मानसी घरात शिरली. गेले दोन दिवस अगदी जरूरीचं तेव्हढं आवरून बाबा जिथे शून्यात नजर लावून बसत होते, तिथेच आत्ताही बसले होते... आरामखुर्चीत. आतल्या खोलीत जाताना तिने आशेने बघितलं पण तिच्या नजरेला नजर मिळताच त्यांनी तोंड फिरवलं....
’दार लाव, आत जाण्यापूर्वी’, अतिशय कडवट दुखावल्या स्वरात त्यांनी तिला सांगितलं. तिला माहीत होतं तितक्या वर्षांत ह्या घरचंच काय पण चाळवजा ह्या बिल्डिंगमधल्या कुठल्यास घराचं दार, घरात माणसं असताना लावण्याची पद्धत नव्हती.
मानसी वळली आणि तिने दार लावलं, ’बाबा...’ तिनं बोलायचा प्रयत्नं केला पण तितक्याच कडवट स्वरात ते परत म्हणाले, ’आत जा...’
निमूटपणे मानसी आत आली.
वास्तविक सकाळची नऊ-दहाची वेळ म्हणजे आईची कोण गडबड असायची. बाबा, बल्ल्याचे डबे, कामवालीचं येणं, स्वयंपाक, सगळीच घाई. याक्षणी स्वयंपाकघरातल्या छोट्या पलंगाच्या कडेला ती डोक्याला हात लावून बसली होती.
बल्ल्या तिच्याशी जुजबी बोलून कॉलेजला गेला होता. पण एकूण प्रकाराने तोही बावचळला होता. मानसीने आपले कपडे घेतले आणि आंघोळीला निघाली, ’आई, आंघोळ करून....’
तिचं वाक्य पूर्णं होण्यापूर्वीच आईने ’कर काय हवं ते...’ अशा अर्थाचा हात हलवला.
बाथरूममधे कितीही प्रयत्नं केला तरी तिचे डोळे वहायचे थांबेनात. हातांच्या ओंजळीत चेहरा घेऊन खाली बसताना, तिच्या गुढग्यातून निघालेली कळ मस्तकात गेली... आणि मानसी ताठ उभी राहिली. तिने स्वच्छ डोळे पुसले. आणि आंघोळ उरकली.
कपडे घालण्यापूर्वी, खांद्यावर, डाव्या स्तनावरच्या काळ्या-निळ्या खुणांवर तिने हळूवार हाताने मलम लावलं. घरातला सुती पंजाबी ड्रेस घालून ती बाहेर आली. केस पुसून पंचा दोरीवर वाळत घातला.
’आई, काय मदत करू? भाजी देते चिरून, चालेल?’, मानसीने आईच्या उत्तराची वाट न बघता विळी घेतली आणि चवळीच्या निवडलेल्या शेंगा मुठीत घेऊन मान खाली घेऊन चिरायलाही लागली.
’मदत करतेस बायो? कर. मी सांगते ती मदत करशील?’ गेल्या काही तासांत पहिल्यांदाच फुटलेला आईचा आवाज ऐकून मानसीच्या घशात आवंढा आला. तिने नुस्तीच मान हलवली.
’.... परत जा. त्यांच्याकडे परत जा. लग्नं म्हणजे तुझे खेळ नव्हेत.... एका स्पर्धेत हरल्यावर दुसरीत भाग घ्याला..... एव्हढे उपकार कर आई-बापावर. तुला....’, आईचं बोलणं अजून पूरं व्हायचं होतं.... अर्ध्यावरच मानसीचा हात धसला विळीवर....
तिला कळलंच नाही बहुतेक, पण आई चित्कारली, ’अगं... केव्हढं कापून घेतलस....’
आईच्या बोलण्याकडे लक्षं न देता मानसीने स्वयंपाकघराचं दार बंद केलं, तसाच रक्तं गळणारा हात वर करून दिवा लावला..... आणि... आणि... डोक्यावरून कुर्ता काढला...
ह्यावेळी तोंडावर हात घेऊन आई जागच्या जागी थरथरत बघत राहिली... लाडा-कोडात वाढवलेल्या आपल्या कोवळ्या वेलीवरचे आघात... सहज दिसणार नाहीत असे... जबरदस्तीचे... पाशवी...
खांद्यावर, स्तनांवर दातांच्या खुणा.... मानसी स्थिर नजरेने आईकडे पहात होती. तिने सलवारच्या नाडीला हात घातला....
आई ओरडल्या, ’मने, थांब.... मनू, काय पोरी हे....’ त्यांना पुढे बोलवेना. त्यांनी पुढे होऊन तिला कुशीत घेतली आणि रडू लागल्या.
’कसं होणार तुझं.... कुठे तोंड दाखवणार आपण....’
मानसी वेगाने आईच्या कुशीतून बाजूला झाली. तिचा तोल सुटला. ती तारस्वरात किंचाळली, ’अजून तुला लोक काय म्हणतील ह्याचीच काळजी आहे? अजून? म्हणजे काय झालं की तू माझी काळजी करशील? मेले की? जीव घेतला त्यांनी तर करशील की... मी जीव दिल्यावर?.... बोल ना.... बोल आई.... आई’
बाबा जोरजोरात दार खडखडावत होते., ’काय चाललय? मानसी... दार उघड... दार उघडा आधी’
मानसीने कुर्ता घातला आणि दार उघडलं. बाबांचा आवाज वाढला होता. ’काय तमाशा लावलाय? झालं तेव्हढं पुरे नाही झालं? आता बिल्डिंगमधे शेजार-पाजार गोळा करायचाय..... काय सांगणारेस त्यांना?... काय बोल... लोकांच्या पोरी नवर्याने मारहाण केली म्हणून परत येतात.... माझी पोरगी नवर्याला मारहाण करून....
इतक्यात लोटलेला दरवाजा उघडून शेजारचे वैद्य, गोकर्णं आले. मागोमाग सामंत काकूही आल्या.
’बोल मने... बोल. कुठे तोंड लपवू आम्ही आता? जातीत, नातेवाईकांत जायची सोय राहिली नाही.... नादान.... नालायक... उरावर धोंड बनून रहाणार आहेस... आयुष्यभर... जीव घे आधी आमचा... मग...’, बाबांच संयम संपला होता, तोल सुटला होता. गेल्या दोन दिवसातलं सगळं सगळं गरळ होऊन बाहेर पडत होतं.
मानसीला सगळच असह्य झालं बहुतेक.... कारण क्षणात अख्खी खोली तिच्या भोवती फिरली आणि ती चक्कर येऊन पडली.
’अहो... काय असं... थांबा...’ ह्या पलिकडे आलेल्यांपैकी कुणालाच काही बोलायचं सुचेना.
एकमेकांच्या अडी-अडचणीला धावणार्या ह्या शेजार्यानी मग सगळं जरा ताब्यातच घेतलं. सामंतकाकूंनी कांदा ठेचून लावला. वैद्यांनी बाबांना आपल्या घरी ओढून नेलं. गोकर्णं इथेच थांबले, मिसेस गोकर्णं येईपर्यंत. पंधरा मिनिटांत त्या ही आल्याच.
मानसी तोंडावर पांघरूण घेऊन भिंतीकडे तोंड करून पडून राहिली. हळू हळू कुजबुजत्या स्वरात सामंतकाकू, ललिताकाकू आईशी बोलत राहिल्या, समजावत राहिल्या. एक एक कळलं तशी, ’बरं झालं मुलगी हातीपायी धडपणे मिळाली आपली आपल्याला’ ह्या निर्णयापर्यंत त्या दोघी आल्या. आई अजून नातेवाईकात काय म्हणतील, कसं तोंड दाखवायचं... हेच अधुनमधुन काढत होती.
शेवटी मानसीला राहवेना... ती उठून बसली.
सामंत काकू धावल्या, ’कसं वाटतय मने? तू काही मनाला लावून घेऊ नकोस, हो... आम्ही बघितलीये तुला लहानाची मोठ्ठी होताना... कोण उगाच कशाला नवर्याचं घर सोडून निघून येइल असं..... तू...’
मानसीने त्यांना थांबवलं. ’काकू... हे माझ्या आई-वडलांना पटायला हवय’
’मग? काय चूक सांगतोय? रितीप्रमाणे वागायला नको?... तुझ्या आणि सगळ्यांच्याच भल्याचं सांगतोय, मने...’, आई म्हणाल्या.
’आई... पुन्हा तेच. काय रिती प्रमाणे? कोण ठरवणार रीत? माझा जीव रितीप्रमाणेच जाईल... तेव्हा ...तेव्हा शुद्धीवर येशील की, रितीप्रमाणे गेली पोर... आपल्या घरीच मेली... म्हणून समाधान...’,
सामंतकाकूंनी आवेगाने तिच्या तोंडावर हात ठेवला, ’मने, भरल्या घरात काहीही काय बोलतेस? असं कस अशुभ बोलवतं तुला?’
’काकू, मी अशुभ बोलले? आई-बाबाच बोलतायत, मी फक्तं त्या अशुभाचं फळ सांगितलं... तर मी अशुभ?.. त्यांना मी इथे नको असेल तर...’
’मानसी... मने...’ आई धावली आणि तिनं मानसीला जवळ घेतली.
मानसीने आईच्या मिठीतून सुटायचा प्रयत्नं केला.... तिची धडपड पाहून आईनं अधिकच घट्टं धरली आणि त्याही रडू लागल्या...
सामंतकाकू, ललितावहिनींनी सावरलं कसंतरी दोघींना.
मानसीने आईच्याच पदराने चेहरा पुसला, ’आई... मी सांगते ते ऐक, आधी. लग्नं ठरल्यावर, दोन-तीनदा भेटलो तेव्हा, तेव्हा ही.... मला उगीच वाटलं की अधीरेपणा असेल... पण एका बाजूला असही वाटत होतं की, अगदी दुखवणारच का असायला हवं... साधा किसही...’
’बोलली नाहीस, मने’, आई म्हणाल्या खरं पण त्यांच्याच लक्षात आपलाच हलणारा स्वर आला.
’आई, अशा गोष्टी... अशा गोष्टी... बोलत नाहीत... आणि नाही बोलले तेव्हा काही... मला... मला माहीतच नव्हतं काही...
लग्नं झाल्यावर बाहेर गेलो.... चारच दिवस. मी मैदानी खेळात अनेक बक्षिसं मिळवलीयेत, कराटे शिकलेय, करते... ह्याचा त्यांना आनंद का माहितीये?... सांगायलाही लाज वाटते... पण ऐकच तू.
कारण... कारण अशा मुली... श्शी... छान भरलेल्या असतात म्हणे...
तेव्हाही... श्शी... कसं सांगू... थोडी मारहाण, जबरदस्ती, पाशवीपणा केल्यशिवाय मजा येत नाही, म्हणे... काकू, माझ्या महिन्याचा गोंधळ झाला म्हणून जरा सुटले, नाहीतर...’
ललिताकाकू आणि सामंतकाकू दोघीही शहारल्या.
आईंनी काहीतरी शब्दात मांडायचा प्रयत्नं केला, ’अगं... असतात काही नवरे असे... जरा नवीन नवीन आहे म्हणून... थोड्या दिवसांनी होईल शांत... पण म्हणून तू हात उगारायला नको...’
’काय? तू मारलस नवर्याला?’, सामंतकाकू आणि ललिताकाकूचेही डोळे विस्फारले.
’नाही. मी फक्तं माझं संरक्षण केलं. सरळपणे करायचं तर मी तयार आहे... पण वाट्टेल तशी इजा केलेली चालणार नाही असं सांगितल्यावर..... चिडले.
आणि... आणि त्यांनी हात उगारला... आई, काकू देवाशप्पथ सांगत्ये.. मी आधी हात उचलला नाही. माझ्याच नकळत माझे हात उठले आणि त्यांचा हात चेहर्यावर पडायच्या आधीच मी हातांच्या कैचीत अडकवला... कराटे! सेल्फ़ डिफ़ेन्सचा पहिला काटा....
हे इतकंच झालय. मी हात उठवला नाही. मी त्यांच्यावर वार केलेला नाही...’
मानसीच्या स्वरातल्या आवेशापेक्षा तिचे डोळे खरं बोलण्याची साक्ष देत होते.
’आई, हे आम्ही परत आल्यावर झालंय... त्यांनी आधी केस धरले माझे... तेव्हाच मी नाही म्हटलं. वाट्टेल तसं दुखवणार असलात तर चालणार नाही म्हणताना माझ्या थोबाडीत देण्यासाठी हात उचलला... मग माझेही हात आपोआप उठले आणि... आणि मी फक्तं अडवला त्यांचा प्रहार, आई, तुझी शप्पथ...
आधी हे माझ्याच नकळत झालं... पण मग मी सावध झाले. हाताचा उपयोग नाही म्हटल्यावर त्यांनी कोपर्यातली धुणं वाळत घालायची काठी घेतली हातात.
आई, माझा नवरा मला लग्नानंतर अवघ्या आठव्या दिवशी मारण्यासाठी हातात धुण्याची काठी घेतोय?... सुशिक्षित म्हणवणारं घराणं ना हे? आपल्या कुणाच्यातही न ऐकलेली गोष्टं ही....
घडलं ते मला इतकं आश्चर्यचकित करणारं होतं की... माझं लक्षं उडालं आणि गुढग्यावर बसली काठी...’
बोलता बोलता मानसीने सलवार गुढग्यापर्यंत वर खेचली. अजून मेंदीचा रंग उतरला नाही असे गोर पान पाय... गुढग्यावर टरटरून सुजलेला दाट काळा-निळा व्रण होता...
’अग्गो... ’ म्हणताना ललिताकाकूंच्या डोळ्यात पाणी आलं. आई उभ्या होत्या तिथेच मटकन खाली बसल्या.
’पण पुढचा वार नाही करू दिला, मी. त्यांना कळायच्याही आधी काठी माझ्या हातात होती.... चालती हो असं म्हणून नेसत्या कपड्यांवर बाहेर काढली मला... तू... तुम्ही समजून घ्याल म्हणून इथे आले.... माझं घर समजून.
काय करू आता? माफी मागून जाऊ परत? पाय चाटू त्यांचे? रोज मार खाऊ? असंच जोर-जबरी, घाणेरडं, उबग आणणारं वैवाहिक म्हणायचं म्हणून तसलं आयुष्य जगू?’
’मने, काही सामंजस्याने घेऊया. आम्ही मोठी माणसं त्यांची समजूत घालू गं... पण असं एकदम तोडून टाकून. आमचे संस्कार...’
आई आपलं वाक्य पुरच करू शकल्या नाहीत. मानसीने त्यांना मधेच तोडलं, ’आई, संस्कार म्हणजे नक्की काय म्हणायचय तुला? जे आज्जी-नानांनी तुला शिकवलं तेच ना?... मी सुद्धा माझ्या संस्कारांच्या बळावरच करतेय हे... वयाच्या पाचव्या वर्षापासून कौतुकाने मैदानी खेळ आणि कराटेला कोणी घातलं? प्रसंगी स्वत:ला नवीन कपडे घेतले नाहीत पण कराटेची फी भरत होते बाबा. जपानला जायच्या खर्चासाठी स्वत:च्या बांगड्या मोडणारी तूच ना?
बल्ल्याला आणि मला मुलगा-मुलगी असं वेगळं वेगळं भासवू दिलत नाहीत कधी... ’कराटे शिकायला नव्हे, आता शिकवायला जातेय माझी मुलगी’ हे अभिमानाने सांगता ते खोटं?
फार पूर्वी एकदा बल्याला त्रास देणाऱ्या त्या चाळीतल्या टारगट पोरांबरोबर झुंजले त्यावेळी डोळ्यात पाणी आणून बाबांनीच ना माझी पाठ थोपटली होती?... तुला भय नाही... समर्थ आहेस स्वत:चं संरक्षण करायला, असं बाबाच ना म्हणाले होते तेव्हा?’
स्वत:चं रक्षण फक्तं घराबाहेरच करावं लागेल... घरातले जपतात एकमेकांना... हेच माहीत होतं आजवर.
कायम बाबांनी कसं तुला जपलय ते बघितलय, मी आई... माझे हे संस्कार कसे पुसू ते सांग आधी.... कशाला असल्या समजुतीत वाढवलत मग मला? बोल ना?’
आईसकट सगळ्याच नि:शब्द झाल्या.... इतक्यात इतकावेळ आड दाराबाहेर उभं राहून सगळं ऐकणारे बाबा घरात शिरले, त्यांच्याबरोबर पापाजी, वैद्यकाका, तेलंगही आले.
’मानसी, हे सगळं ऐकल्यावर तुला परत जा म्हणणार नाही. तेव्हढा निर्दय बाप नाही मी. मगाशी बोललो ते त्राग्याचं होतं पोरी..... आजच्या काळात न ऐकलेलं न घडलेलं घडतय आपल्या घरात.... तुझी मोठी आत्त्या... तिचा छळ केला सासरच्यांनी, मी लहान होतो. पण मोठा झाल्यावरही कधी ’ये सगळं सोडून, मी बघतो तुला’..... असं म्हणायला धजावलो नाही...
मोठा धाडसाचा निर्णय आहे तुझा. सगळ्यांनाच जड जाणारय...’
दोन दिवसांत पहिल्यांदाच सरळपणे, मायेनं बोलणारे बाबा बघून मानसीला हुंदका फुटला. तरी तो तसाच जिरवत ती म्हणाली, ’बाबा, हे सगळं खूप दु:ख देणारं आहे... दुर्दैवी आहे. तुम्हा सगळ्यांचं म्हणणं असेल तर मी परत जायला तयार आहे.... अगदी न केलेल्या चुकांची माफी मागूनही...’
सगळेच तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले, आईंची तिच्या हातावरची पकड घट्ट झाली.
’... पण एकाच अटीवर. त्यांच्या जोरजबरदस्ती आणि मारहाणीला माझ्याकडून विरोध होणार नाही ह्याची मी खात्री देऊ शकत नाही... तो माझ्या रिफ़्लेक्स चा एक भाग आहे...’
’...असं तर, कोणीच...’, नकळत गोकर्णं म्हणायला गेले.
मानसीने मान हलवली,’...बरोबरय, काका. पण माझं हे ठरवून लग्नं आहे. एकमेकांत प्रेम निर्माण होण्यासाठी दोघांनी प्रयत्नं करायला हवेत. त्यांची ही जी काय आहे ती एक विकृती आहे... त्यावर औषधोपचार, मानसोपचार असतील तर ते करून घ्यायला त्यांनी तयार व्हायला हवं... मी मदत करायला तयार आहे.... लग्नं संस्थेवर माझाही विश्वास आहे.... पण अंध विश्वास नाही. बोलाल हे सगळं त्यांच्याशी आणि त्यांच्या घरच्यांशी?’
बाबांनी नकारार्थी मान हलवली... पटूनही हतबल झाल्यावर माणूस हलवतो तशी. ,’मला माहीत नाही. तू करतेयस ते... आपण करतोय ते बरोबर का चूक... माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे आहे हे सगळं...’
इतकावेळ खुर्चीवर बसलेले पापाजी, काठीचा आधार घेत उठले. आपल्याच एखाद्या मोठ्ठ्या काकाच्या किंवा आजोबांच्या अंगावर खेळावं तशी त्यांच्या अंगा-खांद्यावर मानसी खेळली होती. त्यांचे सुखी आणि बाली, दोघेही राखीला न चुकता यायचे.
’चलो अब, अपने अपने घर चलो सब. थकी होगी बच्ची... उसे थोडा आराम करने दो...
दो दो फ़्रंट्सपर लड रही है,.... बाहरवाले बाहरके सही..... लेकीन घरवालोंसेभी मुकाबला?’
बाबांनी चमकून त्यांच्याकडे बघितलं. ’माफ करना, मनूके बाबा. मुझे पता है आपपे क्या गुजरी है... लेकिन कुछ गैर तो नही कर रही बच्ची... अपना सिखाया, धरम पाल रही है, बस्स...
और... खुदको बचाना गैर कबसे हुआ? ऐ?...
एक जमाना था, जब हमारेमे ऐसी बेटियोंकेलिये गुरूसे मन्नत मांगा करते थे... ये तो शेरनी है, शेरनी...’
त्यांच्याकडे अपलक बघणार्या मानसीला त्यांच्या डोळ्यात पाणी तरळताना दिसू लागलं.
’अठ्ठे आ, बेटी. मुझे पता है की तेरी बात सही है. लेकिन जब तुम्हारे अपने नही समज पा रहे वहा....’, त्यांना वाक्य पुरं करता आलं नाही. थकल्या खांद्यांनी पुढे होऊन त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला.
मानसीला आता तिथे बसवेना. ती उठून आत निघून गेली.
पापाजींसह खोलीतल्या प्रत्येकाला जाणवलं त्या आशिर्वादाचं रितेपण ... एखाद्या फोलपाटासारखं आपलं पोकळ अस्तित्वं... आणि आत्ताच आत गेलेल्या ठिणगीची धग...
समाप्त.
सगळ्यांचे
सगळ्यांचे आभार.
दिनेशदा... " तूमची मुलगी नवर्याला मारहाण करते " हे दुसरीकडून कळण्यासाठी हे काही दिवसतरी चालू रहायला हवं नाही?
कथा मनूने नवर्याला परस्पर "हाताळण्या" बद्दल नाहीये. तर कुटुंबसंस्थेतला तिचा विश्वास, तिचा अहिंसक विचार, पण त्याबरोबरच, हिंसा सहन न करण्याचा तिचा स्थायी भाव... ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून ती आई-वडिलांकडे आलिये. हनिमूनहून परतल्यावर अगदी दोन्-चार दिवसातच.
मनूला माहितीये आपल्या आई-वडिलांना किती आणि कसं दु:ख होणारय. पण जे घडतय आणि घडणारय त्यात त्यांचा सहभाग तिला आवश्यक वाटतो.
फक्तं तिच्या अपेक्षेपेक्षा जास्तच "पिळपिळीत" निघाले पालक. म्हणूनच मनू एक "ठिणगी"!
तुम्ही म्हणताय तशी मनू दाखवली असती तर ती "आई-वडीलांना" फाट्यावर मारणारी दिसली असती नाही? आपली मनू तशी नाहिये.
छान...सुंदर कथा!
छान...सुंदर कथा!
>> आणि आत्ताच आत गेलेल्या
>> आणि आत्ताच आत गेलेल्या ठिणगीची धग...
खासच!! सुंदर कथा.
त्यांच्याकडे अपलक बघणार्या
त्यांच्याकडे अपलक बघणार्या मानसीला त्यांच्या डोळ्यात पाणी तरळताना दिसू लागलं.
’अठ्ठे आ, बेटी. मुझे पता है की तेरी बात सही है. लेकिन जब तुम्हारे अपने नही समज पा रहे वहा....’, त्यांना वाक्य पुरं करता आलं नाही. थकल्या खांद्यांनी पुढे होऊन त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला.
मानसीला आता तिथे बसवेना. ती उठून आत निघून गेली. <<<<<<<<<
भरून आलं एकदम.................. !!
वास्तव आहे
दाद स्त्री नसूनही कथा
दाद
स्त्री नसूनही कथा पोहोचली. मन २० वर्षे पुढे गेलं आणि कथेत गुंतत गेलं... मुघल आले, ब्रिटीश आले नि गेले, स्वराज्य आले, समाजवाद आला, गेला, भांडवलशाही आली नि गेली.. पण काही गोष्टी कदाचित बदलतील कि नाही असं वाटलं.
नवरा चांगला मिळाला तर बरं नाहीतर ???
या प्रश्नाला आजही सर्वकालीन, सार्वत्रिक उत्तर मिळत नाही. चांगल्या प्रश्नाला मुळातून हात घातला गेलाय असं वाटलं..
माझी मुलगी अजून खुप लहान आहे
माझी मुलगी अजून खुप लहान आहे पण वाचून अंगावर काटा आला. अशी वेळ कोणत्याही आई बापावर येऊ नये हीच मनःपुर्वक ईच्छा.
दाद, ही पण कथा सुटली होती. आज
दाद,
ही पण कथा सुटली होती. आज वाचयला मिळाली. एखादी कथा लिहताना ते वर्णन जसच्या तस वाचकांच्या डोळ्यासमोर उभ करण्याची क्षमता आपल्या लेखणीत पुरेपुर आहे.
दाद, आजही मुलींना यातून जावे
दाद, आजही मुलींना यातून जावे लागतेय, किंबहुना आज छळाचे मार्ग जास्ती भयावह ही झालेत. याचे जास्त दु:ख वाटते. अजुनही दारच्यांची व घरच्यांची मानसिकता बदलत नाही याचेही दु:ख आहेच. मात्र अश्या मानसी समाजात वाढू लागल्यात हे नक्कीच.
कथा भावली.
मनी सारख्या मुली अगदी बोटावर
मनी सारख्या मुली अगदी बोटावर मोजण्याइतक्याच सापडतील... बाकी संस्कारांच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि उरलेल्या सो कॉल्ड इभ्रतीला घाबरून किंवा आपल्या माहेरी आपल्या इतर भावंडांची लग्न अडू नयेत म्हणून नरकयातना भोगणार्या..
मनूच्या आणि या लेखाच्या रूपात डोळ्यात अंजन घातले जातेय..
स्वत:च्या अस्तित्वासाठी लढणे अपरिहार्य...
लेख चांगला आणि अंतर्मुख करणारा आहे.
दाद, नेहेमीप्रमाणेच नेमके
दाद,
नेहेमीप्रमाणेच नेमके सांगणारा लेख. पण ही सत्यघटना आहे हे कळल्यावर खूप वाईट वाटले. अशा जिद्दी मुलींच्या कथा समाजापुढे नेहेमी यायला पाहिजेत - इतरांचे मनोबल वाढायला मदत होईल.
या बरोबरच "शेवट बदलून - ठिणगी "ची लिंक दिल्यास बरे होईल. - मला स्वतःला तरी ही दुसरी ठिणगी आवडली. (गोनीदांच्या मृण्मयीची - मनूची आठवण झाली - दोन्हीत फरक असला तरी..)
तुझ्या लेखनकलेचे वर्णन करायला काही शब्दच उरले नाहीयेत.....
Pages