येत्या पावसाळ्यात..

Submitted by के अंजली on 26 May, 2011 - 01:11

खूप काही पहाणारेय
येत्या पावसाळ्यात..
धमाल सारी करणारेय
येत्या पावसाळ्यात..

खूप काही बोलणारेय
त्याला एकट गाठून
वर्षभर राह्यलयं मनात
कित्ती किती साठून..

विजा बिजा आणल्यास तर
याद राख म्हणणारेय
भेटायचयं तर ये एकटाच
दम चांगला देणारेय..

चप्पल बिप्पल न घालता
चिखल चांगला तुडवणारेय
बचक बचक होईस्तोवर
पाय माखून घेणारेय..

आडव्या तिडव्या झाल्या तरी
होड्या मस्त सोडणारेय
छत्री बित्री बेतास कात्री
रेनकोट लांब ठेवणारेय..

रपरप धारा अंगावरती
मार खाऊन घेणारेय
आल्लं घालून कडक च्याय
मस्तपैकी पिणारेय..

भिजल्यावर कोरडे अंग
वेढून शालीत घेणारेय
खिडकीमधून त्याला पाहून
हसरे चुंबन देणारेय..!

आवडली..

विजा बिजा आणल्यास तर
याद राख म्हणणारेय
भेटायचयं तर ये एकटाच
दम चांगला देणारेय..>> हे लईच भारी.. Happy

“विजा बिजा आणल्यास तर
याद राख म्हणणारेय
भेटायचयं तर ये एकटाच
दम चांगला देणारेय..”
व्वा ...... काय दम भरलाय पावसाला !!!
हे फक्त ’पाऊस-सखी’ च करू जाणे …. Happy

कविता अगदी सहज उतरलेय
शेवटच्या कड्व्यातलं स्वप्नरंजन खूप आवडलं.

कविता ’काकाक’ विभागात टाकण्याचं प्रयोजन समजलं नाही.

उल्हासजी Happy

पावसाच्या सरींसारख्या अडम तडम कशाही बरसल्यात ना कवितेच्या ओळी म्हणून काकाक मध्ये टाकलीये!

अंजली, सुंदर कविता आहे.

एक छानपैकी बालकविता झाली असती पण....

खिडकीमधून त्याला पाहून
हसरे चुंबन देणारेय..

ह्या कडव्याने घात केला. हे काहीतरी वेगळं असतं तर मी म्हटलं त्याप्रमाणे एक छान बालकविता झाली असती.

अरे वा...!!!
सुंदर कविता... मुसळधार पावसातच वाचली... Happy