राँग नंबर : अंतीम

Submitted by विशाल कुलकर्णी on 28 May, 2012 - 07:53

राँग नंबर : मागील कथानक

"वाईल्ड हॉक हिअर....."

"वाईल्ड हॉक?"

चिटणीसांनी त्या शब्दाचा न राहवून जोरात उच्चार केला. त्यांना खरेतर पख्तुनी अपेक्षित होता. पण हा आवाज....

ब्रिगेडीअर चक्रवर्तींनी अक्षरशः झडपच घातली फोनवर...

"येस वाईल्ड हॉक, हंटर धिस एन्ड.................................!"

डॉ. चिटणीस त्यांच्याकडे बावळटासारखे पाहातच राहीले!

त्यानंतर चक्रवर्ती नुसते ओके, ओकेच करत होते फोनवर.

पाच मिनीटांनी त्यांनी फोन खाली ठेवला, तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर कसलेतरी अनामिक समाधान होते.

**********************************************************************

त्या खोलीत आत गेलेला शिर्‍या दहा मिनीटे झाली तरी बाहेर यायला तयार नाही. शेवटी काळजी वाटून रावराणे आत शिरले. पाच मिनीटांनी मोमीन दारात जावून उभा राहीला. आतले दृष्य त्यालाही अनपेक्षीतच होते.

शिर्‍या आणि रावराणे भंजाळल्यासारखे एकमेकाकडे पाहात उभे होते. आत एक रिकामी कॉट होती. तिला लागुन एक टेबल, एक खुर्ची आणि खुर्चीपाशी थरथरत उभी असलेली एक तरुणी. तीच मघाशी बाहेर आली होती बहुदा. ती बहुदा रजीया असावी. पण खोलीला दुसरा कुठलाच दरवाजा नव्हता. रजीयाशिवाय खोलीत कुणी दिसतही नव्हते. मग.....

रजीयाच्या हाताला धरुन शिर्‍या तिला खोलीच्या बाहेर घेवुन आला....

सतीश आणि शिर्‍या दोघेही चक्रावले होते. खोलीत चैतन्य कुठेच दिसत नव्हता. खोलीतले एकमेव टॉयलेट-बाथरुमही शिर्‍याने चेक करुन पाहीले होते, पण चैतन्य गायब होता. दारात उभा असलेला मोमीनही चक्रावला होता.

"अरे शिर्‍याभाय, मेरे पास पक्की खबर थी, उस चिकणेको यही बंद करके रख्खा था युसुफमिया के लोगोने. कुठे गेला तो?"

"कॅप्टन कुठे आहे?" शिर्‍याने रजीयाला विचारले.

तशी रजीया रडायलाच लागली.......

"मुझे कुछ पता नही. थोडी देर पहले बडे मिया के आदमी आकर उसको लेके गये. मला आज संध्याकाळपर्यंत इथे थांबायला सांगितले होते. कुणीतरी त्या कॅप्टनला सोडवायला येणार हे त्यांना आधीच कळाले होते. त्यामुळे ते कॅप्टनला आधीच येथुन घेवुन गेले. आप लोगोके लिये एक मेसेज छोडा है ...."

घाबरलेल्या रजीयाने हातातील चिठ्ठी पुढे केली...

"तुम जो कोई भी हो दिमागके तेज हो, लेकीन इसबार तुम्हारा वास्ता 'पख्तुनी'की टीमसे पडा है! वैसे तो हम रजीया को भी यहासे गायब कर सकते थे, लेकीन तुम्हें फिर ये चेतावनी कौन पहुंचाता? समझदार हो, जान की खैर चाहते हो तो चुपचाप किनारा कर लो, वर्ना अगला दिन जहन्नममें होंगे!"

"युसुफ टकला"

"साल्ला, सत्या तू म्हणाला होतास तेच खरे होते. त्या पख्तुनीला कमी लेखण्याची चुक माझ्याकडुन झाली खरी. पण काही हरकत नाही. आता सगळे पत्ते जर उघडे पडले आहेतच तर होवुनच जाऊदे. त्या पख्तुनीला कोल्हापूरी हिसका दाखवायची वेळ आलेली आहे. थोडे दुवे निसटलेत हातातुन, पण मी शोध काढेन त्याचा."

"शिर्‍या, पण आता आपल्याला घाई करायला हवी. आता चैतन्यचा धोका वाढलाय मित्रा! आपण चक्रवर्तीसाहेंबांशी संपर्क करुया का?"

"नाही सत्या, त्याने अजुनच घोळ वाढेल. आपल्याला जर इथे चैतन्य सापडला असता तर त्यांच्याशी संपर्क करण्यात काहीतरी अर्थ होता. आता आधी चैतन्यला शोधुन काढुयात आणि मगच चक्रवर्ती साहेबांशी संपर्क साधू."

"शिर्‍या, पण आता कॅप्टनला कूठे म्हणून शोधणार आहोत आपण?"

"काही सोर्सेस आहेत सत्या अजुनही. आता बस्स झाली लपाछपी, आता फक्त 'आर या पार' ! एक काम कर तू मोमीनला उचल, आत्ताच ही बातमी बाहेर कुठे लिक होता कामा नये."

"अरे क्या शिर्‍याभाय, अपनने तो तुम्हारा मदद..."

"उसी लिये , तुम्हारी जानको खतरा पैदा हो गया है मोमीन, लॉकअपमध्ये जास्त सुरक्षीत राहशील तू. सत्या, याला पोचव आणि मला माहिमच्या आपल्या नेहमीच्या कॉर्नरला भेट. मी तोपर्यंत बाकीची माहिती मिळवतो"

शिर्‍याने मनाशी काहीतरी निर्णय घेतला होता.

**********************************************************************
परत फोन वाजला आणि चक्रवर्तींनी उचलला.

"किससे बात कर रहे थे चक्रवर्तीसाहब, लगता है मेरा फोन ट्रेस करनेकी सारी अरेंजमेंट कर चुके है आप. कोइ बात नही ऐसी अरेंजमेंट्सके लिये अक्सर तय्यार रहता हूं मै! "

"हे बघ पख्तुनी चैतन्य तुझ्या तावडीत सापडलाय हे मला कळलेय, पण त्याच्या नावाखाली जर तू आम्हाला ब्लॅकमेल करु पाहात असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव. एका डॉ. चिटनीसांसाठी असे १०० चैतन्यही पणाला लावण्याची माझी तयारी आहे आणि चैतन्यचीही असेल. सो, ती कल्पना तू डोक्यातुन काढुनच टाक."

"छे छे चक्रवर्तीसाहब, एवढा मुर्ख वाटलो का मी तुम्हाला? कॅप्टनला आणि तुम्हाला आज ओळखतोय का मी? डेडशॉटला उचललाय तो फक्त यावेळी त्याचा अडथळा होवु नये म्हणुन. प्रत्येक वेळी तो माझ्या सगळ्या प्लानींगची वाट लावतो म्हणुन यावेळी आधीच खबरदारी घेतलीय. असो मी फोन हे सांगण्यासाठी केला होता की पुढची पाच्-दहा मिनीटे मुंबईवर ल़क्ष ठेवा. पंधरा मिनीटांनी मी परत फोन करेनच."

"पख्तुनी, तू....."

पलिकडून फोन ठेवला गेला होता.

चक्रवर्तींनी लगेचच कंट्रोल टॉवरला फोन लावुन येत्या दहा मिनीटातल्या सर्व बातम्या त्यांच्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करवून घेतली आणि रुममधला टिव्ही स्टार्ट केला.

आठव्या मिनीटाला टिव्हीवर एक बातमी झळकली आणि तेवढ्यात खोलीतला फोन वाजला. फोनवर काय बातमी असणार हे त्यांना टिव्हीने आधीच संगितले होते. तरीही फोनवरच्या बातमीवर त्यांचा अधिक विश्वास होता म्हणून त्यांनी फोन उचलला.

"सर, आझाद मैदान पोलीस चौकीच्या मागे एक बॉम्बस्फोट झालाय. सुदैवाने मैदानावर फारशी गर्दी नसल्याने जिवितहानी झालेली नाही."

"मला वाटलेच होते." चक्रवर्तींनी कपाळावरचा घाम पुसला.

टिव्हीवरच्या बातम्या बघणारे डॉ. चक्रवर्ती सुन्न होवुन बसले होते.

"या थराला जावू शकतात माणसे?"

"अहं, ही फक्त चेतावणी आहे डॉक्टर. जर आपण त्यांचे म्हणणे नाही ऐकले तर मात्र यापेक्षाही खुप काही भयानक घडू शकेल. आता पख्तुनीचा फोन येइल त्याआधी मला काहीतरी करायलाच हवे."

चक्रवर्तींनी खिश्यातला मोबाईल काढला...

"हॅलो वाईल्ड हॉक, हंटर हिअर. शिकारीवर जायची वेळ झालेली आहे. सावज टप्प्यात आलय !"

त्यांनी फोन कट केला आणि तो परत वाजला..., चक्रवर्तींनी कॉल घेतला आणि फोन स्पीकरमोडवर टाकला....

"काय ठरवलत चक्रवर्तीसाहेब? हा स्फोट फक्त इशार्‍यासाठी होता म्हणून निरुपयोगी, निरुपद्रवी होता. यापुढचे स्फोट तसे असणार नाहीत. १९९३ चा अनुभव पुन्हा घ्यायची तुमचीही तयारी नसेलच..."

चक्रवर्ती नुसतेच शुन्यात बघत राहीले.

"ऐका चक्रवर्ती साहेब, आत्ता दुपारचे ४.३० वाजताहेत. कर्जवरुन निघणारी सीएसटी फास्ट बरोबर पाच वाजुन सतरा मिनीटांनी दादर स्टेशनमध्ये येते. डॉ. चक्रवर्ती गाडीच्या मोटरमनपासुन चौथ्या डब्यात शिरतील. चौथ्या डब्यात अगदी कोपर्‍यातल्या सीटवर एक काळ्या कपड्यातला माणुस बसलेला असेल. डॉ. चक्रवर्ती त्याला बसायला जागा मागतील तो म्हणेल 'वेडा झाला की काय?" भायखळ्याला तो माणुस उतरेल, डॉक्टरही त्याच्या मागे उतरतील. कृपा करुन डॉक्टरांच्या मागे कुणालाही सोडु नका. मी आसपासच असेन. थोडा जरी संशय आला तरी डॉक्टरना तर नाईलाजाने संपवावेच लागेल मला पण त्यानंतर मुंबईकरांना जे भोगावे लागेल त्याला जबाबदार फक्त तुम्हीच असाल."

"पण मी तुमच्या ताब्यात आल्यावर तुम्ही बाँबस्फोट घडवणारच नाही याचा काय भरवसा?"

"ओह, फोन स्पीकरमोडवर आहे तर. गुड, डॉक्टर तुम्हाला माझ्यावर भरवसा ठेवावाच लागेल. आणि पख्तुनीचा शब्द म्हणजे काळ्या पाषाणावरची रेघ असते हे तुम्हाला चक्रवर्ती सांगतीलच."

"चक्रवर्तीसाहेब, एक बार डॉक्टरसाहबसे हमें जरुरी मालुमात हासिल हो जाये बस्स, त्यानंतर तुम्हाला त्या सर्व बॉम्ब्स माहिती मी स्वतः कळवेन. एक लक्षात ठेवला पख्तुनी पाकिस्तानी असला तरी विनाकारण कुनाचीही हत्या करत नाही आणि कितीही विश्वासार्ह असला तरी विश्वासघात झाल्यावर कशाचीही पर्वा करत नाही."

"ठिक आहे पख्तुनी, या वेळेपुरता तू जिंकलास. पण हि परिस्थिती जास्त काळ राहणार नाही. बाजी लवकरच पुन्हा माझ्या हातात येइल, लक्षात ठेव?"

पलिकडून पख्तुनी नुसताच हसला.

चक्रवर्तींनी फोन खाली ठेवला आणि हताशपणे डॉक्टरांकडे बघीतले. चिटणीसांच्या चेहर्‍यावर प्रसन्न हास्य होते.

"कमॉन ब्रिगेडीयर , बी ए ब्रिगेडीयर नाऊ ! कर्तव्यापुढे सर्व वैयक्तीक नातेसंबंध नेहमीच गौण ठरतात मित्रा."

"मला ती काळजी वाटत नाहीये चिटणीस. जेव्हा आर्मीत भरती झालो तेव्हाच हे सारे बंध बाजुला काढुन ठेवले होते. माझी समस्या अशी आहे की तू हवी ती माहिती दिल्याशिवाय पख्तुनी बॉम्ब्सची ठिकाणे सांगणार नाहीये. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपण ही लढाई हरलेलो आहोत."

"डोंट वरी ब्रिगेडीयर, असाही या शक्यतेवरदेखील आपण विचार करुन ठेवला आहेच की.. " चिटणीसांचे डोळे मिस्किलपणे चमकत होते. ते हळु आवाजात पुढे बोलायला लागले तसे चक्रवर्तींच्या डोळ्यात पुन्हा चमक यायला लागली.

**********************************************************************

"सतीश, शिर्‍या बोलतोय?"

"हा बोल रे, मी अजुन जवळच्या पोलीस स्टेशनला पोचतोच आहे. या मोमीनला त्यांच्या ताब्यात देतो आणि निघतोच आझाद मैदानाकडे, तिथेच ये तिथेच भेटु."

"म्हणजे तुझ्यापर्यंत बातमी पोचली तर."

"अरे आत्ताच कळलेय मला, का कोण जाणे पण मला वाटतेय या स्फोटाचा काहीतरी संबंध आहे पख्तुनीशी."

"का?"

"का काय शिर्‍या? अरे पोलीस चौकीच्या मागे विस्फोट होतो पण त्यात कुणीही जखमी होत नाही. हे थोडं संशयास्पद वाटत नाही का तुला? मला वाटतं कॅप्टनचे अपहरण ही निव्वळ धुळफेक आहे. पख्तुनीचा डाव काहीतरी वेगळाच असावा. असेही कॅप्टनच्या बदल्यात चक्रवर्ती डॉक्टर चिटणीसांना त्याच्या हवाली करणार नाहीयेत ही काळ्या दगडावरची रेघ समज. असे कित्येक कॅप्टन ते पणाला लावतील बिनधास्त."

"सतीश, तू तिथे पोहोच. स्फोटार कुठली स्फोटके वापरली होती ते शोधुन मला कळव. मी त्या स्फोटकांच्या मागे लागतो. आता हा स्फोटच आपल्याला योग्य ठिकाणी घेवुन जाईल."

"सद्ध्या कुठे आहेस तू?"

"एका खबर्‍याच्या ठिकाणी आहे. युसुफचा टेंटेटिव्ह पत्ता मिळालाय. तेवढी स्फोटकांची माहिती मिळाली की खातरजमा करता येइल. मी तुझ्या फोनची वाट पाहतोय."

रावराणेंनी फोन कट केला.

....

...

..

...

"शिर्‍या , सतीश बोलतोय."

"हा सत्या बोल..."

"आर्.डी.एक्स."

"मला वाटलेच होते. सादिक हे नाव माहीत असेल ना तुला? कुठे सापडेल तो?"

"सादिक ? बेहरामपाड्यातला...?

"येस, तोच..."

"अरे तो नेहमी 'गुलशन'ला पडीक असतो, पण या केसमध्ये जर तो असेल तर तो गुलशनला सापडण्याची शक्यता कमीच आहे. "

"या केसमध्ये आहेच तो. तू गुलशनला पोहोच, मी तिथेच भेटतो तुला. काहीतरी मागमुस लागेलच. सध्यातरी अंधारात हात मारणे एवढेच आपल्या हातात आहे."

गुलशन हा एक कुविख्यात बार होता. कामाठीपुर्‍यातला. सतीश गुलशन'ला पोचला तेव्हा शिर्‍याने गुलशनचे रुपांतर उकीरड्यात करायचेच काय ते बाकी ठेवले होते. पाच सहा टेबलं तुटली होती. ४-५ जण बारच्या जमीनीवर विव्हळत पडले होते. कामाठीपुर्‍याचा शेर समजला जाणारा 'समशेर जकातीवाला' , गुलशनचा मालक जखमी अवस्थेत जमीनीवर पडला होता, शिर्‍या त्याच्या छाताडावर पाय देवुन उभा होता.

"कसमसे भाईजान हमना कुछ भी पता नै, उनो आत्या है इदरकु नेहमीच. पन पिछले दस दिनसे इदरकु फिरक्याच नै ना सादिक!" समशेर कळवळून सांगत होता.

"खोटे नको बोलुस, मला पक्की खबर आहे की काल रात्री तू सादिकला भेटलास. आता लवकर काय ते खरं सांग नाहीतर तुझा बार पुढचे दोन महिने उभा राहु शकणार नाही याची खात्री देतो मी तुला."

"शिर्‍या, काय चाललेय हे?"

सतीशने शिर्‍याला बाजुला ओढुन काढले.

"सत्या, मला पक्की खबर लागलीये की सादिक याला काल रात्री भेटला होता, बोल बे .....!"

मार खाऊन खाऊन दमलेला समशेर शेवटी बोललाच..

"भाईजान, लेकीन मई तुमको कुच बोल्या, तो उनो लोगा मेरी जान के दुश्मन बन जैंगे ना, कुच तो रहमा करो जी..."

"और अगर नही बताया तो जान का दुश्मन बननेके लिये तुम्हारी जान ही नही रहेगी ये मेरा वादा है..."

नाईलाज झालेल्या समशेरने एक आवंढा गिळला आणि तो उच्चारला...

"सादिक, आजकल युसुफमिया के पास है..... आणि समशेर पुढे बोलतच राहीला.

**********************************************************************

दादरला लोकल मध्ये चढलेले डॉ. चिटणीस भायखळ्याला उतरले तेव्हा त्यांना खात्री होती चक्रवर्ती स्वस्थ बसणार नाहीत. झालेही तसेच होते.

डॉ. चिटणीस बाहेर पडण्यापुर्वीच चक्रवर्तींनी एक फोन केला होता...

"हॅलो वाईल्ड हॉक, हंटर धिस एंड, शेळी लावलीये मचाणाला. कुठल्याही क्षणी सावज येइल शेळीच्या मागावर, तयार राहा. तुला किती वेळ लागेल पोचायला."

"......"

"ओके, तू जवळपास पोचलास की मला खबर कर त्यानुसार मी शेळीला मोकळी सोडतो. तसेही आता तुझे लांब राहण्याचाही काही उपयोग नाहीये. सो गेट एस्केप्ड!"

आणि त्यानुसारच 'तो' फोन आल्यावरच डॉ.चिटणीस बाहेर पडले होते.

चिटणीस भायखळा स्टेशनच्या बाहेर पडले तेव्हा एका काळ्या रंगाची अँबॅसिडर त्यांची वाटच पाहत होती. त्या माणसाने केलेला इशारा पाहुन चिटणीस त्या गाडीत बसले आणि गाडी सुसाट निघाली."

त्यानंतर दोनच मिनीटात त्या गाडीमागुन अजुन एक तशीच काळी गाडी स्टेशनवर येवुन उभी राहीली. तो माणुस लगबगीने गाडीकडे धावला. गाडीत बसलेल्या माणसाला त्याने अदबीने सलाम केला आणि गाडीतल्या माणसाने त्याला काही सुचना केल्या आणि ती गाडी पुढे गेलेल्या अँबॅसिडरच्या मागे वेगाने निघाली. पख्तुनीने या संपुर्ण केसमध्ये ही पहिलीच चुक केली होती. त्याने 'त्या' माणसाला असे मागे सोडायला नको होते. एक तर या क्षुल्लक कामासाठी त्याने त्या माणसाचा वापरच करायला नको होता आणि नंतर त्याला असे सोडायलाही नको होते.

अर्थात दोष त्याचाही नव्हता म्हणा. माणसाच्या हातुन अशा क्षुल्लकशा चुका होतातच आणि त्याच कारणीभूत ठरतात विनाशाला !

***********************************************************************

"युसुफमिया, वो तुम्हारा बंदा किधर है? मैने उसे भायखला स्टेशनपेंही छोड दिया था ! वो पहुचा की नही अबतक ठिकानेपें?"

"पोहोचता ही होगा हुजूर....! वो बंबईकी गलीयोमे पैदा हुवा, यही पला-बढा है, उसकी फिकर मत किजीये आप!"

"वैसे नाम क्या बताया था उसका तुमने?"

"सादिक हुजूर"

"वो सारा काम ढंगसे कर देगा ना?"

"आप फिकर मत करो हुजूर! पक्का जिहादी है...., इस काम को अल्लाहकी मर्जी समझके करेगा!"

"खैर..., चलो थोडा डॉक्टरसाहबसे भी मुलाकात कर लेते है!"

दोघेही नुकत्याच आणण्यात आलेल्या डॉ. चिटणीसांना भेटायला निघाले...

********************************************************************

रावराणे आणि शिर्‍या, खबर्‍याकडून आणि समशेरकडुन मिळालेल्या युसुफच्या पत्त्यावर जावून पोचले होते. पण रावराणेंच्या कल्पनेप्रमाणेच ना तिथे युसुफ सापडला ना सादिक. दोघेही गायब होते. युसुफचा परमनंट अड्डा असुनही तिथे त्याची कोणी माणसेही नव्हती. फक्त एकजण सापडला.... त्याला बोलते करायला शिर्‍याला पाच मिनीटेही लागली नाहीत.

"सतीश, तू त्यांच्या मागावर जा. मी सादिकला शोधतो. सगळे बाँब त्यानेच लावले आहेत. त्याची व्यवस्था लावून मी पोहोचतोच. "

"येस मला निघायलाच हवे ......

एवढ्यात त्यांचा फोन वाजला.

कॉलरचे नाव बघत त्यांनी शिर्‍याकडे पाहात डोळे मिचकावले आणि फोन घेतला...!

थोड्यावेळाने फोन ठेवत त्यांनी शिर्‍याला सांगितले...

"डोट वरी, आता तिथे मी एकटा नसेन. तुझे काम झाले की या नंबरवर फोन कर, माझा रेफरन्स दे म्हणजे पुढची जबाबदारी ते सांभाळतील"

रावराणेंनी एक कार्ड त्याच्या हातात दिले, कार्ड बघत शिर्‍या हलकेच हासला आणि त्याने झोंडाचा स्टार्टर फिरवला....

"झोंडा वेगाने भायखळ्याच्या दिशेने धावायला लागली.

**********************************************************************

"वेलकम डॉक्टर चिटणीस, वेलकम टू माय प्लेस!"

"अर्धा तास झाला मला इथे आणुन, काय पाहुण्याला चहा पाणी विचारायची पद्धत आहे की नाही तुमची?"

तो आवाज ऐकला आणि पख्तुनी चमकला, हा आवाज त्याने याआधीही कुठेतरी ऐकला होता. टेलिफोनवर ऐकलेला चिटणीसांचा आवाज आणि हा आवाज बर्‍यापैकी सारखा असला तरी ही दोन्ही माणसे वेगवेगळी होती. पण मनातली खळबळ चेहर्‍यावर दिसु न देणे हा पख्तुनीचा हातखंडा होता.

"अरे सॉरी डॉक्टरसाब ! मेरे आदमी थोडे ढिले है. युसुफमिया, डॉक्टरसाहबकी खातिरदारी का इंतजाम करो. इनके लिये कुछ चाय्-नाश्ता मंगवाओ! ये हमारे खासमखास मेहमान है!"

"अच्छा, तो तुम्हारे यहा मेहमानोंको इस तरह रस्सीयोंमें जकडनेका रिवाज है!"

डॉक्टरांनी परत एकदा मिस्कील स्वरात विचारले तसा पख्तुनी अजुन चमकला. आता मात्र त्याची खात्री पटत चालली होती. पण मग तसे असेल तर समोरचा माणुस इतका बिंधास्त कसा? याला बाँबस्फोटांची अजिबातच काळजी नाहीये का?

"रिवाज तो बदलते रहते है डॉक्टरसाहब...! अब यही देखीये..., बनवाबनवी तर तुम्ही पण करताच आहात की? आता तर तुम्हाला आपल्या लोकांच्या जिवाची पण फिकीर राहीलेली दिसत नाही."

"खैर.., जो होता है अच्छे के लिये ही होता है! आपका बच्चाभी पोहोचताही होगा यहा पर, मेरे पिछे ही लगा था बेचारा....! अब्तक तो मेरे आदमीयोने पकडभी लिया होगा उसको.... मै आपको आखरी चान्स देता हुं, चक्रवर्ती साहबको फोन करके डॉक्टर चिटणीस को यहा बुलवा लिजीये वर्ना मेरे आदमी सारी बंबईमें आतंक मचा देंगे! युसुफमिया डॉक्टरसाहब का ठिकसे खयाल रखना, ये बेहद खतरनाक शख्स है!"

"पागल हो गये हो क्या पख्तुनी? मै यहा तुम्हारे सामने बैठा हुं और किस डॉ. चिटणीसको बुलाना चाहते हो तुम?"

इतका वेळ मजेत असलेले डॉक्टर वैतागुन बोलुन गेले.

पख्तुनीच्या वक्तव्यामुळे युसुफही आश्चर्यात पडला होता.

"हुजूर, ये कैसी बात कर रहे है आप? यही डॉ. चिटणीस है, मैने इनकी तसवीर देखी है अखबारोमें! कुछ दिन पहलेही ही इन्हे पद्मविभुषण संम्मानसे नवाजा गया है!"

"लगता है तुम्हारे बॉसका दिमाग खराब हो गया है!"

डॉ. चिटणीस परत आपल्या मिस्कील मुडमध्ये आले. बहुदा त्यांना अंदाज आला होता की आपले बिंग फुटलेय. या क्षणी त्यांना एकच काळजी लागुन राहीली होती ती म्हणजे पख्तुनीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा बच्चा म्हणजे कॅप्टनही जर परत पख्तुनीच्या जाळ्यात सापडला असेल तर मग ते बाँबस्फोट होण्यापासुन कसे काय थांबवता येणार होते? तरीसुद्धा एक वेडी आशा होतीच ती म्हणजे पख्तुनीचा आजपर्यंतचा इतिहास बघितला तर त्याने कधीच निरपराध व्यक्तींची हत्या केलेली नव्हती. सच्चा मुसलमान होता पख्तुनी. तो विनाकारण बॉम्बस्फोट घड्वून आणुन हजारो निरपराध लोकांच्या मृत्युला कारणीभुत होइल असे त्यांना अजुनही वाटत नव्हते.

तेवढ्यात पख्तुनीची माणसे चैतन्यला घेवुन आलीच.

"हुजूर, जैसा आपने कहा था वैसा ही हुवा, ये आदमी आपका भायखलासे पिछा कर रहा था ! आपके कहे मुताबिक हमने इसे यहातक आने दिया लेकीन जैसेही ये हमारे अहातेमें दाखिल हुवा इसे जकड लिया गया, पर फिर भी बंदे ने हमारे छे आदमी मार गिराही दिये!"

"कोइ बात नही कॅप्टन, आओ खुशामदीद ! देखो यहा कौन तुम्हारा इंतजार कर रहा है?"

कॅप्टनने डॉक्टरांकडे बघितले आणि खालमानेने उत्तरला..

"माफ करा डॉक्टर साहेब, पण मी अति आत्मविश्वासाच्या नादात वाहावत गेलो आणि स्वतःच अडकलो. "

"कोइ बात नही कॅप्टन, आता आलाच आहेस तर आमचं काम तुच करशील. आता डॉ. चिटणीसांना इथे घेवुन यायचं काम तुच करशील. त्या कामाला तुझ्याइतका योग्य माणुस दुसरा कोण असेल, नाही?

शेवटचा 'नाही?' पख्तुनीने डॉक्टरांना उद्देशुन विचारला होता....

"काहीतरीच काय बोलतोयस पख्तुनी? डॉक्टर इथे समोर तर बसले आहेत."

चैतन्यने चमत्कारिक स्वरात विचारले तसे पख्तुनी खळाळुन हासला...

"अब बस भी करो डेडशॉट , बहोत हो गया ! मै जानता हुं अपने होनेवाले ससुर और बंबईके निर्दोष लोगोंको बचानेके लिये तुम असली डॉ. चिटणीस को जरुर ले आओगे, तुम्हारे पास दो घंटे बाकी है दोस्त! क्युं कर्नल रणधीरराजे देशमुख, सही कहाँ ना मैने?"

तसे डॉ. चिटणीस ताडकन उठुन उभे राहीले.

"शेवटी ओळखलस तर तू मला?"

"कर्नलसाहब, आपको तो आपकी आवाजसेही पहचान लिया था मैने! पख्तुनी नाम है मेरा, दिलबागखान पख्तुनी ! इतनाभी बेवकुफ तो नही हुं मै....! वैसे उस शैतानकी खालाकी तबीयत कैसी है अब? उसको मेरा सलाम बोलना यहांसे जानेके बाद! कॅप्टन गेट रेडी, तुमको तुरंत निकलना है, युसुफमिया तुम्हारे साथ जायेंगे और इस बार कोइ चालाकी नहीं, नाहीतर मी माझ्या माणसाला फक्त एक फोन करेन आणि मुंबई फिर एक बार तबाह हो जायेगी !

इतक्यात कुणाचा तरी मोबाईल वाजला....

"ये किसका फोन बज रहा है, ये ट्युन अलग है, लगता है कोइ अंदर आ गया है!" पख्तुनी गरजला, त्याने आपले रिवॉल्व्हर काढून हातात घेतले.

त्या अनामिक माणसाने कॉल रिसिव्ह केला.., पलिकडून एकच शब्द..

"डन ! "

त्याने आपले रिवॉल्व्हर बाहेर काढले आणि आडोश्यापासुन बाहेर येत थेट पख्तुनीच्या हातातल्या रिवॉल्व्हरचा वेध घेतला !

"कॅप्टन, सादिक पकडला गेलाय, त्याने सर्व माहिती ओकलीय. आतापर्यंत आपल्या जवानांनी बाँब शोधले सुद्धा असतील. "

तसा कॅप्टन जागेवरच उसळला, स्वतःभोवती एक गिरकी घेत त्याची किक शेजारच्याच्या नाकावर बसली. त्याला जोराने बाजुला ढकलत कॅप्टनने दुसर्‍या एकाच्या हातातील पिस्तुल हस्तगत केले आणि वेगाने तो कर्नलकडे झेपावला. तसा हातातुन येणारे रक्त दुसर्‍या हाताने दाबत पख्तुनीने आपल्या जमीनीवर पडलेल्या रिवॉल्व्हरकडे झेप घेतली. पण तो रिवॉल्व्हरपर्यंत पोचायच्या आधीच त्यांच्या थोबाडावर एक सणसणीत लाथ बसली आणि तो रिवॉल्व्हरपासुन लाब फेकला गेला.

पख्तुनीने वर बघीतले. एक उंचापुरा, धिप्पाड व्यक्ती हातातले रिवॉल्व्हर त्याच्यावर रोखुन उभा होता. त्याने युसुफकडे पाहीले तर युसुफ पोटात एक गोळी घेवुन खाली कोसळत होता.

*******************************************************************************************

"या पामराला इन्स्पेक्टर सतीश रावराणे म्हणतात पख्तुनी ! भारतीय आर्मीवाल्यांच्या लाथा पुष्कळ खाल्या असशील तु आजपर्यंत , ही एका भारतीय पोलीस अधिकार्‍याची लाथ कशी वाटली?"

पख्तुनी प्रसन्नपणे हासला.

'सतीश रावराणे'? आपण कधी भेटलो नसलो तरी हे नाव ऐकलय मी. तुझी फाईल आहे माझ्याकडे. प्रत्यक्ष भेटून अजुन मजा आला. लगता है इस बार उस 'शैतान की खाला' की जगह तुम्हारा नंबर लग गया. गुड, बाय द वे कर्नल, चलो इस बार तुमने बाजी मार ली. एक बात का अचरज हो रहा है मुझे. सादिक एवढ्या लवकर कसा काय फुटला? त्याला भारतीय लष्करातर्फे केल्या जाणार्‍या सर्व प्रकारच्या टॉर्चरचे खास ट्रेनींग दिले होते मी. म्हणजे मी कमी पडलो असाच याचा अर्थ निघतोय तर? "

हातातले रिवॉल्व्हर सावरीत चैतन्य पुढे झाला. आपले रिवॉल्व्हर पख्तुनीवर ताणत त्याने पख्तुनीला उभे केले. आपले रिवॉल्व्हर तसेच पख्तुनीवर ताणत सतीशने मिस्कील स्वरात सांगितले...

"आर्मी तक तो बात गयी ही नही होगी पख्तुनी. सादिकला बोलते करणारा चक्क एक सिव्हिलियन आहे."

"सिव्हिलियन?"

ही गोष्ट पख्तुनीबरोबरच कर्नलसाहेबांनाही नवीन होती.

"येस कर्नलसाहेब, एक सिव्हिलियन. असे नका बघु चैतन्यकडे. ही गोष्ट आर्मीव्यतिरिक्त फक्त मला आणि अजुन एका व्यक्तीला माहीत आहे. अर्थात त्याचे श्रेय चैतन्यला न जाता पख्तुनीच्या फोनला जाते. तुझा एक 'राँग नंबर' तुला नडला पख्तुनी."

"राँग नंबर? मी समजलो नाही." कर्नल अजुनच बुचकळ्यात पडले.

"मी सांगतो कर्नलसाहेब"

सतीशने मग शिर्‍याला आलेल्या राँग नंबरपासुन ते जयप्रकाश नगरच्या त्या झोपडपट्टीतील घटनेपर्यंत सर्व काही सविस्तर सांगायला सुरुवात केली.

"वाह, काबिले तारीफ शख्सीयत है ये बंदा. इससे एक बार तो मिलना ही पडेगा."

पख्तुनी न राहवुन उद्गारला. एका बहादुराने दुसर्‍या बहादुराला दिलेली दाद होती ती.

"पण सतीश, तुम्हाला जर त्या खोलीत कॅप्टन भेटलाच नाही तर मग तुमच्यात हे आपापसातील सामंजस्य आणि संतुलन कसे काय निर्माण झाले?"

"मी सर्व काही सांगतो कर्नलसाहेब. पण सर्वप्रथम या पख्तुनीला त्या 'चिप'बद्दल माहिती कशी काय मिळाली ते जाणुन घ्यायला आवडेल मला."

सगळ्यांच्या नजरा पख्तुनीकडे वळल्या..

"आता मी तुमच्या ताब्यात सापडलोय म्हणून तुम्ही माझ्याकडून काय हवे ते सर्व वदवून घ्याल असे वाटले का तुला डेडशॉट."

पख्तुनी सगळीकडुन अडकलेला असुनही त्याचा ताठा कायम होता अर्थात हे त्याच्या स्वभावाला साजेशेच होते म्हणा...

"अहं, तुला आज ओळखत नाहीये पख्तुनी मी. पण तरीही ही माहिती तुझ्या संघटनेला अजिबात घातक नसल्याने तू ती लपवणार नाहीस असे मला वाटते. खरेतर, ती माहिती आम्हाला सांगुन आमच्या डोक्याला अजुन एक भुंगा लावून देण्याचा विचार तू आधीच केला असशील याची मला खात्री आहे."

चैतन्य अगदी मैत्रीच्या स्वरात उदगारला. त्याची आणि पख्तुनीचे हे उंदरा-मांजराचे नाते कर्नलला नवीन नव्हते. कधी कॅप्टन वरचढ ठरायचा तर कधी पख्तुनी.

"हुश्शार आहेस, ही संधी कशी सोडेन मी डेडशॉट. ठिक आहे कॅप्टन ऐका तर ...

जशी तुमची माणसं आमच्या संघटनेत आहेत तशी माझीही माणसे तुमच्या संघटनेत आहेतच की. मुळात जेव्हा मला ही बातमी समजली की आर्मी इंटेलिजन्सचा एक स्पेशल एजेंट कुठलीही सुरक्षा न घेता साठ कोटीचे हिरे घेवुन प्रवास करणार आहे तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. असल्या क्षुल्लक कामासाठी एका प्रशिक्षीत गुप्तहेराचा वापर करायची ए.आय. ला गरज का पडावी? अशा कामासाठी तुमच्याकडे पुष्कळ माणसे आहेत. मुळात हे काम आर्मीच्या अखत्यारीत येतच नाही. ए.आय. मध्ये असणार्‍या माझ्या माणसालाही फारशी माहिती नव्हती. त्यामुळे मी थोडे खोलात जावून याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा माझ्या असे लक्षात आले की या दरम्यान ए.आय्.चे चिफ चक्रवर्ती यांनी पुष्कळ वेळा भारतीय संरक्षण विभागाच्या संशोधन केंद्राला भेटी दिल्या आहेत. मी अजुन आत शिरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लक्षात आले की ते कुठल्यातरी जैव शास्त्राशी संबंधीत व्यक्तीला भेटताहेत. त्यानंतर मी माझे इंटरपोलमधील खबरे हाताशी धरले आणि जी बातमी हाती आली ती प्रचंड धक्कादायक होती. त्या बातमीप्रमाणे गेले कित्येक दिवस संशोधन केंद्रात कुठल्याश्या जिवाणुवर संशोधन चालु होते. आता हा विभाग काही जिव वाचवणारे वैद्यकीय संशोधन करणारा विभाग नाही, म्हणजे १००% एखाद्या नव्या शस्त्रावर काम चालु होते. पक्की माहिती जरी नसली तरी काहीतरी शिजत होतं हे नक्की.....

त्यानंतर मग मी सरळ एक दिवस त्या एजंटलाच उचलले.

"यु मीन 'विमल' ? ही माहिती तुला विमलने दिली?"

कर्नल देशमुखांचा जमदग्नि झाला होता.

"कुल डाऊन कर्नल. इतक्या सहजासहजी नाही तयार झाला तो. मुळात त्याला साठ कोटीचे हिरे या व्यतिरिक्त अजुन काही माहितीच नव्हते तर काय सांगणार तरी काय तो? पण मग आम्ही त्याच्यावर आमच्या स्पेशल डोटचा वापर केला. आठवतेय ना कर्नल तुम्हाला त्या डोटबद्दल ? (वाचा 'मी परत येइन') पण त्याला काही माहीतच नव्हते एवढेच त्यामुळे आमच्या ल़क्षात आले. फक्त झाले एवढेच की तो यापुढे स्वतःच सर्व अपडेट्स आम्हाला देत राहणार होता. ज्या दिवशी तो प्रवास करणार हे कळाले त्याच दिवशी सेम फ्लाईटमध्ये माझ्या माणसानेही एक तिकीट बुक केले. सुदैव बघा, त्याला अगदी विमलच्या शेजारचीच सीट मिळाली."

कर्नल स्वत्;शीच खुदकन हासले.

"कर्नल?" पख्तुनीने तेवढ्यातल्या तेवढ्यात तेही पकडलेच.., पण कर्नलनी त्याला टाळुन पुढे कंटिन्यु करायला सांगितले...

"चालु दे तुझे?"

"तर त्या दिवशी निघण्याच्या आधी माझ्या कॉन्टॅक्टने विमलशी संपर्क साधला त्यानुसार त्याला कळले की विमलकडे इतर कुठलीही वस्तु सोपवण्यात आलेली नाही. फक्त साठ कोटीचे ते हिरे आणि एक नवा कोरा मोबाईल फोन. इथे परत मनात शंकेची पाल कुजबुजली. नवा कोरा फोन...? माझी खात्री पटली, त्या फोनमध्येच काहीतरी होते. सुदैवाने माझ्या माणसाला विमलच्या शेजारचीच सीट मिळाली असल्याने त्याला विमलकडून तो मोबाईल उडवणे फारसे कठीण गेले नाही. अर्थात माझ्या माणसाने तो मोबाईल त्याच्याकडून उडवताना ते हिरेही उडवले आणि जाता जाता त्याला अँटी डोटची सुई टोचली. विमलला काही कळालेच नसेल म्हणा, कारण एखादी मुंगी चावल्याइतकीही जाणिव होत नाही त्या सुईने. पुढचे दोन तास तर विमल बेशुद्धच पडणार होता. आणि एकदा का शुद्धीवर आला की त्याला मधले काहीही आठवणार नव्हते. अर्थात त्या दिवशी माझ्या माणसाला योगायोगाने त्याच्या जवळचीच सीट मिळाल्याने ते सहज झाले नाही तर वेळ पडल्यास आम्ही ते विमान हायजॅक करायचीही तयारी ठेवली होती...."

त्यानंतर ती चिप थेट पाकिस्तानात आमच्या हेड क्वार्टरमध्ये पोचली. आमच्या तज्ञांनी ती डिकोड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आले की ही चिप खास संरक्षणात आहे कारण उघडताना तिने आमच्याकडे रेटीनाचा पासवर्ड मागितला. आम्ही सावध झालो. मी या प्रकरणात पहिल्यापासुन असल्यामुळे साहजिकच हे काम माझ्यावरच सोपवण्यात आले. त्याक्षणी तरी मला त्या संशोधकाचे नाव माहिती नव्हते, पण नंतर चक्रवर्तींना शब्दांच्या जाळ्यात पकडून मी ते नाव काढून घेतले. नेहमीप्रमाणे या केसमध्ये मुख्य अडथळा डेडशॉटचा असणार होता. त्यामुळे मी यावेळी त्याला आधीच अडकवण्याचे ठरवले. त्याची पुर्वतयारी म्हणून त्याला भडकवण्यासाठीच मी तो फोन केला होता. पण बहुदा तो चुकीच्या ठिकाणी लागला. साठ कोटीच्या हिर्‍यांचे नाव ऐकताच समोरची व्यक्ती फसली आणि त्याने काहीतरी बोलुन सारवासारव करायचा प्रयत्न केला पण तिथेच तो पकडला गेला. त्यामुळे मी फोन कट करुन परत डेडशॉटला लावला. या गड्बडीत मी त्या राँग नंबरवाल्याकडे थोडे दुर्लक्षच केले. मुझे लगा कोयी मौकापरस्त आदमी होगा इसलिये मैने उसे दिमागसे निकाल दिया, लेकीन अब लगता है वही मेरी सबसे बडी गलती थी. काश.....

खैर..., यावेळी मात्र योग्य नंबर लागला होता. त्यानंतर भडकलेल्या डेडशॉटला अडकवणे सोपे होते. अर्थात त्यासाठी मी इथल्या माझ्या लोकल कॉन्टॅक्टचा युसुफचा वापर केला....

बोलता बोलता पख्तुनीने कपाळात गोळी घेवुन पडलेल्या युसुफकडे पाहीले. "सॉरी युसुफ, मै तुम्हे बचा नही सका. मैने तुमसे पहलेभी कहा था, यहा एकसे एक शैतान भरे हुये है, थोडी भी गलती करोगे तो समझो गये कामसे... आगे सबकुछ मेरे प्लान के हिसाबसेही हो रहा था ! पता नही कहा गलती हुयी और .........!"

पख्तुनी स्वतःशीच विचार करायला लागला.

"कहाँ... कहाँ गलती हो गयी? सब कुछ तो ठिक ठाक चल ....., ओह्..ओह शिट... सबकुछ इतना ठिक ठाक चल रहा था इसका मतलब, तभी मै सोचु कॅप्टन इतनी आसानीसे कैसे फस गया हमारे जालमें? इसका मतलब कर्नल........"

"जी हाँ.... हुजूर दिलबागखान पख्तुनी ! तुला काय वाटलं ? भारतीय आर्मीवाले इतके बेवकुफ आहेत का? इतके योगायोग घडतात का रे कधी? आधी साठ कोटींच्या हिर्‍यांच्या शिफ्टींगची बातमी तुझ्यापर्यंत पोचते, मग ते कोण घेवुन जाणार आहे त्याचे नाव इतक्या सहज तुला कळते, मग एखाद्या शेतकर्‍याने आपल्या शेतात काय बीयाणे पेरलेय इतक्या सहजपणे तुला एवढ्या मोठ्या शोधाची माहिती मिळते, मग अगदी सहजपणे ती चिप तुझ्या हातात पडते, इतक्या सहजपणे कॅप्टन चैतन्य निंबाळकर युसुफ टकला नावाच्या एका फडतुस गुन्हेगाराच्या कैदेत सापडतो. इतके योगायोग आपल्या आयुष्यात घडतात का रे कधी पख्तुनी? तुम्हे तुम्हारे ओव्हर कॉन्फिडन्सने धोखा दे दिया मेरे यार्..ओव्हर कॉन्फिडन्सने धोखा दे दिया !"

चैतन्य अगदी सहजपणे म्हणाला आणि तो व कर्नल दोघेही पख्तुनीकडे पाहून त्याची टर उडवल्यासारखे हसायला लागले. आता चमकण्याची पाळी सतीश रावराणेची होती...

"म्हणजे, म्हणजे कर्नल साहेब , ती चिप गायब होणं, पख्तुनीच्या ताब्यात जाणं, मग पख्तुनी डॉक्टरांसाठी म्हणून इथे येणं..... हे सर्व पुर्वनियोजीत होतं?"

येस सतीश, आर्मी इंटेलिजन्सच्या मुख्य पदावर जो माणुस बसलाय ना? चीफ चक्रवर्ती तो तिथे वशील्याने नाही पोचलेला. जेव्हा आमच्या खात्याला चिटणीसांचा शोध पुर्ण झाल्याची बातमी मिळाली तेव्हाच चक्रवर्तीच्या डोक्यात या योजनेचा जन्म झाला. पख्तुनी नावाचा हा काटा आपल्या गुप्तचर संस्थेच्या डोळ्यात गेली कित्येक वर्षे सलतोय. डॉ. चिटणीसांना विश्वासात घेवुन आम्ही हा प्लान आखला. त्यासाठी विमलला ही आम्हीच प्लान्ट केला होता. पख्तुनी ज्याला आपला खबर्‍या म्हणतोय तो खरेतर खुप पुर्वीच पकडला गेला होता. गेली दोन वर्षे त्याच्या जागी आमचा माणुस काम करतोय, पख्तुनीचा खबर्‍या म्हणुन.

पण मग पख्तुनीने त्याला ओळखले कसे नाही?

पुर्ण तयारी करुन, त्या खबर्‍याचा पुर्ण अभ्यास करुन, प्लास्टीक सर्जरीचा आधार घेवुन मगच आम्ही आमचा माणुस उतरवला होता सतीश. गेली दोन वर्षे तो पख्तुनीच्या संपर्कात आहे. त्यामुळे आम्हाला पख्तुनीचे प्लॅन्स आधीच कळत गेले. खरे तर हा प्रकार पख्तुनीच्या बाबतीत आम्ही या आधीही केलाय, पण तरीही पख्तुनीला संका आली नाही. कदाचित एकच पद्धत आम्ही दोन वेळा वपरनार नाही असेच त्याला वाटले असावे. अगदी चैतन्यचे अपहरण होणार आहे ही बातमीदेखील आम्हाला आधीच मिळाली होती. पण त्याचे अपहरण झाले आणि त्यानंतर माझा त्याच्याशी असलेला संपर्क तुटला. तरी तो चक्रवर्तीच्या संपर्कात असल्याने त्याच्या सर्व हालचाली आमच्यापर्यंत पोचत होत्या. त्या दरम्यान पख्तुनीकडे खरा प्लान काही तरी वेगळाच असणार याची आम्हाला खात्री होती. फक्त तो काय आहे हे शोधुन काढायचे होते? त्यामुळे आम्ही कायम पख्तुनीवर नजर ठेवुन होतो. प्रत्येक वेळी स्वतःच सर्व कामे करण्याची सवय आणि खबरदारी घेणारा अशी पख्तुनीची ओळख असल्याने आम्ही त्याच्यावर पुर्ण नजर ठेवुन होतो. पण यावेळी पख्तुनीने आमच्या या माहितीचाच गैरफायदा घेतला. आम्ही त्याच्या हालचालीवर नजर ठेवुन राहीलो आणि पख्तुनी मात्र युसुफच्या माध्यमातुन आपला बॅकप प्लान तयार करत होता. पण सतीश..., जी माहिती आमच्या सुसज्ज आणि ट्रेनड् एजेंटसना मिळु शकली नाही, तिच्यापर्यंत तुम्ही कसे का पोचलात?

"कर्नलसाहेब, चोराची पावले चोरालाच माहीत असतात. या नात्याने जेव्हा शिर्‍या उर्फ शिरिश भोसले उर्फ बिलंदर या प्रकरणात आला तेव्हाच या गोष्टी त्याच्या डोक्यात आल्या होत्या. आपण केवळ पोलीसी किंवा लष्करी विचारसरणीने विचार करत होतो. शिर्‍या युसुफच्या म्हणजे गुन्हेगारांच्या वृत्तीतुन या केसकडे पाहात होता. त्याने आपले सोर्सेस वापरले आणि कॅप्टनला शोधुन काढले. त्यात पख्तुनीने आझाद मैदानावर तो स्फोट करण्याची चुक केली आणि शिर्‍याची ट्युब पेटली. जेव्हा मी शिर्‍याला सांगितले की त्या स्फोटात आर्.डी.एक्स. वापरले होते तेव्हा शिर्‍या त्या दृष्टीकोनातुन शोध घ्यायला लागला. शिर्‍याबद्दल डिटेल माहिती मी नंतर देइनच, सद्ध्या एकच सांगतो. शिर्‍या म्हणजे अगदीच नसला तरी काही अंशी तरी रॉबिनहुडचा नवा अवतार आहे. तोही रॉबिनहुडप्रमाणे गुन्हेगारांना लुटतो. फरक एवढाच की रॉबिनहुड लुट गोर गरीबात वाटुन टाकायचा आणि शिर्‍याच्या मते तो स्वतःच जगातला सर्वातला गरीब माणुस आहे. "

सतीशने खुसखुसत सांगितले.., तसे कर्नल गडगडाटी हासायला लागले.

"पण सतीश, मघाशी तू सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेव्हा जयप्रकाश नगर झोपडपट्टीत पोचलात तेव्हा तिथुन चैतन्य आधीच गायब झालेला होता. मग चैतन्यशी तुमचा संपर्क कसा झाला? आणि तो 'सादिक' तुमच्या हातात कसा सापडला?

"इथुन पुढची गोष्ट मी सांगु?"

सगळ्यांच्या गन्स लगेच दारावर ताणल्या गेल्या, एकट्या सतीशची नजर पख्तुनीवर होती. कारण दारातून आलेला तो आवाज कुणाचा आहे हे त्याला चांगलेच माहीत होते.

"मैफलीत व्यत्यय आणल्याबद्दल सॉरी सर्स...., इफ यु डोंट माईंड, मी आधी त्या सदगृहस्थांना भेटू.?"

दारात 'बिलंदर' उर्फ शिर्‍या उभा होता, पख्तुनीकडे बोट दाखवत.

"शिर्‍या? कर्नलने प्रश्नार्थक मुद्रा करत त्याला पख्तुनीकडे जाण्याची परवानगी दिली.

शिर्‍या पख्तुनीसमोर जावून उभा राहीला. दोन वादळं जणु काही एकमेकाला आजमावुन बघत होती. अचानक कसलाही विचार न करता शिर्‍याने उजव्या हाताचा ठोसा पख्तुनीच्या तोंडावर मारला, त्या आकस्मिक ठोश्याने क्षणभर भांबावलेला पख्तुनी जरा मागे पड्ल्यासारखा झाला पण पुढच्याच क्षणी काहीतरी घडले आणि शिर्‍या जमीनीवर आडवा पडला होता.

पुढे होत पख्तुनीने त्याला हात दिला...

"मिलकर खुशी हुयी दोस्त. ! लेकीन पख्तुनीपर हात उठानेसे पहले दस बार सोचना. अभी तु बच्चा है , बहोत कुछ सिखना है तुम्हें!"

आपला दुखावलेला जबडा सांभाळत शिर्‍या उठला आणि हासून म्ह्णाला..

"गुस्ताखी माफ करना बडे भाई, गलती हो गयी! पण साला तुला तो राँग नंबर टाकायला मीच सापडलो होतो काय? आणि वर पुन्हा ६० कोटीच्या हिर्‍यांचाही उल्लेख केलास? साला सगळी मेहनत पाण्यात गेली."

आता सतीश त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहायला लागला. आधी खदखदा हसणार्‍या पख्तुनीकडे मग खुसखुसणार्‍या कॅप्टन आणि कर्नलकडे बघत शिर्‍या विव्हळला.

"सत्या, अरे कसले साठ कोटीचे हिरे, सहा हजाराचेही नसतील ते खडे! मुर्ख बनवला सगळ्यांनी झालं..."

तसे कर्नल हसायला लागले.

"अरे ते आमिश पख्तुनीसाठी होतं, पण त्यानेही नेमका त्याचाच वापर केला कॅप्टनला खिजवण्यासाठी आणि त्यात नेमका तू अडकलास."

"सालं गेले काही दिवस नशिबच खराब आहे आपलं. आधी त्या कसिनोमध्ये पैसे हारलो. त्यानंतर हे...."

"एनी वेज तू पुढे काय घडलं ते सांगणार होतास शिर्‍या...." कर्नलने आठवण करुन दिली तशी शिर्‍या बोलायला लागला...

...

..

दारात आडवा पाय घालुन मी आत शिरलो आणि....

*********************************************************************

तेवढ्यात शिर्‍याला त्याच्या अंतर्मनाने काहीतरी जाणीव करुन दिली. डाव्या पायावर भार देवून तो तस्साच गर्रकन वळला, वळता-वळताच त्याने आपले अंग एका बाजुला झोकून दिले होते. दुसर्‍याच क्षणी वरच्या बाजुने काहीतरी जोरात, वेगाने जमीनीकडे झेपावले. शिर्‍याच्या सिक्स्थ सेन्सने पुन्हा एकदा त्याला वाचवले होते. शिर्‍याने लगेच बचावाचा पवित्रा घेतला पण जमीनीकडे झेपावलेला तरुण तयारीचा दिसत होता. वेगाने खाली आलेले आपले शरीर त्याने दोन्ही हातांच्या आधारावर अलगद तोलले होते. एक पाय जमीनीला टेकवत त्याने शरीराला हलकाच जर्क दिला आणि तो तसाच खाली न पडता पुन्हा आपल्या पायावर उभा राहीला. पण त्याचा पवित्रा मात्र आक्रमणाचा होता.

"कोण आहेस तू? यांच्यापैकी वाटत नाहीस?" त्या तरुणाने रजीयाकडे पाहात शिर्‍याला विचारले.

"मी सांगतो डेडशॉट!"

दारातून एक आवाज आला तसे चैतन्यने वळून दाराकडे पाहीले. एक ओळखीचा चेहरा दारात उभा होता. चैतन्यच्या डोळ्यात आश्चर्याची भावना उमटली.

"सतीश? इन्स्पेक्टर सतीश रावराणे...., साल्या तू इथे काय करतोयस?"

आपली बाहेरची जबाबदारी पार पाडून रावराणे शिर्‍याच्या मदतीला येवुन पोहोचले होते. पण इथल्या एकंदरीत वातावरणावरुन शिर्‍याला मदतीची काही आवश्यकता आहे असे वाटत नव्हते.

"ते सगळं सांगतो तुला पण अजुन कोणी यायच्या आधी इथुन बाहेर तर पडुया. आम्ही तुला सोडवायलाच आलो होतो."

"नाही त्याची आवश्यकता नाहीये सतीश. रजीया, तू जरा बाहेर लक्ष ठेवशील, मला यांच्याशी बोलायचेय थोडे."

सतीश आणि शिर्‍या दोघांनाही बुचकळ्यात पाडून रजीया हळुच हासली आणि दाराबाहेर गेली.

"आता मला सांग सतीश हा कोण आहे? आणि तुम्ही इथे कसे? म्हणजे मी इथे आहे हे तुम्हाला कसे कळले?"

"हा शिर्‍या उर्फ 'शिरीष भोसले', कदाचीत याला तू वेगळ्या नावाने ओळखत असशील; त्याला अंडरवर्ल्ड बिलंदर या नावाने ओळखतं. आता आम्ही इथे कसे आलो? तर ती सगळी याचीच कृपा आहे."

रावराणेंनी पटापट सगळा घटनाक्रम चैतन्यला समजावून सांगितला. अर्थात आपल्या जिवलग मित्राला सेफर साईडला ठेवायचे म्हणून त्याने हिर्‍यांचा उल्लेख मात्र साफ वगळला होता. बोलून झाल्यावर सतीशने हळुच शिर्‍याकडे बघीतले, शिर्‍याच्या डोळ्यातली कृतज्ञतेची भावना बघून तो मिस्किलपणे हासला.

"च्यामारी , तुझा हा दोस्त भलताच डेंजर दिसतोय. एवढे शार्प रिफ्लेक्सेस फार कमी जणांकडे असतात. त्याच्या वेगवान हालचाली बघून मला तर आमच्या कर्नलचीच आठवण झाली एकदम."

चैतन्यने हासतच शिर्‍याकडे पाहात हस्तांदोलनासाठी आपला हात पुढे केला.

"पण कॅप्टन तुम्हाला तर किडनॅप केले गेले होते ना? इथे परिस्थिती काही वेगळीच दिसते आहे. ती रजीया नक्की कुठल्या साईडची आहे?"

" यु आर राईट शिरीष, माझे अपहरण झाले होते खरे. पण खरेतर त्याची आम्हाला कल्पना होती आधीच. काही गोष्टी सद्ध्या पडद्याआडच राहू दे. राहता राहिली रजीयाची बाब, तर ती आमचीच आहे. खरे तर माझ्यासाठी ही गोष्ट जास्त धक्कादायक आहे की आज सकाळी माझे अपहरण झाले, ही गोष्ट चीफ आणि कर्नल सोडले तर कुणालाच माहिती नाही, त्यात हे ठिकाण तर अजुन त्या दोघांनाही माहिती नाही आणि इतक्या कमी वेळात केवळ एका राँग नंबरच्या आधाराने शोध घेत तू माझ्यापर्यंत येवुन पोचलास? अमेझींग्...रियली अमेझींग!"

चैतन्यच्या स्वरांमध्ये अगदी प्रामाणिक आश्चर्य होते.

"ती काही फारशी विशेष गोष्ट नाहीये कॅप्टन. चोराची पावले चोरालाच माहिती असतात."

शिर्‍या रावराणेंकडे पाहात खुसखुसत म्हणाला.

एनीवेज मी काय सांगतो ते नीट ऐका. आणि चैतन्य बोलायला लागला. समोर रावराणे असल्याने त्याचा त्या दोघांवर विश्वास बसायला वेळ लागला नव्हता. पाच मिनीटात त्याने आपले बोलणे संपवले. तो तिथे आहे ही गोष्ट मोमीनलाही कळावी असे त्याला वाटत नव्हते, म्हणुन आम्ही लगेच एक नवा प्लान बनवला.

"आता तुम्ही निघा येथुन. मी सांगितलेले तेवढे लक्षात ठेवा. युसुफ कुठल्याही क्षणी येइलच आता."

************************************************************************

खरेतर त्या क्षणापर्यंत आम्हाला पख्तुनीच्या खर्‍या प्लानबद्दल काहीच माहिती नव्हती. पण नंतर त्याने तो आझाद मैदानावरचा बाँबस्फोट घडवून आणला आणि माझी ट्युब पेटली. मी कॅप्टनला फोन केला, माझ्या अंदाजाप्रमाने कॅप्टन अजुन तिथेच होता. हे काम पुर्ण होइपर्यंत बहुदा त्याला तिथेच कैदेत ठेवायचा पख्तुनीचा प्लान असावा. मी कॅप्टनला आता तिथे अडकुन पडण्याची गरज नसल्याचे कळवले. पण रजीया तिथेच थांबणार होती. युसुफने नुसत्या फोनवर जर चौकशी केली असती तर ती त्याला बरोबर गुंडाळु शकणार होती. जर युसुफ प्रत्यक्ष तिथे आला असता तर मात्र त्याला किंवा त्याच्या माणसाला ठरल्याप्रमाणे खोलीला बाहेरुन कुलुप आणि आत रजीया बेशुद्धावस्थेत सापडणार होती. त्याची बाहेरची माणसे आम्ही आधीच ताब्यात घेतली होती.

मी माझे अंडरवर्ल्डमधील सोर्सेस वापरून गेल्या काही दिवसातील आर्.डी.एक्स. संदर्भातील हालचालींबद्दल काही माहिती मिळते का ते शोधायला सुरुवात केली त्यातुन मला सादिकचे नाव कळले. पण तोपर्यंत सादिकच त्या योजनेचा एक महत्त्वाचा घटक आहे हे माहीत नव्हते. पण कर्नल, जेव्हा लोकल ट्रेनमध्ये तुम्ही डॉ. चिटणीस बनुन सादिकला भेटलात आणि तुमच्या सुटाच्या बटनात बसवलेल्या कॅमेर्‍याने सादिकचा फोटो घेतला व तो चक्रवर्तींकडे ट्रान्समिट केला गेला. तेव्हा चक्रवर्तींनी तो चैतन्यला एम एम एस द्वारे पाठवला आणि चैतन्यने मला. माझ्या खबर्‍याने त्या फोटोतल्या माणसाला सादिक म्हणून ओळखले, तेव्हाच मी ठरवले सादिकच्या मागे लागायचे. कारण बॉम्ब्सची माहिती पख्तुनीनंतर फक्त त्यालाच असण्याची शक्यता होती. म्हणून सतीशला युसुफच्या मागे लावून मी थेट भायखळ्याकडे निघालो. दादरला सादिक भेटल्या भेटल्या लगेच कर्नलनी जर फोटो पाठवला नसता तर मग कठीण झाले असते. कारण कर्नल ते चक्रवर्ती, चक्रवर्ती ते चैतन्य, चैतन्य ते मी आणि नंतर खातरजमा करुन घेण्यात ५-७ मिनीटे गेली होती. तोपर्यंत गाडी भायखळ्याला पोचली होती. मी तिथे पोचलो तेव्हा कर्नल कधीच रवाना झाले होते. बहुदा पख्तुनी त्यांच्या मागे आणि चैतन्य पख्तुनीच्या मागे तेव्हाच निघाले असावेत. सादिकची एक जुनी खोड त्याला नडली. भायखळा स्टेशनच्या बाहेर असलेल्या एका पान टपरीवर बहुदा त्याने आधी सिगारेट ओढली असावी आणि नंतर पान चघळत पाच मिनीटे तिथेच उभा राहीला. मला अजुन दोन मिनीटे जरी उशीर झाला असता तरी सादिक माझ्या हातुन निसटला असता मग इथलं चित्र काही वेगळंच असलं असतं. पण मी सादिकला उचलला. अक्षरशः त्यालाही कळले नाही इतक्या वेगात माझी झोंडा त्यांच्या साईडला थांबवली, दार उघडत त्याला आत खेचले. आपल्याला पळवले जातेय हे त्याला कळले तोपर्यंत गाडीने भायखळा स्टेशन ५०० मीटर मागे सोडले होते. या दरम्यान मला ४-५ वेळा सिग्नलपण तोडावा लागला. पण सादिक खुपच महत्त्वाचा माणुस निघाला. सगळे बाँब त्यानेच प्लान्ट केले होते हे त्याने फुशारकीने सांगितले पण त्यानंतर मात्र...

साला, तोंड उघडायला तयारच होइना. तेव्हा मी त्याला साठ कोटीच्या हिर्‍यात पन्नास टक्के शेअरची लालुच दाखवली, तर त्याने मलाच मुर्खात काढले. त्याच्याकडुनच कळाले त्या हिर्‍यांच्या असलीपणाबद्दल..."

हे वाक्य उच्चारताना शिर्‍याने अगदी जळजळीत नजरेने कॅप्टनकडे बघीतले, तसा कॅप्टन अजुनच हसायला लागला.

"असो, पण त्यानंतरही साला बोलायला तयारच नाही म्हटल्यावर त्या कोल्हापूरी हिसका दाखवला." शिर्‍याच्या डोळ्यात पुन्हा ती बेरकी चमक आली.

"काय केलंस शिर्‍या तू त्याचं?"

सतीशने शंकीत होवून विचारले.

"जिवंत आहे रे तो, काही विशेष नाही? फक्त नागडा करुन उलटा टांगला आणि पुढून्-मागून लाल मसाला भरला त्याच्यात. दोन मिनीटात पोपटासारखा बोलायला लागला."

कॅप्टनने डोक्यावर हात मारुन घेतला.

"साला, ये तो मैने सोचाही नही था!" पख्तुनीने विस्फारलेल्या नजरेने शिर्‍याकडे बघतच राहीला.

एकदा त्याने तोंड उघडले की पुढचे काम सोपे होते. सतीशने दिलेल्या नंबरवर चक्रवर्तीसाहेबांना त्याची माहिती दिली. बाँब कुठे, कुठे आहेत ते कळवले? आणि त्याला तसाच लटकलेल्या अवस्थेत सोडून इकडे यायला निघालो. या ठिकाणाचा पत्ता सादिककडुनच कळाला होताच. पण सत्या, तू इथे कसा काय पोचलास?

मला चैतन्य सतत पाठलागाचे अपडेट्स देत होता. या बंगल्यात शिरण्याआधी त्याने शेवटचा मेसेज दिला होता मला. त्यामुळे मी इथे पोचलो. तर इथे नवाच धक्का म्हणजे चिटणीस आणि कर्नलसाहेब एकच आहेत हा, माझी वाट पाहात होता. खरेतर चैतन्यला त्यांनी पकडुन आत आणल्यावरच माझे रक्त उसळले होते, पण जोपर्यंत तुझ्याकडुन 'डन' चा मेसेज मिळत नाही तोपर्यंत मी काहीही हालचाल करु शकत नव्हतो. तुझे कन्फर्मेशन मिळाले आणि आत शिरलो. दोनच मिनीटात सर्व परिस्थिती ताब्यात आली.

शिर्‍याने एक नजर युसुफकडे टाकली..

"अरे याला कुणी उडवलं? हुश्श... बरं झालं, नाहीतर नसती कटकट होण्याची शक्यता होती."

"कटकट? कसली कटकट शिर्‍या, बाय द वे तुला यायला उशीर का झाला इतका. मला मेसेज केल्यानंतर जवळ जवळ पंचेचाळीस मिनीटांनी उगवलास तू. इतका वेळ?"

काही नाही रे. म्हणजे तुम्ही लोक पुन्हा याला अटक करणार, तो सरकारचा जावई बनुन बिर्याणी झोडत राहणार म्हणुन म्हटलं. बाकी उशीराबद्दल म्हणशील तर अरे, ट्रॅफीक कसलं घाणेरडं आहे मुंबईचं, तुला माहीत नाही का?"

शिर्‍याने रावराणेंची नजर चुकवत उत्तर दिलं खरं. पण सतीशच्या नजरेतला संशय काही कमी झाला नव्हता.

पख्तुनीने एक सुस्कारा सोडला आणि लगेचच त्याच्या नेहमीच्या बेपर्वा वृत्तीने विचारले...

"ठिक है कॅप्टन, कर्नलसाब , इस बार तो आपने पख्तुनीको मात दे ही दी ! पण अजुन किती दिवस तुम्ही मला अडकवुन ठेवु शकाल? तुमच्या कुठल्या तुरुंगाच्या भिंती एवढ्या मजबुत आहेत की मला अडवु शकतील? आणि एक गोष्ट विसरताय तुम्ही...

"काय?" कर्नल आणि कॅप्टन एकदमच ओरडले..

"वो चिप ! वो अभीभी हमारे कब्जेमे है और मै इतना बेवकुफ नही हुं की उसे अपने साथ लेकर घुमू ! वो चिप पाकिस्तानमें हिफाजतसे है, आज ना कल कोइ और एजंट असली डॉ. चिटणीस को ले उडेगा और हम उस चिप का राज जान ही लेंगे! तब तक खैर मनाते रहो!"

आता मात्र कर्नल खरोखर एखाद्या राक्षसासारखे हसायला लागले. अतिशय सभ्यपणाचा आव आणत त्यांनी बोलायला सुरूवात केली...

"तुला अजुनही वाटतंय त्या चिपमध्ये कुठल्यातरी संहारक अस्त्राचा आराखडा आहे म्हणुन? वेडा आहेस पख्तुनी. भारत शांतीप्रिय देश आहे मित्रा. आम्ही आण्विक शक्तीचा वापरसुद्धा शांती कायम ठेवण्यासाठी करतो. ज्या शस्त्राने आजुबाजुचा आसमंत उध्वस्त होवु शकेल, निसर्ग विषारी होवु शकेल. कित्येक निरपराधी व्यक्तींचे प्राण जावु शकतील असे जैविक शस्त्र तयार करण्याच्या भानगडीत आम्ही का पडावे? ती चिप फालतु आहे. म्हणजे तशी अगदी सुरक्षीत आहे, डॉ. चिटणीसांच्या म्हणजे माझ्या रेटिनाचे पासवर्ड दिल्याशिवाय उघडणार नाहीच. पण एकदा का उघडली की त्यात फक्त टॉम अ‍ॅम्ड जेरीची कार्टुन्स मिळतील तुला, अन्य काहीही नाही. वेड्या, तुला अजुनही विश्वास बसत नाहीये का, हा सर्व कट फक्त तुझ्यासाठी होता रे आणि तू पद्धतशीरपणे आमच्या जाळ्यात अडकला आहेस."

पख्तुनीने डोक्यावर हात मरुन घेतला आणि दोन्ही हात हवेत झटकले...

"इतना बडा गेमप्लान और वो भी मेरे लिये? इज्जत अफजायी के लिये बेहद्द शुक्रीया कर्नल! चलो देखते है तुम्हारे जेलोकी दीवारे कब तक रोक पाती है पख्तुनीको !"

कॅप्टनने पख्तुनीला ताब्यात घेतले.

"सॉरी शिर्‍या, तुला साठ कोटीचे हिरे काही नाही मिळू शकले. पण एक गोष्ट मला, कर्नलना आणि चक्रवर्तीसाहेबांनाही मान्य आहे की या केसमध्ये तू नसतास तर ही योजना एवढ्या लवकर आणि इतक्या सहजपणे यशस्वी होवु शकली नसती. मुळात पख्तुनी निरपराध माणसांचे प्राण घेत नाही ही आमची कल्पना खोटी ठरली. तू जर सादिकला पकडून त्याच्याकडून बाँब्सची माहिती काढली नसतीस तर अनर्थ झाला असता आणि आम्ही कुणीच स्वतःला कधीच माफ करु शकलो नसतो. या देशावर आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांवर हे तुझे आणि इन्स्पेक्टर सतीशचे खुप मोठे उपकारच झाले आहेत अँड आय सॅल्युट यु बोथ फॉर दॅट !"

दुसर्‍याच क्षणी चैतन्य आणि कर्नल देशमुख यांनी खाडकन आपले पाय जुळवले आणि सत्या-शिर्‍याकडे बघत एक खणखणीत लष्करी पद्धतीचा सलाम ठोकला. सत्यानेही उलटपावली सलामी दिली, शिर्‍या नुसताच बघत उभा राहीला....

"शिर्‍या, यापुढे कधीही मदतीची गरज लागली तर मला हाक मार. आजपासुन तू माझा मानसपुत्र आहेस. खुप दिवसानंतर अजुन एक मर्द का बच्चा भेटलाय तुझ्या रुपाने."

कर्नलनी शिर्‍याला जवळ ओढले आणि बापाच्या मायेने एक कडकडुन मिठी मारली. दुसर्‍याच क्षणी ते परत कर्नल देशमुख होते.

"कमॉन कॅप्टन, बरीच कामे आहेत अजुन, लेट्स मुव्ह !"

जाता जाता पख्तुनीने शिर्‍याला एक कोपरखळी मारलीच...

"सचमुच के बिलंदर हो दोस्त ! फिर मिलेंगे, तुमसे दो हाथ करनेंमे मजा आयेगा...."

शिर्‍याने नुसतेच उजव्या हाताची पहिले दोन बोटे कपाळाच्या कोपर्‍यात टेकवत पख्तुनीला अलविदा केले.

***********************************************************************

"तुझ्याबद्दल खुप वाईट वाटलं शिर्‍या. ज्या साठ कोटींच्या हिर्‍यांसाठी तू या प्रकरणात पडलास ते हिरेच नकली निघाले. सो सॅड!"

"गपे रांडीच्या, खपल्या काढू नको तू अजुन....! साले तुम्ही सगळे वर्दीवाले तसलेच. गोड गोड बोलुन पाचर मारणार." शिर्‍या करवादला.

त्याची झोंडा वेगाने अंधेरीच्या दिशेने धावत होती. जाता जाता मध्ये माहीमला सतीशला त्याच्या चौकीवर टाकून थेट लोखंडवालातला आपला फ्लॅट गाठायचा आणि ताणुन द्यायची असा शिर्‍याचा विचार होता.

"पण शिर्‍या, मघाशी तू माझ्या प्रश्नाचे उत्तर टाळलेस. तुला एवढा उशीर कसा काय झाला? साल्या, ट्रॅफीकचा अडथळा तुला कधीपासून व्हायला लागला रे?"

तसा शिर्‍या आधी हळुहळु खुसखुसायला लागला आणि नंतर कुणी गुदगुद्या कराव्यात तसा खिदळायला लागला. सत्याच्या नजरेतला संशय अजुनच वाढला. काहीतरी काळं बेरं होतं खास....

सत्याने जर तो बसलेल्या सीटचं कुशन उचकुन बघीतलं असतं तर त्याला शिर्‍याच्या हसण्याचं कारण नक्की कळलं असतं...

ज्या सीटवर सत्या उर्फ सतीश रावराणे बसले होते त्या सीटच्या कुशनमध्ये, तसेच रिअर सीटच्या कुशनमध्ये 'युसुफ टकलाच्या' बेसमेंटमधुन शिर्‍याने उडवलेल्या सोन्याच्या चिपा होत्या, किमान ६० कोटीच्या तरी नक्कीच असाव्यात.

समाप्त.

गुलमोहर: 

Jiyo Happy

मस्त Happy

चला आली एकदाची.............हुश्श्श्श्श्श्श्श्श्श्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स

आला का
हुश्श
कितीईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई वाट पाहिली मी Happy
नेहमीप्रमाणेच Happy

फायनली.............. मस्त जमलीय......पण थोडी लवकर आणि थोडक्यात आवरती घेतलीय असे जाणवतेय

आधीच्या गोष्टीसारखी एका ट्रेनप्रवासात एका दमात वाचून झाली नाही ! पण पुर्ण वाचली नंतर ! चांगली आहे पण थोडी विस्कळीत वाटली. Happy
काही भागाची प्रेरणा "१६ डिसेंबर" या डॅनी अभिनीत चित्रपटापासून घेतल्यासारखे वाटले. म्हणजे निदान माझ्या डोळ्यासमोर तरी त्या चित्रपटाची दृष्ये उभी राहीली. Happy

छान कथा विशालदा....आधी वाचलेले भागही पुन्हा वाचावे लागले तेव्हा व्यवस्थित कळली...आणि आवडली Happy