स्पर्धा-२

Submitted by दाद on 3 January, 2008 - 19:25

आधीच्या स्पर्धेचा वृत्तांत इथे सापडेल -
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125244.html?1177673002

ह्या वृत्तांतात तिथले संदर्भ आहेत...... तेव्हा.....

स्पर्धा-२

माझा अनुभव फक्त तीन वर्षांचा... अकरावी, बारावी आणि तेरा... आय मीन, एफ़. वाय. तरिही आधीच्या स्पर्धांच्या अनुभवातून मी शहाणी झालेय. व्यंकटेशचं तसं नाहीये. त्याचा जन्म लोकांस्तव आहे म्हणजे फक्त लोकांना शहाणं करण्यापुरता. इतक्या स्पर्धा ऑर्गनाइझ करूनही तो बदलला नाहीये. तीच तर्‍हा.

नाट्यसंगीताची स्पर्धा परवडली म्हणायची पाळी आणली भावगीतांच्या स्पर्धांनी. ह्या चार दिवस चालतात... जुन्या काळच्या लग्नासारख्या... आणि शेवटी सूप वाजवायचीच पाळी आणतात.
नाट्यसंगीताच्या स्पर्धेला साथीला तबला (मी) आणि पेटी (वश्या) वाजवण्याच्या भीषण अनुभवानंतर दोन दिवस एक भयानक बधीरता आली होती.... वश्याच्या भाषेत डोक्यापासून बुडापर्यंत.... सगळ्यालाच मुंगळे आलेत.... मुंग्या नाही... मुंगळे!

फद्या कॉलेजच्या कॅंटीनमध्ये चहा सांगायल गेलाय असं बघून, व्यंकटेश भावगीतांच्या स्पर्धांच्या साथिदारांचा गहन प्रश्न सोडवायच्या घाईत आहे.
'ही आणि वश्याच ठीकय. फद्याचं पटत नाही कुणाबरोबरही.....' , व्यंकटेश माझ्या नाही नाही मान हलवण्याकडे, उठून उभं रहाण्याकडेसुद्धा पूर्णपणे दुर्लक्ष करत म्हणाला.

शेवटी त्याच्या नाकासमोर जाऊन उभी राहिले, 'जमणार नाही. चार दिवस एकटिनं बडवायला.... धुणी वाटली काय? ती पण जमणार नाहीत'.

'तर काय? ही पार्श्यालिटी झाली. पोरी झाल्या म्हणून काय झालं? आधीच ह्या पोरी त्यात आणि ते.. हे... काय ते? हा.... राकीव जागा. जागा अडिवणार. खाली बसताना सुद्दा आदी रुमाल टाकुन त्यावर बसणार.... आपला नसला तर आमच्या कडे मागणार... त्ये पण दात दाकवीत....' वश्या भलता म्हणजे भलताच चिडला होता. चारही दिवस वाजवायचे? वश्या चिडला की आहे त्यापेक्षाही गोंधळतो.

कुणीतरी दिलेल्या व्हिजिटिंग कार्डाचे तीन कोपरे, दाढा सोडून इतर दातांच्या फटीतून काढून झाल्यावर, आता उरलेल्या कोरड्या कोपर्‍यात ते नीट दुमडून कानात घालत, डोळे मिटून वर्तक अतिशय शांत स्वरात वश्याला म्हणाला, 'वासुदेव बालका, तू नक्की कोणाच्या बाजूने बोलतोयस?'

खूप हवा साठल्यावर पेटीचा भाता जड होतो आणि कधी कधी नको नको ते सूर पिपाटतात तसा वश्याच्या सूरयंत्रातून तुतारीसारखं नुसतेच 'तू... तू.....' ऐकू आलं.

वर्तक छान पेटी वाजवतो. वश्याचे 'ढापणे गुर्जी' आणि वर्तकचे 'सामंत सर' यांचं युगायुगांचं शत्रुत्व. ते शिष्यांच्यातही संक्रमित झालंय. वश्या तालमीत जाऊनही पापडतोड पैलवान दिसतो आणि वर्तक गजाढोल वाजवत नसून साधी बाजाची पेटी वाजवतो हे सांगावं लागतं.

'ठीकय तर....' व्यंकटेशचं काय्ये, विचार-विनिमय वगैरेमध्ये तो मुळीच वेळ फुकट घालवत नाही. 'अर्धा कार्यक्रम तू आणि वश्या, आणि अर्धा फद्या आणि वर्तक वाजवतिल. यापेक्षा वेगळं कुणाला काही सुचत असल्यास आत्ता बोला नाहीतर आयुष्यभरासाठी गप्प बसा'.
चर्च मध्ये लग्नं लावताना पाद्री असलं काहीतरी बोलतात म्हणे.... ते व्यंकटेश इथेही वापरतो.

'कोणचा अर्दा मी आणि कोणचा अर्दा तो? ते इतेच काय त्ये ठरवून सोडा.' साठलेली हवा जरा रिकामी झाल्यावर वश्याला नॉर्मल आवाजात कंठ फुटला. 'म्हंजे पयले दोन दिवस मी, मगचे दोन दिवस तो? का आल्टुन पाल्टुन मी.... तो.... मी.... तो.... किंवा तो... मी.... तो... मी....?'

वश्याला सगळं व्यवस्थित डिफाईन करून हवं असतं विशेषत: ढापणे गुर्जींच्या इज्जतीचा सवाल असेल तर.

'अरे त्यात काय? अर्धा म्हणजे अर्धा. पूर्णच्या अर्धा. हाफ ऑफ इट. अर्धी मात्रा!' सगळ्यांसाठी अर्धा अर्धा कप चहा सांगून आलेला फद्या. फद्याने कुणालाही काहीही समजावून सांगण्यापूर्वी एकदा मनातल्या मनात त्याला स्वत:लाच आधी कळतं की नाही ते म्हणून बघावं असं मला खरच वाटतं.

'आसं कसं? ऑ? अर्दा म्हंजे... अर्दं गाणं मी आणि अर्दं त्याने... असंपण होतय की.....', वश्याचा हा धक्का मात्र आम्हालाही पचला नाही.

'ते तुमच्या क्लासात असेल... अर्दंऽऽऽ अर्दंऽऽऽ....' वर्तकने ठिणगी टाकली. सगळ्यांनी आवरलं नसतं त्या दोघांन्ना तर, तिसर्‍या महायुद्धाला तात्कालीन कारण होतं.

शेवटी.... एकाच दिवसातली जेवणाआधीची वश्या आणि मी, नंतरची फद्या आणि वर्तक, असं ठरलं. कोणत्याही गाण्याला तबला मीच लावून द्यायच्या अटीवर फद्या तयार झाला. आपल्याला तबला लावता येत नाही पेक्षा 'ठाक ठोक कोण करणार ती.... कट कट च्यायला' हे फद्याचं प्रकट मत.

'तुमी सगळ्यांनी धरला म्हणून नायतर आजच त्या वर्तकाला खाऽऽऽऽलपासून वऽऽऽऽरतक वाजिवला असता....', वश्या निघताना आम्हाला सांगत होता.

**************************************

नेहमी सारखे आम्ही आपले पहिल्या दिवशी मागच्या खोलीत बसलो, आपापली हत्त्यारं घेऊन.
गेल्यावेळी सगळ्यांनी फारच आरडाओरडा केल्यामुळे आज संस्थेच्या मेम्बर्ससाठी तरी नाष्ट्याला इडली-साम्बार होतं. मगाशी सांबाराची नुसती चव घेतलेल्या उज्वलासाठी पाण्याचा साठा शोधत वणवण भटकणार्‍या कावळ्याला बघितल्यावर लक्षात आलंच होतं की हा प्रकार जीवघेणा आहे. ते तिखट सांबार नको म्हणून मी भरपूर नुसती चटणीच घेतली होती. नाही म्हणजे चटणीचं गंध लावतात इडलीला.

गेली पंधरा मिनिटं वश्या सांबार्‍यात इडली भिजायची वाट बघतोय... 'येकवेळ पालथ्या घड्यात पाणी जाईल पण ही इडली भिजत्ये म्हणता? नाव सोडा जावा तिकडे!' इति हताश वश्या. गरम सांबारात भिजत नाही ती थंड चटणीत भिजेल? इडली फेकून मारता येईल इतकी टणक होती.
'रव्याला म्हणावं, च्येचून आण जरा दगडीत घालून ही इडली. इडली का काय हो? विटकर बरी ह्यापेक्षा', हताश आणि उपाशी वश्या. इडली, रव्या कामताच्या कुणीतरी ओळखीच्यातून करून आणली होती, म्हणे.

दार उघडलं. नाव घ्यायला आणि राक्षस हजर व्हायला एक गाठ! काखेला शबनम लावलेला झब्ब्या-लेंग्यातला रव्या आम्ही ओळखलाच नाही.
'हे घे', झोळीतून पार्ले ग्लूकोचा पुडे काढला त्याने आणि 'ते दे' म्हणत इडली काढून घेतली वश्याच्या पुढ्यातली.
'चेचून आणतो?', काळजीपूर्वक, एकाग्रतेने बिस्किटाचा पुडा उघडत वश्या सरळपणेच म्हणाला. रव्याच्या चेहर्‍यावर हिंस्त्र भाव दिसता दिसता परत मावळले.
'दुसरी आणतो' असं म्हणून इडल्या घेऊन रव्या गेलाही. खरतर रव्याने वश्यालाच चेचायचा पण नाही. मला अरिष्टाची शंका येऊ लागली पण नक्की काय ते कळेना.

'ह्ये काय? बिस्किटं च्येचून आणलीत... ती काय नको होती चेचायला... ती भिजली असती सांबार्‍यात', वश्याचं हे ऐकायला रव्या नव्हता तिथे नाहीतर....

इतक्यात काड्या, चष्म्याच्या काड्या सावरत आत आला आणि आपली सुप्रसिद्ध पालथी मांडी घालून समोर बसला देखिल. दाताला लावलेल्या तारांमुळे अस्खलीत बोबडं बोलत त्याने विचारलं, 'च्यला, आपली उरकुन घेऊया का? म्हणू?'

वश्याने मान हलवली असेल नसेल, तोच काड्या सुटला,
'सशा....'

'काय? कुठेय?', वश्या इकडे तिकडे बघत. 'थांब. तू सश्या म्हणाला की वशा म्हणालास? तुज्या त्या दाताच्या कुंपणातून काय नीट ऐकू येईना बग'

'अरे, तो ससा तो कसा तो कापुस जसा... ते गाणं म्हणतोय' मी काड्याला सुचलेली अवदसा वश्याला शब्दात एक्स्प्लेन केली.

'ससा? तू ससा म्हणतोयस? ते भाव्गीत तरी आहे का? मदलं म्युजिक वाजवायला मी आर्डी वाटलो का काय तुला?', वश्याने खर्जात काळी दोनला सुरू करून वाक्य शेवटी तारसप्तकात काळी पाचला ओरडत संपवलं. कोणत्याही गाण्यातले ऍकॉर्डियनचे पिसेस फक्त आर डी बर्मन वाजवतो असं त्याला वाटतं.

'काड्या अरे, तू साधं कसलंतरी गाणं निवडायचस... दाताला ब्रेसेस लावून ससा काय? सगळे दंत्य आणि तालव्य उच्चार वगळून गाणं हवं', मी प्रयत्नं केला खरा. पण मला खरं म्हणजे 'तू गातोस कसला, ह्या तारा लावू बोलू सुद्धा नकोस' असं म्हणायचं होतं.

'तुज्या अवस्थेत खर म्हंजे माणसानं, त थ द ध न, स, श, ष, य, ड, प, ट, ल, व,.... ह्ये गाळून गायला हवं.... तर सशा?', वश्या.

पालथी ची सरळ मांडी करत अवस्था बदलून, काड्याने जमालगोटा काढला, 'तू वाजवतो का वर्तकला सांगू?', ... आणि तो लागलाही.... जालिम.

'माजं काय? म्हण तू. तुझा उंदिर, घूस का काय ते', वश्याने भाता ओढला.

'सशा, तो सशा तो कापुश जशा त्यान काशवाशी पैज लाविली....
वेगे वेगे जाऊ....'

अगदिच बघवेना म्हणून मी त्याला थांबवला. 'काड्या, खांदे का उडवतोयस?'
'मग? उडतं गाण आहे.... ताल कसा धरू? तशीच प्रॅक्टिस केलीये', काड्या.

******************************
घरचं अजून कोण कोण आहे ते बघण्यासाठी मी लिस्ट हातात घेतली आणि लिस्टसकट पडत होत्ये. रव्याच्या चेहऱ्यावरच्या सौजन्य लेपाचं आणि 'कामत बुवा' पेहरावाचं कारण ठळकपणे समोर दिसत होतं. रव्या गातोय!

'रव्या म्हंजे आपला रव्या? म्हंजे कामत? म्हंजे कामातून ग्येलेला आपला? रव्या?', वश्याचा वासलेला जबडा अजून एक इंचभर जरी खाली आला असता तर एकतर निखळून पडता किंवा जमिनीला टेकता, किंवा दोन्ही.
'तरीच. न्हाईतर त्याच इडल्यानं माजं डोस्कं नव्हतं फुटत मगाशी?', वश्याची पेटली एकदाची, 'काय म्हणतो म्हणतो?'

'दयाघना', मी सांगितलं.

'द्ये टाळी. मी पण त्येच म्हंटलो बग मनातल्या मनात. द्येवा, बाबा याला चांगली बुद्दी दे किंवा येक आजच्याला आवाज तरी बसून जाऊदे त्याचा... पार चिप. त्यांच्या घराण्यात ओरडण्याल गाणं म्हणतात', वश्याला वाटलं की मी देवाची प्रार्थना करतेय. ती वेळ कधीच टळून गेली होती हे बिचार्‍याच्या लक्षात आलं नाही..... अतिशय नम्रतेने, आवाजही न करता, दार लोटून, साक्षात रव्या, त्याच्या मातोश्रींसकट त्याच्या मागेच उभा होता.

तसलेच पारंपारिक, घराण्याचे हिंस्त्र भाव आता रवी आणि रवीमाऊलीच्या चेहर्‍यावर येत येत ओसरले.

'ते तुमचं ग म भ न नको आपल्याला, म्हणून नाट्यसंगीत गायलो नाही. आज सफेद दोनमध्ये गातोय, दयाघना का', दयाघनाला प्रश्न विचारल्यासारखा तटकन थांबून रव्याने गाण्याचे पहिले दोन शब्द सांगितले.

'ग म भ न'? 'सा रे ग म' म्हणायचय बहुतेक त्याला असा मी मनातच विचार केला.

'चांगलय चांगलय. तुज्या ष्टाईलला फिट्टय गाणं. छोटी छोटी वाक्य.... दयाघनाऽऽऽ, काऽऽऽ, सुट्लेऽऽऽ, चिम्णेऽऽऽ, घर्टेऽऽऽ वा वा....', प्रत्येक शब्द वाण्याच्या यादीतल्यासारखा म्हणत वश्याने गाण्याला परत परत भोसकलं. आता रव्यासाठी काय वेगळं कामच उरलं नाही.

रव्याने सुरूवात केली. रवीची आई समोर बसली मांडी ठोकून हाताने ताल देत, 'घरी रियाजाला नाऽऽऽ ताल मशीन लावतो आम्ही'.
'रविंद्रऽऽऽ, 'ना' ला सम हं? दयाघ.... न्ना!' असं म्हणत त्यांनी तबल्यावर टाणकन वाजवून सम दाखवली. आम्ही सगळेच दचकलो... मी, वश्या, आणि तबला!

'दयाघन्ना!'
'का? सुट्टले?'
'चिम्मणे घरट्टे!'

भयानक प्रकार चालला होता. त्या दयाघ न्ना नंतर रव्या बोटं मोडून मात्रा मोजत होता. त्यामुळे गायचं विसरत होता. त्याला ताल देता देता आई गात होत्या. वश्याला आपण कोणाला साथ करतोय तेच कळेनासं झालं होतं. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी सम आल्यावर मी थांबवलं त्याला आणि त्या ताल मशीनलाही.

'रवी, इतकं तालातलं कठीण गाणं कशाला निवडायचं? शिवाय हेच अजून तिघजण म्हणतायत', मी म्हटलं तर वश्याने मला सुधारलच, 'तिगं नाई दोगच.... पण तू गाणं बदलच.'.

'कोणतं म्हणतोस मग, रविंद्रा?' आईने विचारलं. त्यांचं रव्याला प्रेमाने, पूर्ण नावाने, कोमल स्वरात वगैरे बोलणं ऐकून, इतक्या आई छान आहेत मग रव्या असा कसा काय निपजलाय? असा प्रश्न माझ्याच काय पण वश्याच्याही मनात नक्की आला असणार. कारण तशी मान हलवत त्याने तोंड उघडलही, 'रव्या, रागाला येऊ नकोस पण येक विचारतो तुला,.....'

'... की दुसरं कोणतं गाणं गातोयस तू?', मी वश्याला वाचवला.... परत एकदा.

'प्रेमस्वरूप आई म्हणू?' रव्याने विचारलं.

'नको नको. मगाशी येकीला हाता-पाया पडून मनवलय, म्हणू नको म्हणून. तुला माहितीये तरी म्हणतोयस? उज्वलाला कांदे लावायला लागतात. तिची आई.... ती... तिकडे दुबयला का कुटे असत्ये ना तिच्या आटवणीने? हिला, उज्वलाला कांदा द्यावा लागतो... तिकडे कावळ्याचा आटा सटकला की कोणाकोणाला खांदा द्यावा लागेल त्याचं काय ते बग.... तू तरी येक...', वश्या काव काव कावला. आणि तो म्हणत होता ते शब्दश: खर होतं.

'बरं, 'अ आ आई' म्हणतो' रव्याने म्हणताच त्याच्या आईने सद्गदीत होऊन डोळे टिपले.

'अरे, पण गम भन नको म्हणलास ना मगाशी? ह्याच्यात अख्खी बाराखडी आहे. क ख ग घ.... पासून ह ळ क्ष पर्यंत सगळ.' वश्याच्या बाबतीत, गोंधळलेला हा स्थायी-भाव. बाकीच्यावेळीही अभावच जास्तं. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की तो समजून चुकतो की, आपण समजावण्याच्या पलिकडे सात डोंगर आणि सात समुद्र तरी आहोत.

'त्याला घोड्याच्या टापांचा ठेका वाजवशील?', आई कामत म्हणाल्या. मी अवाक आणि ते माझ्या चेहर्‍यावर जरा जास्तच स्पष्ट लिहिलेलं दिसलं.

'म्हणजे... ढाक टिक ढाक टिक ढाक टिक असं.', रव्याने आपल्यामते घोड्याच्या टापांचा आवाज काढत गाढवासारखं विचारलं.

'तुला टिक टॉक टिक टॉक टिक टॉक म्हणायचय का?', गाढवपणात वश्या मागे कसा राहील?

मी निमूट वाजवून दाखवला. त्यावर, 'चालेल. चालेल नाही?', वश्या म्हाणाला.

'हा... जऽऽऽरा ढॉक टिक ढॉक टिक ऐकू येतोय. पण चालेल', रव्या म्हणाला.

माता न ती वैरिणी मात्रं खूष दिसली. तबल्याच्या हातोडीने त्या दोन्ही गाढवांना सडकून काढावेत असं वाटलं मला.

क्रमश:

गुलमोहर: 

:):):):)

>>तिकडे कावळ्याचा आटा सटकला की कोणाकोणाला खांदा द्यावा लागेल त्याचं काय ते बग......
दाद, हसून गडाबडा लोळायचं बाकी आहे! नवर्‍याने सदगदीत होवून डोळे मिटून घेतल्ये! Lol
तू पुढील भाग टाकशीलच या अत्याशेने स्पर्धा-१ ची पारायणे करून झालीत! आता येवुच दे...

दाद! नाट्यगीतांनीच हसून गडाबडा लोळायला लावले होते..
आता भावगीते.. बापरे!! :))))

लिही दमदार नेहेमीप्रमाणेच! Happy

तोंड घट्ट बंद करून आतून म्हणजे अगदी आतून येणारं हसू दाबत, मुरगडत, वाचणं कठीण आहे. माझे गदगदणारे खांदे बघून कलीग वाकून बघायला लागला हिचं नक्की काय चाललंय ते...... ऑफिसमध्ये अशक्य आहे वाचणं.

तरीही दाद, पुढच्या भागाची आतूरतेने वाट बघतो आहोत....... अजून चांगले ५ - ६ भाग येऊ द्यात.

अरे व्वा!!! सहीच आहे Happy
दाद, खुप खुप हसतोय.

अगदी हहपुवा वाचतानी... एकदम मस्त... पहिला पण भाग वाचुन काढला... अप्रतिम... दाद द्यायला सुद्धा शब्द नाहीत दाद तुमच्यासाठी... Happy

एक छोटीशी शंका... पहिल्या भागात वश्या एकदम शुद्ध बोलायचा अन आता एकदम गावराण टच कसकाय (हा तोच आहे की दुसरा, मी पण वाचण्यात काही गडबड केली असेन...)

अशक्य आहेस तू... मस्त लिखाण...

'परदेसाई' विनय देसाई

झकासने warning दिलि होती तरीपण इथे वाचली.... नि माझी कलिग माझ्या हसण्याचा वेगळाच अर्थ काढुन बसलिय!! Happy

तु अगदि रोज लिहित जा खरच. वाचल्यावर दिवस मस्त जातो.

अनुमोदन.
स्पर्धा-१ मुळे बरेच दिवस बरे गेलेत माझे. Happy

दाद हा आगदी हातखंडा हो तुमचा ! स्पर्धांना आगदी डोळ्यासमोर आणता ! ते सगळे रव्या,वश्या डोळ्यासमोर दिसायला लागले !

खूपच छान

ऑफिस मधे निट हासता हि येत नहिय. तरिहि पुडच्या पोस्ट चि अतुर्तेने वाट बघत आहे.

वा हे मस्त केलस दाद तु, समाप्तचा बोर्ड काढुन क्रमशः चा लावलास ते. आता परत एकदा (हसण्याचा) पुर येणार म्हणायचा.
\(:) /(हा हात कर वरुन नाचणारा माझा चेहरा आहे :D)