असच आपलं... सटर फटर... एक.

Submitted by ह.बा. on 16 December, 2011 - 05:35

असच आपलं... सटर फटर...
******************

तेल संपलेल्या पणतीची वात वाढवून... फाटलेल्या पतंगाला ढील देऊन... सुकलेल्या ओढ्यात खड्डा खणून... सगळं करून झालं... यश काही येईना... पण मी थांबणार नाही... थांबून चालणार नाही... अजुनही मुजलेल्या विहिरीवर मोट बांधायची आहे... संपलेल्या पारायणात टाळ वाजवायचे आहेत... रिकाम्या देवळाला फेर्‍या घालायच्या आहेत... एवढं सगळं करायचं आहे. व्यस्त व्यस्त व्यस्त झालोय... काहीच्या काहीच सुचत नाही... सुचलं तर असंच आपलं सटर फटर सुचत राहतं... आठवत राहत...

शाळेचं पटांगण... प्रार्थनेच्या रांगेपासून ते सव्वीस जानेवारी, पंधरा ऑगस्ट च्या परेड पर्यंत आणि हाडकी गोट्यांच्या नर फादी डावापासून ते हुस्केच्या पाट्या आखण्यापर्यंत आनंद देणार्‍या बहुतांश घटनांचे साक्षीदार. उजवीकडे दहा-बारा उंच गेलेली निलगिरीची झाडं, गेटच्या बाजूला प्राजक्त, नव्या रोपाची वाट पाहणारे विसेक रिकामे खड्डे आणि डाव्या बाजूला हिरवी गार जाई... तिच्या अंगाखांद्यावर पोटातला पिवळसर गोंडा नाचवत उमललेली टवटवीत लाल फुलं... शनिवारची सकाळची शाळा, हेडबाई जाईजवळ गेल्या एकटक बघत राहिल्या, एक फुल पोरांच्या नजरेतून सुटलं होतं. दोनेक दिवसांपुर्वीचं असेल... सुकलेलं, मरगळून कोलमडलेलं... टाचा उचलून बाईंनी त्याचा देठ खुडला... झाडावर आता फक्त देखणी फुलं होती...
"बाई ते पण तोडा ना"
"ते नसतं तोडायचं"
"मग हे का तोडलं?"
"सुकलेलं ते... त्याचं आयुष्य संपलेलं... असं लटकत राहिलं की त्याला त्रास होतो"
सुकलेलं फूल तुटायला हवं, कुरूप दिसतं ते... त्रास होतो त्याला... टाचा उचलाव्या लागतील... देठ खुडावा लागेल... मग सगळं कसं सुरळीत होईल... आनंदी आनंद गडे!
जाईच्या सुखाची वाट किती सोपी... शाळेच्या हेडबाईंना वाटलं अन झालं... माणसांचा हेडमास्तर शहाणा व्हायला हवा... हसणार्‍या फुलांशी मरण मरण खेळत बसतो... सुकलेली फुलं त्याची वाट बघत असताना...

गुलमोहर: 

सर्वांचा आभारी आहे!!!

हे लिखाण त्रोटक (कमी/उणे) आहे असे दोन तीन प्रतिसादात वाचले. पण खरं तर अशा थोडक्या पण पोचणार्‍या परिच्छेदांमधे खूप ताकद असते. पू.लंच्या पुस्तकांमधून असे कित्येक परिच्छेद वेगळे काढून मी वहीत लिहून ठेवले होते. पुरचूंडी (बहुतेक) की अशाच कुठल्यातरी पुस्तकात मी आठवणींविषयीचा त्यांचा एक ललित पॅरा वचला होता आणि आजही मला तो बर्‍यापैकी आठवतो. नायक आणि नायिकेची आठवण सांगताना 'अशी औदुंबराची झाडच नव्हे तर भिंतीना सुटलेले पोपडे सुध्दा अंगावर लाख लाख आठवणी घेऊन उभे असतात.' हा त्या परिच्छेदाचा शेवट वाचताना अंगावर काटा येतो. अर्थात शब्दांची ती किमया आपल्यासारख्यांना साधणे अशक्य पण तसच काहितरी लिहायचा प्रयत्न 'असच आपलं... सटर फटर' करणार आहे.

हसणार्‍या फुलांशी मरण मरण खेळत बसतो... सुकलेली फुलं त्याची वाट बघत असताना...>>> Sad खरं आहे.
नेहमीप्रमाणेच छान.

परवाच वाचलेलं. पण शेवट वाचल्यावर इथे काही लिहायला सुचलंच नव्हतं. शेवट अगदी सुन्न करुन टाकतो.
फार सुंदर लिहीले आहे.

माणसांचा हेडमास्तर शहाणा व्हायला हवा... हसणार्‍या फुलांशी मरण मरण खेळत बसतो... सुकलेली फुलं त्याची वाट बघत असताना... >>>>> ___/\___

Pages