घर, परिसर, झाडं वेली, पशु पक्षी इत्यादि! : २) पाहुणा

Submitted by मानुषी on 25 August, 2009 - 00:28

सकाळी सकाळीच लुईचं विचित्र भुंकणं ऐकू आलं. चहा पिता पिता खाली डोकावले. तर अंगणात कडुलिंबाच्या झाडाखाली लुई महाराज कश्यावर तरी नेम धरून, माना तिरक्या करून करून वेडया वाकडया उडया मारत होते. मध्येच पूर्ण भुईसपाट होऊन पुढील उजवा हात पुढे काढत होता. हो....... तो पुढील पायांचा उपयोग अगदी आपण माणसं जसा आपल्या उजव्या हाताचा वापर करतो ..अगदी तस्साच करतो. विषेशत: त्याला जर वाटलं की आपलं त्याच्याकडे लक्ष नाहीये तर तो चक्क त्याच्या उजव्या हाताने(अर्थातच पुढील पायाने) आपल्याला स्पर्श करतो व अगदी आपल्या डोळ्यात पहातो. कधी कधी जर आपण त्याला काही कारणानं रागावलो तरी तो हीच स्ट्रॅटेजी अवलंबतो! आता सांगा त्याच्या पुढील पायांना पाय म्हणणे योग्य आणि माणुसकीला धरून आहे का?

असो..........तर मी चहा तसाच टाकून पळत अंगणात गेले. पहाते तर लुईचं आदिवासी नृत्य अजूनही चालूच! तोंडानंही धड भुंकणं नाही धड गुरगुरणं नाही असे चमत्कारिक आवाजही चालूच! जरा जवळ जाऊन पाहिलं तर खारूताईचं एक चिमुकलं पिल्लू अगदी भिंतीलगत भेदरून बसलं होतं. माझ्या पोटात एक मिनिट गोळा आला ...वाटलं याने जर या पिल्लाला काही केलं तर?
मी पुढे झाले. पटकन पिल्लाला जरा आडोसा करून उभी राहिले. आणि माझ्या मुलाला हाक मारली. आम्ही दोघेही आमच्या घरात प्राणीवेडे आहोत. (पहा- बोक्या मनी आणि मॉस्किटो नेट)
एकीकडे लुईचीही समजूत घालत होते. "लुई...अरे आपल्याकडे पाहुणा आलाय तो......पाहुण्यांशी असं वागतात का?" तोही समजून घेण्याचा त्याच्या परीने प्रयत्न करत होता.

तेवढयात माझी धाकटी जाऊही अवतीर्ण झाली. तिची एक गंमतच आहे. आता लुई आमच्याकडे येऊन ३ वर्षे झालीत बरं का! तरी तो नुसता जरी तिच्या जवळून गेला किंवा त्याच्या नुस्त्या शेपटीचा अगदी ओझरता जरी स्पर्श झाला तरी ती किंकाळ्या मारायला लागते. आता पहा.... एकीकडे असं आणि एकीकडे घरात काहीही स्पेशल पदार्थ झाला तरी लुईसाठी तिचा जीव अडकतो. बाहेरून आईसक्रीम आणले तर ती लुईसाठी न विसरता एक कप आणेल.

आता मुलगाही अत्यंत हर्षभरित चेहेयाने उपस्थित झालेला. त्याला परिसरात कुणालाही न दिसणारे किडे मकौडे, पशुपक्षी, आणि त्यांच्या गमती जमती दिसत असतात. त्याला खाली काहीतरी रोमहर्षक घटना घडतेय हे आतापर्यंत कळून चुकलेलं होतं.
तो पर्यंत मी केरलं(केर उचलायच्या सुपाला मी केरलं/केरुट म्हणते) आणि अंगणातल्या रोपांना पाणी घालण्यासाठी वापरण्याची छोटी बादली अश्या साधनसामुग्रीची जुळवाजुळव केली होती. मुलगा खाली येईपर्यंत मी केरल्याने ते पिल्लू अलगद उचलून बादलीत अगदी हलक्या हाताने ठेवलं होतं.
" ई sssईsss ई ssss...अहो वहिनी ..काय करताय ते? अहो झाडांना पाणी घालायची बादली आहे ती" जाऊ किंचाळली.
"अगं मग काय झालं? खारूताईचं पिल्लू आहे ते ...काही घाणेरडं आहे का ते?" मी अगदी शांतपणे तिची समजूत काढली.
"शी बाई ...आता तुम्हालाच घेऊन टाका ती बादली" इती जाऊ.
"अगं जिवंत पिल्लापेक्षा त्या तुझ्या झांडांना पाणी घालायच्या बादलीचं काय एवढं कौतुक?" मीही लावून धरलं होतं.

या सर्व प्रसंगाला साक्षीदार म्हणून आता माझी पुतणी सुद्धा तिथे उपस्थित झाली होती. आमच्या(अर्थातच मी व मुलगा) संगतीत राहून ती सुद्धा आता प्राणीवेडी या पदवीप्रत पोचली आहे. ती नुसती फ़िदीफ़िदी हसत होती. अश्या वेळी ती छुपा गद्दार असते.
आता मुलगा व पुतणी दोघंही त्या बादलीत एकदमच डोकावायला लागले.
"आई गं ...कित्ती गोडुस आहे ते पिल्लू!"पुतणी एकदम तिच्या वयाला(टीनएज्) शोभेलसं चित्कारली.
"शी बाई...अगं मैथिली ... अगदी त्या बादलीत तोंड घालायची काही गरज आहे का?आणि त्यात कसलं आलंय गोडुस आणि बिडुस?आणि सलील काय रे तू तरी.... एकेक प्राणी गोळा करतोस नुसता!" जाऊ अजूनही करवादलेलीच होती.

मध्ये एकदा माझ्या मुलाने कमळाच्या कुंडीत सोडण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणले तेव्हाच ती म्हणाली होती, "छान आता अगदी घराचं प्राणी संग्रहालय करायचंय वाटतं!"
"अगं काकू हा ब्लॅक मॉली पाहिलास का? याला पिल्लं होणार आहेत बहुतेक" माझा मुलगा काकूला चिडवायचा एकही चान्स सोडत नसे.
तरी जेव्हा त्या ब्लॅक मॉलीला खरंच पिल्लं झाली तेव्हा मात्र अगदी कुतुहलाने आणि उत्साहाने पहायला आली होती.

असो ...तर आम्ही सगळे ती बादली घेऊन वर गेलो. घरात एक छानशी वेताची टोपली सापडली. त्याला वर धरायला मस्तपैकी गोल हँडल होते. वर त्याला छानसा एक बो ही होता......लाल लाल चुटुक! सगळे आनंदले. चला खारूताईला घर तरी छानच मिळालं.
"काकू त्याला आता खायला काही तरी द्यायला पाहिजे गं...कधीचं भुकेलेलं असेल." पुतणी म्हणाली. जावेने एक हताश कटाक्ष आपल्या मुलीकडे टाकलाच. म्हणाली , ''आधी स्वता:च्या भुकेचं पहा. शाळेत जायचंय ना.............जेवायखायला काही नको वाटतं''!

शेवटी सर्वानुमते शेजारच्या दुकानातून ड्रॉपर आणायचं ठरलं. पुतणी घाईघाईत सायकवर जाऊन ड्रॉपर घेऊन आली. एका छोटयाश्या वाटीत दूध आणले. आणि पिल्लाला दूध पाजण्याचा प्रयत्न चालू झाला. सुरवातीला ते खूप बुजत होते. पण पोटात भूक जशी खवळत होती तसतसे ते मस्तपैकी आपलं चिमुकलं तोंड वर करून दूध प्यायला लागलं. एका वेळेस साधारणपणे अर्धा ड्रॉपर दूध ते प्यायचं.
आणि पुन्हा टोपलीत अंथरलेल्या कापडाच्या चुण्या शोधून त्यात ढुश्या मारून मारून गुडुप झोपून जायचं. आणि झोपायचं पण असं मस्त गुर्गुटून .........आणि अंगाभोवती शेपटीचा गोल मस्त गुंडाळलेला!

एकाच दिवसात त्याच्या दुधाच्या वेळांचं मस्तपैकी वेळापत्रक ठरून गेलं. मुलगा ऑफ़िसला जाताना सांगून जायला लागला, " आई आता दुपारी दोन वाजता त्याला दूध देशील ना?"
पुतणी पण शाळेतून आली की पिल्लाला भेटायला येऊ लागली. असे दोन दिवस गेले. हळूहळू त्या टोपलीत अगदी छोटया छोटया काळ्या लेंडयाही दिसायला लागल्या. सगळे आनंदले. चला........नीट सगळं रूटीन लागलेलं दिसतय. शी शू मं मं गाई गाई!

आता तर आपण ड्रॉपर नुसता त्याच्या जवळ धरायचा अवकाश की ते आपल्या मागील पायावर उभे राहायचे(खारूताईची टिपिकल पोझ्) आणि पुढील दोन्ही पायांनी ड्रॉपर मस्तपैकी धरून वगैरे दूध प्यायला लागलं. काय गोंडस दृश्य होतं ते. अगदी मन भरून यायचं ते पहाताना!
तिसर्‍या दिवशी सकाळी मला त्याला दूध द्यायला जरा उशीर झाला तर काय गंमत........! साहेब टोपलीच्या काठावर मागील दोन्ही पायावर उभे......पुढचे दोन्ही पाय हवेत...आणि जोरात चिर्रर्रर्रर्रSSSS आवाज करून माझ्याकडे पहात होतं. मला तर वाटलं अगदी माझ्याकडे पाहून दोन्ही हात ओवाळून उपहासानं म्हणतंय, " काय किती हा उशीर? आज मला दूध मिळणार आहे की नाही?"

मग ३/४ दिवसात त्याला जरा तरतरी आल्यावर आम्ही निर्णय घेतला त्याला परत कडूलिंबावर सोडून पाहू. आम्ही गच्चीत गेलो. आमचं हे कडूलिंबाचं झाड खूप जुनं आहे. त्यामुळे त्याचा विस्तार प्रचंड आहे. त्याच्या खूपश्या फ़ांद्यांचा विस्तार गच्चीत पसरलेला आहे. त्या पिल्लाला टोपलीतून काढून एका रुमालात घेतले. आता मुलगा पुढे झाला. त्याने हळूच रुमालातून त्याला फ़ांद्यांच्या गच्च विस्तारात सोडून दिले.
चला......वाटलं ....आता ते बहुतेक त्याच्या कुटुंबाला भेटेल. तरी सगळ्यांनाच जरा चुकल्यासारखं होत होतं.

जरा एक तासही गेला नसेल तर खालून जावेच्या हाका ऐकू आल्या. " वहिनी ...अहो ती खार पहा परत इथे अंगणातच फ़रशीवर पळतीये." झालं! नेमकं हिलाच दिसले ती खार परत. म्हणजे आता पुनश्च आरडा ओरडा!
पुनश्च त्या पिल्लाला धरून वर आणलं आणि परत त्याची स्थापना त्या टोपलीत केली. एक दिवस छान दूध प्यायलं पण नंतर दूधच पीइनासं झालं. जरा लक्ष देऊन नीट पाहिलं तर त्याच्या चिमुकल्या तोंडाला काही तरी लागून जखम झाल्यासारखं दिसत होतं. आता काय करावं? त्याला कुठे आणि काय लागलं असावं काहीच कळेना.

मुलाने आणि पुतणीने नेटवरून खारींविषयी माहिती काढली. ती मात्र मजेशीर होती.
"अगं काकू माहितिये का तुला ...अगं खारी साधारण ५/६ महिन्यांच्या झाल्यावर त्यांना छानपैकी कॅरॅक्टर येतं! म्हणजे तोपर्यंत त्यांना स्वता:ची पर्सनॅलिटी येते. अगं म्हणजे पाळीव खारींना बरं का!" पुतणी खूप हसत होती.
"आई, अगं या पाळीव खारींना खायला वगैरे द्यायला उशीर झाला ना तर त्या मालकाच्या चक्क पँटवर वगैरे चढून खायला मागतात, कधी घराचे पडदे, घरातले कपडे कुरडतात." इती मुलगा.
तरी या पिल्लाबद्दल जरा काळजीच वाटायला लागली होती. जावेच्या कानावर पिल्लाच्या तब्ब्येतीबद्दल गेलं होतं. ती सुद्धा एकदा येऊन त्याला पाहून गेली.

पण आता मात्र ते अगदीच काहीच खाईना. एवढासा जीव सुकल्यासारखा अगदी मलूल झाला होता. सगळे हवालदिल झाले. शेवटी आमच्या गावात एक प्राणी/पक्षीमित्र आहेत त्यांना फ़ोन करायचं ठरलं. फ़ोन केला पण ते भेटलेच नाहीत. त्यांची बायको म्हणाली थोडया वेळानी तेच फ़ोन करतील तुम्हाला. आम्ही वाट पहात राहिलो. पण फ़ोन काही आला नाही.

रात्री एकदा त्याला दूध पाजायचा शेवटचा प्रयत्न केला पण व्यर्थ! दुसया दिवशी जो तो सकाळी उठल्यावर आधी टोपलीकडे धाव घेऊ लागला. पण जे नको तेच घडलं होतं. बिचारं इवलंसं पिल्लू उताणं झालेलं होतं.
जगू सकाळी कामाला आलेला होता. त्याला सांगून बागेतच एका झाडाखाली कोपर्‍यात त्याला पुरलं.
अजूनही खारूताईची ती टोपली माळ्यावर आहे ..खालूनच त्याच्या हँडलवरचा लाललाल चुटुक बो दिसतो आणि मग त्या खारूताईच्या पिल्लाची आठवण येते. सर्वांनाच खूप चटका लावून गेलं बिचारं!

गुलमोहर: 

तुमचं दु:ख समजू शकतो, पण एका प्राण्याच्या जाण्याने झालेलं दु:ख विसरण्याचा उत्तम उपाय म्हणजे दुसरा प्राणी पाळणं.

माझी पण झालीये खार पाळून. Happy जुन्या सॉक्सच्या तोंडावर बांगडी (मेटलची) बसवायची. खारीसाठी ढोली तयार झाली. ही ढोली आम्ही पिंजर्‍याच्या आतमध्येच ठेवलेली. साधारण महिन्याभराने आम्ही पिंजर्‍याचा दरवाजा उघडाच ठेवायला लागलो. घर तळमजल्यावत आणि आजूबाजूला झाडं. चींकार्‍याला (हे आम्ही तीच ठेवलेल नाव) अजून काय पाहिजे. दिवसभर भटकून रात्री मुक्कामाला हजर व्हायची. पहिल्या दिवसापासून खायला घालताना एक विशीष्ट शीळ घालायची सवय ठेवल्याने, त्या शीळेवर तीला कधीपण बोलावता यायचं.

दुपारी मातोसरी झोपलेल्या असल्या तरी अंगाखांद्यावर बागडून त्यांना उठवून खाण्ण वसूल करायचा नेम कधी मोडला नव्हता तीन. हळूहळू ती पूर्णपणे जंगलाळली आणि बोलावल्याशिवाय यायची बंद झाली.

अजूनही एखाद पिल्लू मिळालं तर पाळायची ईच्छा आहेच. कारण सुस्थळी पडलेल्या लेकीच समाधान दिलं या प्राण्यानं आम्हाला.

इथे इतके छान प्राणीमित्र भेटले की खूप बरं वाटत.

आई ग ! सुरुवातीला मला इतके छान वाटले, आपण का जवळ रहात नाही, तुझ्या घरी डोकावलो तरी असतो असे वाटले..पण शेवट वाचून..खरच चटका ग. व्हेट वगैरे नाही का ग तुमच्या जवळपास ?
चित्रण सुरेख केलं आहेस पण !

हाय, प्राणीप्रेम हा आपल्यातील समान दुवा आहे एम एम.! ल्युक कोणत्या जातीचा आहे. माझ्याकडे ४ डॅशुन्ड्स आहेत. असा प्राणी भेट्ल्यास जरूर व्हेट कडे न्यावे. मला पण खूप बायका भेटतात कुत्रे म्हणले की अर्धमेल्या होणार्या. काही लोकाना स्वच्छ्ते चे इश्श्यू असतात.

अमित लिम्बू च्या शेतावर कुत्रे पाळायचे का?

हम्म.. आमचाही होता एक मोत्या. भटका होता, पण आमच्या पायरीवर कायम बसून रहायचा पाळलेला असल्यासारखा. Happy शेवट आमच्या ओट्यावरच झाला त्याचा - म्हातारपणामुळे. Sad
एक पोपटही पाळला होता. वर टांगून ठेवावा लागे पिंजरा कारण मागच्या पुढच्या दाराने मांजरी येत असत. एकदा चुकून खाली राहिला पिंजरा अन मांजरीने त्याला बाहेर काढण्याच्या आतच घाबरून ओरडून प्राण सोडला त्याने. बोचकारल सुध्दा नव्हत तिनं, त्याच्या आवाजाने आम्ही धावलोच होतो.. असो.. Sad नंतर नाही पाळला पुन्हा पोपट.. Sad

मामी, कुणीही कुठेही काहीही पाळायचं म्हंटल की मी चारही पायांवर तयार असतो. Happy

बादवे, मी ईंडियन हाउंडसवर माहीती मिळवतोय. मिळाल्यास एखादा गावाकडं (कुडाळ) पाळायचा विचार करतोय. मामी तूम्हाला त्याची एक फाईल मेलतोय. वेळ काढून बघाच.

अरे माझे दोन पपीज आज जाताहेत बहुतेक. आता घरी दोनच कुत्रे. मला एक शिकारी कुत्रा पाळायचा आहे. त्याचे नावच ट्रिगर ठेवणारे.

सर्वांनाच प्रतिसादाबद्दल धन्यवाद. बरोब्बर सगळे प्राणीमित्र जमले आहेत.
सॅम जरा पटव ना बायकोला. माझ्या जावेला प्राण्यांची आजिबात आवड नसताना पहा आम्ही तिला कसं पटवलं असेल!

छान, प्रसंग डोळ्यासमोर उभा केलेला तुम्हि, धन्यवाद! आणि मन थोडे भुतकाळात पन गेलेले. लहान असतान्ना आम्हि पाळलेले प्राणीमित्र:
पोपट (बरेचदा - दोन तिनदा) -- आणि ते पन या खारूताई सारखे, अगदि चिमनिसारखे असतान्ना, ड्रॉपरनेच वाढवलेले, मात्र त्यांचा शेवट, काहिंचा उडुन तर काहिंचा मांजराने रात्रि झोपेत असतान्ना फडशा पाडलेला.
सुदंर शुभ्र ससे -- त्यांचा पन शेवट मांजराने रात्रि झोपेत असतान्ना फडशा पाडलेला.
कुत्रा (सोनी, भोलु) -- ह्यांच्यावर तर सर्वांचा येवढा जीव (घरचे तर सोडाच पन सर्व आजुबाजुच्यांचा पन ह्यांच्यावर भारी जीव). आणि त्यांचा तर सोडाच (आई, बाबा जर रविवारि शेतात गेले, तर ते परतल्यावर ह्यांन्ना येवढा आनंद व्ह्यायचा कि खरे प्रेम काय असते याचि प्रचीति द्यायचे, त्यान्ना मिठी काय मारायचे, सुसाट पळत काय सुटायचे, चक्क सर्वांना दाखवायचे कि बघा... आमचे आई, बाबा आले.)
आणि अरे हो आणखि एक, तुमच्या लुईसारखा विचित्रपना माझ्या बहिनीकडचा कुत्रा पन करायचा - मी जर तीन चार महिन्यात (विसरायचा नाहिच अजिबात) अर्ध्या रात्रि चक्कर मारला तरी ह्याला खुप प्रेम यायचे, आणि माझ्या मामांच्या तिन्हि मुलांचा (बाजुलाच रहायचे) तो सतत तिरस्कार करायचा कारण त्याचे त्यालाच माहित.

माधुरीकाकु छान लिहीलय, खारुताई पाळायची माझी अगदी लहानपासुनची इच्छा आहे पण अजुनपर्यंत तरी जमले नाहीये.
मात्र इथे अमेरीकेत खारी खूप दिसतात, अगदी खिडकीत सुद्धा येतात काही खायला ठेवले तर. आता मी त्या घरात यायची वाट बघतेय म्हणजे मग मला पेट खारुताई मिळेल. Happy

छान लिहिलंय, प्राणीमित्रांना आवडेलच. खारुताई हुशार असतात मात्र एकदम.
घरी आई, बायको लोकांना प्राणी नको असण्याचे एक कारण म्हणजे यांचे सगळे त्यांना करावे लागणार हे असू शकते, म्हणजे कामात भर. दुसरे कोणी जबाबदारी घेत असेल तर तोडगा निघेल. पण पाळीव प्राणी न आवडणारे, त्यांना घाबरणारे लोक असतात. Sad त्याला काही इलाज नाही..

अश्विनी धन्यवाद.
रूपाली आम्ही व्हाइट हाऊससमोरच्या बागेत गेलो होतो तिथल्या खारी काय मोट्ठ्या होत्या. जवळ जवळ मांजराएवढ्या! आणि खूप कम्युनिकेटिव्ह होत्या. आपण जर त्यांना स्टेअर ( एकटक पाहिलं ) केलं तर त्या अंगावर उडी मारतात!
लालू धन्यवाद.

माधुरीताई, छान लिहिलं आहे. आम्हालाही ३ पिल्लं मिळाली होती खारीची, त्यांचं घरटं दिसेना, त्यांचयवर लक्ष ठेवून २ एक अतस बस्लो, त्यांची आई येईल म्हणून, पण तीही आली नाही, मग आणली घरी. एक रात्र ठवलं, तुम्ही म्हणताय, तसं दूध पाजलं, पण मग, कात्रजला फोन करुन त्यांच्याकडे सोपवलं, कारण दिवसभर फक्त आईच घरात आणि तिला झेपलं नसत...

आवाहन ९९९९, शतकाच्या अखेरीस होणार्‍या वातावरणातील दुष्परिणांमाच्या जाणीवेबद्दल विप्रा तुझे आणि AIBEA चे आभार . खरेच या उपक्रमात सर्व मानवजातीने सहभागी होऊन AIBEA या संघटनेची समाजाविषयी असलेली कळकळ समजून घ्यावी . *********************************** तर मग तयार रहा दि.०९/०९/०९ च्या रात्री ०९ वाजता फक्त ०९ मिनीटे दिवे बंद करूयात. आणि थोडी सांमाजिकार्याची चव चाखूयात. होय ना? BEWARE OF GLOBAL WARMING
SAVE PLANET - SAVE MOTHER EARTH
JOIN AIBEA - ExNoRa'S 99999 LIGHTS OUT CAMPAIGN

छान लिहिलंय - हळवं करुन टाकलं अगदी.
बाकी बागुलबुवा, अश्विनीमामी, भाऊ किंवा इतरही मंडळींच्या प्राणीप्रेमाबाबत असे वाचायला खूप आवडेलच.

हो शशांक........माझ्या सर्व प्राण्यांना भेटायला तू उल्लेखलेली वर उल्लेखली सर्व मंडळी येतातच!