चंदूचा लेखन प्रपंच !

Submitted by Unique Poet on 14 May, 2011 - 09:19

चंदूचा लेखन प्रपंच !

आपण लेखक व्हावं या विचाराचा किडा चंद्‍याच्या डोक्यात नाशिक मध्ये साहित्य संमेलन झाले तेंव्हापासूनच वळवळत होता , त्या ध्येयासक्त विचारानेच संपूर्ण साहित्य संमेलनाला अथपासून इति पर्यंत एकही दिवस न चुकवता हजेरी लावली होती.जमतील तितक्या लेखकांच्या , कवींच्या स्वाक्षर्‍या संदेशासहित घेतल्या होत्या. मंगेश पाडगावकरांची मुलाखत सोळाव्या रांगेत एका कोपर्‍यात बसून भक्तीभावाने ऐकली होती.पाडगावकरांची स्वाक्षरी घेताना त्यांनी त्याला नाव विचारल्यावर दोन फूट हवेत उडालेला चंदू ," चांगलं काहीतरी लिहीत जा " या उपदेशाने अस्मानापर्यंत पोहोचला.कविवर्यांच्या उपदेशाने भारावलेला चंदू घरी आला , त्याने लगेच जाहीर करून टाकलं, "मी साहित्यात करियर करायचे ठरवले आहे ". चंदूची उदघोषणा ऐकून घरच्यांना पहिल्यांदा चक्करच आली पण मग हा साहित्य संमेलनाचा प्रभाव दिसतोय हे त्यांच्या लक्षात आले , चंदूच्या निश्चयावर तसा त्यांचा विश्वास असल्यामुळे हे प्रकरण काही दिवसांपुरतेच असेल हे त्यांना माहीत होते आणि तसेच झाले. चंदूचा हा ठाम निर्धार काही दिवसातच आलेले गॅदरिंग, स्पोर्टस,कॉलेजचे निरनिराळे डेज यामध्ये बुडून गेला ,त्यानंतर आलेल्या सेमिस्टर मुळेतर त्याला लेखनाचा पूर्णपणे विसर पडला.
वर्षभरानंतर अचानक जेंव्हा कविवर्य विंदा करंदीकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेंव्हा इतर सर्वसामान्य मराठी माणसाप्रमाणेच चंदूची छातीही अभिमानाने दोन इंच फुगली होती . विंदांची स्वाक्षरी आपल्या कडे आहे की नाही हे पाहण्यासाठी चंदूने आपली धूळ खात पडलेली स्वाक्षर्‍यांची वही बाहेर काढली , ती चाळताना एकदम चंदूची नजर पाडगावकरांच्या स्वाक्षरीवर गेली आणि......
त्याला पाडगावकरांचा उपदेशात्मक आदेश आठवला , चंदू हळहळला. अरे ज्या नाशिकमध्ये कविसम्राट कुसूमाग्रज होऊन गेले, ज्या मातीत श्रेष्ठ नाटककार वसंत बापट होऊन गेले , त्या साहित्यभूमी नाशिकमध्ये राहून मला एक ओळ सुध्दा लिहीता येऊ नये, म्हणजे काय ? कधी नव्हे ते चंद्याला आपल्या विचारदारिद्र्याची विलक्षण खंत वाटली.
असो , जे झालं ते झालं यापुढे आता एकच ध्यास , ’ मला चांगलं काहीतरी लिहायचंय ! ’ या जबरदस्त लेखनउर्मिने पेटलेला चंदू लगेच वही-पेन घेऊन लिहायला बसला, पानावर अग्रभागी !! श्रीगणेशाय नम:!! असं ठळक अक्षरात बुध्दीदात्याला बुध्दीदात्याला आवाहन करून पेन वहीच्या पानावर टेकवला पण त्या गणपतीबाप्पाला चंदूची दया काही येईना आणि चंदूला काय लिहावे ते काही सुचेना . त्याने कविता लिहीण्याचा विफल प्रयत्न करून पाहीला पण हे कवितेच्या नावाखाली भयंकरच विचित्र असं काहीतरी घशात अडकल्यासारखं तयार होतंय हे लक्षात आल्यावर चंदूने तो प्रयत्न बाजूला ठेवला आणि तो लिहावं कसं आणि काय याचा विचार करू लागला पण कोणत्याही आधुनिक चाणाक्ष करियरिस्ट विद्यार्थ्याप्रमाणेच चंदूही हूशार होताच , आपण जर लेखक म्हणून करियर केले तर आपले भविष्य काय ? हा प्रश्न त्याला सुरूवातीलाच पडला आणि चंदू भविष्याची सोनेरी स्वप्ने पाहू लागला ........ पहिल्यांदा आपले लेख , कविता , मग कथा वर्तमानपत्रात छापून येतील . त्यानंतर मासिकं , दिवाळी अंकासाठी संपादक आधी अ‍ॅडव्हान्स देऊन कथा , कविता लिहायला लावतील लेखक म्हणून थोडं नाव झालं की पहिलं पुस्तक लिहायचं . पहिलेच पुस्तक सुपरहीट, अनेक आवृत्या , पुढील पुस्तकासाठी काही लाख रूपये मानधन अ‍ॅडव्हान्स-मध्ये घेणार. दीडदोन वर्षातच बंगला, कार नंतर लग्न ! चंद्या एकदम हुरळूनच गेला.दहाबारा वर्षात अनेक कथासंग्रह,कादंबर्‍या,कवितासंग्रह, शेकडो समारंभांचे प्रमुख पाहुणेपद, अनेको जाहीर सत्कार ! पुरस्कारांचा खच ! पुढेमागे एखाद्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद ,जमलंच तर वीस पंचवीस वर्षात एकदम ज्ञानपीठ विजेता साहित्यिक !
हवेत तरंगताना चंदूला ज्ञानपीठ पुरस्कारावरून एकदम आठवलं , मराठीतील तीनही ज्ञानपीठ पुरस्कार अनुक्रमे वि.स.खांडेकर , वि.वा.शिरवाडकर आणि विंदा करंदीकर यांना मिळालेत म्हणजे आपल्याला खात्रीशीर ज्ञानपीठावर दावा सांगायचा असेल तर आपलंही नाव " वि " या शब्दानेच सुरू व्हायला हवंय. हे लक्षात येताच आपल्या आई-वडिलांनी दुरदृष्टीने "वि " वरून काssssssss ठेवले नाही याचा अतिशय विषाद वाटू लागला, मग ती खंत आवरून चंदू आपल्या नावाचे नव्याने बारसं करायच्या मागे लागला. पण त्याला झकास वाटेल असे नाव " वि "वरून लगेच काही आठवेना तेंव्हा ते काम नंतर करायचे ठरवून आधी लिहायला सुरूवात तर करूया या विचाराने चंदू पुन्हा लिहायला बसला.
परंतु टाळक्यात काहीतरी अगोदरच असल्याशिवाय काही लिहीता येत नाही ही ट्यूब त्याच्या डोक्यात अंमळ थोड्या उशीरानेच पेटली. झालं ! चंदू एकाच वेळी दोन दोन वाचनालयांचा सभासद झाला.आयुष्यात केवळ अभ्यासाचे पुस्तक ते ही परीक्षेच्या पंधरावीस दिवस आधी हाती धरणारा चंदू चक्क तासनतास वाचनालयात घालवू लागला , दिवसाला दोन-तीन पुस्तकांचा सहज फडशा पाडू लागला , शिवाय बुध्दीदात्या गणपतीला रोज एकवीस प्रदक्षिणा अथर्वशिर्षासह घालू लागला ; तेंव्हा तर त्याच्या आई-वडिलांना धन्य धन्य झाल्यासारखे वाटू लागले.चंदूच्या या उग्र साहित्यसाधनेत आपलाही थोडासा हातभार लागावा आणि चंदूच्या बुध्दीमत्तेतही थोडीशी भर पडावी या दुहेरी सद्‍हेतूने त्याच्या मातोश्रींनी चंदूला सकाळी बदामाचा शिरा व रात्री काळ्या मनूका भिजवलेलं दूध असा खास बुध्दीवर्धक खुराक सुरू केला.
चंदूच्या या अतिउग्र साहित्यसाधनेला अखेर फळं येऊ लागली. गेल्या दोन महिन्यात चंदूने सुमारे दहा लेख व दोन डझन कविता केल्या होत्या खर्‍या पण चंदूला आणखी लिहीण्यामध्ये रस वाटेना , कारण त्याच्या दुर्दैवाने हे लेख आणि कविता अद्यापही अप्रकाशित होते.पाच ते सहा वर्तमानपत्रांच्या कार्यालयात त्याने आपले सर्व साहित्य स्वहस्ते देऊनसुध्दा कुणीही ते प्रसिध्द करण्याचे धाडस दाखवले नव्हते. त्यामुळे चंदू बिचारा निराश झाला होता.
एक दिवस कॉलेजमध्ये नोटीस लागली की कॉलेज मॅगझीन साठी विद्यार्थ्यांनी लेख व कविता द्यावेत . चंदूने पुन्हा एकदा नव्या उत्साहाने आपले सर्व साहित्य गोळा केले आणि संबंधीत प्राध्यापकांकडे सुपूर्द केले व त्यांना लेखनासाठी काही मार्गदर्शन करण्याची विनंती केली. चंदूचा तो विनम्र भाव पाहून प्राध्यापक महाशय खुश झाले , त्यांनी चंदूला दोन दिवसांनी घरीच बोलवले. सर त्यादिवशी घरी आल्यावर त्यांचे जेवण वगैरे झालं, ते जरा निवांत झाल्यावर त्यांना चंदूची आठवण झाली , पाहूया तरी काय लिहीले आहे त्याने ? असं स्वत:शी म्हणत सरांनी चंदूने दिलेला गठ्ठा उचलला.
’ मराठी साहित्य - इतर भाषांच्या तुलनेत असलेली वैचारिक प्रगल्भता ’
चंदूने रेकॉर्डब्रेक १६ पानी लेख लिहीला होता , शीर्षक पाहून सरांनी तोच लेख वाचायला सुरूवात केली.२/३ तासांचे चिकाटीचे प्रयत्न, ३-४ चहा आणि २ अख्ख्या ऍस्पिरीन रिचवल्यावर कसाबसा तो लेख संपवण्यात सरांना यश आले! अगम्य तुलनांनी खचाखच भरलेला तो लेख वाचून सरांनी कपाळावर हात मारून घेतला , अरे देवा ! ह्या मुलाच्या मुलभूत संकल्पनांमध्येच बदल होण्याची खरी गरज आहे आणि तो झाल्या शिवाय किंवा केल्या शिवाय काय कप्पाळ साहित्याची रचना करेल हा ! त्यांनी एकदाचा तो लेख बाजूला ठेवला.पुन्हा गठ्ठा हातात घेतला, अरे ! कविता दिसतेय,
ही तरी लवकर संपेल बहुधा. त्यांनी वाचायला सुरूवात केली..............

प्रेमाची तहान !

उद्दाम नजरेत फितुर तू चंद्राला
काजळीत बुडालेली अमावस्या !

पाण्याने थबथबणारे चंचल नयन
जणू पावसाळाच नव्याने आलेला !

शुक्राची चांदणी तू भरदिवसा
पांढराशुभ्र कापशी मांजर जशी !

लाजल्या त्या चांदण्या तुला पाहुन
वसंतातली कोकिळा ओरडली !

बाकी सर्व मुली डोमकावळ्या
केवळ तु एकच जगत सुंदरी !

पिठूर धुके दवबिंदूनी भरलेले गवत
मला तुझ्या प्रेमाची तहान लागलेली !

ही नवकवी चंदूची प्रतिभा पाहून सर थक्क झाले. बाप रे ! उपमांचे पार भूस्काट पाडलंय या पोराने ! कल्पनांचे चक्क किराणा दुकान उघडले.... अशीच जर अवस्था राहीली तर हे दुकान चालेल कसे ?
तरी...त्या दोन दिवसात त्यांनी चंदूचे सर्व साहित्य निर्धाराने वाचले आणि त्यांना चंदूच्या वैचारिक (अ)प्रगल्भतेची व बौध्दीक अकलेची कल्पना आली. चंदूचे साहित्य का छापले जात नाही याचे कोडेही उलगडले. खरं तर आपली कामं सोडून दुसर्‍या कोणी हे केले नसते, पण प्राध्यापकांना विद्यार्थ्यांविषयी कळकळ होती , त्यातच चंदूची तळमळ खरी आहे हे त्यांना जाणवलं होते त्यामुळे आपले सारं उद्योग तात्पुरते बाजूला सारून त्यांनी ’मिशन चंदू ’आरंभला होता.
दोन दिवसांनी चंदू घरी आल्यावर चंदूच्या अतिनम्रपणामुळे आधीच खुश असलेल्या प्राध्यापकांनी चंदूचे सुमारे चार तास वैचारिक व साहित्यिक प्रगल्भतेवर बौध्दीक घेतले.त्या लेखनातील त्रूटी सांगितल्या. काय वाचावे , कसे वाचावे, दर्जेदार काय असते,चिंतन करणे म्हणजे नक्की काय प्रकरण असते हे समजावले. मग त्यांनी त्याच्या सर्व लेखनात सुधारणा करण्यासाठी साहित्य परत केले.चंदूने घरी आल्यावर लगेच मांडी ठोकली , सरांनी केलेले सर्व प्रबोधन आठवत आठवत आपल्या ग्रेट साहित्य रचनेतील शक्य तितक्या त्रूटी काढून टाकत सगळे काही नव्याने रचून लिहीले.पुन्हा एकदा सरांच्या स्वाधीन केल्या.
आणि काय आश्चर्य कॉलेजच्या मॅगझीनमध्ये चंदूचा चक्क एक लेख व दोन कविता छापून आल्या होत्या , खाली नाव होतं ’चंद्रशेखर धरपडे ’.गेल्या दोन-तीन वर्षात मोजून सहाच लेक्चर केलेल्या, कट्ट्यावरच बहुतेक टाईमपास केलेल्या चंदूला त्याच्या चंदू/चंद्या या नावापलिकडॆ कॉलेजमध्ये फारसं कुणी ओळखतच नव्हतं.त्यामुळे ग्रुपमध्ये पहिल्यांदा कुणाचाच विश्वास बसेना की हे चंदूनेच लिहीलं आहे , चंदू त्यांना पटवून देता देता रडकुंडीला आला शेवटी चंदूने आयकार्ड काढून त्यावरचे नाव व फोटो दाखवला तेंव्हाच ग्रुपने विश्वास ठेवला , अन्यथा चंद्या आणि लेखक ! पोरांनी शपथेवर पैजा लावल्या असत्या. अर्थात चंदूला त्या विश्वासाची किंमत म्हणून २०० रू./- खर्च करून पार्टी द्यायला लागली ती वेगळीच.त्या दिवसापासून चंदूचा भाव ग्रुपमध्ये एकदम वधारला. ग्रुप त्याला चंदू ऐवजी " लेखsssssक " म्हणून हाक मारायला लागला.
आपला पहिला वहिला लेख व दोन कविता छापून आल्याच्या आनंदात चंदूने नव्या उत्साहाने आठवड्याला डझनावारी लेख , कथा , कविता यांचा पाऊस पाडायला सुरूवात केली........................ आणि अखेर एक दिवस चंदूचा एक लेख वर्तमानपत्रात छापून आला. त्या दिवशी चंदूने अख्ख्या कॉलनीत पेढे व त्याचा लेख असलेला पेपरही वाटला. कायम ’चंद्या ’ अशी हाक मारणार्‍या शेजारच्या काकांनी कधी नव्हे ते "काय चंद्रशेखर लेखक व्हायचंय वाटत ?" तसा चंदू चक्क लाजला हो ! आणि दोस्तहो , चंदू आता नव्या जोमाने लिहीतो आहे , कारण शेवटी चंदूला ज्ञानपीठ मिळवायचं आहे ना !
- समीर .पु नाईक

गुलमोहर: 

प्रेमाची तहान !

उद्दाम नजरेत फितुर तू चंद्राला
काजळीत बुडालेली अमावस्या !

पाण्याने थबथबणारे चंचल नयन
जणू पावसाळाच नव्याने आलेला !

शुक्राची चांदणी तू भरदिवसा
पांढराशुभ्र कापशी मांजर जशी !

लाजल्या त्या चांदण्या तुला पाहुन
वसंतातली कोकिळा ओरडली !

बाकी सर्व मुली डोमकावळ्या
केवळ तु एकच जगत सुंदरी !

पिठूर धुके दवबिंदूनी भरलेले गवत

हे भारीये

मस्तच!!! Happy सुरुवातीला विनोदी असलेल्या लेखाने उत्तरार्धात गंभीर स्वरुप धारण केले! लिहिण्याची कळकळ असलेल्या माणसाला न खिजवता त्याला प्रोत्साहन दिल्यास त्याच्यातून एक चांगला लेखक/ कवी घडू शकतो... हा सुंदर संदेश मिळाला!

कीप इट अप... चांगले लिहिता! अजून लिहा! Happy

आणि हो! पु.लंचा सखाराम गटणे आठवला एकदम! Happy

सानी... Happy प्रोत्साहनामुळे खरंच चमत्कार घडू शकतात.....
आपण दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनापासून धन्यवाद...! Happy

" आणि हो! पु.लंचा सखाराम गटणे आठवला एकदम! "
अहोभाग्य.. Happy

मस्त Happy