समाधान

Submitted by स्वाभाविक on 10 September, 2011 - 10:16

अशीच एक बुधवारची संध्याकाळ होती. मी कार्यालयातुन लवकर घरी येत होतो. म्हणजे फारसा लवकर नाहि, रोज मला आठ साडेआठ वाजत होते आज साडेसहा वाजले होते.
आमच्या अपार्ट्मेंट समोर येताच मला जोशी काका दिसले, एकटेच कठड्यावर बसले होते. मी म्हंटलं पाहुया ओळख लागते का.
मी: काका ओळखलंत का?
काका: अं, चेहरा ओळखीचा वाटतोय, नाव आठवत नाहि.
मी: काका मी केदार, इथं राहतो. मी समोरच्या बिल्डींगकडं बोट दाखवत म्हंटलं.
काका:अरे तु तर बेंगलोरला गेला होतास ना? नोकरीसाठि?
मी: हो काका (मी मनातल्या मनात काकांच्या स्मरणशक्तीचं कौतुक करत म्हंटलं) आता परत आलोय पुण्यात सहा महिने झाले.
काका: छान छान. बरं आहे ना सगळं?
मी: हो, अगदि मजेत.

का कुणास ठाउक, मला काका थोडेसे उदास वाटले.त्यांचा नातु चिंतन उर्फ चिंटु नव्हता ना त्यांच्याबरोबर. मी यापुर्वी त्यांना चिंटुबरोबर खेळताना पाहिलं होतं बरेचदा.

मी: काका चिंटु कुठं आहे? दिसला नाहि बरेच दिवस
काका : अरे तो अमेरिकेत आहे सध्या. राजेश आणी सुनबा‌इला तिकडं नोकरी मिळाली आहे. तिथंच आहेत ते तिघं. वर्ष झालं त्यांना तिथं जा‌ऊन. मी आणी हि देखील गेले सहा महिने तिथंच होतो. मागच्या आठवड्यात आलो परत.
मी काकांचे अनुभव जाणुन घ्यायचे म्हणुन विचारलं
मी: मग कसं वाटलं अमेरिका काका? पहिल्यांदाच गेला असाल ना तुम्हि?
काका: हो, पहिल्यांदाच. आहे भव्य आहे तिथं सगळं. मुंबईपेक्षा उंच इमारती आहेत, पण मुंबईइतकि गर्दि नाहि. सुख सोयी तर सगळ्या आहेत, पण माणसं एकामेकास भेटत नाहित. थोड्याच दिवसात एकटेपणा जाणवु लागला. चिंटुला तिथंच शाळेत घातलं आहे. त्यामुळं तो देखील सकाळि नसायचा घरी. न्यायला सोडायला स्कूलबस. सकाळि राजेश आणि सुनबाइंची ऑफ़िसची गडबड...
काका भरभरुन आपल्या आठवणी सांगू लागले. मी देखिल खुष होऊन ऎकत होतो.
काका: आता आठवडा झाला इथं येउन. मी आणी हि दोघंच असतो घरी. चिंटु नसला कि वेळ जात नाहि. ....

मधेच भानावर येत काकांनी विचारलं, "बाकि तुझं कसं चाललंय सगळं? नोकरी वगैरे ठिक ना?"

मी: हो, सगळं आहे ठिक सुरु.
(खरं तर ऑफ़िसातल्या कामाच्या वेळा पाळता पाळता नाकि नऊ आले होते, पण सांगतो कुणाला.)
मी: काका चलतो मी आता, पुन्हा भेटु.
काका: अरे थांब, गडबड आहे का?
मी: नाहि गडबड नाहि, असंच जरा..
काका: नाहि ना मग बस इथं...
त्यानंतर मग काकांनी मी मुळचा कुठला, आई वडिल कुठं असतात, काय करतात इत्यादि बरीच चौकशी केली. मधुनच ते स्वत:ची एखादि आठवण, एखादि ओळख सांगत होते. राजेश आणी सुनबाइंना किती कष्ट करावे लागतात हे सांगत होते. चिंटुबद्दल बोलत होते.
साहजीकच काकांना त्यांच्या मुलाची, नातवाची खुप आठवण येत होती. मुलाला परदेशी रहावं लागतं याची खंत जाणवत होती. अजुनहि त्यांचा नातु त्यांना डोळ्यापुढे दिसत असणार, त्याला धावत जाऊन उचलुन घेण्याचा मोह त्यांना नक्किच होत असणार हे मला जाणवलं.
तासभर काकांशी बोलल्यावर मला गहिवरुन आलं. मी तिथुन निघालो. घरी येताच, माझा मुलगा कौस्तुभ मला येउन बिलगला. "माझं शहाणं बाळ ते.." म्हणत मी त्याला उचलुन घेतलं. थोडा वेळ त्याच्याशी खेळल्यावर मी त्याला खाली बसलेल्या जोशी काकांबरोबर खेळायला जायला सांगितलं. तो देखिल आनंदाने तयार झाला.
मी घराच्या गच्चीतुन खाली पाहिलं. जोशी काकांच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडुन वाहत होता. मनाला समाधान वाटलं.
मनात विचार आला, या अशा छोट्या छोट्या गोष्टितुनच खरं समाधान मिळत असतं, परंतु याचि जाणिव होणं गरजेचं आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

<<<छोट्या छोट्या गोष्टितुनच खरं समाधान मिळत असतं, परंतु याचि जाणिव होणं गरजेचं आहे.

अगदी खरं. छोटसंच पण छान लिहिलंय.

>>या अशा छोट्या छोट्या गोष्टितुनच खरं समाधान मिळत असतं, परंतु याचि जाणिव होणं गरजेचं आहे.

बरोबर आहे. जाणीव होऊन ती टिकून रहाणंही महत्त्वाचं आहे. तिथेच नेमके आपण सगळे मार खातो Sad