मनातला चैत्रं...!!!

Submitted by स्मिता श्रीपाद on 4 April, 2012 - 14:06

उन्हाळा सुरु झाला...कडक उन्हं पडायला लागली..मोगर्‍याचे गजरे...कैरीची डाळं-पन्हं या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली की माझं मन १०-१२ वर्ष मागं धावतं...दरवर्षी एप्रिल मे च्या सुमारास मला माझी उन्हाळ्याची सुट्टी आठवते..माझं कर्‍हाड आठवतं..कृष्णाबाईचं देउळ आठवतं...आमचा लाडका घाट आठवतो..आणि सगळ्यात तीव्रतेने आठवतो,तो म्हणजे चैत्रातला कृष्णाबाईचा उत्सव...!!!

आमचं कर्‍हाड हे तसं छोटंसच गाव....(म्हणजे आता पुण्यात रहायला लागल्यापासुन मला कर्‍हाड छोटं वाटतं...:-) ) दोनचं मुख्य बाजारपेठा....आणि त्याच्या आजुबाजुला पसरलेली वसाहत....चावडी चौक ते दत्त चौक आणि चावडी चौक ते पांढरीचा मारुती ईतपतच आमचं विश्वं पसरलं होतं....आजकाल विकसित झालेला विद्यानगर हा भाग, त्यावेळी मुख्य भागापासुन फार फार दूर वाटायचा....कृष्णा नदीच्या पलिकडचे विद्यानगर म्हणजे कर्‍हाडच्या शेजारचं दुसरं गावच आहे की काय असं वाटायचं मला लहानपणी...सोमवार पेठ,कन्या शाळेचा परिसर,पंतांचा कोट..आणि सर्वात महत्वाचं म्हणजे "प्रितीसंगम" आणि कॄष्णाबाईचा घाट एवढचं माझं वर्तुळ होतं.

आमच्या घरापासुन अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर "प्रितीसंगम" होता.कॄष्णा आणि कोयना नदीचा सुरेख संगम प्रितीसंगम म्हणुन प्रसिद्ध आहे.या दोन्ही नद्या समोरासमोरुन येतात आणि एकमेकींना भेटतात...आणि मग या दोन मैत्रिणी एकमेकींच्या गळ्यात गळे घालुन,एकरुप होवुन,पुढच्या जगाला प्रसन्न,पवित्र करण्यासाठी,मैत्रिच्या संदेश सगळ्यांपर्यंत पोचवण्यासाठी पुढे जातात्..."कॄष्णा" असं एकचं नाव धारण करुन.....!
अथांग पसरलेलं नदीचं पात्रं... नदीशेजारचं विस्तिर्ण वाळवंट.. नदीकडे तोंड करुन उभं राहिलं की डावीकडे स्वर्गीय श्री.यशवंतरावजी चव्हाण यांची सुरेख बांधलेली संगमरवरी समाधी..आणि नगरपालिकेने फुलवलेली सुरेख बाग आहे.समाधीच्या आजुबाजुला छोटी छोटी रेखीव मंदीरे आहेत. ही सगळी मंदिरे १९६७ साली आलेल्या प्रचंड मोठ्या पुरातुन वर आली असं लोक सांगतात. उजवीकडे ग्रामदेवता कॄष्णाबाईचे मंदीर आहे..या देवळासमोरुन थेट नदीच्या वाळवंटापर्यंत उतरत जाणार्‍या घाटाच्या पायर्‍या आहेत. काळ्याभोर दगडातुन या विस्तीर्ण पायर्‍या बांधल्या आहेत....पायर्‍या जिथे संपतात तिथे मोठे दगडी बुरुज आहेत.. कृष्णाबाईच्या देवळाच्या आजुबाजुला गणपती,शंकर,कृष्ण अशी विविध मंदीरे आहेत.

माझ्या घरापासुन ते घाटापर्यंत संपूर्ण उताराचा रस्ता होता.ज्या दिवशी परीक्षा संपेल त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांच्या सायकली त्या उतारावरुन सुसाट सुटायच्या...ते थेट घाटावर . मग आम्ही सगळ्याजणी नदीपात्रात जायचो.नदीत मोठे मोठे दगड होते..खोल पाण्यात असलेला सगळ्यात मोठा दगड पकडण्यासाठी आमची शर्यत लागायची.दगडावर बसुन पाण्यात पाय सोडुन गप्पा चालायच्या...पाण्यातले छोटे छोटे मासे पायावरुन सुळकन फिरायचे...पायाला गुदगुल्या करायचे..पाण्यात हात घालुन मासा पकडायचा असफल प्रयत्न करायचो ...पण ते कुठले हातात यायला...आता आठवुन लिहितानाही पायाला गुदगुल्या होतायतं :-)..पाण्यात पाउल गोरेदिसते आणि पाण्याबाहेर काढलं की कमी गोरं दिसतं..असं का?..यावर चर्चा व्हायची.मग कोणाचे पाउल जास्त गोरं आहे यावर दंगा ... एकमेकींच्या अंगावर पाणी उडवायचा खेळ व्हायचा ...पाण्यात बुडणारे केशरी सूर्यबिंब पाहत अचानक सगळ्याजणी स्तब्ध व्हायच्या...आणि मग झुपकन कोणी अंगावर पाणी उडवायची...आणि परत दंगा सुरु...मग वरती बागेत येउन पळापळी,लंगडीपळती,आंधळी कोशींबीर असे खेळ व्हायचे.खळुन खेळुन दमलो की मग मोर्चा खाउकडे...भेळ,पाणीपुरी,पावभाजी ,बटाटेवडा..अशा पदार्थांचा फाडशा पडायचा.

आमच्या शि़क्षण संस्थेच्या दोन्ही शांळांची परीक्षा एकच दिवशी संपायची.त्यामुळे त्या दिवशी घाटावर सगळीकडे मुलामुलींची गर्दीच गर्दी दिसायची..अचानक अमच्या शाळेतल्या सगळ्या भिंती गायब झाल्या आहेत...बेंच काढुन टाकले आहेत आणि त्याऐवजी सगळीकडे हिरवळं पसरली आहे...शाळेच्या वरचे छतं अचानक उडुन गेले आहे...आणि खांबांची मोठमोठी झाडे झाली आहेत...असं काहीतरी वाटायला लागयचं...घाट म्हणजे जणु दुसरी शाळाच...:-)

गुढीपाडवा नेहेमी परिक्षेच्या काळात यायचा..त्यामुळे मग मस्त आम्रखंड खाउन झोपावं म्हटलं तर अभ्यासाचं भूत डोळ्यासमोर नाचायचं...पण रामनवमी होता होता परिक्षा संपलेली असायची आणि चैत्रोत्सवाची चाहुल लागायची...तिजे दिवशी गौरीचे देव्हार्‍यात आगमन व्हायचे..आता पुढचा एक महीना गौराबाई देव्हार्‍यात पेश्शल आसनावर विराजमान व्हायची..आई दारात चैत्रांगण काढायची...तिजे दिवशीच गौरीसाठी अंब्याची डाळं आणि पन्हे असा नैवेद्य व्हायचा...आणि मग कृष्णाबाईच्या उत्सवाची वाट पाहणं सुरु व्हायचं...

गौरीच्या पहिल्या तिजेपासुन ते थेट अक्षयतृतीये पर्यंत रोज कुठे ना कुठे हळदीकुंकु व्हायचं...आणि याच काळात हनुमान जयंतीपासुन पुढे चार दिवस घाटावर चैत्रातला कृष्णाबाईचा मोठा उत्सव व्हायचा. नदीच्या वाळवंटात मोठा मंडप उभा रहायचा.आणि बुरुजावरती एक मोठं स्टेज बनवलं जायचं.विविध कलाकार चार दिवस तिथे आपली कला रसिकांसमोर सादर करायचे.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीची पालखीतुन मिरवणुक निघायची.देवी वाजत गाजत मिरवत नगरप्रदक्षीणा करायची....रस्तोरस्ती तिच्या स्वागतासाठी मोठमोठ्या रांगोळ्या रेखलेल्या असायच्या... चौकाचौकात पालखी थांबायची.. सुवासिनी देवीला ओवाळायच्या...ओटी भरायच्या...आणि मग देवी आता चार दिवस देउळ सोडुन नदीच्या शेजारी,खर्‍या कृष्णेला भेटायला,तिची विचारपूस करायला ,वाळवंटातल्या मंडपात जायची आणि उत्सवाला सुरुवात व्हायची.मग रोज दिवसभर भजन,किर्तन,प्रवचन असा भरगच्च कार्यक्रम मंडपात व्हायचा...आणि संध्याकाळी उन्हं उतरली की मग स्टेज वर विविध कलाकार कार्यक्रम सादर करायचे.मराठी गीतांचा वाद्यवॄंद,कथाकथन,एकपात्री प्रयोग,नाटके असे विविध कार्यक्रम पहायला लोकांची झुंबड उडायची...
त्या चार दिवसांपैकी सगळ्यात महत्वाचा दिवास म्हणजे "सार्वजनिक हळदीकुंकु".सगळ्या सुवासिनी देवीची ओटी भरण्यासाठी,तिला पन्हे आणि डाळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी यायच्या...आणि मग मंडपात भेटलेल्या ईतर स्त्रीयांना पण हळदीकुंकु द्यायच्या.अशा वेळी समोरची बाई ओळखीची नसली तरी चालायचं ... एकमेकींशी ओळख करुन घेणे एवढा एकच उद्देश असावा कदाचितं...आणि मग बोलताबोलता कुठुनतरी ओळख निघायचीच...."अगं बाई...तुमच्या जाउ बाई म्हणजे माझ्या मावशीच्या नणंदेची सूनच की हो...."असे संदर्भ सापडायचे...:-)

शेवटच्या दिवशी मोठी यात्रा भरायची फुगे,खेळणीवाले,बत्तासे,चुरमुरे,गाठी ची दुकाने सजायची....जिकडेतिकडे पिपाण्यांचे आवाज घुमायचे...आजुबाजुच्या खेड्यातले शेतकरी लोकं आपल्या बायकापोरांसोबत तालुक्याला फेरी मारायचे..देवीचा आशीर्वाद घ्यायचे...

घाटावरला कार्यंक्रम संपला की आमच्या घरातल्या हळदीकुंकवाचा दिवस ठरायचा.त्या दिवशी दिवसभर आईची धावपळ चालायची...गौरीसाठी मोठ्ठी आरास बनवायला मी आणि माझी बहिण आईला मदत करायचो.आमची लहानपणीची खळणी,बाहुल्या,घरातल्या शोभेच्या वस्तु बाहेर निघायच्या..गौरीची बैठक सजायची....तिच्या समोर लाडु,चकल्या,शेव,शंकरपाळे असा फराळ मांडला जायचा.कलिंगडाचे झिगझॅग त्रिकोण कापत आई सुरेख कमळं करायची....मोगर्‍याचा घमघमाट सुटायचा...अत्तरदाणी,गुलाबदाणी,पातेलेभर डाळं,पन्हे अशी जय्यत तयारी केली जायची....मग आई मला छान चापुनचोपुन साडी नेसवुन द्यायची...
आलेल्या सगळ्या बायकांना हळदीकुंकु लावणे,अत्तर लावणे,गुलाबपाणी शिंपडणे,डाळ-पन्हं आणुन देणे ही सगळी कामं मी आणि माझी बहीण वाटुन घ्यायचो...आणि मग सगळ्यात शेवटी आई त्यांची भिजवलेले हरभरे आणि काकडीने ओटी भरायची....

चैत्र आला की या सगळ्या आठवणी येतात..परत एकदा लहान व्हावसं वाटतं...कर्‍हाडच्या त्याच घरी जावंसं वाटतं..आता माझं माहेर कर्‍हाड हुन पुण्यात आलं...अजुनही माझ्या माहेरी आणि सासरी आम्ही चैत्रातलं हळदीकुंकु उत्साहनं साजरं करतो...पण कृष्णाबाईच्या छत्राखाली,तिच्या साक्षीनं केलेल्या "त्या" हळदीकुंकवांची सर ईथे पुण्यात नाही... अजुनही या सगळ्या जुन्या आठवणी मनाला हुरहुर लावतात..
माझ्या मनातला चैत्र अजुनही तिथेच फुलतो....घाटावर...कृष्णेच्या काठी...!!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

टीपः

काही वर्षांपूर्वी मी एका चैत्रात असाच हा लेख लिहिला होता.अजुनही मी पुण्यात चैत्रागौरीचं हळदीकुंकु करते.
कालच यंदाचं हळदिकुंकु पार पडलं आणि या लेखाची आठवण आली.म्हणून आज इथे प्रकाशित करते आहे.
कालच्या गौराईचं रूप :

आसनावर विराजमान गौराबाई:
DSC06804_n2.jpg

गौरीची आरास :
DSC06807_n1.jpg

गुलमोहर: 

आवडलं.

शेवटल्या फोटोतलं बाहुलं फार गोड! टेडी बेअर, मिकि आणि मिनी माउस यांनाही गौरीच्या सजावटीत जागा मिळालीय. क्यूट!

छान लिहिलय.
कर्‍हाड माझ्या आजोळच्या वाटेवर लागायचे, पण कधी जाणे झाले नाही तिथे. वर्णन वाटून जावेसे
वाटतेय.

कर्‍हाड माझंही माहेर.......
तुमच्या या सुंदर लेखानं मनाला मागं नेलं.... जेंव्हा मी शाळेत होते त्या काळात.... Happy

गौरीच्या पहिल्या तिजेपासुन ते थेट अक्षयतृतीये पर्यंत रोज कुठे ना कुठे हळदीकुंकु व्हायचं...आणि याच काळात हनुमान जयंतीपासुन पुढे चार दिवस घाटावर चैत्रातला कृष्णाबाईचा मोठा उत्सव व्हायचा. नदीच्या वाळवंटात मोठा मंडप उभा रहायचा.आणि बुरुजावरती एक मोठं स्टेज बनवलं जायचं.विविध कलाकार चार दिवस तिथे आपली कला रसिकांसमोर सादर करायचे.>>>> कृष्णाबाईच्या घाटाच्या पायरयांवर बसून रात्री उशिरापर्यंत बघायचो आम्ही हे कार्यक्रम....

दरवर्षी कृष्णाबाई समितीच्या कवायती खेळांच्या फिरता करंडक स्पर्धा व्हायच्या नदीच्या वाळवंटात...
जी शाळा तो करंडक सलग तीन वर्षे जिंकेल तो करंडक त्यांच्याकडेच रहायचा....
आणि एकेवर्षी तो आमच्या शाळेनं जिंकला होता, समोर संथ वाहणारी कृष्णाबाई आणि करंडक हातात घेऊन जल्लोष करणारया आम्ही सगळ्याजणी......... असे अनेक क्षण कृष्णाकाठी कर्‍हाडला अनुभवता आले हे खरच माझं भाग्य.... Happy

आजही जेंव्हा कर्‍हाडला जाते, तेंव्हा हमखास एकतरी फेरी होतेच घाटावर.... त्या पायरयांवर बसून कृष्णाबाईकडे पाहणे हा माझा आवडता छंद आहे.... Happy

किती सुंदर लिहिलं आहे, खुप मजा आली वाचताना. नदी काठी हा वासंती मुजुमदार यांचा ललित लेख संग्रह वाचल्यापासून मी कऱ्हाडच्या प्रेमात आहे, आज त्यात आणखी भर पडली.
हळदी कुंकू आणि आई हे जोड शब्द च असायला हवेत. आईची आठवण , तिची परंपरा पुढे नेण्यासाठी हळदी कुंकू करता अजून ही म्हणून खुप छान वाटलं. जमेल तसं तिच्या सारखं करायचा प्रयत्न करता हे ही खुप छान, आपल्यालाच बरं वाटतं तसं केलं की. असो.
फोटो मात्र दिसत नाहीयेत .

सुंदर लेख..
नदीचं, घटाच वर्णनही किती छान केलंयत, तुमच्या गावाला भेट द्यावीशी वाटली.
फोटो नीट अपलोड नाही झालेत .

आहाहा अप्रतिम. सुरेख चित्रदर्शी वर्णन.

हेमाताई लेख वर आणल्याबद्दल धन्यवाद.

कऱ्हाड अमलताश पुस्तक आणि इंदिरा संत यांचे काही ललितलेख वाचल्याने ओळखीचं झालं.

कऱ्हाडच्या एका मैत्रिणीला शेअर केला हा लेख.

फोटो मात्र मला दिसत नाहीयेत.

ममो, छन्दिफन्दि, अन्जू प्रतिसादाबद्दल खुप धन्यवाद.
ते फोटो आता खाजगी जागेतुन निघुन गेल्यामुळे दिसत नाहियेत.
पण यावर्षीचे ताजे ताजे फोटो पोस्टते.
गौराई आणि आरास.
gaur1.jpg
माझ्या आजेसासुबाईंची जुनी गौर आहे.. ७०-८० वर्षे झाली असतील नक्कीच...
झोपाळ्यात बसलेली गौर, तिच्यासमोर नंदी, उजव्या हाताला नागोबा आणि डावीकडे गणपती कोरलाय. आता बरंच झिजल्यासारखं झालंय.
ही माझ्या पणजीची ( माझी पणजीच माझ्या आज्जेसासुबाई आहेत.. नात्यातलं लग्नं असल्याने आजोळ आणि सासर एकच Happy ) आहे.
माझी पणजी, आजी, आई सर्वांनी हाताळलेली पुजलेली ही गौर आता माझ्याकडे आली म्हणुन नेहेमी तिला बघताना मन भरुन येतं.
कालसुद्धा पुजा करताना या सगळ्यांची आठवण दाटुन आली. शांता शेळकेंच्या पैठणी कवितेची आठवण आली मला..त्या कवितेचं शेवटचं कडवं आहे...
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो
आज्जीला माझे कुशल सांगा

काल हळदिकुंकवाची धामधुम संपवुन, गौराईला हात जोडले तेव्हा माझ्या पणजी, आज्जी आणि आईकडे असाच निरोप पाठवायला तिला सांगितले आहे Happy

gaur2.jpg

हा लेख वाचून माझ्या कऱ्हाडच्या पुसटश्या आठवणी जागृत झाल्या. पहा त्या बरोबर आहेत कि काही सरमिसळ झाली आहे.
कृष्णामाईचे देऊळ, घाट, वाळवंट, संगम. मढ्या मारुती, पूर, पूल, पुलाच्या पलीकडचे देऊळ. भाऊ मुंबईला जायचा तेव्हा ह्या देवळाला प्रदक्षिणा घालायचा, कोट, कोटातून येणारी रान डुकरे, टिळक कॉलेज(?), हटकेश्वराचे मंदिर. स्वामींची बाग. चांभार आळी.गोशाला. मधेच येणारे हुप्पे.
ह्या गोष्टी आहेत तिथे अजून?
आणि हो हेळवाकचा धबधबा, गोटयाची वांगी, वसंत गड. तिथे पकडलेल्या वनगाई. ओगलेवाडी, कंदिलाच्या काचा...
मी पुणे ते चिपळूण अनेक त्रिपा केल्या पण ST भुइज वरून पाटण वरून कोयनानगरकडे जायची. कराडला टांग मारून. पुढे पुढे मग कराडला जावेसे नको वाटे कारण माझ्या आठवणीतले कराड तसेच राहावे. त्याला डिस्टर्ब नको करायला हीच इच्छा.

स्मिता श्रीपाद, आहाहा सुरेख पारंपारिक ठेव आहे ही गौर आणि पाळणा. छान सजावट, प्रसन्न वातावरण.

हृदयस्पर्शी लिहिलंय.

हा लेख वाचून माझ्या कऱ्हाडच्या पुसटश्या आठवणी जागृत झाल्या. पहा त्या बरोबर आहेत कि काही सरमिसळ झाली आहे.
कृष्णामाईचे देऊळ, घाट, वाळवंट, संगम. मढ्या मारुती, पूर, पूल, पुलाच्या पलीकडचे देऊळ. भाऊ मुंबईला जायचा तेव्हा ह्या देवळाला प्रदक्षिणा घालायचा, कोट, कोटातून येणारी रान डुकरे, टिळक कॉलेज(?), हटकेश्वराचे मंदिर. स्वामींची बाग. चांभार आळी.गोशाला. मधेच येणारे हुप्पे.
ह्या गोष्टी आहेत तिथे अजून? >>
@केशवकूल, कृष्णामाई, घाट, वाळवंट, संगम सगळं जिथल्या तिथे आहे.... पूर अजुनही येतो पण आता नवीन मोठा उंच पुल झाल्यामुळे पाणी पुलावरुन जात नाही इतकंच Happy मढ्याचा मारुती आता बहुतेक वेळा पाण्यातच असतो कारण अलिकडे बांधण्यात आलेलं धरण.
बाकी कोटातुन आता डुकरं गायब झालीत Happy ... टिळक हायस्कुल आहे पण त्याच्या जोडीला अजुन नवनवीन शाळा आल्यात बर्‍याच.... चांभार अळी ? तुम्हाला कुंभार आळी म्हणायचंय बहुतेक... नव्याचं वारं लागलंय कराडला.. पण जुनं आजुन जिथल्या तिथेच आहे.. अगदी बाँबे ची आंबोळी आणि त्यांचा इतिहासकालीन जिना सुद्धा...

स्मिता श्रीपाद
धन्यवाद. नदीचे पुलावरून जाणारे पाणी, त्यात उडया टाकणारे नौजवान. बोटींची शर्यत(?).ओके
पण ते हेळवाक आणि वसंतगड? तिथली जत्रा. हे माझ्या कल्पनेतले कि खरे?