पोटचा - भाग ३ (अंतिम)

Submitted by दाद on 31 March, 2008 - 23:25

भाग १ - http://www.maayboli.com/node/1558
भाग २ - http://www.maayboli.com/node/1566

........
आणि दरवाज्यात एक सुद्दृढ सावली पडली.... ओळखीची अधीर पावलं अन ’छोटी आई’ अशी त्याच्या अंतर्मनालाही साद घालणारी हाक ऐकू येऊनसुद्धा त्यांनी मान उचलली नाही. उलट असहाय्यपणे एकाबाजूला मान टाकून त्या, तोंडात चादरीचा बोळा घेऊन स्फुंदू लागल्या.

.... देवा, याक्षणी उचल, ह्यातून सोडव... ही विटंबना नको.... संजूबाबाने ह्यातलं काहीही करायला नकोय मला.... छे छे... विपरित आहे... अगदी लाजिरवाणं... नको नको....

..........
खोलीत आल्या आल्या संजयने प्रकार ओळखला.... तसाच धावत तो नर्मदाबाईंच्या बिछान्याशी गेला.
’छोटी आई, छोटी आई... अगं मी आलोय. इतकं होईपर्यंत कळवलं नाहीस मला... मी कुणीच नाही काय तुझा....’ आवेगाने नर्मदाबाईंच्या जवळ येत म्हणाला....

’संजूबाबा.....’, नर्मदाबाईना शब्दं फुटेना. तरीही धीर करून बोलल्याच, ’दुरून बोल रे, जवळ नको येऊस.... घाण आहे इथे....’

'अगं .... असं काय ....' संजयने बोलायचा प्रयत्नं केला पण नर्मदाबाईच्या चेहर्‍यावरच्या वेदना आणि त्याहीपेक्षा त्याच्याकडे बघायचं टाळत दु:खातिरेकाने 'नाही नाही' हलणारी मान....

संजय आल्या पावली खोलीबाहेर निघून गेला..... धुमसत्या हुंदक्यात बुडालेल्या नर्मदाबाई आणि काय करावं ते न कळून दरवाज्यात उभे पुरोहितबुवा....

काही वेळातच बालदी भर गरम पाणी, विसाणाचं पाणी, साबण, कपडे, पंचा असं सगळं घेऊन गडीबाबू खोलीत आला.... आणि त्याच्या मागे संजय. प्रवासातले कपडे बदलले होते. मलमलीचा सदरा, घरातला लेंगा अशा घरगुती वेषात आला.... आणि त्यांने आपल्यामागे खोलीचं दार लावून घेतलं....

’छोटी आई, आई.... इकडे माझ्याकडे बघ..... मी हे सगळं स्वच्छ करणारय.... नर्सबाई आल्या नाहीयेत आणि कुणी येईपर्यंत..... तुला अशीच.... अशीच ठेवणं मला जमणार नाही.... पटणार नाही ते’ संजय जमेल तितक्या मृदू पण दृढ स्वरात नर्मदाबाईंना समजवायचा प्रयत्नं करीत होता.

’संजूबाबा, पाया पडत्ये तुझ्या.... मी तुला निकराचं सांगत्ये.... आजवर कुणाकडून काही करून घ्यावं लागलं नाही.... देवाने हे दिवस दाखवलेत... त्याला माझी ना नाही.... पण तुझ्याकडून हे करून घ्यायचं? ... तूझ्याकडून... तू... तू एक.... ही विटंबना.... हे सहन होत नाही... मी जीभ हासडून प्राण देईन....’ नर्मदाबाई आवेशाने जमेल तसा विरोध करत होत्या. ’तुझ्याकडून नाही.... तू... काही झालं तरी तू....’

पण त्या वाक्य पूर्णं करू शकल्या नाही. त्यांचा उद्वेगाने हलणारा चेहरा आपल्या मजबुत हातांच्या ओंजळीत संजयने धरला होता.... आणि त्यांच्या डोळ्यात बघत विचारलं....
’का थांबलीस छोटी आई? बोल ना... काही झालं तरी मी.... बोल.... मी तुझा पोटचा पोर कुठाय... हेच ना? ... हेच बोलणार होतीस ना? मी... मी तुझ्यासाठी एक... एक परपुरूष आहे....’

संजयचं हे इतकं स्पष्टं बोलणं दोघांनाही कातरत गेलं. नर्मदाबाईनी चेहरा वळवण्याचा निष्फळ प्रयत्नं केला.

’छोटी आई, एक जन्मं दिला नाहीस इतकच.... पण सगळं सगळं तूच केलयस.... तुझ्या हातून पहिला मऊ भात, तुझ्या हाती ग म भ न, तुझं बोट धरून पहिलं पाऊल....
.... जावळ करताना इतका रडलो होतो, पण सगळ्यांचा विरोध पत्करून तूच शास्त्राचे म्हणून एका बाजूचे केस कात्रीने कापले होतेस.... आत्तिआज्जीने सांगितलय सगळं.... माझं सगळं पहिलं तुझ्या हातीच गं.... शाळेतून उन्हातानाचं आल्यावर तुला मिठी मारल्यावर तुझ्या गार-गार पोटाचा गालांना होणारा स्पर्शं, तुझ्याकडून डोकं पुसुन घेताना कानाशी होणारी तुझ्या बांगड्यांची किणकिण, मी रात्रं-रात्रं जागून अभ्यास करताना तिथेच आराम-खुर्चीत बसून तुझं पेंगणं, मोठ्या आत्तीआज्जीला एकदा उलटुन बोललो तेव्हा तुझ्या हातचा खाल्लेला मार, मी खोटं बोलल्याबद्दल तू धरलेला उपास आणि मग आपण दोघांनी रडत-रडत देवघरात खाल्लेला नैवेद्य.... आणि तुझ्या रोजच्या जेवणात... शेवटल्या ताकभातात लोणच्याचं बोट लावून माझा हक्काचा घास.... मुंजीत... आता ह्यानंतर शास्त्राने तुझं उष्टं मी खायचं नाही... म्हणून मातृभोजनाला किती कातर झाली होतीस......माझ्या सगळ्याच आजारपणात तुझं रात्रं-रात्रं उशाशी जागणं.... ह्यातलं काय तुझ्या पोटच्यासाठी वेगळं होणार होतं... वेगळं करणार होतीस.....

’आई... छोटी आई, माझ्यासाठी तुझं स्वत:चं बाळ गमावलयस... हे मला माहीत नाही असं तुला वाटतं? ....जन्मदाते वडील.... दादांपेक्षाही मला तू जास्तं जवळची हे मी तुला सांगायचं?’

’छोटी आई, एक सांगतो..... मी तुझ्या पोटीचा नाही हे मला माहीतच नव्हतं, तू कधी जाणवू दिलं नाहीस.... आणि कळलं तोपर्यंत.... तोपर्यंत कधीचाच तुझाच होऊन गेलो होतो... ते कसं विसरू ते सांग...’

आता नर्मदाबाईंनी डोळे उघडले होते आणि एकटक संजयकडे बघत होत्या...

’...... आपल्याशी थोडं तुसडेपणाने वागणार्‍या आक्का आत्येने मानपानाचं निमित्तं करून मुंजीत मला आशिर्वाद द्यायचं नाकारलं होतं, आठवतं? कळत्या वयात तो अपमान सहन न होऊन मी तुझ्याकडे रडत आलो होतो.... तेव्हा तूच माझी समजूत काढली होतीस... जा त्यांच्या पाया पड... त्यांच्या आशिर्वादावर तुझा अधिकार आहे.... आक्कात्ये सारखी बाई नमली होती.. मला हाती धरून त्यांच्या पायावर डोकं टेकायला लावलस तेव्हा....
आई.... छोटी आई, आता तुझी सेवा करायचा माझा अधिकार तू नाकारतेयस.... मला हाती धरणारं, तुला समजावणारं घरात कुणी मोठं राहिलं नाही.... मीहून तुझ्या पायी डोकं ठेवलं तर करू देशील मला हे?.... देशील माझा अधिकार मला....’
संजयचा आवाज भावनावेगाने चढला होता.... हात थरथरत होते, डोळ्यात पाणी साठलं होतं....

पोटच्यापेक्षाही जवळचं होऊन जाब विचारणारा हा त्यांचा तरूण लेक.... नर्मदाबाईंच्या नजरेत माईना.... धडपडत उठतं व्हायचा प्रयत्नं करू लागल्या.... त्याला कवेत घेण्यासाठी.....

आपल्या छोट्या आईची ती गदगदणारी थकली कुडी, तिच्या पसरलेल्या हातांसकट संजयने आपल्या मिठीत घेतली...

समाप्त

गुलमोहर: 

वा खुप छान ग मनाला एकदम स्पर्शुन गेल. वाचता वाचता डोळ्यात कधी पाणी आल ते कळलच नाही......

ekadam "touch" zaal manala..............
kharach daad, khupach mast lihita tumhi.............

दाद, खूप सुंदर आणि हळवी हळवी लिहिली आहेस कथा..... नर्मदाबाई आणि संजूबाबा खूप खूप आवडून गेले.

खुपच हळवी, ह्रुदयस्पर्शी कथा आहे
दाद..........
बस नाम काफि है

किती सुंदर लिहिलं आहेस.........

वाटच बघत होते मी तिसर्‍या भागाची. खूपच सुरेख गोष्ट आहे. छान रंगवलीयस.
किती अवघड आहे असं जगणं खरंच.

तुझ्या कथेला कशी दाद देऊ???
अप्रतिम.... अगदी डोळ्यांत पाणी आणणारी कथा... सुंदर...

खूप छान. अजूनही डोळ्यातुन पाणी वहातय.असे नातेसम्बन्ध खरच असतात जगात. आपणच फार चौकटी आखतो सक्ख्या - दूरच्या अशा नात्यान्च्या.......

परत एकदा
डोळ्यात पाणी ....
काय भान्गड आहे? विनोदी लिहिलंस की हसून हसून
आणि असलं काही लिहिलंस की आपसूकच...

नेहेमीप्रमाणेच.

एक उत्तम हृदयस्पर्शी, सुंदर कथा..... परमेश्वराला प्रत्येक घरात वास करता यावा यासाठी त्याने आई हे रसायन असं बनवलं की जगात त्याला तोडच नाही......

दाद, कित्ती सुरेख लिहिलय. खुप आवडलं. खुप दिवसानी लिहिलस ना तू... आम्ही सगळे वाटच बघत होतो... सार्थक झाले Happy
-प्रिन्सेस...

दाद ,
हे माझे पहिलेच पोस्ट आहे.
खरच खुप छान लिहिता तुम्ही.
मस्तच ..... गुलमोहर आणि बखर मधिल तुमच्या सर्व कथा वचुन काढल्या मी ... खुपच छान लिहिता तुम्ही ..
खरच खुपच छान...

धन्यवाद. खरच.
अगदी 'सरधोपट' म्हणावी अशी कथा आहे. पालक आणि मूल हे नातं... त्यातही आई-मूल हे नातं मला खूप वेड लावतं.
न सांगताही तिला कळतच अन , 'मग? त्यात काय नवीन? मला नाही कळणार तर कुणाला....' असं हजारो मैलांवरून आजही आई म्हणते तेव्हा.... किती जवळ असते ते शब्दात नाही सांगता येत.

अगदी कितीही मोठ्ठा झालेल्या माणसाची पहिली समज यायच्याही आधीची गृहित धरलेली गोष्टं म्हणजे 'पालक' अन त्यातही 'आई'. माझ्या मते आपलं खरं पहिलं भांडणही आईशीच होत असणार... अगदी खूप खूप लहानपणी उडवून दिलेल्य मऊ-भाताच्या ताटलीपासून असावं Happy

माझ्याच लक्षात आलेली गोष्टं म्हणजे माझ्या बर्‍याचशा कथा ह्याच नात्यावर बेतल्यात.... थोडं हटके लिहायला हवं नाही? (जमेल हळू हळू... इथे घाई कोणलाय?)

दाद ! धन्य हो तुमची लेखन शैली ! आजपर्यंत दाद हे नाव फक्त विनोदी कथेबद्दल माझ्या लक्षात राहीलं आणि आता या कथेने एकदम कलाटणी ? अप्रतिम तुमच्या लिखाणाला मनापासुन सलाम !

खुप छान आहे. खरच डोळ्यात पाणि कधी आले कळलेच नाहि.

दाद, खुप सुंदर आणि हळव लिहिलयस. आवडल.

छान कथा दाद, पण तीन भाग का केले ? इथे लिखाण राखुन ठेवायची सोय आहे ना आता. सलग वाचायला सोपे जाते.

हा भाग तिसरा वाचेपर्यंत कुणी लिहिलंय ते पाहिलंच नाही पण तुझीच गोष्ट असणार ह्याची खात्री होती. कोण लिहिणार एवढं हृदयाला भिडणारं? पण इतके दिवस होतीस कुठे? तुझं लिहिणं खूप मिस केलं.

परत एकदा धन्यवाद... सगळ्यांचे.

आता ह्या गोष्टीत मला आवडलेली गोष्टं सांगत्ये -
हे नेहमीचं आई-मुलाचं नातं नाही.
मुलाला दुसरी आई माहीतच नाही. ही इतकी 'त्याची' आहे की 'नाही' कळल्यावरही.... इतकं आत आत रुजलेलं त्यानं कुठेच नाकारलं नाही, उलट जोपासलं.
ही आई -आधी ह्या मुलाची देखभाल ह्या प्रवासाने सुरूवात झालीये... तशी जाणीव इतरांनी करूनही दिलीये. एक स्वतःचं होता होता गमावलय.
सर्वसामान्य नात्यात आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा एक क्षण असा येतो की, नाळ तुटलेल्या आपल्याच लेकाकडून जेव्हा "अशी" सेवा करून घ्यायचा प्रसंग येतो... तेव्हा कोणत्याही आईमधली 'स्त्री' प्रथम बावरेल.... पण नंतर सावरेल अन लेकाकडून करून घेईल.
पण 'हा पोटचा नाही'.... हा एक धुलीकण ह्या मातेच्या मनोबिंबावर अजून तरंगतोय... तिच्यातली 'स्त्री' जास्तं बावरलीये.
कदाचित आपल्याकडल्या स्त्रीयांची जी मनोभूमी लहानपणापासून तयार केलेली असते, ती कारणीभूत असेल... म्हणून ही आई एक 'स्त्री' म्हणून बावरलीये....
शेवटच्या भागात लेकाने तो धुलीकणही अलगद बाजूला करून तिला तिचं आईरूप लख्खं दाखवून देणं... हा माझ्यासाठी अत्त्युच्चं आनंदाचा भाग ठरला. एक सुंदर रिलेशन पूर्णपणे प्रस्थापित झालं... आता त्याला कोणतीही डिग्री, डेप्थ वगैरेची परिमाणं लागू नाहीत... एक स्वतःतच पूर्णं रिलेशन - आई-मुलाचं!
(माझ्याच कथेचं मीच असं लिहिणं कितपत योग्य? माहीत नाही....... मला वाटलं की तुमच्या बरोबर हा अँगलही शेअर करावा... ह्या कथेतली कदाचित हीच गोष्टं तुम्हालाही आवडली असेल)

दाद, अगदी काळजाला भिडणारी कथा! या परते शब्दच नाहीत! डोळयांत पाणी आले ते कथा अंधुक दिसली तेव्हाच कळले! अप्रतिम!

दाद, कथा आणि त्यातल सौंदर्य तूच उलगडणे हे दोन्ही आवडले.

खुप बरे वाटले. अगदि मनाला स्पर्श करुन गेली.

दाद,
तुझं लेखन आणि त्यावरचं विश्लेष्ण दोन्हीही अत्यंत प्रामाणिक, बोलकं आणि निर्मळ असतं. एकाद्या दुर्बोध लिखाणावर विचारलेल्या प्रश्नांना तू अत्यंत आत्मियतेने समर्पक उत्तर देतेस हे खूपच कौतुकास्पद आहे. तुझ्यातल्या ह्या दुर्मिळ वृत्तीचं अभिनंदन करायलाच हवं.
.......................................अज्ञात

परत तोच अनुभव. परत तीच अनुभुती. कथा वाचून संपल्यानंतर परत तेच सुन्न होणं.
तुझ्या प्रत्येक कथेतून हे अनुभवतोय मी! धन्य आहे की मला इतकं चांगलं साहित्य वाचायला मिळतयं!

शलाका, नक्कीच तुला भगवंतानं वेळ काढून बनवलय!

शरद

"नको 'शरद' शब्दांचे वैभव, हवी भावना सच्ची,
ह्रदयावरल्या अनंत लहरी स्वीकारतेच कविता!"

शरददा, धन्यवाद. आपल्यातल प्रत्येकजणं बनवायला त्याला तितकाच वेळ लागतो हो.

वाचता वाचता डोळ्यात कधी पाणी आल ते कळलच नाही......मनाला स्पर्शुन गेली कथा

Pages