गझलेची कार्यशाळा - २ (अंतिम भाग)

Submitted by बेफ़िकीर on 2 April, 2012 - 05:08

http://www.maayboli.com/node/33927 - गझलेची कार्यशाळा - १

=========================================

गुर्जर सभागृह.

येथे बोडण, डोहाळजेवण, बारसे व बारावा या विधींसाठी हॉल मिळेल.

अशी पाटी वाचून मी खाली पाहिले.

'चौकशी' असा शब्द लिहून एक बाण दाखवला होता. तो बाण जिकडे निर्देश करत होता तिकडे दोन गायी बसलेल्या होत्या.

हॉलवाल्यांनी माणसाचा संपूर्ण आयुष्यकाळ कव्हर केलेला दिसत होता. बारश्यापासून बाराव्यापर्यंत सर्व काही तिथे चालत होते.

"सर, या हॉलला लाडाने सगळे बोडोबाबा हॉल म्हणतात"

'प' ने माना वेळावत माहिती पुरवली. 'प' च्या आयुष्यात सर्व काही 'लाडाने' होत असावे.

"बोडोबाबा? का?"

"बोडण, डोहाळजेवण, बारसे आणि बारावा, म्हणून बोडोबाबा"

हे वाक्य बोलून 'प' ज्या शैलीत हासली त्या शैलीत आमच्या पुण्यातल्या कसब्यात एक वेडा रडतो हे मला आठवले.

हॉलमध्ये पुणेकरांना खजील वाटेल अशा पाट्या होत्या.

"पाणी पाहिजे तेवढेच घ्या" असे एका ठिकाणी लिहिले होते व तेथे असलेला एक अवाढव्य माठ फुटलेला होता. पाणी हवे तेवढे तरी कसे घ्यायचे हा एक प्रश्नच होता.

"सर... मला स्थानिक कुसुमाग्रझ पुरस्कार जाहीर झालाय गझलेसाठी"

कुसुमाग्रझ मधील शेवटचा 'झ' मला खटकला. पण ते स्थानिक कुसुमाग्रज असल्याने मी बोलून दाखवले नाही. पण त्रासदायक बाब ही होती की तो पुरस्कार 'प' ला गझलेसाठी मिळत होता. या अचंबीत करणार्‍या देहातून कोणत्या प्रकारची गझल निर्माण होत असेल असा विचार करत मी स्थानापन्न झालो.

"बालकवी पुरस्कार मी नाकारला"

"का?"

मला बालकवींबद्दल सहानुभुती वाटू लागली.

"माझं वय काय आता सर... बालकवी पुरस्कार कसा घेईन मी"

'प' चा मुरका हिंस्त्र होता.

"बाकीचे कुठे आहेत?"

"सहाची वेळ दिलीय..."

"मग? वाजले की आता साडे सहा... ??"

"आंटींचा क्लास संपला की सगळ्या येतील"

"कोण आंटी?"

"आंटी नाही माहीत?"

मी मलूल झालो. आंटी मला का माहीत असावी?

"त्या आम्हाला गझल शिकवतात"

"त्यांचं नाव काय पण?"

"सुलभाताई वाघ, भटसाहेब जेव्हा अमरावतीला होते तेव्हा त्यांच्या घरापासून केवळ सहा किलोमीटरवर राहायच्या त्या"

"मग?"

"अर्थातच, भटांचा परीसस्पर्श लाभलेला आहे त्यांच्या गझलेला"

"नुसते जवळ राहून?"

"अमरावतीच्या हवेत गझलियत आहे"

"गझलियत हा शब्द आपण जाणता वाटते?"

"म्हणजे काय? गझलियत या शब्दावर मी व्याख्यान देते"

मला इतक्या लांब का बोलावण्यात आले असावे हे मला समजत नव्हते. एक गझल शिकवत होत्या, एक गझलियतवर व्याख्याने देणार्‍या होत्या.

तेवढ्यात तीन अजस्त्र महिला प्रवेशल्या व मुरकत मुरकत 'प' ला टाळ्या देऊन माझ्याकडे संकोचाने बघत स्थानापन्न झाल्या.

"सर.. या कोकिळाताई... या भवानी कामत आणि ही आमची नंदा"

तिघींपैकी फक्त भवानी कामतला तिचे नांव शोभत होते. कोकिळाताईंचा आवाज काळी एकला टेकलेला होता. नंदा सहावा महिना लागूनही गझलेत रस दाखवत होती. या अवघडलेल्या अवस्थेत इतकी गझलभक्ती पाहिल्यावर मला गहिवरून आलं. ती पहिलटकरीण असावी. तिच्या चेहर्‍यावर लज्जेच्या लाटा त्सुनामीसारख्या येत होत्या. लाजल्यावर म्हातारीही सुंदर दिसते अशी एक म्हण अस्तित्वात आहे, पण नंदा लाजल्यावर बाकीचे कोणीही तिच्याहून सुंदर दिसेल अशी परिस्थिती होती.

"आणि भगिनींनो, हे महान गझलकार भूषण कटककर, यांच्याच गझला वाचून वाचून आपण आज गझलेच्या प्रांगणात आपली नाजूक पावले टाकून एक नवी आश्वासक गझलपिढी तयार करत आहोत"

"ताई... आंटी आल्यावर करा ना भाषण.. म्हणजे मग दोनदा नाही व्हायचं..." ........ कोकिळाताई

'तुमचं भाषण बंद करा' ही विनंती इतक्या सडेतोडपणे केली जाण्याचा प्रकार मी दुसर्‍यांदाच पाहिला.

'तुझं लेखन बास आता... जरा लक्ष दे घरात' असे यशःश्री अनेकदा म्हणत असल्याने ते पहिल्यांदा होते, हे दुसर्‍यांदा!

"सर कसा झाला प्रवास?"

भवानी कामतांचा हा प्रश्न मला 'का केलात प्रवास' असा ऐकू आला. याचे कारण त्यांचे आविर्भाव तसे होते.

"कार्यशाळा आहे ना आज? "

मी भलतेच उत्तर दिल्याने एक मिनिट अभद्र शांतता पसरली.

"सर तुम्ही गझल कधीपासून लिहिता?"

"झाली की आता तीन चार वर्षे..."

"आयुष्य गेलं तरी गझल हातात पकडता येत नाही ना सर?"

"खरंय.. "

"आल्या आंटी"

मी मान वळवून पाहिले तर एक चार पाच वर्षाचा मुलगा तुफान वेगाने धावत भवानी कामतांपाशी आला आणि त्यांच्याकडे बघत जोरात थुंकला. औरंगाबादमध्ये भावना व्यक्त करताना माणसे इतकी प्रामाणिक कशी असू शकतात हे मला समजत नव्हते. भवानी कामतांनी हसून आपल्या पातळावरचा तो द्राव झटकत त्या मुलाला 'ये गं माझी छबडी कुचुकली , आजी कुठाय रे महेंद्र?"

बालकाचे नांव छबडी व कुचुकली यापैकी काही नसून महेंद्र आहे हे मला समजले. मागून त्याची आजी येताच सगळ्या उठून उभ्या राहिल्या. मलाही उभे राहावे लागले. आजींनी मला सस्मित नजरेने अभिवादन करताच 'प' यांनी सांगितले की हे महान गझलकार भूषण कटककर आहेत. आजी याच आंटी आहेत हे कळल्यावर मला एकंदर जमावावर महेंद्र या छबडी कुचुकलीने केलेलेच कृत्य करावेसे वाटू लागले.

"यांचं तसं गझलेचं झालंय सगळं.. पण म्हंटलं एक त्रयस्थ दृष्टिकोन असलेलाही बरा असतो..."

आंटींनी मंडळातील सर्व भगिनींना गझल पूर्णपणे शिकवलेली असल्याचे सांगून माझ्या येण्यातील हेतूला विनाशक सुरुंग लावला. मी मान डोलावली व कसासा हासलो.

'प' सुरू झाल्या.

"मी 'प'! तुम्ही सगळे जाणताच की मी कवयित्री 'प' असून विविध पुरस्कारांनी माझे काव्य भूषवले गेलेले आहे. कुसुमाग्रझ स्थानिक पुरस्काराआधी मला डोणजे आळीचा साहित्य अकादमी पुर.."

"ताई... आंटींचेही सांगा हां?"

अवघडलेली नंदा म्हणाली.

तिचे आंटींवर जास्त प्रेम होते म्हणून तिने प ला गप्प केले की प वर राग होता म्हणून या तपशीलात मी घुसलो नाही.

प बिथरली असावी. कारण स्वतःला आणि आंटींना वगळून ती एकदम माझ्यावर घसरली.

"व्यवसायाने इंजिनीअर असले तरी एक संवेदनशील मन जपून आपल्या हळुवार तरल गझलांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील रसिकांना तृप्त करणारे श्री भूषण कटककर हे नव्या पिढीचे दमदार व आश्वासक गझलकार आज आपल्या मंडळात आलेले आहेत. आज ते आपल्याला गझल म्हणजे काय हे सांगणार आहेत..."

"गझल म्हणजे काय असं नाही... एक त्रयस्थ दृष्टिकोन मांडणार आहेत..." ... आंटींनी मत्सरापोटी बदल सुचवला.

"तर भूषण कटककरांना सर्वांनी आपला परिचय दिलेलाच आहे.."

"परिचय झाला का?"... आंटींनी कोकिळाबाईंना कुजबुजत विचारले. कोकिळाबाईंनी अनाकलनीयपणे मान हालवून परिचय झाला की नाही झाला की अर्धवट राहिला यातील काहीही कळणार नाही याची काळजी घेतली व राजकीय वादांपासून स्वतःला दूर ठेवण्यात यशस्वी झाल्या. आपला परिचयच कटककरांना देता आला नाही तर उपयोग काय या गहिर्‍या दु:खात आंटी गंभीर झाल्या.

"तर भूषण कटककरांना मी आपल्या मंडळातर्फे विनंती करते की त्यांनी आता स्वतःचा परिचय द्यावा"

"यांची ओळख झालीच आहे की?" ... भवानी कामतांनी हासत हासत मला परिचय न देण्याच्या लायकीचा ठरवले.

"हो पण त्यांना दोन शब्द बोलू देत की???" ...'प' अजून तरी माझ्या बाजूच्या वाटत होत्या...

"मी काय म्हणते.. सरळ सुरुवातच करा ना? ... अजून विणकामाचा वर्गय माझा..."

आंटींनी 'हे मधलं काय गझलबिझल आहे ते पटकन एकदा उरकून घ्या म्हणजे मला माझ्या विणकामाला जाता येईल' असे बिनदिक्कत सांगितले.

मला यांचे हे एक आवडत होते. काय असेल ते तोंडावर.

"बरं चला मीच सुरुवात करतो"

मी एकदम म्हणालो आणि मीच उत्सवमूर्ती असल्याने सगळे एकदम सावरून माझ्याकडे बघू लागले. फक्त तो छबडी कुचुकली माझ्याकडे मारकेपणाने पाहत होता ही एकच अडचण होती. हे पात्र आपल्या बाजूचे असावे म्हणून मी खिशातून एक मॅन्गोची गोळी, जी मला सुट्टे नसल्याने एका चहावाल्याने दिलेली होती ती त्याला देऊन टाकली. आंटींच्या चेहर्‍यावर किंचित समाधानाची रेषा दिसतीय तोवरच छबडी कुचुकलीने ती गोळी लाथेने उडवली. थोड्या वेळाने हा आपल्यालाही असाच उडवेल काय असे मला वाटू लागले.

"खरे तर तुम्ही सगळ्याजणी आधीपासूनच गझल रचता. वृत्त म्हणा किंवा गझलतंत्र म्हणा, दोन्हीचा सराव आंटींनी तुमच्याकडून करून घेतलेलाच आहे. "

आंटींच्या चेहर्‍यावर 'गझलतंत्र ही किरकोळ बाब आहे, त्यात काय माझा मोठेपणा' असा एक भाव आला.

"गझल हे असे काव्य आहे ज्यात माणसाला गझलकाराच्या जाणिवा आणि अनुभुती आपल्याही जाणिवा आणि अनुभुतींशी संलग्न असल्याची जाणीव होते. दोनच ओळीत एक कथा विकसीत करून तिचा प्रभावी समारोप करणे हे खरे तर आव्हानात्मक आहे. पण आपण सगळ्या ते आधीच करत आहात हे पाहून मराठी गझलेची धुरा अशा नवनवीन व कर्तबगार कवीकवयित्रींच्या खांद्यावर आहे याचे समाधान वाटते"

भटसंप्रदायातील कोणी तिथे असता तर त्याने मला खुर्ची डोक्यात घालून बेशुद्ध केले असते. पण पावणे चारशे रुपयांच्या बदल्यात पावणे चार लाखाचे ज्ञान द्यायचे ही माझी वृत्ती!

"आज आपण बघणार आहोत तो मात्र वेगळाच भाग आहे गझलेतील..."

आंटींपेक्षा मी खूप काहीतरी नवीन सांगणार आहे असा गौप्यस्फोट करून सभागृहात चलबिचल माजवली. आंटी क्षणार्धात अतीगंभीर झाल्या व आता जे ऐकायला मिळेल ते कसे चुकीचे आहे हे कसे सांगायचे यावर ताबडतोब विचार करू लागल्या. 'मी इथे असताना या पुण्याच्या पोराला कशाला बोलवून साडे तीनशे द्यायला हवेत' यावर त्यांचा 'प'शी भीषण वाद झालेला असणार हे मला जाणवले.

आंटी लगेच ताठ चेहर्‍याने माझ्याकडे एकटक पाहू लागल्या.

"आज आपण जरा वेगळाच प्रकार करूयात.. मी काही बोलण्यापेक्षा आजु तुम्ही सगळ्यांनी आपापली एकेक गझल वाचयाची आणि त्यावर मी बोलणार... "

हुरूप येणे म्हणजे काय याचे प्रत्यंतर मला आले. प्रत्येकीने पर्समधून एकेक जुनाट विटलेली डायरी काढली व तडफदार भाषण द्यायचे असल्याच्या आवेशात माझ्याकडे पाहू लागल्या. आंटींनी नंदाला सुचवले..

"तू ती सूर्य हा बिनडोक प्राणी वाटतो ती वाच गं..."

दिड माणूस असलेल्या नंदाने मुरकत मान हालवली व ते पाहून 'प'चा किंचित तीळपापड झाल्याचे माझ्या लक्षात आले.

सूर्याला बिनडोक प्राणी म्हणण्यापर्यंत मराठवाड्यातील गझलेचा प्रवास झालेला पाहून मी मुळापासून हादरलेलो होतो.

"सर.. माझी घेऊ? "

कोकिळाबेन खर्जातल्या आवाजात म्हणाल्या...

"अवश्य... असे येऊ... क्लॉकवाईज..."

मला क्लॉकवाईज आणि अ‍ॅन्टीक्लॉकवाईजने काहीही फरक पडत नसतानाही मी एक शब्द उगीचच फेकला.

"आ...........हं.,......... आ..... ए... हे....."....... कोकिळाबेन तरन्नुममध्ये सादर करतील हे मला आधीच जाणवायला हवे होते.

"थांबा... न गाता सादर करा... "

विमानतळावर विमानाचे तिकीट असतानाही नुसतेच लांबून विमान पाहून बाहेर घालवल्यावर होईल तसा चेहरा झाला कोकिळेचा.

"ठीक्के... अशीच सादर करते.... माझ्या गझलेचा विषय आहे... आजचे नेते , पिढी आणि संस्कृती व पाऊस.."

"गझलेला विषय नसतो..."............ मी फाशीच्या कैद्याच्या स्वरात पुटपुटत म्हणालो...

"असतो ना हो आंटी?"

कोकिळेने आंटींची साक्ष काढायचा प्रयत्न केला. पहिलेच कोलीत इतक्या झटपट हातात येईल याची शून्य कल्पना असलेल्या आंटी कबूतर फडफडते तशा फडफडत ताठ बसत म्हणाल्या...

"गझलेबाबत असलेल्या अनेक गैरसमजुतींबाबत मी आपल्याशी नंतर बोलेनच... तोवर गझल ऐकूयात का?"

"कसली गैरसमजूत? गझलेला विषय नसतोच... किमान पाच स्वतंत्र गझलतंत्रातील कविता म्हणजे गझल"

"ते भटांचं झालं..."

"मग? तुमचं काय म्हणणं आहे??"

"मल भट पटत नाहीत... "

"का?"

"भटांना गझल समजली नाही"

"भटांना ?"

"हो.. त्यांची गझल अतार्किकतेकडून सामाजिकतेकडे झुकताना अलवारतेचा तोल सावरू शकत नाही"

"कसला?"

"अलवारता... "

"का?"

"आता नाही सावरू शकत... एकेकाचा प्रॉब्लेम..."

"नाही हो? असं काहीच नाहीये.. "

मी बेडकासारखे डोळे करून सर्वांकडे पाहात आंटींना म्हणालो..

"असो... कोक... तू वाच गझल... "

कोकिळेचे शॉर्ट नेम कोक आहे हे मला समजल.

"वाचते हं... सर ऐका हं... मतला... "

"ईर्शाद..."

"कडुनिंबाच्या पानांवरती झुरळ आमचे झुले"

"कडुनिंबाच्या ???"

"पानांवरती...... पानांवरती झुरळ आमचे झुले..."

"झुरळ?"

:हो.. झुरळ आमचे झुले... "

"हंहं ?? "

"गझल ऐकवे खिडकीमधुनी अलंकारिता घुले"

"काय?"

"गझल ऐकवे खिडकीमधुनी अलंकारिता घुले.. "

"कोण अलंकारिता घुले?"

"इश्श नांव आहे माझं.. "

"मग कोकिळा कोण?"

"स्थानिक गानसम्राज्ञी पुरस्कारप्राप्तीनंतर मला कोकिळा म्हणू लागलाय मराठवाडा"

चार घरे सोडून हिचे नांव कोणाला माहीत नसेल अन मराठवाडा ओळखतोय होय हिला असा विचार माझ्या मनात आला.....

"हो पण... तखल्लुस तुम्ही मतल्यातच घेतलेत"

"चालते की... खावरांनी तर रदीफच खावर घेतलीय एका गझलेत" - आंटी फिस्कारल्या

"नाही नाही... चालत नाही कुठे म्हणतोय मी? पण या मतल्यात झुरळाचा काय संबंध आहे?"

"मग तीन मात्रांचा असा प्राणी सांगा जो कडुनिंबावर झुलेल?" ... कोकिळा आवेशात आली..

"अहो पण.. झुलायलाच कशाला हवं?"

"मग मी काय नाव बदलू? घुलेला यमक काय?"

"का? फुले घ्या की?"

"फुले मक्त्यात घेतलीयत ना?"

"हो पण एक काफिया दोन वेळा आला तर चालतो की?"

"हो पण त्यात आशयदारिद्र्यासहीतच तंत्रओशाळेपणाही दिसतो ना?"

तंत्रओशाळेपणा हा शब्द आंटींचा असावा याबद्दल मला खात्री होती.

"एक मिनिट, म्हणजे केवळ यमकासाठी झुरळं आलीयत... "

"नव्हेच.. यमकासाठी झुले हा शब्द आलाय... झुले साठी झुरळं आलीयत.. झुरळ आणि झुले या शब्दांमधील झु या अक्षराने अंतर्यमक निर्माण करून ध्वनीमाधुर्य प्रस्थापित केलंय.. "

"हो पण चिमणी झुले म्हणा की? "

"चिमणी म्हणजे ललगा होतं... झुरळ म्हणजे ललल... "

कोकिळा हे मला सांगत होती.

"ते मला माहीत आहे... पण झुरळ आपले ऐवजी चिमणी अमुची म्हणा की?"

"ई .. मग तसं काय... कोणताही प्राणी चालेल.. हत्ती अमुचा झुले, पाल आमची झुले... गेंडा अमुचा झुले.."

"अहो कडुनिंबावर कोण कोण झुलू शकेल त्यातील त्यातल्यात्यात काव्यमय प्राणी निवडा की?"

"खार चालेल का?"

"खारीला चालेल का तुमच्या गझलेत स्थान हे बघायला हवं..."

"म्हणजे?"

"पुढचा शेर?"

"इकडे असताना आठवती कष्ट फक्त आम्हाला, माहेरी गेल्यावर स्मरते देवांगी चिरमुले"

"कोण देवांगी चिरमुले?"

"माझी जुनी मैत्रीण, पहिलीपासून एकत्र होतो आम्ही..."

"मग?"

"मग काय? तिची आठवण होते माहेरी गेल्यावर मला.."

"का?"

"कारण सासरी असताना होत नाही.."

"का?"

"कारण ती ह्यांची धाकटी बहिण आहे... आता तिला मी वन्स म्हणूनच हाक मारू शकते.."

"म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की प्रत्यक्ष देवांगी चिरमुले घरात असताना त्या तुम्हाला स्मरत नाहीत, पण तुम्ही माहेरी गेल्यावर तुम्हाला तुमच्याच वन्स एक जुनी मैत्रीण म्हणून आठवू लागतात"

"देवांगी घरात नसते काही... नाहीतर तिचंही आडनांव घुले नसतं का?"

"तुम्ही मतल्यात चिरमुले आणि घुले घेतलंत तर काय होईल?"

"मग झुरळ कुठे झुलणार?"

"नाही नाही... झुरळाचा संबंधच नाही असं समजा एक क्षण... "

"नाही नाही.. तसं कसं?... झुरळ लागणारच ना कडुनिंब म्हंटल्यावर?"

"अहो कोकिळाबाई, कडुनिंबच नाही घ्यायचा.. देवांगी घ्यायची पहिल्या ओळीत... "

"गझल माझी... आणि नणंद पहिल्या ओळीत होय? कदापीही शक्य नाही ते.."

गझलेला कौटुंबीक कंगोरे असतात हे मला आजच समजले.

"पुढचा शेर??"

आता मुले हा काफिया येणार याबाबत मला खात्री होती.

"मामंजींच्या मित्राचे तर नांव मुळी आठवेना"

"काय?"

"मामंजींच्या मित्राचे तर नांव मुळी आठवेना..."

"मामंजींच्या मित्राचे??"

"हो..."

"आठवेना मधे एक मात्रा जास्त झालीय... अठवेना करा..."

कोकिळा घुल्यांनी वहीत काहीतरी टिपून घेतले तशा आंटी त्वेषाने बोटांवर मात्रा मोजू लागल्या.

"केलं सर..."

"पुढे?"

"हं.. तर.. मामंजींच्या मित्राचे तर नांव मुळी अठवेना.. हे म्हणले अभ्यंकर होते मी म्हणले चौगुले"

"सुंदर"

माझ्या मुखातून याहून असहाय्य दाद निघू शकत नव्हती. कोकिळेपुढे माझा चिमुकला चिमणा व्हायची वेळ आली होती.

आता तरी मुले हा काफिया येतोय की नाही याची वाट पाहात मी म्हणालो..

"ऐकवा ना पुढचा..."

"लग्नानंतर अनेक वर्षे काही झाले नाही"

फुसफुस ऐकू आली हासण्याची. सर्वांकडे चोरटेपणाने पाहून मी कोकिळेला म्हणालो

"वा"

"लग्नानंतर अनेक वर्षे काही झाले नाही"

"हंहं?"

"नवमासाचे पोट घेउनी नंदा आता डुले"

नंदाने लाजण्याची परमावधी केली. बाकीच्या हासल्या. मला काय करावे समजेना.

"अभिनंदन हां नंदाताई"

मी एक आपलं वाक्य फेकलं. नंदाने परमावधीचे रेकॉर्ड मोडले.

झुले, घुले, चिरमुले , चौगुले आणि डुले हे काफिये पार पडलेले होते. त्यातील तीन तर आडनांवेच होती.

आता तरी मुले हा काफिया येणार म्हणून मी शांत बसलो. त्या शेराला खूप दाद द्यायची असे मी ठरवून ठेवलेले होते.

"सर ऐका हं.... जिल्ह्याजिल्ह्यातून आवया उठल्या प्रतिशोधाच्या"

प्रथमच गझलेला शोभणारा एक मिसरा ऐकू आल्यान मी कान टवकारून पाहिले.

"कोकणातुनी जेव्हा आले मुख्यमंत्री अंतुले"

"ओहो ओहो... वा वा... फक्त त्री दीर्घ असेल तो र्‍हस्व करा .. त्रि... असा"

"का?"

"मात्रा मात्रा"

आंटी पुन्हा बोटांशी खेळू लागल्या. त्यांचा छबडी कुचुकली आता कोकिळाबेनसमोर उभा राहून वाकुल्या दाखवल्याप्रमाणे 'वा वा' असे म्हणू लागला. 'प' यांनी त्याला बाजूला ओढलेले आंटींनी पाहिले व आंटींच्या कपाळावर एक आठी उमलली.

चार आडनावे कव्हर झाली होती. मी कहर झाल्यासारखा बघत होतो. खिशातून पावणे चारशे घ्या पण मला कार्यशाळेला बोलावू नका असे म्हणावेसे वाटत होते.

"सर मक्ता हं?"

"ईर्शाद ईर्शाद"

माझी अवस्था आता 'काहीही ऐकवा पण लवकर संपवा' अशी झाली होती. मक्त्यात फुले हा काफिया आहे हे माहीत असल्यामुळे 'मुले' या काफियाबदल मला पराकोटीची सहानुभुती वाटू लागली. बिचार्‍याला नाही तर नाहीच स्थान मिळाले गझलेत.

"अलंकारिता घुले पोचली फुलापरी सासरी"

"यात फुलापरी हे विशेषण सासरला आहे की अलंकारिता घुलेला?"

"ईश्श... आता काही मी फुलापरी नाही हो दिसत.. तेव्हाचं सांगतीय... "

तेव्हाही कसल्या दिसाल असे शब्द मी टाळले.

" पण विशेषण माझ्याच नावाचं आहे सर..."

"तेच म्हंटलं मी... सासर फुलासारखं म्हणजे जरा अतीच होईल..."

असे म्हणून मीही हासल्यामुळे मंडळही हासले.

"तर अलंकारिता घुले पोचली फुलापरी सासरी"

"हंहं?"

"सासरच्यांच्या निर्माल्याची करत राहिली फुले"

"व्वा"

"धन्यवाद सर.."

बोडोबाबा मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला तसा छबडी कुचुकली माझ्यासमोर आला आणि ओरडला

"व्वा व्वा.... व्वा व्वा ... व्वा व्वा..."

मी क्षमाशील हासल्यावर सगळे हासले व 'व्वा व्वा ' करत छबडी कुचूकली बोडोबाबाभर फिरला.

इकडे नंदा सावरून काव्यमय नजरेने आपल्याच वहीकडे पाहू लागली.

"सर... ईर्शाद म्हणा ना.. "

"ईर्शाद ईर्शाद."

नंदाला ईर्शादचा अर्थ परवानगी असा वाटत असावा.

"आधी एक शेर ऐकवते सर सुट्टा"

"अवश्य"

"चिमुकली चिमुकली चिमुकली चिमुकली"

मी थिजलो. भुजंगप्रयातवर आजवर असा बलात्कार झालेला नसेल.

"वा वा.. चिमुकली चिमुकली चिमुकली चिमुकली...छान"

"चिमुकला चिमुकला चिमुकला चिमुकला"

"छाने... "

"थॅन्क यू सर...आता गझल ऐकवते.."

"हिला जुळं हवंय सर...एक मुलगा आणि एक मुलगी..." भवानी कामतांनी आदेश द्यावा तशी माहिती पुरवली.

मी गायनॅक शिकलो नाही ते बरं झालं. छबडी कुचुकलीने नंदाच्या पोटावर बिनदिक्कत हात फिरवत आंटींना विचारले.

"इथे बाळ आहे????"

त्याला ओढून जागेवर बसवण्यात आले. त्याने केलेले कृत्य कधी मिस्टर नंदांनीही केले नसेल. माझी अवस्था 'जे जे होईल ते ते पाहावे' या पलीकडे पोचलेली होती.

सर्वसाधारणतः तरुण स्त्री लाजली की तिचे गाल लालसर होतात असा माझा आजवरचा अनुभव होता. नंदा लाजून काळी ठिक्कर पडत होती.

"सूर्य हा बिनडोक प्राणी वाटतो"

नंदा मतल्यातच सूर्यावर संतापलेली दिसली.

"वा... सूर्य हा बिनडोक प्राणी वाटतो"

"मंजूघोषाय सर.."

"मालीबालाय... मंजूघोषाला आणखी एक गा असतो शेव॑टी"

नंदाला धक्काच बसला. ती आंटींकडे पाहू लागली. आंटी माझ्याकडे. मी घाबरून पुटपुटलो.

"काय झालं??"

"हे मंजूघोषा नाहीये??"

" छ्छे??"

"मग??"

"मालीबाला आहे..."

"हांहां..."

आंटी एकदम निपचीत कशा काय झाल्या काही समजेना. तेवढ्यात त्या उद्गारल्याच..

"मी म्हंटलं नव्हतं तुला?? शिंद्यांचं चुकलं आहे हे?"

नंदाने होकारार्थी मान हालवल्यावर मी विचारल.

"कोण शिंदे?"

"छंदोरचनाची समीक्षा करणारे"

आंटींची झेप अफाट होती.

"ऐकवा ना?" .... मी भयाने बोलतात तसा म्हणालो...

"सूर्य हा बिनडोक प्राणी वाटतो"

"हं..."

"चंद्र दारूडा लमाणी वाटतो"

आपल्यातल्या एका बोकडाला कसायाने आत नेल्यावर दुसर्‍या बोकडाचा होतो तसा माझा चेहरा झाला.

"काय झालं सर?"

"नावीन्यपूर्ण खयाल आहे"

"हो सर... मला सगळेच असे म्हणतात"

"पुढे?"

"शेर नेत्रातून माझा वाहतो, पावसाआधीच पाणी वाटतो"

मी कार्यशाळा घेण्यासाठी जावे असे मला वाटावे असा हा पहिला किमान शेर होता.

मी दिलखुलास दाद दिल्यावर नंदा पुन्हा काळी पडली.

"कॅट हा बावन्न पत्त्यांचा तरी"

बोंबललं.

मी चौकसपणे विचारले.

"आधीचा शेर कसा सुचला तुम्हाल?"

" पावसाआधीच पाणी वाला का?"

"हं?"

"माझा नाहीये सर तो शेर"

मराठवाड्याचा निखालस प्रांजळपणा पुन्हा डोकावला.

"मग?????????"

"मी घेतलाय तो एका गझलेतून"

अत्यंत शांत व प्रसन्न चेहर्‍याने हे वाक्य ऐकवले त्यांनी मला... याचा अर्थ अख्खी गझल त्या शेरावरूनच रचलेली असणार हे उघड होते.

"म्हणजे काय? हे चौर्य होईल...." .... माझ्यातील संघाचे संस्कार वदले.

"सगळं चौर्यच आहे" - 'प' नंदाताईंच्या पोटाकडे पाहात कुजबुजल्या...

क्षणभर सर्व नजरा हिंस्त्र झाल्या. मी असल्याने बहुधा पुन्हा मुखवटे धारण केले गेले. नंदाताई पुन्हा सुरू झाल्या.

हा सिक्वेन्स मला नीटसा समजलेला नव्हता, पण आपण येणार इथे आयुष्यात एकदा, नंदाताईंनी काय चौर्य केले ते कशाला विचारायचे म्हणून गप्प बसलो.

"कॅट हा बावन्न पत्त्यांचा तरी"

"हा तुमचाय का शेर?"

"हो सर.."

"ऐकवा..."

"नेहमी तो रोज राणी वाटतो"

"नेहमी आणि रोज हे दोन्ही शब्द कशाला घेताय?"

"सर 'तो' नेहमी आहे आणि 'राणी' रोज आहे.."

"रोज म्हणजे गुलाब म्हणताय का तुम्ही?"

"अय्या हो की... तसाही अर्थ होतो नाही आंटी?"

मी ही तिथली एक अर्थहीन वस्तू ठरू लागलो होतो. आंटी मधे पडल्या.

"कटककर, तिला असं म्हणायचंय की तो जो कोणी आहे तो नेहमीच रोज राणी वाटतो"

"नेहमीच रोज म्हणजे??"

"च्च.. म्हणजे काही वेळा रोज रोज नाही वाटत... नेहमीच रोज वाटतो..."

"पण या शेराचा अर्थ काय?"

"म्हणजे तिला असं म्हणायचंय की तिचा जो प्रियकर आहे..."

"आंटी... नवरा..." - आता नंदामधील सोज्वळ पत्नी जागृत झाली... आंटींची कार्यशाळा सुरू झाली.

"गझलेतील तू, तो, ती, मी याचा शब्दार्थ घ्यायचा नाही हे सांगितलंय ना मी?"

नंदा खजील झाल्यावर आंटी पुन्हा माझ्याकडे वळल्या...

"तिचा जो कोणी प्रियकर आहे तो तिला त्याची फक्त राणीच समजतो आणि नेहमी समजत राहील"

मला काही केल्या तो अर्थ पटेना! पण वेळ कमी होता.

"पुढचा ऐकवा... "

"सर एक रुबाई आहे... "

"गझल संपवा ना आधी?"

"संपली की गझल?"

"तीनच शेर?"

पुन्हा आंटी तलवार घेऊन धावल्या.

"नैसर्गीक प्रेरणेवर गझलतंत्र हावी होऊ नये असे मी माझ्या चौथ्या गझलसंग्रहात स्पष्टपणे म्हंटलेले आहे"

" बरं.. मग आता यांची गझल ऐकू.. "

मला आता मीच कार्यशाळेला शिकण्यासाठी गेलो आहे असे वाटत होते.

'प' यांनी आपले डोळे चौफेर फिरवले व मतला ऐकवण्यासाठी त्या आपले भरभक्कम जबडे हालवणार तेवढ्यात छबडी कुचूकली वादळी वेगाने उठला आणि त्याने 'प'काकूंना एक लाथ घातली. त्यांचा जुना वाद असावा.

'प' साध्यासुध्या नव्हत्या. मी कधी स्वतःच्या मुलालाही आजवर मारलेले नाही. अर्थात मला मुलबाळ नाही हे त्याचे कारण आहे हे वेगळे. पण 'प' यांनी छबडी कुचूकली हे दुसर्‍याने नकळत केलेले घोर पातक असूनही त्याचे गालफाड सुजवले. आंटी अफजलखानासारख्या उठल्या. मी उंदरासारखा आकुंचीत पावलो.

पण 'प' यांनी स्ट्रेट मतलाच सुरू केला.

"मार दुसर्‍याच्या मुलांना जी अशी गेलीत वाया"

ही गझलेची सुरुवात आहे असे मला वाटले नाही, त्यामुळे मी समजावणीच्या स्वरात 'असूदेत अहो.. लहान आहे' म्हणालो. पण 'प' त्यांच्या नशेतच होत्या. छबडी कुचूकली एक सेकंदही रडला नाही याचे मला नवल वाटले. नाहीतर या वयाची मुले काय कांगावे करताना दिसतात.

"एक मी देईन ठेवुन मग बघा करती अयाया"

"वा..."

मला हा मतला आहे इतकेच समजले.. कसा आहे यावर मतप्रदर्शन करणे मी चौगुले, घुले, चिरमुले आणि अंतुले या गझलेलाच बंद केले होते.... बहुधा 'प' चा हा मतला उत्स्फुर्त असावा... पण निदान वृत्तात होता..

"गंधही नाही गझलचा आणि फिरते फोफलत ही
जमवते गावातल्या या साळकाया माळकाया"

'प' ने साळकाया माळकायाला सरळ सगळ्यांकडे हात केला. आंटी छबडी कुचूकलीला घेऊन झाशीच्या राणीसारख्या उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यातला अंगार पाहून मी बाबूराव सणसांच्या पुतळ्यासारखा उभा राहून थिजलो.

नंदा अचानक रडू लागली. भवानी कामतांना आपली गझल राहिल्याचा राग आला होता. त्या रागातच त्यांनी भडकून नंदाला विचारले.

"तू का रडतीयस गं?"

"माझ्या नैतिकतेवर आरोप घेते ही 'प' ...."

तोवर आंटींनी छबडी कुचूकलीला खाली फेकून 'प'ला गदागदा हालवत ओरडायला सुरुवात केली होती.

" माझ्यासारखी खुद्द मी इथे असताना माझ्याच नाकावर टिच्चून या भटसंप्रदायाला इथे बोलावतेस? तेही केवळ याचसाठी की यावर्षीची अध्यक्षा तू आहेस म्हणून? म्हणून मला खाली दाखवायला याला आणलंस? आणि महेंद्रला मारतीयस??? झिंज्या ओढत फरफटत वरात काढीन"

"अहो मी त्यातला नाही हो.." मी कोणत्याही संप्रदायातील माणूस नाही हे सांगताना एरवी मी अभिमानाने सांगायचो. आज काकुळतीने म्हणालो. त्याचीच मला शिक्षा मिळाली. माझ्या पोटरीवर एक तडाखा बसला. मागे पाहिले तर छबडी कुचूकली मला लाथा घालत होता. हा आपल्यावर का चिडला असावा हेच मला कळेना. मी आपला घाबरत घाबरत त्याला 'अचं नाही कलायचं... वेलायश का तू?" असे काहीबाही म्हणत राहिलो.

तिकडे कोकिळाने अचानक 'प' ची बाजू घेतली. का ते तिलाही सांगता आले नसते. पण त्यामुळे नंदा आंटीच्या पार्टीत आपोआपच ढकलली गेली असावी. तिला चॉईसच राहिलेला नसावा.

भवानी कामत एकंदरच जगावर चिडलेली असल्याने ती कोणाच्याच पार्टीत जात नव्हती. पण मला छबडी कुचूकली बडवतीय हे पाहिल्यावर ती अचानक माझ्या पार्टीत आली, याचे कारण मगाशी छबडी कुचूकली तिच्यावर थुंकली होती. भवानीने भवानी अवतार धारण करत छबडी कुचूकलीला सलग सहा लगावल्या. नवल म्हणजे डोळ्यातून टिप्पूस न काढता ते बालक भवानीवरही तुटून पडलं. भवानी आ वासून, म्हणजे खर्‍या भवानीसारखा आ करून मागे मागे होऊ लागली. छबडी कुचूकलीचे अवसान आता तिप्पट झाले. तिकडे नंदा अवघडलेली असल्याने 'प' ची पार्टी विजय निश्चीत असल्याच्या आविर्भावात अगम्य हातवारे करत तोंड सोडून स्वतःही सुटलेली होती. पण एकट्या आंटीने केलेली झटापटही त्या दोघींना आवरेना.

कार्यशाळेची मार्यशाळा झालेली दिसत होती. मी काढता पाय घेण्याआधी 'प' जवळ जाऊन त्यांना विचारून पाहिले..

"मानधन... अं.. देता का??... म्हणजे मग मी निघतो..."

"अरे हाट..."

हे वाक्य आंटी बोललेल्या असल्या तरी मला ते कोणीही बोललं असतं तरी त्या परिस्थितीत समर्थनीयच वाटलं असतं.

माझ्याकडे बघत 'निघा, निघा आता' अशा अर्थीने हात हालवत 'प' किंचाळली...

"मी पाठवीन... पाठवीन मानधन... "

मला धार्मिक दंगल झाल्यासारखी भीती वाटल्याने मी चार पावले मागे सरकलो.. छाबडी कुचूकलीला ते माझे नामोहरम होणे वाटले असावे.... जेत्याच्या आवेशात तो माझ्यावर उसळला तसे मात्र मी त्याला सरळ उचलून त्या ग्रूपवर भिरकावले आणि धावत सुटलो.. बसमध्ये सारखे यशःश्रीचे ते वाक्य ऐकू येत होते...

"पण ते थुंकणार वगैरे नाहीत ना तुझ्यावर?"

'प' च्या मंडळाने त्याहीपेक्षा भयंकर अनुभव दिल्याचे मी घरी सांगणार नव्हतोच...

============================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

त्यांची गझल अतार्किकतेकडून सामाजिकतेकडे झुकताना अलवारतेचा तोल सावरू शकत नाही"
अशक्य हसतोय राव Proud
खतरा लिवलय Wink

सूर्य हा बिनडोक प्राणी वाटतो
चंद्र दारूडा लमाणी वाटतो

>>>

Rofl मेलो हसून ह्या शेरावर.....

Biggrin

जबराट.

“स्थानिक कुसुमाग्रझ”
“विमानतळावर विमानाचे तिकीट असतानाही नुसतेच लांबून विमान पाहून बाहेर घालवल्यावर होईल तसा चेहरा झाला कोकिळेचा.”
“त्यांची गझल अतार्किकतेकडून सामाजिकतेकडे झुकताना अलवारतेचा तोल सावरू शकत नाही" >>>
हे विशेष आवडलं.

दुसरा भाग मजेदार असला तरी पहिल्या भागाइतकी पकड घेऊ शकला नाही असं मला वाटलं.

हा हा हा.....

बेफीजी,

आपल्या कार्यशाळेचा तर वृतांत नाहीय ना हो? Happy

गम्मत करतेय....:-)

भन्नाट भन्न्नाट!

हसून हसून वाट लागली, आणि बायको माझ्याकडे बघून "याला वेड लागलंय की काय?" यामुळे चिंतेत असल्यासारखी वाटली.

_/\_

Pages