पदभ्रमणगाथा

Submitted by chaukas on 9 January, 2012 - 23:50

चालण्याचा व्यायाम हा गेली काही वर्षे माझ्या जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. महाविद्यालयातील दिवसांत धावायला जाण्याचे वेड होते. अर्धमॅरेथॉनची तयारी तर मी जवळपास सहा महिने करत होतो. शिवाय फर्ग्युसनच्या मैदानातून निघून फर्ग्युसन रस्त्याने रोज बेकरीवरून खाली येऊन बीएमसीसी रस्त्यावरून बालभारती, पत्रकारनगर करीत वेताळटेकडीवरच्या खाणीपर्यंत आणि परत अशी क्रॉस-कंट्रीही चालू होती.

धावण्याचे वेड नंतर विद्यापीठात गेल्यावरही चालू राहिले. विद्यापीठात मेनगेट-मेन बिल्डिंग-पोस्ट ऑफिस-लेडिज हॉस्टेल-मेडिकल सेंटर-मेनगेट हे अंतर तीन किलोमीटर आहे. धावत तीन चकरा जरी मारल्या तरी नऊ किलोमीटर पदरात पडत. पण औपचारिक शिक्षण पार करून पंचविशीत व्यावसायिक जगात प्रवेश केला आणि हातचे सोडून पळत्यापाठी लागण्याचे प्रसंग सोडले तर धावण्या-पळण्याशी संबंध उरला नाही.

लांबलांबच्या मजला चालत मारणे याची मुहूर्तमेढ मात्र रोवली गेली. वीस वर्षांपूर्वी मी पहिली मोठी मजल मारली ती म्हणजे इथून तळेगावला.
आषाढाचे भरून आलेले दिवस होते. मी रात्रीच्या मुक्कामास विद्यापीठातल्या मित्राकडे होतो. त्या रात्री मित्रवर्यांकडे ब्रिजचा अड्डा बसणार होता. सकाळी आरामात उठून शिवाजीनगरमार्गे बस वा लोकलने तळेगावला जावे असा बेत होता.
सकाळी उशीरा उठून आवरले आणि बाहेर पडलो. घरीच जायला निघालो असलो तरी कपडे मात्र कामाला बाहेर पडल्यासारखे होते. फुलशर्ट, पँट, चामडी बूट वगैरे. मित्रवर्यांबरोबर 'अनिकेत'मध्ये समोसा नि चहा चापला आणि मेनगेटकडे चालत निघालो. ऊन नव्हते, पाऊसही नव्हता. फारसे गदमदत नव्हते. तोवर पडलेल्या पावसाने आसमंत हिरवे झाले होते. मेनगेटपर्यंत मजेत चालत आलो, नि विचार आला की शिवाजीनगरमार्गे जाण्याऐवजी चिंचवडमार्गे जावे. चिंचवडगावची बस यायला जरा वेळ होता. राजभवनजवळच्या बसथांब्यावर पाचदहा मिनिटे थांबलो आणि हळूहळू औंधच्या दिशेने चालायला लागलो. बस पुढच्या थांब्यावर पकडू म्हणून. औधच्या अग्निशामकदलाच्या स्थानकापाशी पोचलो आणि चालण्यात गंमत वाटू लागली. म्हणून चालत राहिलो.
औंधचे उरो-रुग्णालय ओलांडून रक्षक सोसायटीपाशी पोचलो आणि निर्णय घ्यायची वेळ आली. चिंचवडगावची बस घ्यायची असेल तर उजवीकडे जाणे भाग होते. डावीकडे वाकड गावातून बायपासला गेलो तर बसचा नाद सोडून एखादा ट्रक पहावा लागला असता.
त्या काळात बायपास हा देहूरोडपासून वाकडपर्यंतच (सध्या जिथे हिंजवडीकडे जाणारा फ्लायओव्हर आहे तिथपर्यंत) होता. बालेवाडीची स्टेडियम्स कागदावरच काय ती उमटू लागली होती. आणि हिंजवडी हे एक दुर्गम खेडे होते. एक्स्प्रेसवे कुणाच्याही कल्पनेत नव्हता.
चालायचा मोह आवरला नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवी होऊ घातलेली शेते होती. थंडगार हवेच्या झुळकी मधूनच वाहत होत्या. वरती ढगांची लगबग चालू होती. सूर्य कायदा आणि सुव्यवस्थेसारखा होता. कुठे दिसत वा जाणवत नव्हता.
वाकड गावातल्या चौकात एक वडापावची गाडी होती. तळणीच्या तेलाचा खमंग वास चौकभर पसरला होता. तिथे न थांबण्याचे पातक केले नाही. बायपासच्या तिठ्यावर येईस्तोवर तथाकथित मध्यान्ह होत आली होती. आता शरीराचे यंत्र मध्यलयीत निवांत चालू होते.
बायपासला वळलो आणि एक पावसाची सर आली. खांद्यावरची डफेल बॅग पाण्याला दाद देत नसे. आणि सर लहानशीच होती. पण अंगातले कपडे भिजले. कमरेचा चामडी पट्टा आणि पायातले चामडी बूट "आम्ही आहोत बरं का" करायला लागले.
पवनेचा पूल ओलांडला आणि परत एक जोरदार सर आली. आडोशाला म्हणून एका चहाच्या टपरीवर थांबलो. थांबलोच आहे म्हणून चहा घेतला. आणि समोर दिसली म्हणून सिगरेट घेतली. ब्रिस्टॉल ओढण्याचा योग तोवर आलेला नव्हता. काडेपेटी सादळलेली होती म्हणून थेट चहाच्या स्टोवरूनच करंट घेतला आणि उजव्या भुवईवर चटका खाल्ला.
देहूरोडचा फाटा येईस्तोवर गोष्टी जरा कठीण होऊ लागल्या होत्या. बुटांत एव्हाना पुरेसे पाणी गेले होते आणि चुबकत होते. अजून एकदोन सरी येऊन गेल्या होत्या. मांड्या बधिरायला लागल्या होत्या. तरीही मी सोमाटणे फाट्यापर्यंत कसेबसे रेटवले. आता पायाला फोडही आले. कमरेपाशी पट्टा काचायला लागला. बसने उरलेले अंतर पार करण्यावाचून गत्यंतर नाही असे जाणवले. आणि माझा अडेलतट्टूपणा उफाळून आला. मी बूट काढून हातात घेतले आणि पायाच्या ब्लिस्टर्सना सुखावह वाटावे म्हणून रस्ता सोडून शेजारच्या चिखलाच्या पट्टीतून पदयात्रा चालू ठेवली. घरी पोहोचलो तेव्हा संध्याकाळ येऊ घातली होती. सगळे मिळून पाच ते सहा तास लागले होते.
आधी गरम पाण्याने अंघोळ केली, पायाला खूपसे कैलास जीवन चोपडले आणि मांजरांना आजूबाजूला घेऊन 'वस्त्रहरण'ची कॅसेट ऐकत बसलो. रात्री 'सोलन नं १' नामक एक जादूई सोनेरी द्रव्य प्राशन केले. या द्रव्याची महती ज्यांना माहिती आहे त्यांना काय ते कळेल.

त्यानंतर मोठी चाल अशी झाली नाही. बावधनला रहात असताना माझे कामाचे ठिकाण डेक्कनला होते. सकाळी येताना मित्रासोबत त्याच्या स्कूटरवरून यायचे आणि संध्याकाळी दहा किलोमीटर चालत घरी जायचे असे अधूनमधून केले. मग मॉडेल कॉलनीत रहात असताना एकदा मामेबहिणीकडे वारज्याला आणि मित्राकडे साळुंके विहारला असे चालत गेलो. मॉडेल कॉलनीतून विद्यापीठमार्गे खडकी स्टेशन, तिथून स्पायसर कॉलेज, ब्रेमेन चौक आणि परत असे बर्‍याच वेळेला केले.

वेताळ टेकडी ही पटावर होतीच. पण टेकडीवर जायचे म्हणजे विशिष्ट वेळा पाळाव्या लागतात. रस्त्याने चालायला तसे नसते. वारजे आणि साळुंके विहार हे दोन्ही मी भर दुपारी पादाक्रांत केले होते.

पण येथवर सगळे कसे 'जमेल तेव्हा जमेल तसे' या तत्त्वावर चालू होते. हृदयविकाराने झटका दिला आणि आहार-विहारावर निर्बंध बसले. दिवसाला दोन किलोमीटर चाललो तरी खूप वाटू लागले. त्या निर्बंधांतून बाहेर पडण्यासाठीचे प्रयत्न फारच धीम्या गतीने रेटवावे लागले. पण सहा महिन्यांतच मी रोज किमान सात किलोमीटर चालणे एवढे लक्ष्य गाठले. पहिल्या वाढदिवशीची स्ट्रेस टेस्ट डॉक्टरांना सुखावून गेली. त्याच दरम्यान मी एक (पहिली आणि शेवटची) नोकरी घेतली. जवळजवळ वर्षभर ती नोकरी आणि चालणे हे नियमित राहिले.

नोकरी सोडली आणि नंतर स्वतःचा व्यवसाय, स्वायत्त बर्छीगिरी आणि गेले वर्षभर परत स्वतःचा व्यवसाय या धबडग्यातही सकाळी आणि/वा संध्याकाळी चालणे हे मी शक्यतो नियमित ठेवले. अगदीच काही नाही तर ताथवडे उद्यान, थोरात उद्यान, आयडियलचे मैदान वा पीवायसीचे मैदान यापैकी एक तरी तुडवण्याचे धोरण ठेवले. ते अगदीच यशस्वी झाले असे म्हणवत नाही, पण काहीतरी चालू राहिले एवढे खरे.

उन्हाळ्यात जसजसा दिवस मोठा होत गेला तसतशी वेताळटेकडीवर जाण्याची इच्छा वाढत गेली. दोनचारदा संध्याकाळी गेलोही. पण संध्याकाळचे जाणे हे कार्यालयातून निघण्यावर अवलंबून असल्याने ते नियमित होण्याची शक्यता नव्हती. सकाळचेच काहीतरी जमवायला हवे होते. त्यानुसार तीनपाच वेळेला गेलो. पण ज्यांना टाळण्यासाठी मी पृथ्वी सोडून चंद्र गाठला असता अशी माणसे तिथे भेटल्यावर टेकडी आपली नव्हे हे ध्यानात आले. परत रस्त्यावर यायची वेळ आली. मग मी दोन तास चालायचे एवढाच माफक उद्देश ठेवून त्या वेळात शिवाजीनगर-विद्यापीठ-परत, पुणे स्टेशन-परत, वारजेनाका-परत, असे मार्ग पादाक्रांत केले.
मग विचार आला तो असा, की जी वेताळटेकडी चढण्यासाठी मी धडपडत होतो, तिलाच मोठ्ठी प्रदक्षिणा का घालू नये? म्हणजे, पौड रस्त्याला आयडियल कॉलनीतून सुरुवात करायची, चांदणी चौक गाठून तिथून बावधन-पाषाण-अभिमानश्री करीत विद्यापीठ गाठायचे, तिथून सेनापती बापट रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, नळ स्टॉप, पौड फाटा करीत परत आयडियल कॉलनीचे मैदान. विचार चांगला वाटला. दुचाकीवर फिरून अंतर मोजले. ते १९. ४ किमी भरले. साधारण तीन-सव्वातीन तासात व्हायला रपेट हरकत नव्हती.

एका रविवारी पहाटे चारलाच उठलो. आवरून दुचाकी काढली आणि आयडियलचे मैदान गाठले. तिथून सुरुवात करून तिथेच परत असा बेत होता.
पावणेपाचला आयडियलच्या मैदानाभोवती फक्त एक मफलरवाले काका आणि नऊवारीतल्या काकू रमतगमत चालले होते. मी दुचाकी लावून मयूर कॉलनीतला रस्ता गाठला. आणि अजंता कॉम्प्लेक्सपाशी उजवीकडे वळून पौड रोड गाठला.
तेव्हाच मुंबईहून आलेल्या एका इंडिगोमधून "सोलापूरला कसे जायचे? " अशी पृच्छा झाली. एवढ्या पहाटेही माझा ललाटलेख वाचणारे मानव एवढ्या मोठ्या प्रमाणावर का जन्माला आले या प्रश्नाने हताश होऊन मी आभाळाकडे हात केला. एकदम एका वेळेला अख्खे सोलापूर कसे 'वर' जाईल या प्रश्नाने प्रश्नकर्ता बुचकळ्यात पडला. मी चालू पडलो.
सोबत भ्रमणध्वनीमधले संगीत होते. आणि Fox नामक Clear Mintच्या गोळ्या होत्या. या गोळ्यांची ओळख बारा वर्षांपूर्वी mouth freshner म्हणून झाली होती. त्यानंतर दहाएक वर्षे त्या गोळ्यांशी काही संबंध नव्हता. पण एकदा त्या गोळ्या परत दिसल्या, आणि त्यातील घटक पदार्थ वाचताना त्यात साखरेबरोबरच मीठही आहे हे ध्यानात आले. तेव्हापासून कुठल्याही गिरीभ्रमणाला जाताना त्या गोळ्या असणे गरजेचे झाले होते. आजचे चालणे डोंगरदर्‍यांतून नसले तरी शक्यतो वाटेत कुठे थांबायचे नव्हते. त्यामुळे मध्येच थांबून काही खाण्यापिण्यापेक्षा खिशातच काही ठेवणे अधिक बरे वाटले.

भ्रमणध्वनीमधले संगीत हा एक मोठा गंमतशीर प्रकार होता. वाचनाप्रमाणेच संगीतात माझी आवड कुठल्याही बंधनात जखडून रहायला नकार देते. अगदीच सलील कुलकर्णी छाप संगीत सोडले तर बाकी यच्चयावत संगीतप्रकार माझ्या संगणकावर आणि तिथून भ्रमणध्वनीवर सुखाने नांदत असतात.
सुरुवातीला मी थेट जेम्स बाँडच्या चित्रपटांची गाणी लावली. सकाळी सकाळी चिकन टिक्का. शर्ले बॅसीच्या आले-मिरी-मिरचीचा ठेचा मधात घोळवल्यासारख्या आवाजात "गोल्डफिंगर" नि "डायमंड्स आर फॉरेव्ह" ऐकून झाले. मग फ्रँक सिनात्राच्या गंभीर आवाजात "फ्रॉम रश्शा विद लव" ऐकून झाले. नॅन्सी सिनात्राने "यू ओन्ली लिव ट्वाईस" मधल्या तत्त्वज्ञान सांगणार्‍या ओळी पार्श्वसंगीतात आपला झारदार आवाज मिसळत म्हटल्या. आणि टॉम जोन्सने "थंडरबॉल"चे शब्द उत्कंठा वाढवीत पेरताना 'जेम्स बाँड' म्हणजे शॉन कॉनरी. बाकी म्हणजे नुसती बुजगावणी हे न बोलता सांगितले.

एव्हाना जेमतेम वनाझपर्यंत आलो होतो. मग फाउस्टो पॅपेटीच्या सॅक्सोफोनवर आलो. साठ आणि सत्तरच्या दशकातल्या हिंदी चित्रपटसंगीताची आठवण करून देणार्‍या या सुरावटी. त्या मुळातून ऐकण्यातली खुमारी काही निराळीच. त्यातली Girl from Ipanema ही ग्रॅमी पुरस्कार विजेती सुरावट पुन्हापुन्हा ऐकत रहावीशी वाटते.
एव्हाना चांदणी चौकाचा चढ चढून बावधनच्या रस्त्याच्या उतरणीला लागलो होतो. चढ झपाट्याने चढताना चांगलाच दम लागला. सुरुवातीचा वेग टिकवणे शेवटी चांगलेच जड गेले. इंधन म्हणून एक Foxची गोळी तोंडात सरकवली.
सॅक्सोफोनची धुंदी पाषाण तलावापर्यंत टिकली. मग पाषाण सर्कलपर्यंत कानातली ध्वनीबोंडके काढून थोडा पळण्याचा प्रयत्न केला. जमला.

पाषाण सर्कलला उजवीकडे वळून निघालो. समोर पूर्वदिशा चांगलीच झगझगीत झाली होती. आदल्या रात्री झोपायला मला जरा उशीरच झाला होता. तो शीण क्षणभराकरताच अंगावर आला. मग परत एक Fox चघळायला घेतली आणि ध्वनीबोंडके कानात खुपसून Music & Lyrics कडे वळलो. फडकत्या ठेक्याचे Pop goes my heart चांगले तीन वेळा ऐकले नि परत शांतपणे चालत राहिलो.

एव्हाना मी 'मौसम विज्ञान संस्था' ओलांडली होती. NCL आधीचा चढ लागला. मग पंचवटीकडे जाणारा रस्ता उजव्या हाताला गेला. तिकडे जाऊन सरळ टेकडीवर चढावे नि ARAI वरून खाली उतरून दुचाकी गाठावी असा एक मोह होऊन गेला. पण तो टाळला.
NCL समोर आल्यावर मला तिथे दहा वर्षांपूर्वी काम करणारे मित्रद्वय बोस आणि डे आठवले. "की कोच्छीस रे बूढोभाम बोका? " आदि प्रेमळ संवाद आठवले. मग मी परत संगीताकडे (पक्षी:भ्रमणध्वनीकडे) वळलो आणि थेट भूपेन हजारिकांनाच आवाहन केले. तलत आणि सैगल यांच्या अतर्क्य मिश्रणाने तयार झाल्यासारखा आवाज. 'आमी ऍक जाजाबॉर', 'मानुष मानुषेर जोन्मे' ऐकून झाल्यावर सदाबहार "दोला हे दोला" ऐकले नि भरून पावलो. परत विद्यापीठ चौकापर्यंत मुकाट.

एव्हाना शरीराची गाडी चांगलीच तापली होती. विद्यापीठा चौकात उजवीकडे वळल्यावर 'श्री'मध्ये चहा-वडा चापावा असा विचार केला. पण एकदा चालायला सुरुवात केल्यावर थांबायला नको वाटते, आणि थांबल्यावर परत चालायला लागण्याची शक्यता अजूनच क्षीण असते हे मला चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे मुकाट रस्ता तुडवीत राहिलो. एव्हाना निघून दोन तास होत आले होते. ऊन फार चटकायला लागण्याआधीच परत पोहोचलेले बरे म्हणूनही थांबलो नाही. जसराजांना आवाहन केले नि त्यांनी शिष्यवर्गासमवेत कोरसमध्ये म्हटलेले "कजरारे नैना गोरी के" ऐकून घेतले.
एव्हाना वेताळबाबा चौक गाठला होता. क्षणभर दम टाकून अजून एक Fox चेपली आणि कार्लोस संटानाला पटावर आणले. साठच्या दशकाच्या अखेरीस आणि सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार झालेला हा इसम नव्वदच्या दशकाच्या अखेरीस परत त्या लाटेवर स्वार झाला. Oye como va हे मी ऐकलेले त्याचे पहिले गाणे. तेव्हा तो एक विस्मृतीतला कलाकार झालेला होता. नंतर त्याच्या Evil ways आणि Black magic woman या गाण्यांनी माझ्या आयुष्यात चांगलीच खळबळ माजवली होती. ती कळसाला पोचली आणि नव्वदीच्या दशकाच्या अखेरीस हा इसम Smooth चा झंझावात घेऊन अवतरला. सगळेच अवघड आणि अशुद्ध झाले. नाईलाजाने त्याच्यावर बहिष्कार घालावा लागला.

दशकभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि गेल्या वर्षी मी धीर करून गतस्मृतींचा दगड उलथून पाहिला. त्याखाली कुणी विषारी जिवाणू नव्हते. मग परत संटानाला पावन करून घेतले.
त्याची गाणी ऐकत चालत राहिलो. SNDT पाशी कालव्याच्या रस्त्यावरून जाण्याचा मोह टाळून नळ स्टॉपपर्यंत सरळ गेलो नि उजवीकडे वळलो. पौड फाट्यापर्यंत (किंबहुना, ARAI फाट्यापर्यंत) असलेल्या चढाने पाय आणि छातीचा भाता चांगलाच बोलू लागला. पण रेटवले. संटानाला जे सांगायचे होते ते तोवर सांगून झाले होते. संगीत बंद केले नि भ्रमणध्वनी खिशात टाकला.

दोन तास पंचावन्न मिनिटांत मी परत माझ्या दुचाकीपाशी पोहोचलो.

पूर्वप्रसिद्धी: मनोगत

गुलमोहर: 

जबरी आहे तुमची शैली.

वर्षी मी धीर करून गतस्मृतींचा दगड उलथून पाहिला>>
ज्यांना टाळण्यासाठी मी पृथ्वी सोडून चंद्र गाठला असता अशी माणसे तिथे भेटल्यावर टेकडी आपली नव्हे >>
सूर्य कायदा आणि सुव्यवस्थेसारखा होता. कुठे दिसत वा जाणवत नव्हता.>>>
हातचे सोडून पळत्यापाठी लागण्याचे प्रसंग सोडले तर धावण्या-पळण्याशी संबंध उरला नाही.>>

'जेम्स बाँड' म्हणजे शॉन कॉनरी. बाकी म्हणजे नुसती बुजगावणी हे न बोलता सांगितले.>>>>> सॉरीच पण आय बेग टु डिफर. शॉन कॉनरी के व ळ म हा न आहे प्रंतु बाँड म्हणजे पिअर्स ब्रोसनान!
"दोला हे दोला" >>> म्हणजे " उंचे नीचे रास्तोंसे कांधे लिये जाते है" तेच नां?
मीपण चालणेप्रेमी त्यामुळे लेख आवडलाच. मी आणि आई एकदा दुर्वांकुर ते पौड रोडचा भवानी बस स्टॉप चालत गेलेलो.

मस्तच.
हातचे सोडून पळत्यापाठी लागण्याचे प्रसंग सोडले तर धावण्या-पळण्याशी संबंध उरला नाही.>>
ज्यांना टाळण्यासाठी मी पृथ्वी सोडून चंद्र गाठला असता अशी माणसे तिथे भेटल्यावर टेकडी आपली नव्हे >>
सूर्य कायदा आणि सुव्यवस्थेसारखा होता. कुठे दिसत वा जाणवत नव्हता.>>>
हे भारी आवडले.

मस्त.

सूर्य कायदा आणि सुव्यवस्थेसारखा होता. कुठे दिसत वा जाणवत नव्हता.>>>
>>> लय भारी.

वाह ! लिहिण्याच्या एका वेगळ्याच शैलीमुळे हे एका सुखद अनुभवासारखंच आमच्यापर्यंत पोहचवता आलं. Happy

अफाट लिहीता तुम्ही चौकस........
सगळे अंतर वाचता वाचता चाललो तुमच्याबरोबर......

<<<शॉन कॉनरी के व ळ म हा न आहे प्रंतु बाँड म्हणजे पिअर्स ब्रोसनान!

अगदी १००% सहमत. शॉन कॉनरीचा बाँड स्त्रीलंपट वाटतो पण ब्रॉसननचा बाँड अगदी थंड डोक्याचा एजंट वाटतो.

मस्त लिहीलय.
सोलन नंबर १ ने जुन्या स्मृती जाग्या केल्या. ह्या व्हिस्कीचे प्रमोशन करायला मुंबईभ्रमण केले होते. 'मेड बाय प्युअर हिमायलीयन वॉटर' ही त्याची टॅगलाईन. क्वार्टरवर एशट्रे, हाफवर ग्लास आणि फुल्ल खंब्यावर अ‍ॅप्पल ज्युसची बाटली हा सगळा फ्री गिफ्टचा लवाजमा खांद्यावर मारून वाईन शॉपच्या बाहेर उभं राहून/दुकानदार चांगला असला तर मग बसून, कित्येक संद्याकाळ तळीरामांना हे जादुई सोनेरी द्रव्य विकत घेण्यासाठी वाक्चातुर्याचा कस लावला होता. कष्टाचे असले तरी तेही मंतरलेले दिवस... फक्त ते जादुई सोनेरी द्रव्य कधी प्राशन केले नाही. Happy
(अवांतर प्रतिसादासाठी क्षमस्व. आठवलं म्हणून शेअर केलं.)