पत्र

Submitted by शरद on 11 March, 2009 - 23:04

"अहो ऐकलं का? पत्र आलंय!"

राधाकाकूंच्या उद्गारांनी बापूसाहेब भानावर आले. दुपारची वामकुक्षीची वेळ. जेवण झाल्यावर तास-दोन तास आरामखुर्चीत पडून राहायची त्यांची सवय. नाही तरी दुसरं करायला काय होतं? दोन्ही मुलं लांब गेलेली; मुलगा तिकडे अमेरिकेत आणि मुलगी सासरी. घरी नवरा-बायको दोघेच. निवृत्तीनंतरचं आयुष्य असच असतं. दुपारी आरामखुर्चीत बसल्या बसल्या विचारांचे पक्षी इकडे तिकडे उडत घिरट्या घालत.

"अहो तो पोष्टमन आलाय. बघा तरी कुणाचं पत्र आहे?" राधाकाकू म्हणाल्या आणि बापूसाहेब जाग्यावरून उठले. आजकाल असंच व्हायचं. एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागलं की भानच नाही रहायचं. 'म्हातारपण लागलं आपल्याला' मनाशीच असे पुटपुटत बापूसाहेब आरामखुर्चीतून उठले.

'कुणाचं असेल पत्र? सुमाचं? पण तिचं तर गेल्याच आठवड्यात आलं होतं. सतिशचं तर नसेल? पण तो कशाला लिहील? अरे मोठ्ठा इंजिनिअर झालास, पण काय मिळवलंस? बापाला उलटून बोललास. आणि कुणासाठी? कोण कुठली फिरंगी पोरगी दारात आणलीस आणि कुळाला बट्टा लावलास. अरे, शहान्नव कुळी मराठे आपण! महाराजांच्या खांद्याला खांदा लावून आपले पूर्वज मुघलांविरुद्ध लढले. विसरलास तो इतिहास. कमीत कमी जात पात तरी बघायचीस. आणि मला म्हणतोस - हक्कानं घरात घेतली नाहीत तर रजिस्टर लग्न करीन, घर सोडून जाईन - हरे राम! असे दिवस बघायलाच का तू मला जिवंत ठेवलंस? अरे देवा! कसलं अमंगळ कारटं जन्माला घातलंस तू?' सतिशचं नाव निघताच बापूसाहेबांच्या मस्तकावरील शीर ताड ताड उडायला लागायची. 'वर्ष झालं. भ@#% चार ओळी लिहून खुशाली सुद्धा कळवली नाही.'

बापूसाहेबांचं गाव तिकडं डोंगरात. सह्याद्रीच्या कडेकपारीत लपलेलं. जेमतेम हजार उंबरा. वाड्या विखुरलेल्या. धड रस्ते नाहीत तर बाकीच्या सुखसुविधा दूरच! गावात नाही म्हणायला एक पोष्ट ऑफिस होतं. त्याच्यातच तारघर. कुणीतरी पुढार्‍यानं एक सहकारी बँकेची शाखा उघडायचा प्रयत्न केला होता. पण स्टाफ मिळेना म्हणून तो फसला. तालुक्याला चांगला बंगला झाला असता; पण 'आपलं गाव' म्हणून निवृत्तीनंतर बापूसाहेब तिथेच स्थिरावले. बघायला गेलं तर वडिलोपार्जित घर आणि अर्ध्या एकराची आंब्या-फणसाची बाग यापलिकडं काही नव्हतं. पण बापूसाहेबांचं एकच - 'मरायचं तर आपल्याच गावात'.

"कुणाचं पत्र आहे? बघू तरी." म्हणत ते राधाकाकूंच्या जवळ गेले. "अगं सतिशचं!" रोज सतिशचं नाव निघताच शिव्यांचा भडिमार करणारे बापूसाहेब राधाकाकूंपासून आपलं औत्सुक्य छपवू शकले नाहीत. राधाकाकूंच्या चेहर्‍यावर उत्साहाची एक लहर पसरली. "बघा, मी म्हणत नव्हते त्याचं पत्र येणार म्हणून? अहो, किती केलं तरी दुधाचं नातं आहे ते! माझं लेकरू कसं असेल, काय करत असेल? रोज मला भंडावून जीव नकोसा करून टाकायचा. ती सटवी त्याचं काय बघते! अहो, असं बघताय काय माझ्याकडं. वाचा ना काय लिहिलंय ते." राधाकाकू उद्गारल्या.

"तुझं प्रेम किती उतू जातयं ते बघत होतो. एका वर्षानं महाराजांना आपल्या जन्मदात्यांची आठवण झाली ना!" कपाळावरची आठी कायम ठेवून बापूसाहेब म्हणाले.

"लिहितोय की 'मी खुशाल आहे. घर सोडून येताना खूप वाईट वाटत होते. तुमच्या हट्टामुळे माझा पण नाईलाज झाला. जे झालं ते गेलं, गंगेला मिळालं. तुम्हीसुद्धा सर्व विसरून आम्हाला आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा आहे.'

'मार्गारेट ठीक आहे.' भ@#%नावसुद्धा बदललं नाही बायकोचं. बापाचं नाव तरी लावतो आपल्या नावापाठीमागे की नाही कुणास ठाऊक. 'खरे पाहता स्वभावाने मार्गारेट खूप चांगली आहे. पण अगोदर ते समजावून घ्यायचा प्रयत्न तुम्ही केलात तरी कधी? Any way, मी आता येत्या पंधरा दिवसांत रजा घेऊन दोन महिन्यांसाठी घरी येत आहे. मार्गारेटला तुम्हाला बघायची खूप इच्छा आहे; आणि मलासुद्धा. २० मार्च ला घरी पोहोचेन. आईची खूप आठवण येते.

कळावे.

तुमचा लाडका,

सत्तू' "

"अगबाई, माझं लेकरू घरी येणार! २० मार्च म्हणजे फक्त दहाच दिवस उरले की हो! घर स्वच्छ करायला घेतलं पाहिजे. त्याला धूळ खपत नाही. तुम्ही असं करा - उद्या तालुक्याला जाऊन गहू घेऊन या. माझं बाळ भाकरी खात नाही. ते सोंग त्याला काय करून घालत असेल, देव जाणे! आणि त्यादिवशी त्याचा तो राहिलेला टॉय सुद्धा इस्त्री करून आणा."

"हे पहा, मी त्याला काय सांगितले होते ते तुम्ही विसरलात की काय?" बापूसाहेब एकदम तडकले.

त्यांचं हे असं होतं. एकदा शब्द उच्चारला की मग ब्रह्मदेव आला तरी त्यात बदल व्हायचा नाही. त्यामुळे मग स्वतःचा फायदा होवो, किंवा नुकसान. मोडेन पण वाकणार नाही ही वृत्ती! आत्तासुद्धा तसंच झालं. सतिश घरी परत यावा असं त्यांना वाटत नव्हतं असे नाही. पण एकदा क्षमा नाही म्हटल्यावर त्यात परत बदल करायचा म्हणजे त्यांच्या या स्वाभिमानी प्रतिमेला धक्का होता.

"विसरायला काय मी कुक्कुलं बाळंच जणू!" राधाकाकू म्हणाल्या. "माझ्या पोराला तुम्ही घरातून बाहेर काढलंत. तुम्ही! तुमचा हट्टी स्वभाव मध्ये नडला. स्वाभिमान! म्हणे स्वाभिमान! काडी लावा तुमच्या त्या स्वाभिमानाला. पोरगं माझं आज घरात असतं तर घर कसं भरलं असतं. गोकुळ झालं असतं. नाहीतर आता राहतायच संन्याशासारखं!" राधाकाकूंचा संताप अनावर झाला.

आता मात्र बापूसाहेबांचा पारा खरोखरचं वर चढला. राधाकाकूंचं असलं बोलणं त्यांच्या जिव्हारी लागत होतं; अन् त्यासुद्धा बापूसाहेबांना लागेल असं बोलण्याचा जणु कोर्सच करून आल्या होत्या. संतापानं लाल होऊन बापूसाहेब एकदम ओरडले,"बंद करा आता तुमचा शंख! बाहेरच्या जातीतली सून आणली म्हणून मुळूमुळू रडत बसला होतात. आठवतं? आणि पोराला डोक्यावर तुम्ही चढवून ठेवलत, तुम्ही! मागेल ते आणून द्यायचं. प्रत्येक गोष्टीसाठी माझ्याकडे गळ घालायची. फळं भोगा आता त्याची!"

"हो! हो! भोगत्ये! भोगत्ये! आणि तुम्ही काय कमी भोगता आहात?" पुढचं बोलणं ऐकून घ्यायला बापूसाहेब घरात थांबलेच नव्हते. बोलता बोलता रागाच्या भरात त्यांनी कधी कोट घातला व पायात चपला चढवून काठी घेऊन बाहेत पडले ते राधाकाकूंच्या ध्यानातसुद्धा आले नाही.

ज्या दिवसापासून सतिश घर सोडून गेला तेव्हापासून हे असंच चाललं होतं. साध्या साध्या बोलण्याची परिणती भांडणात व्हायची. बापूसाहेब घराबाहेर पडायचे आणि राधाकाकू उसासे टाकत पडून रहायच्या. तासाभरानंतर दोघांची डोकी थंड झाली म्हणजे दोघेही मग वाईट वाटून घेत. बापूसाहेब घरी येऊन शांतपणानं बसून रहात. त्यांची चाहूल घेऊन राधाकाकू चहा करून आणत व उरलेला दिवस दोघेही न बोलता काढत. फक्त सुमन घरी आली तरच यात बदल व्हायचा. सुमनच्या मुलांशी खेळण्यात, त्यांचे कोड-कौतुक करण्यात त्यांचा वेळ मजेत जायचा.

आजसुद्धा राधाकाकू अंथरुणावर पडून उसासे टाकत होत्या. त्याचबरोबर गतजीवनाचा चित्रपट त्यांच्या नजरेसमोरून सरकू लागला.

ती फ्रॉकमधली १३-१४ वर्षांची अल्लड मुलगी त्यांना आठवली. बापूसाहेबांशी आपलं लग्न ठरतय म्हटल्यावर त्या किती हरखून गेल्या होत्या. बापूसाहेब घरचे खाते-पिते होते. शिवाय त्यांच्या उमेदवारीच्या काळात जे काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच शिकलेले लोक होते त्यापैकी एक होते. त्यामुळे तलाठ्याची नोकरी त्यांना चालून आली होती. शिवाय राजबिंड रूप आणि भक्कम शरीरयष्टी. एकून विचार करता उत्तम स्थळ होतं.

लग्नानंतर थोड्याच दिवसांत त्यांना बाबासाहेबांच्या शीघ्रकोपी स्वभावाची व स्वाभिमानी वृत्तीची जाणीव झाली होती. मामलेदाराच्या नोकरीत असूनही त्यांनी कधी दुसर्‍याच्या एका पै ला हात लावला नाही; कधी लाच मागितली नाही , कुणी देऊ केली तर घेतली नाही. अतिशय नि:स्पृह आणि शिस्तबद्ध म्हणून सगळीकडे त्यांचा लौकिक होता. राधाकाकू तशा लाघवी होत्या; त्यामुळे बापूसाहेबांच्या स्वभावाशी जुळवून घ्यायला त्यांना फारसा त्रास पडला नाही.

लग्नानंतर दोन तीन वर्षे उलटून गेली तरी बाळाची चाहूल लागली नाही तेव्हा दोघांनाही शंका वाटू लागली की आपल्यात काही दोष तर नाही. मग डॉक्टर्-वैद्य, गंडा-दोरा, उपासतापास सुरू झाले. बरेच नवस सायास झाल्यानंतर मग कुठे राधाकाकूंची ओटी भरली. नवसानं झालेला मुलगा म्हणून सतिशचं अर्थातच कोडकौतुक! त्याच्या पाठोपाठ दोन वर्षांनी सुमन झाली.

लहानपणीचे त्यांचे हट्ट, त्यांची भांडणे, मारामार्‍या - मात्र दुसरं कोणी भांडायला आल्यास दोघांचं एक होणं - सगळं सगळं राधाकाकूंच्या डोळ्यासमोर येत होतं. सतिश त्यांचा खूप लाडका होता. त्याचे कितीतरी हट्ट त्यांनी पुरवले होते. दोन्ही मुलांना त्यांनी किती मायेनं वाढवलं होतं!

दोघेही खूप हुषार होते. वर्गात त्यांनी कधी पहिला-दुसरा नंबर सोडला नाही. त्यांचे कप, मेडल्स, सगळे समारंभ, शाळेची स्नेहसंमलने सगळं राधाकाकूंना आठवत होतं. पुस्तकाची पाने पलटावीत तसे एक एक प्रसंग त्यांच्या मन:पटलावरून पुढे पुढे सरकत होते. हळू हळू दिवसांमागून महिने आणि त्यांच्यामागून वर्षे निघून गेली.

अचानक एक दिवस सुमाचं लग्नसुद्धा ठरलं आणि लग्नसमारंभ पार पडला. राधाकाकू एकाकी पडल्या. थोड्याच दिवसांत सतिश इंजिनिअर झाला. बी.टेक. मध्ये युनिव्हर्सिटीत गुणवत्ता यादीत आला. अमेरिकेतल्या शिकागो युनिव्हर्सिटीने त्याला शिष्यवृत्ती दिली अ तो शिकागोला शिकायला गेला. तो गेला तेव्हा त्यांना इतकं वाईट वाटलं की दोन दिवस त्या सतत रडत बसल्या होत्या. आजही त्यांना अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांना ते आठवून वाईट वाटत होतं. आणि आज मुलाचं पत्र आलं तर बापूसाहेब त्याला घरी परत घ्यायला तयार नाहीत. सतिशने जे काही केले ते ठीक नाही झाले; पण आता त्याचा विचार करून काही फायदा? त्याला घरी न येऊ देण्यानं त्यांच्या मातृह्रदयाचे किती हाल होतात याची बापूसाहेबांनी कधी चौकशी केली होती का?

बाहेर रस्त्यावर बापूसाहेब सुद्धा याच गोष्टीचा विचार करत होते. सतिश परदेशी गेला तो दिवस त्यांना अजून आठवत होता. त्या दिवशी आनंदाने व अभिमानाने त्यांची छाती फुलून आली होती. सगळ्या वर्तमानपत्रांतून त्याचे फोटो छापून आले होते. ती कात्रणं त्यांनी आजही जपून ठेवली होती. सगळीकडे लोक त्याचं कौतुक करत होते. बापूसाहेब निवृत्त झाले तेव्हा मोठ्या साहेबांनी सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केला होता.

निवृत्तीनंतरचं आयुष्य ती दोघं सुखात घालवत होती. कधी सुमाकडे, कधी घरी तर कधी यात्रेला! सारं काही सुरळीत चाललं होतं.

आणि मग एके दिवशी सतिशचं ते पत्र आलं. जणु बॉम्बगोळा टाकावं असं. आजचं पत्र येण्याआधी अखेरचं!

'आई - बाबा,

मी जे काही लिहितोय ते वाचून तुम्हाला आनंद वाटेल, आश्चर्य वाटेल की दु:ख वाटेल ते सांगता येत नाही; पण तुम्ही आनंदित व्हाल अशी अपेक्षा करून सांगतो.

माझं इथल्या एका मुलीवर प्रेम आहे. तिलाही मी आवडतो. मार्गारेट दिसायला खूप सुंदर आहे. (फोटोवरून तुम्हाला दिसून येईलच.) पण तिचे सौंदर्य हेच काही माझ्या आवडीचं एकमेव कारण नाही. ती स्वभावानेदेखील खूप चांगली आहे. तुमच्या आशीर्वादाने आम्ही लग्न करून भारतात सेटल व्हायचं ठरवलय.

तुम्हाला वाटेल की अमेरिकन मुलगी आपल्या घरात कशी वावरेल म्हणून. मला कल्पना आहे की आम्हाला थोड्याफार अडचणी येणारच. पण त्या आम्ही दूर करू शकू असा मला विश्वास वाटतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण मार्गारेटने आत्तापासूनच मराठी शिकायला सुरवात केलीय.

येत्या सुटीत मी मार्गारेटला घेऊनच घरी येत आहे तेव्हा तुम्ही तिला पहालच.'

ते पत्र आल्यापासून बापूसाहेबांच्या घरातील शांतता ढळली. त्यांनी लगेचच 'तू असं काही करू नकोस. एकटाच ये. इथे तुझ्यासाठी मुलगी बघत आहे' अशा अर्थाचे पत्रोत्तर पाठवले. तरी आपल्या मुलाचा स्वभाव ते चांगल्या रीतीने जाणून होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे ते राधाकाकूंवर पुरता दोष ढकलून रिकामे झाले होते.

सतिश घरी आला. एकटाच. पण घरात त्यांच थंडपणानं स्वागत झालं. राधाकाकू व बापूसाहेब दोघांनीही त्याच्याशी बोलायचं टाळलं होतं. त्या जीवघेण्या अबोल्यात दोन दिवस निघून गेले. वादळापूर्वीची शांतता! तिघेहीजण वादळाची वाट पहात होते. ते यायला तिघांनाही नको होतं; अन् ते येणारच याची तिघांनाही खात्री होती. फक्त विषय कुणी काढायचा हाच प्रश्न होता. शेवटी बापूसाहेबांनीच तो काढला.

"हं! मग सतिशराव, काय करायचं ठरवलंत तुम्ही?" घुश्शात असले की बापूसाहेब पत्नीशी, मुलांशी अहो-जाहो करून बोलत.

"ते सगळं पत्रातून लिहिलं होतं मी बाबा."

"पत्रातून लिहिलं होतं ते ठीकयं; पण तुम्ही करणार काय आहात ते मी विचारतोय. आमच्या घराण्यात दुसर्‍या जातीतील स्त्री आणण्याची प्रथा नाहीय. त्या फिरंगी पोरीशी जे काही तुमचे संबंध असतील ते विसरून जा आणि आम्ही तुमच्यासाठी योग्य मुलगी बघतो तिच्याशी लग्न करा."

"तिचं नाव फिरंगी पोरगी नाही - मार्गारेट आहे. मार्गारेटवर माझं प्रेम आहे आणि तिच्याशी मला लग्न करायचंय." संथ, संयमपूर्ण आवाजात सतिश बोलला.

त्यावर मात्र बापूसाहेबांचे मस्तक भडकले. ते कडाडले, "भ@#%, बापासमोर असं बोलायला लाज नाही वाटत? मी तुला शेवटचं विचारतो. काय करणार बोल?"

सतिश त्याच संयमपूर्ण आवाजात म्हणाला, "मार्गारेटला जर तुम्ही हक्कानं घरात घेतलं नाही तर मी रजिस्टर लग्न करेन; घर सोडून जाईन."

राधाकाकू रडू लागल्या. "असं नको रे म्हणू बाळा. आणि तुम्ही तरी किती डोक्यात राख घालून घेता?"

बापूसाहेब संतापानं लालबुंद झाले. एकदम् ओरडले, "Get out! आत्ताच्या आत्ता ह्या घराबाहेर हो. पुन्हा माझ्या घरात पाऊल टाकशील तर याद राख. आजपासून माझा मुलगा मला मेला!!"

'टिर्रर्रर्रंग! टिर्रर्रंग!' पाठीमागून येणार्‍या सायकलच्या घंटीने बापूसाहेब एकदम दचकले. विचारांच्या भरात किती चाललो ते त्यांना समजलेसुद्धा नाही. आजच्या पत्रानं त्यांचं डोकं जणु भणाणून गेलं होतं. काय करायचं ते त्यांना कळेना. सतिशला घरी येऊ द्यायचं आणि हार स्वीकारायची की त्याला घरी घ्यायचे नाही व राधाकाकूंचे हाल करायचे?

परत एकदा त्यांचा संताप खदखदू लागला. 'आपला सगळा स्वाभिमान बाजूला सारायचा? शब्द मागे घ्यायचा? ज्याने आपल्या जन्मदात्या बापाचा अपमान केला, कुळाला बट्टा लावला, घराण्याच्या नावाला काळं फासलं त्याला पुन्हा आपलं म्हणायचं? एका जात-पात नसलेल्या किरस्ताव पोरीला शहान्नव कुळी मराठ्याच्या घरात येऊ द्यायचं? समाज मला काय म्हणेल? छे! छे! मी त्याला कालत्रयीही क्षमा करणार नाही. माझा मुलगा मला एक वर्षापूर्वीच मेला. आजच त्याला कळवतो की तू त्या फिरंग्यांच्यातच शोभतोस; माझ्या घरात तुला थारा नाही!'

एकदा निर्णय झाला तशी त्याच तिरीमिरीत ते समोरच्या पोस्टात शिरले. तारेचा फॉर्म घेतला. मुलाचा पत्ता लिहिला. मजकूर लिहिण्यापूर्वी ते क्षणभर थबकले. क्षणभरच! पण तेवढ्या अवधीत सगळे गतजीवन त्यांच्या मनात येऊन गेले व ते झर्रकन लिहून गेले.

"Awaiting arrival. come soon."

(समाप्त)

गुलमोहर: 

खुप छान लिहिलय. थोडक्यात शब्दात सगळ्या भावना पुरेपुर ओतल्या.
-------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

हाय शरद, कथा चांगली आहे. आवडली. फिरंगी सून/जावई ही कल्पना अज्जुनही आपल्या समाजात अंगवळणी पडलेली नाही हे खरचं.

काही गोष्टी मात्र जरा खटकल्या...

<<<'वर्ष झालं. XXX चार ओळी लिहून खुशाली सुद्धा कळवली नाही >>> .... XXX या शब्दाचा वापर जरा जास्तच झालायं, टाळता आला असता... असं माझं मत;

काकूंचं नांव राधाकाकू की शारदाकाकू????

<<<ती फ्रॉकमधली १३-१४ वर्षांची अल्लड मुलगी त्यांना आठवली. बापूसाहेबांशी आपलं लग्न ठरतय म्हटल्यावर त्या किती हरखून गेल्या होत्या>>>... काकूंच्या आजच्या वयाचा अंदाज घेता, त्या जेव्हा १३-१४ वर्षांच्या होत्या तेव्हा वयात आलेली १३-१४ वर्षांची मुलगी फ्रॉक घालुन वावरत आसेल हे जरा पटत नाही.

तुझ्या पुढच्या कथांसाठी अनेक शुभेच्छा..

ह्यांना भडव्या शब्द फार आवडतो वाटत Uhoh

शरद,
कथा, आटोपशीर आणि छान आहे. शेवटी रक्ताची नातीच खरी हे अगदी पटलं. Happy
पण
>>भडव्यानं नावसुद्धा बदललं नाही बायकोचं << बोल्ड केलेला शब्द फार वापरलायंत असं नाही वाटत तुम्हाला? Sad
>>लग्नानंतर दोन तीन वर्षे उलटून गेली तरी पाळी चुकली नाही तेव्हा दोघांनाही शंका वाटू लागली << हे वाक्य फारं अंगावर आलं.... आशय चांगल्या पद्धतीनेही पोहोचवता आला असता... Sad

खुप लवकर संपल्यासारखी वाटली. आवडली. बाकी काही लिहीणार नाही शरददा....
सल्ले देणारे पुष्कळ आहेत माबोवर, त्यात माझी भर नको... Happy

सस्नेह,
विशाल
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

छान जमली आहे गोष्ट्........आवड्ली.

Roops..........

" करु न याद मगर किस तरह भुलाऊ उन्हे, गझल बहाना करु, और गुनगुनाऊ उन्हे...."

छान आहे कथा. लाजो आणि दक्षिणाशी सहमत.

शरददा, कथा आवडली. कथाबीज सशक्तं आहे, आणि फुलोराही छान दिलात.

मला शेवट अगदीच तोडून टाकल्यासारखा वाटला. मुलाने मनाविरुद्ध वागल्याने काटलेला मनस्तापाचा काळ आई-वडील दोघांचाही सारखाच असेल. त्याचं आईचं "इंटरप्रिटेशन" कळलं. वडिलांचं नाही. ते तस न कळू देण्याचा प्रयत्नं असेल तर, यशस्वी आहे... तरीही कथा अकस्मात संपल्यासारखी वाटते.. निरोप न घेता निघून गेलेल्या चालत्या-बोलत्या माणसासारखी.

(हो, त्या अपशब्दाचा वापर... मला खटकला. त्या वयाचा त्या भागात रहाणारा माणूस ती भाषा वापरेल हे नक्की, तरीही.
तसच निवृत्तीच्या वयाला आलेली स्त्री चटकन त्या दिवसांबद्दल त्या भाषेत बोलेल असं मला वाटत नाही... अगदी स्वगतातही नाही).
पण कथा छानच आहे. अजून लिहा, हो. माणसं, प्रसंग रंगवण्याची हातोटी खरच छानय.

पहिलाच प्रयत्न आहे. खटकलेले शब्द आणि शब्दसमूह बदलले आहेत.

प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद.

शलाका, उद्देश्य हा होता की बाहेरून कठोर वाटणारा बाप आतून पोखरून निघालेला आहे पण ते तो जगाला दाखवू शकत नाही कारण त्याची प्रतिमा 'स्वाभिमानी, कठोर' वगैरे आहे. पण शेवटी त्याला कुठेतरी हार पत्करावीच लागली.

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

शरददा, मान्या. बदललतही!

मला कथा खूप आवडली.. शेवट तर फार आवडला.. खूप वर्णन करून कसा बदल झाला विचारात वगैरे दाखवलं असतंत तर फार गुळमुळीत वाटलं असतं.. हे बेस्ट आहे !
बाकी आक्षेपार्ह शब्द आक्षेपार्हच वाटले.. एव्हढी मोठी आणि जुनी माणसं शिव्या देत आहेत हे समहाऊ नाही पटले.. पण असले तरी ठीक वाटतेय..

वातावरण निर्मिती उत्तम झाली आहे. कथेचा शेवट थोडा अपेक्षित होता.
बापूसाहेबांच्या मनातील वादळाबद्दल शेवटच्या परिच्छेदात अजूनही लिहिता आलं असतं आणि ते आणखी शेवटाच्या दृष्टीने जास्ती परिणामकारक झालं असतं.
कथा आवडली. कथाबीज उत्तम आहे.
प्राजु
http://praaju.blogpot.com

छान आहे कथा. अचानक सम्पल्यासारखी वाटते..पण त्यातच मजा आहे.........
फुलराणी.

कथा आवडली. तुमची लिहीण्याची पद्धत छान आहे.

आवडली कथा....
>>>>अरे, शहान्नव कुळी मराठे आपण! महाराजांच्या खांद्याला खांदा लावून आपले पूर्वज मुघलांविरुद्ध लढले. विसरलास तो इतिहास. कमीत कमी जात पात तरी बघायची>>>>>>>> सगळ्यांचा पेट्ट dialogue.....

__________________________________
स्वतःच्या पायावर ठामपणे उभं राहत मी म्हटलं,
'माझं नशीब मीच घडवीन'
तेंव्हा डोक्यावरचं आभाळ पोक्तपणे हसलं- म्हणालं
ठीक आहे.........इतक्यातच कोसळणार नाही

कथा खुप छ्अन आहे. पण किति मराठि मुले पालकाना घाबरुन मुलिना फसवतात?
त्यनि थओडा तरि त्या मुलिचा विचार करावा

शरद,

छानच जमली आहे कथा. मस्त फुलवली आहे! लिहीत रहा.

कल्पू