पेरा

Submitted by आदित्य चंद्रशेखर on 20 May, 2012 - 05:05

           गुढग्यावर जोर देत तुकाराम उठला. उठताना त्याला जाणवलं की गुढग्यातून कळ निघतेय; शरीर पूर्वीसारखं कामाला साथ देत नाही. सवय असली म्हणून शरीरही किती साथ देईल? त्यानंही आता पन्नाशी पार केलेली होती. वर पैसे नाहीत म्हणून अंगावर काढलेले किरकोळ आजार.

घराकडे चालता चालता तो विचार करू लागला,"कायीबी मजूरी सांगी राहाले! इतली कुढी राहाते का?" दोन वरीसमांगे तं ऐंशी रुप्ये रोजावरबी याचे! आताच काहून दिडशे रुप्ये सांगी राहाले? त्याहचंबी बराबरे म्हना! महंगाईनं त्यायचीबी कमर ढीली करी टाकेले; न गावात जे बी राहाले ते जुनेच मजूर राहाले! नविन पोरं उठले का चाल्ले जडगावले, भुसावलले, चाल्ले नाशिकले अन तढी पुन्यात तं गंज भरेले! वावरात काम क-याची लाज वाटले त्याह्यले! सगडेच का हाफिसर होनारे? आढी खेड्यात मजुरीचे शंभर रुप्ये भेटी राहाले रोजाचे! तढी जडगावले दिड हजारात घसता! काय भेटते? फोलपटं? या-जा चा खर्च अल्लग! पन याह्यले सांगीन कोन? शिकेल जाई राहाले तं ठीके, पन हे आठवी फेलबी? बरं घरचं वावर हाय नं? आढीच नीट मेहेनत केली तं त्या शिकेलपेक्षाबी जास्ती कमाडतीन आढी! पन आपलं ऐकीन थोडीच कोनी? पह्यलेच तं पावसानं तान देल्हे. हीरीबी तं सपाट झाल्या! थोडा पाऊस पड्याचे चिन्ह दिशी राहाले तं हे मजुरीचं नाटक उभं राहालं! काय कराव मानसानंबी? बरं किशोरले सांगावं तं तेलेच तेची पडेले! अन आपुनबी कायले सांगावं? आपला तान आपल्याजोय! तो तढी उग्गीच कायजी करत बशीन!"

विचारांची वावटळ डोक्यात घेऊनच तो घरी आला. मंगला भाकरी थापत होती.

"चुल्ह्यावर काहून करी राहाली? इश्टोले काय रोग झाला?" त्यानं संतापातच विचारलं.

"घासलेट कुढीये तेच्यात? सकाडच्या चहालेच संपलं नी का? पह्यलेच तं घासलेट भेट्याची मारामार!" तिने शांतपणे उत्तर दिलं. "भेटीन तं पाहाजा ना घासलेट!"

"नको वो माय मह्यं डोस्क खाऊ! येकतं सकाडचा मजूर शोधी शोधी गयरा पकी जायेले मी! करनं अशीन चुह्यावर तं कर नायतं राहू दे!"

आपल्या नव-याचं डोकं भडकलंय हे समजून मंगला शांत राहीली. काही वेळ असाच शांततेत गेला. तुकारामला मनोमन वाटलं आपण आपला राग तिच्यावर काढायला नको होता. बिचारी! कसा का होईना पण आपल्या संसाराचा गाडा ओढतेय ती! त्याच्या मनात एकदम कणव दाटून आली. गेली सत्तावीस वर्ष त्याच्या डोळ्यासमोरुन तरळून गेली. तो विचार करत होता, सत्तावीस वर्षांपूर्वी मंगला आपल्याशी लग्न करुन या घरात आली, तेव्हाची मंगला आणि आताची मंगला यात कितीतरी फरक पडला होता. तेव्हा आपलंबी मोठं वावर होतं, हीर होती. पन धीरेधीरे महंगाईनं सगडाच वांधा व्हायले लागी गेला. तरीबी तिनं कह्यीच कुरकुर केली नह्यी. उषाच्या लग्नात तं अर्धं वावर इकनं पडलं! खरचं! मंगला नसती तं माह्यासारख्या एड्याचा संसार कसा झाला असता देवाले मालूम!

"मंगले, पेरा तं बी व्हीन की नी आपला?"

"काहून असं म्हनता? आढलोंग तं झालंच की नी? मंग आताबी व्हीन!"

"तसं नी गं! पन काय व्हयेले, की निस्ती हायब्रीड टाकीसन बी परोडनार नी. उडीद बी तं टाकने पडतीन! पन गोष्ट अशी व्हयी जायेले की हायब्रीडची बिजवाई घेयाले गेला की उडदाले पैशे कमी पडी राहाले. बरं हायब्रीड तं टाकनीच पडीन! बैलायले तं देनंच पडीन नं! नाई तं पेंड्या तं गय-या महंग्या व्हई जाता! बरं हायब्रीडले भाव बी तं काई नई! अजून थोडेशे हाये पैशे, पन ते सुपर फास्फेटले लागतीन नं! बरं व्यापा-याकडून घ्यू तं बारे उषाच्या लग्नाचेच बारे फिटेल नी! बरं मजूर बी तं निस्ते पे-याचे दिडशे रुप्ये रोजचे सांगी राहाले! इतला तरास पह्यले कहीच नोता झाला! निस्ती पाभर ध-याचे दिडशे रुप्ये! एक तं ह्या महंगाईनं कमर मोडी टाकेले! येक ठिगय बुज्याले जावं तं दुस-या ठिकानी फाटते! काय करावं कही समजी नी राहालं! आपल्या जवायाकडून मांगले असते तं त्याह्यलेबी लागतीन ना! त्याह्यलेबी तं पेरनंय! न खरी बात सांगू का, जवाई मानसाजोय बी पैशे मांगनं बराबर नी वाटत मले! सोसायटीचेबी पह्यलेचेच फिटेल नी तं नवं कर्ज मिड्याची बातच सोड! इचार करी करी मह्यं डोस्कं फुटी जाईन आता. हा हंगाम कोरडा गेला की मगन संपले आपून!"

मनातलं सगळं भडाभडा बोलून टाकल्याने त्याला जरा मोकळं वाटलं. भिंतीला टेकून तो धापा टाकत बसला. मंगलाचा चेहेरा चिंतेच्या जाळ्यानी ग्रासून गेला.

"आवो, तुमी सोतावर आन त्या इठ्ठलावर इस्वास ठेवा! आतालोंग त्यानेच कायजी केली नं आपली? जवजवा असं काही झालं तवातवा कसंबी करीसन आपलं काम पूरं झालंच नं? आपल्याजोय येकतं पैसा नोता, मंग बाकी कुनाले जाऊद्या, आपल्यालेतंबी वाटलतं का की आपल्या ल्योक ईंजिनेर व्हीन? कसंबी करीसन किशोरले ईंजिनेर केलाच नं आपूननं? तो बी गयरा हुश्शार निंघाला नं तेनं चीज केलं. नाहीतं आढीच राहाला असता नं काहीमाही कामं करत? आता त्याचीबी लाईन लाग्याले थोडा टाईम तं लागीनंच म्हना. काई काजयी करु नका. व्हईन सगडं बराबर! चाला, जी घ्या! त्या इठ्ठलाले हाय आपली कायजी! तो करीन बराबर! चाला तं, भूक लागेलेनं तुम्हाले? चाला!" मंगला इतकं बोलली खरं, पण तिचंच तिला कळत नव्हतं की ती नक्की समजूत कुणाची काढतेय? नव-याची की स्वत:ची?

यांत्रिकपणे तो उठला. भाजी भाकरी खाता खाता त्याचं विचारचक्र चालूच होतं. हात धुवुन त्याने चंची सोडली. तंबाखूची चिमूट तोंडात टाकून त्याने मंगलाला दारातूनच आवाज दिला, "आला गं मी पाहिसन कुनी भेटते का!"
चौकात त्याला नाना ब-हाटे भेटला.
"काय तुकारामभाऊ, कुढी?"
"काई नाई भो, पे-याचा बंदोबस्त करी राहाला. सोसायटीतून काही भेटीन तं बरं व्हीन!"

"कायले त्या चक्करमधी पडतू? तुले मालूम नी का लोकायचे गयरे पैशे डुबाले तेच्यात? नं अठरा टक्क्यायनं आपल्यासारख्याले परोडीन का?"

अठरा टक्के ऐकून तुकारामच्या डोळ्यासमोर भरदिवसाही काजवे चमकले.
"खरंय तुह्यंबी नानाभो, पन पैशेभी कुढून उभे क-याचे? शेती करनं बी जुगार व्हयी जायेले! आढी हारु हे मालूम अशीसनबी पैशे तं लावनेच पडता!"

विचारांच वादळ डोक्यात घेऊनच तो घराकडे वळला. सगळं जग भोवताली गरगर फिरतंय, आपण मोठ्या आवर्तात सापडलो आहोत असं त्याला वाटायला लागलं.

घरी येऊन तो भिंतीला टेकून आढ्याकडे नजर लावून बसला. कितीतरी वेळ तो तसाच बसून होता. मंगला मन लावून आपलं पाकिटं चिकटवायचं काम मनापासून करत होती. जळगावहून एका कपाळावर-च्या टिकल्या बनवणा-या कंपनीचं टिकल्यांचे पाकिटं बनवायचं काम तिला मिळालं होतं. शंभर पाकिटामागे तिला तीस रुपये मिळायचे. ते काम इतकं किचकट होतं दिवसभरात जेमतेम शंभर पाकिटं चिकटवून व्हायची. तरी ती बिचारी घरातलं सगळं काम आवरुन ते काम करायची. तेवढाच पैशाला पैसा जोडला जातो.

दुपारी नेहेमीच्या सवयीने तुकारामने गोडमिट्ट चहा घेतला आणि तो परत घराबाहेर पडला. एसटी स्टॅन्डवर येऊन बसला. तासभर विचार करुन त्याने सावद्याची गाडी पकडली. सावद्यात त्याचा जुना मित्र प्रभाकर राहत होता. तो पण शेतकरीच होता, पण त्याची बागायती होती, केळीचा बाग होता.

"परभाकर, ओ परभाकर!" त्यानं प्रभाकरच्या अंगणातूनच आवाज दिला. आवाजासरशी प्रभाकर घराबाहेर आला.
"ऑं! तुकाराम तू! असा यकदम!" प्रभाकरच्या चेहे-यावरचे आनंद आणि आश्चर्य आणि आनंदाचे भाव लपत नव्हते. "ये ये, नं असा मधीच कसाकाय आला तू? फोनगिन बी नी! आत्ता बारे मी वावरातच जाई राहालता. बोल काय म्हन्तू?"

दोघंही पडवीत टेकले.
"परभाकर, अरे मले पेरा क-याले थोडा पैसा कमी पडी राहालता! म्हटलं तुह्याकून काई मदत व्हईन तं पाहू म्हनून आल्ता मी!"

"कितले पाह्यजेल?"
"दहा हजार तरी लागतीन! उडदाची बिजवाईभी घेनीये!"

"तुकाराम वाईट वाटी नको घेजो, पन दहा मुष्किले गड्या! केडीचे भाव उतरी गेले तं मलेच फटका पडी जायेले. मह्याकून जास्तीत जास्ती चार हजार होतीन. खोटं नी सांगत!" तुकाराम विचारात पडला, प्रभाकर खोटं बोलण्याचं काहीच कारण नव्हतं.
"चालतीन, चार बी चालतीन! सहाचं मी बघतू! देतो तुले हंगाम आला की!"

"चालीन नं भो! कव्हाबी दे! तुह्या सोयनं पाह्यजो!"

प्रभाकरकडून चार हजार घेऊन तुकाराम घरची वाट चालू लागला. सहा हजार आणखी जमवण्याच्या विवंचनेतच तो घरी आला. पैशाचा त्याला आता कुठलाच मार्ग दिसत नव्हता.

"कुकडी गेल्ते वो? पु-या गावात कह्यीच पत्ता नोता तुमचा! मह्या जीव निस्ता वरखाली क-याले लागी गेल्ता नं! सांगिसन जायले काय झालतं तुम्हाले?" मंगला करवादली.
"मी सावद्याले गेल्ता परभाकरच्या आढी. त्येच्याकून चार हजार घी आला. सहा हजाराचं पाही घ्यू! हा तुले सांग्याचच राहालं ह्ये चूक झाली माह्याकून मह्या डोक्यातच नी राहालं तुले सांग्याचं पैशाच्या इचारात!"

मंगला विचारात पडली. "कावो, ह्या मंगयसूत्र गहान ठीसन भेटतीन का काही?" तिने विचारलं.
"येडी झाली का! पह्यलेच तं तुह्यावाल्या बांगड्या मोडीसन उषाच्या लगनाले ठिगय लावलता आपू! मंगयसूत्र बी मोडती का? काहीबी इचार करी राहाली! गप बैस! मी करीन काय क-याचं ते!" तुकाराम संतापला. "आढी लोक पान्याची वाट पाही राहाले, न पानी दोन दिस लेट पडलं तं मी तेच पाही राहाला! पैशे उभे क-याले दोन दिस भेटतीन तं बरंच व्हीन!"
पैसा, पाऊस आणि पेरणी यांची वावटळ त्याच्या घरावर घोंगावत होती आणि कधी त्याचं चक्रीवादळ होईल, काहीच भरवसा नव्हता.

तेव्हड्यात किशोर घरात आला. हातात भलीथोरली बॅग. खूप थकलेला दिसत होता.
"का रे भो, असा मधीच? काय झालं?" तुकाराम आणि मंगलाने एकदमच विचारलं.
"काई नई, मले वाटलं याचं तं सुट्टी घीसन यी गेला मी!"
"न इतलं सामान!"
"हा, तढी जे जे नी लागी राहालतं ते घी आला मी घरी!"
""चाल जेयाले!"

किशोर एक शब्दही न बोलता जेवत होता. तुकाराम आणि मंगलाला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. हा नेहेमीचा किशोर वाटत नव्हता. वरुन शांत असलेल्या पण आतून धुमसत असलेल्या ज्वालमुखीसारखा वाटत होता तो.

"आई, मी गयरा थकी जायेले. मले सकाडले लवकर उठाडजो नोको." एवढंच बोलून तो बाहेर पडवीत झोपायलाही गेली. तुकाराम आणि मंगला एकमेकांकडे बघतच राहीले.

कंदिलाच्या प्रकाशात प्रश्नांची सावली अजूनच गडद होत होती.

सकाळी किशोर उठला तसा सूर्य बराच वर आला होता. घरात कुणीच नव्हतं. तो पाच मिनिट पडवीत तसाच बसून राहिला. तेवढ्यात त्याला डोक्यावर पाण्याच्या दोन कळशा आणि कमरेवर पाण्याचा हंडा घेऊन येणारी आई दिसली. त्यानं चटकन पुढे होत तिच्या हातातला हंडा आणि एक कळशी घेतली.
"दादा कुढी गेले वो आई?"
"वावरात गेले असतीन नाही तं मंगन गावातच असतीन."
"काहून?"
"अरे पे-याले पैशे कमी पडी राहाले. कोनाच्या आढी भेटतीन तं पाही राहाले."
आंघोळ आणि न्याहारी आटोपून किशोर घराबाहेर निघून गेला.

तीन दिवस झाले तरी तुकारामच्या हाताला काही यश मिळत नव्हतं; आणि किशोर गेले तीन दिवस जळगावला चकरा मारत होता. पण कशासाठी, ते तो घरात बोलतच नव्हता.

एकमेकांवरच्या प्रेमापोटी मायबाप आणि मुलगा एकमेकांपासून आपापल्या विवंचना लपवत होती.

चार दिवस झाले अजून याची सुटी संपत कशी नाही म्हणून मंगलाने त्याला टोकलंच. तो म्हणाला, "आयिक, तुले मालूमेका, मी जडगावले काऊन जाई राहाला? ऐक, मह्यावाली नोकरी गेली. कंपनीकडे गाड्यायच्या आडरीच नी तं तेबी काय करतीन? मह्यासारख्या पाचशे लोकायच्या नोक-या गेल्या मह्या कंपनीत. तेच्याकरता मी जडगावले काम शोधी राहालता. तढी एकाने मले बोलायेले गुरुवारी. तढल्यापेक्षा पगार कमीये आढी, पन काम तं हाये. तुमी कायजी करसान म्हून मी सांगी नी राहालता!" त्यानं सगळं एका दमात सांगून टाकलं.
हे सगळं ऐकून मंगला हतबुद्धच झाली.
"असं कसं झालं भाऊ? आढलोंग तं ठीकच व्हतं नं?"

"आई, ह्ये मंदीये, व्हयीन येखाद वर्षात सगडं ठीक! तवर हातावर हात धरी बसू बी तं शकत नी नं आपू! न आढीबी तं काम भेटीच राहालं ना! तढी निस्ता रिकामा बसला अस्ता तं मी येडाच व्हयी गेला अस्ता. पैसा तं यी नी राहाला, अन रोजचा खर्च तं चालूच राहातो. मगन मी आढी ई गेला."

मंगलाचा चेहेरा क्षणभर विचारमग्न झाला, पण क्षणभरच! दुस-याच क्षणी ती किशोरला म्हणाली, "एक ध्यानात ठिवजो बेटा, काहीबी झालं ,आकाशबी कोसयलं तरीबी तू हिम्मत हा-याची नही! तू आत्ताच हिम्मत हारला तं कसं चालीन? तुह्यवालं पूरं आयुष्य जानंय बारे! कसा करशीन मंग? तुह्या दादाकडे पाह्य, सहा हजार रुप्याकरता ते निस्ती वनवन भटकी राहाले. तुम्हाले नोकरदारायले काम केलं तं पैशे भेटायची खात्री तरी राहाते,आम्हाले शेतक-यायले तं ते बी नी नं भो! कह्यी काय व्ही जाईन काई भरोसा नी! आन मी इचारती नी तं तू बोलता बी नी माले!"

"तसं नी, तुमी दोघंबी पे-याच्या तनतनमधी होते. पह्यलेच सांगीसन तुमची कायजी नोती वाढोनी मले. पेरा झाल्यावर तुम्हाले सांगनारच व्हता मी! आता येक करजो, दादाले बारे सांगजो नको."

आकाशातला कोरडा चाललेला मृग आता मंगलाच्या डोळ्यातून बरसत होता.

जूनचा पहिला पंधरावडा उलटून गेला होता. ढग यायचे आणि हूल देऊन निघून जायचे. विहीरी, बोअरवेल सगळं पार तळाला लागलं होतं. चार-पाच किलोमीटरवरुन लोकांना पाणी आणावं लागत होतं. चा-यासाठी दूरदूर फिरुनही गुरं अर्धपोटी, उपाशी घरी परतत होती. दुभत्या म्हशी असलेल्या शेतक-यांची अवस्था तर फार वाईट होती. सरकी ढेप तर लांबच, म्हशींना साधी कटबा कुट्टी आणी उडदान द्यायलाही ते महाग झाले होते. किमतीच इतक्या वाढल्या होत्या! लोकांची नांगरटी, वखरटी करुन संपली होती. कित्येकांनी महागडी खतं खरेदी करुन शेतात टाकून दिली होती. बैलांना काम नाही, दाणापाणी नाही, मजुरांना काम नाही अशी परिस्थिती होती. हाताला काम नाही त्यामुळे उत्पन्न शून्य! रोजचा खर्च तर चुकत नाही! अशा वेळी महागाईच्या धगीचं निखा-यात रुपांतर झालं होतं. गावोगाव पाण्यासाठी धोंडी निघत होत्या. सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी आकाशातल्या पाण्याची वाट बघत होतं. पण आभाळ नुसतं वाकुल्या दाखवत होतं.

एका दिवशी रात्री किशोरचा मोबाईल वाजला. पलिकडून त्याचा कंपनीतला मित्र बोलत होता.
"काय रे किशोर, कुठे आहेस तू? दुस-याच दिवशी कुठे गायब झालास?"
"अरे घरी आलोय, सॉरी यार, जरा घाईतच आलोय त्यामुळे कळवू शकलो नाही तुला मी! बोल काय म्हणतोस?"
"अरे ऐक ना, एक न्यूज आहे!"
"काय झालं?"

"अरे आपल्या कामगार संघटना मॅनेजमेंटशी भांडल्या आणि ज्या पद्धतीने आपल्याला कमी केलं गेलं ते कसं चुकीचं आहे ते मॅनेजमेंटला पटवून दिलं, त्यांनीही ते मान्य केलं आणि आपल्याला जे पेमेंट दिलं होतं, ते दीडपट करुन देणार आहेत आत्ता! संध्याकाळपर्यंत तुला अकाऊंटला कॅश क्रेडिट झाल्याच एसएमएसही येईल! तू तिरमिरीत निघून आलास, तुला कळणार कसं, म्हणून मग मी फोन केला तुला!"
"थॅंक्स यार, तुला माहिती नाही तू माझा किती मोठा प्रॉब्लेम सोडवला आहेस!"
"चल किशोर बोलू नंतर" म्हणत त्याने फोन ठेवलासुद्धा!
किशोर आनंदाने फक्त वेडा व्हायचा बाकी होता. हा आनंद दीडपट पगारापेक्षा पेरणीच्या सोयीचा झालेला होता. नकळत आभाळाकडे त्याचे हात जोडले गेले.

त्याच्या अश्रूंना आता बाहेरचा धुंवाधार पाऊसही साथ देत होता.

रात्री पैसे क्रेडिट झाल्याचा एसएमएस आला तेव्हा तर आनंदाने त्याचं मन अगदी भरुन आलं होतं.
सकाळीच उठून तो भुसावळला गेला, एटीएममधून पैसे काढले आणि उडदाचे बियाणेही घेऊन आला. बापाच्या हातात त्यानं वरुन दहा हजार रुपये ठेवले.

"दादा, हे घ्या! व्हयी गेली सोय! पगाराचेय!"
तुकारामने शांतपणे त्याच्याकडे बघितलं, "किशोर, मले सगडं मालूम व्हतं, तुह्या मायनं सगडं सांगलतं मले, पन तू मले पेरा झाल्यावर सांगनार व्हता म्हून मी तुले काही इचारलं नही! पन मले खरंखरं सांग, तू मले बोल्ला काहून नी?"

"तुम्हीनं तं बी पे-याले पैशे कमी पडी राहाले हे कुढी सांगलं मले? मी करता नी का काही?"

"अरे तु कायजी करशीन म्हनून मी सांगी नी राहालता, न मी कायजी करीन म्हनून तू बी मले सांगी नी राहालता!"

"चाला जाऊ द्या, घ्या ते पाभर नं बिजवाई, मी बी ई राहाला पे-याले!"

"चाल!"

डोळ्यात पुन्हा नविन आशा घेऊन बापलेक "पेरा" करायला निघाले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ग्रामीण भाषेचा लहेजा छान आहे...
आणि मला खास आवडला तो आशावादी शेवट.. अन्यथा ही कथाही शेतकर्‍यांच्या आत्महत्येकडे जातेय की काय असे वाटत होते..

अवांतर - दर दुसर्‍या ओळीच्या सुरुवातीला मला ब्लॉक ब्लॉक का दिसत आहेत.. माझाच काही प्रॉब्लेम आहे की सर्वांनाच दिसत आहेत.

धन्यवाद अभिषेक आणि दिनेशदा! अभिषेक तो ब्लॉकचा प्रॉब्लेम स्पेसमुळे आला होता. आता स्पेस काढून टाकल्या आहेत.

धन्यवाद अनघा_मीरा! कुठल्या शब्दांचा अर्थ कळला नाही? मी इथे स्प्ष्ट करेन! ही भाषा अहिराणी नाही. जळगाव जिल्ह्यातल्या लेवा पाटीदार समाजाची मातृभाषा आहे ही!

जियो ...
मस्तच झालीये कथा. आशावादी शेवटाने अजुन मजा आली, अन्यथा या पद्धतीच्या कथांचा शेवट बहुतांशी शोकात्मच असतो. खासकरुन बोलीभाषेचा गोडवा वेडावुन जातो.
मस्तच, खुप आवडली !

हो का? तस "ळ" च्या ठिकाणी "ड" सहज समजते . तसेच मह्यावाली इ.इ. कारण मीही गावाकडचीच (मराठवाडा) Happy

गयरा -
बिजवाई -
केडी
पाभर हे शब्द नाही समजले.

हे अर्थः
गयरा: खूप
बिजवाई: बियाणे
केडी: केळी
पाभरः हे बियाणे पेरण्यासाठी वापरलं जाणारं एक अवजार आहे. त्याला वरती एक नरसाळं असतं. त्यातून मुठी भरुन धान्य पेरतात.

हे बघा पाभरीचं चित्र :

लेवा पाटलांच्या शाळेत शिकल्यामुळे सतत हि भाषा कानावर पडायची. मैत्रीणीही अशीच भाषा बोलत. खूप दिवसांनी तुमच्या कथेच्या निमित्ताने शाळेचे दिवस आठवले. कथा खरच छान लिहिलीय.

गैरी मस्त रे भो! आखीन येवू देजो.

CHAN

आदित्य चंद्रशेखर धन्यवाद.

माह्या भाषेतली गोठ वाचीसन गहरी मजा आली रं भाऊ !!

आदित्य, अप्रतिम... खूप आवडली कथा. त्या भाषेचा बाज राखुनही कथा कळली. संवाद, आणि निवेदन... सुरेख मिश्रण.

कथेचा विषय साधा, त्यातलं नाट्यंही साधं... अगदी शेवटही साधा. हे साधेपण, सहजपण किती अलवार जपलय तुम्ही.. जियो!
अजून लिहा नं...
वेगवेगळ्या बोलीभाषेत असं काही, इतकं चागलं वाचायला मिळणं... भाग्यं आहे आमचं.

दाद, मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! तुमच्यासारख्या जिची कथा या विषयावर प्रचंड कमांड आहे, त्या लेखिकेने माझ्या प्रयत्नांचं कौतुक करावं यात सगळं आलं. तुमच्यासारख्यांची ’दाद’ मिळाल्यावर अजून काय पाहिजे? मन:पूर्वक धन्यवाद! Happy

आदित्य

माझे आजोळ यावल तालुक्यातले (भुसावळजवळचे) आणि जळगाव माझे विशेष जवळचे.

सगळी कथा अगदी डोळ्यासमोर घडतेय असे वाटत होते वाचतांना. ही भाषा अहिराणी, लेवा पाटिदार आणि पावरी समाजाची सरमिसळ आहे.

अगदी पोस्ट ग्रॅजुएशन करेपर्यंत हीच भा षा बोलत होतो अजुनही घरामध्ये आम्ही भावंडं हीच भाषा बोलत असतो.

खुप छान आहे, बर्‍याच दिवसानंतर स्वतःशी जुन्या दिवसासारखे संवाद साधल्यासारखे वाटले

धन्यवाद prafullashimpi ! Happy
ही भाषा अहिराणी, लेवा पाटिदार आणि पावरी समाजाची सरमिसळ आहे.>>>
याबाबत मी साशंक आहे.

Pages