पावसाळ्यातील आठवणी

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 21 May, 2011 - 02:28

पावसाळ सुरु व्हायला अद्याप १५ दिवस बाकी आहेत. सर्वांनाच पहिल्या पावसाची प्रतिक्षा लागलेली आहे.
तसाही पावसाळा ॠतु, हा ऋतु सर्वांचा आनंदी ॠतु असेल यात शंका नाही. या ऋतुत आपल्याल्या आलेले अनुभव, घेतलेला आनंद यावर जरुर लिहा.
ज्यांना गंभीर अनुभव आले त्यांनीही जरुर लिहावे

गुलमोहर: 

पाऊस...

काय धम्माल विषय मुकू.....

काय काय लिहावं? मला विशेष अश्या आठ्वणी नाहीत... पण त्याची वाट मात्र पाहते मनापासून दरवर्षी..

खूप खूप आनंद होतो, तो येणार असला की... त्याचा मोकळा, ढाकळा स्वभाव भारी आवडतो, स्वतःजवळ राखून ठेवायची व्रुत्तीच नाही त्याची... रितं होईस्तोवर बरसतो..... Happy

मुकुने या धाग्यावर लिही असं विपुत सांगितले. म्हणुन आठवायला लागले.
तशा खुप गोष्टी आहेत पावसातल्या. पाऊस पाचवीलाच पुजलेला. आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या वाईट घटनांचा साक्षीदार आहे तो. त्यामुळे जवळ जवळ प्रत्येक कवितेत तो कुठेतरी डोकावतोच. माझा जन्मच मुसळधार पावसात झाला. धुळ्यासारख्या कायम दुष्काळी प्रदेशात त्या वर्षी पांझरेला सर्वात मोठा पुर आला होता. इतका की मोठ्या पुलावरुन पाणी वाहु लागले म्हणुन ती तारीख त्या पुलावर कोरुन ठेवण्यात आली. Sad

दिल्लीचा पाऊस मला नाही आवडला. थोड्याशा सरी येतात नि लगेच रस्ते कोरडे होतात. त्यानंतरच्या जमिनीवर येणा-या वाफा आणि उकाडा भयानक असतो.
ताम्हिणी घाटातला उभा आडवा तिडवा कोसळणारा पाऊस वेड लावतो.... आणि त्या ही पेक्षा वेल्ह्याचा.
पावसाने धुतले गेलेले रस्ते, डोंगर... भातशेतीत सर्वदुर पसरलेला चहा, रस्त्याने दिसणा-या छोट्या छोट्या खेड्यातली गुडुप झालेली घरं, एखाद्या झाडाखाली जनावरांना घेउन निथळत असलेला गुराखी.
अशा वेळेस लाँग ड्राईव्हला जायचं.. तेही बाईकने! (बाईकची मजा फोर व्हिलरमधे नाही.) भाजलेली मक्याची कणसं, टपरीवरचा चहा आणि खेकडा भजी! अहाहा... वेडा आहे पाऊस!!! Happy

संध्याकाळी कधी कधी भरुन आलेलं मळभ जीवघेणं ठरतं...ढग कुठेतरी दूर जाउन रिते होतात आणि इकडे आकाशात पिवळाई पसरते. आभाळ जरा मोकळं होतं आणि आपण सुटकेचा निश्वास टाकतो.

जाता जाता हे काव्य/ गद्य/ पद्य : बाबांना उद्देशुन आहे.

तुम्हाला आठवत असेल बाबा
पावसाने हजारदा तुमची सोबत केलीये!
भर पावसात २ तास उभा असलेला
तुमच्या सामानाचा ट्रक नि ...
घरात एकत्र रहाण्यास मिळालेला नकार!
एकत्रित रहाण्यसाठी चाललेली तुमची
क्षिण धडपड... नि भावांचा नकार!
आईच्या डोळ्याला लागलेली संततधार
नि तुमच्या डोळ्यात विरलेला पाऊस
अन मग तुमची घर मिळवण्यासाठी धावपळ
तेवढ्या अवधीत मिळालेले ते अर्ध्या भिंतींचे घर
तिथेच आईचं माझ्यावेळचं बाळंतपण!

अन मग त्यानंतर तुम्ही निर्माण केलेलं विश्व...
आयुष्यात स्वतःच्या हिंमतीवर बांधलेली तीन घरं!

नंतरही मला आठवतं ...
तुम्ही म्हणायचे
दर ११ वर्षांनी तुमची बदली होतेच
पावसाळ्यात!
जायच्या सहा महिने आधीपासुन तुमचं चालु होतं
"चला अकरा वर्ष झालीत इथे, घर बदलायला पाहिजे"

२००९ च्या एप्रिलमधे तुम्ही हे घर बदलुन
एकटेच गेलात, तिसर्‍या जगात ...
रुखरुख वाटली असेल ना?
ह्या वेळेस पाऊस नाही सोबतीला!

तुमचा अंदाज चुकला बाबा!
रोखुन ठेवले होते आम्ही त्याला, पापण्याआड!
तुम्ही गेल्यावर कोसळला होता तो
मुक्तपणे...तस्साच आडवा तिडवा!!!

'कळविण्यास अत्यंत दु:ख होते की'...
हे शब्दही भिजुन चिंब झाले होते!
तुम्हाला कळवायला हरकत नाही आता
सर्वांनी सांभाळुन ठेवलय त्याला..मनात!

चार्ली चॅप्लीनचं एक वाक्य आठवलं इथे:
"I always like walking in the rain, so no one can see me crying."

खालची कविता वाचताना खरच हुंदका दाटुन यायला लागला आहे.
सहकारी कॅबिन मधे बसलेले आहेत, तो विचारतो आहे, डोळे का पानावले म्हणुन, मलाही शब्द फुटत नाहीत.
एवढी नात्यातील माणसे निष्ठुर का व्हावी?

माझे पावसाचे खूप भन्नाट अनुभव आहेत.
वादळ आणि पाऊस हे माझे जन्मापासूनचे (अर्थातच माझ्या) प्रियकर आहेत असं म्हणायला पूर्णच वाव आहे..

१) १२ वी ला असताना मी क्लासेस करुन करुन एवढी कंटाळलेले की वाटायचं एकदा तरी आजारी पडावं. तो अख्खा पावसाळा मी जवळ रेनकोट असूनही भिजत काढला. रोजच्या रोज गाडीवर भन्नाट भिजायची मी. त्यावेळी चांगले लांब केस होते, ते पुसायचेही कष्ट क्वचितच घ्यायची. पण च्यायला आमचं नशीबच फुटकं. काही झालं नाही. Sad

२) ताम्हणी घाटात पाऊस थोडा सरत आल्यावर मारलेली ट्रीप.. रिमझिम पाऊस, खूप आभाळ, हिरवी-पिवळी भातशेती, थंडगार वारं, शिजलेल्या भाताचा असतो तसा वास सगळीकडे भरुन राहिलेला, हवेतला मस्त ओलावा, मस्त रमतगमत चाललेली बाइक.. ताम्हिणीतला हा पाऊस खूपचदा अनुभवला.

३) माळशेज घाटातला पाऊस.. सकाळी कोरडं आभाळ, बाईकवरुन रमतगमत, फोटो काढत तिथे पोचायला दुपारचे २ वाजवले. सकाळी ६ ला निघूनही. थोडा थोडा पाऊस पडायला लागला तसे परत फिरलो. येताना मुसळधार पावसात ५ तास बाइक वर भिजलो. हॉस्टेल लिमिट असल्याने रात्री ९ च्या आत परत पोचायचच होतं. पुण्यापर्यंत सोबत होता तो पाऊस. सगळं मिळून ३५० किमी ड्राईव्ह होता. दुसर्‍या दिवशी जी काही वाट लागलेली.

४) सिंहगडाची प्रत्येक वेळची एक आठवण आहे वेगळी.

हे थोडक्यात लोक्स.. Happy

आर्ये, खरच तुझ्या कवितेने माझ्या डोळ्यातून पाऊस बरसला. Sad
आणि बाहेर बघ, निसर्गालाही त्याची बाधा झाली.

अशीच एक आठवण. कोकणातच होतो. पवसाळ्याचे दिवस होते. आम्ही शाळेत गेलो होतो. वडील त्याच शाळेत शिक्षक होते. ते काही कारणाने दुपारनंतर अर्धा दिवस रजेवर होते. दुसरया दिवशीही त्यांची रजा होती. दुसरया दिवशी आम्ही शाळेत गेलो. ( ते त्यांच्या कामाला गेले) शाळेतील सगळी मुले आमच्याकडे
विचित्र नजरेने पाहू लागली. आम्हाला काहीच समजेना.
वडील कामासाठी बाहेर गेले होते. तिथली ही माणसे त्यांच्याकडे पाहून कूजबूज करू लागली. आणि एका बाईने वडीलाना सरळ विचरलेच "काय वो गुरुजीनु तुमी तर काल व्हावून गेला व्हता ना? मग आता कसं आलात?" वडील सर्दच झाले. नंतर मात्र संतापले व त्या बाईला म्हणाले, " काल वाहून गेलो, तर आत्ता काय मी भूत आहे? तुम्हा लोकाना नाही उद्योग, काही तरी अफवा पसरवीत बसता." घरी आल्यावर आम्हाला हा किस्सा सांगितला. मग आम्हाला कळलं सर्व मुले आम्हाला असे का पहात होती ते. Lol

पहिला पाऊस हा पहिल्या चुंबनासारखा असतो....कितीही वेळा अनुभवला तरी त्याची खुमारी कायमच राहते Happy

मी मुक्ता.. , आशु धन्यवाद
आज्जे मास्तर करारी असतील Proud

पाउस महाबळेश्वरचा ,
मार्केट मध्ये चालताना आपल्यावर पाउस पड्तो पण ५ फुटापुढे गायब.
माणसे रस्त्यातुन बाजुला जाताच रस्ता मोकळा . पाउस थाम्बताच माणसे रस्त्यावर.
स्ट्रोबेरि क्रिम आणि मका, वेन्ना लेक
पन्हाळ्याचे आपल्या आसपास वावरणारे ढ्ग आणि ढ्ग + धुक्याचे मिश्रण लाजवाब

Pages