भटकंती -३

Submitted by इन्ना on 5 June, 2012 - 07:32

असंच काही बाही.

आयुष्यात काही भारी माणसं भेटतात. विविधरंगी, प्रसंगी चक्रावून टाकणारे, विचार करायला लावणारे अनुभव देऊन जातात.

ह्या उन्हाळी सुट्टीत मी आणि माझा मुलगा, वय वर्षं १४, जर्मनी भटकायला गेलो होतो. १२-१३ दिवसांत, बर्लिन, म्युनिक, स्टुटगार्ट, हायडेलबर्ग असा ढोबळ प्लॅन होता. जर्मन फुटबॉल आणि जर्मन गाड्या हे लेकाचं माझ्याबरोबर येण्याचं कारण.

ह्यावेळच्या दौर्‍याचं वैशिष्ट्य म्हणजे मुक्काम वेगवेगळ्या स्थानिक लोकांच्या घरी होता. बर्लिनमध्ये माझी आर्किटेक्ट मैत्रीण, म्युनिकमध्ये तिचा भाऊ, स्टुटगार्टमध्ये एक स्पॅनिश फॅमिली आणि हायडेलबर्गमध्ये एक मेक्सिकन. हा भारतातील वेदशाळा ह्या विषयावर पीएचडी करतो हायडेलबर्ग युनिवर्सिटीमध्ये.

बर्लिनमधली माझी मैत्रीण गेल्या महिन्यात ५० वर्षाची झाली. इथे पुण्यात कामासाठी आली की माझ्या घरी राहते. भारतीय लोक, त्यांचे सणवार आणि त्याना लहानपणापासून असलेली अध्यात्माची ओळख (?) हे तिच्या इंट्रेस्टचे विषय! नेहमी मीच येते तुझ्या घरी, तू पहिल्यांदाच आलीस, म्हणून हिने चक्क रांगोळी, तोरण वगैरे तयारी केली होती! हिच्याकडे राहताना एकूणातच नाती, त्यांना जपणं, लेबलं लावणं, मोडलेली नाती ह्याबद्दलच्या माझ्या बाळबोध अनुभवांना धक्का बसला. इस्ट जर्मनीत शिकताना वयाच्या २१व्या वर्षी हिचा मुलगा जन्मला, पण त्याच्या बाबाबरोबर त्या वयात राहणं ठीक होतं, नंतर पटलं नसतं म्हणून लग्न नाही केलं.
तिचा म्युनिकला राहणारा मोठा भाऊ त्या विकेंडला बर्लिनमधे होता, एका पार्टीसाठी आला होता. त्याच्या जुन्या मैत्रीणीचा ५० वा, म्हणून स्पेशल वाढदिवस साजरा करायला. पार्टी तिच्या नवर्‍याने आयोजित केली होती. त्यासाठी तिच्या आयुष्यातले सगळे महत्वाचे लोक आले होते. त्यात हा आणि अजून २ जुने मित्र! माझ्या झेपण्याच्या पलिकडे होतं हे. रात्रभर भरपूर गप्पा, खाणं, पिणं, नाचणं करुन कोणत्याही कडवटपणाशिवाय ह्या मंडळींनी आनंदाने वाढदिवस साजरा केला.

ही नवी जुनी नाती मनापासून वागवता, जपता येण्यासाठी मनाची किती प्रगल्भता लागेल, नाही का? माझ्याबरोबर एवढ्या प्रवासात हा बरोबर होता. मग आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. हे, स्वतःला कोणती वाट चालायची आहे हे ओळखणं, ते स्वतःशी मनोमनी मान्य करणं, मग त्या वाटेवरचे सहप्रवासी भेटणं आणि मग त्या वाटा वेगळ्या झाल्यावर सुद्धा, त्या वेळी, त्या वाटेवर तुझ्याबरोबर चालायला आनंद वाटला, अशी कबुली देऊ शकणं. अर्थात, हा सहजपणा आहे, कारण त्यासाठी तिथली सामाजिक परिस्थिती पूरक आहे. (हे मा वै म)

पहिल्या दिवशी हे सांस्कृतिक धक्के बसल्यावर मग एक चर्चासत्रच झडले रात्री जेवताना. मैत्रीण, तिची मोठी बहीण, मुलगा, अजून एक सहकारी वगैरे...

माझे बाळबोध प्रश्न विचारले मी त्याना. आणि त्या मंडळींनी सुद्धा कोणताही किंतु मनात न आणता मला उत्तरे दिली.

बर्लिनसारख्या मोठ्या शहरात एकेकटे आणि स्वतंत्र रहाणारे माय -लेक, भाऊ, बहीण, वर्षातून ४-५ वेळा एकत्र प्रवास करतात, धमाल करतात. भावनिकरीत्या एकमेकांवर फार अवलंबून असतात. घरी स्पेशल डिश बनली तर इतरांना डबे पाठवले जातात. ह्या सगळ्यांची मावशी , ८५ वर्षांच्या आजीबाई, ह्या भाचरांना वर्षाचे फ्रूट प्रिझर्व, सिझनिंग वगैरे करुन पाठवते. ह्या सर्वांची ही नाती वागवायची सहजता फार भावली मला. नाही म्हणायला, लेकाने एक लोडेड मत व्यक्त केलं दुसर्‍या दिवशी. "इन्ना, मला वाटतं खरं म्हणजे लग्न काही मॅंडेटरी नाही." Uhoh
जगात वेगवेगळ्या ठिकाणी चालीरीती वेगवेगळ्या असतात, असं म्हणून मी पुढे सरकले.
पुढे त्याचाही प्रत्यय आलाच.

स्पॅनिश घरात आई, बाबा, दोन मुलं, वय वर्षं ४ आणि १.५, अजून एक येऊ घातलेलं. घरात शिक्षणासाठी आलेली दूरची नातेवाईक. एकुणात सीन आपल्याकडच्या चाकरमान्यांसारखा .

मग एका इटालियन आप्तांना भेटायचं होतं. तिथे तर माझी इंडियन लेक आली आहे तिच्या मुलाबरोबर म्हणून एक गटग झालं. फक्त फॅमिली म्हणून २०-२२ जण आले होते! काका, काकू, त्यांची लेक, तिचा मित्र. काकांचा सख्खा मित्र -म्हणजे फॅमिलीच ना!- त्याची पोरंबाळं, २ कुत्री, काकांची बहीण, भाचरं, आपापल्या मित्रमैत्रिणींसोबत, अजून एक मित्राचा मित्र, -"तुझ्याशी ओळख करुन घ्यायची आहे भारतात काम करायचंय त्याला म्हणून" - आलेला.

बिग फॅट इटालियन लंच!! मग गप्पा, इटालियन इंग्लिशमधून!
"अगं, हे खाऊन बघ, अग हा पास्ता इथल्यासारखा अजून कुठ्ठे मिळणार नाही!"
पार्मसान चीज, त्यासाठी स्पेशल गवत खाणार्‍या गाई! फेरारी, लॅम्बॉर्गिनी!
"आमच्या इटलीतल्या समर हाऊसमध्ये खरं तर तू रहायला हवं होतंस!"
एक ना दोन! दुपारभर चालू असलेला हृद्य समारंभ संपताना पोट आणि मन, दोन्ही तुडुंब भरलं होतं आणि डोळे पाणावले होते.

युरोप, त्यातूनही जर्मनी जेव्हां कामानिमित्त समोर आला होता, तेव्हा त्यांचा उद्धटपणाकडे झुकणारा काटेकोरपणा, स्वतःखेरीज इतरांना दुय्यम लेखण्याची वृत्ती हेच रुपडं समोर आलं होतम. ह्या भटकंतीमुळे वेगळा माणूस पुढे आला.

अजून काय पाहिजे?

http://www.maayboli.com/node/31802 भटकंती-१
http://www.maayboli.com/node/35461 भटकंती २

गुलमोहर: 

.

खुपच छान लिहीले आहेस इन्ना..
त्यांच्या व आपल्या जडण-घडणी, आचार-विचार व मानसिकतेतला फरक आहे.त्यामुळे पटते पण पचनी पडायला कठिण आहे हे सगळे.

अतिशय सुरेख लेख.

>>>>> ही नवी जुनी नाती मनापासून वागवता, जपता येण्यासाठी मनाची किती प्रगल्भता लागेल, नाही का? माझ्याबरोबर एवढ्या प्रवासात हा बरोबर होता. मग आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. हे, स्वतःला कोणती वाट चालायची आहे हे ओळखणं, ते स्वतःशी मनोमनी मान्य करणं, मग त्या वाटेवरचे सहप्रवासी भेटणं आणि मग त्या वाटा वेगळ्या झाल्यावर सुद्धा, त्या वेळी, त्या वाटेवर तुझ्याबरोबर चालायला आनंद वाटला, अशी कबुली देऊ शकणं. अर्थात, हा सहजपणा आहे, कारण त्यासाठी तिथली सामाजिक परिस्थिती पूरक आहे. >>>>> अगदी भावलाच.

मस्तच

झकास Happy

छान लिहिते आहेस. अजून तपशीलाने लिहिलेस तरी आवडेल Happy
>>>तू पहिल्यांदाच आलीस, म्हणून हिने चक्क रांगोळी, तोरण वगैरे तयारी केली होती! <<< वा क्या बात है| यात त्यांचे कौतुक आहेच पण तुझेही कारण असे काही तू केले असशील म्हणूनच ना त्यांना समजले Happy
>>>ह्या भटकंतीमुळे वेगळा माणूस पुढे आला.<<< सही !
लिहित रहा, अजून आतून... अजून आतून, "इन्ना" सारखी Happy

हे अधि वाचले होते पण आता सदस्यत्व झल्या वर प्रतिक्रिय देता येइल. Happy
पुधच्या भगाचि वाट पहात आहे. मराथि लिहिन्याचा सराव झल्यावर सविस्तर प्रतिक्रिया लिहिन.

हे कसं काय मिस केलं होतं मी ?
मस्त लिहिलंय. अजून लिहित रहा

माझी एक पोर्टोरिकन मैत्रीण आहे. तिचा नातेवाइकांचा गोतावळा फार मोठा आहे - बरेचसे लोक न्यू यॉर्क भागात रहातात. पोर्टोरिकोमधे रहाणारे एक दूरचे अंकल खास फीस्ट असली की डबे डुबे बांधून न्यू यॉर्कला येतात विमानाने. इथे गाडी चालवायला भिती वाटते म्हणून ट्रेन ने फिली पर्यंत येतात. चांगलं न्यू यॉर्क , गेला बाजार जस्री सिटी सोडून कुठे खेड्यापाड्यात रहाते म्हणून माझ्या मैत्रिणीला शिव्या घालतात. पण पोराबाळांनी त्यांनी आणलेला खाऊ खाल्ला की डोळे पुसत परत जातात ! वर्षातून दोन तरी खेपा असतातच आजोबंच्या . स्वतःच सामान एका बॅकपॅकमधे अन चेक इन बॅगांमधे पन्नास एक पाउंड खाऊ भरलेला असतो...

Pages