दोन मिनिटात........

Submitted by कौतुक शिरोडकर on 6 January, 2009 - 02:04

जांभुळवाडीचा एकुलता एक बसस्टँड. अमरावतीची बस लागलेली होती. आठ दहा जण स्थानापन्न झालेले होते.
त्याच्यापाठोपाठ ती बसमध्ये चढली. त्याची शोधक नजर बसमध्ये हवेशीर खिडकीची जागा शोधू लागली. हवे तसे मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर तरळला व त्याने अकरा नंबरच्या सीटवरील सामानाच्या कप्प्यात बॅग टाकली.

"इकडे बस." तो बोलला आणि ती एखाद्या आज्ञाकारी मुलासारखी सीटवर बसली.

"दोन मिनिटात येतो." इतकं बोलून तिच्या उत्तराची वाट न पहाता तो बसमधून उतरूनही गेला. ती खिडकीबाहेर पाहू लागली. मागच्या सीटवरचे श्री. बावळे टाईमपास म्हणून त्यांना न्याहाळत होते हे तिच्या गावीही नव्हतं. साधारण दोन तीन मिनिटातच तो परतला. हातात स्नॅक्सची चार पाच पाकीटे होती व सोबत बिसलरीची बाटली देखील. सगळं काही तिच्यासमोरील हँगरमध्ये अडकवून, डोक्यावरची कॅप डोळ्यावर ओढून तो क्षणभर निवांत झाला. काहीतरी आठवल्यासारखा तो झटकन उठला.

"कुठे चाललात ? " शंकीत स्वरात ती.

"दोन मिनिटात आलो." तो वळला.

"बस चालू होईल इतक्यात. नका ना जाऊ." तिच्या आवाजातलं आर्जव उगाच श्री. बावळेंना सुखावून गेलं. श्यामल आठवली त्यांना. त्यांची बायको. अशीच काळजी करणारी. 'नवीनच लग्न झालेलं दिसतयं' बावळे स्वत:शीच पुटपुटले.

"अग, पेपर घेऊन येतो. सहा तासाचा प्रवास आहे. वाचायला काहीतरी हवचं" तो ठाम स्वरात बोलून पुन्हा वळला. तिच्या डोळ्यातील काळजीला त्याने आपल्या नजरेने आश्वस्त केले व तो झपकन बसबाहेर पडला. ती पुन्हा खिडकीबाहेर गुंग व श्री. बावळे "श्रीमान. योगी" उघडून बसले. साधारण पाच मिनिटानंतर तिची चुळबूळ सुरू झाली. तिही श्री. बावळेंना जाणवण्याइतपत. तो अजून परतला नाही, हे श्री. बावळेंच्या लक्षात आलं. तेही चहूकडे पाहू लागले. दोन चार मिनिटानंतर तर त्यांनी सगळ्या खिडक्यातून डोकवायला सुरूवात केली. मध्येच एकाने त्यांना त्यामुळे झापलही.

"क्या....क्या करताय क्या तुम ? "

"अरे इनका मिस्टर पेपर लेनेको गया, वो आया नही अभीतक." तिला स्पष्ट ऐकू जाईल एवढया आवाजात त्यांनी उत्तर दिले. त्यामुळे ज्यांनी त्याला काळा का गोरा, हे पाहीलही नव्हतं, तेही शोधाशोध करू लागले. तिची अस्वस्थता वाढू लागली.

ड्रायव्हर येऊन स्थानापन्न झाला व मागोमाग कंडक्टरनेही "चला लवकर" असा आवाज दिला.

"अहो, कंडक्टरसाहेब, यांचे मिस्टर यायचेत अजून." श्री. बावळेंमधला सामाजिक कार्यकर्ता एका असहाय्य स्त्रीला सर्वतोपरी मदत करण्याचे आपणहून प्रयत्न करत होता.

"जास्तीत जास्त पाच मिनिटे थांबू शकतो अजून." कंडक्टर कर्तव्यनिष्ठ होता. संधी साधून त्याने माव्याची पुडी तोंडात रिकामी केली.

पाचची दहा मिनिटे झाली व आता बसमधले प्रवासी चुळबूळ करू लागले. कंडक्टरने ड्रायव्हरला आवाज दिला आणि ती चटकन उठली.

"प्लीज, थोडा वेळ थांबा ना."

"बाई, जास्त लेट करून चालायचा नाय. जवाब द्यावा लागतोय डेपोला. तुम्ही असं करा. उतरून शोधा त्यांना. दुसरी गाडी आहेच की रात्री." बहूधा कंडक्टरला असल्या प्रकारांची सवय होती. त्याने त्याचा स्थितप्रज्ञ सल्ला दिला. नाईलाजाने ती बॅग घेण्यास वळली, तोवर श्री. बावळेंनी बॅग काढून आपलं कर्तव्य पुन्हा बजावलं व त्यासोबत बिसलरी व पाकीटेही तिच्या हातात सोपवली. तिच्यामागोमाग कंडक्टर दरवाज्यापर्यंत गेला. कर्मधर्मसंयोगाने समोरच हवालदार बाणे साध्या वेशात होते.

"ओ बाणे, बाणे, इकडे ...इकडे..."कंडक्टरने आवाज दिला. बाणे वळले. कामाशिवाय कंडक्टर आवाज देणार नाही याची जाणिव असलेल्या बाणेंच्या चेहयावर आठ्या उमटल्या.

"क्काय ?" ठेवणीतला 'काय' विचारत ते जवळ आले.

"यांचा नवरा हरवलाय. तो जरा शोधून द्या." तिच्याकडे बोट दाखवून , हीची एकदम किरकोळ वस्तू हरवली आहे, टेंशन नको असा भाव चेहर्‍यावर राखत कंडक्टरने दरवाजा खेचला व ओरडला, "चल रे". तयारीत असलेल्या ड्रायव्हरने गिअर टाकला व बस निघाली.

नस्ती बिलामत पाठी लावून गेलेल्या कंडक्टरच्या नावे मनातल्या मनात लाखोली वाहत हवालदार बाणे तिच्याकडे वळले.

"काय झाल बाई ?" आवाजात शक्य तेवढा मृदूपणा आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. रडक्या सुरात तिने बसमधील कथा सांगितली.

"असतील इथेच. छोटीशी जागा आहे ही. चला शोधूया." बाणेंनी तिला धीर देण्याचा पुर्ण प्रयत्न केला. पुढच्या तासाभरात तो इवलासा बसस्टॊप त्या दोघांनी दोनदा चाळला. आता बाणेंमधला हवालदार जागा झाला. त्यांनी आता मोर्चा पेपरवाल्याकडे वळवला. तिच्यामार्फ़त त्याचे वर्णन देऊन त्यांनी कानोसा घेतला.

"दोन पेपर घेतले की बाणेसाहेब त्यांनी. त्यांना ते पुण्या-मुंबईचे पेपर पाहीजे व्ह्ते. आता इथे आपल्याकडे कुठे मिळतात ? समजून घ्याया तयारच नाय गडी. वर घाई पण. बस सुटेल लवकर दे, असा नुसता घोषाच लावला व्हता." पेपरवाला गुण्या दिड तासापुर्वीची घटना नीट सांगत होता. 'म्हणजे हिचा नवरा इथे होता, मग पेपर घेतल्यावर गेला कुठे ?' बाणेंच्या डोक्यात पोलिसतपास चालू झाला. आता मोर्चा टपरीवजा दुकानाकडे वळला. तिसर्‍या दुकानदाराने बाटली, पाकीटांची खातरजमा केली. पण सदर व्यक्ती पुन्हा आपल्याकडे परतली नाही हे त्याने खात्रीने सांगितलं. आणखी किरकोळ चौकशी करून हवालदार बाणे तिच्याकडे वळले.

"बाई, पोलिसस्टेशनला जाऊया. तक्रार नोंदवावी लागेल. हे असलं कधी घडल नाही गावात. दोन तीनशेची वस्ती आहे इथे. तसं विशेष काही घडत नाही. आपण पोलिसस्टेशनला जाऊ. जमदाडे साहेब असतीलच तिथे, ते ताबडतोब शोध लावतील बघा." तिच्या गोर्‍या गालावरून ओघळणार्‍या अश्रूंनी ते गलबलले. सौजन्य म्हणून तिची बॅग त्यांनी घेतली. ती मुकाट त्यांच्याबरोबर निघाली.
एका जुनाट अशा छोटेखानी वाड्यावर पोलिस स्टेशनचा बॊर्ड होता. बॊर्ड होता म्हणून ते पोलिस स्टॆशन. बाकी सगळा आनंदच होता. बाहेर गुरांनी चक्क गोठा बनवला होता. ते आत शिरले तेव्हा जमदाडे साहेब बनियानवर विसावलेले होते. त्यांना तशा अवस्थेत पाहून हवालदार बाणे ओशाळलेच. तिच्यापासून नजर चोरत त्यांनी जमदाडेंना आवाज दिला.
"साहेब, साहेब."
"बाणॆ, नाईटला यायचं सोडून आता कशाला कडमडलात ?" जमदाडेंनी मिटले डोळे उघडण्याचा त्रास घेतलाच नाही. त्यांच्या या वाक्यात शिवी नव्हती याचा बाणॆंना आनंद झाला.
"साहेब" बाणेंनी स्वर बदलून जमदाडेना जागवण्याचा प्रयत्न केला.
"तुमच्या ०००००००, ....." जमदाडेंनी डोळे उघडले आणि त्यांचा आ तसाच राहीला. तोपर्यत शिवी खाली गळली होती आणि 'खाल्लं शेण साहेबांनी' ही बाणेंच्या चेहर्‍यावर स्पष्ट रिएक्शन होती. जमदाडेंनी तत्परतेने उठून खुर्चीला घातलेला युनिफॉर्म अंगावर चढवला.
"या, बाई बसा." बाणेंनी तिला खुर्ची बसायला दिली.
"जाम उकडतय हो. लोडशेडींग वाढलय आजकाल." बटणं लावता लावता जमदाडेंनी सारवासारव करायला सुरूवात केली.
"काय झाल बाणे? " जमदाडेंनी विषयाला हात घातला. बाणेंनी त्यांच्या तपासासहीत सगळी कथा सांगितली. जमदाडेंचा चेहरा चिंताग्रस्त झाला. बर्‍याच वर्षांनी काही करण्याजोगं काम मिळालं, हा आनंद ही त्यात होताच. पण तो चेहर्‍यावर दिसणार नाही याची त्यांनी काळजी घेतली.
"प्लीज, यांना शोधा हो. मी..........." मघापासून आवरलेला हुंदका एकदाचा बाहेर पडला.
" बाणे, भिवरेना सोबत घ्या व माझी बाईक घेऊन निघा. आख्खं गाव पालथं घाला." ड्युटीवर नसूनही बाणे पुढे सरले.
"इथे कोणाकडे आला होता तुम्ही ?"
"रावराणेंच्या बंगलीवर." त्यातल्या त्यात तिने उत्तर दिले. बाणे जाता जाता थबकले. जमदाडेंकडे पहात त्यांनी 'माहीत असल्याची' मानेनेच खूण केली.
"बाणे आधी तिथे जा. कुठलाच कोपरा सोडू नका आणि सरपंचाना इथे पाठवा." जमदाडेंचा शेवटचा शब्द संपेपर्यंत बाणे बाहेर पडलेही. बाहेर गाडी चालू झाल्याचा आवाज आला आणि जमदाडे तिच्याकडे वळले. कोणीतरी आपल्या नवर्‍याला शोधायला गेलयं हा दिलासा तिला पुरेसा आहे याची त्यांना जाणिव होती.
"हे बघ मुली, रडू नकोस. मला आता नीट सारं काही सुरूवातीपासून सांग. तू कोण ? तुम्ही कुठून इथे आलात ? का आलात वगैरे ?" जमदाडेंनी पोलिसी चवकशीला सुरूवात केली.
"मी निलम खरे. माहेरचं नाव. आता निलम राजेश चव्हाण. आम्ही अमरावतीवरून आलोय. मागच्या महिन्यातच माझं राजेशबरोबर लग्न झालं. ऍरेंज मॆरेज. आई-बाबांनी ठरवलं. मी एकूलती एक. घरचं सारं व्यवस्थित. लखपतींमध्ये मोडणारे. लग्न करून मी सासरी आले त्याच रात्री बाबांना हार्ट अटॅक आला. राजेश मला त्याच क्षणी माहेरी घेऊन गेले. दोन दिवस राहीलेही. आठवड्याभरात बाबा गेले. कळताक्षणी हे आले. बाबांचे दिवस झाले. बाबांच्या अशा अचानक जाण्याने मी पुर्ण खचलेच होते. ह्यांनी सावरलं. बाबांचे स्नेही आहेत. विलास रावराणे. त्यांची इथे नवीनच बांधलेली ही बंगली. माझी बिघडत चाललेली परिस्थिती पाहून त्यांनीच आईला समजावलं आणि फ़ेरबदल म्हणून आम्हाला चार दिवसासाठी इथे पाठवलं. आमच्या दोघांच्याही इथे यायचं मनात नव्हतं. वडीलधार्‍यांचा मान राखून आलो. आज पुन्हा अमरावतीला चाललो होतो आणि..........."पुन्हा हुंदके सुरू झाले. थोडा वेळ थांबून जमदाडेंनी पुढचा प्रश्न टाकला.
"गेल्या चार दिवसात काही विपरित किंवा गावातल्या कोणाबरोबर काही भांडण तंटा वगैरे ?".
"नाही. इथे कोणी कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. आमची सगळी व्यवस्था जनूभाऊच बघत होते." तिने हुंदके आवरत उत्तर दिले.
"जनूभाऊ ?" जमदाडेंची उजवी भुवई वर गेली.
"बंगलीचे केअर टेकर आहेत. म्हातारे आहेत. गेल्या चार दिवसात इथे जास्त फ़िरलोही नाही. इच्छाच नव्हती. त्यामूळे गावात कोणाशी संबंध येण्याचा प्रश्नच नव्हता."
"तुमच्या मिस्टरांचा फ़ोटो आहे का तुमच्याकडे ?" जमदाडेंचा आणखी एक प्रयत्न.
"नाही. आम्ही माझ्या घरूनच सरळ इथे आलो. कॆमेरा घेण्याचे भान होतेच कोणाला ? " आपण फ़ार मुर्खासारखा प्रश्न विचारला असं जमदाडेंना उगाचच वाटलं. दोन क्षण थांबून त्यांनी सिगारेट शिलगावली. स्वत:शीच विचार करत ते खिडकीजवळ आले.
लखपती बापाची एकुलती एक लेक. इस्टेटीची वारस. अशावेळेस खर तर तिने गायब व्हायला हवं पण गायब झालाय नवरा. मग यात संशयित कोण ? त्याची बायको..... छ्यां... ती तर इथेच आहे. तोच पेपर आणायला गेला. स्वत:हून. ती नकोच म्हणत होती. कट इट.
विलास रावराणे....... त्याला काय मिळणार म्हणून तो हे करेल ? एखादं शत्रूत्व.... पोरीला मारेल. जावयाला कशाला ? वेगळा सुड घ्यायचा असेल तर..... कट इट. हे जर-तर बरोबर नाही.
जनूभाऊ..... त्याचा काय संबंध .........कट कट कट. आता उरला कोण ????
स्वत: राजेश..... जाणून बुजून नाहीसा झाला असेल तर.... बायको आवडत नसेल.... दुसरी कोणीतरी मनात असेल..... मग हिच्याशी कशाला लग्न करेल.... जबरदस्तीने केलेलं लग्न..... शक्यता आहे... पैशासाठी लग्न केलं असेल तर कशाला पळेल...... इथे तर इस्टेट चालत आली आहे..... लवमॅरेज करता आलं नसेल म्हणून पळाला असेल..... पण लग्न करून, लग्नाच्या बायकोला अशा अनोळखी ठिकाणी सोडून कशाला कोण नस्तं लफ़डं गळ्यात बांधून घेईल ? हे पण कट कट कट......
कोणीतरी अनोळखी व्यक्ती जी आतापर्यंत या सगळ्या कथेत आलेली नाही. त्याने जुन्या वैमनस्यातून त्याला पळवलं असेल कदाचित ? करेक्ट. हेच. पळवलं असेल. तेही दिवसा ढवळ्या. बसस्टँडवरून. पाच-पन्नास लोकांच्या नकळत.......... काय जमदाडे ... कसले टुकार तर्क लावताय ? जमदाडेंनी एक ठेवणीतली शिवी स्वत:लाच हासडली. धुरामागून धुराची वलये वार्‍यावर विरत होती आणि नव्या तर्कवितर्कात जमदाडेंचा गोंधळ वाढत होता. मेंदूतल्या मेंदूत विचारांची काटछाट करून जमदाडे त्रस्तावून गेले. तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला आणि जमदाडेना हायसं वाटलं. बाणे नक्कीच काहीतरी खबर घेऊन आले असतील हा विचारच तेव्हा सुखावह होता. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहीलं. बाणे बाईकवरून उतरले ते पडेल चेहर्‍यानेच. जमदाडे पुर्ण फ़्लॅट.
"सापडले का ?" बाणेंना पाहताच निलम आत येणार्‍या बाणेंच्या दिशेने धावली. बाणे काहीच बोलले नाहीत. आतापर्यंत सावरलेले निलमचं अवसान पुर्ण गळालं आणि बाणेंना काही कळायच्या आतच ती कोसळली. बाणे बावरले. क्षणभर त्यांना सुचेचना काय करायचं ते. जमदाडे पुढे सरसावले. त्यांनी मग तिला बेंचवर झोपवलं. डोक्याखाली उशी दिली.
"भिवरे, डॉक्टर बोलवा. एखादं बाईमाणूसही बोलवा. सरपंचाना सांगितलत का ? " जमदाडेंनी सुचनाची सुचीच काढली. भिवरे बाहेर पळाले आणि जमदाडे बाणेंकडे वळले.
"बाणे, काहीच माहीती नाही ?"
"नाही साहेब. जन्याभाऊंशी बोललो. ते म्हणाले, पोर आल्यापासून नुसती बापाशीच्या आठवणीच काढतेय आणि नवरा तिची समजूत काढतोय. चार दिवस हा एकच कार्यक्रम." बाणेंनी महत्त्वाचा तपशील दिला.
"बाणे. पहिल्यांदा काहीतरी या टिनपाट गावात घडलयं आणि घडलयं ते पण असं विचित्र घडलय की काय कळायला मार्गच नाय. डोस्क्याचा पार भुगा झाला विचार करून." जमदाडे आपलं दु:ख व्यक्त केलं.
"यांच्या घरच्यांना कळवायला हवं" बाणे अजुन मुद्द्यावरच.
"बाई शुद्धीवर आल्या की नंबर घेऊन कळवूच." इति जमदाडे.
"रावराणेंचा नंबर आणलाय मी." बाणेचा तपास एकदम पुर्णपणे.
"मग लावा फ़ोन आणि कळवा त्यांना."
निलम शुद्धीवर आल्यावर गावातल्या दोन महिलांच्या मदतीने जमदाडेंनी तिला बंगलीवर पाठवलं. आजूबाजुच्या गावात सरपंचांची खास माणसं पाठवून चवकशी करायला सांगितलं. काहीही करून जमदाडेंना ही केस सॉल्व करायची होती.
कधी नव्हे ते दुसया दिवशी सकाळी-सकाळी ते एकटेच ठाण्यात हजर होते. हळूहळू इतर लवाजमा जमा झाला. त्यांनी दिलेल्या वर्णनांचा जीवंत वा मॄत असा कोणीही आजुबाजूच्या गावात सापडला नाही. थोड्याच वेळात निलमची आई, रावराणे, राजेशचे आईवडील व धाकटा भाऊ तेथे पोहोचले. जमदाडेंनी आपल्या संपुर्ण चातुर्याचा वापर करत प्रत्येकाची कसून उलटतपासणी केली. पण निलमने जे सांगितलं त्यात व त्यांच्या जबानीत तसूभरही फ़रक नव्हता. राजेशबरोबर शत्रूत्व असणारा कोणी त्याच्या भावाच्या माहीतीतही नव्हता.
सगळ्यांची जबानी दहावेळा वाचून झाली. सगळ्या घटना जमदाडेंनी कागदावर सलग उतरवल्या. संशयाच्या पाट्यावर जवळपास प्रत्येकाला नीट घासून पाहीलं पण कशाचा काहीच पत्ता लागत नव्हता.
"बाणे, आता ही केस एकच माणूस सोडवू शकतो." जमदाडॆ हताश होऊन उदगारले.
"तो कोण साहेब ? " बाणेंनी उत्सुकतेने विचारलं.
"स्वत: राजेश. तो जीवंत असेल तर आणि मेला असला तरीही." जमदाडे बोलले आणि थोतरीत मिळाल्यासारखा बाणेंचा उत्सुक चेहरा गुडघ्याला पोहोचला.
"बाणे" अचानक आठवल्यासारखे जमदाडे उठले."फ़ोटो मिळाला का राजेशचा ?"
"नाही साहेब. बातमी कळल्याबरोबर सगळे तडक निघून आले. त्यामुळे फ़ोटो कुणाकडे मिळालाच नाही. शिवाय गरज काय त्याची ? त्याची सगळी माणसं इथं आहेत की. कोणी सापडला तर डायरेक्ट ओळखपरेड होईल." बाणे बसल्या जागेवरून जमदाडेंच्या दिशेला फ़िरले.
"तेही बरोबर म्हणा. पण फ़ोटो असता तर आपल्या लोकल पेपरमध्ये दिला असता 'आपण यांना पाहीलतं का ? ' म्हणून. कोणी तरी भेटेलच ज्याने या राजेशला पाहील असेल. " जमदाडे अजूनही नव्या नव्या विकल्पांच्या शोधात होते.
"साहेब, पॊईंट एकदम बरोबर आहे तुमचा." बाणेंनी अनुमोदन दिलं. "पण मला कधी कधी काय वाटते साहेब, हे सगळं त्या पेपरमुळेच रामायण घडलय. आता नसता घेतला पेपर तर काय बिघडणार होतं काय ?"
बाणेंच्या या मुक्ताफ़ळांवर हसावं की रडावं ते जमदाडेंना कळेना.
चार दिवसांनी रावराणे निरोप घ्यायला आले.
"आम्ही सगळे अमरावतीला परत चाललोय. निलमची अवस्था फ़ारच वाईट झालीय. आगीतून काढून तिला फ़ुफ़ाट्यात टाकल्यासारखं वाटतयं मला. अजून काहीच वाईट बातमी नसल्याने आम्ही आशेवर आहोत. काही कळलचं तर आम्हाला कळवा. आमचे सर्वांचे डिटेल्स तुमच्याकडे आहेच."
"नक्कीच. तुम्ही काळजी करू नका. फ़क्त तपासासाठी राजेशचा फ़ोटो तेवढा पाठवून द्या." जमदाडेंनी आपल्यापरीने आश्वासन दिलं.
"मागवलेला आहेच. आज ना उद्या तुम्हाला मिळेलच." रावराणेंनी खात्री दिली.
फ़ोटो मिळाला आणि जमदाडेंनी चहूबाजूस त्यांची फ़ौज पिटाळली. नकारघंटेशिवाय काहीच हाती लागत नव्हतं. अमरावतीवरून फ़ोन येत होतेच. शेवटी खात्याच्या बजेटप्रमाणे फ़ोटो पेपरातही दिला आणि छापून आलेल्या काळ्या फ़ोटोपेक्षा लेखी वर्णन जास्त योग्य होतं या निष्कर्षावर ते पोहोचले.
सगळ्यांचा महिना - दिड महिना वाट पहाण्यातच गेला. वर्णानाशी मिळतीजुळती कोणती बॉडी ही न सापडल्याने अजून आशा होती.

आणि एक दिवस अचानक...............

गुलमोहर: 

आणि एक दिवस अचानक............... >>> काय घडलं आणि आता कधी मिळणार वाचायला... तुम्ही आणि विशालने मस्त खेळ सुरु केलाय.. क्रमशः कथा टाकायच्या आणि उत्सुकता ताणुन ठेवायची Happy ... पण पुढचा भाग लवकर टाका... खुप उत्कंठावर्धक कथा आहे.

पल्लवी

....

आणि तो दिवस लवकर येऊ दे....
जेव्हा पुढचि कथा वाचायला मिलेल.....

रन्गात रन्गुन रन्ग माझा वेगला,
गुन्त्यात गुन्तुनि पाय माझा मोकला....

ह्म्म.. उत्सुकता ताणली जात्येय, लिहा लवकर!

अरे यार तुम्ही असे अर्धवट नका ना लिहू..... सस्पेन्स कथा असेल तर पूर्ण टाका ना एकाचवेळी... माझातर उत्साह मावळतो असं पुढचा भाग वगैरे असेल तर...
टीव्ही सिरिअलसारखं नसतं ना इथे... तिथे ते रिकॅप दाखवतात.... नाहीतर तुम्हीसुध्दा रिकॅप लिहित जा.. Proud

सुरूवात छान आहे... पुढचा भाग लवकर येऊ दे... Happy

मस्त, उत्कंठावर्धक ...

कौतुक, काय एकेक भुंगे सोडतोयस....
ओ, पुढचा भाग लवकर टाका की... म्हणजे पुढच्या तासाभरात तरी...
उरलेला दिवस डोक्यातल्या भुंग्याशिवाय घालवावा म्हणतेय.

रे कौतुका........... असे एकदम ताणुन धरु नये, आता टाकतो का पुढचा भाग !!
बेष्ट रे !
...................................................................
इथे रात्रंदिन, युद्धाचाच प्रसंग, ........... !

मस्त आहे. पुढच्या भागाची वाट्पहात अहोत.

लई भारी... एकदम झ्याक...
-
सँटीनोशी सहमत... पुढच्या भागात रिकॅपसुद्धा टाका... Wink

पुढ्चा भाग लवकर टाका, उत्सुकता जास्त ताणता येत नाही...सगळेच जण खोळंबले आहेत...

पुढे काय होतेय, ह्या उत्सुकतेपोटी हावर्‍यासारखे कथा वाचून काढली..नेहमीसारखी च रहस्यमय, छान....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृध्दीचे ,भरभराटीचे ,उन्नतीचे , समाधानाचे आणि आनंदाचे जावो , ही सदिच्छा!!!

कौतुक, सुरुवात झक्कास.. Happy
पुढचं लवकर येऊ देत.

अहो किती अन्त बघणार आमचा. टाका पटापट पुढचा भाग.

आणि एक दिवस अचानक>>>>आणि एक दिवस अचानक काय???????????? पटकन लिहा पुढचे भाग आणि शेवटचाहि Happy

कौतुक
तुम्हीही 'दोन मिनिटात येतो...' असे म्हटल्यासारखे करून गायब झालात...

एक काय दोन दिवस झाले Sad अजून पत्ता नाही या कौतुकचा. जरा फोटो छापा हो.

------------------------------
पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती | सगुण रुपाने येऊन स्वामी स्विकारा आरती ||

खुप ताणुन धरलस रे बाबा, आता सान्ग पुढे काय झालं ते.
---------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

लवकककककककककककककककककककर टाका पुढचा भाग...खुपच मस्त रन्गली आहे कथा

आणि एक दिवस अचानक>>>>आणि एक दिवस अचानक काय???????????? पटकन लिहा पुढचे भाग आणि शेवटचाहि


शिरोडकर तुम्ही शांतपणे लिहायचे तेंव्हा लिहा. नाहीतरी मला दोन तीन दिवस वेळ नाहीये वाचायला. नि तो राजेश नाही सापडला तरी मला रात्री शांत झोप येईल. तेंव्हा घाई करू नका. मला तर ही एका मोठ्ठ्या रहस्यपटाची सुरुवात दिसते आहे. विचार करकरून कथा फुलवा. सिनेमाचे हक्क राखून ठेवा. Happy
Light 1

हे काय बरोबर नाही राव....... आधी उत्कठा ताण ताण ताणायची अन मग क्रमशः................

बाकी कथा लई भारी........