भांगेचे प्रयोग आणि परिणाम

Submitted by अमेय फडके on 12 February, 2009 - 12:17

हा मी जरा वेगळा विषय घेतला आहे. आत्तापर्यंत वाघ, साप, भूत असे गंभीर विषयांवर लिहिले. त्यामुळे सर्वांना भिती वाटू लागली....
भांग सर्वांना माहितच असेल. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचा प्रसाद म्हणून घेतली जाते.
मी अजून भांग प्यायलेली नाही. पण या भांगेचे झाड असते आणि भांगेची गोळी दुधात उगाळून ते मिश्रण आटवलेल्या दुधात मिसळतात असे मी ऐकले आहे....
ही भांग म्हणे प्यायलाही खूप चांगली लागते. खरे खोटे प्यायलेल्यांना माहित.असो. तर मुख्य विषय असा की ही भांग जर प्रमाणाबाहेर प्यायली तर चढते...
आणि चढली की मग बघायलाच नको... पण भांग चढणे आणि दारु चढणे यात फरक आहे. दारु चढल्यावर माणसाचे नियंत्रण सुटते. तो वाट्टेल ते बरळायला लागतो, चालताना भेलकांडायला लागतो, गटारात ओकतो आणि त्यातच लोळत झोपी जातो. भांग चढल्यावर यापैकी काहीच होत नाही. काय होते ते पुढील किश्शात कळेलच...
का किस्सा मला बाबांनी कधीतरी बोलता बोलता सांगितला आहे.....
सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपुर्वी, बाबा त्यावेळी कॉलेजला रत्नागिरीला होते आणि बाबांचे तिघे मित्र मुंबईत शिकायला राहिले होते. त्या मित्रांचे हे उपद्व्याप आहेत.
त्या दिवशी महाशिवरात्र होती आणि या तिघांना त्यांच्या मित्रांनी रात्री भांग प्यायला बोलावले होते. त्याप्रमाणे हे सगळे रात्री गेले. आटवलेले गोड दूधातली भांग ती... मग काय विचारता, गोड लागते म्हणून सगळे दणकावून प्यायले. नंतर थोड्या गप्पागोष्टी करुन सुमारे दहा वाजता सगळे आपल्या खोलीवर परत आले. त्यातला एकजण पार्टटाईम रात्रीची नोकरी करत असे. तो सायकल घेऊन दादर स्टेशनला जात असे व तिथे सायकल ठेऊन लोकल ट्रेन ने पुढे जात असे. त्या तिघांनाही भांगेबद्दल फारशी महिती नव्हती पण भांग चढते हे माहिती होते. म्हणून तिघेही खोलीवर आल्यावर थोडावेळ तसेच बसले पण कोणालाही काही फरक जाणवला नाही. त्यामुळे भांग चढते हे खोटे आहे असा लगेच निष्कर्ष काढून मोकळे झाले. त्यातला एक जण जो नोकरी करत असे तो सायकल घेऊन निघाला आणि बकीचे दोघे आपआपल्या पलंगांवर आडवे झाले....
अशीच पाच-दहा मिनिटे गेली. एव्हाना सगळ्यांना चढायला सुरुवात झाली होती. थोड्यावेळाने तो गेलेला मित्र तंबाखूची पुडी विसरली म्हणून परत आला. परत आल्यावर बघतो तर एकजण नाट्यसंगीत आपल्या सुमधूर (?) आवाजात गात बसला होता. आणि दुसरा आडवा राहून आपले हात असे वर करुन काहीतरी तोलून धरावे तसा पडला होता....
परत आलेल्या त्या मित्राने आपली तंबाखूची मळी लावली आणि म्हणाला, "काय रे साल्यानो? भांग चढली की काय"? ......
तो आडवा पडलेला मित्र म्हणाला, "छे! छे! अजिबात नाही".....
"मग तू हात असे वर का केले आहेस?" तो तंबाखू मळता मळता म्हणाला..
"अरे हे छप्पर सारखं खाली खाली येत आहे म्हणून हाताने सारखा वर ढकलतो आहे."
थोड्यावेळाने तंबाखूवाला मित्र निघून गेला आणि पुन्हा पाच दहा मिनिटांनी परत आला. इकडे यांचे आपले चालूच. एक जण तीच तीच नाट्यपदाची ओळ पुन्हा पुन्हा म्हणतोय आणि दुसरा सारखा छप्पर वर ढकलतो आहे...
गाण्याचा कर्कश आवाज अगदी असह्य झाल्यावर उरलेल्या दोघांनी त्या गाणार्‍याला दाबून झोपवले आणि रुमालाने त्याचे तोंड जाम बांधून टाकले....
तंबाखूवाला मित्र निघून गेला आणि या गायकाने रुमाल सोडून टाकला आणि तो पुन्हा ताज्या दमाने गाऊ लागला....
तो गेलेला मित्र थोड्यावेळाने पुन्हा परत आला. शेवटी या छप्पर ढकलणार्‍या मित्राने छप्पर सावरून धरत त्याला विचारले, "अरे तू जातोस पुन्हा परत येतोस पुन्हा जातोस.. हा प्रकार तरी काय"?
तो म्हणाला, "फार मोठ्ठा घोटाळा झाला आहे".
"असं झालय तरी काय"?
"अरे कसं सांगू तुला? मि मघाशी दादर स्टेशन वर गेलो होतो आणि पाहतो तर काय....."?
"काय?"..
"अरे अख्खं दादर स्टेशनच गायब झाले आहे. मी आजूबाजूला शोधून पहिले पण मिळालेच नाही म्हणून शेवटी परत आलो".
"मग आता तुला काही जाता येणार नाही, तेव्हा तू आता इथेच बस."
एव्हढे बोलणे झाल्यावर त्या तंबाखू मळणार्‍याने पुन्हा तंबाखू मळायला सुरूवात केली.
नंतर तो सारखा तंबाखूच मळत होता. मळलेला तंबाखू पुन्हा मळत होता...
आणि बाकी दोघांचा छप्पर ढकलण्याचा आणि गाण्याचा कार्यक्रम चालूच होता तो सुमारे पहाटे पर्यंत...
पहाटे केव्हातरी सगळ्यांना झोप लागली....
..
....
अजूनही काही छान छान किस्से आहेत... वेळ मिळाला की टाकतोच...
तुम्हालाही असे काही किस्से माहित असले तर येथे टाका...
वाचायला मजा येईल...

गुलमोहर: 

मी सुद्धा असे एकले होते की एखादी क्रीया पुन्हा पुन्हा करत रहातात. मी कधी बघितले नाही. पण एकदा माझी मैत्रीण भांग प्ययाली . दुसरी रूममेट न्हवती प्यालेली. दुसर्‍या दिवशी दुसरी मैत्रीण सांगत होती की ती सतत मोठ्या मोठ्याने नॉनस्टॉप हसत होती. आम्हाला काही खरे वाटले नाही दुसरी काय सांगत होती ते.

>>>> अरे अख्खं दादर स्टेशनच गायब झाले आहे. Lol
...;
आपला, लिम्बुटिम्बु

व्वा ! मजा आली! हे मात्र खरं की एखादी भांग जेव्हा चढते तेव्हा एखादी क्रिया पुन्हा पुन्हा करत रहातो माणुस!
मला यावरुन आठवले... गणपती विसर्जनाची गोष्ट ..! माज्या मैत्रीणीकडे ढोल ताशावाले जमले होते.. गणपतीची मुर्ती उचलुन हातगाडीवर ठेवली. आता ती मुर्तीच्या सिंहासनाचे पाय नारळाच्या दो-यांनी हातगाडीच्या चाकांना बांधायचे होते. एक जण आला, अन हातगाडीभोवती गोल गोल फिरत सारख्या दो-याच बांधत बसला. दुसरा ताशावाला पोटावर त्याचे वाद्य ठेउन ( या वाद्याला आमच्या गावाकडे 'पोटझोड्या' असे म्हणतात Happy ) दोन काठ्यांनी न थांबता वाजवतच होता. तेही करुन थकला.. तेव्हा ते वाद्य मैत्रीणीच्या दारासमोर ठेउन तसाच दोन काठ्यांनी पोट वाजवत घरी निघुन गेला.

कसले गणपती विसर्जन अन कसले काय..! सगळे त्यांच्या या माकडचेष्टांनी हसुन हसुन बेजार..!

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
स्मितहास्याची ही गोलंदाजी
पेलवेल त्याने करावी फलंदाजी....
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

पोटझोड्या' Lol

------------------
Our life is shaped by our mind; we become what we think. Joy follows a pure thought like a shadow that never leaves....