सूर शब्द लहरी - ३१ जाने २०१२

Submitted by हिम्सकूल on 1 February, 2012 - 06:47

काल ३१ जानेवारी २०१२ रोजी कवीवर्य कै. गंगाधर महाम्बरे ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी लिहिलेल्या काही राग गीतांवर 'सूर शब्द लहरी' हा कार्यक्रम सुमनांजली तर्फे सादर करण्यात आला.

101_0259_1.JPG

ह्या कार्यक्रमातील गीते पूर्व पश्चिम ह्या पुस्तकात गंगाधर महाम्बरे ह्यांनी लिहिलेली आहेत. पुस्तकात एकूण ५८ अशी गीते आहेत त्यातील निवडक गीते सादर केली गेले.

कार्यक्रमाची सुरुवात कल्याण रागातील 'आलो तुझ्या मंदिरी देवा, कल्याणाच्या स्वरी निनादे देहाची मंजिरी' ह्या गीताने झाली. हे गीत सुरंजन खंडाळकर ह्याने तयारीने सादर केले.

101_0213_1.JPG

त्यानंतर रश्मी मोघे हिने 'तू कन्हैया हसुनी अधरी धरशी जेव्हा पावरी, धीर द्याया सहज येई का मला आसावरी' हे आसावरी रागातील गीत सादर केले.

101_0205_1.JPG

मग चैतन्य जोगाईकर ह्याने 'मुखरित आपुले सखये झाले यौवन सुलतानी, अणुरेणूतुनी अवघे न्हाले जीवन मुलतानी' हे मुलतानी रागातील गीत वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर केले. 'प्रीतिज्वाली ध ग रे कोमल मनोज्ञ हा संगम, सुरासुरातूनी साधला तूच रम्य तीव्र मध्यम' ह्या ओळीतून मुलतानी रागाचे वैशिष्ट जसे शब्दात व्यक्त केले आहे ते चालीतूनही तितक्याच समर्थपणे उमटले आहे.

101_0201_1.JPG

पिलू राग दिवस मावळताना गायला जातो आणि त्याचे वर्णन महाम्बरे आजोबांनी 'दिन मावळता असा लागतो मला कळू, न कळताच रंगतो हृदयी राग पिलू' असे केले आहे. रुपकतालातील हे गीत रसिकांसमोर सादर केले रश्मी मोघे हिने.

छायानट हा कल्याण थाटातलाच एक राग पण त्याचे वैशिष्ट्य म्हणजे शुद्ध स्वरांचा राग आहे पण कोमल निषादही अल्प प्रमाणात वापरला जातो आणि दोन्ही मध्यम ही येतात. द्रूत एकतालातील ही रचना काहीशी लक्षणगीत असल्यासारखी आहे. 'छायानट गायिला मी, आळविता तुला, कल्याण थाट पाहिला मी', 'वाट चालता वक्र ती कोमल शुद्धा स्वरांचा आला परिमल, दोन मध्यम पथी लागता जीव सुरांना वाहिला मी'. दोन्ही मध्यमांचा सुंदर वापर करत ही रचना सुरंजनने सादर केली.

दक्षिण भारतीय संगीतातील प्रसिद्ध हंसध्वनी ह्या रागातील रचना 'लाविशी का वेडा मजला राजहंसा येऊनी , जाशि का तू हळू मला अर्धी कहाणी सांगुनी' रश्मीने सादर केली.

101_0168_1.JPG

औपचारिक मध्यंतरात श्री.म.ना.कुलकर्णी ह्यांनी काढलेली कै.गंगाधर महाम्बरे ह्यांचे रेखाचित्र श्रीमती महाम्बरे ह्यांना श्रीमती सुनीता खाडिलकर ह्यांच्या हस्ते देण्यात आले.

101_0216_1.JPG

'ऊठ शिवबा तुझी जाहली आज स्वप्नपूर्ती, मुठीत घे तलवार यशाची ही जयजयवन्ती' ही जयजयवंती रागातील रचना चैतन्यने तडफदार रितीने सादर केली.

सकाळच्या वातावरणाची प्रसन्नता निर्माण करणारी अहीरभैरव रागातील 'पृथ्वीवरती पसरित आपुली ही रजताची शाल, अहिरभैरव गात उदेला सुरम्य प्रात:काल' ही रचना सुरंजनने सादर केल्याने मैफिल प्रसन्न झाली.

वसंतऋतू आल्यावर निसर्गात निर्माण होणारा उत्साह 'आला आला रे आला वसंत, छेडीत पंचम सांगे कोकीळ करू नका कुणी खंत' ह्या गीतातून चैतन्यने सुंदर उभा केला. प्राचीन लघुचित्र शैली वर आधारित शब्द रचना, त्या रचनांवर आधारित स्वर रचना आणि स्वर रचना ऐकताना परत एकदा नवीन चित्र काढायची उर्मी अशी काहीशी अवस्था निर्माण होते.

कोकिळेचा स्वर पंचमाचा मानला गेला आहे आणि खम्बावती रागात तो स्वर वर्ज आहे. तेव्हा आता खंबावती राग गाणार आहे तेव्हा कोकिळे तू दूर जा असे सांगणारी रचना सौ. मंजिरी जोशी ह्यांनी सादर केली. 'कोकिळे जा दूर मी गाते इथे खंबावती, पंचमाचा सूर चुकुनी नूर बदलू पाहती'

कार्यक्रमाची सांगता 'गा मना, गा मना भैरवी तू रंगुनी, सदाफुली परी सदा फुलतसे ही सदारंजनी' ह्या भैरवीने झाली. तीनही गायकांनी एकत्रीत सादर केलेल्या गीतात हार्मानीचा ही सुंदर प्रयोग केला होता.

कार्यक्रमात संवादिनीची साथ संगीतकार म.ना.कुलकर्णी ह्यांनी स्वत: केली, तर तबल्याची साथ पांडुरंग पवार ह्यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. मंजिरी जोशी ह्यांनी केले.

101_0166_1.JPG101_0190_1.JPG

संगीतकार प्रभाकर जोग, पुणे आकाशवाणीचे माजी डायरेक्टर श्री रवींद्र आपटे, एस एन डी टी च्या माजी संचालिका श्री.सुनीता खाडिलकर, श्रीमती प्रतिभा शाहू मोडक उपस्थित होते.

101_0169_1.JPG101_0172_1.JPG101_0173_1.JPG

गुलमोहर: 

छान Happy

मस्तच !
ह्या गीतांचं पुस्तक मिळवून वाचलं पाहिजे असं वाटलं.
रागांची नावं किती सहज गुंफली आहेत काव्यात.
ऐकायला नक्की आवडले असते. पुन्हा संधी मिळाली तर नक्की ऐकेन !
(तुम्ही काही ऑडिओ टाकलेत तर फार बरे होईल. झलक स्वरूपात टाकलेत तरी चालतील )