ये हवां ये रात यें चांदनी - तलत

Submitted by टवाळ - एकमेव on 8 May, 2012 - 02:25

एक उदास संध्याकाळ. मुड बिनसण्याचे कारण काहीही असू शकते, पण आपल्याला अगदी एकटंच रहावंसं वाटतयं. मनात विचारांचा कल्लोळ आहे पण आपण नक्की काय विचार करतोय हेच लक्षात येत नाहीये. आपण असेच गच्चीवर एका कोपर्‍यात कोर्‍या नजरेने दूर पहात उभे आहोत. हळूहळू अंधाराच्या सावल्या आणखी गडद होतायत. आणि नेमकं अशा वेळी हवेच्या लहरींबरोबर कुठून तरी एक स्वर आपल्या कानांवर पडतो -

शाम-ए-गम़ की कसम, आज गमगी़ है हम
आ भी जा, आ भी जा, आज मेरे सनम

स्वतःच्या नकळत आपण त्या स्वरामध्ये कधी गुरफटत गेलो आपलं आपल्यालाच कळत नाही.

तलत - नावाबरोबरच एक तलम, तरल, रेशमी अनुभव मिळतो. तलत हा दु:खाचा आवाज होता. त्याही पेक्षा आपल्या मनातल्या प्रत्येकच नाजूक, तरल भावनेचा तो आवाज होता. म्हणूनच प्रेमाचा पहिला ईजहार, तो ही समोर बोलण्याची हिम्मत न झाल्याने फोनवरून केलेला. तो रफी किंवा किशोर यांसारख्या दमदार आवाजाच्या गायकांच्या आवाजापेक्षा तलतच्या हळूवार, किंचीत कापर्‍या स्वरातच होणे जास्त सयुक्तिक वाटते. (चित्रपट - सुजाता, गाणे "जलतें है जिसके लिए").

वर उल्लेख केलेल्या दोन गायकांपेक्षा किंवा अगदी समकालीन ईतर गायकांपेक्षा (मुकेश, मन्ना डे) तलत च्या आवाजाला मर्यादा होत्या. तरी देखील जगभरातल्या चाहत्यांचा विचार केला तर या सर्व गायकांपेक्षा तलतच्या चाहत्यांची संख्या काकणभर जास्तच भरेल. कारण बाकी सर्व आवाज हे गायकांचे होते पण तलतचा आवाज हा सर्वसामान्य माणसाचा होता. त्यामुळे सानुनासीक, किंचीत कापरा आवाज ही त्याची मर्यादा न ठरता तोच त्याचा सर्वोत्तम गुण ठरला. त्याच्या आवाजाचा टोन हा सर्व गाण्यांसाठी सारखाच राहीला (अगदी शेवटपर्यंत). मग गाण्यातल्या भावना वेग-वेगळ्या का असेनात. "सिनें में सुलगते है अरमान" असो की "ओ दिलदार, बोलो एकबार, क्या मेरा प्यार पसंद है तुम्हे" सारखे आनंदी ड्युएट असो, तलतचा आवाज हा तलतचाच राहीला. आणि तरीही ही गाणी लोकप्रिय झाली कारण हा आवाज जास्त आपलासा वाटला.

रफीच्या उदयाआधी तलत हा ट्रॅजेडीकिंग (असे त्या वेळेला बिरूद असलेल्या) दिलीपकुमारचा आवाज होता. नंतरही अगदी रफीच्या चलतीच्या काळात सुद्धा बर्‍याच चित्रपटात तो दिलीपकुमारचा आवाज होता. असं असलं तरी तलत हा कधीही कुठल्या ठराविक कँपमधे अडकला नाही. याचं कारण त्याचा स्वभाव. अतिशय मनमिळावू आणि सज्जन माणूस असंच त्याचं वर्णन करावं लागेल. कदाचित याच स्वभावाच्या बळावर त्याने अनिल विश्वास आणि सज्जाद हुसेन यांसारख्या ईंडस्ट्रीने भांडकुदळ ठरवलेल्या संगीतकारांकडेही सहजगत्या काम मिळवलं. संगदिल या चित्रपटातले "ये हवा ये रात ये चांदनी" हे गाणे सज्जाद हुसेन यांचे सर्वोत्तम गाणे तलतच्याच आवाजात आहे. तलत ने ईंडस्ट्रीतल्या जवळपास सर्वच संगीतकारांकडे सारखेच काम केले. त्याचे उर्दु उच्चार हे ईतर कुठल्याही गायकापेक्षा जास्त स्वच्छ होते. मजरुह सुलतानपूरी, साहीर यांचे सुरवातीच्या काळातले खास उर्दू काव्य, त्याला खरा न्याय तलतनेच दिला. मी सुरवातीला उल्लेख केलेले "शाम-ए-गम़ की कसम" हे त्याचेच एक उदाहरण आहे.

तलतवर आजवर ईतके भरभरून लिहून आले आहे आणि ईंटरनेटवर तर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. असे असूनही मला लिहावेसे वाटले कारण तलत काय किंवा शंभर वर्षांच्या या ईंडस्ट्रीमधला छोट्यातला छोटा कलाकार काय, या सर्वांचे माझ्या/आपल्या भाव-विश्वावर ईतके उपकार आहेत की त्या उपकारांची परतफेड या जन्मात तरी आपण करू शकणार नाही. भारतीय चित्रपटाच्या या शतकमहोत्सवी वर्षात या कलाकारांवर दोन शब्द लिहून निदान त्यांची आठवण आपल्या मनात परत जागवावी एवढाच हेतू.

तलतची सर्वोत्तम गाणी या विषयी एक स्वतंत्र लेख माझ्यापेक्षा जास्त प्रभावीपणे कुणी लिहू शकेल. त्या मुळे मी ते टाळतोय. तरीही काही गाणी ज्यांचा उल्लेख टाळणे जिवावर आलंय.

१. ये हवां ये रात यें चांदनी - संगदिल - सं. सज्जाद हुसेन
(पुढे मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या "आखरी दांव" या चित्रपटातलं "तुझे क्या सुनाऊं मै दिलरुबा" हे गाणं हुबेहूब याच चालीवर आहे. या वरून आधीच शिघ्रकोपी असलेल्या सज्जाद हुसेन यांनी म्हणे भरपूर तमाशा केला होता)
२. मैं दिल हुं ईक अरमान भरा - अनहोनी - सं. रोशन
(राज कपूरसाठी गायलेलं तलत चे एकमेव गाणे)
३. रिमझीम के ये प्यारे प्यारे गीत लिए - उसने कहा था - सं. सलील चौधरी
४. हमसे आया न गया - देख कबिरा रोया - सं. मदन मोहन
५. सिनें में सुलगते है अरमान - तराना - सं. अनिल विश्वास
६. ऐ मेरे दिल कहीं और चल - दाग - सं. शंकर जयकिशन
७. तस्विर बनाता हुं - बारादरी - सं. नाशाद (नौशाद नव्हे)
८. जलतें है जिसके लिए - सुजाता - सं. सचिन देव बर्मन
९. रात ने क्या क्या ख्वाब दिखायें - एक गांव की कहानी - सं. सलील चौधरी

ही माझ्या आवडीची काही गाणी जी आत्ता आठवतायत. ही यादी आणखीही खुप वाढू शकते. आता थोडी तांत्रिक माहीती - तलत ने एकूण ७४७ गाणी गायली ज्यात ४८१ फिल्मी आणि तब्बल २६६ गैरफिल्मी गीतांचा समावेश आहे. एकूण २९३ चित्रपटांसाठी पार्श्वगायन त्याने केले. तरीही एकाही चित्रपटासाठी त्याला पार्श्वगायनाचा फिल्मफेअर पुरस्कार काही मिळाला नाही. त्याच्या गैरफिल्मी गाण्यांमधे बहुतांश गझल आहेत. आणि ही गाणी देखील त्याच्या फिल्मी गाण्यांईतकीच लोकप्रिय आहेत. त्याने जगातल्या कित्येक देशात जाहीर कार्यक्रम केले आणि तेही प्रचंड लोकप्रिय ठरले. अभिनेता म्हणूनही त्याने एकुण १३ चित्रपटात काम केलं. त्यापैकी ९ चित्रपटात त्याने नायकाची भुमिका केली. "दिल-ए-नादान (याची निर्मितीही तलतचीच होती)", " एक गांव की कहानी", "लालारुख" आणि "सोने की चिडीया" ही त्यातली काही ठळक नावे. पैकी सोने की चिडीयां मधे त्याने नकारात्मक नायकाची भुमिका केली होती. या सर्व चित्रपटांची गाणी सुपरहिट होऊनही अभिनेता म्हणून तलत काही यशस्वी ठरला नाही. या व्यतिरिक्त २ मराठी चित्रपटांसाठी देखील त्याचा आवाज वापरला गेला होता. त्यापैकी "पुत्र व्हावा ऐसा" या चित्रपटातले (सं. वसंत प्रभु) "यश हे अमृत झाले" हे गाणे लोकप्रिय ठरले.

नौशाद यांनी संगीत दिलेल्या "आदमी" या चित्रपटासाठी रफी आणि तलत यांच्या आवाजात एक सुंदर ड्युएट रेकॉर्ड झाले होते. "कैसी हसीन आज यें तारोंकी रात है". पण चित्रीकरणाच्या वेळेला कुठे माशी शिंकली देव जाणे, चित्रपटात हे गाणं तलतच्या ऐवजी महेंद्र कपूरच्या आवाजात आहे.

भारत सरकारने त्यांना पद्मभुषण सन्मानाने गौरवले होते. अशा या तलतचा उद्या दि. ९ मे हा १४ वा स्मृतीदिन. त्यानिमीत्त या महान कलाकाराला मानाचा मुजरा !

"कहतें है के गालिब़ का था अंदाज-ए-बयां और" असं मिर्झा गालिब़च्या बाबतीत म्हटलं जायचं. पण मला विचाराल तर तलतच्या आवाजात "दिल-ए-नादां, तुझे हुवा क्या है" असं विचारणार्‍या गालिब़चा अंदाज-ए-बयां अगदी अस्साच असणार या बाबत माझ्या मनात कुठलेही दुमत नाही.

गुलमोहर: 

आणि ही गाणी तर हवीतच की ...
जाये तो जाये कहा, समझेगा कौन यहा - समुद्रकिनारी बसलेला देव आनंद इन टॅक्सी ड्राईव्हर

आणि रात्रीच्या अंधारातही अतिशय देखणा दिसणार शम्मी कपूर ठोकर मधल्या 'ए गम-ए-दिल क्या करु मै , वहशत-ए-दिल क्या करु'

मुहोब्बत ही न जो समझे वो जालिम प्यार क्या जाने
काय आवाज, काय शब्द !

बाबूल मधलं - मेरा जीवन साथी बिछड गया, लो खत्म कहानी हो गयी

रैना, इथे ब-याच गझल दिल्या आहेत अनेकांनी. अजून ज्या आहेत त्या लिहिते.
ऐकायच्या असल्यास मेल करते Happy
वर नसलेल्या काही (काही रिपीट झाल्यास क्षमस्व)
१. आख पडती है कही, पाव कही पडता है कही
२. ए-अंदलीब-ए-झार जानेको है बहार
३. कोई दिन गर जिंदगानी और है
४. शब-ए-फिराक है और नींद आयी जायी है
५. उस बझ्म मे मुझे नही बनती हया किये
६. गम-ए-जिंदगीका यारब न मिला कोई किनारा
७. हंगामा -ए- गम से तंग आकर, इजहार-ए- मसर्रत कर बैठे

खूप छान लेख आणि खूप आवडत्या गायकाबद्दल. मला स्वतःला ते 'माझंदराँ' हे एकच गाणं फारसं झेपत नाही. वर उल्लेख झालेली गाणी तर अफाट आहेतच, शिवाय आवडती आणखी काही (द्विरुक्ती झाली असल्यास क्षमस्व)

फ़िर मुझे दीदा-ए-तर याद आया
तेरी आँख के आंसू पी जाऊँ
दो दिन की मुहोब्बत में हम ने
एक मैं अौर एक मेरी बेक़सी की शाम है
दिल ऐ दिल, बहारों से मिल ('एक फूल चार काँटें' मधलं लताबारोबरचं एक प्रसन्न द्वंद्वगीत)
ये मेरे अंधेरे उजाले न होते
तुम्हीं तो मेरी पूजा हो
तुम तो दिल के तार छेड़कर

थांबते आता... पण तुमच्या लेखानी एक हुरहुर मात्र लागली, जी तलतचं कोणतंही गाणं ऐकून लागते तशी! तांत्रिकदृष्ट्या भलेही तलतच्या आवाजात दोष काढतील त्यातले तंत्रज्ञ - पण मी तलतची गाणी हृदयानी ऐकते, मेंदुनी नाही... त्यामुळे दादच्या शब्दांत, माझ्यावर तर ती नक्की गानभुली करतात.

पुन्हा एकदा, एका छान विषयावरच्या छान लेखाबद्दल आभार...

हल्ली जरा सी प्रसिद्धी मिळाली की स्टेज शो चे दरवाजे उघडून गायक मालामाल होतात... मात्र तलत हे पहिले भारतीय गायक होते ज्यांनी परदेशात स्टेज शो केले. १९५६ पासून तलत यांनी हॉलंड्,दक्षिण आफ्रिका,इंग्लंड्,अमेरिका इत्यादी ठिकाणी स्टेज शो केले.

लोकप्रियता, मानमरातब वगैरे राहूदे पण तलतला गायला मिळालेले काव्य बघितले तर त्याच्याइतका भाग्यवान तोच असे म्हणावेसे वाटते.

मला वैयक्तिक पातळीवर तो बर्‍याच ठिकाणी एकसुरी वाटतो... गायकी वगैरेने भारावून जायला होत नाही परंतू त्याच्या आवाजातल्या आपलेपणाला तोड नाही हेच खरे!

हमसे आया न गया तुमसे बुलाया न गया
फासला प्यार का दोनोंसे मिटाया न गया

ह्या शेरासारखाच मी तलतच्या गाण्याच्या बाबतीत राहिलो असे वाटते.

शैलेंद्र, एकदा हेमंतकुमारांबद्दल लिहा अशी विनंती करतो.

छान लेख ! इथे लिहिलेली बहुतेक गाणी ऐकलेली आहेत, सगळीच आवडतात. पण खूप आवडती गाणी- सच बता तू मुझपे फिदा, जलते है जिसके लिये,तुम तो दिल के तार छेडकर !

जलते है जिसके लिए हे एक सर्वांग सुंदर गाणं आहे.
लेख भलताच आवडला आणि प्रतिक्रियाही. किती गाणी ऐकु असं झालय.

आज पुणे विविधभारतीवर तलत मेहमूद ह्यांच्या स्मृतीदिनानिमीत्त मधुमालती मध्ये त्यांचीच काही निवडक गाणी ऐकवली.. उर्वरित गाणी पुढच्या बुधवारी लावणार आहेत.. फोन इन कार्यक्रम असल्यामुळे भरपूर फोन आलेले आहेत ते सगळे एकाच भागात ऐकवता येणार नाहीत त्यामुळे उरलेले फोन पुढच्या बुधवारी ठिक सकाळी ११:१५ वाजता... नक्की ऐका...

मला संगदिल मधलं - दिल मे समा गये सजन (सज्जद हुसेन ने संगीत दिलेलं) फार आवडतं.
हमसे आया न गया, फिर वोही शाम, मै दिल हूं एक अरमान भरा, ये हवा ये रात ये चांदनी, मुहोब्बत ही न जो समझे ही काही खास आवडती गाणी.

http://www.talatmahmood.net/

जहा आरा मधलं तलत्-लता चं 'ए सनम आज ये कसम खाये' ऐकताना मला नेहेमी मजा वाटते. (हा लेख वाचून तलत आठवायला घेतला तसं हे गाणं पण आठवलं)
गाण्याच्या सुरुवातीला जवळजवळ २ मिनीटांचा म्युझिक पीस आहे (कधीतरी १ मिनीट हा कट्-ऑफ ठेवून खूप म्युझिकनंतर सुरु होणा-या गाण्यांबद्दल लिहायचंय मला, त्यात माझ्या मते हे गाणं पहिल्या पाचात असेल्)...आणि मग
देखकर रंग्-ए-वफा मुसकुरायेगा खुदा
और सोचेगा जरा इष्क क्यु पैदा किया....
असं खुदाला 'सोच' मधे टाकुन शब्द संपल्यासारखं किंवा म्युझिक संपल्यासारखं अचानकच गाणंच संपत.
मला आधी वाटायचं माझ्या कडच्या गाण्यातच पुढे काही नाहीये, पण तीन-चार वेगळ्या सोअर्स कडुन ऐकलं तरी तसंच आहे ते गाणं.

टवाळ -अशोक जी,
काय सुंदर लिहिलय तुम्ही.
तलत -तलम्-मुलायम अन निहायत सज्जन
आपली पिढी तशी खूप सुदैवी. कालाच्या प्रवाहात हा वाहून जायला नको एवढेच
आयुष्याच्या अनेक 'शामे गम' अन ' तस्वीर तेरी दिल' ऐकून 'सुलगते अरमान' शांत केले त्याने

सगळ्यांनी लिहिलेली गाणी वाचूनच भूले बिसरे गीतचा एक मॅरॅथॉन कार्यक्रम ऐकल्याचं समाधान मिळालं. तलतने 'जलतें हैं जिसके लिए' शिवाय दुसरं काही म्हटलं नसतं तरी तो कायम लक्षात राहिला असता, इतकं ते गाणं ठसलंय. त्याच्या आवाजाचं व्यक्तित्व 'तेरी आंख के आंसूं पी जाउं' मधे प्रतिबिंबित होतं असं वाटतं.

एक अत्यंत आवडतं गैरफिल्मी गाणं : तसवीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी
ये तेरी तरह मुझसे तो शरमा न सकेगी

तलतच्या आवाजातली एक न आवडलेली गझल : कभी शाख-ओ-सब्झ-ओ-बर्ग पर
कभी गुंचा ओ गुल-ओ-खार पर
मैं चमन में चाहे जहां रहूं
मेरा हक है फसल-ए-बहार पर

यातले 'मेरा हक' हे शब्द तलतच्या आवाजात पोचतच नाहीत, विशेषतः आशाच्या आवाजात एकदा ऐकल्यावर.

Pages