त्या दिवशीची ती बातमी वाचतांना चहाचा कप खालीच ठेवला. शहारे आले अंगावर..
सुखी संसाराची स्वप्नं पाहत नवविवाहित दांपत्य दुस-या शहराल निघालेलं आणि व-हाडी दोन तीन गाड्यांतून. एप्रिल मे च्या हंगामात सर्रास दिसणारं हे चित्रं. बसला शुभ विवाहाचे कापडी बॅनर्स झळकत असतात. लग्नाचे विधी, चालीरिती, मानपान , उकाडा, गर्दी यामुळे दिवसभराचा शीण येऊन अंग ठणकत असतं. नातेवाईक भेटले म्हणून उगाच गप्पाष्टकं पडलेली आणि दुपारी तीन पासून निघू निघू म्हणता म्हणता रात्रीचे आठ वाजतात आणि मग हा दिसतोय का, तो दिसतोय का... माझी पोरगी राहिली असा सावळा गोंधळ घालत गाड्या रात्रीच्या अकरा बाराच्या दरम्यान प्रत्यक्षात निघतात.
कुठल्यातरी मित्राच्या ओळखीने बस स्वस्तात मिळालेली असते. ड्रायव्हर म्हणून मिसरूडही न फुटलेलं पोरगं असतं. दिवसभर ते गुटख्याच्या पुड्या रिकाम्या करत इथं तिथं पिचका-या मारत बसलेलं असतं. अधून मधून मोबाईलवर बोलत असतो. निघा म्हटल्यावर निर्विकारपणे बस चालू करतो. त्यालाही भूक लागलेली असते. झोप डोळ्यांवर असते. पण रात्रीची गाडी हा हा म्हणता हाकू हा फाजील आत्मविश्वासही..
मग फिरक्या घेत, हसत खेळत प्रवास सुरू होतो. लग्नात उरलेलं बांधून घेतलेलं असतं. कुणाकडे तरी प्लेटसची पिशवी असते. मग गाडीतच जेवण सुरू होतं आणि इतक्यात काही तरी होतं आणि प्रवासाला खीळ बसते.
थोड्या फार फरकाने हा प्रसंग नेहमी घडतो. कधी व-हाडाला घेऊन जाणारी सुमो जीप असते, कधी ट्रॅक्टर, कधी ट्रक तर कधी बस. वाहन मिळेल ते. पण ते स्वस्तात मिळालं याचा आनंद असतो. पिवळ्या पाटीची वाहनं येत असली कि मी त्यांना साईड देतो. अतिशय बेदरकार पद्धतीने हाकलं जाणारं वाहन म्हणजे पिवळ्या पाटीचं वाहन. याशिवाय पिवळी पाटी न लावता बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणारी वाहनं असतातच.
आताच्या घटनेत रात्रीच्या वेळी शेवटच्या लेन मधे वाहन थांबवून ड्रायव्हर टायर चेक करत होता. हायवेला गाड्या उभ्या करण्यासाठी स्वतंत्र लेन ठराविक अंतरावर आहेत. पण रात्रीच्या अंधारात त्या दिसणार नाहीत आणि टायर फुटला तर नाईलाज असतो. अशा वेळी गाडी उभी करताना गाडीच्या मागे ५०० मीटर अंतरावर (?) रिफ्लेक्टर लावणं गरजेचं असतं. हे गुटखाछाप ड्रायव्हरांच्या गावी तरी असतं का ? स्वस्तात मिळालेल्या बसचे पार्ट्स, टायर हे चेक करायची गरजच पडलेली नसते. खरं तर महागडी कार जरी असेल तरीही ती प्रत्यक्ष दारात उभी राहीपर्यंत कुठलं वाहन मिळणार आहे याची कल्पना नसते.
जीवन किती स्वस्त झालंय याची चर्चा होत राहणार आहे. पण आपण हायवे वर आहोत. दोन बसच्या मधे बसताना काही विपरीत घडलं तर ... ही पुसटशीही शंका एकालाही येऊ नये ? डोळ्यांवर असलेली झोप आणि गप्पा, त्यातून अडचणीच्या ठिकाणी ओढवलेला प्रसंग. वेळ सांगून येत नाही हे खरंच. तरीही शक्य तितक्या कडेला थांबण्याचे केले असते तर ?
कबूल आहे, या जर तर ला अर्थ नाही. पण काही होत नाही तोपर्यंत शहाणे व्हायचेच नाही या बेपर्वा वृत्तीला काय करायचं ? तीच गोष्ट त्या किलर ट्रकची.
ब्रेक लागेल, वाहन आवरेल इतका वेग नक्कीच नसावा ट्रकचा. रात्रीच्या वेळी व्हिजिबिलिटी अतिशय कमी झालेली असताना ट्रकसारख्या वाहनाने ६० - ७० च्या वेगाने जाणे अपेक्षित आहे. पण नीट पाहीलं तर रात्री देखील ट्रकचे सगळे दिवे काम करत नसतात. कित्येकदा समोरून येणारं वाहन एका दिव्यामुळे समजत नाही आणि अचानक जवळ आल्यावर लक्षात येतं कि आपल्या विरूद्ध बाजूचा एकच दिवा चालू असणारा भला मोठा ट्रक आहे हा. त्या वेळी पोटात धस्स होतं.. त्या प्रत्येक वेळी जीवदान मिळालेलं असतं. अशी कितीक जीवदानं मिळत असतात रोजच्या रोज.
देवदर्शनाला चाललेले यात्रेकरू, लग्नाचं व-हाड, मयताची बातमी समजल्याने घाईत निघालेल लोक यांच्या अपघाताची बातमी नेमेचि येतो प्रमाणे वर्तमानपत्रात येत राहते. कधी कधी बरेच दिवसांत पहिल्या पानावर येत नाही. आणि मग अति भयानक अपघात झाल्यावर ती पहिल्या पानावर झळकते.
मग सुरू होतं अपघाताचं पोस्टमार्टेम. रस्त्याला दोष दिले जातात, वैद्यकिय मदत का मिळाली नाही, पोलीस काय करत होते वगैरे प्रश्न उपस्थित होतात.
पण मूळ प्रश्नांचा वेध घेऊन ठोस उपाय दृष्टीक्षेपात येतील का ? कदाचित तेव्हाच त्या २७ जणांच्या आत्म्याला शांती लाभेल.
- Kiran..
सुन्न करणारी बातमी
सुन्न करणारी बातमी होती......... ड्रायव्हर काळजीपुर्वक चालवणारा हवा......जवाबदारी कळायला हवी.. प्रत्येकालाच
किरण, बरोबर लिहिलेत. मला
किरण,
बरोबर लिहिलेत. मला एक्स्प्रेस वे वर जाताना नेहमी कै. भक्ती बर्वेंची आठवण येते. (जिथे त्यांचा अपघात झाला होता तिथे त्यांच्या नावाची पाटीही आहे.)
वैद्यकीय मदत बरोबर हवी, आपत्कालीन उपायामधे सुधारणेला वाव आहे हे खरेच पण आपला "अॅटिट्युड" आणि सवयी बदलणे हे पहिले आवश्यक आहे.
फार वाईट वाटले त्या २७ जणांचे वाचुन..
अशी रस्त्यावर यायला अपात्र
अशी रस्त्यावर यायला अपात्र असणारी वाहने रस्त्यावर येऊ शकतात. कशी, ते मी सांगायला हवे का ?
एस टी ने अशा प्रासंगिक करारावर कायम गाड्या दिलेल्या आहेत. त्यांचे दर पण वाजवीच असतात.
सिझन नसेल त्यावेळी, नियमित एस टी गाड्यांमधूनही असे मोठे गट जाऊ शकतात.
आणि ड्रायव्हर्सना, वाहतुकिचे सर्व नियम शिकवले जातात का ?
असो, पण हि काही आपल्या देशातीलच स्थिती आहे असे नाही. बीबीसी, अल जाझिरा यानी, अशी
चित्रीकरणे केली आहेत. यू ट्यूबवर आहेत.
किरण....मी कोणत्या ना कोणत्या
किरण....मी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने फार फिरतो.....कार्यालयीन जीप वा कारमधून. पण ज्यावेळी ही सरकारी वाहने नसतील त्यावेळी जाणीवपूर्वक एस.टी. महामंडळाचीच....अगदी तांबडी-पिवळी मिळाली तरी घेतो....याला कारण म्हणजे खाजगी वाहन आणि त्यावर नेमणूक केलेले चालक यांच्यावर नसलेला विश्वास.
तुम्ही त्यांच्या सवयीविषयी लिहिले आहे ते योग्य निरीक्षण आहे. त्यातही लग्नाचे वर्हाड मागे बसले असले आणि त्यात महिला वर्ग मोठ्या संख्येने असला की मग चालकाला असा काही चेव चढतो की कुणी सुजाण तिथे असेल तर तो एकतर गाडी थांबवेल वा स्वतः त्या गाडीतून उतरून दुसरा उपाय शोधेल. ही बेदरकार वृत्ती [त्यातही वेगापेक्षा गाडीच्या अवस्थेविषयीची बेफिकिरी] कशी घातक होऊ शकते हे प्रतिदिनी या संदर्भात प्रथम पृष्ठावर झळकणार्या बातम्या दर्शवितातच. मग सुरू होते ते नित्याचे या कृत्याचे धनी कोण ? जबाबदार कोण ? वैद्यकिय सेवा कशी मिळाली नाही....पोलिस खाते किती सुस्त होते....आजुबाजूच्या रहिवाशी मदतीला कसे धावून आले वा ना आले...इ.इ.
जे २७ गेले आणि जे राहिले आहेत त्यातही हातपाय कायमचे गमावलेले असल्याने त्यांच्याही भावी जीवनाच्या स्थितीविषयी भले मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्या कुटुंबियांसमोर आहे, त्याचा तर विचारही करवत नाही.
दुसरीकडे गावात असेही कुणी महाभाग (आणि भागाही) असतात जे बेतालपणे 'लग्नाचा मुहूर्तच चुकला होता....देवदर्शन व्यवस्थित केले नाही बघा....सूनेची पत्रिका अमक्यातमक्याला दाखविलीच नव्हती...' अशी पारावर गुण उधळत बसतात आणि येनकेनप्रकारे सार्या प्रकरणाला अप्रत्यक्षरित्या कारणीभूत कोण आहे तिकडे बोटे दाखवित एखादे महान कार्य केल्याचा आव आणतात.
तसे होऊ नये इतपतच आपण सदिच्छा व्यक्त करू शकतो.
अशोक पाटील
दिनेशदा आणि अशोकजी एसटीचा
दिनेशदा आणि अशोकजी
एसटीचा तुम्ही दोघांनी मांडलेला मुद्दा अतिशय अचूक आहे. एसटीला कितीही नावे ठेवली तरी जवळ जवळ विनाअपघात सेवा हा विश्वास त्यांनी कमावलेला आहे. मात्र लग्नसराईच्या काळात एसटीवर ताण येत असल्याने प्रासंगिक करारासाठी पुरेशा संख्येने गाड्या उपलब्ध होत नाहीत.
दुर्दैव हे की तो टेंपो
दुर्दैव हे की तो टेंपो मागेपुढे कुठे न आपटता नेमका शेवटच्या गाडीलाच जाऊन धडकावा. दोन बसच्या मध्ये थांबलेली माणसं कदाचित - रात्रीची वेळ आहे, रस्त्यावर गेलो तर मागून येणार्या गाड्यांना दिसणार नाही - म्हणून सुरक्षित जागा समजून तिथे थांबली असावीत.
ज्या टेंपोने धडक मारली त्याचा ब्रेक फेल झालेला नव्हता किंवा टायरही फुटला नव्हता. [निदान पेपरमध्ये आलेल्या बातमीत हा उल्लेख नव्हता]. अशावेळी आपली लेन सोडून शेवटच्या लेन मध्ये असलेल्या गाडीला जाऊन ठोकणे म्हणजे ड्रायव्हरला डुलकी लागली असण्याचा संभव जास्त. बर्याचदा हे ड्रायव्हर विश्रांती न घेता डबल-ट्रिपल ड्यूटी करत असतात. पुणे-मुंबई प्रवास म्हणजे अगदी नगण्य ठरला आहे. अशा वेळी ड्रायव्हरला जबरदस्ती जर डबल ड्यूटी करायला भाग पडले असेल, तर त्या मालकाला पण जबाबदार धरले गेले पाहीजे.
ईथे दिलेल्या माहितीनुसार,
ईथे दिलेल्या माहितीनुसार, सोनावणे कुटुंबातले ४ जण ह्या अपघातात जागीच दगावले. ६ वर्षाचा मुलगा, जो गंभिररीत्या जखमी झाला होता, त्याला त्याचे वडील मिळेल ती गाडी घेऊन ७० किमी दूर ससूनमध्ये घेऊन आले; पण उशिर झाल्याने तो मुलगा वाचला नाही.
कल्पना करा त्या माणसाची, त्याची बायको, मोठा मुलगा आणि सासू समोर पडले आहेत; धाकटा हातावर शेवटचे आचके देतोय आणि जवळचे हॉस्पिटल / वैद्यकीय व्यवस्था गाडीने तासाभराच्या अंतरावर आहे; त्याची काय अवस्था झाली असेल. [मी हे लिहीताना ३ वेळा थांबलो डोळे पुसायला]. एवढ्या बिझी रस्त्यावर इमर्जन्सी वैद्यकीय व्यवस्था / अॅम्ब्युलन्स नसावी? असेल तर निदान मी तरी बघितली नाहीये. निदान प्रत्येक टोलनाक्याजवळ/फूडमॉलजवळ आणि बोगद्यांजवळ ही व्यवस्था करणे कितपत अशक्य आहे?
ईथे दिलेल्या माहितीनुसार,
ईथे दिलेल्या माहितीनुसार, सोनावणे कुटुंबातले ४ जण ह्या अपघातात जागीच दगावले. ६ वर्षाचा मुलगा, जो गंभिररीत्या जखमी झाला होता, त्याला त्याचे वडील मिळेल ती गाडी घेऊन ७० किमी दूर ससूनमध्ये घेऊन आले; पण उशिर झाल्याने तो मुलगा वाचला नाही.
कल्पना करा त्या माणसाची, त्याची बायको, मोठा मुलगा आणि सासू समोर पडले आहेत; धाकटा हातावर शेवटचे आचके देतोय आणि जवळचे हॉस्पिटल / वैद्यकीय व्यवस्था गाडीने तासाभराच्या अंतरावर आहे; त्याची काय अवस्था झाली असेल. [मी हे लिहीताना ३ वेळा थांबलो डोळे पुसायला]. एवढ्या बिझी रस्त्यावर इमर्जन्सी वैद्यकीय व्यवस्था / अॅम्ब्युलन्स नसावी? असेल तर निदान मी तरी बघितली नाहीये. निदान प्रत्येक टोलनाक्याजवळ/फूडमॉलजवळ आणि बोगद्यांजवळ ही व्यवस्था करणे कितपत अशक्य आहे?
>>>>>>>
+ १००००००
वरती लग्नाच्या वर्हाडाच्या
वरती लग्नाच्या वर्हाडाच्या गाड्यांबद्दल लिहिलय ते काही खरे असले तरी या अपघाताच्या बाबतीत फारसे खरे नाही असे बातमी वाचल्यावर वाटते.
टाईम्स मधे पुर्ण वेळेसकट बातमी आहे त्यानुसार
दोन्ही बसेस सर्विस रोड वर थांबल्या होत्या ( हायवे वर नाही) आणि दोन बस थांबल्यामुळे हायवेवर फिरतीवर असणारा डेल्टा फोर्सची गाडीपण त्यांच्यासाठी येऊन थांबली होती. अर्थातच त्या फिरतीच्या वहानाने रिफ्लेक्टर लावले असण्याची शक्यता जास्त.
त्या फोर्स मधले कुणीतरी जखमीही झालेय.
ट्रकवाला ड्रायव्हरला विश्रांती मिळाली नव्हती असे आजच आलेय बातमीमधे. मालकाला जबाबदार धरणार आहेत बहुतेक.
ईमर्जन्सी वैद्यकिय व्यवस्थेसाठी गेले काही वर्ष बोलणी चर्चा चालु आहेत म्हणे.
ज्या टेंपोने धडक मारली त्याचा
ज्या टेंपोने धडक मारली त्याचा ब्रेक फेल झालेला नव्हता किंवा टायरही फुटला नव्हता. [निदान पेपरमध्ये आलेल्या बातमीत हा उल्लेख नव्हता]. अशावेळी आपली लेन सोडून शेवटच्या लेन मध्ये असलेल्या गाडीला जाऊन ठोकणे म्हणजे >>>>>> द्रुतगती महामार्गावरुन जाताना मोठी जड वाहने, ट्रक वगैरे सर्वात आतल्या लेनमधुन जात असतात (जे वाहतुकीच्या नियमानुसार चुक आहे) आणी त्यामुळे वेगात जाऊ ईच्छीणार्या लहान वाहनांना सर्वात बाहेरच्या लेनमधुन ओव्हरटेक करुन पुढे जावे लागते. आणी मग एखादे नादुरुस्त वाहन रस्त्याच्या कडेला उभे असेल तर त्यावर जाऊन धडकायची शक्यता वाढते.दुर्दैवाने महामार्ग गस्तीपथक अश्या चुकीच्या लेनमधुन जाणार्या वाहनांवर कारवाई करताना पण दिसत नाही.
बातमी सुन्न करणारी
बातमी सुन्न करणारी आहेच.
त्यानी कदाचित साईड लाईट चालु ठेवले नसतील, किंवा गोटे- वा लक्षात येण्याजोग्या गोष्टी लावल्या नसतील. जवळ वळ्ण असल्यास एकदम लक्षात येत नाही अशामुळे अपघाताची शक्यता जास्त असते.
दोन्ही बसेस सर्विस रोड वर
दोन्ही बसेस सर्विस रोड वर थांबल्या होत्या ( हायवे वर नाही) आणि दोन बस थांबल्यामुळे हायवेवर फिरतीवर असणारा डेल्टा फोर्सची गाडीपण त्यांच्यासाठी येऊन थांबली होती.
असं आहे का ? हे माहीत नव्हतं मला. धन्यवाद या माहितीबद्दल.
लग्नाच्या वर्हाडाचे
लग्नाच्या वर्हाडाचे रस्त्यावरचे अपघात व उत्तरेकडे कोंबून भरलेल्या प्रवाशांमुळें बुडालेल्या होड्या, ह्या बातम्या इतक्या नियमितपणे येत असतात कीं डोकं सुन्न होतं; नियमांच्या पायमल्लीमुळे होणार्या व सहज टाळता येण्यासारख्या शोकांतिका ! पण लक्षांत कोण घेतो ?
या रस्त्यांचे ठेके घेणा-या
या रस्त्यांचे ठेके घेणा-या कंपनीविरूद्ध निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणाची केस करता येईल का ? मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून न्यायालयात दावे करता येतील ? उच्चशिक्षित मुलं गेली त्यांच्यासाठी एक लाखाची मदत जाहीर होईल आणि सर्व काही आलबेल. पण इन्शुरन्सच्या नियमाप्रमाणे किंवा अमेरिकेत ज्याप्रमाणे नुकसान भरपाईचं कॅल्क्युलेशन करून जबर दंड केला जातो तसा केला म्हणजे टोलभैरवांना चपराक बसेल.
रस्ते आणि टोलनाक्यांची कंत्राटे म्हणजे खिसे भरायचं कुरण नव्हे यासाठी केस घातली गेली पाहीजे. या रस्त्याला दोन्हीकडे कुंपण आहे. मदतीसाठी जवळच्या हावात जाता येत नाही कि गावक-यांना काही करता येत नाही.
हे कुंपण काढण्यासाठीही आंदोलन व्हायला हवं का ? काय फरक पडतो दोन तासाच्या प्रवासाला २५ मिनिटं जास्त लागली तर ?
अतिशय वाईट बातमी... आणि खरेच
अतिशय वाईट बातमी... आणि खरेच काही वर्षानी आपल्याला अश्या घटनांचे काहीस वाटेनासे होणार आहे
किरण, एकस्प्रेस
किरण,
एकस्प्रेस हायवेच्या दोन्ही बाजूला असलेले कुंपण रस्त्यावर मो ठी गुरे / प्राणी येऊ नये म्हणुन लावलेले
असते.
तरी सुद्धा मी ह्या रस्त्यावर कुत्री मोकाट सुटलेली पाहीली आहेत. ८०-१०० च्या वेगाने जाणार्या लहान
वहानाला त्याचा मोठा धोका होऊ शकतो.
ज्या देशात वाहन चालकाला कुठल्याही शिक्षणाची अट नाही, घर बसल्या, कुठल्याही परीक्षेशिवाय,
प्रशिक्षणा शिवय वाहन चालकाचे लायसन मिळु शकते तिथे असे घडणारच.
पुर्व मध्य देशात वाहन चालकाला लायसन घेण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ( एक तर लायसन
महाग असत, आणि परीक्षा कठीण ! )
हे किती बरोबर आहे हे ह्या अश्या दुर्घटना वरून जाणवते.
ईथे प्रत्येक लहान वहानात रिफ्लेकटर (Triangle) ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे रस्त्यात थांबताना
दगड गोटे, लावण्याऐवजी असे रिफ्लेकटर लावणे जास्त चांगले हे कळते.
किरण.... आज आमच्या भागात
किरण....
आज आमच्या भागात सुन्न करून टाकणारी अशीच एक भीषण अपघाताची घटना. शिर्डीहून दोडामार्ग इथे आपल्या घरी परतणार्या एका कुटुंबाची टोयोटो गाडी निपाणीजवळ पुणे-बंगलोर मार्गावर एका ट्रकवर इतक्या जोराने आदळली की जागच्याजागी दहाजणांनी प्राण गमावले.
दगावणार्यामध्ये श्री.पालयेकर यांच्या दोन मुली, जावई, एक मुलगा, एक नातू, दोन पुतणे, त्यांच्या पत्नी, त्यांची दोन मुले....असे विदारक चित्र आहे.
आता अपघातामध्ये त्या ट्रकचालकाचा बिलकूल संबंध नाही, कारण तो पुण्याच्या लेनमध्ये तर टोयोटो बेळगावच्या लेनमध्ये....मध्ये दुभाजक असल्याने समोरासमोर येण्याचीही शक्यता नाही. तरीही अपघात कसा झाला ? तर साहजिकच टोयोटोमधील ड्रायव्हरला पहाटे झोप अनावर झाली असणार, वेगही भरपूर असावा...कारण टोयोटो चक्क दुभाजकावरून उडी घेऊन त्या ट्रकवर थेट आदळली.
शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन झाल्यानंतर खरेतर त्या ड्रायव्हरची पुरेशी झोप विश्रांती झाली आहे किंवा नाही याची जबाबदारी सहल ठरविणार्या प्रमुखाची असते. इथे तसे घडलेले नाही हे तर उघडच आहे.
काय आणि कसे 'सेफ्टी ट्रॅव्हल' चे शिक्षण देणार वा घेणार ?
अशोक पाटील
मला वाटतं, ईतर उपायांसोबत
मला वाटतं, ईतर उपायांसोबत वैद्यकिय व्यवस्था ठेवणे हे ही अतिशय गरजेचं आहे. सावलीने म्हटल्याप्रमाणे बोलणी सुरु असावीत; पण हा रस्ता सुरु होऊन १० वर्षे झाली आहेत आणि अजून हे झालेलं नसेल तर हा चिंतेचा विषय आहे.
लोकसत्तामध्ये आज आलेल्या बातमीनुसार कॅमेरे लावले जाणार आहेत्; पण हे एवढेच पुरेसे आहे का? रस्ता आहे म्हटल्यावर अपघात होणार; पण त्यासाठी काय तरतूद आहे? ह्या रस्त्यावर १५-२० मिनीटांच्या आत मिळू शकणारी वैद्यकिय व्यवस्था आहे का? मला ठाऊक नाहीये. कोणाला माहिती असेल तर इथे सांगा. प्लिज.
रात्रीचा प्रवास टाळणे इष्ट.
रात्रीचा प्रवास टाळणे इष्ट. कितीही गरज पडली, अगदी कोणाच्या मयतालाही जायचं असलं तरीही रात्री रस्त्यावरून दूरचा प्रवास करायचा नाही. माझ्यापुरतं इतकंच ठरवलं आहे. बाकी देवाची इच्छा!
-गा.पै.
गापै +१ कितीही उशीर झाला तरी
गापै +१
कितीही उशीर झाला तरी आम्ही रात्री प्रवास करत नाही. आपण जरी नीट चालवत असलो, तरी इतरांची काय गॅरेंटी? समोरचा माणुस कसा चालवतो त्या वर आपला जीव अवलंबुन, ही परिस्थीतीच टाळायला हवी.
या सारखाच एक अनुभव माझ्या आते
या सारखाच एक अनुभव माझ्या आते भावाला आला होता. तो देखील असाच लग्नाच्या मंडळींसोबत परतत होता. तो ड्राइवर च्या केबिन मधेच बसलेला होता. औरंगाबाद जवळ त्याच्या लक्षात आले की ड्राइवरला झोप येते आहे कारण त्याने गाडी जवळ जवळ दरीत घातली होती. सुदैवाने भावला ड्राइविंग चांगले येत असल्याने उरलेले अंतर (पुण्यापर्यंत) त्याने एकट्याने गाडी चालविली. गाडीतील इतर कुणालाही याची कल्पना नव्हती. दुसर्या दिवशी सकाळी कळल्यानंतर सगळ्यांनी त्याचे आभार मानले. पण तो जर ड्राइवर शेजारी बसलेला नसता तर काय अनर्थ ओढवला असता?
असाच एक अपघात मागे पनवेलजवळील
असाच एक अपघात मागे पनवेलजवळील पळस्पेफाट्यावर झाला होता. रात्री साडेआठ्च्या दरम्यान बंद पडलेल्या 'एसटीला' पून्हा चालू करण्यासाठी त्या बसमधील काही प्रवासी आणि त्या बसची महीला कंडक्टर मागून धक्का मारत होते, आणि काही प्रवासी बघत उभे होते, त्याचवेळी पाठीमागुन या बसला एका ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रक आणि एसटीच्या मध्ये चिरडूनत्या त्या एसटीला धक्का देणारे प्रवासी, बघे आणि ती महीला वाहक जागच्या जागी ठार झाले होते, आणि बसमधील अन्य प्रवाशी जखमी.
मूळात, गोवा मुंबई मार्गावर
मूळात, गोवा मुंबई मार्गावर देखील सुसज्ज असे हॉस्पिटलच नाही.
किरणचा, रस्त्याच्या कंत्राटाचा मुद्दा योग्य असला, तरी रस्ता बांधतानाच, योग्य तो दर्जा राखला जात नाही.
आपल्याच भारतीय तंत्रज्ञांनी व कामगारानी बांधलेले आखाती देशातले रस्ते वर्षानुवर्षे बिनबोभाट सुरळीत
चालले आहेत.
अशी वर्हाड नेणारी वाहने, बर्याचदा विनापरवाना चालत असतात. त्याचा मालक वगैरे वेगळाच असतो.
चालकाच्या झोपेकडेच काय तो जेवला कि नाही, याकडे पण कुणाचे लक्ष नसते. गाडी मालकाला जास्तीत जास्त फेर्या मारून, पैसा कमावयचा असतो.
रात्रीच्या प्रवासाचा मुद्दा मला पटला नाही, अनेक व्होल्वो गाड्या, एस टी गाड्या या मार्गावर बिनबोभाट
चाललेल्या असतात. पण त्यांच्याकडे पर्यायी चालक असतो आणि ते चालकही निष्णात असतात.
त्यांच्या आपल्या वाहनावर योग्य ताबा असतो आणि रस्ता माहितीतला असतो. मी स्वतः अनेकवेळा, हा
प्रवास रात्रीचा केलेला आहे.
या निमित्ताने मला आठवतात त्या
या निमित्ताने मला आठवतात त्या दोन घटना -
१) आम्ही कुटुंबिय जयपुर-दिल्ली हायवेवरून लांबवरची ट्रिप करून येत होतो. ड्रायव्हर म्हातारा होता. दोन दिवस त्याने योग्य सावधतेने गाडी चावलवल्याने काळजी करावी असे काही नव्हते.विशेषतः आम्ही रात्री मुक्काम करुन पुढे जात होतो म्हणून त्याच्या झोपेची तक्रार नव्हती.
संध्याकाळची वेळ. दिवेलागणीला आलेली. मी त्याच्या शेजारी बसलो होतो. अचानक मी ओरडलो, क्या कर रहा है आणि खसकन माझ्या उजव्या हाताने स्टिंयरिंग व्हील मी डावीकडे खेचले व पुन्हा सरळ करून गाडी रस्त्यावर आणली. क्षणार्धात घटलेली ती गोष्ट आठवून आजही शहारा येतो. कारण नंतर ड्रायव्हरने कबूल केले की त्याला समोरच्या लाईटमुळे दिसत नसे व म्हणून ओव्हटेक करणाऱ्या वाहनाच्या प्रखरतेने तो अंधळा झाला होता. त्यावेळी मी ताबा घेतला नसता तर हे लिहायला कदाचित उरलो नसतो.
२) पाचगणीच्या वाटेवर २००४ साली एका गुजराथी प्रवाशी बस दरीत कोसळून अनेक गेले. त्यावेळी पेपर मधून असे कळले की त्या प्रवाश्य़ांया पैकी काही लोक ड्रायव्हरला रातोरात परत चल म्हणून मागे लागले होते. तो मला नीट २ तास तरी झोपू द्या असे म्हणत असताना त्यांनी ऐकले नाही व दुर्घटना घडली.
दूर प्रवासात रात्रीची झोप व गाडीच्या नीट रखरखावाची वेळीच त्वरा याची सांगड हवी.
अपघात दुर्दैवी
अपघात दुर्दैवी आहेच.
त्यानिमित्ताने वाहनांच्या, रस्त्याच्या व एकूणच डीझास्टर मॅनेजमेंटच्या खेळखंडोब्याबद्दलची चर्चा वाचली. किरण यांनी अतीशय उत्तम विवेचन केलेले आहे. प्रतिसादही विचारपूर्वक दिलेले आहेत. याबद्दलची मते मांडण्यापूर्वी, एक जाणवले ते लिहितो.
यात अशोक पाटील सरांचे पुढील विधान खरे मर्मस्पर्शी आहे...
>>दुसरीकडे गावात असेही कुणी महाभाग (आणि भागाही) असतात जे बेतालपणे 'लग्नाचा मुहूर्तच चुकला होता....देवदर्शन व्यवस्थित केले नाही बघा....सूनेची पत्रिका अमक्यातमक्याला दाखविलीच नव्हती...' अशी पारावर गुण उधळत बसतात आणि येनकेनप्रकारे सार्या प्रकरणाला अप्रत्यक्षरित्या कारणीभूत कोण आहे तिकडे बोटे दाखवित एखादे महान कार्य केल्याचा आव आणतात.<<
जाणारे गेले.. राहणारे राहिले. कुणाच्या घरातले कर्ते गेले. कुणाची वंशवेल खुंटली. कुणी जन्माचा अपंग झाला..
या सगळ्यात दुर्दैवी आपली मानसिकता म्हणजे, त्या नव्या नवरीच्या, परणून आणलेल्या निष्पाप पोरीच्या कपाळावर हे सगळे खापर फोडले जाईल.
आपल्या देशातल्या विचारपद्धतीतला "हा" भाग मला फार दुखावून जातो...
-(पोरीचा बाप) इब्लिस.
दिनेशदा म्हटलेत : >>आपल्याच
दिनेशदा म्हटलेत :
>>आपल्याच भारतीय तंत्रज्ञांनी व कामगारानी बांधलेले आखाती देशातले रस्ते वर्षानुवर्षे बिनबोभाट सुरळीत
चालले आहेत.<<
सत्य आहे.
हे असे असते/आहे, तर आपण आपल्याच घरात घाण का करतो?????
जिल्ह्याच्या गावी रस्ता ओलांडतान दोन्हीकडे पहाणारा, गावात या चौकापासून त्या चौकापर्यंत रस्त्यातून तिरका चालत जातो.
पुण्या-मुंबईमधे पार्कींग प्लेस शोधणारा, पेड पार्किंग करून जीव मुठीत धरणारा, गावात रस्ता बंद होईल असे पार्किंग करतो.
मुंबईत ऑडी पळवणारा १६ वर्षांच्या मुलाला गाडीची चावी बिनदिक्कित पणे देतो... मग मुलगा त्याच्या चार 'जीएफ' सोबत पाम बीच रोडवर एकादी म्हातारा म्हातारीची मारूती ८०० 'उडवतो'..
वर्हाड नेण्यासाठी एस्टी ऐवजी एकादी ४०७ गाडी वा ट्रक वा खासगी ट्रॅव्हलची गाडी वधूपिता निवडतो.. तेवढेच २-४ हजार वाचलेत ते डीजे मधे नवरदेवाचे मद्यधुंद मित्र नाचतील, त्यांच्यावर खर्च करता येतील म्हणून..
दोष कुणाचा आहे??
मौन्मोहन्/सोनिया/युवराज?? की हायवे अॅथॉरिटी? की "टोळ"(Toll)धाड? की.....
.
.
"मी"चा?
वाचवत नाही इतकं भयानक आहे!
वाचवत नाही इतकं भयानक आहे!
अपघातग्रस्ताला तातडीनं वैद्यकीय सेवा मिळू शकेल अशी काही यंत्रणा नाही. नको त्या खिश्यांमधे भरपूर पैसा आहे, पण पॅरामेडिकसह अँब्युलन्स, एअरलिफ्टिंगसाठी हेलिकॉप्टर अशा अत्यावश्यक बाबींसाठी पैसा नाही.
'आम्ही चार पेग मारूनही व्यवस्थीत गाडी चालवू शकतो' अशा बढाया मारणारे (आणि इतरांचा जीव धोक्यात घालणारे) महाभागही आहेत. इथेच मायबोलीवर, अमेरिकेत कुठून कुठे ते आठवत नाही, पण भरपूर लांबचा प्रवास करणारे नवरा बायको यांच्याविषयी लिहिलं गेलं होतं. बहुतेक बायकोने लिहिलं होतं. मग नवर्यानं कशा कठीण परिस्थितीत, झोप आली असताना ती महत्प्रयासानं आवरून गाडी चालवली याचं कौतूक होतं. त्यावर काही मायबोलीकरांचे कौतुकाचे शब्दही होते. वाचूनही अस्वस्थ, हताश व्हायला होतं, चीड येते.
ही अशीच परिस्थिती आणि बेपर्वाईचा रवैय्या सर्वदूर दिसतो. यामुळे क्षणार्धात कुणाचं जीवन कसं भयानक रित्या बदलू शकेल याचा काडीभरंही विचार करता येत नाही?
किरण चांगले लिहिले आहे बाकी
किरण चांगले लिहिले आहे
बाकी बाकिचे अर्धवट शिंगे फुटलेले आणी स्वतःचे अर्धवट konwledge पाजळणारे इथेहि येउन दिवे उजळवायला लागलेले दिसत आहेत!
>>>>> पण आपण हायवे वर आहोत.
>>>>> पण आपण हायवे वर आहोत. दोन बसच्या मधे बसताना काही विपरीत घडलं तर ... ही पुसटशीही शंका एकालाही येऊ नये ? डोळ्यांवर असलेली झोप आणि गप्पा, त्यातून अडचणीच्या ठिकाणी ओढवलेला प्रसंग. वेळ सांगून येत नाही हे खरंच. तरीही शक्य तितक्या कडेला थांबण्याचे केले असते तर ?
कबूल आहे, या जर तर ला अर्थ नाही. पण काही होत नाही तोपर्यंत शहाणे व्हायचेच नाही या बेपर्वा वृत्तीला काय करायचं ? तीच गोष्ट त्या किलर ट्रकची.<<<<<<<<ज्यावेळी या अपघाताची बातमी ऐकली तेव्हा हेच विचार मनात आले होते.
ह्यावरचा तामीळ Engeyum
ह्यावरचा तामीळ Engeyum Eppodhum चित्रपट जरुर बघा. ईन्ग्लीश सबटायटल सहित internet वर आहे.
http://www.imdb.com/title/tt2065924/