राजाराम सीताराम.....भाग २....... पुढचे चार दिवस

Submitted by रणजित चितळे on 1 June, 2011 - 01:34

ह्या आधीचे ...........

प्रवेश

पुढचे चार दिवस

पुढचे चार दिवस आम्हाला आमचे सीनियर्स दहा दहा मुलांचा गट करून रोज सकाळी नाष्टा झाल्यावर चेटवोड हॉलवर घेऊन जायचे. आमच्या कडून सविस्तर वेगवेगळे फॉ्र्मस भरून घ्यायचे. ज्यातले मला काहीच कळत नव्हते. कळत नव्हते म्हणण्या पेक्षा कळून घ्यायची इच्छा नव्हती. रॅगिंग होत नव्हते त्या मुळे एक प्रकारचे कुतूहल वाढले होते. रॅगिंग सुरू झाले असते तर एका अर्थाने त्या बाजूने मन मोकळे झाले असते. आता मनाचा एक कोपरा रॅगिंग बद्दलचा विचार सतत करण्यात गुंतला असल्या कारणाने मी कोठे सह्या करत आहे व कसले फॉर्मस् आहेत ह्या बद्दल जाणून घ्यायचा मला अत्यंत कंटाळा आला होता. ढोबळ मानाने ते फॉर्मस् असे होते

... प्रशिक्षणात काही उणे पुरे झाले तर घरच्यांना निदान इन्शुरन्स मिळावा ह्या हेतूने आयुर्विमा,
... दुसरा प्रशिक्षण पूर्णं झाले तर पुढची २० वर्ष सैन्य सोडणार नाही अशी प्रतिज्ञा असलेला कागद होता,
... तिसरा कागद प्रशिक्षण अर्धवट सोडून निघून किंवा पळून गेलो तर झालेला खर्च देऊ असे आश्वासन देणारा होता,
... तदनंतरचा कागद प्रशिक्षणात काही कारणाने मृत्यू ओढवला तर कमावलेला पगार कोणाला द्यायचा ह्या संबंधीचे इच्छापत्र (हा फॉर्म भरताना क्षण भर अंगावर काटा आला),
... अजून एका पत्रकावर सही घेतली की ज्यात लिहिले होते अशा प्रकारचे काहीतरी लिहिले होते. पुढे जर आढळून आले की मी सुपूर्त केलेली पदवी व मार्क्स नंतर करण्यात येणाऱ्या तपासणीत बरोबर निघाली नाहीत तर मला प्रबोधिकेतून काढून टाकले जाईल व खोटे कागदपत्र दिली म्हणून कारवाई होईल,
... पोलीस चाचणीमध्ये चारित्र्या बद्दल जर काही आक्षेपहार्य आढळल्यास काढून टाकले जाईल व कारवाई होईल ती वेगळीच ह्याची नोंद अशा अनेक कागद पत्रांवर सह्या घेतल्या गेल्या.

कोर्स संपल्यावर परत करायच्या बोलीवर आम्हाला प्रत्येकांना सायकली देण्यात आल्या. सायकलचा लागणारच कारण प्रबोधिका साधारण दीड हजार एकरांमध्ये पसरलेली आहे व एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायला सायकल सारखे दुसरे वाहन नाही. सोपा, स्वस्त, टिकाऊ पण वेगवान असे गुण दुसऱ्या कोठल्याच वाहनात नाही. शिवाय सायकलचा उपयोग प्रभावी शिक्षेत कसा होऊ शकतो ते पुढे आम्हाला समजणार होते. मग आम्हाला शोपिंगसेंटर मधल्या ठराविक दुकानातून कोर्स मध्ये लागणारे तऱ्हे तऱ्हेचे गणवेश, बूट, पोषाख घेऊन दिले गेले. तद्नंतर, त्या चार दिवसातल्या एका सकाळी आम्हाला सीनियर्सनी सायकल वरून आयएमएची सफर करवली. कोठे काय आहे ते दाखवले. परेड ग्राउंड, पिटी ग्राउंड, विपन ट्रेनिंग स्टॅन्ड, स्विमिंग पुल, शॉपिंगसेटर, क्लासरुम्स, दवाखाना, हॉस्पिटल, मेस, स्टडियम, ऑडिटोरियम, जिमनॅशियम, घोड सवारी साठी वेगळी जागा, फायरिंग रेंजेस कोठे कोठे गेलो आम्ही कधी मध्येच चहाच्या बागा लागायच्या तर कधी जंगल लागायचे. त्या वेळेला आम्हाला खरी कल्पना आली आम्ही केवढ्या मोठ्या संस्थेत आलो आहोत ह्याची. आयएमए मध्ये प्रशिक्षण घ्यायला आलेला जंटलमन कॅडेटसचे गट केले जातात. साधारण ४० जंटलमन कॅडेट जिथे राहतात त्याला प्लॅटून म्हणतात. अशा चार प्लॅटूनची एक कंपनी बनते. चार कंपन्यांचे बटालियन होते. आयएमए मध्ये चार बटालियनस आहेत. प्रत्येक बटालियनचे पिटी ग्राउंड, ड्रिल स्क्वेअर, क्लास रूम्स वेगवेगळे. इमारती पूर्वीच्या भारदस्त व भव्य. अंतरं लांब लांब. प्रत्येक इमारत छान रंगलेली. स्वच्छता तर टोकाची. रुंद आखलेले रस्ते. नियमित पणे निट झाडलेले. मोठमोठाली ट्रेनिंग फील्ड्स. मोठमोठाली पिटी ग्राउंड्स व ड्रिल स्क्वेअर. मी मानेकशॉ बटालियनच्या मॅक्टीला कंपनीच्या फोर्टीनथ् प्लॅटून मध्ये होतो. रुम नं ७. मॅकटीला कंपनी टॉन्स नदी किनारी होती. तिनचारशे यार्डावर नदी किनारा लागायचा. जर हा कोर्स करत नसतो तर त्या अतिशय सुंदर निसर्ग दृश्याचा लाभ घेतला असता. बाकी सगळ्या बटालियनस व आमच्या क्लासेस कडे जायचे म्हणजे चढाव चढून जावे लागायचे. जवळ जवळ १०० मीटरचा चांगलाच चढाव लागायचा. सायकलवरून बळेच उतरावे लागायचे इतका चढाव. त्या उलट सायकल वरून त्या उतारावरून येताना भुर्रकन येता यायचे, मजा यायची.

आता रॅगिंग बद्दलचे कुतूहल जाऊन ते अजून का सुरू होत नाही त्याचे कुतूहल अधिक वाटायला लागले होते. कोण करील कसे करील व आम्हाला काय काय करावे लागेल. रॅगिंग केव्हा एकदा सुरू होईल असे वाटत होते, ह्याला कारण असे की रॅगिंग बद्दलचे गुपित काय आहे ते समजून घ्यायचे होतेच व मनात एक अटकळ होती की रॅगिंग जेव्हा सुरू होईल तेव्हाच संपेल ना, त्या मुळे रॅगिंग संपण्यासाठी तरी ते सुरू होईलच पाहिजे होते. त्या वेळेला हे कोठे माहीत होते की आयएमेतले रॅगिंग कधी संपत नाही, कोर्स पूर्णं होई पर्यंत चालूच राहते. फक्त त्या रॅगिंगची नंतर सवय होते व म्हणून मग त्याचे काही वाटेनासे होते इतकेच.

आम्ही नवे बकरे भारतातल्या वेगवेगळया ठिकाणाहून आलो होतो. अगदी म्हणतातना काश्मीर ते कन्याकुमारी व गुजरात ते मणीपूर, अगदी तसेच. माझी मराठी डेहराडून एक्सप्रेस मध्येच संपली होती होती, कारण कोणीच मराठी दिसत नव्हते त्यात. नेहमीच मराठी वातावरणात वाढलेला मी, जेव्हा दाखल झालो तेव्हा पासून माझी बंबय्या हिंदी व इंग्रजी मधून हळू हळू संभाषणाला सुरवात झाली व बाकीच्यांची ओळख होऊ लागली. सगळेच खरे म्हणजे हरवलेले व बावचळलेले पण दाखवण्यासाठी बेडकाच्या गोष्टी सारखे उगाचच छाती फुगवून चालणारे. आमचे चार दिवस हे सगळे प्रकार चालले होते. मेस मध्ये नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण व्हायचे.

मेस मध्ये आमच्या साठी कोपऱ्यात वेगळे टेबल लावले असायचे. बाकीचे सीनियर्स दुसरी कडे जेवायचे. आयएमए मध्ये साधारण एक ते दीड वर्षाचा कोर्स असतो. काही मुले राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीए, खडकवासला येथून येतात, काही इंजिनियरिंग करून येतात. एनडीए व इंजिनियरिंग करून येतात त्यांचा कोर्स एक वर्षाचा असतो व काही बिएस्सी, बिकॉम, बीए करून आलेल्यांचा कोर्स दीड वर्षांचा असतो. त्या मुळे सीनियरच्या दोन फळ्या असतात आपल्या डोक्यावर, पाहिली फळी ज्यांचे सहा महीने झाले त्यांची व दुसरी ज्यांचे एक वर्ष झाले त्यांची. सैन्यात सिनीयॉरीटी जोपासतात, जपतात व त्या प्रमाणे सैन्याच्या फळ्या पुढे चालवतात.

चार दिवसाचे आमचे आयएमए दर्शन संपत आले. चवथ्या दिवशी संध्याकाळी आयएमेतली पुढची रूपरेषा समजावून सांगण्यासाठी सिनीयर्सने आमचे 'फॉल इन' घेतले. फॉल इन म्हणजे तीन पंक्ती करून आडव्या फळीत एकामागेएक असे उभे राहायचे. आम्ही सगळे मधल्या आवारात जमा झालो. आम्हाला आमचे सगळे गणवेश आणायला सांगितले होते. प्रत्येक गणवेश कसा घालायचा, कोणत्या वेळेला घालायचा हे आमच्या सीनियरने शिकवले व दाखवून दिले. आयएमएतले पोषाख तरी किती प्रकारचे. एक नूर आदमी दस नूर कपडा ह्या म्हणीचा अर्थ तेव्हा कळला.

dplus4.jpg

पिटी परेड साठी पांढरा बनियन – गंजीफ्रॉक, पांढरी अर्धी चड्डी व पांढरे कॅनव्हासचे बूट. आयएमएतल्या रोजच्या क्लासेस साठी ऑलिव्ह ग्रीन रंगाचा शर्ट हा 'ओजी' रंग, ऑलिव्ह ग्रीन रंगाला थोडक्यात ओजी असे म्हणतात तो रंग पुढे सैन्यात जिथे तिथे दिसतो. ओजीचा खरा अर्थ काही दिवसाने मला कळणार होता. त्या ओजी शर्टावर उजवीकडे खिशावर नावाची छोटी पाटी. काळ्या पाटीवर पांढऱ्या रंगाने नाव कोरलेले असायचे. शर्टाच्या कॉलरवर ब्रासच्या रोमन अंकात टर्मचे बिल्ले, पॅन्ट अशी चढवलेली की पट्ट्यावर जिथे शर्ट दिसायला लागतो त्या भागात शर्टाची फक्त तीन बटणे दिसली पाहिजेत, पॅन्टवर आयएमएचे बक्कल असलेला काळा जाड कातड्याचा पट्टा, डोक्यावर आयएमएच्या स्टील ग्रे रंगाची बॅरे. आयएमएत डोक्यावर घालतो त्या टोपीला बॅरे म्हणतात. त्यावर आयएमएचा ब्रासचा बिल्ला शोभून दिसतो. खांद्यावर आयएमएच्या ब्लड रेड आणि स्टील ग्रे रंगाच्या एपलेटस्, खाली ऑफिसर पॅटर्नचे काळे जोडे. ह्याच गणवेशात जर काळ्या ऑफिसर पॅटर्न शूज ऐवजी ड्रिल शूज चढवले व पॅन्ट व जोडे जेथे मिळतात तेथे काळी पट्टी ज्याला इंग्रजीत एंकलेट असे म्हणतात तसे बांधले म्हणजे ड्रिल रीग तयार झाला. एंकलेट मुळे उठावदार दिसतो पोषाख. आयएमेत ड्रेसला रीग म्हणतात. ड्रिल शूज चामड्याचे असतात व नडगी पर्यंत येतात. टाचेला १३ खिळ्यांनी घोड्याची नाल ठोकलेली असते. ते जोडे घालून चालताना लक्षवेधी खाड खाड आवाज करतात त्या ठोकलेल्या नाले मुळे. त्या जोड्याची लेस लांब असते. लेस बांधताना ती दुमडली गेली नाही पाहिजे म्हणजे छान दिसते. ड्रिलसाठी खांद्यावर रायफल. आऊट डोर ट्रेनिंग साठी कॅमोफ्लॅजचा शर्ट व पॅन्ट. शर्ट खोचून त्यावर कापडाचा जाड वेब बेल्ट. पाठीवर स्मॉल किंवा बिग पॅक, कमरेला पाण्याची बाटली व खांद्यावर रायफल. पायात डिएमएस शूज. ड्रिल शूज सारखेच फक्त टाच रबराच्या सोलची बनवलेली असली कि झाले डिएमएस बूट. डिएमएस बूट असले म्हणजे जंगलातून जायला बरे पडते. पॅन्ट व बूट जेथे मिळतात तेथे बॅन्डेज बांधल्या सारखी कापडी 'ओजी' रंगाची पट्टी बांधावी लागते एंकलेट सारखीच असते फक्त येथे त्याचा उपयोग जंगलातून चालताना किडे, साप, विंचू ह्या पासून वाचवण्यासाठी होतो. अशी पट्टी बांधण्याने किडे बुटांमध्ये घुसण्याची शक्यता दुरावते. वरती जॅप कॅप. गेम्स परेड साठी पांढरा टीशर्ट, पांढरी अर्धी चड्डी व कॅनव्हास शूज. जेवणासाठी मुफ्ती ड्रेस. मुफ्ती मध्ये पांढरा फुल शर्ट व स्टील ग्रे कलरची पॅन्ट असते. त्यावर आयओमएचा टाय व पायात ब्रोग शूज. हा झाला उन्हाळ्याचा मुफ्ती ड्रेस, हिवाळ्यात त्यावर कोट येतो. विपन ट्रेनिंग साठी अमेरिकनं खाकी रंगात डांगरी, डिएमएस शूज, स्मॉल पॅक पाठीवर, कमरेला पाण्याची बाटली, डोक्यावर जॅप कॅप व खांद्यावर रायफल असे ना ना प्रकारचे पोषाख.

फॉल इन मध्ये उभे होतो तेव्हाच आमचा एक सीनियर - ज्युनियर अंडर ऑफिसर ज्याला जेयुओ म्हणतात तो जेयुओ भुल्लर कडाडला आणि म्हणाला की इतके दिवस तो आम्हाला बघत होता आम्ही कसे जेवतो, कसे सायकलवरून जात होतो, कसे चालत होतो, कसे बोलत होतो व त्याच खड्या आवाजात आम्हाला कळवण्यात आले....

युअर इटिंग हॅबिटस्, युअर एटीकेटस्, युअर टर्न आऊट. नॉट एक्सेप्टेबल एटऑल. अट्टरली एट्रोशियस.
प्यूsssट्रीड. यु डोंट इव्हन नो हाऊ टु विश द टाइम ऑफ द डे टु युअर सीनियर्स.
एट धिस रेट यु विल गो बॅक होम, डबल द स्पीड यु हॅव कम.

आम्ही एकदम शांत.

फ्रॉम टुमॉरो यु आर जंटलमन कॅडेटस एंड यु विल बिहेव लाइक ए जिसी. जिसी म्हणजे जंटलमन कॅडेट. त्यावेळे पासून मी आकाश काशिनाथ शिरगावकर चा जिसी आकाश काशिनाथ शिरगावकर झालो किंवा मित्रांमध्ये नुसतेच आकाशी.

आम्हाला दुसऱ्या दिवसा पासूनचे रुटीन समजावून सांगण्यात आले. आयएमएत 'समजावणे' नसते फक्त आदेश असतात व ते पाळायचे असतात. जेवताना काट्या चमच्याने कसे जेवायचे त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. आयएमएत सायकली नेहमी दोन स्तंभात चालवायच्या, दोन सायकल स्वार पुढे एकमेकांच्या शेजारी व बाकीचे सहा त्यांच्या मागे. आठ सायकलींचा एक स्क्वाड होतो. जर एकटा जिसी असेल तर एकटे सायकल वरून नाही जायचे, मग सायकलचे हॅन्डल धरून पळत जायचे. सायकल नसेल तर जिसीने दोन स्तंभात आठ आठचा स्क्वाड करून जायचे. आयएमेत कधी चालायचे नाही फक्त डबल्स म्हणजे नेहमी जॉगिंग करतच जायचे. कोणताही अधिकारी दिसला की स्क्वाड मधल्या पुढच्याने जोरात स्क्वाड साssssवधान चा इशारा देताक्षणिक बाकीच्या सगळ्यांनी सायकलवर बसल्या बसल्या स्वतः ताठ होऊन सायकलचे हॅन्डल धरलेले कोपऱ्यात वाकलेले स्वतःचे हात सुद्धा सरळ करायचे, तो अधिकारी गेला की शेवटचा सायकल स्वार स्क्वाड विsssश्राम असे ओरडला की स्क्वाड मधल्या सगळ्या जिसीजने सायकली पूर्ववत चालवण्यास लागायचे.........

रात्री बारा पर्यंत आम्ही सगळे उभे होतो व आमचे सीनियर्स आम्हाला वेगवेगळे नियम सांगत होते. बारा वाजता आम्हाला सोडले. नाऊ गो टू बेड एंड वि वॉन्ट लाइट्स ऑफ बाय ट्वेल्ह थर्टी. गेट रेडी फॉर प्री मस्टर एट फोरथर्टी टुमॉरो मॉर्निंग.

मी माझ्या रुम नं ७ मध्ये पोहोचलो, पटकन कशीबशी दुसऱ्या दिवशीची तयारी केली व गादीवर आडवा झालो. रहदारी नाही, आवाज नाही सगळी कडे सामसूम. त्या निरव शांततेचा भंग जवळच वाहणाऱ्या टॉन्स नदीच्या पाण्याच्या खळखळाटांनी होत होता. माझ्या खोलीच्या खिडकीतून लांबवर मसुरीचा पहाड दिसत होता. त्यात लुकलुकणारे दिवे बराच वेळ गादीवर पडल्या पडल्या पाहत राहिलो. दुसरा दिवस उजाडूच नाही अशी आर्त प्रार्थना देवाजवळ करता करता कधी झोप लागली कळलेच नाही.

(क्रमशः)
http://rashtravrat.blogspot.com
http://bolghevda.blogspot.com

गुलमोहर: 

मस्त चालु आहे.... आर्म्ड फोर्सेस मधले अनुभव वाचायला, ऐकायला नेहमीच मजा येते, आणि कितीही माहिती मिळाली तरीही कुतुहल कधीच शमत नाही....पुढच्या भागाची वाट बघत आहे..

रणजीत साहेब... गणवेशाचे वर्णन वाचून एन.सी.सी. चे दिवस आठवले.. बूट पोलिश पासून सर्व काही चमकवणे आठवले. मजा येतेय वाचायला..

बिएस्सी, बिकॉम, बीए करून आलेल्यांचा कोर्स दीड वर्षांचा असतो.
>>तोच तो कोर्स.. मला एन.सी.सी. B cert. B grade मधून यायला चान्स होता पण मेडिकलमध्ये बाहेर जावे लागले.. Sad नाहीतर दीड वर्षाचा कोर्स करायची इच्छा होती...

जिसी आकाश काशिनाथ शिरगावकर ??
>>>> इथे नाव रणजीत चितळे असे का? की तिथे वेगळे नाव दिले जाते.. गुप्ततेसाठी???

चिमुरी, अखी, हिम्सकूल, मित, .अदिती., पल्ली, पक्का भटक्या यांना प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

पक्का भटक्या - माझे नाव रणजित चितळेच आहे पण येथे कथेच्या स्वरुपात आहे आत्मकथेच्या नाही. त्यामुळे हे नाव ठेवले आपले असेच जास्त स्वतंत्र्य मिळते म्हणून. पण अविनाश वडगावकर (मुंबईचा) होता माझ्या बरोबर पठ्ठ्या १६ वर्षाने आर्मी सोडून गेला न्युझिलंडला कायमचा.

मस्तच सुरू आहे...युनिफॉर्मचे वर्णन, तिथली शिस्त फारच छान वाटतीये...अर्थात वाचायलाच...प्रत्यक्ष त्यातून जाणार्यांचे काय हाल होत असतील

वाचते आहे. मघाशी दिलेला प्रतिसाद दुरपाळाने खाल्ला वाटतं. पुन्हा लिहिते.

>> एकटा जिसी असेल तर एकटे सायकल वरून नाही जायचे >> हे असे का? सुरक्षेच्या कारणावरुन वगैरे?

मंजूडी, निधप, आशुचॅंप, maitreyee, रोहित, रचु, ज्योती, शैलजा आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

शैलजा एकटा जिसी सायकल वरुन जाणे चांगले दिसत नाही. स्क्वाड छान दिसतो. एकटे कोठेही जावे लागत नाही कारण सगळे वेळापत्रक ठरलेले असते - क्लास बंकींग (एक पण) चालत नाही.

मलाही माझे भोसला मिलीटरीचे, एनसीसी कॅम्प्सचे दिवस डोळ्यापुढे आले. खरचं एक वेगळंच शिस्तबद्ध जीवन पण त्यामुळे शरीर आणि मन सतत अ‍ॅलर्ट ठेवण्याचं, वेळेचं व्यवस्थापन करण्याचं ट्रेनिंग अंगी बाणवलं जातं ज्याचा खरंच खूप फायदा होतो.

आपली शैली छान ओघवती आहे. एकदा सुरू केल्यावर त्या वातावरणात स्वतः शिरल्यासारखं वाटतं.

पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.

मस्त लेखमाला.
असं जीवन बघायला, ऐकायला किंवा वाचायलाच chhan वाटतं. प्रत्यक्षात जगायला अवघडच. तेवढी शारीरिक अन मानसिक क्षमता अंगी असायला हवी.
पुढचा भाग वाचायला उत्सुक.

मस्त

(रणजित... तुमचे पाय पाळण्यात सुद्धा खाड खाड सावधाsssन दिसले का काय? तुमच्या नावावरून म्हणतेय Happy
)
तुमची शैली ओघवती आहे, नेमके शब्दं... अगदी मराठीही हुकुमी हाजिर आहेत.
हे वाचणं आनंदाचं आहे. अगदी दिवसाच्या कोणत्याही वेळी वाचलं तरी सगळी मरगळ जाऊन एकदम मार्चिंगसाठी मन तयार होईल... असच वाटतय.
रणजित हे तुमचे अनुभव आमच्याबरोबर वाटून घेण्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुढल्या लेखांची आतुरतेनं वाट बघतो आहोत हे सांगायलाच नको.

Pages