आत्मपरीक्षण - कॊंग्रेसी स्टाईलचे

Submitted by Kiran.. on 22 December, 2009 - 04:02

आधीचा भाग इथे वाचा
http://www.maayboli.com/node/12831

हायवेवरून आत शिरणा-या रस्त्यामुळे झालेल्या चौकात कोप-यात गांधींजींचा पुतळा अनुयायांच्या प्रतीक्षेत काठी टेकत उभा होता. सर्वत्र दाट कळोख असूनही रातकिड्यांचा किर्रर्र आवाजही नव्हता. महात्म्याच्या प्रभावाने त्यांचेही मौनव्रत चालू असावे. पुतळ्याखालच्या अंधूक प्रकाशात मध्यरात्री काँग्रेसी बगळे जमले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपला उमेदवार पडल्याने तिथे आत्मपरीक्षण केले जाणार होते.

"बबन्या, किती वाजलं रं ?
चपटी संपवण्याच्या बेतात असणारा बबन्या घड्याळात बघत म्हणाला " दहा दहा "
"डोस्कं फिरलं का रं ? तुक्याचा बार अकराला बंद झाला अन नंतर मंजुळाबाईंची बैठक एकला संपली न्हवं ?"
" आयला ह्या बबन्याच्या ! ह्यानीच आपल्या घड्याळात दहा दहा वाजवून दुस-याच्या घड्याळाला चावी भरली. याच्या तर xx ला XX लावाय पायजे"

इतक्यात लांबवर एक पांढरी स्कॉर्पियो थांबली. रात्रीच्या अंधारात रेबॅनचा गॉगल, हातात सोन्याचं कडं आणि शिनीयॉरिटीप्रमाणे सर्वात शुभ्र आणि स्वच्छ कपड्यात तात्यासाहेब पुतळ्याजवळ डेरेदाखल झाले.

" तात्यासाहेब... या या. सगळ्यात पहिल या भXXच्या XXवर XX मारा "

गॉगल खिशात टाकत तारवटलेल्या डोळ्यांनी सर्वांकडे पहात तात्यासाहेबांनी आपला हात वर केला. खरं म्हणजे त्यांना काहीच न सुचल्याने त्यांनी हात वर केला होता. पण त्याबरहुकूम वर माना करणारे बगळे चांगलेच वरमले. वर त्यांना महात्माजी दिसले आणि त्यांनी तात्यासाहेबांच्या प्रसंगावधानाला दाद दिली.

" इज्या भोXXच्या , पुतळ्याखाली बसून शिव्या देतुस व्हय रं रांडीच्या ?"

" ए बबन्या माजावर आलास का?"

तात्यासाहेबांनी पुन्हा दुसरा हात वर केला. पुतळ्याच्या खाली चालू असणा-या एकमेव पण आता पिवळी पुटं चढल्याने शोभिवंत वाटणा-या एकमेव दिव्याच्या प्रकाशात पुतळ्याखाली दोन्ही हात वर केलेले बसक्या नाकाचे काळेढुस्स तात्यासाहेब एखाद्या वाट चुकलेल्या एकाकी वाटसरूला पार्श्वभाग ढिल्ला होण्यास समर्थ भासत होते.

" बंधू आणि भगिनींनो,

आज आपण या ठिकाणी का जमलो आहोत ? " ओठ बंद करून आचमन केल्यासारखी तोंडाची हालचाल करत त्यांनी एक पॊझ घेतला.
" आपण हितं जमण्याच कारण म्हंजी आपला उमेदवार पडला. त्यो पडल्यानं श्रेष्ठी लई नाराज झाल्यालं हाय. तर आपला उमेदवार का पडला ह्याचं आत्मपरीक्षण करा असा आदेश मीळाल्यानं आपण हिथं जमल्यालो हाय. "
सर्वांनी समजले या अर्थाने माना डोलावल्या..

" आत्मपरीक्षण करून आपल्याला डिट्टेल रिपोर्ट वर पा ठ वा य चा हा य.." शेवटची अक्षरं जुळवत असतानाच बगळे पुन्हा वर पहायला लागले. वर महात्मा चपटीच्या भपका-याने अंग चोरून पुतळा झालेत असा उगीचच बबन्याला भास झाला.

तात्यासाहेब बोलत असतानाच ट्टॉक असा बूच उघडण्याचा चिरपरिचित आवाज सर्वांच्या तीक्ष्ण कानाने टिपला. आपले बोलणे थांबवून तात्यांनी आवाजाच्या दिशेने पाहीले. एका डोळ्यांत फूल पडलेल्या, चेह-यावर देवीचे व्रण असलेल्या आणि सहसा डोक्याला काम नसणा-या विशालकाय जगन्याच्या हातात शँपेनेची बाटली होती.

" च्यामारी ! शिनीयरला चपटी आन या भोXXच्याला शँपेन ?"

प्रोटोकॊलच्या प्रश्नावरून तात्यांच्या जीभेवर आता सरस्वती नाचू लागली होती. पुतळ्याने कानावर हात ठेवल्याचे दॄश्य बबन्याने पाहीले.

जगन्याने बाटली हलवताच आतून शँपेन फसफसत वर आली. विजारीच्या खिशातून आणलेल्या स्टीलच्या ग्लासात ओततांना तो शांतपणे म्हणाला..

" कारखान्याच्या मिटींगला गेलतु. दादासाहेबांनी प्रेमानं दिलीया.. न इच्चारता !!" न इच्चारता या शब्दांवर जगन्याने उगाच जोर दिलाय असे तात्यांना वाटले. त्यातच कारखान्याचे नाव काढल्याने नुकत्याच झालेल्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची खपली निघून त्यांचा चेहरा मोसंबी नारंगीसारखा झाला. त्याच तिरीमिरीत त्यांनी जगन्याच्या कानाखाली ठेवून दिली.

" तुझ्या XX च्या ....! XXXXX अस्तनीत निखारं व्हतं अन आम्ही म्हणतुय काय जळतंया ..!"

" तात्यासाहेब. त्वांड आवरा. च्यायला हितकी वर्स सतरंज्या हाथरल्या पण चपटीच्या वर दानत नाय झाली कधी तुमची.. आमच्यावानी निष्ठावान कार्यकर्तं ह्यो अपमान सहन नाय करनार..!" जगन्या हात झटकत म्हणाला.

" अस्स ! बुडाला लई मिरच्या लागल्या जणू ? काय रं काय करशील रं माXXXX ?"

इतका वेळ राखलेला संयम शेवटच्या ओवीने सुटल्याने जगन्याने तात्यासाहेबांना ढुशी मारून पाडले. तो तात्यांच्या छातीवर बसून ठोसे मारू लागल्याचे पाहून बबन्या तिरीमिरीत त्याच्या दिशेने धावला. पण आपन उंच कधी उडालो आणि सावरत उठणा-या इज्याच्या अंगावर कधी आदळलो हे जसे त्याला समजले नाही तसेच इज्यालाही कळाले नाही.

तारवटलेल्या पण आता श्वास घुसमटल्याने विस्फारलेल्या डोळ्यांनी जगन्याकडे बघत तात्या काहीतरी ओरडायच्या बेतात होते मात्र , त्याच वेळी एक मर्मभेदी ठोसा बसल्याने त्यांच्या तोंडातून बेडकासारखा विचित्र आवाज बाहेर पडला आणि उजवा हात वर करतानाच ते सुरापानासाठी आकाशस्थ झालेही !

तात्यांना हात वर करून निश्चल अवस्थेत पडलेले पाहताच जगन्याची खाडकन उतरली. सगळेच इतस्तत: विस्कळीत रित्या पडल्याचे पाहून त्याने तिथून धूम ठोकली. त्याचं अनुकरण इत्रांनी केलं आणि बैठक बरखास्त झाली.

सकाळच्याला पुतळ्याभोवती गर्दी जमा झाली होती. पुतळ्याच्या दिशेने बोट दाखवत विनोदी चेहरा केलेल्या तात्यासाहेबांकडे पहात प्रत्येकजण हसू दाबत हळहळत होता . इतक्यात जगन्याबरोबर दादासाहेब तिथं पोहोचले. पक्षाचा पराभव सहन न झाल्याने तात्यांनी रात्रभर आमरण उपोषण करून आपला देह पुतळ्याच्या चरणी ठेवला असे काहीसे ते बोलले.

भाषण संपल्यावर महात्मा गांधी कि जय, तात्यासो अमर रहे वगैरे घॊषणांनी परिसर दुमदुमला.

चौथ-याच्या मागच्या बाजूला पडलेल्या चपट्यांच्या साक्षीने आत्मपरीक्षण करण्यांत पुतळा मात्र मग्न झाला होता...

( जितका जुना पक्ष तितके मोठे आत्मपरीक्षण )

गुलमोहर: 

शिव्यांना फुल्या फुल्या देण्याचे कारण काय? ज्या सरळ सरळ कळत आहेत त्यांना लपवायची काय गरज आहे? असल्या भडक शिव्यां ऐवजी दुसरं काही पर्यायी शोधता आलं असतं. उदा. नरसाळ्या, फुकणीच्या, सुक्काळीच्या इ.

मित्रांनो

सर्वांचे आभार..

वैभव... वाचक कुठले आहेत याची कपना असल्याने गाळणी लावली..पण शिव्या कुठल्या ते कळायला पाहीजे होतं..

नरसाळ्या, फुकणीच्या, सुक्काळीच्या या शिव्या म्हणजे गटारी अमावस्येला शिरा, कांदेपोहे असा बेत करण्यासारखं वाटलं जरा.. ?

नरसाळ्या, फुकणीच्या, सुक्काळीच्या या शिव्या म्हणजे गटारी अमावस्येला शिरा, कांदेपोहे असा बेत करण्यासारखं वाटलं जरा.. >>>>
======================
जितका जुना पक्ष तितके मोठे आत्मपरीक्षण ... Happy

गंगाधरपंत...

आभार..
खूप जुनं लिखाण आहे. बालवाडीतलं (ब्लॉगवाडीतलं ) ब्लॉग लिहायची हौस होती तेव्हाचं. पण ब्लॉगचं मार्केटिंग काही झेपलं नाही म्हणून दोन वर्षांपूर्वी माबोवर आलो ते इथलाच झालो. Happy

मस्त .............................................................!

किरणराव..
एक ऑनेस्ट शंका.
>>पण ब्लॉगचं मार्केटिंग काही झेपलं नाही म्हणून..<
म्हंजे काय?
ब्लॉग कधी लिहिला नाही मी. पण त्याचं मार्केटिंग म्हणजे नक्की काय असतं?
ते का अन कसं करावं लागतं?

@ आगाउ

बास का राव ! बेफिकीररावांचा शेलका माल वर काढला. आणि आम्ही विनंती केली म्हणून जिवावर आल्यासारखा शेळका माल काढला होय ? वेचून वेचून काढताय कि Proud

तुमचं कार्य असंच चालू ठेवा. बेफींच्या मिनिटास एक कादंबरी या वेगास आपण सेकंदास एक प्रतिसाद असं ठेवलेलं प्रमाण योग्यच आहे. पाहूयात कोण जिंकतंय ते !