कसलेही विघ्न न येता रात्र अगदी शांततेत पार पडली..मला दोन-तीन वेळेस पालापाचोळा वाजल्याचा भास झाला पण तिकडे दुर्लक्ष करून मी निवांतपणे निद्राधीन झालो. सकाळ उगवलीच ती मुळी एकदम प्रसन्न वातावरणात. तुम्ही कधी कुणी जंगलातली सकाळ अनुभवलीये..नसेल तर जरूर अनुभवा..देवाशपथ सांगतो त्यासारखे सुंदर काही नाही...
पक्षी किलबिलाट करत आपापल्या कामाला लागलेले असतात..कोवळी उन्हे गर्द झाडांमधून पाझरत पाझरत खालच्या सुकलेल्या पानांच्या गालीच्यावर सुवर्ण नक्षीकाम केल्यासारखी पसरली असतात..थोडीशी थंडी..थोडी बोचरी हवा गुदगुल्या करत आपली जाणीव करून देते आणि एकूणच वातावरणात इतकी प्रसन्नता भरली असते की बस..
जाऊ दे माझ्याच्याने फार वर्णन नाय करवत..मी तर इतका त्या वातावरणात गुरफटून गेलो होतो की फोटोबीटो पण काढायचे लक्षात आले नाही. तसाच एका झाडाच्या खोडाला टेकून नुसते जंगल अनुभवत राहीलो.
दरम्यान, अमेयने छानपैकी उप्पीट बनवायला घेतले होते. त्या फोडणीचा वास असा छानपैकी घेत असतानाच ज्याची सर्वात भिती होती तेच झाले..
समोरच्या झाडीतून दोन फॉरेस्ट गार्ड दत्त म्हणून उभे ठाकले. बर आले ते एकदम समोर येऊन बसलेच...
दोन मिनिटे काय बोलावे ते सुचेनाच. ते पण काही न बोलता निवांत.
मीच कोंडी फोडली...
"रामराम"
"राम राम, कुठुन आला?"
"मुंबई आणि पुणे..हे मुंबईचे आणि आम्ही दोघे पुण्याचे"
"परवाना आहे का..??"
"परवाना कसला परवाना.??"
"जंगलात मु्क्काम ठोकून राहीलाय, आग पेटवलीये आणि वर विचारता कसला परवाना,"
मामांनी एकदम फर्स्ट गियर टाकला.
"नाही त्याचे काय आहे आम्ही निघालो होतो प्रचितगडावर, पण वाटेत अंधार झाला..वाट सापडेना..म्हणून इथे मुक्काम केला. आमच्याकडे परवाना वगैरे काय नाही,"
"तुम्हाला माहीती नाही का हे टायगर रिझर्व आहे..कुठुन पाथरपुंजवरून आला ना..तिथल्या फारेस्टगार्डला विचारलेत का जाऊ का म्हणून?"
मामा फुल जोशात..बोलण्यात वर्दीची गुर्मी साफ डोकावत होती..
"नाय तिकडे कुणी नव्हते. तो कोण फॉरेस्ट गार्ड आहे बाळू तो ऑफीस सोडून खाली गावात निघून गेला होता. गावकरीपण आम्हाला काय बोलले नाहीत.."
आमचा बचावाचा क्षीण प्रयत्न..पण काय माहीती तोच उलटवार होईल म्हणून..तो दुसरा फारेस्ट गार्ड शांतपणे म्हणाला मीच बाळू..आणि कालच्याला मी गावातच होतो..
आयला...चेहर्यावर हसू उमटू न देण्याचा कसोशीने प्रयत्न करत मी म्हणालो
"अहो पण गावकरी म्हणाले तुम्ही नाहीये म्हणून ऑफीसात. नायतर काय तुम्हाला विचारले असतेच ना आम्ही,"
"चला उठा लवकर, सामान आवरा तुमचे"
कुठे चला..
"पाथरपुंजला. विनापरवाना जंगलात राहील्याबद्दल, आग पेटवून वणवा लावल्याबद्दल तुमच्यावर केस करायचीये..वीस हजार रुपये दंड तो नाही भरला तर सहा महिने जेल.."
शप्पथ, हे प्रकरण सिरीयस होते..:(
तेवढ्यात मला शंका आली..
एक मिनिट, तो वणवा आम्ही नाही लावला. उलट आम्ही विझवायचा प्रयत्न केला. खरं वाटतं नसेल तर हे पहा आम्ही किती काळजी घेतलीये आग पसरू नये यासाठी..
असे म्हणत त्याला आम्ही कशी स्वच्छता केलेली, पाणी कसे शिंपडलेले वगैरे दाखवले..पण त्याची मग्रुरी काय कमी होईना..
"पण जंगलात राहीलात ना. उठा लवकर..तुमच्यावर केस होणारच."
त्या तशा दुर्धर प्रसंगी अमेयला कसे काय सुचले माहीती नाही..
तो अजुनही त्याच्या उप्पीटातच होता..आणि अगदी मन लावून त्याने उप्पीट बनवले होते.
"आम्ही कालपासून काय खाल्ले नाहीये..आत्ता थोडे खाऊन घेऊ का..असेही बनवून झाले आहे..खातो आणि मग निघुया.."
त्या गार्डने पाहिले आणि चक्क हं लवकर खावा आणि चला असे म्हणत बसला.
आम्ही सर्वांनी कहर शांतपणे आपापल्या प्लेट काढल्या आणि काहीच झालेच नाही अशा थाटात निवांतपणे उप्पीट खायला सुरूवात केली.
"आयला, अम्या, जमलंच आहे रे उप्पीट, खासच, लिंबू आहे का पिळायला यावर"
फुल्ल बडबड..ते गार्ड बघतच बसले..त्यावर कळस म्हणजे अमेय त्यांनाच विचारतोय..
"काका तुम्हीपण खाणार का थोडे उप्पीट..मस्त झालेय.."
हे त्यांच्या दृष्टीने अतिच होते.
"नको, पटदिशी आवरा, आम्हाला सेन्ससच्या कामासाठी जायचंय पुढे..मोठे साहेब येणार आहेत."
असे म्हणून ते लांब जाऊन बसले.
आता मात्र गंभीर होण्याची वेळ होती. सगळ्यांनी आपापले सोर्सेस काढायला सुरूवात केली. मी बायकोला फोन केला. ती पण पत्रकार आणि ती वनखात्याच्या स्टोरीज द्यायची हे माहीती होते..
हळुवार आवाजात तिला आमच्यावर ओढवलेल्या संकटाची कल्पना दिली.
तिने सर्वप्रथम बायकोचा हक्क बजावत ठणाणा केला. असे कसे काय कुणाला न विचारता गेलात जंगलात..वगैरे वगैरे (अधिक तपशील देण्यात अर्थ नाही..सर्व विवाहीत पुरुषांना याची अनुभुती असेलच).
मी तिला कसेबसे थोपवले..म्हणलो तु काय म्हणशील ते ऐकून घेतो पण आता मला तुरूंगात घालायला निघालेत..आत्ता मला इथून बाहेर काढ बयो
सुदैवाने तिने ऐकले..बर म्हणली बघते..
दरम्यान, स्वप्नील आणि प्रणवही कुणाकुणाला फोन लावून सेटींग लावायच्या मागे होते.
मी पण जरा काही होतंय का बघायला म्हणून माझे प्रेसकार्ड घेऊन त्या गार्डकडे गेलो. त्यांना म्हणले
"आम्ही पत्रकार आहोत, आम्हाला खरेच माहीती नव्हते. आम्हाला गडावर जायचे होते पण आम्ही रस्ता चुकलो."
ते कार्ड पाहून तो बराच नरम आला पण हेका सोडेना..
"अहो तुम्हाला तर फारेस्टचे नियम माहीती पाहिजे. तुम्हीच असा कायदा मोडायला लागले तर कसे व्हायचे. या भागात अस्वलं आहेत..आता मला सांगा तुमच्यावर रात्री अॅटॅक झाला असता तर कुणाच्या डोक्यावर आले असते हे..माझ्याच ना.."
भले मोठे लेक्चर..
मी आपला कान पाडून ऐकत बसलो..पण एवढे करून त्याचा आम्हाला पाथरपुंजला घेऊन जाण्याचा हट्ट कायमच..
"तुम्ही आता असे करा, तुमचे सगळे सामान ऑफीसमध्ये सोडा आणि नंतर येऊन थोडा दंड भरून घेऊन जा."
थोडा म्हणजे किती..
"थोडा म्हणजे चौघांचे मिळून आठ हजार तरी भरावेच लागतील बघा."
हॅट्ट साला..काय उपयोग नाही..आणि सामान तर सोडणे सर्वथया अशक्य होते..
दरम्यान बायकोचा फोन आला तिने पुण्यातल्या एका वनाधिकाऱ्याचां नंबर दिला..जरा हायसे वाटले...
मग तातडीने त्यांना फोन लावला..
त्यांनी आश्वासक सुरात सांगितले, काही काळजी करू नका..द्या त्या गार्डला फोन
मग अदबीने त्या गार्डला सांगितले..
असे असे साहेब बोलतायत..
त्याची मग्रुरी, ताठा एकदम संपला आणि उभा राहून बोलायला लागला..
"होय साहेब नाही साहेब...नक्कीच साहेब."
"अहो पण त्यांनी वणवा लावला मंग.."
मला जाणवले इथे हस्तक्षेप करण्याची गरज आहे..मी चक्क त्याच्या हातातून फोन खेचून घेतला आणि सांगितले की वणवा कसा लागला होता आणि आम्ही कसा विझवायचा प्रयत्न केला आणि हा माणूस तो आळ आमच्यावर घालतोय..
झाले आता तर त्याचे उरले सुरले अवसानपण गळाले..भिजलेल्या आवाजात त्याने एवढेच म्हणले मग साहेब त्यांना किमान प्रवेशशुल्क तरी भरावे लागेल..
परत मी मध्ये पडलो..
"किती आहे प्रवेशशुल्क.."
वीस रुपये प्रत्येकी...
"हाहाहाहाहाहा, चला लगेच भरून टाकतो.."
मग त्या साहेबांना मनापासून धन्यवाद दिले..शंभर रुपये काढून त्या गार्डच्या हातावर टेकवले..
अर्थात त्याने त्याचा पावशेर ऐकवलाच..
"तुमच्यासारखे लोक येतात इथे. आम्ही कर्तव्य करायचे म्हणले की अशा ओळखी दाखवून सुटून जाता..आम्ही काम तरी करायचे कसे.."
हे मात्र तो शंभर टक्के खरे आणि मनापासून बोलला होता. मलाही ते जाणवले...त्याला म्हणले
"बरोबर आहे तुमचे...पण आम्ही कसलेही नुकसान केलेले नाही..मला वाटते तुम्ही आम्हाला शिकार्याच्या किंवा बाकीच्या उपद्रवी लोकांच्या रांगेत बसवणे चुकीचे आहे. आम्हालाही तुमच्याइतकेच जंगलाबद्दल प्रेम आहे आणि आपले हे वैभव असेच रहावे अशी आमचीही इच्छा आहे. "
अर्थात एवढ्या सगळ्या प्रकरणानंतरही त्याने आम्हाला प्रचितगडला काय जाऊ दिलेच नाही.
"अहो, तिकडे मोठे साहेब आले आहेत सेन्ससच्या कामासाठी...त्यांना कळले आम्ही तुम्हाला असे सोडून दिले तर नोकरी घालवाल.."
"तुम्हाला आता कोकणात जायची वाट दाखवतो तिकडून चिपळूणला जा आणि तिकडून घरी.."
आता आम्हीही फार ताणून धरले नाही..पण एवढे लांब आल्यावर किल्यावर न जाताच परत जायचे म्हणजे अगदीच वाईट वाटत होते.
तिकडे स्वप्नील आणि अमेयला सगळी घडामोड ऐकवली. त्यांचाही घरी जायचे म्हणून हिरेमोड झाला. आणि आम्ही आवरा-आवरी करायला घेतली.
पण ती इतकी संथगतीने की त्या गार्डला असह्य झाले.
अहो आटपा, आम्हाला ड्युटी आहे..तुमच्यासारखे नाय
असे बडबड करून झाली..पण आम्ही ढिम्मच...
त्याचा पुरेसा अंत पाहून म्हणजे जवळजवळ एक तासाभराने आमचे पॅकींग करून झाले..
अशी आशा होती की तो कंटाळून निघून जाईल आणि गुपचुप आम्हाला किल्ल्यावर सटकता येईल. पण तो आमचे बारसे जेवला होता. त्याला शंका होतीच हे सरळ मुकाट्याने वागणारे लोक नाहीत. त्यामुळे तो चडफड करत बसून राहीला होता.
मग बरेच अंतर चालून त्याने एका वाटेने आम्हाला चक्क खाली घालवले आणि आम्ही गेलोय याची खात्री करूनच मग तो आपल्या वाटेला गेला.
आणि मग त्या अत्यंत कंटाळवाण्या आणि दमछाक करणाऱ्या वाटेने कडकडीत उन्हाचे आम्ही पावले ओढत चालत राहीलो. दमणूक होण्याला तर काहीच अंत नव्हता..पाय बुटात शिजून निघत होते..दर दहा मिनिटांनी घशाला कोरड पडत होती..उनाचा तडाखा असह्य होत होता..पण समाधान एकाच गोष्टीचे होते..
ठरल्याप्रमाणे जंगल ट्रेक पार पाडला होता...
आणि शेवटी सुखद आठवणीच लक्षात ठेवायच्या असतात ना..
समाप्त...
सही आहे... खरचं मजा आली
अरेरेरे........तुमचा प्रचितगड
अरेरेरे........तुमचा प्रचितगड हुकला हे वाचून फार म्हणजे फारच वाईट वाटले.
अन हे फॉरेस्ट गार्ड एवढे घायकुतीला आणतात ?
पण बाकीचे वर्णन एकदम बहारदार.....जंगलातल्या सकाळचे वर्णन, उप्पीट, घरचा आहेर, वगैरे सर्वच.
अरेरे .. हुकला हे ऐकूनच भावन
अरेरे .. हुकला हे ऐकूनच भावन पोचली रे... नि त्यात हे फॉरेस्ट खातेचे लफडे भारीच.. आता तर खूपच निर्बंध आले आहेत..
रच्याकने परवाना मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे याची माहिती आहे का..
बाकी
तो अजुनही त्याच्या उप्पीटातच होता..आणि अगदी मन लावून त्याने उप्पीट बनवले होते. >> हे आवडले..
भन्नाट आशु!! supperb अनुभव
भन्नाट आशु!!
supperb अनुभव लिहिलायस!! एकदम डोळ्यासमोर घडतय अस वाट्ल..
हे वाचुन नक्किच जंगलात stay करायला (अनुभवायला) आवडेल!!
प्रसंग बाका होता. पण ते नियम
प्रसंग बाका होता. पण ते नियम आपल्या भल्यासाठीच केलेले असतात रे. मी पण कर्नाळ्याहून उतरायला रात्र झाली म्हणून भरपूर ओरडा खाल्ला आहे. पण त्याची काळजी खरी होती, जंगली श्वापदे नसली तरी तिथे अजगर आहेत.
निवांत पाटील - हाहाहाहा...अहो
निवांत पाटील - हाहाहाहा...अहो तसे काही असते तर ही कथा माबोवर नाही वर्तमानपत्रात आली असती..
शशांक - मी सगळे संभाषण दिलेले नाहीये..त्याने जाम म्हणजे जामच ताणले होते..आणि तो खरेच निघाला होता आम्हाला घेऊन पाथरपुंजला
यो - अरे त्याच फॉरेस्ट
यो - अरे त्याच फॉरेस्ट गार्डचा मोबाईल नंबर आणि चांदोली अभयारण्याचा नंबर घेऊन ठेवला आहे मी. जायचे असेल कधी तर सांग..माझाही प्रचितगड राहीलाच आहे..मग कंधारडोहपण करू..
पण उन्हाळ्यात नाही बाबा..
या ट्रेकनंतरच ठरले आहे..उन्हाळ्यात जायचे नाही कुठे म्हणून
शप्पू धन्यवाद
दिनेशदा - नियम आपल्याच
दिनेशदा - नियम आपल्याच भल्यासाठी असतात हे शंभर टक्के मान्य..आम्हीही जरा थोडा अघोरीपणाच केला होता..खरोखर जर झाला असता हल्ला तर आमच्याकडे बचावासाठी काही म्हणजे काहीही नव्हते..
आणि त्या भागात आहेतच मोठ्या प्रमाणावर अस्वले...
रिस्क घेतली होती आणि तो गार्डपण बरोबर होता..पण त्याने एवढे ताणायची गरज नव्हती..
शिकारी आणि चोरटे बरोबर पैसे खाऊन त्यांना मॅनेज करतात आणि आपल्यासारखे निसर्गप्रेमी त्यांना बरोबर तावडीत सापडतात.
आता वनाधिकारी मिळाला मला फोनवर म्हणून नाहीतर त्याने भरपूर उकळलेच असते आमच्याकडून..
भन्नाट ...मस्त लिहिलय... एका
भन्नाट ...मस्त लिहिलय...
एका दमात सगळ वाचुन काढलं...चार ही भाग...
सह्हीच आहे हा अनुभव ....अगदी डोळ्यासमोर सगळं घडतयं असंच वाटलं.
सह्ही!!! एक नं वर्णन व फोटो.
सह्ही!!! एक नं वर्णन व फोटो.
<<पण ते नियम आपल्या
<<पण ते नियम आपल्या भल्यासाठीच केलेले असतात रे>> अगदी
शिवाय निसर्गप्रेमी कोण आणि उपद्रवी कोण हे ओळखणं ही सोपं नाही. एकदा विना परवानगी सहज जाता येतं हे लोकांना कळलं की मग काय उठसुठ सगळेच जातील ना. आणि सगळेच तुमच्यासारखे निसर्गप्रेमी नक्कीच नसतात. त्यामुळे नियम आपणच पाळायला हवेत.
"आम्ही कर्तव्य करायचे म्हणले की अशा ओळखी दाखवून सुटून जाता" हे त्याचे फ्रस्ट्रेशन अगदी रास्त आहे.
हे लिहिल्याचा कृपया राग मानु नये. तुझी हि भटकंती नेहेमी वाचत होते आणि प्रतिक्रियाही देत होते म्हणुनच आताही जे वाटलं ते लिहीलं.
चांगला अनुभव गाठीशी जमा झाला
चांगला अनुभव गाठीशी जमा झाला म्हणायचं.
सह्ह्हीच आहेत एकेक अनुभव.
सह्ह्हीच आहेत एकेक अनुभव. बरंच झालं त्यावेळी प्रचितगड हुकला ते... पुन्हा नव्यानं मोहिम काढा की. आम्हाला पुन्हा एकदा घरबसल्या मेजवानी.
मस्त लिहिलय. जंगलातली सकाळ, उप्पीट... तो फॉरेस्ट गार्ड पण एकदम सहीच की.
"..........मी आपला कान पाडून ऐकत बसलो.." >>>>>
हा ही भाग खासच!!!! संपूर्ण
हा ही भाग खासच!!!!
संपूर्ण लेखमालाच भन्नाट झाली.
पुढिल ट्रेकसाठी शुभेच्छा!!!!
पण मग प्रचितगडावर जायचे असेल
पण मग प्रचितगडावर जायचे असेल तर काय करावे?
म्हणजे तिथे जायला बंदी असताना परवाना शुल्क वगैरे घेवून जावू देण्यात काय पॉइंट आहे? लोकांची सुरक्षा म्हणून जावू देत नाही ना? की शिकार होतेय या मुळे जाण्यास बंदी आहे... असो..
मस्त चित्त थरारक अनुभव.
shittttttttttttttttttt!!!!!!!
shittttttttttttttttttt!!!!!!!!!
चायला, एवढं करून प्रचितगड झाला नाहीच!!!
शिकारी आणि चोरटे बरोबर पैसे खाऊन त्यांना मॅनेज करतात आणि आपल्यासारखे निसर्गप्रेमी त्यांना बरोबर तावडीत सापडतात. >>>>>
१०००००% अनुमोदन!!
वासोट्याला हे असले प्रकार सर्रास चालायचे.. एकतर कोकणातून येणार्या वाटेवर फॉरेस्टचा पहारा नाही. जे काही आहे ते फक्त बामणोलीसाईडला. त्यामुळे, कोकणातून कोणीही खुशाल चढू शकत असे, स्वतःच्या जबाबदारीवर नागेश्वराला मुक्काम करत असे आणि वासोटा फिरून बिनबोभाट उतरू शकत असे...
इतका सुंदर ट्रेक चालला होता... त्यांना नेमकं आत्ताच येऊन तडमडायची काय गरज होती?
बरं आता हा सगळा ट्रेक कसा करायचा?
फार सुरेख होते ४ही भाग. आणि
फार सुरेख होते ४ही भाग.
आणि त्या फॉरेस्टगार्डाचे बरोबर होते हेही मान्य केल्याबद्दल कौतुक.
आपल्याला पुन्हा परवान्यासहित हे आणि असे ट्रेक करायला मिळो !
मस्त सफर अनुभवली, धन्यवाद ,
मस्त सफर अनुभवली, धन्यवाद , आशु आणी मित्र मंडळी
खुप जबरी अनुभव...
खुप जबरी अनुभव... आशुचँप...
मलाही जायला आवडेल..... परवानगी भेटली तर...
सावली - छेछे राग कसला...ही
सावली - छेछे राग कसला...ही वस्तुस्थिती आहे..पण एक सांगावेसे वाटते की निसर्गप्रेमी आणि उपद्रवी मंडळी यातला फरक लगेच कळतो. निसर्गप्रेमी कधीही सिगरेट, गुटख्याची पाकिटे, दारूच्या बाटल्या, ट्रांझीस्टर असे घेऊन फिरत नाहीत.
मला असे म्हणायचे नाहीये आम्ही फार ग्रेट निसर्गरक्षक वगैरे आहोत, पण जर एखाद्याला निसर्गाच्या शांततेला धक्का न लावता, नैसर्गिक साधनसंपत्ती न ओरबाडता जर जंगलात राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याला नक्कीच तो हक्क आहे. सरसकट सगळ्यांना परवानगी देऊ नये हे मात्र खरे.
याच कोयनानगर भागात सर्रास मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते आणि ती वनखात्याच्या आशिर्वादानेच..तिथली जैविक विविधता आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे...हरणांची चोरटी शिकार चालते...(मध्यंतर दैनिक सकाळनेच यावर एक आख्खी मालिका चालवली होती). तिथे हे सगळे पैसे खाऊन गप्प बसतात आणि नियमांचा बडगा आपल्यासारख्याच लोकांसाठी असतो. म्हणून जास्त वाईट वाटते.
मला इथे आमच्या चुकीच्या वागण्याचे काहीही समर्थन द्यायचे नाहीये. विनापरवाना गेलो हे चुकलेच. पण आम्ही कुठल्याही प्राण्याच्या अधिकारावर आक्रमण होईल असे वागलो नाही. शेकोटी पेटवतानाही योग्य ती खबरदारी घेतली आणि एकही फांदी तोडली नाही. जो काही सुका पाला-पाचोळा आणि खाली पडलेल्या सुक्या फांद्या आणि लाकडे होती तीच वापरली. निघण्यापूर्वी त्यावर पाणी ओतून सर्व आग विझल्याची खात्री केली.
किमान यावरून तरी त्यांना आम्ही नेहमीची हल्लागुल्ला करणारी मंडळी नाही हे कळून चुकले होते. पण अशा मंडळींनाच दाबात घेता येते हे त्याला अनुभवाने माहीती होते आणि त्याचाच तो फायदा उठवण्याच्या प्रयत्नात होता.
अजून एक मुद्दा असा की आम्ही सहज त्यांना सापडलो नव्हतो. ज्या पद्धतीने ते येऊन बसले त्यावरून हे लक्षात आले की ते चक्क शोधत आले होते. त्यांना पाथरपुंज गावातून टीप मिळाली असणार की चौघेजण प्रचितगडच्या वाटेने गेले आहेत. आम्ही गावातून निघालोच उशीरा आणि ओझी घेऊन किती वेगाने चालू शकतो यावरून त्यांनी अंदाज बांधला असणार...
असो थोडे म्हणता बरेच स्पष्टीकरण झाले..:)
आडो, मामी, जिप्सी...रैना,
आडो, मामी, जिप्सी...रैना, राजेश्वर आणि रोहीत..
खूप धन्यवाद..
डॉ. - लोकांची सुरक्षा म्हणून नाही...तर तिथल्या वन्यसंपदेला धक्का लागू नये म्हणून बंदी करण्यात आली आहे. टायगर रिझर्व हा एका विशिष्ट उद्दीष्टाने जाहीर करण्यात येतो. वाघ हा सध्या नष्ट होण्याच्या मार्गावरील जीव आहे. त्यामुळे एखाद्या जंगलात जर पट्टेरी वाघाच्या पाऊलखुणा आढळल्या तर त्याच्या संरक्षणासाठी तो भाग टायगर रिझर्व म्हणून घोषीत करण्यात येतो. मग त्या पट्ट्यातील गावे, वसतीस्थाने उठवून त्यांचे पुनर्वसन करण्यात येते. आता लवकरच पाथरपुंज गावदेखील उठवणार असे ऐकिवात आहे.
यामागचा उद्देश हा आहे की लोकांनी वाघांच्या वसतीस्थानावर आक्रमण करू नये, त्यांना शांतता (एकांतवास) लाभावी आणि त्यांची वाढ व्हावी.
पण आपल्याकडे गावकरी आणि बाकीचे लोक बाहेर जातात आणि शिकारचोरांचे फावते. कारण त्यांच्यावर लक्ष ठेवायला कुणीच नसते. (काही अपवादामत्क चांगले वनरक्षक सोडले तर)
आनंदयात्री - आता चोरवणेलाही
आनंदयात्री - आता चोरवणेलाही फॉरेस्ट ऑफीस झाले आहे. आणि आता कदाचित तो भागही बंद करण्यात येणार आहे. नुकत्याच एका ट्रेकर ग्रुपकडून मिळालेली माहीती अशी की तिथेही पट्टेरी वाघाचे वास्तव्य आढळले आहे. इनफॅक्ट जोडी असल्याचे कळले आहे. त्यामुळे बहुदा आता फक्त यात्रेच्या दिवशीच नागेश्वरला जाता येईल.
इतका सुंदर ट्रेक चालला होता... त्यांना नेमकं आत्ताच येऊन तडमडायची काय गरज होती?
अगदी अगदी मनातले बोललास
आता हा ट्रेक कसा करायचा..
जंगली जयगड आणि भैरवगड हे कोअर एरीयात येत नाहीत त्यामुळे तिथे जायला फार अडचण नाही. पण प्रचितगडला आता फक्त शृंगारपुरावरून चढून जावे लागते. आणि तिथूनच उलटे फिरून खाली..तो भाग जंगलाच्या बाहेर येतो.
मस्त लिवलयसं आशू.. प्रसंग
मस्त लिवलयसं आशू.. प्रसंग अगदी डोळ्यापुढं उभा राहीला.
तुम्ही कधी कुणी जंगलातली सकाळ अनुभवलीये..
>>> खरचं जंगलातली सकाळ शब्दांत नाय पकडता येत. ती अनुभवावीच लागते.
सावली ह्यांचंही म्हणणं पटतंय
सावली ह्यांचंही म्हणणं पटतंय आणि तुमचंही म्हणणं पटतंय पण जंगली प्राण्यांचा वावर असलेल्या जंगलात वावरताना ह्यापुढे कृपया काळजी घ्या एव्हढंच सांगावंसं वाटतं. जंगलावरचे आणखी लेख लिहायला तुम्ही धडधाकट हवे आहात
अरेरे पोचलो की घरी. मस्तच
अरेरे पोचलो की घरी. मस्तच वर्णन. सगळ अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं.
आम्हाला पुन्हा एकदा घरबसल्या मेजवानी.>>>>१००००० मोदक.
आशु, आता लवकरच दुसरया जंगल सफारीवर/गड सफारीवर ने बाबा. वाट पहातेय.
याच कोयनानगर भागात सर्रास
याच कोयनानगर भागात सर्रास मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते आणि ती वनखात्याच्या आशिर्वादानेच.. >>> खरयं
सगळेच लेख आवडले... मस्तच
जंगलातील सकाळ कधी अनुभवयाल मिळणार कोण जाणे?
स्वप्ना - आवडलं... कळकळ
स्वप्ना - आवडलं...:)
कळकळ पोहोचली..नक्कीच काळजी घेऊ यापुढे..
अमित, इंद्रा धन्स..
शोभा - माझ्याकडे रामसेज-धोडप-कंचना आणि कोल्हापूरमधली नऊ किल्ल्यांची बाईक भटकंती स्टॉकमध्ये आहे.
पण मला लिहायचा जाम कंटाळा..बघु आता याचे प्रचि टाकीन..
स्थानिक गावकर्यांनाच
स्थानिक गावकर्यांनाच प्रशिक्षण देऊन, सुरक्षितपणे जंगलातून फिरवून आणणे, मचाण बांधून त्यावर निवार्याची सोय करणे, उंचावरुन चालण्यासाठी लाकडी मार्ग बांधणे (यावरुन झाडांच्या शेंड्यांच्या पातळीवरुन चालता येते ) असे उपक्रम करता येतील.
पण मग जंगलातील संपत्तीच्या चोर्या, बांबूची बेकायदेशीर तोड, प्राण्यांची बेकायदेशीर शिकार हे पण थांबवावे लागेल.
दुसरे म्हणजे एकवेळ वाघ, बिबट्या हल्ले करणार नाहीत. पण समोर आलेल्या कुणालाच सोडायचे नाही, ही अस्वलाची खोड असते. खरे तर त्याचाहि दोष नसतो. अधू नजरेमूळे त्याला लांबचे दिसत नाही. आपला वास त्याला आला नाही आणि आपण त्याच्या समोर उभे ठाकलो, तर ते गळामिठी मारणारच.
देअर यु आर... जंगलांचा विनाश
देअर यु आर...
जंगलांचा विनाश रोखायचा असेल तर स्थानिक लोकांचीच मदत घ्यावी लागणार आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे..
आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारचे यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. पण आपल्याइथे होते काय की जंगल आरक्षित झाले की पहिली कुर्हाड आदिवासी आणि स्थानिक लोकांवर पडते. त्यांच्या हाता-तोंडचा घास काढून घेतला जातो. मग अवैध मार्गाने मिळणारा पैसा त्यांना आपलेच जिवाभावाचे जंगल ओरबाडायला भाग पाडतो.
याऐवजी जर जंगल राहीले तरच आपल्याला रोजगार मिळणार आहे हे त्यांच्यावर बिंबवले आणि खरोखर तशी योजना परिणामरित्या राबवली तर चोरट्या शिकारीला मोठ्या प्रमाणावर आळा बसू शकेल.
पण एवढे करण्याऐवढी इच्छाशक्ती आहे कुणाकडे.
मस्त
मस्त
Pages