फरक...

Submitted by MallinathK on 9 May, 2011 - 04:12

"काय सालं हे ट्रॅफिक! च्यामारी, या पुण्याच्या रस्त्यावर गाडी चालवायची म्हणजे जिवावर येतं बे!" नव्यानेच पुणेकर झालेल्या एका मित्राचा सात्त्विक संताप.

"माहीताय बे, झाली की आता ४-५ वर्ष ! सवय झालीय मला या सगळ्याची, तुलाबी होइल, उगीच कचकच करु नको." अस्मादिक करवादले.

इथे पुण्यात गाडी चालवायची म्हणजे 'भुतली असावी दृष्टी' हे पक्के ध्यानात ठेवावे लागते. कुठल्या क्षणी समोर खड्डा येइल ते सांगता येत नाही. त्यातूनही बचावलोच तर रिक्षावाले असतातच तुमच्या ड्रायव्हिंगच्या कौशल्याची परीक्षा घ्यायला. बाजीराव रोडवरच्या नेहमीच्याच ट्रॅफिकमधून, क्लच आणि गियरच्या करामती करत गाडी पुढे रेटताना आधीच तर डोक्याला शॉट बसतो त्यात कचकच. एका क्षणाचा जरी उशीर केला तरी एखादा रिक्षावालातरी आपलं (सॉरी आपल्या रिक्षाचं) नाक मध्ये घुसवतो नाहीतर कुठलातरी तोंडाला फक्त डोळेच दिसतील असा स्टोल गुंडाळलेला चेहरा आपली स्कुटी मध्ये घुसवतो.

रविवार, सुट्टीचा दिवस! दुपारचे ४ वगैरे वाजले असतील. आम्ही बाजीराव रोडवर होतो. मित्र नुकताच पुण्यात नोकरीला जॉईन झाल्यामुळे मला भटकायला पार्ट्नर मिळालेला. आज दोन्ही स्वार्या गाडी घेउन पुरंदर सर करुन परतले होते. पुन्यात स्वारगेटला आल्या पासुन जे ट्रॅफिक लागले ते लागलेच. ते पाहुन मित्राच्या तोंडाचा पट्टा चालु झाला तो आप्पा बळवंत चौक आला तरी चालुच होता. चौकात येतो न येतो तोच सायरन वाजवत एक अँब्युलन्स आली. सायरन मुळे आणि अँब्युलन्स असल्याने सगळेजण त्या गाडीला साईड करुन देत होते. ती गाडी शेजारी आली तेव्हा त्या गाडीच्या मागे मोकळी जागा मिळाली. डोक्यात एक सहज विचार येउन गेला, या गाडीच्या मागे गाडी लावली तर फटाफट ट्रॅफिकच्या बाहेर तरी पडु. पण क्षणभरच........!

मी अजुन विचार करतो ना करतो तोच मित्राने लगेच गाडी त्या गाडीच्या मागे लावली. पण दुसर्याच क्षणी मी मित्राला गाडी साईडला घ्यायला लावली. तो म्हणाला "अरे अँबुलन्सच्या मागे कमीत कमी पटपट पुढे तरी सरकु. बघ किती फास्ट गेली ती गाडी". हे ऐकल्यावर मी पुर्ण उचकलोच त्याच्यावर. त्याने गाडी गप साईडला घेतली. विचार केला असं काय डोक्यात आले की एका क्षणात की मित्रावर इतका रागावलो ? कदाचीत तो राग मित्रावरचा नव्हता. तो राग होता स्वतःवरचा. एका क्षणात काहीतरी जाणवले होते. कदाचीत फरक जाणवला.

फरक... आतले आणि बाहेरचे. एका दरवाज्याचा फरक. जेव्हा माझी नजर त्या अँब्युलन्सच्या आत पडली, तेव्हा जाणवलेला फरक. कित्ती फरक आहे या दोन्ही ठिकाणात...! आत... आयुष्याशी झगडणारा एक जिव. ज्याचा प्रत्येक श्वास त्याच्यासाठी मोलाचा असतो. त्याच्यासाठीच नव्हे, त्याच्या सोबत असलेल्या प्रत्येकासाठी. हे श्वासांचे नि क्षणांचे गणित बिनसले तर... ? विचारही करवत नाही त्या क्षणांचा. जणु, याचाच ताळमेळ साधण्यांसाठी असलेले ते ऑक्सीजन मास्क, हॉस्पिटल टच असलेले स्पिरिट नि फिनाईल चा विशिष्ट दर्प, भिरभिरणारे-घाबरलेले डोळे, मुकपणे ओघळणारे अश्रु... सारे काही बाहेरच्या जगपेक्षा पुर्णत: वेगळे. त्या झगडणार्या जिवाला धीर देणारा हातातला हातही स्पर्शातुन कित्ती काही बोलुन जातो. तो हात किती मोलाचा असतो हे आपण बाहेरुन काय समाजु शकणार आहोत ? धीर देताना स्वतःलाही सावरणे तितकेच कठीण, आणि हि तारेवरची कसरत करताना मनात चाललेली घालमेल मला त्या चेहर्यावर दिसली. एका क्षणासाठी झालेली नजरा-नजर खुप काही बोलली. मी बाहेरचा आहे हे सांगुन गेली.

वपु अगदी नेमकेपणाने सांगतात, "कोणत्यातरी एका क्षणापर्यंत पेशंट डॉक्टरचा असतो, नंतर तो नियतीचा होतो. कोणत्या क्षणी तो आपला होणार आहे हे नियतीला माहीत असतं, पण तो कोणत्या क्षणी आपल्या हातुन निसटणार आहे हे डॉक्टरला माहीत नसतं."
पण इथे तर नियतीने डॉक्टरला संधीच दिले नाही तर ? म्हणजे लढण्यापुर्वीच नियती डॉक्टरना हरवुन जाणार आणि ही हार कोणाची ? त्या डॉक्टरची... त्या रुग्णाची.. की त्या अँबुलन्सच्या ड्रायव्हरची?

ड्रायव्हर? हो ड्रायव्हरचीही...! असे वाटले की जणु ही गाडी रुग्णाला हॉस्पीटल मध्ये पोचवण्यासाठी धावत नसुन नियती बरोबर स्पर्धा करतीय. नियतीला हरवण्यासाठी, डॉक्टरला एक संधी देण्यासाठी... आणि याचा तसुभरही पत्ता आमच्या सारख्या बाहेरच्या लोकांना नसते. बाहेरच्यांना फक्त एवढंच कळते की कोणीतरी सिरीयस आहे, अँब्युलन्सला वाट द्यावी. हे नेहमीच होतं. प्रत्येक ठिकाणी...., मग ती रोजची जगरहाटी असो वा जिवन-मृत्युचा निरंतर चालणारा खेळ. या क्षणी बाहेर असलेला पुढच्या क्षणी आत असु शकतो. मला वाटतं आपणही कधी तिथे 'आत' असणार आहोत, याची जाणिव जर प्रत्येकाने ठेवली तर.....! हा आत-बाहेर चाललेला लपंडाव किती सोपा होवून जाईल ना?

तेवढ्यात कोणत्या तरी धक्क्याने माझी विचारांची माळ तुटली. मित्र पुण्यातल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांना लाखोली वाहत होता. अँब्युलन्स नजरे पासुन दुर गेली होती. त्याच्या मागे धावणारी एक बाईक दिसली. कदाचीत माझ्यासारखंच अजुन कोणी तरी अँब्युलन्सच्या मागे गाडी लावायचा विचार केला असेल. कदाचीत त्याने आत डोकावले नसेल, कदाचीत तो बाहेरचा आहे हे अजुन त्याला उमगले नसेल. म्हणुन अजुनही तो अँब्युलन्सच्या मागे गाडी पळवतोय.

आजही जेव्हा मला अँब्युलन्सच्या सायरनचा आवाज ऐकु येतो, मला ती भिजलेली नजर आठवते, ते मुकपणे ओघळणारे अश्रु आठवतात, थरथरणारा पण धीर देणारा हात आठवतो. आणि वाटते अँब्युलन्सच्या या स्पर्धेत क्षणभर का होईना नियतीला उशीर व्हावा. एकदा का होईना पण डॉक्टरना एक संधी मिळावी.....!

-- मल्लिनाथ.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चांगलं लिहिलयंस. अशीच माझी एक आठवण आहे एका ड्रायव्हरची. गर्दीत वाट काढता येईना म्हणुन राँग साईडने अँब्युलन्स हाकत तो हॉस्पिटलला घेऊन गेला. तेव्हा तोच जिंकला, पण चार तासांनी नियतीने आपला क्लेम केलाच.. बाबा नाही राहिले. Sad

की जणु ही गाडी रुग्णाला हॉस्पीटल मध्ये पोचवण्यासाठी धावत नसुन नियती बरोबर स्पर्धा करतीय. नियतीला हरवण्यासाठी, डॉक्टरला एक संधी देण्यासाठी... आणि याचा तसुभरही पत्ता आमच्या सारख्या बाहेरच्या लोकांना नसते. >> **

आवडला लेख!

लेख आवडला.
<< वपु अगदी नेमकेपणाने सांगतात, "कोणत्यातरी एका क्षणापर्यंत पेशंट डॉक्टरचा असतो, नंतर तो नियतीचा होतो. कोणत्या क्षणी तो आपला होणार आहे हे नियतीला माहीत असतं, पण तो कोणत्या क्षणी आपल्या हातुन निसटणार आहे हे डॉक्टरला माहीत नसतं." >> Happy अगदी खरं आहे !

मला तर ही वेळच येऊ नये असे वाटते. पुण्यात येणारे नागरिक आपण थांबवु शकत नाही पण किमान ठराविक पुण्यातल्या रस्त्यांवरच्या ठराविक वेळात मंत्र्यांचे येणे, शोभायात्रा किंवा अन्य ज्यामुळे अ‍ॅब्युलन्सला अडथळा होईल असे होऊ नये यास्तव महनगरपालिकेकडे व पोलिसांकडे मागणी करायला हवी. अर्थातच ह्यामागणीला केराची टोपली दाखवली जाणार अश्यावेळी जनहितार्थ याचिका दाखल करावयास लोकमत अजमावण्याची गरज आहे.

मागच्या महिन्यात मा. राष्ट्रपती महोदयांचा पुण्यात मुक्काम होता. नेहमी प्रमाणे सिमला ऑफिस ते युनिव्हर्सिटी चौक या रस्त्याची कोंडी २-३ वेळा झाली. ज्या ऑफिस मधे उशिरा येण्यासाठी पगार कापला जातो अश्या नागरिकांचा पगारही गेला. पण जीव जाण्यापेक्षा सुसह्य म्हणायचे.

आता निवृत्तीनंतर मा. राष्ट्र्पती महोदय कायमचे पुण्याला स्थायिक होणार आहेत असे ऐकले. मग काय काय होईल हे पहावे लागेल. कारण निवृत्त राष्ट्र्पतींना सुध्दा झेड प्लस सुरक्षा असते म्हणे.

सर्वांना धन्यवाद ! Happy
आणि विशालचे, विशेष आभार....

भ्रमर, Sad नियतीच ती शेवटी, एकटे पाडुन डाव साधनारी. एक डाव ड्रायव्हरने जिंकला, डॉक्टरला संधी मिळाली. पण तिला पराभव डॉक्टरच्या माथी मारायचा होता कदाचीत. पेशंट सुधारल्याच्या खुणा दाखवुन, हिरावुन नेते. Sad

डोळ्याला पाणी आलं.
अँब्युलन्सचा आवाज ऐकला ना, की अजुनही कासावीस होते मी. काही आठवणी जोडल्या गेलेल्या. माणूस संपले तरी आठवणी जशाच्या तशा असतात, अगदी काल घडल्यासारख्या.

धन्स पनु.
माणुस संपले म्हणुन आठवणी संपत नाहीत. उलट त्यांचा पसारा होतो. आणि त्या आठवणींच्या पसारा सावरताना आपण एका आठवणींवरुन दुसर्‍या आठवणींकडे, दुसर्‍यावरुन तिसर्‍या आठवणींकडे जातो. जेव्हा भानावर येतो, तेव्हा जाणवते की पसारा अजुन तसाच आहे... पण मला वाटतं तो पसारा तसाच असावा, कारण त्या आठवणीं आपल्याला अनुभवलेल्या त्या प्रत्येक अनमोल क्षणांचा पुन:प्रत्यय देतात.

Pages