चेहेरे

Submitted by श्रीकांत जोशी on 19 July, 2012 - 04:58

म्हणजे चेहेर्‍याच्या साधर्म्यामुळे किंवा नावातील साधर्म्यामुळे कसे गोंधळ होतात बघा. सिनेमात नाही का? लहान अमिताभ मास्टर बबलूसारखा, पण मोठेपणी हुबेहूब स्वतासारखा. केस काळे किंवा पांढरे एव्हढाच फरक. पण बघायच मात्र कस? की चाळीशीतला अमिताभ पंचवीसचा समजायचा आणि तोच पांढरे केस करून आला की साठीचा. प्रत्यक्षात शक्य आहे का?
अहो नाही काय? आहे, शक्य आहे. कशावरून सांगतो.मध्यंतरी मी मणीपालहून येत होतो. मी म्हणजे बायको, मुलगा आणि मी.

कशाला गेलो होतो? मुलाला आणायला. तो तिकडे काय करतो म्हणजे? तुमच्या शंकाच फार बुवा! अहो आमचे हे चिरंजीव महा वांड. घरातल्या कोणाच ऐकायला नको. मनाप्रमाणे वागायाच. उच्छाद आणला होता नुसता. अशी मुल रिक्षावाल्या काकान्च मात्र नीट ऐकतात अस म्हणे. पण हा लेकाचा सायकलीने शाळेत जायचा त्यामुळे तो मार्ग खुंटला. शेवटी विचार केला की जरा घरापासन लांब राहिला की बरोबर सरळ येईल. पण उगाच पुण्या मुंबईकडे ठेवला तर तिथल्यापेक्षा घरीच जास्त राहील. म्हणून पार लांब मणीपालला विचारणा केली. कशीबशी परवानगी मिळवली. पण त्या लोकांनी देखील दोन वर्षच कळ काढली. मग मात्र मागच्या महिन्यात कळवल की आता मात्र बास झाल. परत न्या कस त्याला. हव तर आम्ही भरपाई करतो. म्हणून निघतांना एक सुवर्णपदक, काही सहस्त्र रुपयांचा धनादेश वगैरे दिले. त्याला सांगतांना मात्र आत्तापर्यंतच्या गेल्या दोन वर्षातल्या कामगिरीबद्दल अप्रिसीएशन वगैरे म्हटले. शिवाय निघतांना फूटभर उंचीची चंदनाची मूर्ती आमची आठवण म्हणून ही घे वगैरे सांगितले. त्यामागचे रहस्य आम्हा दोघान्नाच माहीत.
तर सांगत काय होतो? आम्ही मणिपालहून आरामबसने पुण्याला येत होतो. उजवीकडच्या ओळीत आम्ही दोघ आणि डावीकडच्या ओळीत चिरंजीव आणि कोणी गोरा अमेरिकन. उडुपीहून सुटल्यापासून दोघात कोणत्यातरी विषयावर जोरदार चर्चा चाललेली. (माझा मुलगा संपूर्ण मराठी माध्यमातून शिकल्यामुळे त्याचे इंग्रजी उत्तम आहे.) इकडे आम्ही समोरच्या टी. व्ही. तल्या सिनेमाच्या आवाजावर आवाज चढवून वन्स, सासूबाई, पुरणपोळी, उकडीचे मोदक वगैरे जागतिक महत्वाच्या विषयांवर - अर्थात मराठीत - चर्चा करत होतो. अचानक मागच्या सीटवरच्या माणसाने पाठीवर टकटक केले. मी दचकून मागे पाहिले. आम्हा उभयतात चाललेली राष्ट्रीय महत्वाच्या गुपितांची देवाणघेवाण मराठीत असल्याने अन्य सत्तेचाळीस जणांना कळणार नाही या समजुतीत मी होतो.
"यस सर?" टकटक करणारा साधारण पन्नाशीच्या पुढचा असल्याने -अर्धवट पांढरी दाढी, व्यवस्थित कपडे वगैरे - त्यामुळे जास्तीत जास्त सभ्य सूर काढून मी विचारले "यस सर?"
"तुम्ही मेरिलीन डिसोझा का?"
मी क्षणभर कोमात. हा मलाच विचारतोय का समोरच्या मद्राशिणीला? मेरिलीन हे बाईचे नाव असल्याचे आठवत होते. आमच्या वेळी याच नावाची मन्रो घराण्यातली एक हृदयदुखी असल्याचे आठवत होते. काही दिवस ही बया जगातल्या सुंदर स्त्रियांमध्ये दोन नंबरला आम्ही बसवली होती. करेक्ट, एक नंबर मधुबाला. ती आजतागायत काय उद्या परवातागायत सुद्धा तिथेच असणार. दोन नंबर बदलता असायचा. शुक्रवारी सिनेमा बदलावा तसा. मग तिथे कधी वैजू, कधी वहिदा, कधी आशा (यांना परके अद्न्य लोक वैजयंतीमाला, वहिदा रहमान किंवा आशा पारेख अशा नावांनी सुद्धा ओळखायचे.) असत. नंतर नंतर नटाली वुड, माधुरी, प्रीती वगैरेही येऊन गेल्या. काही तासांपुरत्या झरीना, जाहीदा, टीनासुद्धा हजेरी लावून गेल्या. पण एक नंबरला हात लावायची कुण्णा कुण्णाच्यात धैर्य नव्हत.
तर मी त्याला स्त्री स्वरूपात कसा काय वाटलो असेल या शंकेने मी व्याकुळ झालो. माझी ही अवस्था त्याच्याही लक्षात आली असावी. त्याने परत विचारले "मेल्विन डिसोझा ना?"
अच्छा. टी.व्ही.वरच्या गोंधळात मीच चुकीच ऐकल तर. आता मी त्याला कोण्या अद्न्यात मेल्विनसारखा कसा दिसलो हा प्रश्न माझ्या चेहेर्‍यावर उगवला. आणि खरच की, हा गृहस्थ चक्क शुद्ध मराठीत बोलतोय की! मी अत्यंत दुख्खद स्वरात मेल्विन नसल्याच जाहीर केल. त्यानेही दाढीच्या आसपासचा प्रदेश वगळून चेहेरा पाडला. जेवणाच्या थांब्यावर त्याने जे सांगितले त्याप्रमाणे मंगळूरला त्याच्या वर्गात हा मेल्विन होता. अडुसष्ठला मॅट्रिक झाल्यावर हा मुंबईला पुढच्या शिक्षणासाठी आला आणि गेली पंचवीस सव्वीस वर्षे पुण्यात चर्चमधे असतो. त्याच्या डोळ्यासमोर अडुसष्ठ सालातली मेल्विनची जी प्रतिमा होती त्याच्या अनुरोधाने मी आज दिसतो अस त्याच म्हणण होत. मी मेल्विन नसल्याने झालेली त्याची निराशा त्याच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसत होती.
गावके मेलेमे (हो, गोव्यात अजून जत्रा वगैरे असतात. आपल्याकडे उरूस असतात का नाही तसच.) माझा कोणी जुडवा भाई वगैरे हरवल्याच आई बाबांनी सांगितल आठवत नव्हत. हा घोटाळा केल्याबद्दल त्याने आमचे दोन कॉफी आणि एक लिंबू सोडा याचे बील सुद्धा (दोन रुपये टीप सह) आम्हाला देऊ दिले नाही.
मी जेंव्हा कामिन्सला नवीन नवीन आलो त्यानंतर काही दिवसातच शॉपवरच्या एका ऑपरेटरने "काय धन्या, कधी लागलास इथे?" असे पाठीत बुक्का घालून विचारले. कराडला त्याच्या वर्गातल्या कोण्या धनंजय नावाच्या मुलाच्या व माझ्या चेहेर्‍यातल्या साम्यामुळे हा घोटाळा झाला होता. मी धनंजय नाही हे सिद्ध करता करता पुरेवाट झाली. शेवटी शेजारी उभ्या असलेल्या फोर्क लिफ्टच्या सीटवर हात ठेवून 'सच के सिवा कुछ ना कहूंगा' अस सांगितल्यावर त्याचा विश्वास बसला.

एके काळी कामिन्समधे आम्ही चार श्रीकांत जोशी होतो. एक क्वालिटीला, एक टूल प्लॅनिंगला, दोघे शॉपवर - त्यातला मी एक. त्यामुळे याची पत्र त्याला, याचा निरोप त्याला अस नेहेमी व्हायच. तरी त्या वेळी फोनच एव्हढ प्रस्थ नव्हत. त्यावरून आठवल. एकदा सेकंड शिफ्टला आलो होतो. सेक्शनमधला फोन वाजला. त्यावेळी संध्याकाळी आलेले फोन प्रथम गेटवर लागत. तिथला वॉचमन त्या त्या सेक्षनला ते ट्रान्स्फर करे. सेक्षन मधे ज्याने उचलला त्याने सांगितले की तुझाच फोन आहे म्हणून. माझे वडील साधारण महिन्यातून दोनदा फोन करायचे. तेसुद्धा आमच्या घराखालच्या दुकानदाराकडे फोन होता त्याच्याकडे. मग कंपनीत फोन? मी उचलला. पलीकडून एका बाईचा घाबरट स्वर (त्यावेळी आम्ही केवळ आवाजावरून पलिकडची व्यक्ती बाई आहे का मुलगी, ठीक ठाक का सुंदर का लाखात एक असेल अशी वर्गवारी निष्णातपणे करायचो.) "श्रीकांत..श्रीकांत..अरे श्री...."
अरेच्या, आई आणि इतक्या घाबरट स्वरात बोलू शकेल? शिवाय इतक्या सरळसोट नावाने कधीपासून हाक मारायला लागली? "रे मेल्या, बरा आहेस ना? पयसे बियसे पुरवतोयस ना गध्या?"
छे, हा माझा फोन नसावा. शिवाय टेलीफोनमधे एव्हढी खरखर? त्याकाळी स्थानिक फोनसाठी बेम्बीच्या देठापासून ओरडावे लागे. पण पणजीहून बाबांचा फोन मात्र स्वच्छ ऐकू यायचा. आई पुण्यात येऊन ठाकली की काय? भिंतीवर, गादीखाली, खोलीच्या कानाकोपर्‍यात अनेक पुरावे नष्ट करायचे होते. मालकांकडून किल्ली घेतली तर? अरे पण ही पुढे का बोलेना?
"अग बोल ना! नुसत श्रीकांत श्रीकांत काय?"
अरे काय सांगू कपाळ? शेजारच्या बर्व्यांकडे मगाशी चोर शिरले. दोघांना बांधून ठेवून सगळ घर धुवून नेल रे मेल्यांनी. तू ये कसा लगेच. पोलीसांनी नुसते प्रश्न विचारून भंडाऊन सोडलय. सारखे येऊन आम्हालाच काहीतरी विचारातायत."
बर्वे? हे कोण बर्वे? आमच्या दोन्ही बाजूला दोन कुटुंब राहायची खरी. पण त्यात बर्वे कोणी नव्हते. डावीकडच्या सावंत काकांकडे जर हे चोर घुसले असतील तर सावंतीण काकुंच्या हातून धडीने सुटणे महाकठीण. किमान एखादा तरी अवयव गमावून बाहेर पडू शकतील. काकासुद्धा थोडेसे लंगडतात ते सायटीकामुळे असे जरी सांगत असले तरी अन्दरकी बात सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे त्या बाजूची निश्चिंती होती. ह्या बाजूचे पेंडसे. त्यांना असे बांधून ठेवण्याची आमच्याच कंपूची फार इच्छा होती. म्हणजे चोरी बिरी काही करायचा प्लॅन नव्हता. पण म्हातारा म्हातारी भयंकर खत्रूड. त्यांची पोरगी आमच्या दृष्टीला सुद्धा पडू नये म्हणून जी काही खटपट करायचे की बस. आमच्या सारख्या सभ्य मुलांची जरा सुद्धा चाहूल लागली तरी तिला आतल्या खोलीत पिटाळायचे. त्यांना लुटल्याबद्दल आभार प्रदर्शनाच भाषण करायला बोलावलाय की काय? तिकडे फोनही बंद झालेला. मी धावपळ करत घरी पोहोचलो. त्या आघाडीवर सर्व सामसूम. काकू जेवण वगैरे उरकून आवराआवरी करत होत्या. काका आराम खुर्चीत सकाळ वाचत बसलेले. मुख्य पात्र आतल्या खोलीत अभ्यास करत असावे. विचारणार कस? अरेच्या, पण आई कुठाय? खोलीही बंद आहे. नक्की काहीतरी घोटाळा झालाय. टूल्सवाला श्रीकांत बरेचदा उशीरा पर्यंत कारखान्यात असायचा. त्याचाच फोन असणार. तो पुण्याचाच. लग्नानंतर कोथरुडला राहायला गेला. धडपडत तिकडे जाऊन निरोप देऊन आलो अन् काय!!

एकूण अशा घोटाळ्यांमुळे फायदा कधीसुद्धा नाही. अशोक सराफ, सचीनला कस चेहे र्‍या च्या सारखेपणामुळे गुंड, मवाली असतांना सुद्धा लक्षाधीशाकडे राहायला मिळाले. आम्हाला मात्र "कसली चोरी अन् काय. घरात घुसायला कारण काढतायत लेकाचे." ही मुक्ताफळ ऐकावी लागली. पुढच्या जन्मात वटवाघूळ होतील अशा वागणुकीने. मनुष्य जन्म मिळालाच तर अमृतसर किंवा तरणतारण अशा ठिकाणी कटिंग सलून काढाव लागेल. मग बसा दिवसभर सकाळ किंवा तरूण भारत वाचत. सत्शील ब्राम्हणाचा तळतळाट घेतलाय म्हणाव.
जाऊ दे. बराच वहावत गेलो. पण बरीच वर्ष (बरोबर सांगायाच तर सत्तावीस वर्ष. ऐंशीच्या मे मधे कु. पेंडसे नागपूर अमरावतीकडे उजवली गेली.) मनात दाबून ठेवलेले दुख्ख कुठेतरी सांगितल्याने कस हलक हलक वाटतय. तुमच्यासारखी सहृदय माणस आजकाल कुठे सापडतात?

गुलमोहर: 

छान...:)

शैली छान वाटली. खुसखुशीत आहे. चोरी कुणा़कडे झाली याची उत्कंठा लागून राहिली. शेवट घाईत केला असं वाटलं.