"आरसा.."

Submitted by Manasi R. Mulay on 1 June, 2011 - 13:32

" आरसा! चेहरा आणि प्रतिमा म्हटलं की आठवतो या दोघांची सांगड घालणारा आरसा..चेहरा आणि प्रतिमा या दोहोतलं अंतर किती अचूकपणे सांभाळत असतो तो! दोघांतील परस्पर भेद अन समानतेचं द्योतकच असतो तो!
जेव्हा कर्त्रुत्वाचं तेज लेऊन चेहरा सौंदर्‍यानं निथळत असतो, तेव्हा प्रतिमेच्याच मुखावर समाधानाचं हासू उमटलेलं..अन जेव्हा कर्तव्याचं ओझं घेऊन चेहरा दु:खानं व्याकूळ होतो,तेव्हा प्रतिमेनंच आसवं गाळलेली...

प्रतिमेचं अन चेहर्‍याचं नातंच मुळी स्वर्गीय! ते नातं जन्माला घालणारा अन त्याला जीवपाड जपणारा तो इवला काचेचा तुकडा,आरसा!
आरसा,निर्मिती प्रतिमेची! चेहरा आणि प्रतिमेची झालेली नजरभेट अन त्यांचा सहज सुरु झालेला मूकसंवाद...चेहर्‍याला अंतर्मुख करत त्यानं मनाशी साधलेली हितगूज अन त्या मनाचं प्रतिबिंबित झालेलं साजिरं रूप... ते स्वत्वाचं प्रतिबिंब न्याहाळताना नकळत चेहर्‍यालाच भुरळ पडावी, चेहर्‍यानं आरसा जवळ करावा..चेहरा हरवून जावा अन प्रतिमा मोठी व्हावी!!!
चेहर्‍याला स्वतःची ओळख पटवणारा,चेहर्‍याचं अगदी तंतोतंत चित्र रेखाटणारा तो साधा,सरळ आरसा, ज्या विशाल गोलकाचा भाग, तो विशाल आरसा चेहर्‍यासमोर येताच प्रतिमेनं अचानक आपला नूर पालटावा...कधी वास्तव कधी आभासी ,कधी उलटी कधी सुलटी, कधी लहान तर कधी खुद्द चेहर्‍याहूनही मोठी... एकेवेळी चेहर्‍याचं हुबेहूब चित्र असणार्‍या प्रतिमेनं हळुहळू बदलत जावं अन अनभिज्ञ चेहर्‍याला त्याचा सुगावाही न लागवा...मग प्रतिमेचा खेळ करणार्‍या आरश्याच्या वक्रतेबरोबर चेहर्‍यानं कधी उगाच दु:खी व्हावं तर कधी भलतंच बेभान व्हावं...
चेहरा व प्रतिमेचं नाजूक नातं!इवला खडा लागला तरी तुकडे-तु़कडे होऊन जातं आरश्यासारखं..पण आरश्याचे तुकडे होवोत, प्रत्येक कण त्या पवित्र नात्याची साक्ष देत राहतो आणि चेहरा -प्रतिमेचं नातं अधिकच घट्ट होत असतं.."

गुलमोहर: