बाबाची सही

Submitted by rkjumle on 27 September, 2011 - 02:49

मी चवथी पास झाल्यावर नंतरच्या शिक्षणासाठी शहरात आलो.
त्यावेळी आम्ही ऊमरसर्‍याला राहत होतो. हे गांव यवतमाळपासून एका मैलावर म्हणजे एक छोटंस खेडच होतं. दोन्ही गावांच्या मध्ये एक नाला होता. त्याच्या कडेला उंच-खोल अशी जमीन पसरलेली होती. अंधार पडला की येथून जायला भिती वाटायची. माझी व बाईची शाळा या गांवापासून एक-दिड कोस दूर असेल.
सुरुवातीला आम्ही दोघं बहिण-भाऊ माझ्या आत्याची मुलगी सुभद्राबाईकडे, त्यानंतर लहान आत्याकडे व तेथून मोठ्या आत्याच्या एका छोट्याश्या खोलीत राहायला गेलो.
त्यानंतर बाबाने बांधून दिलेल्या एका लहानश्या झोपडीत राहिलो.
बाई माझ्यापेक्षा मोठी असल्यामुळे साहजिकच कर्ता म्हणून प्रपंचाची सारी जबाबदारी तिच्यावर आली होती. जे वय खेळण्या-बागडण्याचं असते, त्या वयात घर सांभाळण्याचं ओझं तीच्या अंगावर येऊन पडली होती!
वर्ग चालू असतांना चपराशी आला.
‘जुमळे कोण आहे ?’ मी ऊभा झालो.
‘तूला बाबुने बोलावीले.’
मी ऑफीसमध्ये गेलो. बाबूने मला एक फॉर्म दिला.
‘तूझ्या बाबाची सही घेऊन उद्याच्या उद्या आणून दे.’
तो फॉर्म स्कॉलरशीपचा होता. मला वर्षाला पंधरा रुपये मिळणार होते. मागास जातीतील ज्यांना चवथ्या वर्गात चांगले मार्क्स मिळालेत, त्यांनाच ही सरकारची स्कॉलरशीप मिळणार होती.
घरी आलो. घरी येईपर्यंत संध्याकाळ झाली होती. दप्तर खुंटिला अडकवून ठेवले.
‘बाबाच्या सहीसाठी गांवला जात आहे.’ मी बाईला सांगितले.
माझ्या मोठ्या बहिणीचे नांव जनाबाई. ती माझ्यापेक्षा मोठी पण एका वर्गाने मागे होती. कारण तिला माझ्यानंतर शाळेत टाकले होते. लहान भाऊ अज्याप याला राखण्यासाठी तिला ठेवले होते.
‘रस्त्यात तूला अंधार होईल. मग कसा जाशील रे अंधारात?’
‘पण बाबाची सही उद्याच्या उद्या आणून द्यायची आहे ना?. अंधार पडला तरी जातो मी... सकाळी लवकर येईन...’ असे म्हणून मी तडक निघालो.
माझे खेडेगांव तीन साडे-तीन कोस दूर होते. त्यावेळेस गांवला जाण्यासाठी पायी जाण्याशिवाय दुसरा उपायच नव्हता.
रस्ता पण चांगला नव्हता. लहान-मोठे दगडं, माती-मुरमाटीचा असा तो कच्चा रस्ता होता. परंतू तो लहानपणापासून नेहमीचा जाण्या-येण्याचा असल्यामुळे अंधारात सुध्दा रस्ता चुकत नव्हता. इतकी ती वाट मळलेली होती.
झाडांझुडपातून, जंगलघाटातून जाणारा..., उतार-चढावातून जाणारा..., शेतातून, शेताच्या उभ्या पिकातून जाणारा...,शेताच्या धुर्याधुर्याने जाणारा...,बैलगाडीच्या चाकोरीने जाणारा..., बरडाच्या काठा काठा ने जाणारा... तो रस्ता होता.
घाटाच्या खाली उतरलो. गोधणी हे गांव ओलांडून पलीकडे गेलो. त्यानंतर निळोणा व नंतर माझं गांव चौधरा येणार होते.
सूर्य बरडाच्या आड लपत लपत खालच्या बाजूने हळुहळू सरकत चालला होता. त्याचे लालसर किरणे तेवढे दिसत होते. त्याचे अस्तित्व नष्ट होत चालल्याची जाणीव मला अस्वस्थ करत होती. हळुहळु त्याची जागा अंधारलेला काळोख आपल्या कवेत घेत होता. पाखरं मोठ-मोठ्या झाडावर रात्रीच्या राहुटीला एकत्र जमले होते. त्यांचा बर्याच वेळापासून चाललेला किलबिलाट आता मंद होत चालला होता.
जस-जशी झाकट पडत चालली, तस-तसे माझ्या अंगावर अनामिक भितीचे काटे उभारले जात होते. कशी तरी हिम्मत करुन मी निघालो खरा, पण आता अंधाराच्या जाणिवेने माझे सर्वांग शहारत चालले होते. हृदयाच्या ठोक्याची गती वाढत चालली होती. छाती धडधड करीत होती.
ती काळीकूट्ट अंधारी रात्र असल्याचे आता तिव्रतेने जाणवत होते. बहूतेक अमावस्या तेवढ्यातच होती कीं काय असे वाटत होते.
नाला आला की आणखीनच भिती वाटत होती. कारण काठाच्या अलीकडे व पलीकडे निमुळता व चिखल-पाण्याचा घसरता रस्ता असायचा. आजुबाजूच्या गवताने व पालवीने तो रस्ता झाकून जायचा. पाय घसरुन पडू नये म्हणून पायाच्या बोटाची नखे ओल्या मातीत रुतवून हाताने जवळच्या पालवीला पकडीत जावे लागे.
शेत ओलांडल्यावर रस्त्याच्या आजु-बाजूला गर्द झाडी असायची. मध्येच नाला यायचा. दिवसा निखळ आनंद देणारी पाण्याची खळखळ आता मात्र अंधार्‍या रात्रीत नकोशी वाटत होती. रातकिड्यांचा किर्रकिर्र आवाज शांतता भंग करुन अंधाराला सोबत करीत होता. कुठे खुडखूड वाजले की अंगावर सरसरुन काटे उभे होत. मध्येच एखाद्या पाखराच्या फडफडण्याचा आवाज दुरुन ऎकू यायचा. कधी कधी पाखरांच्या गुंजण्याचा आवाज मंजूळ वाटायचा तर कधी कधी भेसूर वाटायचा.
मला प्रश्न पडायचा की, या पाखरांना अंधार्‍या रात्रीची भिती कां वाटत नाही? माणसांनाच कां वाटते? दिवसा किंवा उजॆड असतांना आपण ज्या रस्त्याने जातो, तेव्हा त्या रस्त्याची जेवढी भिती वाटत नाही. त्यापेक्षा त्याच रस्त्याची रात्रीला आणखी भिती वाटते. असे कां?
लहान मोठ्या झाडा-झुडपाच्या सावल्या विचित्र दिसायच्या. कोणीतरी उभे आहे कां असे वाटायचे. जवळ गेल्यावर ती सावली असल्याचे लक्षात यायचे. कधी मध्येच काजवा ऊजेडाची उघडझाप करीत चमकून जात होता. थोडासा कां होईना त्या अंधारात एखाद्या बिघडलेल्या बंद चालू होणार्‍या बॅटरीप्रमाणे उजेड पाडून जात होता. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार वाटत होता.
मला विंचु-काट्यांची, सापाची किंवा हिंस्त्र पशु-पक्षांची जेवढी भिती वाटत नव्हती, त्यापेक्षा भुता-खेतांची, चकव्या-लावडिनीची जास्त वाटत होती. कारण अशा भितिदायक गोष्टी लहानपणापासून खूप ऎकल्या होत्या. त्या मनाच्या एका कोपर्‍यात घट्ट जावून बसल्या होत्या. अशा भयान रात्रीला त्या हमखास बाहेर यायच्या. मग भितीने आणखीनच कापरे भरायचे. अशा गोष्टींमध्ये काहीच तथ्यांश नसते हे त्यावेळी मला काहीच कळत नव्हते. भगवान बुध्दांचा आत्मा नाकारणारा अनात्मवादाचा सिध्दांत व भुता-खेतांसारख्या गुढ, अदभूत व चमत्कारिक गोष्टीला नाकारणारा, कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही असा कार्यकारणभाव किंवा प्रतित्य समुत्पादाच्या सिध्दांताचे ज्ञान त्यावेळी मला झाले नव्हते.
एक-दिड कोस मी चालून आलो असेन. शेतातल्या पायवाटेने जीव मुठीत घेऊन चाललो होतो. गोधणी गांवच्या कोलामाचे मोहाच्या झाडाचे ते शेत म्हणून ओळखले जात होते. त्या शेताच्या मधोमध मोहाच्या झाडाजवळून पायवाट जात होती. पायवाटेच्या दोन्हिही बाजूला ज्वारीचे धांडे माझ्या उंचीएवढे वाढले होते.
मी एवढ्या रात्री येण्याची इतकी हिंमत करायला नको होती, असे मला राहून राहून वाटत होते.
आतापर्यंत केवळ अर्धीच वाट चालून आलो असेन. आणखीन तेवढेच दूर जायचे होते. अजून निळोणा हे गाव यायचे होते. या गांवला माझे चवथीपर्यंतचे शिक्षण झाले होते.
त्यांतर वाघाडी नदी...! बापरे त्या नदीतून कसा जाईन? खळखळ वाहणारी व मोठे पात्र असलेली भयावह नदी... तिच्या आलिकडील व पलिकडील काठाला मसणवटी... तिच्या थोडे दूर खालच्या बाजूला खोल असा डोह होता. तो डोह... तो चकवा... माझं सर्वांग शहारुन गेलं! अंगावर सरसरून काटे ऊभे झाले! छाती धडधड करायला लागली! माझे पाय लटपटा कापायला लागले! परत जावे की काय असाही विचार मनात चमकून गेला. पण बाबाची सही... काय करावे काही कळत नव्हते. ‘पुढे बसलो तर धूर जड अन् मागे बसलो तर उलार!’ अशी माझी विचित्र गत झाली होती. तरीही मनाची हिय्या करुन मी पुढे पुढे सरकत चाललो होतो.
एवढ्यात मला दुरुनच धियाऽऽ धियाऽऽ असा अस्पष्ट आवाज ऎकू येऊ लागला. मी त्या आवाजाचा कानोसा घेण्यासाठी क्षणभर थबकलो.
त्याच वेळेस पुन्हा एकदा त्या चकव्याची आठवण झाली. तो म्हणे असाच कोणत्यातरी रुपात येत असतो. आपल्यासोबत गोड गोड बोलून नदी काठावर घेऊन जातो व डोहात ढकलून देतो.
आमच्या गांवात अशीच एक गोष्ट घडून गेल्याचे सांगत होते. एका नवरदेवाला रात्रीला चकव्याने नदीवर नेले होते. त्याचे कपडे उतरवून त्याला डोहात ढकलून दिले होते. खरं काय न खोटं काय कोण जाणे!
या आठवणीने मी पार हादरून गेलो होतो. तोंड सोकून आले होते. तरीही मी आवाजाचा कानोसा घेत थबकत थबकत चालू लागलो. आता तो आवाज थोडा स्पष्ट होत जवळ येऊ लागला होता. चकव्याची भिती थोडी कमी होत चालली होती. माझ्या घाबरलेल्या जीवात जीव आल्याचे जाणवत होते. परंतू पायवाटेच्या समांतर चाललेल्या बैलगाडीच्या वाटेने तो आवाज येत होता. म्हणून मी झपाझप पाऊले टाकत चालायला लागलो. नाहीतर ती व्यक्ती पुढे निघून जाईल व पुन्हा मला एकट्यालाच त्या अंधार्‍या रात्री मार्ग तूडवत जावे लागले असते.
जेथे दोन्हिही रस्ते एकत्र येत होते तेथे मी येऊन थांबलो. ती व्यक्ती जवळ येऊ लागली. तसा तो एकदम थांबला. एवढ्या रात्री कोणी येथे उभा असेल याची त्याला कल्पना नव्हती. मला पाहून तो पण घाबरुन गेला असावा.
‘कोण आहेरे?’ असे दरडावून मला विचारले.
‘मी रामराव.’
’अरे बापरे, एवढ्या रात्री कसा तू?’
‘हो, कामच होतं तसं. बाबाच्या सहीचा कागद उद्या शाळेत नेऊन द्यायचा आहे. म्हणून शाळा सुटल्यावर निघालो, पण अंधार पडला.’
‘बरं झालं, मी भेटलो, नाहीतर तू एकटा कसा गेला असतास, कुणास ठाऊक?’
तो व्यक्ती माझ्याच गांवचा निघाला. धर्मा लभान. त्याने त्याचा बैल दवाखाण्यात नेला होता. पण उशीर झाला. त्यामुळे त्यालाही निघायला रात्रच झाली होती. तसे अंधारात जायची या लोकांवर नेहमीच पाळी यायची.
‘शाळा शिकायला किती कष्ट घ्यावे लागतात! नाही कां? पहाना आमचे लभान लोकं पोरांना शाळेत धाडत नाहीत. कोणी टाकले तर ते शाळेत जात नाहीत. असे बयताड लभान आहेत आमचे... तू मात्र किती आटापिटा करुन शिकत आहेस! शिक बाबा... आपल्या गांवचं नांव कमावून दाखव म्हणजे झालं!’
मी त्याच्या मागे मागे चालत होतो. त्याच्या सोबत बैल असल्यामुळे त्याला बैलगाडीच्या रस्त्यानेच चालावे लागत होते. पायवाट तरी बरी होती. त्यापेक्षा हा बैलगाडीचा रस्ता म्हणजे आणखीनच त्रासदायक होता. अनवाणी पाय कधी खड्ड्यात पडायचा. तर कधी ठेचाळत जायचा. निळोणा गांवापासून ते वाघाडी नदिपर्यंतचा रस्ता तर निव्वळ गोटाळीचा होता. आम्ही निळोण्याला शाळेत यायचो, तेव्हा येवढा रस्ता पार करायला आमचा जीव नाकीनव यायचा.
तो खेडूत शेतकरी असल्यामुळे तो झपाझप लांब टांगा टाकत चालत होता. मला त्याला गाठायला त्या अंधार्‍या रात्री दुडक्या चालीने चालावे लागत होते. गांव जवळ आले की हागदोडी-पांदन लागायची. पाय केव्हा एखाद्या पोवट्यावर पडेल याचा काही नेम नव्हता.
शेवटी गावांत आलो. बाहेरून आवाराच्या कवाडाची कडी वाजवली. बाबाने कवाड उघडलं. हातातला कंदिल वर घेऊन पाहायला जवळ आला. मला दारात पाहून दचकलाच.
‘अरे बाबु, तू कसा काय एवढ्या रात्री आलास?’
‘मी गोधणीच्या मोहाच्या वावरापर्यंत एकटाच आलो. मग धर्मा लभान भेटला. त्याच्याबरोबर आलो.’
‘एवढ्या रातच्यानं कशाला आलास गा.... आला असतास सकाळ-वकाळ.’ ‘स्कॉलरशीपच्या फॉर्मवर तूमची सही पाहिजे होती ना... तो उद्याच शाळेत नेवून द्यायचा आहे. म्हणून आलो.’
‘आता ही काय भानगड आहे?’
‘मला वर्षाला पंधरा रुपये मिळणार आहेत. त्याला स्कॉलरशीप म्हणतात.’
‘हो बाबा, आपल्या आंबेडकर बाबांनी तूझ्यासारख्या हुषार मुलांना खूप शिकता यावे म्हणून मोठ्या पुण्याईचं काम केलं... ते खूप शिकलेत...मोठे झालेत...तू पण तसाच शिकून मोठा हो...’
दुसर्या दिवशी सकाळी बाबांनी मला रेंगीने आणून दिले.
त्यानंतर मी कानाला खडा लावला. कोणत्याही फॉर्मवर बाबाची सही घेण्यासाठी कधिही गांवला गेलो नाही. कारण मीच बाबाची सही चांगली घोटून घोटून शिकून घेतली होती. त्यामुळे मीच प्रत्येक वेळी त्यांची खोटी खोटी सही करीत होतो. त्यांची खोटी सही करण्याचा वारंवार गुन्हा माझ्या जीवनाचा तेव्हापासून अविभाज्य अंग बनला होता.
खरंच डॉक्टर बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार माझ्या बाबांनी अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी मजबुत पायाभरणी केली होती, ही गोष्ट मी कधिही विसरु शकत नाही. कारण याच मजबूत पायाच्या आधारावरती माझ्यानंतर येणारी पिढी निश्चितच शिक्षणाची भव्य-दिव्य ईमारत उभी केल्याशिवाय राहणार नाही हेही तेवढेच खरे होते!

गुलमोहर: 

सिंडरेलजी व विप्राजी
बरोबर आहे. ही कथा यापुर्वी टाकली होती. परंतु चुकून निवडक १० मधून काढून टाकली होती. म्हणून मी पुन्हा तीच कथा सुधारुन टाकली आहे. पुर्वी जवळपास १८५० शब्द होते. आता १५०० शब्दाच्या आंत आहे. आता मी अनावश्यक भाग गाळला आहे.
धन्यवाद!