आत्याबाईंच्या गोष्टी - भाग २ (रोशन माकडीणीची गोष्ट)

Submitted by उमेश वैद्य on 11 October, 2011 - 11:56

(खर तर ही गोष्ट `विनोदी' या सदरात बसणारी नाही. पण गोष्टींची सुरूवात तेथूनच झालेली असल्यानं ईथेच पोस्ट करत आहे)

आत्याबाईंच्या गोष्टी - भाग २

एकदा गप्पांच्या ओघात राजाकाकांची आठवण निघाली. राजा काका म्हणजे राजा माणूस,
शांत सौम्य स्वभाव, स्थितप्रज्ञ माणसा सारखे डोळे. लग्नात फ़ोटोग्राफ़रन ’स्माईल प्लीज’
अस म्हणता क्षणी मंडळींच्या चेह-यावर पसरतो तसा भाव नेहमी चेह-यावर.

"हा आपला राजा तान्हा होता ना तेंव्हा ची गोष्ट". आत्याबाई सांगु लागल्या.
आता आत्याबाईंच्या पोतडीतून काय बाहेर पडत ते आम्ही कुतुहलानं पाहू लागलो.

"राजाचे वडिल म्हणजे आमचे काका मुंबईत रहात होते. एका पारश्याच्या ईस्टेटीवर ते
नोकरीला होते. त्या पारशाच्या वाडीतच त्यांच बि-हाड होत.
राजा असेल जेमतेम सहा एक महिन्यांचा. घर प्रशस्तच होत. बाहेर सारवलेल अंगण,
मोठी गॅलरी, घराच्या भोवताली नारळाची, जांभळीची झाडे होती. त्या वाडीचा मालक पारशी होता.
त्याने पुष्कळ प्राणी पाळले होते. कुत्रे, मांजरी, एक माकडीण ही होती त्यात.
पक्षी तर कितीतरी होते. काकाकूआ पक्षी ही होता. वाडीतली मुलं या प्राण्या-पक्षांच्या
मागे मागे असायची. माकडीण पारशाची फ़ार लाडकी होती.
पारशाच्या घरात तिचा मुक्त संचार असे. नोकर माणसे आणि वाडीत रहाणा-यांना
देखील तिची सवय होती. त्रास कोणालाच नव्हता. आजूबाजूच्या झाडांवर ती खेळत असे.
आता माणसांनासुध्दा टिचभर जागा नसलेल्या मुंबईत लोक प्राणी, पक्षी पाळत असत तेंव्हाची ही गोष्ट."

"संध्याकाळची वेळ होती. अंगणातली उन्ह परतली होती. राजाची आई, म्हणजे आमची काकू
अंगणात बसली होती. खाली दुपट्यावर सहा महिन्यांचा राजा होता. काका अजून घरी यायचे होते.
बसल्या बसल्या भाजी निवडावी असं काकूला वाटल. भाजीची जुडी आणण्यासाठी म्हणून काकू घरात गेली.
अंगणात काकूची शेजारीणही होती. अक्षरश: दोन चार मिनीटे गेली असतील अचानक शेजारणीचा
जोराजोराने आरडा ओरडा ऐकू आला. काकू धावतच बाहेर येउन पहाते तो काय!
समोरचे द्रुश्य पाहून काकू बेशुध्दच पडली. काकू भाजी आणायला घरात गेल्यावर
ती माकडीण अंगणात अवतरली होती. तिनं दुपट्यावर निजवलेल्या राजाला उचलल.
अगदी आपण लहान मुलांना कुशीत घेतो अस्स बरं!!" आत्याबाई कसं ते दाखवू लागल्या.
"तर आपल्या पोटाशी राजाला घेतल आणि त्याला घेउन ती समोरच्या जांभळाच्या झाडावर चढुन बसली.
शेजारणीनं आरडा ओरडा करून माणस जमवली. गडीमाणसे आपापल्या हातातली कामे टाकून तिथ आली.
त्या पारशाच्या घरातील झाडून सारी माणसे आली.
वाडीतल्या बायका काकूच्या चेह-यावर पाणी मारून वारा घालू लागल्या. आता कसे करावे?
माकडीण मुलाला ऊंचावरून खाली टाकेल की काय अस जमलेल्या लोकांना वाटून, अस झालच
तर मुलाला झेलण्यासाठी लोक झाडाखाली जमाव करून उभे राहिले.
काका अजून घरी यायचे होते. कुणीतरी पारशाच्या ऑफ़िसात जाउन हे सांगितल तसा तो ही धावत आला
आणि झाडाखाली उभं राहुन मोठ्या प्रेमाने माकडीणीला बोलावू लागला. त्या माकडीणीच नाव त्याने ‘रोशन’ ठेवलं होत.

‘रोशऽऽऽन मारी डिकरीऽऽ, आवी जा ने. आवी जा बेटा, हूं तमे कई आपस". आजा. मारी पासे आप बाबा."
अस मोठ्या गोड आवाजात तो पारशी तिला आर्जवू लागला. पण माकडीणीचं त्याच्याकडे मुळीच लक्ष नव्हत.
ती कडेवरच्या राजाकडे एकदा पाही आणि त्याला घट्ट छातीशी घेई.

"पण मग राजाभावजी रडत नव्हते काहो वन्स?" बाजूलाच गोष्ट ऐकत बसलेल्या आईनं विचारलं.

"अग तो गाढ झोपलेला होता. आणि त्या माकडीणीनं त्याला अस काही पोटाशी धरलं होतं की जणू काही
आईचीच कूस." लहान पोर ते! राहिल आपल निजलेल.

"मग पारशाला आठवल, यशवंता नावाचा त्याचा एक नोकर होता या माकडीणीला त्याची फ़ार सवय.
त्याचा आवाज ऐकताच ती जिथे असेल तिथून येई. त्याच्या हातून फ़ळे, गाजरे,
पेरू अस घेऊन खात असे. पारशानं त्या यशवंताला निरोप दिला. तो आला.
त्यान आल्या आल्या प्रथम अंगणातली झाडाखालची गर्दी हटवली.
प्रत्येकाला त्यानं आपापल्या घरात जायला सांगितल. अंगणात कोणालाच थांबू दिल नाही.
पारशाच्या घरातून त्यानं टपोरे ‘भरूची’ खारे शेंगदाणे मागवले. माकडीणीला शेंगदाणे फ़ार आवडत म्हणे.
ते हातात घेउन प्रेमान तो माकडीणीला बोलावू लागला."

"माकडीण झाडावर ऊंच बसली होती. एका हातान तिनं राजाला घट्ट पोटाशी धरलं होत.
यशवंताचा आवाज येताच माकडीणीने कान टवकारले. त्याच्या हातातले शेंगदाणे पाहून ती पोटाशी घेतलेल्या
राजाला सावरत सावकाश खाली उतरली. अंगणात येउन पोटाशी धरलेल्या तान्ह्या राजाला तिने हलकेच
त्या दुपट्यावर ठेवल. अजून पुरता जीवही न धरलेल हे माणसाच पिलू आहे याची माकडीणीला पुरेपुर जाणीव होती.
मग यशवंताच्या हातातले शेंगदाणे घेउन ती झाडावर पसार झाली. लोकांनी श्वास रोखलेले होते ते सोडले.
राजा मात्र अर्धा झोपेतच होता. बायकांनी राजाला उचलून घरात नेल. कुणी अलाबला घेतली.
कुणी वहाणेनं द्रुष्ट काढली. पारशाची बायको त्यांच्या अग्नीदेवतेला नवस बोलली होती की ’डिकरा’
सुखरूप राहू दे म्हणून. दुस-याच दिवशी तो नवस फ़ेडायला पारश्याच आख्ख कुटुंब गुजरातला त्यांच्या
तिर्थक्षेत्री रवाना झाल. परत आल्यावर मात्र पारशानं त्या माकडीणीला वाडीत ठेवल नाही.
त्याने तिला आपल्या पालघरच्या शेतावर नेउन ठेवल.

माणूस असो वा पशू-प्राणी, ‘आई’ पणाची भूक सगळ्यांनाच सारखी. त्या माकडीणीच लहान पिलू
नुकतच देवाघरी गेलं होतं म्हणे. दुपट्यावरच्या तान्ह्या राजाला बघून तिला आपल्या पिलाची
आठवण आली होती आणि या माणसाच्या पिलात तिला आपल्या लहानग्याच दर्शन झाल होत असं वाटत.
घटकाभर का होईना ती त्याचं आईपणच उपभोगत होती. तर अशी ही विलक्षण गोष्ट.
आत्याबाईंनी ही गोष्ट पुरी केली तेंव्हा सगळ्यांचेच डोळे पाणावले होते.

उमेश वैद्य.

गुलमोहर: 

ह्र्द्य प्रसंग आहे,
पण माकडाशी मैत्री करुन अंगरक्षक ठेवणार्या पंचतंत्रातील "राजा" ची आठवण झालिच.
हा राजा मात्र खुपच लहान होता.

किती छान गोष्ट...आणि रंगवलीही आहे छान...राजाला पोटाला घेऊन झाडावर बसलेली माकडीण डोळ्यासमोर आली...
मातृह्द्य ते शेवटी...

छान

प्रीती.. ह्या गोष्टीतून बोध घे की एकट्या बाळाची काळजी घ्यायला कोण ना कोण तरी असतच. Happy

मस्त गोष्ट आहे हा माकडिणीची! Happy

राजा आणि रॅन्चो!
बघ राजा , टारझन होता होता वाचला!
सर्वजणी एकदम इमोशनल अत्याचार करताहेत म्हणुन थोडे हलके फुलक्या कॉमेन्ट्स.

गोड Happy

Pages