गझलेची कार्यशाळा - १ (दोनच भाग आहेत)

Submitted by बेफ़िकीर on 31 March, 2012 - 12:07

सौ. अनुकंचनीपवित्रा उधळकोरेसोरकर या नवतरुणीच्या नाजूक आवाजातील एक फोन मला आला तेव्हा मी चुकून 'कोण बोलताय भाऊ' असे विचारले आणि मी एक स्वतःच्याच धुंदीत असलेला यग्रकवी असल्याचे सिद्ध केले. यग्रकवी म्हणजे यमकांत व्यग्र असलेला कवी.

"सर मी 'प' बोलतीय"

'प' हे नांव असते याची मला कल्पना नव्हती. माझा सामाजिक व सांस्कृतीक विकासाबाबतच्या ज्ञानाचा विकास केव्हा खुंटला हे नक्की आठवत नाही.

"प? प म्हणजे?"

"मी मिसेस अनुकंचनीपवित्रा उधळकोरेसोरकर"

"म्हणजे किती जण आहात तुम्ही एकंदर?"

"सर मला लाडाने सगळे प म्हणतात"

"प?"

हे विचारताना माझे डोळे विस्फारले जाणे, फोन न धरलेला हात हवेत नवलाने उडणे व लाडाने सौ. यशःश्रीला मी 'य' म्हणायला लागलो तर काय होईल या विचाराने माझे हृदय तीव्र वेगाने धडधडणे या क्रिया एकदम घडल्या.

"सर, तुमच्या गझला वाचतो आम्ही. काय गझल करता सर. अक्षरशः शब्द अन शब्द परफेक्ट असतो"

"हॅहॅहॅहॅ.. नाही हो .. तसे काही नाही... "

"सर, आमच्या कुमुदिनी रणरागिणी बहुप्रसवा विधायक साहित्य मंडळातर्फे बोलतीय मी"

"बोला"

मला एकेक नांवे ऐकून एका शब्दातच बोलणे शक्य होत होते.

"सर.. तुमची एक कार्यशाळा ठेवायची आहे.. "

"कसली?"

"गझलेची.. तुमच्या परीसस्पर्शाने आमच्या भगिनींमधील सुप्त गझलकार जागृत होऊन मराठी गझलेला एक नवी सामाजिक परिमिती देईल याची आम्हाला खात्री आहे"

"काय सांगताय?"

"अगदी सर.. आणि मानधनही आहे"

"किती?"

"सर तुम्ही कसे येणार?"

"का?"

"त्यावर मानधन ठरणार आहे"

आजवर मी मानधनावर माझा कन्व्हेयन्स मोड ठरवायचो.

"मी? रिक्षा.."

"सर एवढ्या लांब रिक्षा येते?"

"कुठे राहता आपण?"

"औरंगाबाद"

प गहन होती.

मी व्यावसियाकाच्या भूमिकेत शिरलो.

" एअरपोर्ट नाहीये नाही का औरंगाबादला?"

"आहे की... पण कार्यशाळा आमच्या मंडळाच्या हॉलमध्ये आहे.."

"ओह... मग मी टॅक्सी करून येतो..."

"चालेल की सर... आम्ही तीनशे रुपये मानधन देणार आहोत... त्यात जे बसेल ते बघा..."

"तीनशे???"

"हो सर... आम्ही त्या संवादिनी भडकमकरांच्या मंडळाच्या दुप्पट मानधन देतो म्हणून तर गाजतो"

"बसचं तिकीटच एकशे वीस रुपये आहे..."

"चालेल ना मग सर... बसस्थानकावर आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ..."

"हो पण.. त्यातच दोनशे चाळीस गेल्यावर मी काय फक्त साठ रुपयांसाठी तिथे यावे?"

"सर.. मराठी गझलेला यातून बाहेर काढायचे असल्यास थोडे कष्ट पडणारच ना?"

"हे बघा प... मी एक विवाहीत पुरुष आहे.. कुठे गेलो आणि का गेलो हे मला घरी सांगावे लागते.. तेव्हा निदान पाचशे तरी द्या.. दोनशे रुपयांसाठी मी एक दिवसभर प्रवास करणे हे आमच्या घरी मान्य होऊ शकते... साठ रुपयांसाठी नाही मान्य व्हायचे..."

"त्यांनाही घेऊन या की?"

"त्या येत नाहीत.. त्या गझलेला तुच्छ मानतात..."

"काय ही दुरावस्था,,,"

"ते बघू.. पण मानधनाचं काय..."

"साडे तीनशे देईन सर... मागच्या वेळी आम्ही म भा चव्हाणांना बोलावले त्यांनी चारशे मागीतले होते..."

"त्यांचं वेगळंय... ते तिथेच असतील आदल्या दिवसापासून... म्हणून चारशेत समाधान मानले असेल त्यांनी"

" पावणे चारशे देते सर... खिशातून घालणारे मी.."

"तुम्हाला खिसा आहे?"

"ह्यांच्या खिशातून"

"हंहं.. बरं.. मग असं करा.. हजारची पावती करा... मी घरी सांगेन हजार मिळाले आणि बसमध्ये पाकीट गेले.."

"का सर? असं का? "

"अ‍ॅप्रूव्हलसाठी अशा रकमा आवश्यक असतात.."

" चालेल सर... हवं तर दहा हजाराची पावती करते.. "

"नको.. एवढं मोठं पाकीट गेलं तर मीही घरातून बाहेर काढला जाईन..."

"हा हा हा हा हा हा .. गझलकारांना विनोदही जमतात म्हणायचं..."

"त्याशिवाय गझल कशी जमेल?"

"सर... आमच्या भगिनींना ना? वृत्ताबित्तातलं सगळं कळत.... गझलतंत्रही बर्‍यापैकी समजतं... पण सफाई नाहीये.. "

"आणेन मी सफाई... "

माझ्यातील बाजीप्रभू उद्गारले.

"आणि ना सर... त्यांना गझलेबाबत थोडं ऐकायचं आहे आपल्याकडून.. "

"चिक्कार ऐकवेन"

"आणि आम्ही न सर.. ड्रेस कोड ठेवलाय..."

"काय ड्रेस कोड?"

"सर्वजणी पारंपारीक मुस्लिम पोषाख धारण करून बसणार आहेत.. मात्र बुरखा नाही..."

"छान.. मी काय घालू?"

"तुम्ही उत्सवमूर्ती आहात सर... तुम्हाला आम्ही काय सांगणार?"

"अरे अरे... असे म्हणून मला लाजवू नका..."

"सर... पण तुम्हाला बोलता येईल ना?"

"न यायला काय झालं?"

"तसे नाही... मागच्या वेळी एक जण आले होते व्याख्यानाला... त्यांना त्या विषयातले जेवढे कळत होते त्यापेक्षा आम्हा भगिनींनाच जास्त समजत होते... त्यांचे व्याख्यान पडले..."

"विषय काय होता?"

"नणंद व कौटुंबीक शोषण"

"त्याचा गझलेशी काय संबंध?"

"कुठे काय?"

"मग हे मला का सांगताय?"

"तुमची कार्यशाळा पडू नये म्हणून म्हणाले हो.... बाकी काही नाही..."

प उधळली होती.

ही प दिसते कशी याची उत्सुकता आता वाढू लागली.

शेवटी पत्ता वगैरे विचारून घेतला आणि फोन संपल्यावर बसून राहिलो.

=================================================
संध्याकाळी बायको घरी आल्यावर मान खाली घालून निराश बसून राहिलो. डोळ्यात विश्व हे शून्य असल्याचे भाव आणले होते.

"असा का बसलायस?"

"नको झालंय सगळं..."

"काय???"

"हेच... कविता...लेखन... गझला..."

"मला केव्हाचंच नको झालंय ते..."

"म्हणून तर वाटायला लागलंय मलाही तसं.... शेवटी सहजीवनाचा अर्थच नष्ट होऊ नये या साहित्यामुळे..."

"पण आज अचानक का असे वाटतेय???"

"ऐकत नाहीत गं... फोनवर फोन...... फोनवर फोन..."

"कोण???"

"प"

"प म्हणजे ????"

"कवी प..."

"कवी प??? "

"हो..."

"हे कोण???"

"अ‍ॅक्चुअली ते मराठवाडा ग्रामीण साहित्य मंडळाचे पुरोगामी अध्यक्ष आहेत... पण त्यांच्या कवितेतील आर्तता अमीर खुस्रोवर थुंकते..."

"का?"

थुंकणे या शब्दावरून तिला अमीर खुस्रो आणि प यांच्यात भांडणे झाली असावीत अशी शंका आली.. त्यामुळे अमीर खुस्रो बाराव्या शतकात होऊन गेला हे मी तिला सांगितलेच नाही...

"कारण त्यांच्या काव्यात भ स्वरुपी विकृत उद्विग्नता असून तिला केळीच्या गाभ्यासारखे आशयाचे अतिनील पापुद्रे आहेत..."

"पण... म्हणून थुंकायचं???"

"छे.. मीही तेच म्हणतो..."

"पण तुला काय झालंय???"

"सोडत नाहीत ग साले मला... एक गझल काय जमते मला... म्हणून इतकं छळायचं???"

"का? काय केलं त्यांनी..??"

मी जळजळीत नजर करून हातातले एक स्वतःचेच पुस्तक (आपटायला बरी पडतात माझी पुस्तके) दाणकन आपटत जहरी आवाजात म्हणालो...

"याच... याच... याच... याच म्हणतायत मला..."

बायको सी आय डी मधील दयासारखी बघू लागताच मी जगज्जेत्याच्या आविर्भावात टिचक्या वाजवत म्हणालो...

"मी सरळ विचारलं... मानधन किती... "

".... मग??"

"हजार म्हणाले ते.... हाच तर माझ्यासमोरचा प्रश्न आहे.."

"काय?"

"हजार रुपये घ्यायचे की सांसारीक सुख मिळवायचं? "

"हजार मिळणारेत?"

"एक हज्जार... एक दमडी कमी नाही... "

"पण ते थुंकणार बिंकणार नाहीत ना?"

"छे?? त्यांच्या बापाची हिम्मत आहे का?"

"मग??? जायचंय का तुला???"

मी देशासाठी फासावर जाणार्‍याचा चेहरा केला आणि म्हणालो...

"तुला योग्य वाटलं तरच... तरंच ही संधी मी घेणार... नाहीतर खड्ड्यात गेला तो प"

"जायचं असलं तर जा..."

"ठीक आहे... तुलाही मान्य होतंच आहे तर... इट्स ओक्के..."

त्या दिवशी मी टेबल पुसणे, वॉचमनला हाका मारून उरलेले अन्न देणे वगैरे कामे स्वतःहून केली.

'प' या व्यक्तीचे लिंग सांगितले नाही. काही वाद हल्ली नकोसे होतात.

=====================================================================

स्थानकावर पोचलो आणि इकडे तिकडे पाहिले. तेवढ्यात खांद्यावर एक जबरदस्त हात बसला आणि मी भीतीने शहारत मागे पाहिले. एक मध्यमवयीन पुरुष मला म्हणाला...

"चला... "

मी 'धुतल्यानंतर कपाळावर कुंकू लावून नेण्यात येत असलेल्या' बकर्‍याप्रमाणे त्या माणसामागून निघालो.

त्या माणसाचे चालणे मला एकाचवेळी कसायासारखे व प्रियांका चोप्राच्या पणजीसारखे वाटत होते. येथे पणजी या शब्दाचा अर्थ गाव न घेता नाते असा घ्यावा अशी विनंती

लवकरच समजले की हा माणूस 'प' आहे

मराठी गझलेची सद्यस्थिती अशी का हे समजायला मला विलंब लागला नाही

पुढे वाचा.................

(क्रमशः)

http://www.maayboli.com/node/33965 - गझलेची कार्यशाळा - २

गुलमोहर: 

भन्नाट कार्यशाळा.......:-)

सुरवातच अशी तर नेमकी कार्यशाळा कशी पार पडेल बुवा?

लवकर लिहा....:-)

(उत्सुक)
-सुप्रिया.

"सर मी 'प' बोलतीय"

"प? प म्हणजे?"

"मी मिसेस अनुकंचनीपवित्रा उधळकोरेसोरकर"

"म्हणजे किती जण आहात तुम्ही एकंदर?"

Rofl

पुढचं लौकर लिहा राव! Happy

त्यांच्या काव्यात भ स्वरुपी विकृत उद्विग्नता असून तिला केळीच्या गाभ्यासारखे आशयाचे अतिनील पापुद्रे आहेत..."
"एक स्वतःचेच पुस्तक (आपटायला बरी पडतात माझी पुस्तके) दाणकन आपटत...."
मी 'धुतल्यानंतर कपाळावर कुंकू लावून नेण्यात येत असलेल्या' बकर्‍याप्रमाणे त्या माणसामागून निघालो."

हे पंचेस अधिक आवडले.
मानधनाबाबतचे संवाद थोडे लांबले असं वाटलं.
पण एकूण कथेत त्याने बाध आला नाही.
पुढचा भाग वाचायला उत्सुक.