अकल्पित

Submitted by shilpa mahajan on 27 April, 2012 - 23:52

उषा म्हणाली ," माझी कहाणी याच्या पुढेच सुरु होते .मी झपाटल्यासारखी रविच्या पाठोपाठ गेले खरी पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही . रविच्या मनाचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता तो आपल्या दोघींशी सारख्याच आपुलकीने वागायचा . एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा म्हणून मी त्याच्या मागोमाग गेले पण सेमिनार संपेपर्यंत त्याला मुळीच स्वस्थता नव्हती . मी देखील हट्टाला पेटले होते . मी तिथेच ठिय्या दिला . सेमिनार संपल्यावर कुठेतरी बाहेर जाऊ आणि मग त्याच्या मनाचा ठाव घ्यावा असा विचार करून मी तिथे थांबले होते .
मीच हट्टाने त्याला सिमल्याला जाऊयात असे सुचवले पण इथल्यापेक्षा जास्त काय निसर्ग
सौंदर्य तिथे दिसणार आहे असे म्हणून त्याने तो बेत रहित करायला लावला .मुंबईला त्याचं काहीकाम होतं म्हणून मुंबईला जाऊ असा आग्रह त्याने धरला . मला तो नाराज व्हायला नको होतं म्हणून मी हो म्हटलं . माझ्या मनातले विचार सांगताना त्याचा मूड चांगला असावा एवढंच मला हवं होतं . जायच्या आदल्या दिवशी आह्मी सहज फिरायला निघालो . इथल्या डोंगर कपारी आम्हाला खूप भावल्या होत्या . त्यामुळे डोंगराच्या बाजूलाच आम्ही गेलो . डोंगर उतारावर एक चांगलीशी
जागा पाहून आम्ही बसलो . इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता माझ्या मनात माझे
मनोगत त्याला इथेच का सागू नये ? मुंबईला किंवा आणखी कुठेतरी जायची वाट कशासाठी
पहायची ? आत्ता त्याचा मूड चांगला आहे तर विचारूनच टाकू . माझा निश्चय झाला आणि मी तो लगेच अमलात आणला . मनात आशा होती कि तो माझ्यावरच जास्त प्रेम करत असणार .त्याच्या तोंडून ते
वदवून घ्यायचेच काय ते बाकी आहे. लाजत लाजत मी माझे मन हळुवारपणे त्याच्यासमोर उलगडले .पण ....पण..."
" पण काय उषा ? बोल ना ! निशाने उतावीळ पणे विचारले
त्याचे उत्तर ऐकून माझा पूर्ण भ्रमनिरास झाला . " उषा मान खाली घालून बोलली .
" म्हणजे काय ? त्याचे तुझ्यावर प्रेम नव्हते ?" निशाच्या स्वरात एक वेगळीच आशा चमकली
" नाही . त्याचे आपल्यापैकी कोणावरच प्रेम नव्हते . त्याला लग्नच करायचे नव्हते ." उषाने स्पष्ट केले
" का पण ? का नव्हते करायचे लग्न ? दोघीपैकी कोणीच कसे आवडले नाही ?" निशाच्या स्वरातले आश्चर्य लपत नव्हते
" त्याला अविवाहित राहून समाजकार्य करायचे होते ." उषाने सांगितले
" खरं का रे रवी? खरं आहे का उषा म्हणते ते ?" निशाने इतका वेळ गप्प ;बसून ऐकणाऱ्या रविला विचारले .
" हो ! अगदी खरे आहे ते .म्हणूनच मी तुम्हा दोघींशी वागताना अगदी जपून वागत होतो . माझ्या वागण्यातून कोणताही चुकीचा अर्थ निघू नये , कोणताही गैरसमज
होणार नाही याची पूर्ण काळजी घेत होतो . असे करताना माझी किती तारांबळ उडत होती त्याची तुम्हाला कल्पना नाही येणार " अरे पण मग तुम्ही परत का नाही आलात ? इथे राहून कोणते समाजकार्य करता आहात
तुम्ही ?" निशाचे आश्चर्य ओसरले नव्हते
" आम्हाला तसे करण्याची संधीच मिळाली नाही . आमचं दोघांचं दुर्दैव आड आलं .
"म्हणजे काय ? मी नाही समजले !" निशा म्हणाली
" काय सांगू तुला ! रविकडून नकार ऐकल्यावर मी अगदी सुन्न होऊन गेले . जरी त्याचा नकार
दोघींसाठी होता पण माझा फार मोठा अपेक्षाभंग झाला होता .
रविबरोबर संसाराची खूप स्वप्ने मी पाहिली होती. स्वतःचं एक घर , गोजिरवाणी मुले असावीत असं मला वाटत होतं . त्या माझ्या सोनेरी स्वप्नाला रविच्या नकारामुळे खोल तडा गेला . आम्ही दोघे शेजारी शेजारी बसून आपापल्या दुख्खात चूर होऊन गेलो होतो ."
"रविला कसलं दुख्ख झालं? नकार तर त्यानेच दिला होतं ना?" निशाने विचारले
" हो,नकार दिला हे खरं पण त्याचा हेतू मला दुखवायचा नव्हता . त्याच्यामुळे माझी झालेली अवस्था त्याने पाहिली
आणि त्याला तो स्वतःच कारण असल्याने तो ही खूप दुख्खी झाला .
एकूण काय तर जवळ बसूनही आम्ही एकेकटे होतो . मनाने खूप दूर होतो . विचारात गुरफटून गेलो होतो.असे आम्ही किती वेळ निशब्द बसून होतो कुणास ठाऊक !
अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आम्ही भानावर आलो .वारयाबरोबरच धूळ , वाळू , पाला पाचोळा अवकाशात उडत होते .डोळे उघडे ठेवणे देखील अशक्य झालं.
आम्ही एकमेकांचे हात घट्ट धरले आणि परत यायला निघालो . पुढच्याच क्षणी ढग गडगडल्यासारखा मोठा आवाज झाला आणि दगडमातीचा मोठा डोंगरच जणू आमच्या
दिशेने गडगडत खाली येऊ लागला . ते पाहून आमच्या काळजाचा ठोकाच चुकला !
आम्ही हातात हात घालून जीव घेऊन पळत सुटलो . पण नशिबान साथ द्यायचं नाकारलं..! "
" मग ?" निशाने धडधडत्या काळजाने विचारले .
" मग काय ! आम्ही सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच तो दगड मातीचा डोंगर आमच्यापर्यंत पोहोचला ! आम्हाला जिवंत समाधी मिळेपर्यंत दगड मातीचे थरावर थर
साठतच राहिले!
"जिवंत समाधी ?" निशाच्या अंगावर सरसरून काटा आला .
" म्हणजे तुम्ही ...तुम्ही दोघे ...." निशाला पुढे बोलवेना
" होय ! आम्ही आता जिवंत नाही ! " निशाने तिचे वाक्य पूर्ण केले .
" पण मग आत्ता मी पाहते आहे ते ...." निशा पुन्हा चाचरली
" साध्या भाषेत सांगायचे तर हे आमचे वासना देह ! उषा म्हणाली ," आमचं काय झालं ते आमच्या घरच्या लोकांना समजावं , आमच्या बद्दलचे सर्वाचे गैरसमज दूर व्हावेत ही आमची
इच्छा अपुरी असल्याने आम्हाला मुक्ती मिळत नाही आहे .”
“" मी काय करू शकते तुमच्या साठी ?" उदासपणे निशाने विचारले
" फार काही नाही .फक्त घरी जाऊन घडलेले सर्वाना सांग . आमच्या आईबाबांना इकडे घेऊन ये. आमचे मरण त्यांनी स्वीकारले , अंतिम संस्कार केले म्हणजे आमचा जीव शांत होईल .
तुझी आणि आमची मने खूप जुळली असल्याने आमची अंतःप्रेरणा तुझ्यापर्यंत पोहोचेल याची आम्हाला खात्री होती. त्याप्रमाणे तू आलीस पण . पण सामोरा समोर यायला इतका वेळ लागला . आम्ही पुन्हा पुन्हा तुझ्या समोर येऊन तुझे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होतो . तुझ्याकडून पुढाकार येणं आवश्यक होतं . तोपर्यंत आमच्या प्रकट होण्याला मर्यादा होती . म्हणून आपली भेट इतकी लांबली ." इतका वेळ गप्प बसलेला रवी हळवा होऊन बोलला .
" उषा, रवी, तुमच्या या बोलण्यावर मी विश्वास ठेवीन , पण इतरांना मी कसे पटवून देऊ ? " जरा सावरल्यावर निशाने विचारले .
"आम्हाला त्याची कल्पना आहे .ती समस्या दूर करण्यासाठीच तुला इतक्या दूर यायला लावलं आहे ."
" म्हणजे काय?" निशाने विचारले
" त्या समोरच्या टेकडी पलीकडे चिंचेचे झाड आहे . त्या झाडाखाली चल. तुझ्या समस्येचे उत्तर तिथे आहे ." रवी बोलला
निशाला काहीही बोध झाला नाही .पण काही विचारण्याच्या स्थितीत ती नव्हती . ती मुकाट्याने रवीने दाखवलेल्या दिशेने निघाली . उंच सखल रस्त्याने दगड धोंड्यांवरून ठेचकाळत कशी बशी ती चिंचेच्या झाडाखाली पोहोचली . धापा टाकत तिने प्रश्नार्थक मुद्रेने रवी कडे पाहिले.
उषाने एका उंचवट्याकडे बोट दाखवत म्हटले ,"तिथे नीट जवळ जाऊन पहा ."
निशा जवळ गेली . पण तिला काहीच दिसले नाही . तिने सहज समोरचे मातीचे मोट्ठे ढेकूळ जोरात बाजूला सरले अन .....तिच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली .हातात हात गुंफलेल्या स्थितीत हातांचे दोन सांगाडे बाहेर आले. एका हाताच्या अनामिकेत लाल खड्याची अंगठी होती आणि दुसऱ्या हातात सोन्याच्या बांगड्या ! दोन्ही तिच्या चांगल्याच परिचयाच्या होत्या . अंगठी रवीची आणि बांगड्या उषाच्या होत्या .आणखी कोणत्याच पुराव्याची गरज नव्हती . तिने रवीकडे पहिले .रवीने उदासपणे होकारार्थी मान हलवली .
निशा स्फुंदून स्फुंदून रडू लागली .उषाने तिला रडू दिले . थोड्या वेळाने आवेग कमी झाल्यावर निशाने डोळे पुसले .
" निशा, जे झालंय ते तर आपण बदलू शकत नाही. पण आमची शेवटची इच्छा तरी तू पूर्ण कर .आमच्या आई वडिलांना इथे घेऊन ये. हा पुरावा दाखव . त्यांनी आमचा अंतिम संस्कार केला की आम्हाला मुक्ती मिळेल ."
निशाने निशब्दपणे मान हलवली आणि विमनस्क मनस्थितीत ती रूमवर परतली
दुसऱ्या दिवशी परतीच्या गाडीत बसून घरी निघालेली निशा विचारांच्या आवर्तात सापडली होती . तिला कळलेल्या सत्य परिस्थितीमुळे तिच्या मनावरचं कित्येक वर्षांचं दडपण ,
रविच आपल्यावर प्रेम नाही ह्या विचाराने आलेली एक प्रकारची निराशा या सर्वातून तिची अचानक सुटका झाल्यामुळे तिला खूप हलकं वाटत होतं ! पण त्याचबरोबर उषा आणि रविच्या घरी जी बातमी आपल्याला सांगायची आहे त्याच्या परिणामाची कल्पना तिच्या अंगावर शहरे आणत होती .
इतके दिवस आपल्या मुलांनी आपल्याला विश्वासात घेतलं नाही या कल्पनेने ते दुख्खी असले तरी कुठेतरी मुले सुखरूप आहेत आणि एक ना एक दिवस आपल्याला येऊन भेटतील या आशेवर दिवस कंठत होते. पण आता सत्य समजल्यावर त्यांच्या जगण्याचा आधारच नाहीसा होईल की काय ह्या विचाराने तिच्या अंगावर काटा उभा रहात होता. ही बातमी कशा प्रकारे
सांगावी म्हणजे त्यांना कमीत कमी धक्का बसेल याचा विचार करण्यात ती गढून गेली . त्या नादात तिचं उतरण्याच ठिकाण कधी आलं ते ही तिला कळलं नाही .
त्यांची चाळ स्टेशन पासून पायी जाण्यासारखी जवळ होती . घरी जाऊन आधी आईला सांगावं आणि तिला बरोबर घेऊनच दोघांच्या घरी जावं असा विचार करत ती चालत होती . जसजसे
घर जवळ येऊ लागले तसतशी तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली .चाळ नजरेच्या टप्प्यात येताच ती थबकली . चाळीपाशी गर्दी दिसत होती .ती गोंधळून गेली . कशासाठी ही गर्दी जमली
असावी ? ती विचार करू लागली . आपल्याला कळलेली बातमी त्यांना कळली असेल का? छे! शक्य नाही ! मग काय घडले असेल ?
रवी किंवा उषाच्या आई वडिलांपैकी कुणाला काही ......छे! छे! निशाने तो घाणेरडा विचार झटकण्यासाठी मान जोरात झटकली .
काही तरी विपरीत घडलं आहे एवढे निश्चित ! तिचं मन तिला सांगत होतं.
आपल्या आई बाबांपैकी कुणाला तर काही ....या विचारासरशी निशा नखशिखांत हादरली ! गळाठलेल्या पायातलं सारं बळ एकवटून ती धावत सुटली .
चाळीच्या फाटकापाशी आल्यावर तिला दिसलं की घराच्या समोरच तिचे , उषाचे आणि रविचे सुद्धा आई बाबा हतबुद्ध चेहेरयाने उभे होते.काही अनोळखी लोक गंभीर मुद्रेने
त्यांना काहीतरी सांगत होते . सर्वजण इतके काळजीत होते की निशा समोर येऊन उभी राहिली तरी कोणाचे लक्ष गेले नाही .
आता कुठे निशाच लक्ष समोर गेलं! पांढरया चादरीखाली झाकलेला एक देह समोरच ठेवलेला दिसला तिला !
कोणासाठी वातावरण इतकं गंभीर झालंय ? इतक की माझी चाहूल देखील लागू नये? विचार करत करत निशा त्या देहापाशी गेली. वाकून तिने तो चादारीखालचा देह न्याहाळला .
तिला आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला ! तो देह तिचा स्वतःचाच होता !!!
" सगळी गाडी रिकामी झाली तरी ह्या आपल्या झोपलेल्या! म्हणून त्याना उठवायला गेलो तर ...."
ती माणसे सांगत होती . तिने आश्चर्याने मान वर केली . तिच्या देहाच्या पायथ्याला उषा आणि रवी निराश चेहेऱ्याने डोक्याला हात लावून बसले होते !!!

गुलमोहर: 

छान लिहिलि, वाचुन अंगावर काटे आले , कथा कल्पनिक नसेल तर आत्म्यांच्या किंवा पास्ट लाईफ रिग्रेशन या धाग्यावर लिंक द्या Happy

मस्त कथा...... खूप आवडली. ती टाईप करत असताना,तुम्हाला इतक्या अडचणी आल्या तरी तुम्ही कथा पुर्ण केलीत याबद्द्ल तुमचं खूप कौतुक. अश्याच चांगल्या चांगल्या कथा इथे लिहितं रहा.

खूप आवडली.. शेवट खरेच अकल्पित होता.. आणि रंगवलाही छान.. एवढा त्रास घेऊन आपण ही कथा इथे टाकलीत ती सार्थकी लागली म्हणायचे.. आता आपल्या पुढच्या कथांची वाट पाहतोय.. Happy

खूप आवडली.. शेवट खरेच अकल्पित होता.. आणि रंगवलाही छान.. एवढा त्रास घेऊन आपण ही कथा इथे टाकलीत ती सार्थकी लागली म्हणायचे.. आता आपल्या पुढच्या कथांची वाट पाहतोय.. Happy

कथा छान आहे. पण मग नायिकेला दोन सांगाडे दिसतात ते तिचं स्वप्नंच का? आमच्या आपल्या अडाणी शंका!!

नाही . ते स्वप्न नव्हे . एक सांगाडा उषाचा आणि दुसरे रवीचा . ते सत्यच होते . फक्त ते घरापर्यंत पोहोचू शकले नाही इतकेच .

रतन जाधवजी, कथा आवडल्याचे वाचून बरे वाटले. कथेतल्या काही घटना सत्य आहेत हे खरे पण कथा मात्र काल्पनिक आहे

कथा चांगली वाटली. त्या दोघांबद्दल अंदाज आला होता पण शेवट मात्र अजुनच कलाटणी देउन गेला. Happy

छान

डरना मना है या सिनेमाच्या शेवटी असेच काहीसे आहे ना. शेवटी सगळ्यांना कळते की ते सर्व ऑलरेडी मृत झालेले आहेत. मला तरी शेवट प्रेडीक्ट करता आला होता आधीच Happy

डरना मना है या सिनेमाच्या शेवटी असेच काहीसे आहे ना. शेवटी सगळ्यांना कळते की ते सर्व ऑलरेडी मृत झालेले आहेत. मला तरी शेवट प्रेडीक्ट करता आला होता आधीच
>>>>>>>>

एकदम एकदम.. तरीच मी बोल्लो की काहीतरी असे कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतेय, आपण बोललात आणि क्लिक झाले.
पण वाचताना नाही बाबा प्रेडीक्ट करता आले, तसे मी करायचा प्रयत्नही करत नाही कधी, हे म्हणजे स्वताच्या वाचनाची मजा स्वताच घालवण्यासारखे झाले.. Happy

डरना मना है हा सिनेमा मी पाहिला नाही त्यामुळे त्याबद्दल मला माहिती नाही. पण एकासारख्या कल्पना इतरांच्या मनात येऊ शकतात एवढेच म्हणेन