श्रुती धन्य जाहल्या...

Submitted by ललित२०११ on 10 August, 2011 - 07:42

फेब्रुवारी महिन्यात गणेश कला-क्रीडा मंचावर पार पडलेला 'सहेला रे' हा अविस्मरणीय कार्यक्रम ऐकल्यानंतर मी माझ्या ब्लॉगवर त्याबद्दल लिहीलं होतं. तेव्हा मायबोलीवर account नव्हतं. आज सहज वाटून गेलं की तोच लेख माबोवर शेअर करावा.
तुमच्यासारख्याच एका संगीतभक्तानी केलेलं हे रसग्रहण तुम्हाला आवडेल अशी आशा करतो. चूभूदयाघ्या. Happy

किशोरीताईंचा फोटो आंतरजालावरून.

Kishoritaai.jpg

परवाचा वीकेन्ड संस्मरणीय होता... किशोरी आमोणकरांच्या सहस्त्रचंद्रदर्शनानिमित्त अमोल पालेकर आणि त्यांच्या सौ. (संध्या पालेकर) यांनी आयोजित केलेला 'सहेला रे' हा संगीत महोत्सव ऐकला, अनुभवला....

खरं तर 'ब्लॉग लिहिणे' हे मला प्रचंड अवघड काम वाटते... एक ओळ लिहायला ५ मिनिटं विचार करावा लागतो. पण या संगीत महोत्सवातला एक-एक परफॉरमन्स ऐकतानाच मनाशी ठरवलं होतं - जे जमेल ते आणि जसं जमेल तसं - पण लिहायचं. हा अनुभव शेअर करायचा आणि at the same time, हे क्षण शब्दबद्ध करायचे जेणेकरून स्वतःसाठी सुद्धा ती एक छानशी आठवण असेल.

प्रोग्रामची थीम एका शब्दात सांगायचे झाले तर 'Confluence' अशी होती. वेगवेगळी वाद्यं किंवा वेगवेगळ्या गायनशैली - एकत्रपणे अभिजात संगीताचा आविष्कार किती प्रभावीपणे घडवू शकतात हे आजमावून पाहण्याचा प्रयत्न.

Session wise सांगण्याचा प्रयत्न करतो.

सेशन १ (शनिवार संध्याकाळ) --

१. उस्ताद अमजद अली खान -- झिंझोटी रागाने सुरुवात करून खांसाहिबांनी 'गणेश कला क्रीडा'चा आसमंत सुरांनी भरून टाकला. आणि जणू 'पुढचे २४ तास इथे फक्त आणि फक्त सुरांचं राज्य असणार आहे' अशी ग्वाही दिली. काही विभूतींबद्दल आपण फार बोलू नये, त्यांच्या कलाकृतीचं analysis करू नये - फक्त त्यांचं 'जीनियस' अनुभवावं आणि धन्य व्हावं. अमजद अली खान हे त्यांपैकीच - माझ्या (आणि i am sure अनेकांच्या) मनातल्या 'gallery of the greats' मधले... एका सुरावटीला दाद निघून जाईस्तोवर दुसरी तितकीच सुरेख सुरावट आकार घेत होती...पण खांसाहेब एक 'गिला' देवून गेले...आलापी आणि झाला मस्त रंगवून झाल्यानंतर आता तबल्याबरोबर आणि लयीशी खेळ सुरु होईल असं वाटत असतानाच झिंझोटी थांबवला आणि खमाज वाजवायला सुरुवात केली... Sad पण हरकत नाही! तोही तितकाच गोड राग...आणि सरोद, सतारीवर उत्तम खुलणारा... तबल्यावर योगेश शमसींची 'योगेश शमसी' level ची साथ... मध्य आणि नंतर द्रुत लयीत पुढचा १ तास खमाज खूपच सुंदर खुलला... त्यात शमसींचे २-३ सोलो... क्या केहने!

२. उदय भवाळकर (धृपद गायन) , उस्ताद बहाऊद्दीन डागर (रुद्रवीणा) , नॅन्सी कुलकर्णी (सेल्लो - मोठ्ठ व्हायोलीन) -- तिघांनी मिळून राग 'बिहाग' आळवला. सुरुवातीलाtypical धृपद शैलीत खर्जाची आलापी आणि नंतर एक एक स्वर घेऊन बढत. उदय भवाळकर हे माझे अत्यंत आवडते गायक. तिन्ही सप्तकांत आवाजाची सहज फिरत - आवाजाचं माधुर्य तसूभरही कमी न होऊ देता, रागाचं स्वरूप हळुवारपणे उलगडत नेण्याचं त्यांचं कसब... आलापीच्या पार्ट मध्ये त्या मानाने रुद्रवीणा आणि सेल्लो यातून 'बिहाग' दिसत नव्हता (त्यामुळे मी सारखा 'भवाळकरांचा टर्न कधी येतो' याची वाट पाहत होतो :D) पण द्रुत बंदिशीत मात्र खूप मजा आली. तालाबरोबर छान अदाकारी करत तिघांनी बिहाग सुरेख रंगवला.

३. विदुषी किशोरी आमोणकर -- किशोरी ताईचं गाणं लाईव्ह पहिल्यांदाच ऐकायला मिळणार होतं. त्यांच्या कितीतरी audio रेकॉर्ड्स ऐकल्या होत्या, ऐकत राहीन... पण प्रत्यक्ष ऐकण्याची मजा वेगळीच... सेट वर मोहक calligraphy मध्ये लिहीलेलं 'सहेला रे' , किशोरी ताईंचे २ मोठ्ठे आणि अत्यंत सुंदर portraits आणि stage वर त्या स्वतः ... क्या बात है! अमोल पालेकरांनी आधीच announce केलं होतं - रात्री १२ पर्यंतची permission मिळालीये... 'पुढचा दीड तास किशोरी आमोणकरांचं गाणं ऐकायला मिळणार' ही कल्पना खूपच
सुखावणारी होती. And How! राग 'सावनी नट' नी सुरुवात करून १०-१५ मिनिटांत बाईंनी मैफिल capture केली (हा राग नेमका कोणता आहे हे शेवटपर्यंत ओळखता आलं नाही कारण त्यात अनेक रागांच्या छटा दिसत होत्या. शेवटी परवा रघुनंदन पणशीकरांकडे शिकणाऱ्या एका मैत्रिणीला विचारलं. 'सावनी नट' हा जयपूर घराण्याचा ठेवणीतला राग आहे असं कळलं). तीनतालाच्या छान संथ लयीत एक एक स्वराचा आनंद घेत, स्वतःच्या खास शैलीत तो राग खुलवत त्यांनी वातावरण प्रसन्न करून टाकलं. सगळे स्वर शुद्ध - त्यामुळे त्यात कारुण्य, शृंगार, mysticism अश्या blue इमोशन्स नव्हत्या. आणि तरीही शुद्ध स्वरांच्या प्रसन्नतेला, उभारीला एका हळव्या - सुंदर इमोशन ची जोड होती. थोडं थोडकं नव्हे तर तब्बल सव्वा तास बाईंनी हा राग आळवला. सुरुवातीला जम बसेपर्यंत त्रास देणाऱ्या आवाजाची नंतर तार सप्तकातल्या पंचमापर्यंत भरारी गेली. आलापीमध्ये इतकी creativity आणि रंजकता होती की ती ऐकताना एक अख्खं आवर्तन गावून त्यांनी सम कधी, किती सहजपणे गाठली हे कळतच नव्हतं. Stuff of pure genius! महान लोकांच्या बाबतीत सगळं positive अर्थानी उलटं घडतं बहुदा - ते एकीकडे वयानी मोठे होतात आणि दुसरीकडे त्यांच्या performance मध्ये लहान मुलातल्या
शोधक वृत्तीची झाक अधिकाधिक दिसायला लागते. हा शोध त्यांना खूप काही मिळवून देतो आणि आपल्या सारख्यांना सुद्धा, क्षणभर का होईना, पण त्या holy pursuit चा पार्ट बनवून टाकतो. 'किशोरीताई तुम्ही गात रहा, गात रहा' असं म्हणावसं वाटत होतं. सावनी नट नंतर 'सुहा कानडा'तली मध्य/सेमी द्रुत लयीतली बंदिश गायल्या. अप्रतीमच! त्यांचा खूप भारी मूड लागलाय हे लक्षात येत होतं तेवढ्यात संयोजकांच्या सांगण्यावरून '१२ वाजून गेले' असं एका शिष्येनी खुणावलं. मग अंतरा आणि थोड्या ताना गाउन त्यांनी तिहा घेतला. किशोरी ताईचं गाणं प्रत्यक्ष ऐकणे हा केवळ amazing अनुभव होता. श्रुती धन्य जाहल्या ...

सेशन २ (रविवार सकाळ) --

पोहचायला जsssरा उशीर झाला आणि I paid the price... कौशिकी चक्रवर्तींचं गाणं already तानकारी फेज मध्ये पोहोचलं होतं... या सेशन मध्ये आधी नंदिनी बेडेकर (किशोरी आमोणकरांच्या शिष्या, जयपूर अत्रौली घराणे), कलापिनी कोमकली (कुमार गंधर्वांच्या कन्या आणि शिष्या, ग्वाल्हेर घराणे + कुमारजींचा स्वतःचा वेगळा रंग) आणि कौशिकी चक्रवर्ती (अजय चक्रवर्तींच्या कन्या आणि शिष्या, पटीयाला घराणे +अजय चक्रवर्तींचा स्वतःचा वेगळा रंग) या तिघींनी - प्रोग्रामच्या थीम प्रमाणे - आपापल्या घराण्याच्या ढंगाने राग 'तोडी' सादर केला...
'कौशिकी चक्रवतीं' हे पुण्यातल्या श्रोतृवर्गाचं फेव्हरेट नाव आहे. नितळ आवाज, घराणेदार गायकीची कमालीची तयारी, आवाजाची तिन्ही सप्तकांत लीलया फिरत, निरनिराळ्या सूर-सुरावटी आणि त्यांचे unimaginable permutations-combinations, स्टेज वरचा त्यांचा presence , साथीदारांना सोबत घेऊन गाणं पुढे नेण्याचं skill... अशा अनेक गुणांमुळे कौशिकींचं गाणं लगेच भावतं. गाण्याच्या तालमीसोबतच विनम्र स्वभाव ही त्यांना वडिलांकडून मिळालेली मोठी देणगी आहे. कदाचित त्यामुळेच त्या गाण्यात कुठेच क्लिष्टता जाणवत नाही आणि ते खूप भावपूर्ण वाटतं. रागातला आर्त भाव हरवू न देता तार षड्ज लावून तोच मीन्डेनी अतितार षड्जापर्यंत नेवून आणणे, अतिदृत लयीत सुरांची gimmickry करणे हे सगळं अत्यंत जिकिरीचं काम आहे पण त्यांना ते सही जमतं . पं. अजय चक्रवर्तींप्रमाणेच कौशिकी देखील गायनातील 'खतरों के खिलाडी' पैकी आहेत आणि त्यांनी तसंच राहावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. (माझ्या इच्छेवर काय आहे म्हणा, पण तरीही...! :))
दुर्दैवाने नंदिनी बेडेकरांचा आवाज त्या दिवशी पूर्णपणे बसला होता. पण तरीही, आपल्या गुरूंच्या गौरवसोहळ्यात गायलं पाहिजे या भावनेनी त्या गायल्या... तोडीतल्या तीव्र मध्यमापर्यन्तची त्यांची आलापी खूप सुरेख होती, तेवढ्या कमी sample space मध्ये सुद्धा जयपूर घराण्याची स्वच्छ आकाराची गायकी उलगडून दाखवणारी होती. पण कोमल धैवतापासून पुढे गाताना त्रास होत असल्याचे पाहून त्यांची मध्यलयीतली बंदिश कौशिकी आणि कलापिनींनी गायली. त्यानंतर कलापिनी कोमकलींनी कुमारजींनी स्वतः रचलेली एक मध्यलयीतली बंदिश सादर केली. बंदिशीचे शब्द नीटसे आठवत नाहीत पण सेलिब्रेशनच्या प्रसंगावर केलेलं composition होतं. सुरावटही तशीच vibrant. त्यामुळे एरव्ही अतीव करुण रसाने भरलेला 'तोडी', ती बंदिश ऐकताना अत्यंत वेगळा, आनंददायी वाटत होता. सुरेख!

त्यानंतर पं. सतीश व्यास (संतूर), विदुषी मंजू मेहता (सतार) आणि राकेश चौरासिया (बासरी) यांनी एकत्र येऊन आपण राग 'शुद्ध सारंग' वाजवणार असल्याचं announce केलं आणि I was overjoyed. एकतर वसंतातला मध्यान्ह प्रहर आणि त्यात 'शुद्ध सारंग' सारखा गोड राग... Happy Instrumental असो की vocal - शुद्ध सारंगाचं रॉयल आणि तितकंच लोभस रूप तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार!
तिघांनी सुरुवातीला संथ आलापीतून राग establish केला. आणि त्यानंतर मध्यलयीत शुद्ध सारंगातली पारंपारिक बंदिश 'अब मोरी बात मान ले पिहरवा'... मंजू मेहता या पं. रविशंकर आणि विदुषी अन्नपूर्णा देवी यांच्या शिष्या. विश्वविख्यात मोहनवीणा वादक पं. विश्वमोहन भट यांच्या ताई. अत्यंत शांत composure, राग ज्ञान आणि जम बसलेला हात या तिन्ही गोष्टींमुळे त्यांची सतार ऐकत रहावसं वाटत होतं. सतीश व्यास हे पं. सी. आर. व्यास यांचे सुपुत्र. त्यांचं संतूर सुद्धा ऐकायला छान वाटत होतं पण with due respect to all the santoor players, मला ते वाद्य फारसं मनापासून आवडत नाही. Art exhibition पाहत आहोत किंवा एखादा प्रोग्राम सुरु व्हायच्या आधी filler म्हणून काहीतरी लावलय असं वाटतं. हे माझं वैयक्तिक मत. असो, पण तीन वाद्यातून एकत्रितपणे शुद्ध सारंग खूप सुंदर रंगला. तिघांची द्रुत लयीतली तानकारी म्हणजे crescendo चं perfection होतं. तिहा झाल्यानंतर कितीतरी वेळ उत्स्फूर्त टाळ्या थांबत नव्हत्या. पण सगळ्यात जास्त लक्षात राहील राकेश चौरासियांची बासरी...भक्कम तयारी, आत्मविश्वास आणि 'बासरी-शुद्ध सारंग' या combination मधून जास्तीत जास्त सुंदर सुरावट निर्माण करण्याची त्यांची धडपड दिसून येत होती.प्रचंड दमसास हे आणखी एक वैशिष्ट्य. तार 'सां' पहिल्यांदा लावला तेव्हा जवळजवळ २० सेकंद लावून धरला!! दोन मध्यमांचा खेळ बासरीवर खूपच मोहक वाटत होता. He was the best among all.
'तोडी' आणि नंतर 'शुद्ध सारंग' हे combination मैफिलीच्या दृष्टीने खूपच perfect आहे. त्यात भर पडली कौशिकी, कलापिनी आणि राकेश यांच्या graceful गायन/वादनाची. त्यामुळे सकाळचं सत्र ऐकल्यानंतर अगदी तृप्त झाल्यासारखं वाटत होतं...

सेशन ३ (रविवार संध्याकाळ)

संध्याकाळच्या सत्राची सुरुवात प्रसाद खापर्डे (उस्ताद रशीद खानचे शिष्य, रामपूर सहस्वान घराणे), पं. रघुनंदन पणशीकर (किशोरी आमोणकरांचे शिष्य) आणि जयतीर्थ मेवुंडी (श्रीपती पडीगारांचे शिष्य, किराणा घराणे) यांच्या 'यमन' ने होणार होती. पोहचायला पुन्हा एकदा उशीर झाला पण did not have to pay the price this time. कारण मी पोचलो तेव्हा प्रसाद खापर्डेंचं गायन सुरु होतं. का कुणास ठाऊक, मला ते फार hammering type चं गाणं वाटलं. बंदिशीच्या शब्दांवर, यमनच्या स्वरांवर आजिबातच प्रेम न करता सरगम मधल्या आणि आकारी तानांचा भडीमार केला जातोय असं वाटत होतं. असो. जयतीर्थ मेवून्डींनी तीव्र माध्यमावर सम असलेली 'पत तोरे कारन' ही अत्यंत सुंदर विलंबित बंदिश गायली. त्यांचा यमन छान रंगला होता पण माहित नाही का, फार वेळ गायलेच नाहीत. जेमतेम १५-२० मिनिटं. जयतीर्थ हे किराणा घराण्याच्या तरुण गायकांपैकी सगळ्यात सिनियर...त्यांचं गाणं अत्यंत श्रवणीय आणि graceful आहे. आजच्या घडीला पं. भीमसेन जोशींसारख्या अतिदृत ताना घेऊ शकणारे माझ्या मते तरी ते एकमेव. प्रत्येक तानेला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळत होती. यमन मधलं अजून खूप काही ऐकवावं असं वाटत असताना त्यांनी डाव घोषित केल्यामुळे जरा नाराजी झाली. पण त्यानंतर रघुनंदन पणशीकरांनी सगळी उणीव भरून काढली. विलंबित एकतालातल्या बंदिशीनी सुरुवात करून त्यांनी एक सुखद धक्का दिला. जयपूर घराण्याचे एक गायक विलंबित एकतालात गात होते हा तो धक्का element. कारण जयपूरची जीवलग दोस्ती विलंबित तीनतालाशी! Happy असो, पण पणशीकरांनी पहिल्या काही मिनिटातच आपल्या सुरेल, आकारयुक्त गायकीने वातावरण प्रसन्न, 'यमन'मय करून टाकलं... २ तपांहून अधिक काळ किशोरी ताईचं गाणं ऐकून, शिकून सुद्धा त्यांच्या गाण्याची copy न करता पणशीकरांनी, जयपूर गायकीची सगळी वैशिष्ट्ये जपून, स्वतःची स्वतंत्र शैली तयार केली आहे. स्वरांची अचूकता, स्पष्ट आकार, स्पष्ट शब्दोच्चार, गायनातील सहजता आणि तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा गोड आवाज अशा अनेक गुणांनी पणशीकरांचं गाणं सुसमृद्ध आहे.

महोत्सवाची सांगता ताल-क्षेत्रातल्या मातब्बर मंडळींनी येऊन सादर केलेल्या 'तालकचेरी' (हे नाव कॉमेडी वाटलं मला! :)) ने झाली. उस्ताद झाकीर हुसेन, पं. भवानीशंकर (पखवाज), विकू विनायकराम (घटम - Instrumental 'जन गण मन' लागतं tv वर अधून मधून, त्यात आहेत ते), सेल्वा गणेश (खंजिरी) यांसारख्या दिग्गज कलाकारांनी श्रोत्यांना तालाच्या सौंदर्याचं समूर्त दर्शन घडवलं. त्यांना साथ होती महेश विनायक (दक्षिणात्य गायन) आणि साबीर खान (सारंगी - सुलतान खाँ साहेबांचे चिरंजीव आणि शिष्य) यांची. कलाकारांमधलं Gelling कशाला म्हणतात याचं समर्पक उदाहरण 'तालकचेरी'त पाहायला, ऐकायला मिळालं. सुरुवातीला विकू विनायकरामांनी घटम वर सोलो घेतला. वयाच्या सत्तराव्या वर्षातदेखील घटम वर चालणारा तो हात ऐकला की थक्क व्हायला होतं. केवळ एखादं वाद्य वाजत नाहीये तर त्यातून त्यांची वर्षानुवर्षांची मेहनत बोलतेय याचा प्रत्यय येतो. शेवटी दक्षिणात्य तालाचा चेहरा असलेले 'तझ्झुम...तक झुम' हे बोल सुरु झाले आणि दोन हजारांच्या श्रोतृवर्गानी टाळ्यांचा ठेका धरला. मग घटम आणि या टाळ्यांचा सवाल-जवाब! आणि तिहा झाल्यानंतर टाळ्यांचा न थांबणारा कडकडाट आणि शिट्ट्या (yes!) ... त्यानंतर सेल्वा गणेश आणि त्यांचे सहवादक ( नाव आठवत नाहीये Sad ) यांनी खंजिरी वर जुगलबंदी सादर केली. सळसळतं 'यंग ब्लड' आणि वाद्यावर जम बसलेला हात या दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर जे काही घडतं ते अनुभवायला मिळालं. दोघांनी खंजिरीवर तालाचे अशक्य प्रयोग करून दाखवले. विकू विनायक रामांप्रमाणेच सेल्वा गणेश यांच्या performance ला सुद्धा प्रचंड दाद मिळाली.
टाळ्यांचा हा गजर fade out झाल्यानंतर त्या शांततेत साबीर खाननी 'मधुकंस' चे स्वर छेडायला सुरुवात केली आणि पहिल्या 'ग नी सा sss'लाच सगळ्यांची 'वाह' मिळाली. झाकीर हुसेनच्या सोलो ला मधुकंस चा लेहरा असणार होता. साबीर खान यांनी फक्त १० मिनिटांच्या त्यांच्या performance मध्ये वातावरण बदलून टाकलं. काहीतरी साहित्यिक style चं लिहायचं म्हणून नाही, पण खरंच तो १० मिनिटांचा मधुकंस शब्दांत नाही सांगता येणार. मुळातच सारंगीचे स्वर काळजाला भिडणारे, त्यात कोमल 'ग' - तीव्र 'म' - कोमल 'नी' चा राग म्हणजे अजूनच दर्द (!). तार साप्तकापर्यंत विस्तार करून झाल्यानंतर मग लेहरा सुरु झाला आणि झाकीर भाईंनी एक अत्यंत किचकट पण तितकाच intriguing पेशकारा घेऊन सम गाठली आणि 'देअर ही इज!' असं झालं! पुढची २०-२५ मिनिटं झाकीरभाई वाजवत होते आणि श्रोते त्यांना ऐकत होते, पाहत होते. तबल्यावरचे सुस्पष्ट बोल, एकाग्रता, आत्मविश्वास आणि त्यांचा gracefulness हे सगळंच वन ऑफ इट्स काईंड!

रात्रीचे साडे अकरा वाजले होते; पुढे 'सोमवार' दिसायला लागला होता...त्यामुळे भवानीशंकरांचा पखवाज आणि नंतर सगळ्यांनी मिळून सादर केलेलं jamming ऐकायला थांबता आलं नाही. या दीड दिवसांत मिळालेली स्वर-तालाची पुंजी मनात आणि कानांत साठवून आम्ही बाहेर पडलो. एक अविस्मरणीय सोहळा अनुभवल्याचा आनंद होताच, पण त्याहीपेक्षा मोठं होतं ते एक सुख - उस्ताद अमजद अली खान, किशोरीताई, झाकीरहुसेन , विकू विनायकराम, कौशिकी चक्रवर्ती, रघुनंदन पणशीकर यांसारख्या गंधर्वांचं 'गंधर्वपण' अनुभवल्याचं... Happy

गुलमोहर: 

आ हा हा .......
वाचूनच धन्य धन्य वाटायला लागतंय, तुम्ही तर प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि ते लेखणीतूनही अप्रतिम उतरलंय...
संगीतानुभव लेखणीतून वाचकापर्यंत पोहचवायचा....किती अवघड काम...तुम्ही लीलया पेललंत हे "शिवधनुष्य",
त्यामुळे या लेखाला देखील....जियो, जियो...

जियो... जियो, ललित... केवळ अप्रतिम वर्णन लिहिलयत. (तुमचा विलक्षण हेवा वाटतोय.. हे इतकं सगळं एकगठ्ठा ऐकायला मिळालं).
खूप आभारही... एका नादमधुर अनुभवाचं शब्दांकन... सोप्पं नाहीये. छान जमलय.

दाद, अरुंधती, मुक्ता, मानुषी -- खूप आभार! Happy

दाद - हो, ही concert ऐकल्यानंतर पुढचे काही दिवस एका वेगळ्याच trance मध्ये होतो मी Happy