हाऊसकीपर भाग २

Submitted by मानुषी on 18 November, 2009 - 06:40

भाग १
http://www.maayboli.com/node/12090
क्रमशः .....

विमानतळावर विशाखा, मन्दार, हर्षू सगळेच आले होते. विशाखाने आईला धावत येऊन मिठी मारली. " आई.........तू अशी एकटी........तेही जॉब करायला इथे इंग्लंडला येशील........वाटलंच नव्हतं गं! आम्ही बोलावतोय इतके दिवस तर कधी जमलंच नाही तुम्हाला.........पण आई तू चांगला डिसिजन घेतलास. करू देत बाबांना घर मॅनेज......आणि आता विनितलाही चांगली किंमत कळेल आईची."
विशाखाची अखंड बडबड चालू होती. जावई नातूही आनंदी चेहेर्‍याने अवती भवती बागडत होते.

नवं वातावरण......नवा प्रदेश.........तिला स्वप्नभूमीत आल्यासारखं वाटत होतं...सारं काही स्वच्छ, सुंदर, चकचकीत, सुव्यवस्थित पण तरीही अपरिचित! सगळं खूप वेगळं होतं. विशाखाच्या घरी पोचेपर्यंत ती दमून गेली. शनीवारचा दिवस असल्यामुळे सगळे निवांत होते. तिने बॅगा उघडल्याबरोबर सगळे भोवती जमा झाले.
"व्वा sssss ! आई......अगदी मी सांगितलेलीच शेड मिळाअली गं कांजीवरममध्ये! मंदार पाहिलीस का साडी?"विशाखा एक्साईट झालेली होती. नवर्‍याला हाका मारत सुटली.
"विशाखा तुला तर महिती आहे, तुझ्या बाबांना किती इंटरेस्ट आहे खरेदीत. अगं या शेडसाठी मी किती दुकानं पालथी घातली........!आवडली ना तुला मग झालं तर!"लेकीच्या सुखानं तीही सुखावली.
जादूच्या पोतडीतून आल्यासारख्या बॅगेतून वस्तू बाहेर निघत होत्या. चकल्यांची ,थालिपिठांची भाजणी, लोणची, मसाले, डांगर, लाडू, चिवडा.......सगळं कसं जमवलं आणि इथपर्यंत कसं आणलं तिचं तिलाच माहिती. काही लेकीची आवड म्हणून तर काही जावई नातवासाठी!
हर्षू बॅगेत समोर दिसणार्‍या स्वेटरवर झडप घालून तो घाईघाईने त्यात डोकं घुसवत होता.
"आजी मी कसा दिसतो?"हर्षू आजीचं मत घेत होता. स्वता: विणलेल्या स्वेटरमधलं नातवाचं रुपडं बघून तिला अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं. मरून कलच्या स्वेटरवर तिने काळपट पक्षी विणले होते.
सगळ्यात गंमत म्हणजे नातवापाठोपाठ जावईही हसर्‍या चेहेर्‍याने त्याला दिलेला पोलो नेक घालून आला होता. म्हणाला, "आई खूप छान झालंय फिटिंग.........कलरही माझ्या अगदी आवडीचा आहे."
तिला मनापासून हसू आलं.....मुलापाठोपाठ मुलाचे वडीलही नवे कपडे घालून कौतुकानं बागडताहेत.
हे अ‍ॅप्रिसिएशन, ही दाद, हा मोकळेपणा ........याची तिला सवय नव्हती. तिच्या घरात असायचा तो नुसता कोरडा व्यवहार! इथे तिघेहीजण तिच्या भोवती नुसता गलबला करत होते. धमाल चालली होती. तिचा तो दिवस फ़ार छान गेला आणि रात्री तो संपलाही.

ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळी नीरज नमिता मिल्टन केन्सहून आले.
" दोन वर्षांनी पुन्हा बर्मिंगहॅमला यायचा योग येतोय." नीरज म्हणाला.
"हो ना..... आमचा एक मित्र होता इथे चारपाच वर्षे......गेला तो परत भारतात. त्याच्या मुलाच्या मुंजीला आलो होतो." नमिताने नेहेमीप्रमाणे नवर्‍याचं वाक्य पूर्ण केलं.
दोन्ही जोडपी एकमेकांशी ओळख करून घेत होती. इकडे तिच्या मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ माजला होता. परीक्षेला जाणार्‍या मुलासारखं छातीत धडधडंत होतं. तर एकीकडे चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या होता. आयुष्यात पहिल्यांदाच ती पैसे मिळवायला बाहेर पडत होती. तेही या वयात आणि परदेशात! वर ही नोकरी तिने स्वता:च्या हिमतीवर मिळवलेली होती. आजकालच्या मुलांचे होतात तसा तिचाही टेलेफोनिक इन्टरव्ह्यू झालेला होता...........यशस्वी!

तिने मनात खूप प्लॅनिंग केलं होतं. एका वर्षात मिळकत किती होणार, त्यातले नवर्‍याला कर्ज फेडण्यासाठी किती द्यायचे, विनीतला एखाद्या कंप्युटर कोर्सला घालायचं तिच्या मनात होतं...त्याचा खर्च, नंतर उरलेले कुठे कसे गुंतवायचे, स्वता:ला किती उरतात याचं पूर्ण गणित तिनं मांडलं होतं. अर्थातच फायनान्समधे असलेल्या जावयाचीही मदत होतीच. आता तिला स्वयंपूर्ण व्हायचं होतं.
"मिसेस मराठे........आईला वीकेन्डसला कधी तरी पाठवाल ना माझ्याकडे?"विशाखा नमिताला नम्रपणे विचारत होती.
मनू येणार माहिती असल्याने विशाखाने आधीच एक बार्बी डॉल आणून ठेवलेली होती. ती तिने मनूच्या पुढे केली. मनू खूष!
"मिसेस फ़डणीस.....तुम्ही कशाला उगीच त्रास घेतलात.......आधीच इतक्या डॉल्स, इतकी खेळणी पडून आहेत घरात.....मनू , से थँक्यू बेटा...!"नमिताने लगेचच जरा तोरा दाखवला. खरं म्हणजे मंदार विशाखा त्या दोघांपेक्षा जास्त क्वालिफ़ाइड आणि जास्त चांगल्या पोझिशनला होते. पण नमिता तिच्या हाऊसकीपरच्या मुलीशी बोलत होती ना!

अखेरीस तो क्षण आला. डोळे पुसत तिने सर्वांचा निरोप घेतला आणि ती निघाली. मनात एक वेगळीच हुरहुर होती. या आधी तिने बीड परभणी......फार फार तर पुणे मुंबई एवढाच प्रवास केला होता. तोही आपल्या एस्.टी.च्या लाल डब्यातून!
मिल्टन केन्सला पोचल्याबरोबर एकीकडे पाणी पुढे करत नमिताने तिला लगेच घर फ़िरून दाखवलं.
"मावशी, आता तुम्ही घरातल्या कामांची साधारण माहिती करून घ्या......अरे हो.........चालेल ना तुम्हाला मावशी म्ह्टलेलं?" तिच्या हो.....नाही..उत्तराची वाट न बघता नमिता तिला घरातल्या सर्वांचं रूटीन........ऑफिसच्या वेळा......खाण्यापिण्याच्या सवयी याबद्दल सांगत सुटली. कुठे काय ठेवलेलं असतं, तेही सांगून झालं.........डबे वगैरे दाखवले.

हळूहळू तिचं स्वता:चं रूटीन तिनं अगदी पद्धतशीर लावून घेतलं. घरातले सगळे हळूहळू तिच्यावर अवलंबून राहू लागले. सकाळपासून "मावशी चहा झाला का......मावशी माझे सॉक्स कुठायत...मावशी हे घ्या...मावशी ते ठेवा....मावशी मावशी!"दिवसभर तिच्या नावाने पुकारा चालायचा. इतकी वर्षं नीटनेटकेपणानं, काटकसरीनं केलेल्या संसाराचा अनुभव या नोकरीत कामी येऊ लागला. तिचा स्वयंपाकही चविष्ट असायचा. तिच्या हाताला तर चव होतीच. पण ती जे काही करायची त्यात अगदी जीव ओतायची.........सगळं अगदी निगुतीनं, प्रेमानं करायची.

यूकेतल्या लहरी हवामानाशीही तिने हळूहळू जुळवून घेतलं. तिथल्या मायनस टेंपरेचरमध्ये तिच्या साडी, स्वेटरचा काही उपयोग नव्हता. इतरांच बघून व नमितानं सुचवल्याप्रमाणे तिने आपल्या पोषाखातही बदल केला. जरा लाजत संकोचत नमिताने दिलेला ट्राउझर व टॉप तिने घालून पाहिला. तिच्या लक्षात आलं .........खूपच सुटसुटीत.......मुख्य म्हणजे थंडी छान भागत होती. पुन्हा काम करतानाही खूपच कंफर्टेबल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमिताला हा बदल एकदम पसंत पडला.कारण आता तिची मेड........हाऊसकीपर आता एकदम स्मार्ट, चटपटीत दिसायला लागली.
हळूहळू पाठीवरच्या वेणीचंही रूपांतर स्टेप कटमध्ये झालं.
नमिता एकदा म्हणाली सुद्धा, " मावशी तुमची तर कंप्लीट मेकओव्हर स्टोरीच झालीये.........ट्रॅव्हल अँड लिव्हींगवर दाखवतात तशी!"
तिच्यात अमूलाग्र, अंतर्बाह्य बदल होत होता. ती आता अधिक आत्मविश्वासानं वावरू लागली होती. घडय़ाळाचे काटे आणि कॅलेंडरची पानं पुढं सरकत होती. पर्समधल्या पौंडांच्या उबेनं ती सुखावून जायची...........पण........कधी कधी विनीतच्या आठवणींनी मात्र तिच्या पोटात तुटायचं....वाटायचं.."बाळ माझं.... काय कदान्न खात असेल देव जाणे!"कधीमधी सुभाष, विनीत दोघांशी फोनवर बोलणं व्हायचं.
हवेतला थंडीचा कडाका वाढला. आयुष्यातला पहिला हिमवर्षावही तिने इथेच अनुभवला. तिच्या मनात आलं"आता आपल्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा स्नो फॉल.........पुढच्या वर्षी काही अनुभवायला मिळणार नाही असा स्नो फॉल!"सीझनच्या पहिल्या स्नो फॉलला लहान थोर सगळे कसे बाहेर पडून मस्त एन्जॉय करतात हेही ती पहात होती. इथे बर्फात खेळताना वयाचा काहीही अडथळा नसतो हेही तिला जाणवलं. पहावं तो......जो तो मस्त जगतो!

कराराप्रमाणे वर्ष संपत आलं. तिचे परतीचे दिवस जवळ येत चालले होते. एरवी तिच्याशी फारसं न बोलणारा, फार कशातही न लक्ष घालणारा नीरजही आता जवळपास घुटमळू लागला. त्यालाही तिच्याशी संवाद साधण्याची इच्छा होऊ लागली........म्हणायचा, " मावशी, तुमची जायची वेळ आलीये.....पण आम्हाला जड जाणारे".
एके दिवशी असंच नीरज नमिता एकदमच ऑफ़िसातून घरी आले. आल्याआल्या नीरज त्याच्या खोलीत जाऊन झोपला. नमिता जिमला जाण्याच्या तयारीत होती. कपडे वगैरे बदलून आली. जरा नवर्‍याची विचारपूस केल्यासारखं केलं........त्याच्या कपाळावर थोपटून म्हणाली,"डोन्ट वरी बेबी........आय विल बी बॅक विदिन हाफ अ‍ॅन् आवर........ओके? टेक रेस्ट."
नमिता जिमला गेल्यावर ती त्याच्या बेडरूमच्या दाराशी घुटमळली. तिला वाटलंच होतं की नीरजला बरं वाटत नव्हतं.
"या ना मावशी आत.......बसा ना." नीरजचं तिच्याकडे लक्ष गेलं.
"का हो झोपलात? बरं नाही का वाटत?" ती नीरजला अहो जाहो करत असे.
"नाही........फ़ार काही नाही..........जरा डोकं जड झालंय सर्दीनं" नीरज म्हणाला.
ती पटकन वळली. आपल्या खोलीत गेली. बॅगेतून दोन छोटया डब्यातून सुंठ पूड, वेखंडपूड काढली. गॅसवर त्याचा लेप बनवला........हळुवार हाताने नीरजच्या कपाळावर घातला. गरम गरम लेपानं नीरजला जरा हलकं वाटायला लागलं.
"थँक्स मावशी......खूप दिवसात आईचा हात फिरला नव्हता कपाळावरून!.....खूप छान वाटतय."
नीरजला भरून आलं होतं. तिला एकदम काय बोलावं सुचेना. ती आपल्या खोलीत जायला वळली.
"मावशी तुम्ही गेल्यावर खरंच आम्हाला खूप जड जाणारे."नीरज बोलत होता म्हणून ती थांबली.
पुढचं प्रपोजल मात्र तिला अनपेक्षित होतं.पण खूप जिव्हाळ्यापोटी नीरजने हे प्रपोजल मांडलं होतं.
" मावशी तुम्ही रहा ना इथेच.......एकदा घरी जाऊन सगळयांना भेटून या पाहिजे तर.........मी तिकिटे काढतो तुमची." नीरज खूप मनापासून बोलत होता.
"नाही हो..........आता मला जायला हवं. माझं घर आहे तिकडे.............माझी माणसं माझी वाट पहात असतील आता."असं म्हणून ती त्याच्या खोलीतून बाहेर आली. बाहेर छानपैकी हिमवर्षाव चालू होता. सगळं सभोवताल सफेद रंगाचं होऊन गेलं होतं.

काम करता करता ती विचार करत होती,"खरंच कुणी माझी वाट पहात असतील का? माझी उणीव भासली असेल का कुणाला?" मनूसाठी वरण भात लावला. तीही आईबरोबर जिमला गेली होती. कुकरच्या शिट्टीनं तिची तंद्री भंगली. तरी मनाचे खेळ चालूच होते.
परत त्याच लातूरला जाऊन परत तेच कंटाळवाणं, रसहीन, रटाळ जीवन जगायचं........आपली तयारी आहे ना नक्की? असंही वाटत होतं कारण आता एका वेगळ्याच जगात तिने एक वर्ष काढलं होतं. तर एकीकडे मन आपल्या माणसांकडे ओढ घेत होतं. मन लेकाच्या भेटीसाठी आसुसलं होतं. पण पुन्हा वाटायचं, परत तीच पूर्वीची कुमूद भालेराव मी बनू शकणार आहे का?
तिला परतीचं तिकिट मिळालं होतं.
"मावशी मनूला तुमची सवय झालीये.......तुम्ही थोडे दिवस तिकडे आपल्या माणसात राहून परत येता का........पहा.......पगार वाढवू तुमचा."मनूला सवय झालीये म्हणत नमिताने स्वभावानुसार अंदाज घेत आपलं प्रॅक्टिकल प्रपोजल मांडलं.
"छे गं नमिता.......आता माझं मन लागणार नाही इथे."ती म्हणाली.

तिला निरोप द्यायला मनूला घेऊनच दोघे विमानतळावर आले होते. जायचं म्हणून ती दोन दिवस बर्मिंगहॅमला लेकीकडेही राहून आली होती. मनूने विमानतळावर खूप गोंधळ घातला. खूप रडली. मनूची मुलायम मिठी सोडवताना तिला खूपच जड गेलं.

इकडे भारतात मुंबईला ठरल्याप्रमाणे विमानतळावर उतवून घ्यायला तिची मैत्रीण सुधा आणि तिचा नवरा दिलीप आले होते.
खूप वर्षांनी भेटल्यामुळे मैत्रिणींना अगदी भरतं आलं होतं. सुधा तिच्याकडे पहातच राहिली.
"कुमे.....काय क्यूट दिसतेस गं जीन्समधे! आणि इंग्लंड चांगलं मानवलेलं दिसतंय!"सुधाने तिच्यातल्या बदलाला मनापासून दाद दिली.
"आणि तो हेअरकट?............त्यामुळे तर चांगली पाच सहा वर्षांनी तरी लहान दिसतेस माझ्यापेक्षा!" सुधाची टकळी चालूच राहिली. मैत्रिणींच्या गप्पा रंगल्या.
"बघ कुमूद असं कधी माझ्याकडे ये म्हटलं असतं, तर तुझं ते लातूर सोडून काही आली नसतीस कधीच." सुधा म्हणाली.
"हो ना आपली भेट अशीच व्हायची होती." तिने सुधाला दुजोरा दिला.

रात्री ठरल्याप्रमाणे सुभाषही आला लातूरहून. बेल वाजल्यावर तीच उठली दार उघडायला. पण तिला तसं आतून काहीच जाणवत नव्हतं. ना हुरहुर........ना एक्साईटमेंट!
सुभाष आत आला. बॅग ठेवली. तिच्याकडे पाहून हसल्यासारखं केलं. खिशातला रुमाल काढून उगीचंच घाम पुसल्यासारखं केलं. मग आढयाकडे पहात म्हणाला,"खूप गर्दी होती ट्रेनला......!"
काही क्षण जीवघेणी स्तब्धता.........मग तीच म्हणाली,"कसा झाला प्रवास, आणि तब्येत बरी आहे ना?" मग तिला वाटलं , अरे हे प्रश्ण त्यानंच आपल्याला विचारायला हवे होते.!

तिकडे मिल्टन केन्सला वर्षभर नवरा बायकोचं एक वेगळच अवीट गोडीचं नातं तिने जवळून अनुभवलं होतं.
नीरज नमिताशी एकमेकांशी असलेली जवळीक, सलगी, खटके, लटकी भांडणं, वादावादी, रुसवेफुगवे, आणि तरीही असलेली एकमेकांबद्दलची अतीव ओढ....! तिला ते सगळं इतकं गोड आणि अनोखं वाटायचं. हेच नातं तिला मंदार विशाखामध्येही अनुभवायला मिळालं होतं.
तरीही तिला उगीचच वाटत होतं की तो आत आल्याआल्या निदान आपले हात हातात घेईल आणि विचारेल,"कुमूद कशी आहेस गं? दमलीस का? आम्ही खूप मिस केलं तुला वर्षभर."
पण जे आयुष्यभर एकत्र राहून जे कधी अपेक्षिलं नव्हतं,अनुभवलं नव्हतं......ते एका वर्षाच्या विरहानं थोडंच निर्माण होणार होतं!
"प्रवास ठीक झाला........खूप गर्दी होती........उद्या निघूया ना?"सुभाष म्हणाला. बोलण्यावागण्यात तोच कोरडेपणा, अलिप्तपणा ओतप्रोत भरलेला. दिलीपने त्यांची लातूर गाडीची रिझर्वेशन्स करून ठेवली होती.
"चला आता उद्यापासून इकडचं रूटीन सुरू!" ती सुभाषकडे पहात मनातल्या मनात विचार करत होती. एका वर्षात सुभाष तिला आणखीनच वयस्कर झाल्यासारखा वाटला.
हवेत एक चमत्कारिक शांतता भरून राहिली होती. दिलीपला ते टेन्शन जाणवलं. त्याने काही तरी विषय काढून हवा खेळती ठेवण्याचा प्रयत्न केला.

रात्री जेवताना दिवाळीच्या गप्पा निघाल्या. दिलीप सुधाकडे दिवाळीला सुधाचे भाऊ, भावजय, मुलं आली होती. त्यांच्या गंमती सांगताना सुधाचा चेहेरा अगदी खुलला होता.दिलीप म्हणाला, "कुमूद, मिल्टन केन्सची दिवाळी कशी होती सांग ना जरा!"
तिने प्रथम नमिता, विशाखाकडच्या दिवाळीचं वर्णन केलं आणि स्वता:लाही नकळत एकदम सुभाषला प्रश्ण टाकला, " मग.......भालेराव.....तुमच्याकडे काय काय केलं दिवाळीला?" तिच्या भालेराव या संबोधनाने आणि त्याहीपेक्षा तिच्या आवाजात आलेल्या कमांडने बेसावध सुभाष एकदम दचकलाच. खरं म्हणजे तिलाही आपण जरा आगाऊपणेच बोललो असं वाटून स्वता:चीच गंमत वाटली. सुभाषनेही काही तरी गुळमुळीत उत्तर देऊन वेळ मारून नेली. तिचा तो प्रश्ण त्याच्या एकदम अंगावरच आला. आणि तसाही तिला सुभाषच्या उत्तरात फारसा इन्टरेस्ट नव्हताच.
सुधा, दिलीप दोघांनाही ते जाणवलं. नंतर तर तिने इंग्लंडमधली दिवाळी या विषयावर नवर्‍याचं रीतसर बौद्धिकच घेतलं.
सुधाला आपल्या मैत्रिणीतला वरवरचा बदल विमानतळावरच जाणवला होता.पण आता सुधाला प्रकर्षाने जाणवलं की आपली मैत्रीण आता आंतर्बाह्य बदलली आहे. आता लातूरच्या दीड खोलीत खालमानेने जगणारी, खालच्या पट्टीत बोलणारी, सगळं निमूटपणे सहन करणारी, आला दिवस ढकलणारी ती पूर्वीची कुमूद भालेराव ही नव्हेच!
रात्री जवणं झाल्यावर बडिशोप पुढे करत सुधा म्हणाली, "कुमूद तुम्ही दोघं मुलांच्या बेडरूममधे झोपा. तिथे जरा शांतता आहे. आणि हो......उद्या आरामात उठा. दमला आहात दोघेही." सुधा झोपायला जाण्यासाठी वळली, तोच घाईघाईनं पाठोपाठ ती म्हणाली, "सुधा अगं ...मी काय म्हणते..मुलांची खोली........जरा कोंदटच आहे गं....मी तरी इथे हॉलमधेच झोपते.......मस्त आहे इथं." सुधाच्या संमतीची वाटही न पहाता तिने पटकन सोफ्यावरच ताणून दिली. सुधाने मुकाटयाने आणून पांघरूण घातलं. सुभाष पडेल चेहेर्‍याने निमूटपणे मुलांच्या खोलीत जाऊन जाऊन झोपला.

रात्र चढत होती. तिला उगीचच वाटत राहिलं की रात्री कधी तरी तो येईल.......आपली विचारपूस करेल..........त्यांच्यात निवांतपणे जे बोलणं व्हायला हवं होतं ते होईल......तो स्वता:बद्दल सांगेल, विनीतबद्दल बोलेल.......! ती पांघरुणाआडून त्याची चाहूल घेत राहिली............

दुसर्‍या दिवशी लातूरला विनीत स्टँडवर आला होता. आई दिसल्याबरोबर "आई sssss" म्हणून धावत येऊन साश्रू नयनांनी मिठी मारली. घरी पोचल्यावर जरा फ्रेश होऊन तिने नवर्‍यासाठी ,मुलासाठी आणलेल्या वस्तू , कपडे, शूज, परफ़्यूम्स, गॉगल्स, चॉकोलेट्स सगळं बाहेर काढलं. ज्याच्या त्याच्या हवाली केलं. मुख्य म्हणजे बरीच रक्कम सुभाषच्या हवाली केली.
"थॆंक्स कुमूद......केवढं केलंस तू संसारासाठी.......किती राबलीस तू परदेशात? आणि तू इथे नव्हतीस तर आम्हाला अगदी वाली नसल्यासारखं झालं होतं बघ!"सुभाषचे डोळे भरून आले होते.
आयुष्यात पहिल्यांदाच एका दमात तोंड उघडून इतकं बोलला. बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला.
तिला वाटलं, चला.......काही तरी भावना शिल्लक आहेत अजूनही.....नवर्‍याला काही तरी वाटतय आपल्याबद्दल........लेकही किती काळजी घेतोय आपली.

जसं रूटीन लागलं, तिच्या लक्षात आलं की बाप लेकात काहीच फ़रक पडला नव्हता. उलट बेशिस्तपणात, आळसात भरच पडली होती. सुभाषची नोकरी तशीच रडत खडत चालू होती. विनीतचा रिझल्टही चांगला लागलेला नव्हता. या पूर्ण वर्षाच्या कालावधीत दोघे मनाला येईल तसे वागले होते. एकमेकांत जराही संवाद नव्हता. घराचा उकिरडा करून टाकलेला होता.
आता फरक इतकाच होता की तिच्यामुळे घरावरचा कर्जाचा बोजा थोडा हलका झाला होता. रात्री तीघांत जुजुबी संवाद झाला. सुभाष म्हणाला, " उद्या ताई आणि वहिनी येतील तुला भेटायला."
विनितनेही इंग्लंडबद्दल, तिच्या तिथल्या वास्तव्याबद्दल माफक चौकशी केली. तिनेही दोघांना जगातल्या बर्‍याच नव्या गोष्टी सांगितल्या.

दुसर्‍या दिवशी ठरल्याप्रमाणे नणंद आणि मोठी जाऊ आल्या.आल्याआल्या आधी तिच्या कापलेल्या केसांकडे, अंगावरील पंजाबी ड्रेसकडे नापसंतीचे कुत्सित कटाक्ष टाकले गेले. नंतर वरवर चौकशा झाल्या.
"ह्यांना आज जरा काम निघालं गं..ते उद्या येताल तुला भेटायला."असं स्वता:च्या नवर्‍याबद्दल सांगून मोठी जाऊ एकदम सिरियस टोनमधे आणि अगदी पडेल चेहेर्‍याने पुढे म्हणाली, "कुमूद........आता इथेच ना गं मुक्काम तुझा?...........कसा बाई जीव राहिला तुझा तिकडे.........इथे नवर्‍याला, मुलाला एकटं टाकून............!"
"हो ना........किती हाल झाले बिचार्‍यांचे............आणि हो बाई.......आता तुला जे काही पैसे कमवायचेत ना, ते आपल्या देशातच कमव बाई! असं आपल्या माणसांना टाकून जायचं म्हणजे.........!"नणंदेनेही मोठया जावेच्या सुरात सूर मिसळला.
तिला वाटलं या दोघींना हडसून खडसून विचारावं........."एवढं वाटत होतं तर मी नसताना काय मदत केली माझ्या नवर्‍याला, किंवा काय आधार दिला माझ्या मुलाला? दोघी फिरकलेल्या पण नाहीत इकडे."ती दोघींना चांगलं ओळखून होती.
चहा खाणं झालं. दोघींनी सर्व पदार्थांचा अगदी येथेच्छ समाचार घेतला. आपापल्या गिफ्ट्स घेतल्या आणि दोघी निघून गेल्या.

पहाता पहाता असेच दोन तीन महिने गेले. विनीतला, " अभ्यास कर, दिवसाकाठी काहीतरी ध्येय मनात ठेव, सकाळी उशिरापर्यंत लोळत राहू नको."वगैरे रोज तेच तेच सांगून कंटाळाली. नवरा तर हाता बाहेरची केस!
अशाच एका रवीवारी सुभाष, विनित सकाळीच उपमा खाऊन, वर चहा पिऊन उधळले. तिने मागचा पसारा आवरला. एकाएकी तिला खूपच डिप्रेस्ड वाटायला लागलं. ती हातात वर्तमानपत्र घेऊन निष्क्रीयपणे खिडकीबाहेर पहात बसली. तिला खिडकीतून आकाशाचा एक राखाडी रंगाचा निस्तेज चौकोनी तुकडा दिसत होता. तिला एकाएकी आयुष्यात परत पोकळी जाणवायला लागली.कशातच मन लागेना.

फोनची रिंग वाजली. अपेक्षेप्रमाणे विशाखाचा फ़ोन होता. " आई.....काय गं तू?.....तिकडचीच झालीस आता. रुळलीस ना गं?आई........आता जरा विनितला सुधरव बाई......या वर्षी तरी पास हो म्हणावं.........आणि आई बाबा कसे आहेत गं? जातात का वेळेवर कामाला?"
ती लेकीचा आवाज खूप मन भरून ऐकत राहिली. तिच्या थकलेल्या मनाला जरा टवटवी आली.
मध्येच जावईही बोलला,"आई कश्या आहात तुम्ही?.....अरे हो हो......अहो हर्षूलाही बोलायचंय.....तो फोन ओढतोय. आई नीरजचाही फोन होती मध्यंतरी.......मनू खूप आठवण काढते म्हणत होता..........आई ते तुम्हाला जवळचे, आम्ही इतकी वर्षं बोलावून थकलो." जावई कृतककोपाने बोलत होता." आई तुम्ही तिकडे होतात तरी आम्हाला केवढा आधार वाटायचा."तो पुढे म्हणाला. बर्‍याच गप्पा झाल्या. मध्येच नातूही काहीतरी चिवचिवला , "आजी आजी " करत. सगळ्यांशी बोलून तिचा जीव जरा हलका झाला.

आता सुभाष, विनीत, त्यांचे नातेवाईक, परिचित स्नेही मंडळी........सगळ्यांच्या दृष्टीने तिचं इंग्लंड प्रकरण आता कायमचं संपलं होतं. तिच्या आयुष्यातलं एक पान उलटलं गेलं होतं. या वयात परदेशी जाऊन, काम करून, पैसे कमवून, तब्येत धड ठेवून सुखरूप परत आली हेच सर्व सामान्यांच्या दृष्टीने खूप होतं.
पण आता विशाखाशी फोनवर बोलताना तिच्या मनात काही वेगळ्याच विचारानं उचल खाल्ली होती.
हर्षूकडून आता फोन विशाखाने घेतला होता.
विशाखा काही बोलण्याआधीच ती म्हणाली,"विशाखा, मंदार म्हणत होता ना मनू माझी आठवण काढतेय.......नीरजला माझा निरोप देशील प्लीज?"
"आई......अगं........" विशाखाला आईचा परत तोच निर्वाणीचा आवाज ऐकू आला होता.
"विशाखा प्लीज.......मी काय सांगते ते ऐक.....नीरजला माझं तिकिट पाठवायला सांग.......पण त्या आधी मला त्याच्याशी फोनवर बोलायचंय."ती अगदी शांत पण कणखरपणे बोलत होती.
"आई आता परत कशाला.........."विशाखाने आईच्या बेतात मोडता घायचा निष्फ़ळ प्रयत्न केला.
"विशाखा...... हे पहा माझा निर्णय झालाय. मी पुन्हा नीरज नमिताकडे हाउसकीपिंगसाठी जाणार आहे. त्यांना लवकर काय ते कळवायला सांग. मी तयारीत रहाते."तिने विषय संपवला.

दुपारी जेवणाच्या वेळा टळून गेल्यावर कधी तरी उशिरा सुभाष आला.........पाठोपाठ थोडया वेळाने विनित. दोघेही भरपूर जेवले.....नेहेमीप्रमाणे मुक्यानेच.......नंतर दोघांनी ताणून दिली.
तिने चष्मा चढवला........इंग्लंडची डायरी काढली.....पेन घेतलं आणि न्यायच्या सामानाची यादी व मागच्या वर्षी लिहून ठेवलेली इतर अनेक महत्वाची टिपणे काळजीपूर्वक वाचून टिकमार्क करू लागली. परत इंग्लंडला जायची तयारी सुरू झाली.
रविवारची निवांत दुपार टळत आली होती. उन्ह फिक्कट झाली होती. खिडकीतून गार वार्‍याच्या झुळुका यायला लागल्या.
सुभाष व विनित दिवसा ढवळ्या घोरत होते.

संपूर्ण.
================================================

गुलमोहर: 

मानुषी,
छान लिहिलयं . कथा आवडली . सर्वच पात्रे डोळ्यांसमोर जिवंत दिसत होती वाचताना.
पहिला भाग वाचलेला नाहि, लिन्क हवी आहे.

अरे ...अजूनही वाचताहेत लोक...खूप छान वाटलं.
सानी अनिल आणि एम पीएस्पी सर्वांना धन्यवाद.

>>> विशाखा-मंदारची परिस्थिती इतकी चांगली असते, तर तेच आईला का नाही ठेवून घेत>>> ह्याबद्दल मला वाटत की, मग तिचा पैसे मिळवण्याचा हेतु साध्य झाला नसता ना?

पण ते दोघे जर नमिता नीरज पेक्शा चांगल्या पोझिशन वर असतील तर ते पण मदत करु शकतात ना?

कुमुदने हिमतीने परदेशात काम करुन जो self respect, आत्मविश्वास मिळवला आहे त्यासाठीही तिला जावसं वाटलं असेल पुन्हा, हे कुमुदचे जास्त पटले.

Pages