मन...!

Submitted by बागेश्री on 25 January, 2012 - 04:09

आज मी तुझं मन खणायला घेतलंच शेवटी....
एक भली मोठी पिशवी घेऊन प्रवेश करणार होतो. नको ते सल, तण उपटून टाकून बाहेर घेऊन येण्याच्या हेतूने...

प्रवेशाचे महाद्वारच महामजबूत!!! आत प्रवेश करायलाच माझी निम्मी शक्ती खर्ची पडली, पण; आज मी ही माघार घेणारच नव्हतो...

तुझी मन-वस्ती सुनसान आणि निपचित वाटली मला....
सगळं आवरत, स्वच्छ करत निघालो.. बरीच जळमटं, सर्वत्र धूळ, जिवंतपणाचं एकही लक्षण नाही त्यात..
अवकाशाने कळलं, मी तुझ्या मन-गाभ्याच्या भूतकाळात शिरलोय!! कारण तू, आपल्या अनेकविध झालेल्या चर्चा-गप्पांमधे, नकळत दिलेले संदर्भ तिथे धूळ खात पडलेले दिसले...

अनेक जुनाट झोपड्या, त्यावरची धुळमटलेली कौलारं, विझलेले कंदिल, जीर्ण चबूतरे, निष्पर्ण झाडी आणि बरेच काही त्या परिसरात..
तू गेले कित्येक वर्षांत इकडे फिरकलीच नाहीस हे जाणवलं, थोडं बरंही वाटलं आणि निरातिशय आश्चर्य ही!
एखाद्याला आपला भूतकाळ असा पूर्णपणे दूर्लक्षित करता येतो, तोडून टाकता येतो? इतका की- त्यात खरेच काय होते हे आपले आपण ही डोकवून पहावे म्हटले तर धुळींच्या पापुद्र्यांखाली, काही म्हणता काहीच दिसू नये?

अगं, कबूल आहे!
नकोसे क्षणच तू जास्त पाहिलेस गतकाळात. पण म्हणून, अनुभवलेल्या हसर्‍या क्षणांना सुद्धा तू गळफास द्यावास?
छे!
वर्तमानाचा, हसरा भूतकाळ करण्यासाठी- हे हसरे क्षण सोबतीला हवेतच.. ते भूतकाळात जिवंत ठेवायलाच हवेत!

इथे, तुझे कधीकाळचे सारे हसरे क्षणही मला मलूल, केविलवाणे दिसले, ज्यांनी कधी तुला, 'तू' जिवंत असल्याची कबुली दिली होती!!!
आज नकोशा क्षणाबरोबर त्यांनाही तू कायमचं त्यागलेलं पाहून मीच दचकलोय!

माझ्या पोतडीत मी जमतील, मिळतील तितके दु:खी क्षण घेतो आहे भरून, ही अडगळ कायमचीच बाहेर न्यावी म्हणतोय... त्या जळमटलेल्या झोपड्यांनाही देतो आहे नवजीवन माझ्यापरीने, जमेल तसे!

विझलेल्या कंदिलांवर साचून राहिलेल्या काजळीखाली काळवंडून गेलेले ते हसरे क्षण मात्र मी जिवंत केलेत, निव्वळ एक फुंकर मारून.....
ते उडत आहेत ह्याच स्वच्छ परिसरात आता, गोंडस फुलपाखरांप्रमाणे!!!
अगं, निष्पर्ण झाडंही बहरतील - तुझ्या आटलेल्या आनंदाश्रूंना स्पर्शून जो आलोय!

तसं हे काम सोपं होतं, पण महाद्वारावर असलेला तुझाच खडा पहारा तोडणं सोप्याला अवघड करून गेला...

तो भूतकाळाचा परिसर, थोडातरी हसरा झाला हे पाहून, माझी पोतडी घेऊन परतीच्या मार्गी निघालो..
तो बाहेर पडण्याआधी छानसा- रंगीत, हसरा परिसर दिसला एक! पहावं म्हटलं वाकून, तर कळलं तो वर्तमान होता... इथे मला काही करावे लागणारच नव्हते बहुधा कारण तो परिसर तूच फार सुंदर ठेवला होतास- सजवलेला होतास!! मी वाकूनच पहात राहिलो..
त्या परिसरात माझ्याही वावराची जाणीव झाली आणि बाहेरून ऐकू आलं तुझं खळाळ हास्य, कदाचित आपल्याच गप्पांमधून फुललेलं असावं ते...
बघ, काही क्षणातच ह्या वर्तमानातील हास्यांनाही भूतकाळाच्या वस्तीत जावे लागेल.. पण आता, मी समाधानी होतो, कारण त्या वस्तीत हे हास्य चिरंतन राहणार होतं..कोमेजणार नव्हतं आणि हा विश्वास मला आपल्या नात्यानेच दिला होता....

समाधानी मनाने मी बाहेर पडलो, महाद्वार हलकेच टेकवून घेतलं, तो गोजिरं हास्य ओठांवर खेळवत, तू स्वागताला तयार दिसलीस.. तुझ्या डोळ्यांत चमकून गेलेली कृतज्ञता, मला मी केलेल्या कामाची पावती देऊन गेली... माझ्या छातीवर तू टेकवलेलं डोकं, किती वेळ थोपटत बसलो होतो ते आठवत नाही...

गुलमोहर: 

परत एकदा वेगळ्याच पद्धतीने मानवी मनाचा ठाव घेण्याचा एक चांगला प्रयत्न..... आवडलं लेखन.

“तसं हे काम सोपं होतं, पण महाद्वारावर असलेला तूझाच खडा पहारा तोडणं सोप्याला अवघड स्वरूप देऊन गेला... “>>> माझ्या दृष्टीने हा सर्वात महत्वाचा भाग आहे.
आपल्या मनाचं दार बंद असल्यास केवळ आपणच नव्हे तर आपलं जवळचं माणूसही घुसमटत राहतं.
उलटपक्षी एकमेकांकडे मनं व्यक्त केली (मनाची दारं उघडी ठेवली) की दु:खं, झेलण्याइतकी हलकी होतात आणि सुखं अधिक सुंदर भासतात.

अनेक जूनाट झोपड्या, त्यावरची धूळमटलेली कौलारं, विझलेली कंदिलं, जीर्ण चबूतरे, निष्पर्ण झाडी आणि बरेच काही त्या परिसरात..

आयला.. काय बागेश्री ! अगंगंगंगंगं ... गरगर फिरवून भिरकावून दिल्यासारखं वाटलं बघ. तुस्सी ग्रेट हो !

खणून झालं असेल तर ती कुदळ घेऊन आमच्या सोसायटीत खणायला ये. खूप ढेकळं झालीत. कामगार मिळत नाहीत...

आज तुझं घर खणायला घेतलंय मी

करू का विडंबन Lol

बागुली, अगं केवढीशी तु आणि काय काय विचार करतेस. -/\- कसलं तुफान लिहिलं आहेस. मस्त मस्त मस्त ! तुझ्या लेखात किंवा कवितेत काय विशेष आवडलं हे सांगण्यासाठी ओळी कॉपी करायच्या तर ते संपुर्ण लिखाणच कॉपी करावं लागतं. Happy ह्या ललिताची संकल्पनाच इतकी अप्रतिम आहे कि शब्दच नाहीत कौतुक करायला. जियो सखी ! अशीच लिहित रहा.

नेहमी प्रमाणेच अंतर्मुख करणारं!

माझ्या पोतडीत मी जमतील, मिळतील तितके दु:खी क्षण घेतो आहे भरून, ही अडगळ कायमचीच बाहेर न्यावी म्हणतोय>> हे मात्र पटल नाही. दु:खाचे क्षण असे वेगळे करता येतात का? उलट भुतकाळातल्या दु:खाच्या क्षणांच्या उपस्थिती मुळेच वर्तमानातल्या सु:खी क्षणांच महत्व पटत

वाह !!

सगळ्यांचे आभार मित्र मैत्रिणींनो..
शाम, साको Happy
डॉक, उकाका, किरण्यके, मनी- विशेष आभार तुमचे Happy

झक्क्कास!!!


तुझी मन-वस्ती सुनसान आणि निपचित वाटली मला....

इथपासूनचं वर्णन फार छान!
काही काही वाक्यं म्हणजे 'खास बागेश्री' टच!

"तपशीलातले बारकावे मांडत डोळ्यासमोर उभं राहिलं असं चित्र उभं करणं" हे आता लेखनागणिक छान जमायला लागलंय.. शुभेच्छा! Happy

सुरेख सुरेख सुरेख्..........या पेक्षा जास्त चांगले शब्दच नाहीत माझ्याकडे..... Happy

अगं, निष्पर्ण झाडंही बहरतील - तुझ्या आटलेल्या आनंदाश्रूंना स्पर्शून जो आलोय! >>> व्वाह.....
मी फारच उशिरा वाचलं....... खुप मस्तं लिहिलयस बागु....
आवडलं.... Happy