असच आपलं... सटर फटर... एक.

Submitted by ह.बा. on 16 December, 2011 - 05:35

असच आपलं... सटर फटर...
******************

तेल संपलेल्या पणतीची वात वाढवून... फाटलेल्या पतंगाला ढील देऊन... सुकलेल्या ओढ्यात खड्डा खणून... सगळं करून झालं... यश काही येईना... पण मी थांबणार नाही... थांबून चालणार नाही... अजुनही मुजलेल्या विहिरीवर मोट बांधायची आहे... संपलेल्या पारायणात टाळ वाजवायचे आहेत... रिकाम्या देवळाला फेर्‍या घालायच्या आहेत... एवढं सगळं करायचं आहे. व्यस्त व्यस्त व्यस्त झालोय... काहीच्या काहीच सुचत नाही... सुचलं तर असंच आपलं सटर फटर सुचत राहतं... आठवत राहत...

शाळेचं पटांगण... प्रार्थनेच्या रांगेपासून ते सव्वीस जानेवारी, पंधरा ऑगस्ट च्या परेड पर्यंत आणि हाडकी गोट्यांच्या नर फादी डावापासून ते हुस्केच्या पाट्या आखण्यापर्यंत आनंद देणार्‍या बहुतांश घटनांचे साक्षीदार. उजवीकडे दहा-बारा उंच गेलेली निलगिरीची झाडं, गेटच्या बाजूला प्राजक्त, नव्या रोपाची वाट पाहणारे विसेक रिकामे खड्डे आणि डाव्या बाजूला हिरवी गार जाई... तिच्या अंगाखांद्यावर पोटातला पिवळसर गोंडा नाचवत उमललेली टवटवीत लाल फुलं... शनिवारची सकाळची शाळा, हेडबाई जाईजवळ गेल्या एकटक बघत राहिल्या, एक फुल पोरांच्या नजरेतून सुटलं होतं. दोनेक दिवसांपुर्वीचं असेल... सुकलेलं, मरगळून कोलमडलेलं... टाचा उचलून बाईंनी त्याचा देठ खुडला... झाडावर आता फक्त देखणी फुलं होती...
"बाई ते पण तोडा ना"
"ते नसतं तोडायचं"
"मग हे का तोडलं?"
"सुकलेलं ते... त्याचं आयुष्य संपलेलं... असं लटकत राहिलं की त्याला त्रास होतो"
सुकलेलं फूल तुटायला हवं, कुरूप दिसतं ते... त्रास होतो त्याला... टाचा उचलाव्या लागतील... देठ खुडावा लागेल... मग सगळं कसं सुरळीत होईल... आनंदी आनंद गडे!
जाईच्या सुखाची वाट किती सोपी... शाळेच्या हेडबाईंना वाटलं अन झालं... माणसांचा हेडमास्तर शहाणा व्हायला हवा... हसणार्‍या फुलांशी मरण मरण खेळत बसतो... सुकलेली फुलं त्याची वाट बघत असताना...

गुलमोहर: 

__/\__

छानच!!

केवढं मस्त लिहिलंय ह.बा. शेवटचं वाक्य म्हणजे मनात आजवर लाखो वेळेला आलेला विचारच आहे. माझ्याच नाही तर सर्वांच्याच मनात आला असेल असा! पण तो इतक्या चांगल्या पद्धतीने मांडता आला तुला, ह्यासाठीच ह्या लेखाचं खुप कौतुक.

__/|\__

छान Happy

(खूप आवडलंय, पण 'अप्रतिम' अशी प्रतिक्रिया दिली नाही. कारण हे खूपच संक्षिप्त आहे. पहिला परिच्छेद अजून मोठा वाचायला आवडला असता. Happy )

हबाच्या लेखनशैलीबद्द्ल प्रश्नच नाही परंतू हे लिखाण थोडे त्रोटक वाटले. विचार अजून खोल पोहचवता आला असता असे वाटले.

तरी पण हबा तो हबाच!!

Pages