मौसिकीसे मुहब्बत - फरहान

Submitted by दाद on 18 April, 2012 - 02:34

काही माणसं आपल्या आयुष्यात येतात अन अक्षरश: अगदी थोडक्याच वेळात जातातही. एखादा झरा थोडकाच काळ का असेना पण रानातही वाहिला की आपली खूण ठेऊन मगच सुकतो... आजूबाजूची झाडं, वेली... त्याच्या नुस्त्या आठवणींनीही कातर-हिरवी होतात. माथ्यावरलं एरवीचं निरभ्रं आभाळ अभ्रं होऊन झुकतं.... कुठं एखादं पाणथळ अजून असेल थरथरत.... त्यात का होईना, पण डोकावेन क्षणभर....
थरथरणार्‍या धुरकट बिंबातही.... आठवणी मात्रं किती नितळ, ताज्या असतात.

फरहान!
प्रसिद्धं तबलावादक अनुराधा पालचा सिडनीतला एक घरगुती कार्यक्रम नुकताच संपला होता. केवळ अप्रतिम! इतकच म्हणता येईल असा सोलो वाजवून गेली ही मुलगी. तिच्या हातांकडे अगदी टक लावून आणि स्पीकरला कान लावून संपूर्णं कार्यक्रम ऐकणारा हा लावण्यपुरुष सगळ्यांच्याच ध्यानात आला होता.
"चलिये, शलाकाजी... अनुराधाजीसे मिलते है!" हा कधी येऊन बाजूला उभा राहिला कळलच नाही.
"क्या बजाया है.... माशाल्ला.... दिल करता है, ऐसे हातोंको चूम लू....".
मला मुळात कुणी असलं काही बोलायला लागलं की विलक्षण वैताग यायला लागतो. विशेषत: ह्या असल्या.... फक्तं जाहिरातीत शोभून दिसेल असल्या माणसाच्या तोंडून म्हणजे अगदीच कसंतरीच वाटतं. स्वत: जाऊन काय बोलायचं ते बोल म्हणावं. पण ते नाही. मला आग्रहं चालला होता.

मी अतिशय नाराजीने बघितलं आणि तिथून बाजूला झाले. मग लक्षात आलं की, अनेकदा बघितलय ह्याला... अनेक कार्यक्रमांमधून. आवर्जून कलाकारांचं कौतुक करण्यासाठी कितीही वेळ ताटकळत उभा, अगदी लवून लवून, पुन्हा पुन्हा वाकत, हातांनी आदाब करीत, बेफाम तारीफ करणारा हा "रसिक" मी सुद्धा बघून होते. चटकन कुणीही वळून बघावं इतका देखणा. कार्यक्रमांना आपल्या अफगाणी टोपी अन जरीबुट्टीच्या जॅकेटसहं सजून येणारा. त्यावेगळी वागण्यातच एक खास राजेशाही ऐट होती. चालणं, बोलणं, बसणं, दाद देणं... इतकंच काय, पण किंचित रेलून नुस्ता ऐकत असला तरी त्याच्याकडे बघणार्‍याला वाटावं की, आजची मैफिल केवळ ह्याच्यासाठी आहे. तरीही कलाकारांशी जवळीक करण्याचा, बोलण्याचा, तोंडफाट तारीफ करण्याचा त्याचा प्रयत्नं मलातरी अगदीच केविलवाणा वाटला.

अगदी पुढच्याच आठवड्यात त्याचा फोन. "शलाकाजी, आपसे मुलाकात करनी है. ज्यादा वक्तं नही लूंगा आपका.... कुछ लम्हे इस नाचीजकी झोलीमे..." घरी येऊका म्हणून विचारणार्‍याला नाही म्हणण्याला जीभ रेटत नाही.... नावडतं माणूस असलं तरी. त्या दिवशी, फरहान काही लम्हे म्हणून जो आला..... तो आमच्या आशियानाचाच एक तिनका बनून गेला.

अफगाणच्या कुठच्यातरी छोट्या शहरातल्या गली-कुच्यातला हा पश्तू बोलणारा शाहजादा, जुजबी शिक्षण आणि गाणं-बजावण्याशी लगन एव्हढ्यावर मोठ्या शहरात राहू लागला. तिथेच नाती-जातीतल्या, माहितीतल्या एका मुलीशी तथाकथित प्रेमविवाहही केला. बॅण्णव सालापासून ऑस्ट्रेलियात आहे. त्याच्या भाषेत "सिर्फ मौसिकी से मुहब्बत", ही एकच एक मुश्किली, मजबुरी आयुष्यात होती. आयुष्यभर फारसी, अरबी काव्य, उर्दू गजल ह्यावरच्या नितांत प्रेमामुळे रोजच्या बोलीभाषेलाही किंचित काव्यात्मक नाटकी वळण. फारसी, अरबी, पश्तू भाषांवर प्रभुत्वं आहे. तो स्वत: उत्तम गायक असल्यानं लग्नं वगैरे समारंभात छोट्या मैफिलींमधे गाणं हा छंद तसंच अधिक उत्पन्नाचं साधनही होतंच.
संगीत कलाकारांना त्याच्या आयुष्यात अल्ला-तालाच्या खालोखाल स्थान आहे. कलाकार ही खुद्दं अल्लाची कलाकारी आहे, म्हणूनच सराखोंवर त्यांचं अधिष्ठान आहे. ज्याला संगीताची अभिरूची नाही, ज्याला सूर स्पर्शत नाहीत, तो त्याच्या मते जिंदाच नाही. माझी एकही मैफिल त्यानं चुकवलेली नाही आणि.....

.... आणि त्याला माझ्याकडूनच तबला शिकायचाय, दुसर्‍या कुणाकडूनही नाही....!!

"शलाकाजी, उस दिनका मैने छिपाकर रेकॉर्डिन्ग किया है. चाहिये तो अभी हाजिर कर सकता हू... ", खिशातून छोटा डिजी रेकॉर्डर बाहेर काढीत मुक्तं मनाने त्यानं मला त्या दिवशीच्या अत्त्युतम कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग, जे करू नका असं विनवलं गेलं होतं, त्याचीच लाच देऊ केली.
"ये तो उस कलाकारी का अपमान है, फरहान.... अनुराधाजी के इजाजतके बिना इसे सुनना भी नही चाहिये....", मी जमेल तितक्या कडक शब्दांत माझी नाराजी व्यक्तं करताच..... एका क्षणाचाही विलंब न करता त्यानं ती फाईल डिलीटही केली.
"आपको मै नाराज नही कर सकता. गुरू कभीभी अपने शागिर्दंसे नाराज हो, इससे बेहतर है के शागिर्द गर्दना जाय... फिरसे ऐसी गलती नही होगी..."!!
मी नि:शब्दं, अवाक झाले. तरीही खूप आढेवेढे घेऊन मी त्याला अशी वेळ दिली की कुणीही त्याच्या वयाचा खूप दिवस ती पाळूच शकणार नाही.
शुक्रवारी रात्री आठ किंवा शनिवारी सकाळी सात!
त्यावर त्याचा प्रश्नं होता, "आपको ऐतराज न हो तो मै दोनो दिन आऊ?"

शिकायला सुरूवात केल्यावर त्याची लगन, असोशी अगदी ध्यानात येऊ लागली. त्यानं पैसे देऊ केले. मी घ्यायचे नाकारले. मी जे शिकवेन अन तू जे शिकशील त्यात मलाच आनंद आहे, त्याचा मोबदला मी घेऊ शकत नाही... हा माझा युक्तिवाद. गुरूसामोरी बसून शिकणं हा त्याचा आनंद आहे आणि तो फुकट लुटावा हे त्याच्या "कुराणी" शिकवणीत बसत नाही... हा त्याचा.

मग असा सौदा ठरला की, एका बरणीत त्यानं त्याचा आनंद ठेवायचा. वर्षाअखेरीस एखाद्या सेवाभावी संस्थेबरोबर तो वाटून टाकायचा. जरा चांगला बॉक्स किंवा सुबक बरणी हाताशी नाही म्हणून मी कुचकुचले. तर, "... प्यार बुतसे नही उसमे बसी खुदाईसे होना चाहिये, दीदी" असं म्हणत डोळा मारून हसला, फरहान.
शनिवारी सकाळी पठ्ठ्या सातच्या ठोक्याला दाराबाहेर हजर असायचा. सुरुवातीला लवकर आला, तर बाहेरच थांबायचा आणि सात वाजता दारावर थाप द्यायचा. मला कळलं तसं त्याला ओरडले. मग घरात येऊन माझं आवरेपर्यंत लेकाबरोबर दंगा चालू झाला. मग आमचा अजून राहिला असेल तर आमच्याबरोबर नाश्ता. मला आवरायला वगैरे मदत करायला अगदी तत्पर असायचा फरहान. मी अगदीच स्वयंपाकघराबाहेर हाकललं तर बैठक घालणे, तबले काढून जुळवून ठेवणे, झाल्यावर उचलून ठेवणे ह्यात त्याला अपार आनंद होता. जुन्या काळातल्या गुरुगृही राहून शिक्षण वगैरे त्याच्या कल्पनेतलं जगातलं काहीतरी जगू पहाण्याचा त्याचा अट्टाहास असायचा.

खूप रियाज करूनही घरी आपला "ना" दीदीसारखा वाजत नाही म्हणून खट्टू चेहरा घेऊन बसला होता. मग त्याचा घरचा तबलाच चांगल्या प्रतीचा नसल्याचं ध्यानी आलं. माझा एक जास्तीचा तबला दिला त्याला. एखाद्या लहान मुलासारखा त्याचा उजळलेला चेहरा मला अजून आठवतो. पुन्हा पुन्हा कमरेत वाकून मला अभिवादन करीत, त्यानं तबला आपल्या पोरासारखा मांडीवर घेतला. हळूवारपणे त्यावरून हात फिरवला. अन तबल्याला हात लावून तो आपल्या छातीवर ठेवीत डोळे मिटून त्याला नमन केलं. अन म्हणाला, "यह आपका, मेरे गुरूका साज है. इसे मै जान देकरभी संम्हालूंगा..." मीच अवघडले, इतक्या नाट्यानंतर.

हळू हळू फरहानबद्दल इतरही बरच कळत राहिलं. ह्याचं शाळेनंतर शिक्षण असं फारसं नाही, टॅक्सी वगैरे चालवतो, एक मुलगी आहे सातेक वर्षांची... गेजल तिचं नाव, बायकोला ह्याचं संगीत, तबला-बिबला जराही पसंत नाही इ. इ. गोष्टी कळत गेल्या.
मध्यंतरीच्या काळात त्याला एका कंपनीबरोबर कॉन्ट्रॅक्ट होऊन कॅनबेराला बिर्‍हाड हलवलं. सिडनीत कार्यक्रमांच्या निमित्ताने वीकेंन्ड्सना येतोच तेव्हा शनिवारी सकाळचा क्लास नक्कीच होऊ शकतो अशी हमी दिली, त्यानं. एका शनिवारी सकाळी जरा लवकरच बाहेर पडलेल्या माझ्या नवर्‍याला कोपर्‍यावर गाडी लावून त्यात झोपलेला फरहान सापडला होता. कार्यक्रम नसले तरी शुक्रवारी रात्री कॅनबेराहून इथे येऊन गाडीत झोपायचा, फरहान. कळल्यावर मलाच भडभडून आलं. इतकं जीव ओतून कलेवर प्रेम करणारं मला आजवर कुणी प्रत्यक्षं भेटलच नव्हतं. शिकणं त्याच्यासाठी धर्म होता... ह्याचं गुरू बनणं सोप्पं नाही... तारेवरची कसरत आहे... जराही ढिलाई चालणार नाही, हे ध्यानात आलं. त्याच्या माझ्या नशीबानं दोनेक महिन्यांतच तो सिडनीत परतला.

शिकायला सुरुवात केल्यावर एक दिवस एक मोठ्ठं बाड घेऊन आला. कितीतरी पानंच्या पानं तबल्याचे बोल लिहिलेले. "... दीदी ये सब मेरी जिंदगी की कमाई है... क्या कुछ दे देकर ये इकठ्ठा किया है. मुझे यह सब सीखना है..."
मी ते फार न चाळताच बाजूला ठेवलं. फरहानच्या उत्साहावर पडलेलं पाणी त्याच्या चेहर्‍यावर व्यवस्थित दिसत होतं.
"... फरहान, ह्यातलं मी तुला काहीच कदाचित शिकवू शकणार नाही... प्रत्येक घराण्याच्या लकबी, सौदर्यस्थानं, बलंस्थानं ह्यानुसार घराण्याचा चीजा बांधल्या जातात. ते सगळं मला आत्मसात नाही. पण... ह्यातलं तुला काय झेपेल ते तुझं तुला शिकता येईल, वाजवता येईल अशी तुझी तयारी मी करून घेईन.
"ना" वाजतो म्हणजे काय? किंवा कोणतंही व्यंजन, अक्षर वाजतं म्हणजे काय? त्याचं तंत्र काय? एकच तबला दोघा तबलावादकांच्या हाती वेगवेगळा का ऐकू येतो? एकच ताल किंवा ठेका दोन वेगवेगळे तबला वादक वाजवतात तेव्हा तो वेगवेगळा का ऐकू येतो? तबला वाजवणं म्हणजे एखादी बोली भाषा बोलण्यासारखं आहे. त्यात शब्दं आहेत, वाक्यं आहेत, परिच्छेद आहेत... काव्य आहे, कथा आहे. जेव्हा दुसरा तबला वादक वाजवतो तेव्हा ती भाषा तिचे आघात, लकबी, मुरके, ठसके, ठहराव ह्या सगळ्या सगळ्यासकट ऐकू यायला हवी. त्यासाठी कान तयार व्हायला हवा. अगदी कान देऊन खूप ऐकायला हवं. म्हणजे मग चुकीचे बोल, बोबडे बोल स्पष्टंपणे ऐकू येतात. तुझ्या सुरुवातीच्या काळात आधी हे शिकुया... चालेल?"
मगासचे निराशेचे ढग कुठेच्याकुठे विरून गेले. "... आप जो मेरेलिये सोचेगी, वही सही है, दीदी."
मी पुन्हा एकदा अवाक. कधीकधी खिशात असेल-नसेल ते देऊन गोळा केलेलं हे भांडार माझ्यावरच्या कोणत्या विश्वासानं ह्यानं माझ्या हातात ठेवलं? कोणत्या भक्तीनं ते तितक्याच सहजतेनं तो ते बाजूला सारतोय? ह्याच्याइतका समर्पित विचार ह्यापूर्वी आपण कधी केलाय?... खूप ताण देऊनही मला आठवेना.

आमचं शिक्षण मग त्या दिशेनं सुरू झालं. कधीतरी लहान मुलाच्या उत्सुकतेनं आपली "आनंदाची बरणी" निरखण्यात आनंद असायचा, फरहानला. नुकतेच त्यातले पैसे बांगलादेशातल्या एका शाळेला पाठवले होते.
"... दीदी, ना ये आपका, ना मेरा.... ये तो उन बच्चोंका आनंद था, जो हम सम्हाल के रख्खे थे इतने महिने... आपकी बरनी मे कैद था बेचारा... उसे अपना घर मिला" असं एक झक्कास तत्वज्ञानाचं पिल्लू त्यानं उडवून दिलं होतं.

एक दिवस त्याला त्यात अधिक पैसे दिसले. तत्परतेनं त्यानं विचारलंही, "और कौन शागिर्द इसमे पैसे डालता है?".
"... नही फरहान, ये सिर्फ़ तुम्हारेलियेही है... लेकिन उसमे मेराभी आनंद शामिल है"
आधीच्याच आठवड्यात एक रेकॉर्डिंग घेऊन आला होता. त्यात वाजलेल्या ठेक्यात मी लिहून दिलेल्या बोलापेक्षा अधिक बोल अगदी सुक्ष्मंरित्या वाजतायत. ते काय आहेत? त्यांचं तंत्रं काय? असले प्रश्नं घेऊन आला होता, फरहान. त्याचे कान तयार होतायत. लिखित भाषेपेक्षाही बोलीभाषा किती समृद्धं असते, त्याची समज येऊ लागली होती. एक मोठ्ठा पल्ला आम्ही गाठल्याचा मलाच खूप आनंद झाल्यानं तो गेल्यावर बरणीत मी भर घातली होती.
हे ऐकल्यावर त्याचा चेहरा अस्सा उजळला होता.
पण क्षणात "... कैसा आनंदही आनंद है इसमे दीदी... देखिये ना... मुझे सीखनेमे है, आपको सिखानेमे है... यह कैसी बेजान पत्थरदिल दुनिया है जिसे यह आनंद छूता भी नही..." असं म्हणत त्याचा चेहरा विषण्णं झाला. आपल्या बायकोच्या गाण्याच्या नावडीबद्दल अगदी कधीतरीच तो असं संदिग्धं काही बोलून जात असे. टवटवीत फुलानं क्षणात कोमेजून जावं, लखलखणार्‍या ज्योतीला काळोख शिवावा... तसं व्हायचं. "... इस मौसिकीसे मुहब्बतने कर दिया नाकाम वरना..." हा तर त्याचा अत्यंत प्रिय डायलॉग!

मी त्या काळात दुसरी डिग्री पदरात पाडून घेण्याच्या गडबडीत होते. परिक्षेचे दिवस आणि नवरा दौर्‍यावर. त्यात नेमक्या परिक्षेच्या दिवशी लेक आजारी पडला. थोडा मलूल दिसत होता... त्याला डे-केअरमधे पाठवायचा धीर होईना. बाजूच्या आज्जी बाहेरगावी गेलेल्या. सकाळी कामावर निघालेल्या फरहानचा फोन, "... दीदी बारिश हो रही है... आपको युनिव्हरसिटीतक छोड दू?"
त्याला खरं काय ते सांगितलं तर, मी पेपर संपवून परत येईपर्यंत आपला टॅक्सीचा काम धंदा सोडून माझ्या लेकाबरोबर थांबायची नुस्ती तयारीच नाही दाखवली तर गळच घातली त्यानं मला. कसातरी पेपर देऊन बस स्टॉपपाशी येते तर पठ्ठ्या माझ्या मुलाला त्याच्या टॅक्सीत मागे बसवून तिथे हजर. माझं काही एक न ऐकता डॉक्टरच्या दारात आम्हाला सोडलन. वर आणखी, "... पुराने सदियोंमे अपने गुरू केलिये लोग क्या क्या करते थे... उनके घर पानी भरना, बरतन मांजना... उपरसे गुरूका पान-तमाकूकी थूंकका झमाला... आप तो वो भी नही खाती. अभी जिजाजी नही है. आपको किसीभी प्रकारकी मदद की जरूरत हो... और आपने किसी औरको बुलाया तो... तो आपको मेरी कसम"
हे बजावून गेला. नवरा नसताना आता अजून कोणताही मदतीचा प्रसंग येऊ नये म्हणून मीच देवाला गार्‍हाणं घातलं.

एक दिवस आला तोच तणतणत. "वो... दिलावरका फोन आये तो मुझे कह देना... उसे देख लुंगा. मैने पहलेही मना कर दिया है... हिंमतही कैसे हुई उसकी, आपके लिये ऐसा मनसबा लानेकी..."
त्याच्या दिलावर नामक एका मित्राचं रेस्टॉरंट होतं. त्यात आठवड्यातून एका संध्याकाळी गिर्‍हाइकांसाठी गजल, नज्मांची मैफिल सजत असे. तिथे फरहानला गाण्यासाठी आणि साथीला मला तबल्यासाठी म्हणून तो आमंत्रित करू इच्छित होता.
"... लोग, वहा खाना खायेंगे, शराब पियेंगे... आपका दिलौ-जानसे कौन सुनेगा वहा दीदी?... मेरी बात अलग है... मै तो पैसे केलिये गाता ही हू... लेकिन आप? आपकेलिये यह सिर्फ पूजा है... मुझे यकीनही था की आप मनाही कर देगी... मैने वहीपे बात तोड दी"
माझ्यातल्या माणसावरल्या कलाकार म्हणून असलेल्या मर्यादा ह्या अशिक्षित माणसानं किती सहज व्यक्तं केल्या... दाखवून दिल्या. त्यानं माझी मलाच करून दिलेली ही वेगळी ओळख... त्याक्षणी मी फरहानची ऋणी झाले.

असाच एक दिवस दुपारी एका तरूण स्त्रीनं दारावर थाप मारली. तिच्याबरोबर असलेल्या लहान मुलीच्या चेहर्‍यावरून मी ओळखलं की ही मिसेस फरहान आणि ही भावली... गेजल. फरहानसारखेच हरिणाच्या पाडसासारखे मोठ्ठे डोळे, भुरे केस आणि लख्खं गोरा रंग.
ठक्कं कोरड्या आणि करड्या चेहर्‍यानं तिची आई आत आली. वारंवार विनवूनही बसायला तिनं नकार दिला. फरहानचं शास्त्रीय संगीताशी लगन, तबला, कार्यक्रम करणं, कार्यक्रमांना जाणं, हे सगळं तिला किती त्रासदायक आहे त्याचा मोठ्ठा पाढा तिनं वाचला. इंग्रजीत बोलत होती. ह्या त्याच्या असल्या प्रकारांना कंटाळून ती दोन-तिन वेळा माहेरी निघून गेली आहे, घरात रोज ह्यावरून भांडणं होतात. ह्या असल्या "मागासलेल्या कल्चरचा" आपल्या मुलीवर परिणाम व्हायला नको हा सुद्धा त्यातला मोठ्ठा भाग आहे....

घराच्या उघड्या दरवाजातून तिचं मोठ्ठ्या मोठ्ठ्यानं बोलणं बाजूच्या अपार्टमेंन्ट्स मधे ऐकू जात होतं, गेजल बावरली होती आणि दरवाजाशी जाऊन उभी राहिली होती, बाजूच्या दाक्षिणात्यं आज्जी दार उघडून "प्रकार काय" ते बघायला बाहेर आल्या होत्या...
ह्यातलं काहीही माझ्या डोक्यात शिरत नव्हतं इतकी मी अवाक झाले होते.

"... मी सांगून सांगून थकले... ह्या वयात त्याला तबला-बिबला शिकायची काहीही गरज नाही... आमच्या कुटुंबाचं काही वाईट व्हावं असं वाटत नसेल तर... तुम्हीच त्याला सांगून हा तुमचा प्रकार बंद करा... नाहीतर... नाहीतर मी भलतच काहीतरी करून घेईन... नंतरच्या परिणामांना मी जबाबदार नाही... सांगून ठेवते..."
ती अजूनही ओरडतच बोलत होती. आता गेजल तिच्याकडे येऊन तिचा हात धरून ओढत तिला घरी चलण्याची विनंती करीत होती... ".... ममी, चलो... मुझे घर जाना है... घर चलो..."

गेजलचं आर्जव आणि शेजारच्या आज्जींना दरवाज्यात बघून असावं... पण मी सावरले. "... थांब, एक मिनिट" म्हणून एक चॉकलेट गेजलच्या हातात ठेवलं आणि मग तिला "तू निघू शकतेस, आता" इतकच सांगितलं. गेजलच्या हातातलं चॉकलेट हिसकावून घेऊन तिथेच टेबलवर ठेऊन ती तरातरा निघून गेली. आज्जींना मी समजावलं आणि दार बंद करून सोफ्यावर येऊन बसले.

असं काही विचित्रं भस्सकन समोर येईल असं वाटलच नव्हतं. तमाशा झाल्यासारखाच प्रकार, काहीही चूक नसताना उलटसुलट ऐकून घ्यावं लागणं, एक भलताच निर्णय करणं माझ्या पदरात, काही विपरित करण्याची धमकी, शेजारच्या आज्जींना भलताच संशय... थोडी हबकले, गडबडले, चिडलेही. तिरमिरुन जाऊन फरहानला फोन लावला, तो त्याच्या व्हॉईसमेलला गेला. "... ताबडतोब फोन कर मला. महत्वाचं बोलायचय" इतकच म्हणून ठेवूनही दिला.
त्याच्याशी माझ्या तुटक वागण्याचं मला थोडं वाईट वाटलं... पण पुन्हा पुन्हा ..."माझी काहीही चूक नसताना काय म्हणून..." हा एकच काटा परत परत डोकं वर काढीत राहिला.
".....फरहान आला की सांगायचं त्याला... तुझं घरचं काय ते तू बघ... माझ्या डोक्याला फुकटचा त्रास नकोय. इथे परत असला तमाशा झालेला मी खपवून घेणार नाही... वाटलं काय तुम्हा लोकांना... सभ्यं लोकांचं घर आहे हे... एकदा ऐकून घेतलं... पुन्हा आली तर घरातही घेणार नाही... हाकलून लावेन बाहेरच्या बाहेर...
... मागासलेली संस्कृती म्हणे... चार सरळ वाक्यं सभ्यंपणे बोलता तरी येतात का स्वत:ला... ते बघ म्हणावं आधी. मी गेले नव्हते तुझ्या नवर्‍याचे पाय धरायला.... ’माझ्या क्लासला या’ म्हणून... तोच आला होता म्हणावं. आणि तुमचा प्रकार?... म्हणायचय काय हिला?... स्वत:चा संसार संभाळण्यासाठी दुसर्‍यांना धमक्या देताना लाज नाही वाटत... बांधून ठेव नवर्‍याला.. नाहीतर काय वाट्टेलते कर ना.... मला काय म्हणून त्यात ओढायचं..."

दुपारभर हेच चाललं होतं डोक्यात. भणभणून गेले अगदी. करकरीत संध्याकाळी खाली मान घालून फरहान आला. लाल झालेले, तरारलेले डोळे, तांबारलेला चेहरा... कोणत्याही क्षणी रडू कोसळेल अशी दुखावली नजर.
".... मै आपका गुनहगार हू, दीदी. मेरी वजहसे आपको क्या कुछ सुनना पडा... इसके बाद आपको मेरी वजहसे कोई तकलीफ नही होगी... कभीभी नही" हात जोडलेले, अजून उंबर्‍याच्या बाहेरच, डोळे मिटून प्रार्थना केल्यासारखं बोलत होता फरहान.
योजलेलं, मनात उद्वेगानं इतक्यांदा घोकलेलं.. काही काही तोंडातून बाहेर पडलं नाही. "...अब आपसे सिखना नही होगा, दीदी" असं म्हणून येणारा हुंदका आत जिरवत फरहान बोलण्याचा प्रयत्नं करीत होता, "... अबसे सीखनाही नही होगा... इस जिंदगी मे मेरा एकही गुरू रहा... कसमसे आजके बाद तबलेको हात नही लगाऊंगा..", असं म्हणून माझे पाय शिवायला वाकला.

माझ्या दारात हुंदकत उभ्या माझ्या ह्या उदंड शिष्याला कवेत घेण्याइतकं माझं गुरुपण मोठं नव्हतं बहुतेक. पण माझ्या पायाला हात लावून आपली शपथ पूर्णं करण्यापूर्वीच त्याला मी वरच्यावर थोपवला. त्याचा हात माझ्याच डोक्यावर ठेऊन त्याला म्हटलं, "... मेरे सरकी कसम अगर ऐसा कुछ किया तो. तेरा मौसिकी से प्यार किसीभी गुरु तक सिमित नही... इतना छोटा मत बना उसे... तेरी कला पे प्यार है तेरा. भक्ती बुतकी नही, उसमे बसी भगवानकी करते है, फरहान... तुम्हीने कहा था. जब सबका दिमाग थंडा हो जायेगा, तब फिरसे शुरू करेगा तू तबला... मेरे सर की कसम खाकर अभी बता दे तू... मुझसे नही तो किसी और से सीखेगा"
माझ्या डोक्यावर हात ठेवून निश्चल पण डबडबलेल्या नजरेनं मान हलवीत त्यानं हामी भरली.

फरहान सिडनीच सोडून गेला. माझ्या फोनना उत्तर नाही, कधी कार्यक्रमांतही दिसला नाही. आमच्या कॉमन ओळखीच्यातही तो फार तटकन निघून गेल्याचं... जवळ जवळ नाहिसा झाल्याचंच लोक बोलत राहिले.
माझा तबला त्याच्याकडे राहिला, त्याच्या आनंदाची बरणी माझ्याकडे. शनिवारी सकाळी आमचा नाश्ता वेळेत होऊ लागला पण त्यातली जान गेल्यासारखे गप्पं गप्पं झालो आम्ही. कोणत्याही कार्यक्रमाला नजर भिरीभिरी व्हायची. कुठुनतरी "दीदी..." म्हणून हाक मारेल, फरहान आणि आपल्या राजबिंड्या चालीनं माझ्या दिशेनं येईल असं खूपदा वाटायचं. स्वत:ला, आमच्या संगीताच्या दुनियेतून त्यानं अलगद पुसून टाकल्यासारखंच केलं... अगदी मागमूस न ठेवता अल्लाद निसटून गेला.

त्या आनंदाच्या बरणीत त्याचा ठेवा हा एकमेवं दुवा राहिला माझ्याकडे. बरणी तशीच ठेवावी तरी अपराधी वाटत होतं, अन चटकन उचलून देऊन टाकावं तर... हा फरहानचा आनंद... मी कसा देऊ कुणाला... असंही.
चारशे नऊ डॉलर्स!
मधे दोनेक वर्षं गेली आणि आमच्या एका मित्राचा फोन. एका छोट्याचं तबला वादन ऐकवतो, चल. सताठ वर्षाचं ते रुपडं अगदी तल्लीन होऊन भारतात कधीतरी शिकलेले मुखडे, तोडे मनापासून वाजवीत होतं. तो वाजवत होता तो तबला अगदी वाईट स्थितीत होता. नाद नसलेल्या त्या तबल्यावरही ह्या मुलाचं विलक्षण प्रेम दिसलं. वाजवून झाल्यावर तबला नीट उचलून ठेवला आणि मला लवून नमस्कार करून खेळायला पळूनही गेला. घरातली परिस्थितीही बेता-बाताचीच दिसत होती.
आई-वडिलांशी बोलले. अजून एक लहानगं पदरात असताना, मुलावर अशा परिस्थितीतही संगीताचे संस्कार करण्याची त्यांची धडपड अगदी स्पर्शून गेली मनाला.
"... इथे येताना, इतर सामानाबरोबर विकून टाकावा लागला ह्याचा तिथला तबला. किती रडला..." आई सांगत होती.
"... इथे एका भल्या माणसानं दिली ही जोडी... फरहान?... तुम्हाला माहीतच असेल", वडील म्हणाले आणि मी चमकले. पुढच्या बोलण्यात, तो तबला, पेटी दोन्ही ह्यांना देऊन कुठे निघून गेला, ह्यांनाही पत्ता नसल्याचं कळलं.
"... हा तबला कधीही विकणार नाही असं वचन मात्रं घेतलं त्यानं....", ह्यावर मी हसून तबला उचलला... बुडावर माझ्या नावाची आद्याक्षरं कोरलेली दिसली.

जवळच्या ATM मधून पैसे काढले आणि त्या वडिलांच्या हातावर ठेवले. ते घेईचनात. शेवटी त्यांना सगळं सांगितलं. "...ज्या यक्षानं त्यांना माझा तबला दिलाय, त्याचाच आनंद हा... इतके दिवस माझ्याकडे बरणीत कैदेत होता. आता त्या आनंदाला त्याचं घर मिळालं. हा तबला दुरुस्तं करायला, पुढे मुलाला शिकण्यासाठी पैसा लागणारच आहे..."
डोळ्यांतून पाणी काढीत, पुन्हा पुन्हा डोक्याला हात लावीत त्यांनी कसेतरी घेतले पैसे.
".... सच पूछो तो आपका तबला और आपकी बरनी मे इकठ्ठे पैसा... उसमे हमारा कुछ नही था... सब इस बच्चेका आनंद था... इतनी बरस हम सम्हाल रहे थे, दीदी... आज उसे अपना घर मिल गया..." असंच म्हणाला असता फरहान.
मधल्या काळात आम्ही एकमेकांना त्याचं व्याज वाटीत राहिलो.... आणि भरून पावलो.

समाप्त

गुलमोहर: 

.

सुंदर! अशी माणसं, अशी कलेची पूजा खरंच दुर्मिळ आहे आजच्या जगात. पण ज्याला जे हवं, त्याला ते मिळू न देणं हा नियतीचा आवडता खेळ आहे. फरहान जिथे असेल तिथे आनंद वाटत असेलंच. त्यालाही समाधान मिळत राहो !

खरंच.. डोळे भरुन आले....
तुझ्या शब्दांमध्ये प्रचंड ताकद आहे, दाद. खरं तर तेवढ्यासाठी मी ऑफीसमध्ये तुझं लेखन वाचणं टाळतो. प्रत्येक वेळी काय कारणे देणार सहकार्‍यांना भरून आलेल्या डोळ्यांसाठी !
माझ्या दुर्दैवाने इथे सगळे औरंगजेब भरलेत Sad

उत्तम!

एक गोष्ट प्रामाणिकपणे नमूद करतो, ह्या लेखात इतर लेखांच्या तुलनेत लालित्य कमी आणि वृत्तांत कथन जास्त असल्यासारखे वाटत राहिले.

चु. भू. द्या घ्या.

सुरेख व्यक्तिचित्र आणि ऋणानुबंधाचं चित्रण... !!

गुंतवून टाकलंत.

"बायकोला ह्याचं संगीत, तबला-बिबला जराही पसंत नाही..." हे असं का होतं या प्रश्नाचा भुंगा मात्र सुरू झाला.

दाद.. स्तब्ध व्ह्यायला झालं वाचताना... !!!!
तुझं ललित वाचलं कि (नेहमीच!) पाच दहा मिनिटं काही न बोलता, नुस्तं..बसून राहावसं वाटतं..

वा!
काय अप्रतिम लिहीले आहे.
शेवट दुखावणारा असला तरिही हा अनुभव आणि त्यावरचे लिखाण दोन्ही अतिशय सुंदर.

अप्रतिम लिहीलेय..
दाद.. स्तब्ध व्ह्यायला झालं वाचताना... !!!!
तुझं ललित वाचलं कि (नेहमीच!) पाच दहा मिनिटं काही न बोलता, नुस्तं..बसून राहावसं वाटतं..
अगदी अगदी. मलाही नेहमीच असा अनुभव येतो. अगदी प्रतिसाद पण सुचत नाही.

वाचताना गळा कधी रुद्ध झाला, डोळ्यांमधून कधी अश्रू ओघळले आणि मनातल्या मनात 'व्वाह!....' चा नाद उमटला ते कळलंच नाही!!

काय लिहु दाद....अगदी भरुन आलंय...शब्द नाहीत प्रतिक्रियेसाठी. तुला आणि तुझ्या लेखणीला त्रिवार वंदन.

हृदयस्पर्शी......... आतापर्यंत तू जी वेगवेगळी व्यक्तिचित्रे रेखाटलीस त्यातलं हे फारच वेगळ्या ढंगाचं.... एखाद्या अगदी जमलेल्या मैफिलितला एखादा तोडी किंवा भैरवमधला आर्त सूर कसा मैफिलीनंतरही काळजात रुतून बसतो तसं काहीसं खोलवर रुतणारं..... विराणीसारखं.....
फरहान सारख्या संगीतभक्ताची संगीतापासून अशी ताटातूट चटका लावून गेली.....

दाद, नेहमीप्रमाणे निशःब्द!

खुप दिवसांनी लिहीलसं! लिहीत रहा गं!

शलाकाजी खुप दिवसानंतर छान वाचायला मिळालं..तुमचं तबला वादन आणि लेखन अप्रतिम..मनापासुन दाद..

Pages