सांगलीकर, सातारकर आणि कोल्हापुरकर...

Submitted by जयंत निखारे on 9 August, 2011 - 05:28

हा लेख माझा मित्र अमित पवार ने लिहिला आहे.
त्याच्या 'असाच काहीतरी...' ह्या ब्लोग वरून हा लेख पोस्त केला आहे.
अमित पवार च्या ब्लोग ची लिंक - http://amitpawar21.blogspot.com/

सांगलीकर, सातारकर आणि कोल्हापुरकर...

परवा पुलंच मी मुंबईकर, पुणेकर आणि नागपुरकर ऐकत होतो.. राहुन राहुन मला माझ्या कॉलेजची आठवण झाली.. सांगलीच्या आमच्या वालचंद कॉलेजमध्ये असेच ढोबळमानाने वेगळे काढता येण्यासारखे तीन ग्रुप होते..
सांगलीकर, सातारकर आणि कोल्हापुरकर...
तुम्हाला सांगलीकर ग्रुप मध्ये जायचं आहे का? तर मनाची फ़ार तयारी करुन जा.. पदोपदी अपमान आणि चेष्टा सहन करण्याची ताकद जमवुन घ्या आणि जरुर हा ग्रुप जॉईन करा. कॉलेजमधली आठपासुनची सगळी लेक्चर्स ओळीने करण्याचा संयम बाळगुन रहा. कॉलेजला येवुन लेक्चर चुकवणं म्हणजे संकष्टीला गणपती मंदिरासमोर जावुन वडापाव खावुन उपवास मोडण्याइतकं पाप वाटतं या लोकांना.. आठच्या लेक्चरला जाउन मागे झोपा काढतील.. सरांच्या चुका काढतील.. तोंडावरची माशी कंटाळून उडुन जाईल असल्या पोरि बघत बसतील.. पण लेक्चर चुकवणं .. अंहं..
या ग्रुपमध्ये जायचं तर तुमचा स्वाभिमान प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळुन सॅकमध्ये ठेवुन टाका.. आणि मग चला.. कारण हे लोक एकमेकांना कशावरुन चिडवतील हे सांगता येत नाही.. रंग, रूप, जात, पात, धर्म, वर्ण, बुद्धी या कशाचीही तमा यांच्या ठायी नाही.. खरं तर असली तारतम्यरुपी बंधनं पाळणं हे यांच्या स्थायीभावातच नाही. म्हणजे यांच्या ग्रुप मध्ये खऱ्या नावाने कोणीही कोणाला बोलवत नाही.. इतर ठिकाणी फ़ार फ़ार तर नावाचा अपभ्रंश होतो मात्र इथं एकंदरीत व्यक्तीमत्वाचा अपभ्रंश करुन नावं ठेवतात.. ठेवतात म्हणजे काय अशी ठेवतात की लोकं नावं ठेवायलाही असली नावं वापरणार नाहीत.. या बाबतीत सांगली-मिरजकरांची प्रतिभा वाखानण्यासारखी आहे.. खरी नावं रगिस्टरमध्ये अडगळीत धुळ खात पडुन रहातात.. ती इतकी विस्मृतीत जातात की कुठंतरी proxy मारताना आपल्या झिंग्याचं खरं नाव काय रे? असा संभ्रम होतो कधी कधी.. आता हा झिंग्या म्हणजे कुठंतरी आपल्याच तंदरीत रमणारा एकटा एकटा राहणारा मुलगा आहे हे समजुन घ्यायचं.. दात पुढे असणाऱ्याला ’तारे जमिन पर’ म्हणतील. उंची कमी असणारा छोटा छ्त्री असतो.’धुमकेतु’ हे नाव तुमच्या मते एखाद्याला का पडलं असावं, तो कॉलेजमध्ये कधीतरी दिसतो म्हणुन.. हा ग्रुप लेक्चरर्सना देखिल यातुन मुक्ती देत नाही.. एखाद्या फ़ारच पुरुषी आवाज असणाऱ्या मॅडमना ’बजाज पल्सर’(definitely male), किंवा मुळातच हसरा चेहरा असणाऱ्या सरांना विक्टर (more smiles per hour) म्हणतील. अतिशय जाड असणाऱ्या मेकॅनिकल च्या सरांना बॉयलर म्हणत..
बॅटरी, चपण्या, ढापण्या, नकट्या ही असली मुळमुळीत नावे श्रीयुत किंवा माननीय अशी आदरार्थी धरावीत इथं.. हे लोक चिडवण्यात जंगिझ खान इतके निर्दयी आहेत. म्हणजे एखाद्या डावखुऱ्याला तू नेमकं कोणत्या हाताचा वापर कशासाठी करतोस इतकं विचारायलाही कमी करत नाहीत. एखाद्या रंगात मार खाणाऱ्या मुलाला तोंडावर काळ्या म्हणण्याचं आणि ते पचवण्याचं धैर्य इथंच पहायला मिळतं. पंढरीच्या विठ्ठलाला काळा म्हणावं इतकं सहजासहजी हे लोक त्याला काळ्या देसाई म्हणुन हाका मारतात.. आणि याचं त्यालाही काही वाटत नाही. पण हे त्याच्या रुखुमाई समोर झालं तर मात्र त्याचा चेहरा बघण्यासारखा होतो.. तुम्हीच कधीतरी दयेने उगीच तोंडावर नैतिकता आणुन “इतकाही सावळा नाहिस तु..” असं काहीतरी म्हणायला जाल आणि त्याच्या काळ्या कपाळावरच्या आठ्याही स्पष्ट पहाल..
सांगली-मिरजकर कॉलेजला मस्त दोन कप्पी डबा आणतात घरातुन.. झाडाखाली किंवा कॅंटीनमध्ये तो पुर्ण संपवतात आणि हॉस्टेलवर तुमच्या रुममध्ये येवुन विचारतात "या आठवड्यात घरी जाउन आलास ना.. घरुन काही खायला आणण्याची पद्धत?"
कॅंटीनमध्ये तुमच्या पैशाचा चहा ढोसतील आणि "छ्या.. कसला चहा पाजलास लेका.. तु मिरजेला ये एकदा चहा प्यायला.. असा चहा पाजतो, असा चहा पाजतो.. रोज येशील मिरजेला.." बोलवुन बोलवुन चहाला बोलवतात..दोन रुपयांचा चहा प्यायला आठ रुपयांच तिकीट काढुन कोणीही मिरजेला येण्याची यत्किंचितही शक्यता नाही हे आधीच माहीत असतं..
भाषावैशिष्ट्यांमध्ये सांगायचं तर सांगली मिरजेने मराठीला दिलेली एक बहुपयोगी देणगी म्हणजे मारणे.. मारणे हे हिंसावादी क्रियापद इथं कशाही बरोबर कशाही अर्थी वापरतात.. म्हणजे इथं मुलींना प्रपोज मारतात.. मारतात म्हणजे शब्दशः लागेल असा मारतात हो.. फ़ार serious नसेल तर कधी सहज ट्राय मारतात..लेक्चर बंक मारतात. एकमेकांवर जोक मारतात. इतरत्र संधी साधतात पण इथं chance मारतात. येवढचं नाही तर टपरीवर कटिंग मारतात. दिवसभर एवढी मारामारी केल्यावर मग कंटाळुन संध्याकाळी सायकल नाहीतर गाडी मारत घरी जातात..
तुम्हाला जोक सांगायला, ऐकायला आवडतात का? तर मग कोल्हापुरकर ग्रुप तुमच्यासाठी योग्य प्लॅटफ़ॉर्म आहे. इथं कोणताही PJ चालतो.. कितीही जुना, पांचट, अर्थहीन.. द्वापारयुगात सांदिपनी रुषींनी आश्रमात कधीतरी पोरांना सांगितलेला आणि त्यानंतर वर्षानुवर्षे मुखोद्गत होऊन चालत आलेला Antic PJ ऐकवुन तुम्ही गडागडा लोळेपर्यंत लोकांचा हशा घेवु शकता. ‘हसा आणि हसु द्या’ या तत्वानं जगणारी सात्विक लोकं आहेत ही. इथं शाहु महाराजांचा उल्लेख तुम्ही गल्लीत रहाणाऱ्या मित्राला बोलावता तसं एकेरी करु शकता. कारण इथं सगळेजणच स्वतःला शाहु महाराज समजत असतात.
कोल्हापुरकर जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी स्वतःची भाषा, बोलण्याची लकब, आवाजाचा चढऊतार (अम्म तसा चढच फ़क्त..) सोडत नाहीत.. पंचगंगेच्या पाण्यातच याचं गमक सापडेल बहुतेक.. अगदी अंटार्टिकाच्या बर्फ़ात नाहीतर अमेझॉनच्या खोऱ्यात सदाहरित जंगलात कुठेही तुम्हाला भावा sss SSS अशी आरोळी ऐकायला आली तर आपलाच कोणीतरी कोल्हापुरचा स्नेहबंधु जवळपास आहे हे ओळखावे. इतका बंधुभाव जपणारी माणसं जगात इतर कुठं सापडतील असं मला तरी वाटत नाही. ज्युनिअर पासुन सिनीयरपर्यंत, कंड्क्टरपासुन शिपायापर्यंत कुणालाही हे लोक भाऊ करुन टाकतात. उद्यापरवा कोल्हापुरच्या एखाद्या मुलीनेही तुम्हाला भावा म्हणुन हाक मारली तर फ़ार मनाला वैगेरे लागुन घेवु नका. भावा हे मित्रा सारखं ग्रुहीत धरुन चला.
काही मोजके अपवाद वगळता राग म्हणून काय असतं ते कोल्हापुरकरांच्या जवळपासही फ़िरकत नाही. मी तर म्हणेन राग यांना यायच्याआधी दहा अंक मनात मोजत असेल.. आणि स्वतःच शांत होऊन निघुन जात असेल. म्हणजे कोणी यांना शिवी जरी दिली तर "कसलं यमक जुळवलंय भावा.. जिकलस की" म्हणुन पाठीवर थाप देतील.
मला वाटतं..कोल्हापुर म्हणजे महाराष्ट्राचं पंजाब आहे. दिलखुलासपणा हा यांच्या अंगात भिनला आहे. विचार करुन बोलनं वैगेरे यांना जमतच नाही. तसलं ते पुणेरी वारं कोल्हापुरात येता येता वाटेतच कोरडं झालं.. कोल्हापुर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आल्याने इथं या बाबतीत दुष्काळच आहे. मनात येईल ते हे लोक तोंडावर बोलुन जातात. म्हणजे एखादा राजकारणी विरोधी पार्टी च्या सभेत "तुमचा पुढच्या निवडणुकीत असा काटा काढणार आहे" असं म्हणुन ठरलेले internal party मनसुबे रागारागाने सांगुन गेला तरी फ़ारसं नवल नसावं..
कोल्हापुरकरांची काही स्फ़ुर्तिस्थाने आहेत. यांचा कायम उल्लेख तुम्हाला बोलण्यात कायम आढळेल. रंकाळा, शिवाजी पेठ, राजाभाऊ भेळ, फ़डतरे मिसळ, पाटाकडची तालिम.. आणि बरंच काही.. या कोणत्याही विषयावर हे लोक तासनतास बोलु शकतात.
पण यातही एक अस्सल टिपिकल कोल्हापुरी जागा आहे. शिवाजी पेठ. इथले लोक खरे native कोल्हापुरी आहेत. तुमच्या ग्रुप मध्ये या किंवा जवळपासच्या परिसरातले कोणी असतील तर तुम्हाला खरा कोल्हापुरी ठसका कळेल. इथला प्रत्येकजण कुठल्याना कुठल्यातरी मंडळात असतो.. मंडळाच नाव पण काय तर.. मैं हु ना ग्रुप.. नाद करायचा नाय गणेश मंडळ.. पाटाकडची तालीम मंडळ.. यांची ब्रिदवाक्यं पण तशीच अर्थपुर्ण.. "खटक्यावर बोट जाग्यावर पलटी" "आमच्याशिवाय हायेच कोण?" "घास आहे का कुणाचा?".. प्रत्येकजण आपल्या मंडळाचा committed उत्साही fulltime कार्यकर्ता असतो.. आणि या हातावर मोजता येण्याएवढी सदस्यसंख्या असणाऱ्या मंडळाची किर्ती तो मनमुराद पसरवत असतो..
प्रत्येक मंडळ एखाद्या तालिमीशी संलग्न असतं.. कोल्हापुरी लोक या मंडळांच्या कथा वर्षानुवर्षे सांगत असतात. कारण त्या प्रत्येक तालिमीमागे तसाच मोठ्ठा पिढ्यानपिढ्यांचा इतिहास असतो. या तालिमीही अशा की इथं दंड, बैठका, कुस्त्ती याबरोबरच कॅरम, पत्ते असल्या खेळांचही प्रशिक्षण दिलं जातं. हे सगळं सांगणाऱ्या मित्राची तब्येत बघुन कधीही विश्वास बसणार नाही की हा कधी तालिमीत सोडा.. तालिमीसमोरुनही गेला असेल..
मागच्या गणपतीच्या वेळी झालेल्या भांडणात आमच्या ग्रुप चे ५ लोक पोलिसांनी कसे पकडुन नेले. आणि नको तिथं चार काठ्या मारुन पुन्हा सोडुन कसे दिले. ही गोष्ट अगदी अभिमानाने छाती फ़ुगवुन सांगतात. अशा अनेक भांड्ण आणि मारामाऱ्या यांच्या कथा तुम्हाला चविने आणि दर वेळी दाद देवुन ऐकायला लागतील. या मंडळांच्या विसर्जणाच्या मिरवणुकाही तशाच.. डॉल्बींच्या भिंती काय.. लायटींग काय.. बेभान नाचनारी पोरं काय... मला तर कधीकधी वाटतं असल्या वातावरणात ट्रॅक्टरमध्ये अवघडुन बसलेला गणपतीच कधी तरी सगळं झुगारुन "काला कौआ काट खायेगा" च्या तालावर नाचायला लागतो कि काय…
हे लोक आपल्या घरी किती जुनी तलवार आहे असल्या गोष्टी ऐकवतात. मला आजपर्यंत कळलेलं नाही असल्या बिनकामी गोष्टी घरात धुळ खात ठेवुन हे लोक करतात काय? आहेतच तर त्याचा काहीतरी वापर तरी करावा. लोणच्यासाठी कैऱ्या कापायला जरी त्याचा उपयोग होत असला तरी माझी हरकत नाही.. असो..
का तुम्हाला सातारकर ग्रुप मध्ये जायचं आहे? तर मग तुम्हाला ज्या विषयावर बोलायचं आहे त्याचा पुरता अभ्यास करुन जावं लागेल. कारण उत्तरेहुन पुण्याकडून येणारे उष्ण सांस्क्रुतिक ’शिष्टा’चाराचा प्रवाह आणि दक्षिणेतुन कोल्हापुरकडुन येणारा थंड रांगडा प्रवाह एकत्र येऊन काहीतरी मस्त उबदार तात्विक वातावरण इथं तयार झालं आहे असं माझं एक भौगोलिक cum सामाजिक निरिक्षण आहे. याच हवामानाच्या परिणामांमुळे लोक इथं रात्ररात्रं सभा टाकू शकतात. न थकता.. न कंटाळता.. सभांचे विषयदेखील गांगुलीला ओपनिंग द्यावी का नको इतकया हलक्याफ़ुलक्यापासुन अंधश्रद्धा विरुद्ध science इतके जड असु शकतात. प्रेम, धर्म, वास्तववाद, कला असल्या अगम्य विषयांवर तर यांचं प्रभुत्व आहे. इथं प्रत्येकजण स्वतःचा मुद्दा सांगायला आणि पटवायला टपलेला असतो. सगळ्यांचा हाच stance असल्याकारणाने कधी कधी नकळत वादविवादाचे कलहात रुपांतर होते.
सातारकरांचे साताऱ्यावर विलक्षण प्रेम आणि अभिमान आहे हे अधीच जाणुन घ्या. तसंच ते कोल्हापुरकरांनांही आहे. पण या दोन्हींत जमीन अस्मानाचा फ़रक आहे. तुम्ही कोल्हापुरकरांवर शाहु महाराज ते फ़डतरे मिसळ कशावरुनही जोक मारुन फ़ार फ़ार तर एका शिवीवर सुटू शकता.
किंवा कावलायस काय? डोक्यावर पडलयस काय? असलं काहीतरी म्हणतील. कारण त्रागा व्यक्त करण्याची त्यांची ती पद्धतच आहे. पण सातारकरांच तसं नाही. तुम्ही कर्मवीर भाऊराव पाटलांचा उल्लेख "ते रयतवाले कोण रे पाटील कोणीतरी" असा ‘कर्मवीर’शिवाय एकेरी केला म्हणून तुमच्या चांगल्या मैत्रीला तडे जाण्याइतपत मतभेद करुन घ्याल.
सातारकरांच मत सह्याद्रिचं सौंदर्य साताऱ्यात सुरु होऊन तिथंच कुठेतरी संपतं असं आहे. महाबळेश्वर, सज्जनगड, चाळकेवाडी.. शेकडो गोष्टींवर हे लोक गप्पा मारतील. ठोसेघरच्या धबधब्याची वर्णनं ऐकवुन तर भर उन्हाळ्यात तुमच्या अंगावर शहारे आणतील.
तुम्हाला एखादी आधी यमक, मग शब्द आणि मग कुठेतरी शेवटी आशय अशा आडमार्गाने सुचलेली मोडकीतोडकी कविता ऐकवायची असेल. किंवा एखादी ड्रॉईंग शीट सरांनी rework शेरा मारुन परत दिली म्हणुन त्याच शीटच्या मागे त्याच सरांचं काढलेलं कार्टून दाखवायचं असेल. सांगलीकरांकडे जाण्याची चूक करु नका. कारण हे लोक जन्माने समीक्षक आहेत. याच critic gene च्या प्रभावामुळे हे लोक तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल असल्या सुधारणा आणि टीका ऐकवतील. कोल्हापुरकरांकडे गेलात तर कौतुक करुन क्षणभर तुम्हाला शेक्स्पीयर, लिओनार्दो दा व्हिंची, मायकल ऐंजेलो पासुन ते कुसुमाग्रज, पाडगावकर अशा प्रतिभावंतांमधून स्वप्नसफ़र घडवुन आणतील. त्यापेक्षा सातारकरांकडे आपला कलाविष्कार सादर करा आणि यथासांग विवेचन ऐकुन घ्या. पंधरा एक मिनीटाच्या आपल्या creative आविष्कारावर हे लोक तासतासभर भरभरुन बोलत आहेत याचंच तुम्हाला समाधान मिळुन जाईल.
तुम्हाला एखादी मुलगी आवडली आहे कॉलेजमध्ये? तुम्हाला तुमची प्रेमकथा कुणालाही ऐकवावीशी वाटली तरी सांगलीकरांच्या वाटेला चुकुनही जाउ नका. तुम्ही आपलं तुमच्या मनातलीविषयी मनापासुन काहीतरी सांगायला जाल आणि "कोण? ती? ती जरा तिरळी बघते का रे? " "मला तर मंद वाटते ती" असलं काहीतरी परखड मतप्रदर्शन करुन तो तुमच्या प्रेमाचा फ़ुगा फ़ुगायच्या आधीच पंक्चर करेल.
असली गोष्ट कोल्हापुरकरांना सांगा.. हे लोक तुम्हाला फ़ुल्ल जिकवतील. अजुन कशात काही नसताना वरातीच्या घोडीवर नेऊन बसवतील. Confidence वैगेरे काही हवं असेल तर इथुन भरभरुन मिळेल. सरळ रस्त्यावरुन जात असताना तुम्हाला हे लोक प्रपोजच्या दारात नेऊन ठेवतील. प्रसंगी मागुन धक्काही देतील. पण यापेक्षा सगळ्यात चांगला सल्ला देतो. सातारकरांना सांगा. या विषयावर authority असलेले हे लोक तुमचं ऐकुन घेतील. त्यांचे अनुभव सांगतील.या वैचारिक आदानप्रदानात मस्त गप्पा रंगतील. काही नाही झालंच तरी फ़ुगा तरी तुर्तास शाबुत राहील..
या लोकांविषयी मी तासनतास बोलत राहु शकतो.. कारण सगळे आहेतच तसे.. मला हे सगळेजण त्या त्या वेळी तसे तसे भेटले हे मला मिळालेलं गिफ़्ट आहे. मला या सगळ्यांतले बरेचसे चेहरे जसेच्या तसे आठवतात. यांच्या जमवलेल्या बऱ्याचशा चांगल्या वाईट आठवणी आहेत माझ्याकडे.. लिहित राहिलो तर हनुमानच्या शेपटीसारख्या वाढतच राहतील. तेव्हा कोणी आग लावायच्या आधी मी स्वतःहुन आवरतं घेतो.
कोणीतरी विचारेल.. तु यापैकी कोणत्या ग्रुप मध्ये होतास?..किंवा तुला यातला कोणता ग्रुप आवडतो?.. मी फ़ार फ़ार तर हसुन सांगेन..
कसं असतं तुम्ही जर सच्चे खवय्ये असाल तर मग भडंग काय, तांबडा पांढरा रस्सा काय किंवा कंदी पेढे काय सगळ्या चवी तशाच जीभेवर रेंगाळत राहतात.. वेगवेगळ्या.. वैशिष्ट्यपुर्ण.. पण तशाच हव्याहव्याशा..

गुलमोहर: 

Proud

काय लिहलंस ? ह्या पेक्षा आमचा रघ्या बग . पार जेम्स बाँड पेक्षा भारी बग. { एति सांगली कर
रिस्पॉन्स}
खट़का दाबलास बघ्,टांगा पलटी झाला की राव
बसा खुप्च छ्हन लिखाण - सातार कर

वा छान! हे बरे केलेत. इतके दिवस लोक महाराष्ट्र म्हणजे पुणे, मुंबई, नि फार तर नागपूर समजत. पण खरा माहाराष्ट्र म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर इथेच आहे. कारण पुणे, मुंबई तर आता इंग्रजी हिंदी बोलणार्‍या लोकांचे!

सांगलीकर , सातारकर आणि कोल्हापुरकरां मध्ये एवढा फरक आहे ??? Uhoh Proud
चांगलं लिहिलयं !
लेखक सातारकर असावा.. ! >>> नाही जाईजुई लेखक कोल्हापुरकर असावा . Wink

पण सातारकंराविषयी जरा कमीच लिहीले आहे.......एक सातारकर.>>> अनुमोदन!!!

कोल्हापुरकरांचे वर्णन अगदी छान आहे. सुरेख लेखन.

डॉल्बींच्या भिंती काय.. लायटींग काय.. बेभान नाचनारी पोरं काय... मला तर कधीकधी वाटतं असल्या वातावरणात ट्रॅक्टरमध्ये अवघडुन बसलेला गणपतीच कधी तरी सगळं झुगारुन "काला कौआ काट खायेगा" च्या तालावर नाचायला लागतो कि काय… >>>> Biggrin

काही म्हणा पण अख्खा महाराष्ट्र फिरा, पण कोल्हापुरकर, सांगलीकर आणि सातारकर सारखी 'अस्सल' माणसं इतर ठीकाणी तुम्हाला त्यामानाने खुप कमी सापडतील,सापडलीच तर ती मुळात तिकडुनच आलेली असतील
नाद नाही करायचा, भावा !
Happy

सांगलीकर मोड ऑन

कसलं लिव्हलयंस लेका अम्या.. सांगलीला ये एकदा असला लेख लिहून दाखवतो की वाचतच बसशील Proud

सांगलीकर मोड ऑफ

एक नंबर.. लै हशिवलंस..

व्वा, व्वा ! आनंद झाला MH-09 बद्दल इतकं भरभरून लिहून आलेले वाचत असताना. लेखात आणि प्रतिसादात आमच्या करवीर नगरीबद्दलची जी आपुलकी जाणवली तीबद्दल इथल्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार.

"भावा, तू आलास, भेटलास, लई बरं वाटलं !" हे वाक्य ज्यावेळी परराज्यात नोकरी करीत असलेला एक कोल्हापूरकर दुसर्‍याला म्हणतो त्यावेळी हा दुसरा कोल्हापूरचाच असला पाहिजे अशी कोणतीही अट नसते....तो महाराष्ट्रीयन असला की पुरे. कोल्हापूरच्या मिरचीचा ठसकाच असा लुभावणारा आहे की झटदिशी दुसरा तसल्या स्वागताने तिच्या प्रेमातच पडतो.

साखर कारखान्याच्या परिसरात पैदा होणार्‍या राजकारणाचे ज्याला सोयरसुतक असेल ते असेल, पण या कारखान्यामुळे चहुबाजूला पसरलेल्या हिरवाईमुळे जी प्रसन्नता परक्या पाहुण्यांच्या मनी दाटते ती करवीरकरांच्या दृष्टीने महत्वाची. शिवाय 'महालक्ष्मी अंबाबाई" च्या मूर्तीसमोर हात जोडून उभे राहिले की जो परमानंद मिळतो तो फक्त कोल्हापुरकरच नव्हे तर राज्यातून इथे येणारा प्रत्येक यात्रिक जाणत असतो.

असे आमचे कोल्हापूर ~ लई भारी !

अशोक पाटील
(कोल्हापूरकर)

सही. Happy

Pages