द्वार : अंतिम भाग

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 April, 2009 - 05:51

द्वार : भाग १ : http://www.maayboli.com/node/6868

आनंदराव भारावल्यासारखे सन्मित्रकडे पाहातच राहीले. त्यांनी मनात केलेल्या सगळ्याच कल्पनांना तडा देणारी गोष्ट होती ही. त्यांना वाटले होते कल्याणस्वामी किंवा आण्णा म्हणजे कुणीतरी वयस्कर, अनुभवी व्यक्ती असेल. म्हणजे पांढरे शुभ्र केस, छातीवर रुळणारी रुबाबदार दाढी, चेहर्‍यावर जाणवणार्‍या सुरकुत्या, पायघोळ भगवी कफनी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा वगैरे........

पण इथे समोर उभा होता जेमतेम पस्तीशीतला एक हसतमुख तरूण. स्वच्छ पांढराशुभ्र सदरा आणि तसाच पायजमा, गळ्यात फ़क्त एक काळा गोफ. पण त्याचे ते डोळे, त्यात भरलेला आत्मविश्वास, प्रेम .............
का कुणास ठाउक, पण आनंदरावांना आपल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्याची इच्छा झाली. समोर बसलेल्या तरुणाच्या डोळ्यात पाहीले की आपोआपच एकप्रकारचा धीर आला होता त्यांना. का कोण जाणे पण त्यांना त्याच्यावर पुर्ण विश्वास टाकावासा वाटू लागला होता.

"असं का होतय? आपण काही वेगळेच ठरवले होते आणि काही वेगळेच घडतेय? त्या सरबतात तर काही ........!" आनंदरावांच्या मनात भरभर अनेक विचार येवून गेले.

तसा सन्मित्र प्रसन्नपणे हसला.

"जय जय रघुवीर समर्थ ! काका, अहो त्या सरबतात काहीही नाही, साधं लिंबुपाणी आहे ते.... त्या मुळ्या बाहेरच्या बागेतल्या मोगर्‍याच्या आहेत. मी आमच्या तुकोबाला उगीचच ती जडीबुटी असल्याचे सांगुन ठेवले आहे. हे जो काही बदल तुम्हाला जाणवताहेत ना...तो इथल्या वातावरणाचा, समर्थांच्या कृपेचा प्रभाव आहे. कळत नकळत आजुबाजुच्या वातावरणाचा मानवी मनावर आणि माणसाच्या स्वभावाचा आजुबाजुच्या वातावरणावर परिणाम होत असतो. आपल्या रोजच्या सवयी, विचार, अनुभव, आपल्या मनातल्या इच्छा, आकांक्षा, वासना यामधुन आपण कळत नकळत बर्‍या वाईट लहरी आसपासच्या वातावरणात प्रक्षेपीत करत असतो. आता असं बघा, तुमच्या घरात नील आजारी आहे ............

काका, अहो असे काय बघताय माझ्याकडे, माझ्यापाशी कुठलीही विद्या किंवा दैवी शक्ती नाहीये. पण श्री समर्थांच्या कृपेने थोडेफार फेस रिडिंग शिकलोय आणि थोडीफार सुभाषदादांनी दिलेली माहीती यावरुन बोलतोय मी हे. हं तर काय सांगत होतो मी ......

आनंदराव, एकटक त्याच्याकडे पाहात ऐकत होते आणि सन्मित्र बोलत होता.

तर नीलच्या आजारपणामुळे तुमच्या घरच्या वातावरणात एकप्रकारची उदासी, नैराश्याची भावना निर्माण झालीय. इतकी वर्षे हे सहन केल्यामुळे तुमच्या मनातही एकप्रकारचा कडवटपणा, जगाबद्दलचा अविश्वास निर्माण झालाय. त्यामुळे तुम्ही कदाचित काही वेगळा विचार केला असेल घरातुन निघताना. पण इथली परिस्थिती भिन्न आहे....

निसर्गाच्या, श्री समर्थांच्या सानिद्ध्यात आले की आपोआपच माणुस आपली दु:खे, वेदना विसरतो काही काळ. तुमचेही तसेच झालेय. अर्थात मी तुम्हाला आत्ताच कसलाही दिलासा देवु इच्छित नाही नीलच्या बाबतीत, ते मी नीलला भेटल्यावरच ठरवेन. पण सद्ध्या तुम्ही इतर सर्व विचार मनातुन काढुन टाका आणि जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मन मोकळे करा. विश्वास ठेवा इथल्या भिंतींना कान नाहीत! आणि हा सन्मित्र एखाद्या टिपकागदासारखा आहे, एकदा शोषुन घेतलेली गोष्ट त्याच्यात सामावून जाते, ती परत कुठल्याही मार्गाने बाहेर येत नाही. तेव्हा नि:शंक मनाने बोला, काळजी करु नका. "चिंता करतो विश्वाची" म्हणणारे श्री समर्थ, समर्थ आहेत आपल्या चिंता वाहायला. तुमच्या सगळ्या काळज्या, सगळ्या चिंता रामरायाच्या चरणी वाहुन मोकळे व्हा. अहो, भक्ताच्या काजासाठी तो काय वाट्टेल ती दिव्ये करतो. कधी पाणक्या होतो, कधी युगानुयुगे वीटेवर वाट बघत उभा राहतो, फक्त त्याच्यावर श्रद्धा ठेवा आणि एक लक्षात ठेवा मी काय , तुम्ही काय आपण सगळेच निमित्तमात्र आहोत हो. कर्ता करविता तो श्रीराम आहे, तो करेल ना करायची ती काळजी. त्याच्यावर सर्व सोडुन रिकामे व्हा. त्याला विनवा...

अनुदिनी अनुतापे तापलो रामराया
परमदीन दयाळा नीरसी मोहमाया !
अचपळ मन माझे नावरी आवरीता
तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता !!

बोलता बोलता सन्मित्र उठुन आनंदरावांच्या पाठीमागे जावुन उभा राहीला आणि त्याने सहजपणे आनंदरावांच्या खांद्यावर हात ठेवला. आनंदरावांना संपुर्ण शरीरातुन एक कसलीतरी चेतना, एक लहर दौडत गेल्याचा भास झाला. जणु त्यांच्या डोक्यावरचे ओझेच कुणीतरी काढुन घेतले होते. आणि आनंदराव बोलायला लागले.........

कितीतरी वेळ ते बोलत होते, अगदी नीलच्या जन्मापासुनच्या आठवणी..... त्याचे रांगणे, त्याचे बोबडे बोल, त्यानंतर त्याचा तो आजार आणि मग सुरु असलेली परवड इथपासुन ते नजिकच्या काळात घडलेल्या त्या चित्र विचित्र घटना, नीला वहिनींना , त्यांनाही झालेले आभास..............!

"आण्णा , काय अर्थ असेल हो या सगळ्यांचा? नील कुठे जात असेल त्या एक दिड मिनीटात? त्याला काही त्रास तर नाही ना होणार? त्या मृत्युंशी त्याचा काही संबंध तर नसेल ना? मला तर काहीच समजत नाही हो. नीलाला धीर यावा म्हणुन तिच्यासमोर मी शांत असतो पण माझीही कोसळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे हो." आनंदरावांना रडु आवरले नाही तसे दादा पुढे सरकले. पण सन्मित्राने त्यांना अडवले.....

"अहं दादा, येवु द्या सगळे बाहेर, मनाचा निचरा करायला अश्रुंसारखे योग्य साधन नाही, रडु दे त्यांना मनसोक्त. एकदा मनातुन ही खंत , वेदना बाहेर पडली की त्यांना हलके हलके वाटेल.

आनंदराव मोकळेपणाने रडत होते, सन्मित्र हळुवारपणे त्याचा हात हातात घेवुन शांत बसला होता. थोड्या वेळाने आनंदराव शांत झाले.

"आनंदकाका, आता तुम्ही घरी जा, शांतपणे झोपा. काकुलाही सांगा काळजी करु नकोस म्हणावे. मी उद्या सकाळी येतोच आहे नीलला भेटायला, तेव्हा सविस्तर बोलुच. तुकोबा, कॉफी करा सगळ्यांसाठी."

"आण्णा, साखरेची की बिनसाखरेची! " तुकोबा बाहेर डोकावला.

"मला तर भरपुर साखर लागते, तु यांना विचार ! बाय द वे काका हा आमचा तुकोबा, खुप जवळचा आहे हा मला. हा होता म्हणुन आण्णा जिवंत आहे आज. ती कथा कधीतरी सांगेन तुम्हाला." सन्मित्राने हसत हसत सांगितले तसा तुकोबा लाजला...

"तुमचं काहीतरीच असतं आण्णा, उगाचच लाजवता गरिबाला !" तो कॉफी करायला आत पळाला. आणि सन्मित्राने इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली.

खुप दिवसानंतर आनंदरावांना त्या दिवशी शांत झोप लागली. नाही म्हणायला नीलावहिनींनी भुणभुण लावली होती त्यांच्या मागे, काय झाले म्हणुन. पण जे झाले ते शब्दात सांगण्यासारखे नव्हते म्हणुन त्यांनी नीलावहिनींना फक्त एवढेच सांगितले की उद्या आण्णा घरी येताहेत, काळजी करु नकोस मला आता खात्री वाटायला लागलीय की सर्व काही ठिक होइल. वहिनींना मात्र झोप लागली नाही. रात्रभर डोक्यात नीलचे आणि आण्णांचे विचार. त्या आण्णांना काय काय लागतं, फराळ करतात की जेवणच करतील. चहा की कॉफी कि फक्त दुधच घेतात? कुठल्याही टिपिकल गृहिणीप्रमाणेच त्यांचे विचारचक्र सुरू झाले.

"काकू, मी आलोय गं! जेवुनच जाणार आहे. जर गरम गरम भाकरी आणि एखादी भाजी मिळाली तर बहार येइल!" सन्मित्रने आल्याआल्याच जाहीर करुन टाकले. प्रथम तर नीलावहिनींच्या डोळ्यात "हा कोण उपटसुंभ" असेच भाव होते. पण आनंदरावांकडुन हेच आण्णा असे कळल्यावर त्यांच्याही भुवया उंचावल्या. हा एवढा तरुण मुलगा ....... ? पण सन्मित्रच्या मनमोकळ्या वागण्या बोलण्याने थोड्याच वेळात त्या ही मोकळ्या झाल्या.

"काकू, मी आधी नीलला भेटतो, मग आपण जेवताना बोलुच, काय चालेल ना?"

"हो का नाही, चला मी तुम्हाला नीलची खोली .........................

सन्मित्रने हाताच्या इशार्‍याने त्यांना थांबवले, "अहं, मी जाईन एकटाच, मला माहीत आहे त्याची खोली , काळजी करु नको!"

सन्मित्र बरोबर नीलच्या खोलीसमोर जावुन उभा राहीला. त्या दारात पोचल्या पोचल्या त्याला ती जाणीव झाली. सगळ्यात प्रथम माणिकरावांच्या त्या वाड्यातल्या हॉलमध्ये शिरताना झाली होती ती. फरक इतकाच की आता फक्त धोक्याची घंटी होती, त्यात ती भीती नव्हती. त्याने एकदा मागे वळुन पाहीले आनंदराव आणि नीलावहिनी त्याच्याकडेच पाहत होते, त्यांच्या डोळ्यात काळजी, चिंता, भिती अशा मिश्र भावनांची वादळे स्पष्ट दिसत होती. त्यांच्याकडे बघुन सन्मित्र पुन्हा एकदा प्रसन्न , आश्वासक हसला आणि त्याने वर आकाशाकडे बोट दाखवले आणि हसुन नीलच्या खोलीत पाउल टाकले.

"जय जय रघुवीर समर्थ !

सहजपणे त्यांच्या ओठातुन रघुरायाचे नाम बाहेर पडले आणि त्या खोलीतली हवा, वातावरण एकदम ढवळल्यासारखे झाले. सन्मित्रला त्या खोलीतली उष्णता अचानक वाढल्याची जाणीव झाली. असे भासत होते की श्वास गुदमरतोय, जणु काही त्या खोलीतला प्राणवायुच संपला होता. त्याचे लक्ष नीलकडे गेले. नीलच्या डोळ्यात एक छद्मी हास्य होते, जणु तो म्हणत होता की आत आला तर आहेस, आता आला आहेस तसाच बाहेर जा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. सन्मित्र त्याच्याकडे बघुन हसला , मागे वळला तसे नीलच्या चेहर्‍यावरचे हास्य गडद झाले. मागे वळलेल्या सन्मित्रने दार आतुन बंद केले आणि आतुन कडी लावुन घेतली. त्याला माहीत होते आनंदराव आणि नीलावहीनी काळजीत पडले असतील, पण दुसरा पर्यायच नव्हता. इथल्या युद्धाची झळ त्यांना लागु द्यायची नव्हती त्याला. दार लावुन घेवुन सन्मित्र मागे वळला तसा नील चमकला. हे त्याच्या कल्पनेच्या विरुद्ध घडत होते. त्याला वाटले होते हा क्षुद्र मानव घाबरुन निघुन जाईल पण तो तर परत आला होता. बरं या मानवात काही विशेष शक्तीही दिसत नव्हती, नाहीतर तिची जाणीव नीलला झाली असती. मग हा मानव कशाच्या जोरावर एवढा निर्धास्त होता.

"जय जय रघुवीर समर्थ ! तुला काय वाटलं तुलाच फक्त लपता, लपवता येतं. नीलच्या आई वडीलांच्या लक्षात नाही आलं तुझं अस्तित्व, पण माझ्यापासुन नाही दडता येणार तुला! आता सामना बरोबरीचा आहे लक्षात ठेव. आणि माझ्या मनापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करु नकोस, ते रामबीजाने संरक्षीत आहे."

त्याच्याशी बोलता बोलता सन्मित्र तो शब्द उच्चारण्याची तयारी करत होता. आप्पाजींनी शिकवलेले ते शब्द म्हणजे त्याची अस्त्रेच होती जणु. पण आप्पाजींनी सांगितले होते की त्यांचा वापर फक्त आणिबाणीच्या प्रसंगीच करायचा. त्यामुळे सन्मित्र शक्यतो त्याचे उच्चारण करायचे टाळत होता. मुळात सद्ध्या लढाईची तयारी नव्हतीच त्याची, तो दुसर्‍याच कामासाठी आला होता. तोंडाने रामनामाचा जप चालुच होता. "जय जय रघुवीर समर्थ" या मंत्राचा घोष त्याने चालुच ठेवला होता. खोलीत इकडे तिकडे बघत तो त्याला हवी असलेली वस्तु शोधत होता. त्याच्या त्या वागण्यामुळे नील किंवा तो जो कुणी होता तो मात्र चांगलाच गोंधळात पडला होता. आज प्रथमच त्याची शक्ती कमी पडत होती. मुळात त्याला पहिला धक्का बसला होता तोच सन्मित्रच्या पहिल्या दर्शनाने. खरेतर गेल्या काही महिन्यातला त्याचा अनुभव फार वेगळा होता. हे मानवप्राणी फारच क्षुद्र होते त्याच्या सामर्थ्यापुढे. नुसत्या कटाक्षाने तो त्यांचे रक्त शोषून घेवु शकत होता. तोच प्रयोग त्याने सन्मित्रवर पण करुन पाहिला पण सन्मित्र अविचल राहीला होता. उलट त्यालाच आपली शक्ती उणावल्यासारखी, दुर्बळ झाल्यासारखी भासायला लागली होती. पण गंमत म्हणजे हा नवीन माणुस त्याच्यावर उलट हल्लाही करत नव्हता, तो जणु काही फक्त काही तरी तिथे शोधायला आल्यासारख्या वाटत होता. नीलने (?) त्या नव्या मानवाचा मेंदु, मन वाचायचे खुप प्रयत्न केले. पण.....

अहो, आश्चर्यम , त्याच्या साम्राज्यात मनोवेगी म्हणुन ओळखला जाणारा तो, इथे मात्र त्या नवख्या, सामान्य मानवाच्या मनापर्यंत पोहोचुही शकत नव्हता. जणु काही एखादी अदृष्य पोलादी भिंत उभी होती त्या दोघांच्या मध्ये. आपल्या या असहायतेचा त्याला संताप येवु लागला होता. एक क्षुद्र मानव त्याच्या अफाट सामर्थ्याला आव्हान देत होता.

"अहं, माझ्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करु नकोस मित्रा, मी इंद्रियबंधन केले आहे, रामबीजाचे वज्रकवच लाभलेय त्याला. ते तोडणे तुझ्यासारख्या क्षुद्राला शक्य नाही."

त्या माणसाने, सन्मित्रने त्याला खिजवायचा प्रयत्न केला तसा तो अजुनच भडकला.अचानक त्या नव्या मानवाचे डोळे चमकले, तो जे शोधत होता ते त्याला दिसलं होतं बहुदा. तो माणुस त्या वस्तुकडे सरकला तसा नील (?) चमकला, त्याने वस्तु पटकन आपल्या ताब्यात घेतली. पण इथे पुन्हा त्याला त्याच्या इच्छाशक्तीने दगा दिला. कसे कोण जाणे पण त्यानेच ती वस्तु त्या माणसाच्या हातात देवुन टाकली. तसा तो माणुस, सन्मित्र मोकळेपणाने हसला. ती वस्तु त्याने आपल्या खिशात टाकली आणि परत दाराकडे निघाला. तसे नील प्रचंड संतापला. खोलीला हादरे बसायला लागले. उष्णता वाढायला लागली. तसा सन्मित्र चमकला , त्याचे लक्ष भिंतीकडे गेले त्या चारही भिंती एकमेकीकडे सरकत होत्या, बहुदा सन्मित्रला त्या भिंतीत दाबुन मारण्याची इच्छा होती त्याची. मृत्युची भिती मागे प्रतापनगरातच सोडली होती सन्मित्रने. पण इथे प्रश्न नीलच्या आयुष्याचा होता. शेवटी त्याने आप्पाजींनी शिकवलेली ती वर्णमाला डोळ्यासमोर आणली. त्यातला या परिस्थितीसाठी योग्य असा शब्द त्याने डोळ्यासमोर आणला. आप्पांनी अगदी दिवसदिवस समोर बसुन ते शब्द घोकुन घेतले होते त्याच्याकडुन. ते शब्द म्हणजे सगळ्यात विनाशकारी शस्त्र होते त्याच्या भात्यातले.

तो शब्द उच्चारण्याआधी सन्मित्रने एकदा दिर्घ श्वास घेतला, मग श्वासांचे बंधन केले आणि तो शब्द उच्चारण्यापुर्वी एकदा मनोमन पुन्हा श्री राम प्रभुंचे नाव घेतले. तो शब्द योग्य तसाच उच्चारला जायला हवा होता, थोडीजरी चुक झाली असती तरी परिणाम अतिशय भयानक झाले असते. पुर्ण विचार करुन शेवटी त्याने तो शब्द उच्चारला....................

तसा पलंगावर झोपलेला नील एकदम हवेत उडुन पुन्हा पलंगावर पडला. मात्र आता ती वावटळ थंडावली, नीलच्या चेहर्‍यावर प्रचंड आश्चर्य होते. पण तो पुर्ण जखडल्यासारखा झाला होता. त्याच्या शक्ती काही काळाकरीता का होईना निष्प्रभ ठरल्या होत्या. सन्मित्रने त्याच्याकडे एकदा पाहीले ....

"आत्तापुरता मी परत जातोय मित्रा, पण दोनच दिवसांनी अमावस्या आहे, त्या रात्री मी परत येइन..... तेव्हा मात्र जपुन. आणि हो, तुला माहीती आहे ना तुझ्या परतीच्या मार्गाचा परवाना माझ्याकडे आहे. या दोन दिवसात जर नीलला काही त्रास झाला तर तु कधीही परत जावु शकणार नाहीस याची मी पुरेपूर काळजी घेइन, समजले?"

सन्मित्रचा आवाज नेहेमीप्रमाणेच अगदी शांत होता पण यावेळी मात्र त्याच्या आवाजाला एक विलक्षण जिवघेणी धार होती. सन्मित्र नीलच्या खोलीतुन बाहेर पडताच पुन्हा खोलीत वादळ उभं राहीलं. पण सन्मित्रला आता काळजी नव्हती. त्याला खात्री होती जोपर्यंत ती वस्तु त्याच्याकडे आहे तोपर्यंत नील सुरक्षीत होता. तो खोलीच्या बाहेर पडला तसे आनंदराव आणि नीलावहीनी वाटच पाहात होते.

"काय झाले आण्णा? नील कसा आहे?" इति नीलावहिनी.

आनंदरावांनी त्यांना थांबवले, "अगं त्यांना दम तरी घेवु देत, दिसत नाही का आण्णा प्रचंड थकलेले आहेत. तुम्ही बसा आण्णा, नीला पाणी आण आण्णांसाठी."

सन्मित्रने पाणी घेतले. " काका, काकु नील ठिक आहे. पण ही सुरुवात आहे. मुळ लढाई परवा रात्री अमावस्येला होईल. पण काळजी करु नका, सुत्रे बर्‍यापैकी आपल्या हातात आहेत. मी थोडावेळ विश्रांती करतो, तुमचा स्वयंपाक झाला की सांगा, मला प्रचंड भुक लागली आहे. बाकी आपण जेवतानाच बोलू."

बोलता बोलता सन्मित्र तिथेच खालीच चटईवर आडवा झाला आणि पडल्या पडल्या झोपला देखील. त्या दोघांनाही त्याच्या हुकमी झोपेचे आश्चर्य वाटले. पण वहीनी लगेच स्वयंपाकाला लागल्या.

एका तासाने सन्मित्र स्वतःहुनच जागा झाला. आता तो पुन्हा पहिल्यासारखा ताजातवाना वाटत होता. तोंड धुवून जेवायला बसला. जेवण सुरू करण्यापुर्वी त्याने हात जोडुन रामरायाचे, बजरंगबलीचे स्मरण केले आणि जेवायला सुरूवात केली. शांतपणे जेवुन झाल्यावर मगच त्याने वर पाहीले.

नीलावहिनींकडे पाहुन हात जोडले, "अन्नदाता सुखी भव !"

काका, काकु आता मी काय सांगतो ते नीट ऐका. इथे जे काही आहे..ते अतिशय वाईट आहे, महाशक्तिशाली आहे. आज त्याला माझ्या शक्तीचा अंदाज नसल्याने ते थोडेसे बेसावध होते म्हणुन ते मला फारसा त्रास नाही देवु शकले पण परवा रात्री अमावस्या आहे. त्या दिवशी त्याची ताकद प्रचंड असणार आहे. काळजी करु नका बजरंगबली आपल्या पाठीशी आहे, रामरायांची कृपा आहे आपल्यावर. तुम्हाला उत्सुकता असेल ना ते नक्की काय आहे? नील एक दिड मिनीटाकरीता कुठे जातो? त्या स्त्रीयांच्या मृत्युंशी नीलचा काही संबंध.......

आहे, नीलचा प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष संबंध आहे त्या घटनांशी. कारण ते जे काही आहे त्याने नीलच्या शरीराचा ताबा घेतलाय. आता ते इथे आले कसे....?

ते स्वतःहुन आलेले नाहीय? कळत नकळत त्याला नीलने आमंत्रण दिलेय. ते बरीच वर्षे तिथे अडकुन पडले होते. नीलने आपल्या खेळाच्या नादात त्याची त्या बंधनातुन मुक्तता केलीय. ते काय आहे हे महत्वाचे नाही. ते कशासाठी आलेय ते महत्वाचे आहे, ते घातक आहे , केवळ नीललाच नव्हे तर या समग्र विश्वाला, अखंड मानवजातीला ते घातक आहे. शेकडो वर्षापुर्वी एका अघोरी तांत्रिकाने सिद्धी मिळवण्यासाठी त्याची मुक्तता केली होती. त्याला बळी / नैवेद्य म्हणुन फक्त कुमारी स्त्रीयांचे रक्त लागते. पण त्यावेळी त्या कापालिकाची सिद्धी सिद्ध होण्यापुर्वीच कुणा शक्तिशाली पुण्यात्म्याने त्या शक्तीचे बंधन करुन तिला एका विलक्षण कैदेत अडकवुन टाकले. तुम्हाला माहीत असेल किंवा ऐकुन असाल या जगात सर्व गोष्टी त्रिमीती सुत्रात बांधलेल्या आहेत, मग हे जगच कसे अपवाद असेल त्याल. या जगालाही एक चौथी मीती आहे जी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जनांच्या आकलन क्षमतेबाहेरची, कुवतीबाहेरची आहे. त्या पुण्यात्म्याने त्या अघोरी शक्तीला या चौथ्या मितीत कैद करुन टाकले होते. पण चुकुन नकळत नीलने त्या मीतीचे द्वार उघडायला त्या शक्तीला मदतच केली. आश्चर्य वाटतेय ना ! नील ?

त्यात अशक्य काहीच नाही. तो जगन्नियंता परमेश्वर कुणावरच अन्याय करत नाही, नीलसारख्या निरागस मुलावर कसा करेल. जेव्हा त्याने नीलची संवेदना, त्याची सर्व क्षमता हिरावुन घेतली त्याचवेळी त्याला सामान्य माणसाला अप्राप्य अशी एक महाशक्तीशाली देणगी दिली.

"इच्छाशक्ती" जगातली सर्वात मोठी ताकद असते ती म्हणजे तुमची इच्छाशक्ती. बरेच काळापर्यंत नीलच्या मेंदुचा वापर फक्त वेगवेगळ्या इच्छा मनोमन व्यक्त करण्यासाठीच होत होता. शरीराचे इतर सर्व अवयव निर्जीव झाल्याने त्याचा मेंदु आपले सर्व सामर्थ्य फक्त कल्पना करण्यात, वेगवेगळ्या इच्छा करण्यासाठीच वापरत होता त्यामुळे त्याच्या इच्छाशक्तीची परिणामकारकता नीलच्या बाबतीत प्रचंड वाढली. पण लहानपणापासुन नील त्या पर्‍यांच्या, जादुच्या कथा ऐकत आला होता, त्यामुळे त्याच्या मनावर त्याचाच प्रचंड पगडा किंवा आकर्षण होते. तो कायम त्या तिसर्‍या जगाचाच विचार करत असायचा. त्याचा पुर्णपणे विश्वास आहे की पर्‍या, जादुगार यांचे जग अस्तित्वात आहे. त्यामुळे तो बहुदा लहानपणापासुनच त्या जगाचे द्वार शोधत होता. त्याला स्वतःचे असे एक जग हवे होते जिथे तो पुर्णपणे निर्व्यंग असेल, निरोगी... सुदृढ असेल. सामर्थ्यवान असेल. तशातच त्याच्या हातात ही जादुई गोष्ट पडली.

सन्मित्रने खिशातुन ती वस्तु बाहेर काढली.

त्याच्या हातावर ते प्लास्टिकचे छोटेसे भिंग होते.

काका, तसं बघायला गेलं तर हे एक छोटंसं भिंग आहे. पण याच भिंगातुन निर्माण होणारी उष्णता आणि आपली प्रचंड इच्छाशक्ती यांच्या सहाय्याने नीलने काळाच्या बलाढ्य भिंतीला एक छोटेसे छिद्र... ज्याला फारतर आपण छोटेसे द्वार म्हणुया, पाडण्यात यश मिळवले. पण नीलचे सगळे प्रयत्न त्याला असणार्‍या तोकड्या माहितीतुन आणि त्याच्या मनोराज्यातुन निर्माण झालेले होते. त्यामुळे त्या पर्‍यांच्या जगाचे दार शोधण्याच्या नादात दुसरेच द्वार उघडले गेले आणि त्याने त्या वर्षानुवर्षे कोंडल्या गेलेल्या काळ्या शक्तीला, विनाषाला मुक्तद्वार मिळवुन दिले. त्याला थोडीशी फट मिळताच तो तिथुन निसटला आणि आपल्या जगात येवुन दाखल झाला. इथे आल्या आल्या आपली शक्ती वाढवण्यासाठी म्हणुन समोर दिसेल त्या शरीराचा म्हणजे नीलचा त्याने ताबा घेतल्या. शेकडो वर्षे बंधनात राहिल्याने त्याच्या शक्ती दुर्बळ झाल्यात, त्यामुळे ती अजुनतरी फक्त अमावस्येलाच बाहेर पडु शकतेय. इतर वेळेला तो त्या दाराच्या पलिकडे असतो कारण इथले वातावरण अजुनही त्याच्यासाठी योग्य नाही, पण एकदा त्याचे सामर्थ्य एकवटले की मग अखंड मानवजातीला खुप त्रासदायक ठरणार आहे तो.

तो जेव्हा अमावस्येच्या रात्री नीलला घेवुन बाहेर पडतो ....आपला बळी मिळवण्यासाठी, ताजे रक्त मिळवण्यासाठी....

तेव्हा तुमच्या या घरापुरते कालचक्र गोठवुन ठेवतो, त्यामुळे तुम्हाला नील फक्त एक्-दिड मिनीटेच गायब झालाय असे वाटते, पण प्रत्यक्षात तो एक दिड तासासाठी गायब असतो. तेवढा वेळ त्या शक्तीला पुरेसा आहे योग्य ती शिकार मिळवण्यासाठी. शिकारीचे रक्त शोषुन घेण्यासाठी त्याला त्या व्यक्तीला स्पर्ष करायचीही आवश्यकता नसते, नुसत्या डोळ्यांच्या माध्यमातुन तो एखाद्याचे रक्त शोषुन घेवु शकतो, माझ्यावरही तो प्रयत्न करुन बगितलाय त्याने, पण श्री समर्थांच्या कृपेमुळे मी वाचलो. तर हे सगळे असे आहे.

काळजी करु नका, ती शक्ती आपल्या नीलला काहीही करणार नाही, कारण त्याला परत त्या दुनियेतुन या दुनियेत येण्यासाठी नील आणि हे भिंग दोहोंचीही नितांत आवश्यकता आहे. नील त्याच्या ताब्यात आहे पण आता हे भिंग माझ्याकडे आहे. तेव्हा नील अगदी सुरक्षीत राहील याची खात्री बाळगा. मी परवा दिवशी संध्याकाळी परत येइन अगदी जय्यत तयारीनेशी. विश्वास ठेवा मी तुमच्या नीलला त्या शक्तीच्या तावडीतुन अगदी सहिसलामत बाहेर काढीन. मला काही तयारी करायचीय, काही वस्तु मिळवायच्या आहेत, थोडीफार साधने सिद्ध करावी लागतील. असो निश्चिंत राहा, परवा दिवशी संध्याकाळी आपण या सर्वाचा शेवट करणार आहोत, आपल्या नीलला त्याच्या तावडीतुन वाचवणार आहोत. येवु मी आता?

त्यांचे शब्द ओठापर्यंत यायच्या आतच सन्मित्र घराबाहेर पडला होता. आनंदराव आणि नीलावहिनी दोघांनीही त्याच्या पाठमोर्‍या आकृतीलाच हात जोडले.

त्या दिवशी सन्मित्र पहाटे साडे तीन वाजताच उठला होता. स्नान-संध्या आणि नियमीत योग प्राणायामादी व्यायाम आटपुन त्याने ध्यान लावले. आप्पाजी गेल्यापासुन हा त्याचा नियमीत दिनक्रम होता. शरीरशुद्धी, बलसाधना आणि आत्मसाधना हे तीन मुलभुत प्रकार आप्पाजींनी शिकवले होते. आज तर त्याची खुपच आवश्यकता होती. दिवसभर सन्मित्र आपल्या खोलीतुन बाहेर पडलाच नाही. आप्पाजींनी शिकवलेल्या त्या वर्णमाला आणि प्रभु रामरायाचे नामस्मरण यातच तो व्यस्त होता. रात्री बरोबर दहा वाजता जेव्हा तो आनंदरावांच्या घरी पोहोचला तेव्हा दोघेही त्याची वाटच पाहत होते. चेहेर्‍यावर प्रचंड प्रश्न आणि मनातल्या शंका, नीलची काळजी याने त्या दोघांचेही चेहरे काळवंडुन गेले होते. सन्मित्रला पाहताच त्यांच्या चेहेर्‍यावर थोडे हासु उमलले.

सन्मित्रने आपल्या खांद्यावरच्या झोळीतुन एक काळ्या रेशमी दोर्‍याचे बंडल काढले. घराची सर्व दारे, खिडक्या... जिथुन आत येण्याचा किंवा बाहेर जाण्याचा मार्ग होता तिथे तिथे त्याने तो काळ्या रंगाचा रेशमी दोरा बांधुन टाकला. नंतर झोळीतुन एक तांब्याचे प्रणवचिन्ह (ओंकार) काढुन त्याने ते घराच्या उंबर्‍यावर ठोकुन टाकले. आनंदराव आणि नीलावहीनी दोघेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते.

"काका, आज पहाटे उठुन या काही गोष्टी सिद्ध करुन घेतल्या गुरुमहाराजांकडुन. इथे जे काही आहे, ते आपल्या हातुन निसटलेच तरी ते या घराबाहेर पडता कामा नये म्हणुन ही बंधने घातली आहेत. खरेतर ही सगळी बंधने, ही सुरक्षा प्रतिकात्मक आहे...आपले खरे शस्त्र आहे ते रामनाम, त्याच्यावरची आपली निष्ठा , विश्वास, श्रद्धा! "

आनंदराव थोडे गोंधळल्यासारखे झाले," मी समजलो नाही आण्णा, नाही.. रामनामाचा महिमा मला मान्य आहे. पण त्या अघोरी शक्तीचा पाडाव करायचा असेल तर त्यासाठी इतर काही मंत्र तंत्र पण असतीलच ना. केवळ रामनामाच्या जोरावर त्या बलाढ्य शक्तीचा सामना कसे करणार आहोत आपण?"

तसा सन्मित्र हसला, त्यांच्या समोर येवुन बसला.

"काका, अहो "राम" हाच सगळ्यात मोठा मंत्र आहे. मुळात मंत्र म्हणजे काय? तर "मननेन जायते इति मंत्र:" ज्याच्या साह्याने तरुन जाता येते तो मंत्र. प्रकृतीच्या प्रथम स्पंदनातुन प्रणव(ओंकार) व द्वितीय स्पंदनातुन अष्टबीजांची निर्मीती झाली. कामबीज, योगबीज, गुरुबीज, शक्तीबीज, रामबीज, तेजोबीज, शांतीबीज आणि रक्षाबीज ही शब्दब्रम्हाची आठ बीजे. आता रामच का?

तर राम हा बीजमंत्र आहे. त्याच्या उपासनेने जीव आणि ब्रम्हाचे ऐक्य घडुन येते. आपण म्हणतो ना जीवाशिवाची भेट तसंच. राम हे रक्षाबीज म्हणजे तारकमंत्र आहे. राम म्हणजे काय? तर सर्वसाधारण साधकाला कळावे, आकलन व्हावे म्हणुन परब्रम्हाला दिलेले एक नाव. रामाचे आळंबन लावुन ’परब्रम्ह’ कळावे म्हणुन ब्रम्हाला लावलेली एक उपाधी. ब्रम्ह समजावे, उमजावे म्हणुन संतलोक रामाचा आश्रय घेवुन ब्रम्हाचे म्हणजे आत्म्याचे दर्शन घडवतात. शास्त्र आणि गुरू सांगतात की ब्रम्ह हे निराकार आहे, निर्गुण आहे. त्या निराकार स्वरुपाचे ज्ञान होण्यासाठी रामाचा म्हणजे सगुणाचा आधार आवश्यक आहे. विधीलिखीतानुसार मानवाच्या हातुन रावणाचा वध होणार होता म्हणुन परमेशाने दाशरथी रामाचा अवतार धारण केला. रावणवधानंतर देवांनी खुष होवुन रामाचा जयजयकार केला आणि म्हणाले की

हे रामा तु देव आहेस, देवाधिदेव आहेस. त्यावेळी श्रीराम म्हणतात .....

"आत्मानं मनुषं मन्ये रामं दशरथोत्यजय "

दशरथपुत्र या नात्याने राम मानवीय आहे तर विष्णुरुप असल्याने त्यात देवत्वही आहे. तो मर्यादा पुरूषोत्तम असल्याकारणे या देवांशी मानवाची , ईशत्वाची आराधना करावी त्यासाठी नाम घेणे आहे. प्रभु रामाच्या नावात अघटीत घटनापटुत्व शक्ती आहे. रामाचे नाव हाच एक मंत्र आहे, तारकमंत्र आहे.

"गर्भ, जन्म, जरा, मरण , संसार महत्मयात संतास्यमिती !
तस्मादुच्यते तारकसिद्धी !! "

राम म्हणजे परब्रम्ह. गर्भ, जन्म, जरा (वार्धक्य), मृत्यु आणि भौतिकता यापासुन रामनाम मुक्ती देते. परब्रम्हापासुन निर्माण होणारा प्रणव मोक्ष देतो, त्याचेच हे "तत्वमसि" रुप आहे. म्हणजे परब्रम्ह तुच आहेस असा उपदेश हा मंत्र करतो, तुमच्यात सामर्थ्य निर्माण करतो म्हणुन रामनाम हा सर्वशक्तिमान असा मंत्र आहे. समजले?

अजुन काही शंका असल्यास आत्ताच विचारुन घ्या. कारण ज्यावेळी आपण त्या शक्तीचा सामना करु तेव्हा मला तुमचीही मदत लागणार आहे, तेव्हा तुमचा मनोनिग्रह कमी पडता कामा नये. तेव्हा तुमचा रामावरचा, रामनामावरचा विश्वासच आपल्या उपयोगी पडणार आहे."

सन्मित्रने बोलणे थांबवले आणि त्या दोघांच्या चेहेर्‍याकडे पाहीले. त्यांचे समग्र शंकासमाधान झाल्याचे भाव आता त्या दोघांचाही डोळ्यात आणि चेहेर्‍यावर दिसत होते.

"क्षमा करा, आण्णा. अविश्वास नव्हता माझा पण एक शंका म्हणुन विचारले होते. आता आम्ही दोघेही पुर्णपणे तयार आहोत कुठल्याही परिस्थितीशी सामना करायला." आनंदराव म्हणाले.

"काका, काकु तुम्हाला फारसे काही करायचे नाही आहे. बरोबर साडे अकरा वाजता आपण नीलच्या खोलीत जावु. मी एक रिंगण आखुन देइन तुम्हाला. तुम्ही त्यात थांबायचे आहे. लक्षात ठेवा, काहीही झाले तरी मी सांगितल्याशिवाय रिंगणाच्या बाहेर यायचे नाही. तो खुप आकर्षणे दाखवील, भीती दाखवील पण मोहाला बळी पडायचे नाही. ज्यावेळी मी खुण करीन त्यावेळी पटकन रिंगणाच्या बाहेर यायचे आणि नीलला उचलुन खोलीच्या बाहेर घेवुन जायचे, बस्स! जमेल ना?"

आनंदराव आणि नीलावहीनी दोघांनीही सुचक मान डोलावली. आपल्या मुलाला आणि विश्वाला वाचवण्यासाठी आता काहीही दिव्य करायची त्यांच्या मनाची पुर्ण तयारी झालेली होती.

साडे अकरा वाजता तिघेही नीलच्या खोलीत शिरले. आपल्या झोळीतुन थोडेसे भस्म काढुन सन्मित्रने एक छोटेसे रिंगण आखले आणि त्या दोघांनाही त्या रिंगणात उभे केले. स्वत: मात्र रिंगणाच्या बाहेरच एका जागेवर पद्मासन लावुन येणार्‍या प्रसंगाचे स्वागत करण्यास तो सिद्ध झाला. त्याआधी ते भिंग त्याने परत नीलला देवुन टाकले होते.

"आण्णा, तुम्ही बाहेरच आहात , असंरक्षित आहात." नीलावहिनींना स्त्रीसुलभ काळजी वाटणे साहजिकच होते.

तसा सन्मित्र हसला, " काकु, अगं शिकार करण्यासाठी सावजाला काहीतरी आमिष दाखवावे लागते. तु काळजी करु नका, माझा राम समर्थ आहे माझे रक्षण करायला. जय जय रघुवीर समर्थ! "

"जय जय रघुवीर समर्थ" त्या दोघांनीही रामनामाचा घोष केला.

बारा वाजले आणि हळुहळु खोलीतले वातावरण बदलायला सुरूवात झाली. हवेत एक विलक्षण दुर्गंधी पसरली. हळुहळु खोलीतला प्रकाश कमी होवु लागला, एक प्रकारचे कोंदट धुके खोलीत जमा व्हायला सुरूवात झाली. श्वास घ्यायला त्रास होवु लागला. नील पडल्या जागी चुळबुळ करायला लागला. तसे सन्मित्रने दोघांकडे पाहून स्मित केले.

"तो आलाय काका, सावध ! मी सांगितलेले लक्षात आहे ना नीट. मी खुण केली की ......!"

सन्मित्रने आपल्या झोळीतुन काही उदबत्ता काढुन लावल्या, एक छोटीशी पणती काढली आणि प्रज्वलीत केली. तसे धुके कमी होवु लागले. त्या दुर्गंधीची परिणामकारकता कमी होवु लागली. तसा नील चमकला, त्याने वळुन सन्मित्रकडे पाहीले.

"हं, तु आलास तर? तुला काय वाटले, त्या दिवशीसारखा आज पण मी तुला परत जावु देइन. आज तुझी सुटका नाही." आनंदराव आणि नीलावहीनींनी पहिल्यांदाच तो आवाज ऐकला होता त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले. "आणि या दोघांनाही आणलेस ते बरे केलेस, माझ्या मार्गातली सगळ्यात मोठी धोंड होती ही. आज सगळे एकदमच संपाल."

त्या आवाजात एक प्रकारची तुच्छता, स्वत:च्या सामर्थ्याचा अहंकार, दर्प भरलेला होता. दुसर्‍याच क्षणी नील पलंगावरुन खाली उतरला आणि सन्मित्रसमोर येवुन उभा राहीला. तसे आनंदराव, नीलावहीनी चमकले. नील चालु शकतो .......? त्यांना हा धक्काच होता !

"तो नील नाहीये काका-काकु! तो ’तो’ आहे, फसु नका, रिंगणाच्या बाहेर येवु नका." त्यांच्या कानात सन्मित्रचा आवाज घुमला तसे त्यांना आश्चर्य वाटले कारण सन्मित्र डोळे मिटुन शांत बसला होता, त्याचे ओठही हलत नव्हते.

"असे आश्चर्यचकित होवु नका, याला टेलीपथी म्हणतात. शास्त्र आहे हे." पुन्हा तोच आवाज.

सन्मित्र लक्ष देत नाही म्हणल्यावर नीलने त्या दोघांकडे मोहरा वळवला. दुसर्‍याच क्षणी नील कोसळुन जमीनीवर पडला. जोरजोरात विव्हळायला लागला....

"आई, वाचव गं मला, खुप दुखतेय! त्या माणसाने काहीतरी जादु केलीय. तो सन्मित्र खोटारडा आहे. तोच खरेतर हे सगळे घडवुन आणतोय. बाबा, वाचवा मला! मी काही सुटत नाही आता त्याच्या तावडीतुन!"

तसे नीलावहीनी व्याकुळ झाल्या आणि पुढे झेपावल्या. आईच ती, पोटच्या पोराच्या यातना पाहुन कळवळली नसती तर आई कसली. पण आनंदरावांनी त्यांना पकडले....

"नीला, तो आपला नील नाहीये, आपल्या नीलला बोलता येत नाही माहीत आहे ना तुला."

तसा नील ताडदिशी उठुन उभा राहीला, "असे काय, तुझ्या या पोरालाच संपवतो आज, मग बघु तुझा तो संरक्षक किती काळ गमजा करतो ते?"

"जा रे, आमचे संरक्षक प्रभु रामचंद्र आहेत. तुझ्यासारखे क्षुद्र जीव काय लढा देणार परमेश्वरासोबत आणि एक लक्षात ठेव या वेळी मला माझा मुलगा गमवावा लागला तरी चालेल, पण तुला मुक्त करुन या सकळ जगाला धोका होवु देणार नाही मी." आनंदराव ठामपणे उदगारले आणि त्याक्षणी सन्मित्रने डोळे उघडले.

"याच, याच क्षणाची वाट पाहात होतो मी काका. आता तुम्ही पुर्णपणे सिद्ध आहात. बस्स रामप्रभुंचे नाव घ्या आणि सज्ज व्हा." सन्मित्र आता उठुन उभा राहीला.

दोघे एकमेकासमोर उभे राहुन एकमेकाला आजमावीत होते. आता ते युद्ध फक्त सन्मित्र आणि ती अघोरी शक्ती यांच्यातले राहीले नव्हते. तो लढा होता सत आणि असत मधला. ती लढाई होती धर्म आणि अधर्माची! आनंदराव त्या दोघांकडे पाहातच राहीले. दोन प्रबळ शक्ती एकमेकासमोर अंतीम युद्धासाठी उभ्या ठाकल्या होत्या. नील तोंडातल्या काहीतरी पुटपुटत होता. हळु हळु नीलची आकृती अदृष्य होवु लागली. त्या जागी एक काळपट, धुक्याचा आकार निर्माण झाला. हवेत कमालीचा गारवा पसरला होता, श्वास घेणे जड होवु लागले होते. आनंदरावांचे लक्ष सन्मित्रकडे गेले आणि त्यांना धक्काच बसला.

सन्मित्रच्या जागी कुणीतरी पन्नास - पंचावनच्या घरातले गृहस्थ उभे होते. पांढरे शुभ्र धोतर, खांद्यावर पांघरलेले उपरणे , गळ्यात जानवे आणि चेहेरा .......

आनंदरावांचे डोळे दिपुन गेले, चेहेर्‍याच्या ठिकाणी एक अतिशय तेजस्वी, दाहक असा तेजाचा अग्निगोलक दिसत होता. तो चेहेरा हळुवारपणे आनंदराव आणि नीलावहिनींकडे वळला. त्या सत्पुरुषाने आपले दोन्ही हात हवेत उंचावले जणु काही दोन्ही हात उंचावुन तो आशिर्वादच देत होता. खोलीत एक विलक्षण तेजस्वी असा शुभ्र प्रकाश पसरला आणि त्याच क्षणी खोलीत तो मंत्रघोष घुमला ...

"जय जय रघुवीर समर्थ"

आणि नील खाली कोसळला, तेव्हांच आनंदरावांच्या कानात पुन्हा सन्मित्रचा आवाज आला...

"काका, आत्ताच !"

तसे आनंदराव नीलावहिनींना घेवुन रिंगणाच्या बाहेर धावले, त्यांनी नीलला उचलुन खांद्यावर टाकले. सर्वांगाला चटके बसत होते, श्वास थांबतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण त्यांनी नीलला खांद्यावर टाकले आणि वहीनींसोबत खोलीच्या बाहेर पडले. मागे हलकल्लोळ माजला होता. सावज हातातून निसटल्यामुळे तो प्रचंड भडकला असावा, पिसाळल्यासारखा आपल्या सर्वशक्तीनिशी तो सन्मित्रवर तुटुन पडला असावा. पण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करुन आनंदराव बाहेर पडले.

त्यानंतर थोडा वेळपर्यंत खोलीतुन वेगवेगळे आवाज येत होते.
सन्मित्रच्या आवाजातील "जय जय रघुवीर समर्थ" जा घोष चालुच होता. अचानक आनंदरावांना सन्मित्रच्या आवाजातला बदल जाणवला. आता त्या आवाजाला एक वेगळीच धार आली होती आणि त्याने तो विवक्षित शब्द उच्चारला ........
क्षणभर शांतता ......
मग एक वेदनेचा हुंकार आणि मग एक संतप्त आरोळी !
आणि मग सगळे आवाज लुप्त झाले, एक विलक्षण शांतता पसरली आसमंतात.

तसे आनंदराव अस्वस्थ झाले, आतामात्र त्यांना राहवले नाही. ते तसेच धाडस करुन पुन्हा खोलीत शिरले. खोली पुन्हा पुर्वपदावर आली होती पण सन्मित्र एका कोपर्‍यात अचेतन अवस्थेत पडला होता.

आनंदरावांनी सन्मित्रला उचलले आणि ते खोलीच्या बाहेर पडले. सन्मित्रचा श्वास चालु होता, बहुदा त्या लढाईच्या थकव्याने अतिश्रमाने त्याला ग्लानी आली असावी. थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला. त्यांच्याकडे पाहुन प्रसन्न हसला. उठुन त्याने सर्व कोपर्‍यात दारा, खिडक्यावर बांधलेली बंधने काढुन टाकली. उंबर्‍यावत ठोकलेला ओंकार तापुन लालबुंद झाला होता.

"दु:स्वप्न संपलं काका! ते नष्ट झालय. आता काळजी करण्यासारखे काही राहीले नाही. अरे हो, तुम्ही ज्यांना पाहिलत ना मघाशी ते माझे गुरु, आप्पाजी. बगितलत ना या लेकरावर संकट आलं की त्याची माय कशी धावुन आली लगेच मदतीला. सुदैवाने त्यावेळी नील तिथेच होता, त्यामुळे त्यालाही तो दैवी स्पर्ष झालाय. कदाचित तुमचा नील पुर्णपणे बरा होईल यातुन. बोला "सियावर रामचंद्र की जय!"

त्याचवेळी नील चुळबुळायला लागला होता. त्याने डोळे उघडले आणि अगदी हळु आवाजात हाक मारली....

"आई, मी...मला ........! ’ बोलता बोलता तो हलकेच उठुन बसला. आनंदराव आणि नीलावहीनींच्या डोळ्यातुन आनंदाश्रु वाहु लागले. त्यांचा नील पुन्हा माणसात आला होता. दोघेही एकदम सन्मित्रकडे वळले...

"आण्णा, तुमचे उपकार आम्ही..........................................."

सन्मित्र जागेवर होताच कुठे? आपले काम आटोपताच तो कधीच दार उघडुन घराबाहेर पडला होता. त्यांच्या कानावर फक्त त्याच्या खणखणीत आवाजातील श्लोक आला......

"समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भुमंडळी कोण आहे
जयाची लीला वर्णिती लोक तीन्ही
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी !!"

"जय जय रघुवीर समर्थ!"

समाप्त.

विशाल कुलकर्णी.

कथा

गुलमोहर: 

छान Happy
काल गटग ला ह्याच गोष्टीच्या विचारात होतास काय? म्हणुन गप्प गप्प होतास ते Wink

-------------------------------------------------------------------------------
राग लोभ, अन खेद खंत हे
दिले घेतले इथेच ठेऊ
"तिथे" न लागे ह्यातील काही
आलो तैसे निघुन जाऊ

विशाल अतिशय सुंदर! शब्द च नाहित रे माझ्या कडे ,मंत्र मुग्ध केल तुझ्या कथे ने! खरच!

नेहेमीप्रमाणेच उत्तम.. भाषेवर प्रभुत्त्व आहे तुमचं.. Happy

छान आहे ह्...यात जे निल च वर्नन आहे न सेम तसाच १ मुलगा माझ्या नात्यात आहे,गोश्ट वाचुन मला आता त्याचि भिति वाटु लागलिये.खुप छन लिहिल आहेत.

विशाल खुप म्हणजे खुपच सुंदर....

शब्द च नाहित हो दादा बोलायला आता.... Happy
खुप छान लिहिलं आहे.

- पिल्लु छोटा (पिंकी)

विशाल... मला नाही लिहीता येत रे ईतके... तुझ्या सारखे...
पण मी ही तुझ्यासाठी ईतकेच म्हणेन....
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भुमंडळी कोण आहे
जयाची लीला वर्णिती लोक तीन्ही
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी !!"
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी !!"
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी !!"

श्री राम.. श्री राम.. श्री राम..
---------------------------------------------------------------
"जय जय रघुवीर समर्थ !"

विशाल,
एक तर खूप दिवसांनी दुसरा भाग टाकलास, लिंक तुटून गेली होती....
सरळसोट वाटली कथा, पहील्या भागात उत्सुकता खूप ताणली गेली होती....
मला ठिक वाटली, खेळ नंतर हीच... Sad

विशाल दा, क्षणभर तर मी ही तिथेच आहे अस वाटल मला !
डोक सुन्न झाल एकदम !
आता पेशल चा पाहिजेच !
सिम्पलि ग्रेट !!!!!!!!!
Happy

---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

विशालदा एकदम झकास...
-------------------------
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..

सुंदरच! विशाल कथा आवडली.
जय जय रघुवीर समर्थ!

आज एका दमात दोन्ही भाग वाचले !
विशालदा जबर्‍य्याक्स झाली आहे कथा !! आवडली.

जय जय रघुवीर समर्थ!

विशाल..... पहिल्या भागात फार उत्सुकता निर्माण झाली होती. पण दुसरा भाग थोडा सपाट वाटला रे ......म्हणजे..... बरचंसं अपेक्षित होतं तेच झालं.

पण तुझी शैली छान वाटली Happy

अजून येऊ देत.

~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/

अतिशय अप्रतिम.
फारच सुंदर.
इतकी जबरदस्त कथा लिहिलीयस मित्रा कि ज्याच नाव ते!
कुठेहि कथेची पकड सैल झालेली नाहीये.
अभिनंदन. अशी छान कथा लिहिल्याबद्दल.
आणि थंक्स हं! आम्हाला अशा चांगल्या कथेची मेजवानी दिल्याबद्दल.

किती लिहितोस यार तु. दमलो वाचुन. Wink
______________________

साकी! अब भी यहां तू किसके लिए बैठा है
अब न वो जाम, न वो मय, न वो पैमाने हैं

छान आहे विशालबुवा!

तुम्हाला अश्या कथा छानच जमतात! Happy

विशाल,

मला क्षणभर त्या खोलीत मी उभा आहे की काय असे वाटले. राम नामाचे विवेचन खूप आवडले.

श्रीराम रामेती रामेती रमे रामे मनोरमे
सहस्त्र नाम तत्तुल्यं रामनाम वरानने..

सस्नेह..

त्याच्याशी बोलता बोलता नील तो शब्द उच्चारण्याची तयारी करत होता. आप्पाजींनी शिकवलेले ते शब्द म्हणजे त्याची अस्त्रेच होती जणु. पण आप्पाजींनी सांगितले होते की त्यांचा वापर फक्त आणिबाणीच्या प्रसंगीच करायचा. त्यामुळे सन्मित्र शक्यतो त्याचे उच्चारण करायचे टाळत होता.>>> विशाल! इथे नील एव़़जी सन्मित्र हवे होते असे वाटते.

कथा खुप आवडली.. सन्मित्र डोळ्यासमोर उभा केलास.. लढा थोडा प्रेडिक्टेबल वाटला.

जय जय रघुवीर समर्थ!

अंदाज होताच पुढे काय होईल याचा, तरी पण....

खुप खिळवुन ठेवले कथेने. अंगावर रोमांच उभे राहणे म्हणजे काय ते अनुभवाला आले.
मनाचे श्लोक आणि राम रायाचे नाव आणि स्पष्टीकरण.... अतिशय सुंदर. शब्दातीत , निदान मी तरी भारावुन गेले. कथेपेक्षा जास्त तुझ्या त्या स्पष्टिकरणावर.

फारच छान! सन्मित्रची व्यक्तिरेखा फारच छान रेखातलि!

सन्मित्राचे मागचे-पुढचे प्रसंग छान गोवले आहेत विशालदा.
जरी शेवट अपेक्षित होता तरी तू तो कसा करतोस याची उत्कंठा होती...कथेचा फ्लो छानच. आणि विवेचन..अहाहा..अप्रतीम्..मान गये गुरु! _/\_

यापुढील लिखाण तुमच्याकडुन करवुन घेण्यास 'श्री समर्थ' समर्थ आहेत!

सस्नेह,
अवधूत सप्रे.

विशाल, डोळ्यासमोर घडतंय असं वाटत होतं Happy प्राजक्ता म्हणते तसं मला पण ते नील ऐवजी सन्मित्र हवं असं वाटतंय. तसेच माझ्या माहितीप्रमाणे आपण त्रिमितीत आहोत आणि जी आपण सामान्य मानवाच्या आकलनापलिकडील मिती आहे ती चतुर्मिती.

बाकी, रामनामाबद्दल लिहिलेले वाचताना मुळातच हृदयात वसलेले रामनाम उचंबळून येत होते आणि त्याबद्दल जे लिहिले आहेस त्याला अनुमोदन. म्हणूनच रामरक्षेत म्हटलं आहे ना ! 'रामेणाभिहतां निशाचरचमु रामाय तस्मै नमः' . अंधाराचे उपासक रामनामासमोर टिकूच शकत नाहीत Happy

तसेच प्रथम स्पंद ॐकार (जो परब्रह्माच्या मायेने उत्पन्न झाला) व दुसरा स्पंद परब्रह्माची म्हणजेच दत्तगुरुंची अष्टबीज ऐश्वर्ये संक्रमित करता झाला व परमात्म्याला (रामाला) नवअंकुर ऐश्वर्ये प्राप्त झाली. रामनामस्मरणाने हीच नवअंकूर ऐश्वर्ये आपल्यापर्यंत पोहोचतात व ती आपल्याला द्यायला तो श्रीराम आसुसलेला असतो.

************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

मला खुप आवडला दुसरा भागही...भले बर्‍याच दिवसांनी टाकला विशालने, पण त्यामुळे त्याची रंगत आणखी वाढली असं मला वाटतं. खुप छान विशाल..अगदी सगळं डोळ्यांसमोर घडतय असं वाटलं

जय जय रघुवीर समर्थ!

सुमेधा पुनकर Happy
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************

बाप्रे.. हे वाचून काय वाटलं ते सांगताही येणार नाही!! अफलातून डिटेलिंग.. काय होणार हे व्यवस्थित माहीत होते.. परंतू कसे होणार याची उत्सुकता.. अतिशय सुरेख हाताळली आहे कथा तुम्ही!
किती आवडली हे सांगणं मुश्किल आहे!

बायदवे.. याला काही संदंर्भ वगैरे वापरलेत का? कारण इतकं सगळं कसं गुंफलंत एकामेकांत ? रामनामाचे विवेचन इ. तो भागही उत्तम!

मला वाटतंय अशा कथा प्रकारामधली ही सर्वोत्तम कथा असेल.. अर्थात तो आधीचा सन्मित्र पार्ट १ आणि हा पार्ट २.. ! वेल डन! Happy

पहिला भाग खूपच उत्कंठा वाढवणारा होता, त्या भागापुढे दुसरा भाग फिका पडला (माझ्यासाठी).

मस्त लिहिली आहेस कथा, विशाल. मी दोन्ही भाग आज वाचले. दोन्ही आवडले. Happy

त्रिमितीबद्दल अश्विनीशी सहमत.
रामनामाचे विवेचन जरी चांगले केले असले तरी ते कथेच्या संदर्भात थोडेसे अनावश्यक वाटले मला.
तुकोबाचा थोडक्यात केलेला उल्लेख आवडला... Happy

"मननेन जायते इति मंत्र:" >>

'मननात् त्रायते इति मंत्रः ' असा समास आहे बहुतेक तो... ज्याचे मनन केल्याने रक्षण होते, तो मंत्र...

Pages