मोठ्ठं झालं की...

Submitted by हायझेनबर्ग on 12 November, 2010 - 21:23

ए दादा! सांगणारे ह्या अभिदादाला, बघ ना कसा बोलतो मला.

ए चले शेंबडे मी बोलावलं होतं का तुला माझ्या मध्येमध्ये करायला, कशाला हात लावलास मग माझ्या दुर्बिणीला गं आणि आता वर चुगल्या करतेस? आईने सांगितलंय ना तुला झोपून रहायला मग जा की. नाही तर देशील तुझा सर्दी खोकला आम्हालाही.

अभि गप्प राहतोस का घालू एक गुद्दा. लहान आहे ना ती तुझ्यापेक्षा आणि असं बोलतोस होय रे तिच्याशी. मोठा भाऊ ना तू तिचा? ती आजारी आहे तर काळजी घ्यायची तिची की असं ओरडायचं? जा तुझ्या रूममध्ये! पॅकींग कर जा तुझी.

ए मी काहीच नाही केलं हां श्रीदादा तिला. हात तर मुळीच लावला नाही. आईनंच सांगितलंय तिला झोपून रहायला मग कशाला आली रे ती माझ्या रूममध्ये, तिच्यामुळं मला सर्दी झाली आणि आईने उद्याच्या ट्रीपला जाऊ नाही दिलं तर.

वा रे मेरे डॉक्टर-दोस्त. ती तुझ्या रूममध्ये आली तर अशी एका मिनिटात सर्दी होणार होय रे तुला?

हो तर तिला नाही का झाली तिच्या वर्गातल्या त्या जाड्या केतकरकडून एका दिवसात? आईनंच सांगितलं मला की मनीपासून लांब रहा म्हणून.

बरं ठीके! जा की मग आता तुझ्या रुममध्ये, कशाला थांबलास इथे? ही श्रीदादाची रूम आहे तुझी नाही. जा!

जातोचे मी , इथे कोण थांबतंय तुझ्याजवळ, उद्या गणपतीपुळ्याला जायचंय मला, तुझ्यासारखं शेंबडं होऊन फुरफुर करत झोपून नाही रहायचंय दिवसभर.

जा जा बघच तू आता, तिथे गेल्यावर तुला सर्दी होते की नाही, मग फुरफुरतंच येशील घरी. दुष्ट कुठचा.

मने, ए असं बोलतात का? भाऊ ना तो तुझा, तो आजारी पडला तर आवडेल का तुला.

पण मग तो बघणारे कसा बोलतो माझ्याशी, दिवाळी कँपमध्ये जायला आईने परवानगी दिली तर बघना कसा दुष्टपणा करतो, मी काय खाणार होते का त्याची दुर्बीण.

जाऊदे गं तो तसाचे भावखाऊ, तू नको त्याच्या मध्ये मध्ये करू.

मग मी काय करू, मला बोअर होतंय.

तुला भूक लागली असणार? मी तुला देऊका वरणभात भाजी वाढून, काकू सगळा स्वैपाक बनवूनच गेलीये बँकेत आणि मला सांगितलय तू उठली की तुला वाढून द्यायला. आज शनिवारचा तिला हाफडे असणार. तू काकू यायच्या आत जेऊन घे नाही तर ती आली की तुला बळजबरी पोळीपण खायला लागणार.

नकोये मला काही. भूक नाहीये. आई आली की तू सांग मी जेवले म्हणून.

छे! मी नाही खोटारडेपणा करणार. तू आत्ता जेवत्येस की काकू आल्यावर तेवढं सांग.

नको ना रे दादा तोच वरणभात आणि तीच फ्लॉवरची नाहीतर शेपूची भाजी असणार, कंटाळा आला मला.

आत्त्ता की नंतर?

नको ना रे दादा मला भूकच नाहीये.

आत्त्ता की नंतर?

दादा नक्कोये ना मला.

आत्ता की नंतर?

जाऊदे मी जाते.

अगं थांब. बरं असू दे, बघू तुला ताप आहे का आता?

ताप गेला सकाळीच. फक्त रात्रीच आला होता थोडा. आई पण म्हणाली ,ताप गेला आणि बरं वाटलं तरी झोपून रहायचं.

असा कसा दिवाळी सुटीच्या पहिल्याच दिवशी ताप आला गं तुला?

अरे ती माझ्या वर्गातली केतकर आहे ना तिच्यामुळेच झाली मला सर्दी आणि मग ताप पण आला.

कोण ती केतकर वकीलांची स्वराली? तुझ्या वर्गाते? मला वाटलं ती नववीत तरी असेल.

हो तीच ती, अभिदादा तिला जाडी म्हणतो पण एवढीपण काही जाड नाहीये ती, फक्त माझ्या डब्बल आहे. ही ही ही.

बरं बरं ठीके, जा आता तू, झोप बरं परत.

ए मला नाही झोपायचं-बिपायचं आता. मला झोपून पण बोअर झालंये.

मग टीव्ही बघ.

टीव्हीपण बोअर झाला. सगळीकडे नुसती अक्षयकुमार आणि सलमानखानची बोअर गाणी, नाही तर ऐश्वर्यारायची सगळेच बोअर.

हे बोअर, ते बोअर, ते बोअर, मग काय करायचंय तुला?

मी इथे बसू? मी बसले तर तुला नाही ना होणार माझ्याकडून सर्दी?

अरे येडबंबू पंधरावीतल्या मुलाला सर्दी आणि साडेसातवीतल्या मुलीकडून आणि ती पण तुझ्यासारख्या फुलाफुलांचे गुलाबी-निळे फ्रॉक घालणार्‍या मुलीकडून? हे हे हे! असं कधी होतं का?

मग आई का म्हणाली अभिदादाला माझ्यापासून लांब रहा म्हणून तो पण तर मुलगा आहे ना आणि माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठापणे.

कोण अभि ना? त्याची सगळी प्रतिकारशक्ती दुसर्‍यांशी भांडण्यातच संपून जाते आणि मग लगेच सर्दी-ताप होतो त्याला म्हणून. आपली आजी म्हणते ना 'विलायची खाल्ली की थंडी वाजते आणि लवंग खाल्ली की गर्मी होते ह्या पोराला' हॅ हॅ हॅ

ही ही ही, मग त्याला घशाची आग होईपपर्यंत नुसतं सुंठ घालून दूध प्यायला लागतं. सर्दीची गोडमिट्ट औषधं तरी चांगली पण ते दूध...याक याक.

ऐकलं वाटतं त्याने, बघ कसा दरवाजा लावला जोरात. कोपिष्टं आहे एक नंबरचा.

ही ही ही कोपिष्ट.... आता तो मला शेंबडी म्हणाला की मी त्याला कोपिष्टंच म्हणणार. ही ही ही कोपिष्ट.
आणि आपण गावच्या घरी गेल्यावर आजी काय म्हणते अभिदादाला माहितेय का? 'अरेच्या! मुंबईचं वाळकेश्वरपण आलंय का गाडीत बसून?' ही ही ही

वाळकेश्वर हॅ हॅ हॅ.

पण दादा तू त्याला खरंच गुद्दा घालणार होतास माझ्याशी दुष्टासारखा बोलतो म्हणून.

नाही गं ते तर असंच त्याला घाबरवण्यासाठी म्हणालो. मी नुसती शर्टाची बाही जरी वर केली तरी माझे दंड बघूनच घाबरतो तो. आणि तुला माहितीये त्याला दोन्ही हातांनी जोर लाऊनसुद्धा माझी एक डंबेलपण उचलता येत नाही. खरंच वाळकेश्वरे तो, हॅ हॅ हॅ.

बापरे केवढे कडकेत दादा तुझे दंड! तू पण ह्रितिक सारखा हो. मला आवडतो तो.

हे हे ह्रितिक म्हणे... काहीपण.

अरे खर्रच आवडतो मला तो. सलमान, अक्षय बोअरेत.

बरं ठीके ह्रितिक सारखा होतो बस्स.

काय रे दादा तू, नाक्यावरच्या दुकानात मित्रांबरोबर चोरून ऑमलेट खातो?

क्काय ? कोणी? कोणी सांगितलं तुला?

सांगना खातो का?

तू आधी सांग कोण म्हणालं तुला असं?

अभिदादा म्हणाला! मागच्यावेळी त्याने मला मारलं म्हणून तू त्याचा हात पिरगाळला होतास ना आणि मग तो रागारागाने न जेवता रूममध्ये दार लाऊन बसला. मग थोड्यावेळाने मी बॅडमिंटनची र्रॅकेट मागायला त्याच्या रूममध्ये गेले तर तो रागात बडबडत होता, 'परत जर माझा हात पिरगाळला ना तर मी सांगतोच आईला हा मित्रांबरोबर नाक्यावरच्या हॉटेलात ऑमलेट-पाव खातो म्हणून, बघितलंय मी शाळेतून येतांना. ऑमलेट तर खातोच, मग कोंबडीपण खात असणार. सांगतोच आईला. मग आई देते की नाही परत त्याला गावाकडे पाठवून बघतोच मी.' असं काहितरी.

बरं! असं बडबडत होता का? भलताच राग येतो वाटतं कोपिष्टं डॉक्टरांना. बिनधास्त सांग म्हणावं काकूला.

म्हणजे तू खातोस ना ऑमलेट.

हो खातो! त्यात काये सगळेच खातात ज्यांना त्यांचे दंड मोठे करायचे असतात. तुझा ह्रितिकपण खातंच असणार.

ईssss....पण आपल्या घरी चालत नाही ना असलं काही? आजीला किंवा मोठ्या काकांना कळलं मग.

कळलं तर कळलं.

मग आजी आणि काका तर तुला पुन्हा गावाकडच्या घरात येऊ पण देणार नाही आणि आई पण इथे राहू देणार नाही. मग तू काय करशील?

तुला बरं माहितीये गं कुणी मला घरात घेणार नाही ते. अं काय बरं करणार मी? काय करू? हां मग मी हॉस्टेलवर जाईन रहायला.

जाशील तू हॉस्टेलवर? तुला कुणाचीच भिती नाही का रे वाटत?

भिती? कशाला? आणि कुणाची वाटायला पाहिजे गं मने?

कशाला म्हणजे? मग वाईट कामं करतांना भिती नाही का वाटली पाहिजे? ती स्वराली केतकर आहे ना माझ्या वर्गातली, ती रोज मधल्या सुटीत पेप्सी विकत घेते शाळेच्या बाहेरून आणि पिते. मला सांगते की तिला पेप्सी खूप आवडते म्हणून पेप्सीसाठी तिचे बाबाच तिला रोज पैसे देतात. पण मला माहितीये की ती खोटंच बोलते. तिचे बाबा तर कित्ती कडक आहेत, माझ्या आईपेक्षा पण खूप जास्ती. मग ते कशाला देतील तिला पैसे रोज? आणि तरी तिला थोडीसुद्धा भिती वाटत नाही.

तू अजून लहान आहेस गं म्हणून तुला वाटते भिती?

म्हणजे मोठं झाल्यावर वाईट कामं केली तरी चालतात? आणि भिती पण नाही वाटत आपल्याला?

तसं नाही गं वेडे, मोठं झाल्यावर आपल्याला नीट कळतं की कुठलं काम चांगलं आणि कुठलं वाईट?

मग जे काम करणं लहानपणी वाईट असतं तेच काम मोठं झाल्यावर केलं तर वाईट नसतं?

असं म्हणालो का मी ?

मग मी नाहीतर अभिदादाने चोरून अंडी खाल्ली किंवा पेप्सी पिली तर आई आम्हाला लाटण्याने बदड-बदड बदडेल. मला बदडलं नाही तरी रूममध्ये अर्धा दिवस तरी कोंडून ठेवेल. मग तू फक्त मोठा आहेस म्हणून ती तुला शिक्षा नाही करणार? तुला तिने गावाकडे परत पाठवून दिलं तर?

नाही गं बाई असं नसतं. बघ! आता काकूला माहितीये ना की मी मोठा झालोये आणि माझ्यासाठी काय चांगलं काय वाईट आहे हे माझं मला कळतं, म्हणून मग ती माझ्या अश्या छोट्या गोष्टी मनावर घेणार नाही. ती फारफार तर मला विचारेल 'तू खरंच खातोस का आणि का खातो वगैरे?' पण ह्या कारणावरून कोणी कुणाला घराबाहेर काढत असतं का? हां आता तुझ्या मोठ्या काकांचा काही भरवसा नाही ते काढतीलही मला घराबाहेर, पण मला त्याने काही फरक पडत नाही.

पण मग मोठं झाल्यावर अंड खाणं चांगलं असतं का?

हो चांगलं असतं, सांगितलंना तुझा तो ह्रितिकपण खातो म्हणून.

मग मोठं झाल्यावर अंड खाणं चांगलं असतं तर आई-बाबा, आजी मोठे काका-काकू का नाही खात.

अर्रे !!! पेटलीसच की तू? बर्रीच हुशार आहेस गं! मी तर समजत होतो ही एक फक्त फुलाफुलांचे फ्रॉक घालणारी आणि केसांचा यू कट करून सुंदर दिसाणारी बाहुलीच आहे नुसती....पण मेंदूपण आहे की तुझ्या डोक्यात. हॅ हॅ हॅ

ए गप ना रे श्रीदादा, तू पण त्या कोपिष्टासारखं नको ना बोलू? सांगना! का ती मोठी लोकं अंडं नाही खात मग?

हे बघ! तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांचं ठरवायचं खायचं की नाही. मी काय सांगणार? मी माझ्यापुरतं ठरवतो आणि करतो.

मग किती मोठं झालं म्हणजे मी अंडं खायचं की पेप्सी प्यायची असं मी माझं माझं ठरवू शकेन?

कळेल ते तुला मोठं झाल्यावर. मोठं झालं की आपण मोठ्यांनी बनवलेले काही नियम तोडायचे असतात?

तेच तर. असं किती मोठं झालं म्हणजे मग मोठ्यांचे नियम तोडतांना आपल्याला भिती नाही वाटत?

असं नक्की काही नसतं. पहिले थोडी वाटते मग नंतर नाहीच वाटत. आणि वाटली तरी काय? आपण तोडायचेच असे नियम. ह्या असल्या फालतू नियमांना ही माणसं उगीचच संस्कार-बिंस्कारसारखी मोठ्ठाली नावं देतात. ह्या असल्या साखळदंडांची बंधनं आजिबातच झुगारून द्यायची आपण. जो जेवढ्या लवकर ती झुगारून देतो तो तेवढ्याच लवकर मोठा होतो? मग आपण सगळं आपलं स्वतः ठरवायचं. कशाची फिकीर नाही कुणाची पर्वा नाही. आपलं आयुष्य, आपले नियम आणि फक्त आपलं जग.

काय्य? काय बोलतोयेस तू श्रीदादा? मला तर काहीच नाही कळलं.

जाऊ दे. तुला आपोआपच कळेल सगळं. फक्त डोळे आणि कानाचे काटे चालू ठेवायचे आणि मेंदूला चावी देत रहायची कायम बस्स!

काय्य? कुठल्या मेंदुची चावी?

काही नाही गं! सांगितलं ना! कळेल तुला सगळं हळूहळू. तू जा बरं आता. दिवाळीसाठी आईबरोबर आपल्या गावाकडच्या घरी जाणारेस ना तू उद्या? पॅकींग नाही करायची का तुला? जा बरं.

मी लहाने आणि मला तुझ्या गोष्टी कळत नाहीत म्हणून तू घालवतोयेस ना मला?

ए काही पण! मी कशाला घालवू. आणि सगळंच तर कळतं की गं बयो तुला. हुश्शारचेस तू. त्या कोपिष्ट वाळकेश्वरापेक्षाही हुश्शारेस! हॅ हॅ हॅ.

ही ही ही... ए दादा तुला एक विचारू?

काय गं?

तू का रे कधी जात नाहीस गावाकडच्या घरी? ते तर तुझंच घर आहे ना? मग आम्ही दरवर्षी दिवाळीला जातो तर आमच्याबरोबरही येत नाहीस. सुटी असली की नुसता मित्रांबरोबर कुठेकुठे ट्रेकींगला जातोस. अभिदादाला तर तिथला शेणाचा वाससुद्धा आवडत नाही आणि तिथे त्याला रात्री अंगणात जायची पण भिती वाटते म्हणून तोही येतच नाही.
पण तू तर तिथेच मोठ्ठा झालास ना? मग तुलाही नाही आवडत तिथे? पण मला तर खूप आवडतं आणि आज्जी पण आहे ना तिथे. फक्त मोठ्या काकांची खूप भिती वाटते. पण काकू मस्तये. ती आणि आज्जी काय काय मस्त मस्त करून खायला घालते मला माहितीये का तुला? आणि मग सारखं तुझ्याबद्दलपण विचारत असते काकू आणि आज्जी. का रे येत नाहीस तू? खरंच नाही आवडत तुला तिथे?

मला तर सॉलीड आवडतं गं मने तिथं, आपलं मोठ्ठं घर, हिरवीगार शेतं, शेणामातीचा वास भरभरून राहिलेला गोठा, प्रत्येक पोळ्याला मी स्वतःच्या हातांनी रंगवलेली बैलगाडी सगळं खूप म्हणाजे खूप्पच आठवतं. तुला माहितीये तिथे आपल्या वाड्याच्या मधल्या चौकाच्या देवघराबाहेर मोठ्ठा झोपाळा आहे की नाही त्याच्यावर बसूनच मी रोज अभ्यास करायचो, अभ्यासच काय जेवण, खेळ, झोप सगळंच झोपाळ्यावर.
कधी झोका हळू हलतोय आणि मी झोक्यावर लोडाला टेकून एक पाय दुसर्‍या पायावर टाकून पानिपतचा रणसंग्राम वाचतोय. कधी पालथं पडून डोकं बाहेर काढत दोन्ही हातात पुस्तक धरून घसा फाटेस्तोवर ओरडत कविता पाठ करतोय तर कधी नुसतीच मांडी घालून गणितं सोडवत बसे आणि तेव्हा झोपाळा तसूभरसुद्धा हलायचा नाही. मग शेतातून बैलं येतांना त्यांच्या गळ्यातल्या घंट्या वाजल्या की मी पुस्तक टाकून त्यांना चारा टाकायला गोठ्यात पळून जाई. मग आईने झोपाळ्यावर माझं ताट ठेऊन हाक मारली 'श्रीरंग ए श्री....' की मी पळत येऊन झोपाळ्यावरच जेवायला बसे.
मग आजी ओरडे...'लग्न झाल्यावर पण झोपाळ्यावरंच संसार थाटशील काय रे झोपाळवेड्या'... आणि मी तोंडात घास असतांनाच जोरात ओरडून म्हणत असे 'हो थाटीन की, तू आण माझ्यासाठी झोपाळवेडी बायको शोधून' मग मला हमखास ठसका लागे आणि तो ऐकून बाबा तिरीमिरिने मला दंडाला धरून खस्सकन खाली ओढत नि भिंतीला टेकवून बसवत अणि काही न बोलताच रागारागाने बैठकीच्या खोलीत निघून जात. तेव्हा त्यांचे डोळे बघितले की मला प्रचंड भिती वाटे. मग आजी पुन्हा मला तिच्याबरोबर झोपाळ्यावर बसवून घास भरवत असे मग आई आणि आजी जेवायला बसल्या की मी पूर्ण वेळ झोपाळ्यावर पडून वाड्यातल्या चौकातून दिसणार्‍या आकाशातल्या चांदण्यांकडे बघत बसे आणि झोपाळ्यावरच झोपून जाई.

तुला मोठ्या काकांची भिती वाटते म्हणून तू जात नाहीस का मग गावाकडे?

नाही गं वेडे! मला नाही वाटत आता त्यांची भिती, पण नाही जात मी.

का पण?

अर्रे!!!!!!!!..... तू पण हेकटच आहेस की गं वाळकेश्वरासारखी.

ए काय रे श्रीदादा!.....जा नको सांगू! पण मला माहितीये तू का नाहीस जात गावी.

अच्छा! तुला माहितीये?

हो मला माहितीये.

हो का? मग सांग बरं मी का गावी जात नाही ते.

जा! मी कशाला सांगू? तुला विचारलं तर तू काहीच सांगत नाहीस मग मीच का सांगू.

अगं पण तुला जे माहितीये ते तू मला सांगितलंस तर मी तुला सांगू शकेन ना की तुला माहितीये ते बरोबर आहे की चुकीचं.

मला माहितीये ते बरोबरच आहे!

कशावरून?

ह्यावेळी गौरी गणपतीला आम्ही सगळे गावी गेलो होतो की नाही तेव्हा मी काकूला आणि आईला ऐकलंय बोलतांना. आजी फुलवाती करत होती आणि मी आजीच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपले होते, पण मी खरीखरी नव्हते झोपली काय, नुसतीच डोळे मिटून पडले होते.

मग?

मग तेव्हा काकू आईला सांगत होत्या, 'श्री महिन्यातून एकदा न चुकता आम्हा दोघींना पत्र लिहितो, फोन करतो पण ह्यांना साधा नमस्कारही लिहित नाही की साधं तब्येतीचं क्षेमकुशल विचारीत नाही. आताशी कुठं मिसरूड फुटलंय तर एवढा राग येतोय अजून तर गंगा लांब वहात जायचीये ह्याची. ते वडीलधारे आहेत आता वडीलधार्‍यांनीच पोरासोरांना धाकात नाही ठेवायचं तर कुणी ठेवायचं. शेतकी शिक्षण काय वाईट आहे का तू सांग? गावातल्या मोठ्मोठ्या बागायतदारांची त्याच्या बरोबरची पोरं पण गेलीच ना शेतकी कॉलेजात? आता ह्यांच्यामागं हा वाडवडिलांचा एवढामोठा जमीन-जुमला त्यालाच बघायचाय ना मग डोक्यातलं खूळ बाजूला ठेऊन निर्णय घेतला असता तर कशाला सगळ्यांची मनं दुखावली असती?'

मग आई म्हणाली, 'ताई तुम्ही पण असं कसं म्हणता? आपला श्री त्या बागायतदारांच्या पोरांसारखा कुणीही आहे का? तुम्हाला अजूनही त्याच्या बुद्धीमत्तेचा अंदाज आलेला नाहीये. अहो तिकडे कॉलेजातसुद्धा त्याच्याबरोबरीच्या शहरी मुलांपेक्षा हुशारीत दोन पावलं पुढेच आहे तो. त्याचे प्रत्येक परीक्षेतले मार्कच सांगतात तसं. त्याला चंद्र तार्‍यांच्या गणितातच आवड आणि गती आहे तर करू देत ना त्याला त्याच्या मनाप्रमाणे, तुम्ही का त्याला नांगराला जुंपायला निघाला आहात. हे सांगत होते की त्याला त्याच्या आवडीच्या खगोलशास्त्र विषयात चांगल्या शास्त्रज्ञ लोकांना ऐकायला, भेटायला मिळावं म्हणून त्याचं कॉलेज त्याला खास डेहराडून ला कुठल्याश्या कार्यक्रमासाठी पंधरा दिवस पाठवणार आहे.'

मग काकू म्हणाल्या, 'अगं बाई हे कधी ठरलं. का काका-पुतण्यांना इकडे कळवणं जरूरीचंही वाटत नाही अताशा?'

मग आई म्हणाली, 'ताई, खरं सांगू का मला काय वाटतं! ह्यांनी जेव्हा भाऊंजीची परवानगी नसतांना शेतकी कॉलेजात न जाता सिव्हील ईंजिनियरींगसाठी शहरात जायचं ठरवलं ना! तेव्हापासूनच भाऊजींची ह्यांच्यावर नाराजी आहे, आणि त्यात भरीसभर म्हणून श्रीनेपण काकाच्या पावलावर पाऊल ठेऊन घर सोडलं. त्यासाठी भाऊजींनी ह्यांना काही बोलून दाखवलं नसलं तरी मनोमन ह्यांनाच जबाबदार धरलं. जणू ह्यांनीच श्रीला फूस लावली.
फक्त शेतकी व्यापांमध्येच अडकून पडल्यांमुळे भाऊजी आणि ह्या दोघांच्या विचारसरणीत आलेली प्रचंड तफावत आणि कायमच गडी माणसांना कह्यात ठेवण्यासाठी भाऊजींच्या वागण्याबोलण्यात जो एक कठोरपणा जोपासला गेला आहे ना त्यामुळे लहानपणापासूनच श्री वडिलांपेक्षा काकाच्या फार जवळ आहे आणि त्याला वडिलांच्या कायम धाक दाखवण्याच्या स्वभावपेक्षा काकाचे स्वतंत्र विचार आवडतात हेही एक कारण आहेच. भाऊजींनी दिवसरात्र ज्यांच्यासाठी कष्ट करून ज्यांना मोठं केलं त्या दोघांनीही केलेल्या अपेक्षाभंगाची जागा टोकाच्या नाराजीनं घेतली आणि त्याचे परिणाम असे मनं दुखावण्यात झाले.'

तेवढ्यात आजी बोलली, 'हुष्षार आहेस हो सूनबाई...अगदी बर्रोब्बर ओळखलंस बघ. झाडून सगळे हेकेखोर आहेत. आपणच सांभाळून घ्यायचंन काय. गावात काय अन शहरात काय? बाईचा जन्म असतोच सगळ्यांची मनं सांभाळण्यासाठी, आपल्याला कोण विचारतो? आपलं मन कुठं अडकलंय आणि कुठं तुटतंय कोण बघतो? तुझा पोरगाही तुझ्यावर अशीच वेळ आणतो की नाही बघशीलच. बाकी परमेश्वर बघतोच आहे'

मग आई म्हणाली, 'हो आई! आता काळच तसा झपाट्याने बदलतो आहे. जशी परिस्थिती येत जाईल तशी मनाची तयारी होत जाईलंच पण काळानुसार हे बदल होणारच हे आपण पक्कं समजून घेतलं पाहिजेच.'

मग काकू म्हणाल्या, 'सीमा अगं केवढी हुषार आहेस तू? केवढं छान बोलता येतं तुला मनातलं आणि तेही कुणालाही न दुखावता. मलाही हे सगळं थोडं थोडं कळतं पण असं स्वतःला समजावता वगैरे येत नाही बाई. मग ह्यांचा सदाच चढलेला पारा आणि त्याची मनाला हात घालणारी पत्र वाचली ना की गोंधळून जायला होतं आणि मग अजूनच चिडचिड होते.'

मग तेवढ्यात काका आले आणि आई आणि काकू गेल्या चहा करायला.

असं होयं! लबाडच आहेस की तू. मोठ्यांच्या गप्पा चोरून ऐकत्येस.

छे! चोरून थोडीच ऐकल्या मी! पण बघ मला माहितीये ते बर्रोबरंच आहे की नाही. तुला काकांची भीती वाटते आणि ते तुला आवडत नाहीत म्हणून तू गावी जात नाहीस ना.

हो हो आहे की बरोबर! माताहारीचा अवतारच आहेस ना तू!

माता-हारी ? ही कोणती देवीये?

देवी? अगं माताहारी काय देवी नव्हती ती तर मोठी....जाऊदे! तेही कळेल तुला मोठं झाल्यावर.

पण श्री दादा, मग आता तू कधीच नाहीस जाणार का रे गावी?

जाईन गं!

पण कधी?

मला नाही माहित, जाईन! जेव्हा जावसं वाटेल तेव्हा.

पण मग तुला आपोआपच कसं जावसं वाटेल.

ए बाई! बास ना आता! का मला पिडत्येस अशी?

ठीके! जाते मी.

अग्गं!! काय पण लगेच घुर्र येतं गं तुला. मी 'जा ईथून' असं म्हणालो का?

मग तूच म्हणालास की नाही 'मी पिडते तुला म्हणून'.

अगं मने! एवढं सरळ सरळ नाहीये गं सगळं. तू लहान आहेस म्हणून तुला सगळे सांगतात की नाही, 'मने असं कर, इथे बस, तिथे जाऊ नको', मग तुला वाटत असेल कधी मी मोठी होणार आणि मला वाट्टेल तसं करायला मिळणार. वाटतं की नाही.

हो मग वाटतं तर. पण असं नुसतं वाटून थोडीच मोठं होता येतं?

पण आपण मोठे झालो ना मने, की लहानपणी आपल्याकडे हट्टं करून पाहिजे ते मिळवण्याची जो अधिकार असतो ना तो संपत जातो आणि त्याच्याजागी येत जाते 'शहाणा मुलगा बनण्याची' एक मोठ्ठी जबाबदारी.
लहानपणी आपल्याला हट्टं करूनही एखादी गोष्टं मिळाली नाही तर आपण दोन दिवस रडून तिचा नाद सोडून देतो की नाही आणि त्या गोष्टीला विसरूनही जातो. किती सोप्पं असतं तेव्हा आपल्यासाठी असं आवडती गोष्टं विसरून जाणं. पण मोठं झाल्यावर तेच विसरणं तेवढं सोपं नाही रहात गं. खूप त्रास होतो, रडून गोंधळही घालता येत नाही की रुसूनही बसता येत नाही. मग एक तर जबाबदार शहाण्या मुलासारखं मुकाट गोंधळ न घालता सगळं निमुटपणे ऐकून घ्या किंवा बंड करा. मी दुसरा मार्ग निवडलाय इतकंच.

मला कधीच नीट नाही रे कळत श्रीदादा तू काय बोलतोस ते.

कळेल गं मने तुला, तू अजून थोडी मोठी झालीस ना की नक्की कळेल.

मग मलापण कधी आईने सांगितलेलं आवडलं नाही किंवा कितीही हट्टं केला तरी बाबांनी माझं ऐकलं नाही आणि मला तुझ्यासारखं माझ्या आवडत्या गोष्टीला विसरता आलं नाही तर मी काय करणार. मी कुणाकडे जाणार.

हे हे! तू कशाला कुठे जात्येस बाई. तुझे आईबाबा चांगले समजूतदार आहेत की, ते घेतील तुला समजून आणि तुला हवं ते नक्की करू देतील.

कशावरून? काका-काकू पण चांगलेच तर आहेत. फक्त काका खूप कडक आहेत इतकंच. मग त्यांनी कुठे तुला हवं ते करू दिलं? आणि मग तुला ईकडे यावं लागलं.

अग्गं! कमाल आहे तुझी. सांगितलं ना तुला, तुझे आईबाबा तुझं नक्की ऐकतील म्हणून.

पण मग त्यांनी नाहीच ऐकलं तर?

त्यांनी नाहीच ऐकलं तर मी आहे ना, तू मला सांग तुला काय हवं ते.

बघ हां श्रीदादा?

अगं तू मागून तर बघ मने. माझा शब्द आहे हा माझा. आपण कधीच कुणाचं मन मोडत नाही. आपल्या राज्यात सगळे सुखी असतात. 'जो जे वांछेल तो ते लाहो' ऐसा ऊसूल है ये तेरे श्रीरंगभाईका, समझी.

बघ हां श्रीदादा? नाही म्हणलास तर.

अगं माग गं तू फक्त. मागून मागून अशी मागणारेस तरी काय तू?
आई तुला मैत्रिणींबरोबर सिनेमाला जाऊ देत नाही म्हणून म्हणशील ह्रितिकचा सिनेमा दाखव, नाहीतर एखादा नवीन फॅशनचा ड्रेस पाहिजे म्हणशील. सर्दी झाली नसती तर तुझं ते आवडतं गुलकंद फ्ल्वेवरचं आईस्क्रीम मागशील. नाहीतर अजून काय काकांच्या गाडीतून कुठंतरी फिरवून आण म्हणशील. असणार तरी काय दुसरं तुझ्या लिस्ट मध्ये अजून.

छ्या! ह्यातलं काहीच नक्कोय मला. हे असलं सगळं तू त्या वाळकेश्वराला विचार.

वाळकेश्वराला जाऊदे कोकणात. तुला काय पाहिजे ते सांग.

मागू?

माग तर आता!

तू येतोस उद्या आमच्याबरोबर गावी?

गुलमोहर: 

बढीया!! मजा आली वाचायला. शीर्षक बघून आधी वाटल की मेधाची गोष्टचा भाग २ आहे की काय.
खूप दिवसांनी लिहीलस चमन, आता सुरूवात केली आहेस तर लिहीत रहा.

छान आहे Happy

पण ताईचे वय, समज नि संवाद यांचा मेळ नाही बसतै<<< अगदी, ती जेव्हा श्रीदादाला आज्जी, आई आणि काकु तले संवाद सांगते तिथेच फक्त. बाकी मस्तचं

मस्त रे चमन्..पण....ती जेव्हा श्रीदादाला आज्जी, आई आणि काकु यांच्यातले संवाद सांगते हेच फक्त पटत नाही.

जरा जास्तच महात्त्वाच्या डिटेल्स दिल्या आहेत तिने....

लाजोच म्हणण पटतय............बाकी मस्तच लिहीलय.........शेवट फार गोड आहे....अन्त भला तो सब भला........!

मस्त..
आधी मला श्री ईमॅजेनरी असेल अस वाटलं..

MAST

Chhan