ये हवां ये रात यें चांदनी - तलत

Submitted by टवाळ - एकमेव on 8 May, 2012 - 02:25

एक उदास संध्याकाळ. मुड बिनसण्याचे कारण काहीही असू शकते, पण आपल्याला अगदी एकटंच रहावंसं वाटतयं. मनात विचारांचा कल्लोळ आहे पण आपण नक्की काय विचार करतोय हेच लक्षात येत नाहीये. आपण असेच गच्चीवर एका कोपर्‍यात कोर्‍या नजरेने दूर पहात उभे आहोत. हळूहळू अंधाराच्या सावल्या आणखी गडद होतायत. आणि नेमकं अशा वेळी हवेच्या लहरींबरोबर कुठून तरी एक स्वर आपल्या कानांवर पडतो -

शाम-ए-गम़ की कसम, आज गमगी़ है हम
आ भी जा, आ भी जा, आज मेरे सनम

स्वतःच्या नकळत आपण त्या स्वरामध्ये कधी गुरफटत गेलो आपलं आपल्यालाच कळत नाही.

तलत - नावाबरोबरच एक तलम, तरल, रेशमी अनुभव मिळतो. तलत हा दु:खाचा आवाज होता. त्याही पेक्षा आपल्या मनातल्या प्रत्येकच नाजूक, तरल भावनेचा तो आवाज होता. म्हणूनच प्रेमाचा पहिला ईजहार, तो ही समोर बोलण्याची हिम्मत न झाल्याने फोनवरून केलेला. तो रफी किंवा किशोर यांसारख्या दमदार आवाजाच्या गायकांच्या आवाजापेक्षा तलतच्या हळूवार, किंचीत कापर्‍या स्वरातच होणे जास्त सयुक्तिक वाटते. (चित्रपट - सुजाता, गाणे "जलतें है जिसके लिए").

वर उल्लेख केलेल्या दोन गायकांपेक्षा किंवा अगदी समकालीन ईतर गायकांपेक्षा (मुकेश, मन्ना डे) तलत च्या आवाजाला मर्यादा होत्या. तरी देखील जगभरातल्या चाहत्यांचा विचार केला तर या सर्व गायकांपेक्षा तलतच्या चाहत्यांची संख्या काकणभर जास्तच भरेल. कारण बाकी सर्व आवाज हे गायकांचे होते पण तलतचा आवाज हा सर्वसामान्य माणसाचा होता. त्यामुळे सानुनासीक, किंचीत कापरा आवाज ही त्याची मर्यादा न ठरता तोच त्याचा सर्वोत्तम गुण ठरला. त्याच्या आवाजाचा टोन हा सर्व गाण्यांसाठी सारखाच राहीला (अगदी शेवटपर्यंत). मग गाण्यातल्या भावना वेग-वेगळ्या का असेनात. "सिनें में सुलगते है अरमान" असो की "ओ दिलदार, बोलो एकबार, क्या मेरा प्यार पसंद है तुम्हे" सारखे आनंदी ड्युएट असो, तलतचा आवाज हा तलतचाच राहीला. आणि तरीही ही गाणी लोकप्रिय झाली कारण हा आवाज जास्त आपलासा वाटला.

रफीच्या उदयाआधी तलत हा ट्रॅजेडीकिंग (असे त्या वेळेला बिरूद असलेल्या) दिलीपकुमारचा आवाज होता. नंतरही अगदी रफीच्या चलतीच्या काळात सुद्धा बर्‍याच चित्रपटात तो दिलीपकुमारचा आवाज होता. असं असलं तरी तलत हा कधीही कुठल्या ठराविक कँपमधे अडकला नाही. याचं कारण त्याचा स्वभाव. अतिशय मनमिळावू आणि सज्जन माणूस असंच त्याचं वर्णन करावं लागेल. कदाचित याच स्वभावाच्या बळावर त्याने अनिल विश्वास आणि सज्जाद हुसेन यांसारख्या ईंडस्ट्रीने भांडकुदळ ठरवलेल्या संगीतकारांकडेही सहजगत्या काम मिळवलं. संगदिल या चित्रपटातले "ये हवा ये रात ये चांदनी" हे गाणे सज्जाद हुसेन यांचे सर्वोत्तम गाणे तलतच्याच आवाजात आहे. तलत ने ईंडस्ट्रीतल्या जवळपास सर्वच संगीतकारांकडे सारखेच काम केले. त्याचे उर्दु उच्चार हे ईतर कुठल्याही गायकापेक्षा जास्त स्वच्छ होते. मजरुह सुलतानपूरी, साहीर यांचे सुरवातीच्या काळातले खास उर्दू काव्य, त्याला खरा न्याय तलतनेच दिला. मी सुरवातीला उल्लेख केलेले "शाम-ए-गम़ की कसम" हे त्याचेच एक उदाहरण आहे.

तलतवर आजवर ईतके भरभरून लिहून आले आहे आणि ईंटरनेटवर तर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. असे असूनही मला लिहावेसे वाटले कारण तलत काय किंवा शंभर वर्षांच्या या ईंडस्ट्रीमधला छोट्यातला छोटा कलाकार काय, या सर्वांचे माझ्या/आपल्या भाव-विश्वावर ईतके उपकार आहेत की त्या उपकारांची परतफेड या जन्मात तरी आपण करू शकणार नाही. भारतीय चित्रपटाच्या या शतकमहोत्सवी वर्षात या कलाकारांवर दोन शब्द लिहून निदान त्यांची आठवण आपल्या मनात परत जागवावी एवढाच हेतू.

तलतची सर्वोत्तम गाणी या विषयी एक स्वतंत्र लेख माझ्यापेक्षा जास्त प्रभावीपणे कुणी लिहू शकेल. त्या मुळे मी ते टाळतोय. तरीही काही गाणी ज्यांचा उल्लेख टाळणे जिवावर आलंय.

१. ये हवां ये रात यें चांदनी - संगदिल - सं. सज्जाद हुसेन
(पुढे मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या "आखरी दांव" या चित्रपटातलं "तुझे क्या सुनाऊं मै दिलरुबा" हे गाणं हुबेहूब याच चालीवर आहे. या वरून आधीच शिघ्रकोपी असलेल्या सज्जाद हुसेन यांनी म्हणे भरपूर तमाशा केला होता)
२. मैं दिल हुं ईक अरमान भरा - अनहोनी - सं. रोशन
(राज कपूरसाठी गायलेलं तलत चे एकमेव गाणे)
३. रिमझीम के ये प्यारे प्यारे गीत लिए - उसने कहा था - सं. सलील चौधरी
४. हमसे आया न गया - देख कबिरा रोया - सं. मदन मोहन
५. सिनें में सुलगते है अरमान - तराना - सं. अनिल विश्वास
६. ऐ मेरे दिल कहीं और चल - दाग - सं. शंकर जयकिशन
७. तस्विर बनाता हुं - बारादरी - सं. नाशाद (नौशाद नव्हे)
८. जलतें है जिसके लिए - सुजाता - सं. सचिन देव बर्मन
९. रात ने क्या क्या ख्वाब दिखायें - एक गांव की कहानी - सं. सलील चौधरी

ही माझ्या आवडीची काही गाणी जी आत्ता आठवतायत. ही यादी आणखीही खुप वाढू शकते. आता थोडी तांत्रिक माहीती - तलत ने एकूण ७४७ गाणी गायली ज्यात ४८१ फिल्मी आणि तब्बल २६६ गैरफिल्मी गीतांचा समावेश आहे. एकूण २९३ चित्रपटांसाठी पार्श्वगायन त्याने केले. तरीही एकाही चित्रपटासाठी त्याला पार्श्वगायनाचा फिल्मफेअर पुरस्कार काही मिळाला नाही. त्याच्या गैरफिल्मी गाण्यांमधे बहुतांश गझल आहेत. आणि ही गाणी देखील त्याच्या फिल्मी गाण्यांईतकीच लोकप्रिय आहेत. त्याने जगातल्या कित्येक देशात जाहीर कार्यक्रम केले आणि तेही प्रचंड लोकप्रिय ठरले. अभिनेता म्हणूनही त्याने एकुण १३ चित्रपटात काम केलं. त्यापैकी ९ चित्रपटात त्याने नायकाची भुमिका केली. "दिल-ए-नादान (याची निर्मितीही तलतचीच होती)", " एक गांव की कहानी", "लालारुख" आणि "सोने की चिडीया" ही त्यातली काही ठळक नावे. पैकी सोने की चिडीयां मधे त्याने नकारात्मक नायकाची भुमिका केली होती. या सर्व चित्रपटांची गाणी सुपरहिट होऊनही अभिनेता म्हणून तलत काही यशस्वी ठरला नाही. या व्यतिरिक्त २ मराठी चित्रपटांसाठी देखील त्याचा आवाज वापरला गेला होता. त्यापैकी "पुत्र व्हावा ऐसा" या चित्रपटातले (सं. वसंत प्रभु) "यश हे अमृत झाले" हे गाणे लोकप्रिय ठरले.

नौशाद यांनी संगीत दिलेल्या "आदमी" या चित्रपटासाठी रफी आणि तलत यांच्या आवाजात एक सुंदर ड्युएट रेकॉर्ड झाले होते. "कैसी हसीन आज यें तारोंकी रात है". पण चित्रीकरणाच्या वेळेला कुठे माशी शिंकली देव जाणे, चित्रपटात हे गाणं तलतच्या ऐवजी महेंद्र कपूरच्या आवाजात आहे.

भारत सरकारने त्यांना पद्मभुषण सन्मानाने गौरवले होते. अशा या तलतचा उद्या दि. ९ मे हा १४ वा स्मृतीदिन. त्यानिमीत्त या महान कलाकाराला मानाचा मुजरा !

"कहतें है के गालिब़ का था अंदाज-ए-बयां और" असं मिर्झा गालिब़च्या बाबतीत म्हटलं जायचं. पण मला विचाराल तर तलतच्या आवाजात "दिल-ए-नादां, तुझे हुवा क्या है" असं विचारणार्‍या गालिब़चा अंदाज-ए-बयां अगदी अस्साच असणार या बाबत माझ्या मनात कुठलेही दुमत नाही.

गुलमोहर: 

मस्त लिहिलयस!
जलतें है जिसके लिए, मैं दिल हुं ईक अरमान भरा, फिर वही शाम ,आखो मे मस्ती तलतची गाणी विशेष आवडतात.

तरल मेहमुद - मस्तच लेख.

तुमच्या यादितले तिसरे गाणे - रिमझीम के ये प्यारे प्यारे गीत लिए - सोलो पण आहे का? मी कायमच लता आणि तलतचे ड्युएटच ऐकले आहे. लता आणि तलतची ड्युएट एकदम खास आहेत. लताच्या धारधार आणि लवचीक आवाजावर तलतचा रेशमी आवाज मस्त खुलून दिसायचा.

छान लिहिलाय लेख. आवडला. स्मृतीदिनानिमित्त आठवणी जागवण्याचा उपक्रम खरंच स्तुत्य आहे.

तलतच्या आवाजात एक अंगभूत मूड आहे. गाणं कसंही, कोणतही असलं, ऐकताना तुम्ही कुठेही, काहीही करत असाल तरी तलतच्या आवाजाचा मूड तुमच्यातही आपसूक भिनतो.

तलत म्हटलं की मला त्याचा 'प्यार पर बस तो नही है मेरा लेकीन फिर भी.. ये बता दे मै तुझे प्यार करु या न करुं?' या गाण्यातला हळुवार, आर्जवी स्वर आठवतो. गाण्याचे शब्द जितके ऋजू तितकाच तलतचा आवाजही.

माझी अजून दोन आवडती तलतची गाणी-

हमसे आया न गया, उनसे बुलाया न गया.. फासला प्यार में दोनोंसे मिटाया न गया' खूप हळवा, कातर स्वर लागलाय. मला हे गीत म्हणूनही खूप आवडतं. खूप वर्षांनंतर गुलझारने " हमे ये जीद थी के तुम बुलाओ, तुम्हे ये उम्मीद हम पुकारे.." असं लिहिलेलं किशोरच्या तोंडून ऐकलं तेव्हा मला तलतच्या या गाण्याची आठवण तीव्रतेनं झाली होती.

जलते है जिसके लिये- प्रेमाची कबुली देतानाची हुरहूर खूप सुरेख व्यक्त झालीय. तलतच्या आवाजत आणि सुनिल दत्तच्या चेहर्‍यातही. यातली दिल में रख लेना इसे हाथोंसे ये छुटे ना कही, गीत नाजूक है मेरा शीशे से भी टुटे ना कही..' ही ओळ तलतने म्हटल्यावरच शोभेल अशी आहे.

"तलत" या विषयावर एखाद्याने 'तलत' इतकेच नाम लिहून लेख थांबविला आणि प्रसिद्ध केला तरी मन थबकते आणि पानेच्या पाने मागे भूतकाळात फडफडली जातात आवाजाच्या त्या मधाळ मोहकपणात. काय जमाना होता तो त्या त्रयीचा.... रफी मुकेश तलतचा. किशोर आपली ओळख कायम करण्याच्या नादात होता तर मन्ना डे याना ठराविक संगीतकारांनी एका विशिष्ट परिघात बद्ध करून टाकले होते.

मग.....तरुण हृदयांच्या आसुसलेल्या वेदना छेडण्यासाठी समोर होता तो एकमेव तलत. माझ्याकाळी तलतला ऐकणे म्हणजे फक्त रेडिओ सिलोन; पण दुसर्‍या एका बर्‍यापैकी पैसा असलेल्या मित्राकडे घरी ग्रामोफोन होता. अडचण अशी की त्याचे वडील सक्तीने फक्त शास्त्रीय संगीताच्या तबकड्या बाळगून असायचे. ते व्यापाराच्या निमित्ताने कर्नाटकात गेले की आम्ही इथूनतिथून (एचएमव्हीची एजन्सी असलेला स्थानिक व्यापारी मित्रही होता, त्याच्याकडूनही) त्या ७० आर.पी.एम.च्या - एलपीचा जमाना अजून लांब होता - रेकॉर्डस आणून ग्रामोफोनवर मनसोक्त ऐकत राहायचे.....पाचसहा कप चहाही व्हायचा. या उधारीच्या रेकॉर्डमध्ये एक होती तलतची 'तस्वीर तेरी दिल मेरा बहला ना सकेगी...." व्वा....ही गैरफिल्मी गाण्याची तबकडी आणि त्यातील ओळनओळ आम्हाला अगदी तोंडपाठ झाली होती (आजही या धाग्याच्या निमित्ताने परत एकदा या अवीट गाण्याची उजळणी झालीदेखील). कोण तलत, कोण हा संगीतकार कमल दासगुप्ता....याची कसलीही फिकीर आम्हाला नसायची, गुंगून जायचे ते त्या आवाजात आणि त्याच्या कधीही न पाहिलेल्या 'तस्वीर' मधील त्या लावण्यवतीच्या कल्पनेत.

मग त्या आवाजाचा मागोवा घेण्याचा सिलसिला जो सुरू झाला तो थकलाच नाही कधी. नाजूक कोमल प्रणयभावनांचा आविष्कार रफी उत्कटपणे करतो की तलत ? या प्रश्नावर हमरीतुमरीवर येऊन मध्यरात्रीपर्यंत वाद रंगायचे आणि त्यावर उतारा म्हणून वहीत मोठ्या नजाकतीने लिहिलेली तलतची गाणी गुणगुणत वर टिमटिम तार्‍यांकडे पाहात टेरेसवर पडायचे. पुढे वसंत देसाई यानी संगीतबद्ध केलेल्या 'मौसी' मधील 'टिम टिम टिम तारोंके दीप जले....' हे गाणे कानावर आले त्यावेळी खुद्द तलत लताला जेवढा आनंद झाला नसेल तेवढा आम्हाला झाला होता.

खर्‍या अर्थाने तरुणप्रेमी जीवांचा गायक म्हणजे 'तलत मेहमूद'....त्यातही ते विरहगीत असेल तर त्या आवाजाला चौदहवी का चाँदच म्हणावे लागेल. भग्न हृदय नेमके कशा आपल्या भावना व्यक्त करेल याचे उत्तर तलतच्या आवाजात होते. जादूचे संगीत असेल पण त्या जादूला अजरामर केले ते तलतच्या मधुर आर्त आवाजाने.

त्याच्या चित्रपट कारकिर्दीविषयी श्री.टवाळ यानी जितके लिहिले आहे तितकेच पुरेसे आहे कारण आमच्यासाठी तलत हा कधीच पडद्यावरील 'नायक' नव्हता. तो होता फक्त गीतातील नाजूक नि सूक्ष्म-तरल भावनांचे पापुद्रे उलगडून दाखविणारा एक अजोड गायक....ज्याच्या आवाजात मध्यरात्र चारी दिशांनी फुलून उठायची. केवळ निर्मळ प्रीतीचा आवाज असे ज्याला विशेषण देता येईल असा 'तलत' आणि फक्त 'तलतच'.

इथे त्याच्या गाण्यांची यादी देण्यात काही हशील नाही इतकी ती इतरत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. फक्त आवडलेली (तशी सर्वच.....) द्यायची म्हटलीच तर वर दिलेले 'तस्वीर तेरी मेरा दिल बहला ना सकेगी....' सोबतीने शैलेन्द्रचे 'है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सूर मे गाते है....", "मेरी याद मे तुम ना आँसू बहाना...", 'शुक्रिया ऐ प्यार तेरा शुक्रिया...." आदींची वर्णी लागू शकेल.

....पण अशी दोनचार गाणी इथे नोंदविणे हे त्याच्या एकंदर कारकिर्दीवरच अन्याय करण्यासारखे होईल असे मला वाटते. तलत आवडतो म्हणजे अ पासून ज्ञ पर्यंत.

एका छान लेखासाठी श्री.टवाळ यांचे मनापासून आभार.

अशोक पाटील

तलत हा तसा माझा आवडता गायक कधी नव्हता. मला पुर्वीपासून शास्त्रीय गाण्यांची आवड होती आणि
त्याकाळातही मला त्या आवाजाच्या मर्यादा जाणवत असत.

तरीही माझी काही आवडती गाणी (खुपच हटके आहेत गाणी ही.)

१) सोने कि चिडीया. यात नूतन बरोबर तलत ने नायकाची भुमिका केली होती.
सच बता तू मुझपे फिदा, क्यू हुआ और कैसे हुआ.. हे आशाबरोबरचे गाणे. याची चाल गोड आहे पण
पडद्यावरचा नूतनचा वावरही प्रसन्न आहे.

२) उसने कहा था.. मधले लता बरोबरचे, आजा रिमझिम के ये प्यारे गीत लिये, आयी रात सुहानी देखो
प्रीत लिये. या गाण्यात त्या आवाजाच्या मर्यादा आहेतच पण लताने अशी काही कारागिरी केलीय, कि
त्याकडे दुर्लक्ष होते. लताने शेवटी अगदी टिपेला आवाज नेलाय (म्हणजे याल्ला याल्ला दिल ले गया, किंवा
आ अब लौट चले मधे नेलाय तसा)

३) लागे तोसे नैन लागे लागे,
कल ना परे दिन हो के रैन,
जागू सारी रैन

हे सारंग रागातले, आशा बरोबरचे गाणे. यात सारंग राग हा शांत रसाचा राग वापरल्याने
फारसे चढ उतार नाहीत. आणि इथे त्यांचा आवाज शोभलाय.

४) मौदन दरा, मौदन दरा

रुस्तम सोहराब, या चित्रपटातले हे गाणे. संगीत गुलाम मोहम्मदचे होते. आवाजाच्या कंपाचा इथे
चांगला वापर केलाय. या चित्रपटातली मला माहीत असलेली चारही गाणी, अप्रतिम आहेत.
फिर तूम्हारी याद आयी (रफी, मन्ना डे), ये कैसी अजब दास्तॉ हो गयी है (सुरैया ) ए दिलरुबा नजरे मिला (लता)

५) होके मजबूर मुझे उसने भूलाया होगा

मदनमोहनने, हकीकत मधे रफी, मन्ना डे, तलत आणि भूपेंद्र यांच्याकडून हे अप्रतिम गाणे गाऊन घेतले आहे.
प्रत्येकाने आपले कडवे जीव ओतून गायलेय. सैनिकांच्या व्यथा बोलक्या केल्या आहेत, चौघांनी.

सुरेख लेख. आवडला. पुन्हा एकदा सगळ्या आवडत्या गाण्यांना उजाळा मिळाला. धन्यवाद.
शर्मिला +१. मीही प्यार पर बस तो नहीं.. चा उल्लेख करणार होते, मग पाहिलं तू लिहिलं आहेस त्या गाण्याबद्दल.

छान लेख!
माझी आवडती गाणी..
१. फिर वही शाम (जहाँ आरा)
२. मैं तेरी नजर का सुरूर हूं! (चित्रपट माहीत नाही)
३. आंसू समझके क्यूं मुझे (छाया)
४. आंखोमें मस्ती शराबकी (छाया).. हे एक मस्त आनंदी गाणं आहे.

>> शाम-ए-गम़ की कसम, आज गमगी़ है हम
हे 'आज गमही है गम' असं पाहीजे ना?

हे गाणे कुठल्या चित्रपटातले आहे मला आठवत नाही, तरीपण माझे आवडते

आँखोंमे मस्ती शराबकी, और होठोंपे लाली गुलाबकी
है आयी कहासे झूमके, मेरे आँगनमे पंखुडी गुलाबकी

दिनेश, ओ दिलदार बोलो एक बार यात तलत बरोबर लता आहे. गाणे स्कूलमास्टर मधले आहे. पडद्यावर राजा गोसावी आहे.

"शाम-ए-गम़ की कसम, आज गमगी़ है हम......"

~ प्रतिसादाच्या नादात याबद्दल लिहायला मी विसरलोच. पण आता श्री.चिमण यांची शंका वाचल्यावर लक्षात आले. असो.

योग्य शब्द आहेत :

"शाम-ए-गम़ की कसम, आज गमगीन हम......"

गमगीन = उदास, खिन्न, कष्टी

म्हणून...."आ भी जा आ भी जा आज मेरे सनम...." ही आर्तता.

अशोक पाटील

आभार माधव, मला दुसरेच गाणे लिहायचे होते, आता सुधारलेय.

एकंदरीत मला आर्त, व्याकुळ गाणी फारशी आवडत नाही.

तलतचा आवाज म्हणजे मखमली स्पर्शाची कट्यार -

माझी आवडती -

है सबसे मधूर वो गीत जिसे
जाये तो जाये कहाँ
मेरी याँद मे तूम ना आँसू बहाना
फिर वहीं शाम
ऐ मेरे दिल कहीं और चल
अंधे जहान के

तलत माझा अतिशय प्रिय. त्याच्यावर लेख मी नक्की नक्की लिहिणार आहे, त्याशिवाय मुक्ती नाही.
पण माझ्यासाठी एका शब्दात तलत मला describe करायला सांगीतला तर मी म्हणेन

तलत = बेबसी

मन भरुन येतं, कोणत्याही क्षणी डोळ्यातून पाणी येणार इतके डोळे भरुन येतात .... पण 'आसु समझके क्यू मुझे, आखसे तुमने गिरा दिया' म्हणणारा हा माणूस... साला पोटभर रडूही देत नाही.

चिमण, मै तेरी नजर का सुरुर हू हे गाणं पण 'जहा आरा' मधलं.
माझं अजून एक अति आवडतं गाणं म्हणजे 'तसबीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी". ..

भारी. Happy
सगळ्यांनीच मस्त गाण्यांच्या आठवणी काढल्यात.

अपुनभी तलत फॅन.
कातर आवाजाची ती स्टाईल भारी. आणि ते गीतकार. कुठे लुप्त झाले सारे?
'देख ली तेरी खुदाई बस मेरा दिल भर गया' मध्येही कसली ग्रँड शान आहे.
'सीनें में सुलगते है अरमाँ'
'अंधे जहाँ के गम के रास्ते'
'हमसे आया न गया'

कुठलेही ऐकले तरी 'मै यहाँ जीतेजी मरगया' हीच अनुभूती. खल्लास.

ओह ते 'गमगीन' आहे होय. कर्म. कितीवेळा चुकीचे ऐकले म्हणजे.
धन्यवाद हो.

तलतच्या नॉनफिल्मी गझल हा एक वेगळाच विषय.
बेकैफ दिल है और जिये जा रहा हु मै, खाली है शीशा और पिये जा रहा हू मै
किंवा
खोके महफिल मे तेरी सब्रो करार आया हू, चंद लम्हे तेरी मेहेफिल मे गुझाय आया हू

महान!

टवाळा, मस्त लेख Happy

ही माझी आणखी काही तलत स्पेशल गाणी.

१) ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल
२) आंसू समझ के क्यूँ मुझे आंख से तुने गिरा दिया
३) मै तेरी नजर का सुरुर हूं
४) मै पागल मेरा मनवा पागल
५) हुस्नवालोंको ना दिल दो
६) चल दिया कारवां
७) तुझे अपने पास बुलाती है

सुंदर लेख.
माझी आवडती गाणी
१. बेचैन नजर बेताब जिगर (सिनेमा - यास्मीन)
२. जिंदगी देनेवाले सुन ( सिनेमा - दिले नादान)
३. अपनी कहो कुछ मेरी सुनो (लता बरोबर, सिनेमा - परछाई)

अजून बरीच आहेत पण तलत म्ह्टला की ही आधी डोळ्यासमोर (का कानासमोर?) येतात Happy

सुंदर लेख, प्रतिसाद पण मस्तच Happy

"मिलते ही आँखे दिल हुवा दिवाना किसी का .... " तलत चे शमशाद बेगम बरोबर गायलेले एक वेगळ्याच मुड मधले गाणे.
"सब कुछ लुटा के होश मे आये तो क्या किया ... " हे टिपीकल तलत मेहमुद गाण Happy
"तुझे क्या सुनाउ मै दिलरुबा ...."

"सब कुछ लुटा के होश मे आये तो क्या किया ... >>> अगं हो की. हे राहिलंच.
'मैं पागल मेरा मनवा पागल' >> हेही.

ते 'प्यार पर बस तो नही' मात्र मला कधी फारसं आवडलं नाही. कवितेला चाल लावल्यासारखं. नूतन मात्र बेदम सुंदर दिसते त्यात. तलत पडद्यावर 'जाऊद्या झालं'.

तलतच्या खर्जातल्या जागा किती हलक्या नजाकतदार तरीही सुराला नेमक्या यायच्या. कुठल्याही गाण्यात. उगाच आव नाही. ऐकताना सोप्या पण गुणगणुले की 'चांगल्याच खाली होत्या की' ते कळायचे.

रार, नॉन फिल्मी गझला ऐकल्या नाहीयेत. प्लीज सांग ना.

अरे टवाळा
काय अगदी हृदयालाच हात घातलास. एक काळ (खरं म्हणजे वय!!!) असं होतं की "ये हवा ये रात.....हे तलतचं गाणं सर्व गाण्यातलं १ नं. होतं.
तलतचा आवाज म्हणजे मखमली स्पर्शाची कट्यार -

>>>>>>>>>>बागुलबुवा आणि इतरही.....तुमच्या पिढीलाही तलत इतका आवडतो हे वाचून मस्त वाटतं!

Pages