माझे गाजलेले व़क्तृत्व....

Submitted by मी विडंबनकार on 12 October, 2011 - 02:11

"अहो सर, ह्याचं हिंदी खूप छान आहे. हिंदी फारच छान बोलतो" पांडे सरांनी पाटील सरांना आश्वासन दिले.

"खरंच ना? नाहीतर साहेबांपुढे धांदल उडायची" पाटील सरांच्या चेहर्‍यावर थोडा ताण होता.
वकृत्व स्पर्धेचं आयोजन शेवटी त्यांच्याच हातात होतं. "सर, ट्रस्ट मी " पांडे सरांच्या चेहर्‍यावर आत्मविश्वास होता.

"ठीक आहे , याचं नाव मी फायनल यादीत टाकतो , काय नाव म्हणालात याचं ? रोहित ना?" पाटिलजी उवाच!
पांडे सर तत्परतेने- "होय"
सरांचा आत्मविश्वास त्यांच्या आवाजातून जाणवला आणि मला माझी जबाबदारी कळाली. त्यावेळी सहावीत होतो मी.

पांडे सरांनी मला विषय दिला 'आई'. तसे तर आई या विषयावर भरपूर निबंध लिहिले होते पण मराठीतून. हिंदीमधून कधी लिहिलंही नव्हतं आणि कधी वकृत्वही केलं नव्हतं.म्हणून जाम टेन्शन आलं.

घरी जाऊन बाबांच्या मागे तगादा लाऊन, हिंदीतून छान लेख लिहून घेतला, वक्तृत्वासाठी! मग सुरू झालं पाठांतर!

ताईच्या मदतीने, आवाजातले चढ- उतार शिकलो...
दररोज शाळेतून घरी गेल्यावर वकृत्वाची तालीम करायची जवळ जवळ २-३ तास, तालीम झाल्यावर मित्रांसोबत गप्पा टप्पा.

शनिवारी पांडे सरांनी संध्याकाळी फोन करून सांगितलं की रोहित सोमवारी सकाळी ८ वाजता वकृत्व स्पर्धा आहे.त्याची नीट तालीम कर. आणि उद्या मला येऊन भेट. आपण एक ट्रायल घेऊ तुझं.
" ठीक आहे सर " मी पण आत्मविश्वास दाखवला.

रविवार उजाडला सकाळीच सायकल काढली आणि सरांच्या घरी जाऊन धडकलो.
" ये ये रोहित. सीमा, रोहित आया है. " सर तसे हिंदीभाषिक पण त्यांना २० वर्ष होऊन गेली होती महाराष्ट्रात राहून, म्हणून मराठी त्यांचं अगदी अस्खलित. सीमा हि सरांची मुलगी.आम्ही एकाच वर्गात होतो.

सीमाने पण वकृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. तिचे बाबाच लिहून देणारे आणि शिकवणारे, त्यामुळे तिचं वकृत्व छानच असणार यात काही वादच नव्हता.

माझी ट्रायल झाली. सरांना फार आवडली असं वाटत होते त्यांच्या हावभावांवरून. नंतर सीमाची ट्रायल झाली. सीमाने तर अगदी मस्त तयारी केली होती स्पर्धेची. सरांकडे नाश्ता केला आणि
मी सरांचा आशीर्वाद घेऊन घरी निघालो.

रात्रीच्या जेवणाच्या वेळेस बाबांना एक ट्रायल करून दाखवली. बाबा अगदी खुश झाले माझ्या शब्दावरचं प्रभुत्व पाहून.

सोमवार उजाडला. आई बाबांचा आशीर्वाद घेऊन मी शाळेत निघालो .
शाळेत गर्दी जमली होती . स्पर्धेला थोडा अवकाश होता, म्हणून एका रिकाम्या वर्गात मित्रांना रंगीत तालीम करून दाखवली भाषणाची...
त्यांना फार आवडलं, पण हरीशने (वर्गात दरवर्षी प्रथम क्रमांक पटकाविणारा, माझा महान हुशार मित्र) मला काही ओळी टाकायला सांगितल्या त्या म्हणजे ' स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी' मला त्याचं सजेशन पटलं कारण हुशारच होता तो.

एकदाची सुरू झाली स्पर्धा...
माझ्या वयाची मुले पटापट वकृत्व करून जात होती.
आता सीमाचा नंबर होता. तिने भाषण सुरु केले. भाषण संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
तिने माईक सोडला व जागेवर जाऊन बसली.
आता नंबर होता माझा. माझं नाव घोषित केल्या गेलं.
मी स्टेजकडे वळलो , माईक हातात घेतला आणि केली सुरुवात भाषणाला.

" माँ इस एक नाम में ही बोहोत कुछ समाया हैं . " हे वाक्य बोलून मी सरांकडे पाहिले . पांडे सर पहिल्याच रांगेत होते म्हणून त्यांचा चेहरा मला व्यवस्थित दिसत होता.त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता.
मी वकृत्व करत गेलो आणि सरांचा आनंद तसाच होता.

आता वकृत्वाचा शेवट मी करणार होतो.
हरीशने सांगितलेली ओळ म्हणायची वेळ आली होती . पण ऐन वेळी मी जे काही केलं त्याचा पश्चाताप आजही होतो.
मी पुढे बोललो "इसी माँ पे पूझे कुछ पंक्तिया याद आई हैं .स्वामी तिन्हो जग का
माँ बिन भिकमंगा." मी बोलून गेलो आणि वकृत्व संपवणार त्याच्या आधीच हास्याचा सागरच जणू उफाळून आला.टाळ्या वाजल्या त्या फक्त माझ्या मित्रांकडून, हरीश गप्प होता. मला काही समजले नाही, मी पांडे सरांकडे पाहिले त्यांनी आधीच डोक्याला हात लावला होता. मला अजूनही कळत नव्हतं की मी काही चूक बोललो का?

स्पर्धा झाल्यावर सर माझ्याकडे आले. चेहर्‍यावर संताप होता. कदाचित पाटील सरांनी त्यांना चांगलंच सुनावलं असणार हे मला कळून चुकले होते.
" अबे , आखिर की लाईन क्या बोली तुने ?" सरांच्या कानातून धूर निघत होता.

मी गप्प राहिलो. आणि सर तिथून निघून गेले.

वकृत्व स्पर्धेची विजेती सीमा होती. (हे सांगायलाच नको....)

मी घरी जाऊन बाबांना वकृत्व करून दाखवलं . बाबांना हसणं कंट्रोल होत नव्हतं.

बाबांनी मला माझी चूक सांगितली. मी पण हसलो. ताईने मला सरांची माफी मागायला सांगितली . मी फोन लावून माफी मागितली .सर शांत झाले होते. त्यांनी माझ्या "अर्ध्या" भाषणाचं कौतुक पण केलं,
पण पांडे सरांचा माझ्याबद्दलचा आत्मविश्वास मला शाळा सोडेपर्येंत कधीच दिसला नाही..

गुलमोहर: 

मित्रांनो , दुर्दैवाने ही घडलेली सत्य घटना आहे. या घटनेला घेऊन आजही मला माझ्या घरी चिडवतात आणि खूप हसतात.

<<<पण पांडे सरांचा माझ्याबद्दलचा आत्मविश्वास मला शाळा सोडेपर्येंत कधीच दिसला नाही..

हे अगदी वाईट. एका चुकीमुळे कायमचा विश्वास गमावण्यासारखं काही नव्हतं त्यात. असो.

चान्गल लिहिलय Happy
मी तर बोवा पहिली ते दहाव्वीपर्यन्त कधी वक्तृत्वाच्या नादी लागलो नाही, तसे मुखदुर्बळच आम्ही.
पण ...स्वामी तिन्हो जग का माँ बिन भिकमंगा...<< यातिल विनोद देखिल माझ्या लक्षात आला नाही, इतक काय त्यात हसण्यासारख?

रोहित...........-------------^---------- Lol
.स्वामी तिन्हो जग का
माँ बिन भिकमंगा." Rofl

>>हे वाक्य अत्रे यांचे आहे, त्यांनी जर हे भाषांतर ऐकले असते तर ?

पुढच्या दहा हजार वर्षात याला माफ केला नसता Proud

रोहित, धम्माल लिहिलंय भौ.

@शिल्पा : धन्यवाद !!
अगं ते असं झालं की सरांनी नंतर साधा निबंध लिहून दाखव पण म्हणलं नाही ग कधी Sad

@लिंबूटिंबू : मला पण पहिले कळालं नव्हतं..
पण काही गोष्टी मराठीतच छान वाटतात हे कळालं..

@किरण : धन्यवाद भावा Happy

@ महेश : हा हा .. विचार पण नाही करू शकणार..

@स्मितू : धन्यवाद !! Happy

@ रान्चो : धन्यवाद !! Happy

@ मंदार : धन्यवाद भौ Lol ...!!

@ बागेश्री : धन्यवाद. Happy

सर्वांचे प्रतिसाद वाचून खूप आनंद झाला..यापुढे पण लेख लिहिण्यास आवडेल मला Happy . कलम उचलतो Happy

तुमच लेखन सुध्दा गाजेल यात शंका नाही.

प्रयोग करुन पहायलाच हवा.

हात हे कंगन को आरसी क्यु - हातच्या कंकणाला आरसा कशाला
उलटा चोर कोतवाल को डाटे - चोर तो चोर वरुन शिरजोर

इ. म्हणी कुणीतरी मराठीतल्या हिंदीत -किंवा हिंदीतल्या मराठीत भाषांतरीत केल्याच असतील ना ?

मराठीतल्या प्रतिभावान लेखकाला आई विषयी जे म्हणावस वाटत ते हिंदीत भाषांतरीत झालेच पाहिजे.

हे वाचून पुलंच्या एका लेखनातील पुढील भाषांतराची आठवण झाली:

उद्या सर्वपित्री अमावस्या आहे = Tomorrow being all-fathers' night smiley_laughing_01.gif

याऐवजी दिवारची लाइन बोलायला हवी होती.
"मेरे पास मेरी माँ है |"

सारी दुनियाँ का मालिक, माँ के लिये तरसता!
असे काहीसे योग्य होइल.

जनु बांडे (लेखक बहुतेक रमेश मंत्री), जेम्स बॉण्डचे मराठीकरण. यामधला एक किस्सा आठवला.
जनु बांडे एअरपोर्टवर गॉगल लावून पेपर (सकाळ किंवा सामना असेल) वाचत उभा असतो. दुसरा एकजण गॉगलवाला त्याच्या जवळ येतो आणि त्याच्या कडे न बघता एक वाक्य बोलतो.
"ऑई थॉर टुझे ऑपकार" आणि मग कोडवर्ड मॅच होत असल्यामुळे
जनु बांडे पेपर वाचत असतानाच त्याच्या बरोबर काही वस्तु किंवा बॅग एक्स्चेन्ज करतो.
सगळ्याच गोष्टीचे मराठीकरण करायचे असल्याने कोडवर्ड पण अफलातुन निवडलाय. Happy

Tomorrow being all-fathers' dark night without moon, therefore we can not see all fathers.