मिरवणुक

Submitted by निरंजन on 6 April, 2012 - 23:53

मला एका वृद्ध माणसानी गाडीत सांगितलेली कथा.....

आवाज जवळ यायला लागला तसा टिव्ही बंद करुन मी बाहेर आलोच. सुरवातीला तर फ़क्त "जय.....जय" असेच आवाज येत होते. नक्कीच कसली तरी मिरवणुक असणार. जशी ती मिरवणुक जवळ आली तस लक्षात आल की आमदार निवडुन आलेत व त्यांच्या विजयाची ही मिरवणुक आहे.

"आबासाहेब" ही फ़ार प्रभावी व्यक्ती. आज अनेक वर्ष हे निवडणुक लढवत आहेत. दर वेळेस निवडुन येतायत. दर निवडणुकीला आपल्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचुन लोकांना गुंगवुन टाकायच कसब यांना चांगल अवगत झालेल आहे. सुशिक्षित लोकांना अशा प्रकारे गुंडाळायच व अशिक्षितांना ताट वाट्या वाटुन, कधी त्यांच्या भागात कोंबड बकर मारुन त्यांना मेजवानी देऊन गुंडाळल जायच. तसे ते विकासाची कामही करत होतेच. पण हल्ली अशी कामं करुन थोडच कोणी निवडुन येत?

मधे काही दिवस त्यांचे एक सहकारी "तात्याराव" उपोषणाला बसलेले होते. त्यांनी सरकारी निधी मिळावुन दिला आणि आबासाहेबांनी त्या निधीतुन काही कामं केली. हे उपोषण बरेच दिवस चालू होत. यात तात्याराव खुप थकले होते. या गोष्टीला बरीच वर्ष झाली. लोकांच म्हणण की यात आबासाहेबांनी बरेच पैसे खाल्ले. पण लोकांना हे बोलायची सवयच असते. दोन्हीकडुन बोलतात. काम केल तरी बोलतात न केल तरी बोलतात. तेव्हा त्याचा विचार आबासाहेब व मतदार दोघेही करत नव्हतेच.

आबासाहेबांना निवडणुकांच तंत्र खुप चांगल अवगत झालेल होतं. त्यात आता ते वाकबगार झालेले होते. निवडणुकांच्या आधी काही दिवस ते एक सर्वे करत. कोण कोणते मतदार बाहेरगावी गेलेत ? किती जण आजरी आहेत ? किती जण फ़ार म्हातारे आहेत व किती जण मेलेत. आता या सर्वेचा नक्की कसा उपयोग केला जायचा हे माहिती नाही पण लोकांच म्हणण की याचा उपयोग करुन बोगस व्होटींग केल जात. लोकांच्या जीभेला हाड नसत काहीही अफ़वा पसरवतात. आबासाहेवांच्या कानावर अशा गोष्टी जात ते फ़क्त ओठाच्या कोपर्‍यातुन थोडेसे हसत. बस यापेक्षा जास्त प्रतिक्रिया नसायचीच.

मिरवणुक जवळ आल्यावर दिसल की मिरवणुकीच्या पुढे कार्यकर्ते नाचतायत. खुप जोषात नाचतायत. त्यांना आबासाहेब निवडुन आल्याचा खुप आनंद झालेला होता. मी सुद्धा या नाचणार्‍यांच्यात मिसळलो. मिरवणुक पुढेच चाललेली होती. आबासाहेब रथात बसलेले होते, स्वच्छ पांढरे कपडे त्यांनी घातलेले होते. त्यांच्या गळ्यात हार घातलेले होते. सौम्य हासत ते लोकांना नमस्कार करुन त्यांचे आभार मानत होते. भारदस्त व्यक्तिमत्व दिसत होतं. हे आमदार आपण निवडुन दिले हे बरं केल अस लोकांच्या चेहर्‍यावर दिसत होत. उगाच कोणातरी सोम्या गोम्याला निवडुन द्यायच आणि विभागात चाललेली कामं रखडायची. काही लोकं मात्र बोट मोडत होती. "आता झाल परत पांच वर्ष हा पैसे खाणार. कामाच्या नावानी शंख" लोकांच्या या व अशा बोलण्याची, टिका व निंदा करण्याची आबासाहेबांना आता सवयच झालेली होती.

मिरवणुक खुप मोठी होती. मिरवणुकीच पुढच टोक कुठच्या कुठे पुढे गेल होत. या रस्त्यावरुन त्या रस्त्यावर ते वळत होत. चौकाचौकात फ़टाके वाजत होते. धुरानी आसमंत भरुन जात होता. आवाजानी झाडांवरचे पक्षी व रस्त्यावरची कुत्री लांब पळुन जाऊन दडी मारुन बसलेली होती. लोकांना यातल काहीच करता येत नव्हत. त्यांना कानावर हात ठेऊन व धुरात कोंडल जाव लागत होत. काहीच इलाज नव्हता. विजय इतका महत्वाचा होता की काही त्रास तर होणारच होता.

पुढे चाललेली मिरवणुक एका नाक्यावर वळली आणि काहीतरी गडबड झाली. मी पुढे जाऊन पाहिल. एका झोपडीत एक माणूस मेलेला होता. अठराविश्व दारिद्र्य होतं. त्याची फ़ाटक्या कपड्यातली बायको रडत होती.

"अरे आजच मरायच होत का याला?" कोणीतरी बोलल. "आबासाहेबांना जाऊन सांग रे लगेच. ते येतील"

कोणीतरी धावत जाऊन आबासाहेबांना सांगितल. आणि तसाच धावत येऊन निरोप दिला.

"आबासाहेब येतायत, मिरवणुक पुढे न्या."

वाजंत्री वाजवणारे चौकात वळुन पुढच्या रस्त्याला लागले. मिरवणुक पुढे गेली. आबासाहेबांनी या रस्त्यावर एक कटाक्ष टाकला. त्यात फ़क्त तुच्छता होती.

ते रथातुन खाली उतरले. भराभर चालत त्या घरी आले. स्वातंत्र्य सैनिकाला एक फ़ुलांचा हार घातला. लगेच त्यांचे फ़ोटो काढल्या गेले. रस्त्यावरुन जाणार्‍या वाजंत्र्यांचा आवाज इतका जास्त होता की त्या स्वातंत्र्य सैनिकाची बायको रडत चिडत काय बोलते हे कोणालाच ऎकायला येत नव्हत. आबासाहेब थोड्यावेळ तीच्या जवळ बसले. फ़ोटो काढण सतत सुरुच होत. आबासाहेबांची निघायची वेळ झाली ते गेले.

मी झोपडीजवळच्या माणसांना विचारल
"मेलेला माणूस कोण आहे? "
"ते एक स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र संग्रामात त्यांची नोकरी गेली. या आबासाहेबांचे चांगले मित्र. त्यांच्यासाठी झटले. वेळॊवेळी उपोषणं केली. गेल्यावेळच उपोषण भारी पडल."

मी आत गेलो. मनोभावे नमस्कार केला. रंग गेलेल्या भिंतींवर गांधीजींचा फ़ोटो होता. आणि टेबलावर त्यांनी लिहिलेली अनेक पत्र पडलेली होती. अनेक लहान मोठ्या नेत्यांना त्यांनी मदतीसाठी लिहिलेल होत. खुप जणांची अश्वासनं आलेली होती. या आजारपणात मदत करा अस लिहिलेल एक पत्र दिसल. त्यात त्यांनी लिहिल होत की

" उपोषणामुळे तब्बेत खुपच खालावलेली आहे. हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट व्हाव लागणार आहे. माझ्याकडे पैसे नाहीत मदत करावी"

यावर आलेल अश्वासनाच पत्र त्याच पत्राला क्लिप करुन ठेवलेल होत. मी उचलुन त्याखालच नांव पाहिल. आताच जिंकलेल्या व मिरवणुक घेऊन पुढे गेलेल्या नेत्याचं, आबासाहेबांच ते पत्र होत.

मिरवणुक खुप पुढे निघुन गेलेली होती. आवाज लांब लांब येत होता.

"जय हो..... जय हो........"

गुलमोहर: 

मी सुरवातीलाच लिहिल आहे की एका वृद्ध माणसानी मला ही हकिगत गाडीमधे सांगितली. इतका पोटतीडकीनी सांगत होता की मला तरी ती खरीच वाटली.