सावधान! चालक (अजूनही) शिकत आहे...

Submitted by ललिता-प्रीति on 8 December, 2008 - 05:52

(वैधानिक इशारा(?) : क्लास लावून कार चालवायला शिकताय? किंवा शिकायचा विचार करताय? तर हा लेख आपापल्या जबाबदारीवर वाचा. याआधीच क्लासला जाऊन कार चालवायला शिकला आहात? मग हा लेख बिनधास्त वाचा. तुम्हाला पुनःप्रत्ययाचा आनंद देण्याची जबाबदारी माझी.)

आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक यंत्रं, उपकरणं वापरत असतो. काही काळ ती उपकरणं हाताळली की त्यांच्या सर्व बारकाव्यांनिशी आपण ती वापरण्यात तरबेज होतो. त्यासाठी कुणाची शिकवणी लावायची गरज पडत नाही. पण कार चालवण्याचं मात्र तसं नाही. (अर्थात, स्वतःस्वतःच, कुणाच्याही मदतीशिवाय कार चालवायला शिकणारेही असतील. त्यांना या लेखाच्या खोलात शिरण्यापूर्वीच माझा दंडवत. पण कुणाच्याही मदतीशिवाय शिकण्यासाठी कार अश्या लोकांच्या ताब्यात देणे हीच त्यांना खरं म्हणजे सर्वात मोठी मदत असते. त्यामुळे त्या दंडवताचा पुनर्विचार होणं आवश्यक आहे असं नाही का वाटत तुम्हाला?)
तर - गरज म्हणून, आवड म्हणून, घरात नवीन कार आली आहे म्हणून किंवा उगीच - ’कार चालवायला शिकलं पाहिजे’ असं वाटायला लागतं. आता ’शिकलं पाहिजे’ म्हणजे कुणीतरी शिकवलं पाहिजे. घरातल्या कुणाकडून ही गोष्ट शिकायची तर त्यात शिक्षण कमी आणि भांडाभांडी, रागवारागवीच जास्त होते. (नवरा-बायकोची तर होतेच होते.) मित्रमंडळींकडून शिकावं म्हटलं तर कोण सहजासहजी गाडी आपल्या ताब्यात देणार? तेव्हा राहता राहिला ’ड्राईव्हिंग स्कूल’चा पर्याय. तिथे ना भांडाभांडी ना रागवारागवी. पैसे मोजायचे आणि त्याबदल्यात चारचाकी चालवायला शिकायची. शिवाय दहा-पंधरा दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चारचाकी चालवायचा परवाना (बऱ्यापैकी) विनासायास मिळून जातो हा त्यातला अजून एक फायदा. (नाहीतर एखाद्याला विशेष कटकटीविना परवाना देणे हे आपल्याकडच्या वाहतूक अधिकाऱ्यांना कमीपणाचं वाटतं!) तेव्हा, असा सगळा (सारासार वगैरे) विचार करून ’ड्राईव्हिंग स्कूल’मध्ये नावनोंदणी केली जाते आणि त्या ’शाळेचा’ पहिला दिवस उजाडतो.

ही एकच अशी शाळा असेल की जिथे शिक्षकांसकट सर्व विज्ञार्थी पहिल्या दिवसापासूनच वर्गाच्या बाहेर असतात! मला माझा तो दिवस आजही आठवतोय. प्रामाणिकपणे सांगायचं तर त्यापूर्वी मी कारमध्ये फारशी बसले नव्हते. चालकाच्या जागेवर बसण्याचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. त्यामुळे माझ्या चेहेऱ्यावर ’अरे, आता फक्त थोडे दिवस थांबा. मग बघा. अशी गाडी चालवेन की बघतच रहाल’ असा आविर्भाव होता.
त्या ’ड्राईव्हिंग स्कूल’च्या बाहेर निरनिराळ्या तीन-चार प्रकारच्या ’मारुती’ गाड्या उभ्या होत्या. प्रत्येकीच्या डोक्यावर ’सावधान! चालक शिकत आहे’ अश्या मोठ्या अक्षरातल्या पाट्या होत्या. (त्या शिकणाऱ्या चालकाला जर सर्दी झाली तर ती पाटी ’सावधान! चालक शिंकत आहे’ अशी बदलत असतील का अशी एक शंका उगीचच मनाला चाटून गेली!) मला एका गाडीत बसायला सांगण्यात आलं. आतून ती गाडी काय छान होती! तो स्पीडोमीटर, ते निरनिराळे आकडे, काटे, चमकदार लाल-पांढऱ्या-काळ्याची रंगसंगती, डावीकडच्या ’गीअर लीवर’वरचे २, ४ आणि इंग्रजी ’आर’ आणि त्यांच्या डोक्यावर १ आणि ३ असे कोरलेले आकडे - मला ते सगळं निरखून बघायचं होतं हो. इतक्यात मास्तरांनी पहिला धडा शिकवायला घेतला - चालकाने इकडे-तिकडे न बघता नेहेमी समोरच्या काचेतून सरळ बाहेर(च) बघायचं. आता मला सांगा, जर बघायचंच नाही तर मग त्या कोरलेल्या आकड्यांचा काय उपयोग? इतकी चकचकीत, आकर्षक रंगसंगती कशासाठी? गाडीत बसणाऱ्या इतर लोकांसाठी? पण विचारायची सोय नव्हती कारण तोपर्यंत पुढचा, चारचाकीच्या मुळाक्षरांचा धडा सुरू झाला होता - ए ए ’ऍक्सिलरेटर’चा, बी बी ’ब्रेक’चा, सी सी ’क्लच’चा. या ’ए-बी-सी’चा क्रम मात्र नेमका उजवीकडून डावीकडे असा उलटा होता. तो सुरूवातीला लक्षात राहणं कठीणच होतं. चालकाचा डावा पाय हा नेहेमी ’सी’ला समर्पित असतो, उजव्या पायाच्या निष्ठा मात्र ’ए’ आणि ’बी’ला आळीपाळीनं वाहिलेल्या असतात हे ही कळलं. मग पुढची दहा-पंधरा मिनिटं बसल्या-बसल्याच मास्तरांच्या इशाऱ्यानुसार दोन्ही पाय त्या ’ए बी सी’वरून इकडून तिकडे नाचवण्याचा सराव पार पडला, ते ही खाली न बघता. (शिक्षकांच्या डोळ्यांदेखत विद्यार्थ्यांना ’ए, बी, सी’ ना पायदळी तुडवायची ’फुल्ल’ परवानगी होती!) सरावादरम्यान माझ्या डाव्या पायानं न राहवून ’बी’वर देखील चार-दोन उड्या मारल्याच!
यानंतर पाळी होती ’गीअर लीवर’ची. डाव्या पायानं क्लच दाबलेला ठेवून त्या लीवरची मूठ आपल्या मुठीत आवळून गीअर बदलायचा सराव झाला. त्याकडे न बघण्याची अट कायम होतीच. आपल्याला शाळा-कॉलेजमध्ये ’जे करताय त्याकडे लक्ष द्या’ असा शिक्षकांचा पहिला इशारा असतो आणि या शाळेत मात्र विद्यार्थी जे करतात तिकडे त्यांनी बिलकुल बघायचंच नाही हेच घोषवाक्य! करायचं एक आणि बघायचं भलतीकडेच (म्हणजे काचेतून बाहेर) हे म्हणजे मजेशीरच होतं!

(न बघताच) इतके सगळे सराव पार पडल्यानंतर एकदाची ती गाडी सुरू करायची वेळ आली. खरंच की! इतका वेळ गाडीचं इंजिन बंदच होतं नाही का! आता गाडी सुरू करायची तर किल्ली फिरवायला हवी. मास्तरांनी त्या ’की होल’ आणि किल्लीचं मात्र डोळे भरून दर्शन घेऊ दिलं. गाडीचं इंजिन सुरू झालं. गीअरच्या दांड्याला त्या इंग्रजी ’आर’ च्या कोपऱ्यात चिणून, दोन्ही पायांची काहीतरी सर्कस केल्यावर गाडी थोडी मागे सरकली. ’आपल्याला ही गोष्ट त्यामानानं फारच सहज जमली’ असं वाटलं. ’आपण पंधरा दिवसांच्या आतच गाडी शिकणार बहुतेक’ असा त्यावर मुलामा देखील चढवावासा वाटला. पण मला ताबडतोब माझी जागा दाखवून देण्यात आली. माझ्या पायाशी असणाऱ्या ’ब्रेक’ आणि ’क्लच’ची जुळी भावंडं मास्तरांच्याही पायाशी वास्तव्याला असतात अशी माहितीत भर पडली. म्हणजे पहिल्या दिवसाच्या शिकवणीअंती माझ्या पायांच्या (यशस्वी) सर्कशीला त्या (रिंग)मास्तरांच्या ’ब्रेक’ आणि ’क्लच’चा चाबूक कारणीभूत होता तर!

नंतरचे दोन-तीन दिवस छोट्याछोट्या गल्लीबोळांतून थोडाफार सराव झाल्यावर चौथ्या दिवशी गाडी ’हाय-वे’ वर न्यायची आहे आणि चौथ्या गीअरचा प्रथमच वापर करायचा आहे असं कळलं. माझ्या चेहेऱ्यावरच्या आविर्भावाचा दुसरा अध्याय सुरू झाला.
हे असले (दमदार!) आविर्भाव गाडी रस्त्यावर आणेपर्यंतच टिकतात. समोरची आडवी-तिडवी वाहतूक, पु. लं. च्या शंकऱ्यासारख्या पाचोळ्याप्रमाणे इकडे-तिकडे धावणाऱ्या दुचाकी गाड्या हे सगळं दिसताक्षणी तो चेहेरा असा काही बदलतो की विचारू नका. आजही भर रस्त्यात ’चालक शिकत आहे’ अशी पाटी मिरवणारी गाडी दिसली की मी त्या शिकाऊ चालकाचा आधी चेहेरा बघते. तो हवालदील, हैराण चेहेरा बघण्यासारखी दुसरी करमणूक नाही! अश्या चेहेऱ्याची माणसं डावीकडे वळायचं असेल तरीही उजवीकडे हात दाखवतात, क्लचसाठी हमखास उजवा पाय पुढे आणतात, ब्रेक दाबायच्या ऐवजी हॉर्न वाजवतात आणि मग जे घडतं ते म्या पामराने काय सांगावं!
त्यादिवशी ’हाय-वे’वर माझा चेहेराही अगदी तस्साच झालेला असणार. कारण, चौथा गीअर टाकायच्या वेळी मी एखाद्या ’घासू’ विद्यार्थ्याप्रमाणे तीन दिवस आधी शिकलेला धडा नीट लक्षात ठेवून तो गीअरचा दांडा सरळ खाली ओढण्याऐवजी परत एकदा जोरात ’आर’ च्या कोपऱ्यात चिणला! तडकाफडकी उलटं जायची आज्ञा मिळाल्यामुळे तिसऱ्या गीअरमध्ये तीसच्या वेगानं चाललेल्या गाडीनं कान किटवणाऱ्या आवाजात ताबडतोब आपला निषेध नोंदवला. आपल्या हातून असा कुठला प्रमाद घडला ते काही मला पटकन लक्षात येईना. शिकाऊ चालक हे असले उद्योग करतात म्हणूनच त्यांच्याकडून भरमसाठ फी आकारली जात असणार बहुदा! त्यादिवशी, त्यावेळी शेजारी समजा माझा नवरा बसलेला असता तर आमच्यात तिथे तिसरं महायुद्धच घडलं असतं. पण म्हणूनच ’ड्रायव्हिंग स्कूल’चा पर्याय इतका लोकप्रिय आहे. कारण पहिल्या दिवसापासूनच गाडीची वाट्टेल ती वाट लावायची आपल्याला मुभा असते आणि एकदा हा असा प्रमाद घडला की पुढचं सगळं सुरळीत पार पडतं! बघताबघता पप्पू चांगला चारचाकी-चालक बनतो... निदान त्याला देऊ केलेला चालकाचा परवाना तरी तसंच दर्शवतो.

आज माझ्याकडेही चारचाकी चालवण्याचा परवाना आहे. कागदोपत्री मी कार व्यवस्थित आणि चांगली(!) चालवू शकते पण आजही ’की होल’कडे न बघता त्यात मी किल्ली सरकवू शकत नाही, ’हेडलाईटस’ लावायचे असतील तेव्हा माझ्या हातून हमखास ’वायपर्स’ सुरू होतात...
मला आजही रस्त्यावरचे खड्डे शिताफीनं चुकवता येत नाहीत की पिवळा दिवा लाल व्हायच्या आत चौकातून गाडी दामटता येत नाही. चढावरून जाताना गाडी अचानक थांबवावी लागली की माझा चेहेरा अजूनही ’तस्साच’ हवालदिल होतो. (कारण नंतर ती पुढे कमी, मागेच जास्त जाणार आहे हे फक्त मलाच ठाऊक असतं.) सिग्नलला थांबलेले असताना अचानक दिवा हिरवा झाला की माझी गाडी हमखास बंद पडते आणि मग (नऊ वर्षं, चार महिने आणि सतरा दिवसांनंतरही) ’हा चालक (अजूनही) शिकत आहे’ हे पाहणाऱ्याच्या लगेच लक्षात येतं!

-----------------------------------------------------------------

'स्त्री' मासिकाच्या फेब्रुवारी-२०११च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला.

गुलमोहर: 

>>’ड्राईव्हिंग स्कूल’चा पर्याय. तिथे ना भांडाभांडी ना रागवाराग>>..
अगदी अगदी! Happy

मस्तच! ललिता-प्रीती, सुरेख लिहिता. माझ्या गाडी शिकण्याचे दिवस आठवले.

मस्तच. काही पंचेस क्लास.

अगदी अगदी...

आपल्याच लोकांकडून गाडी शिकणे हा पर्याय कधीच उत्तम नाही :), जेवढा म्हणून आपण गाडी 'व्यव्स्थीत चालवू शकता हा confidenc' असेल तो पुर्णपणे जाईल. आधीच सुरुवातीला भांडाभांडी,नको तेव्ढ्या सुचना नी शेवटी गाडी आदळणे अगदी व्यवस्थीत क्रमाने होतात. Happy

छान लिहिलंय... Happy

त्यामानाने अमेरिकेतल्या ऑटोमॅटीक गाड्या सोप्या असतात शिकायला.. 'क्लच' नावाची भानगडच नसते...

छान लिहिलय! Happy अगदी पुनःप्रत्ययाचा आनन्द मिळाला! Proud
माझ गाडी शिकण ही देखिल एक कथाच हे! पण परत कधीतरी सान्गेन! Happy
सद्ध्या मात्र थोरला त्याच्या मामाकडून गाडी शिकतो हे! "धन्य ते मामा-भाच्चे" Lol
...;
आपला, लिम्बुटिम्बु

छान लिहिलंय.. माझी गाडी शिकायची मानसिक तयारी तरी झाली आता... Happy

छान लिहीता हो तुम्ही. भाषा मिश्किल आणि वेगळीच शैली आहे. हा लेख तर अगदीच जमलाय. काही पंचेस खूप मस्त आहेत.
>>चढावरून जाताना गाडी अचानक थांबवावी लागली की माझा चेहेरा अजूनही ’तस्साच’ हवालदिल होतो.
हहपुवा

मजा आली..
ब्रेक दाबायच्या ऐवजी हॉर्न वाजवतात >> अगदी अगदी! Lol
---------------------------------------------------------------------------
The only thing you take with you when you're gone is what you leave behind.

लले....माझा ड्रायव्हींग क्लास आठवला...शेवटचा परिच्छेद तर अगदी जसाच्या तसा माझ्या बरोबर घडतोय असं वाटलं Proud

आज माझ्याकडेही चारचाकी चालवण्याचा परवाना आहे. कागदोपत्री मी कार व्यवस्थित आणि चांगली(!) चालवू शकते >>>> अगदी छान गाडी कागदोपत्री चालवते Happy

आजही ’की होल’कडे न बघता त्यात मी किल्ली सरकवू शकत नाही>>> हे आजच कळले Happy

’हेडलाईटस’ लावायचे असतील तेव्हा माझ्या हातून हमखास ’वायपर्स’ सुरू होतात...>>> बरोबर Happy

सिग्नलला थांबलेले असताना अचानक दिवा हिरवा झाला की माझी गाडी हमखास बंद पडते >>>> आणि मागच्या गाड्या तुफान हॉर्न वाजवतात -- वर -- हम्म लेडी ड्रायव्हर असेच व्हायचे Sad

सगळे अजुन अनुभवते. Happy

घरातल्या कुणाकडून ही गोष्ट शिकायची तर त्यात शिक्षण कमी आणि भांडाभांडी, रागवारागवीच जास्त होते. (नवरा-बायकोची तर होतेच होते.) >>> माझ्या घरची कथा. पण आमच्या घरी चालक अजून शिकलाच नाही........... Happy

छान लिहीलय........................

ललिता, माझे अनुभव लिहिलेस असंच वाटतय, की खरच होतीस मागच्या सीटवर Happy
फार मस्त अन सहज लिहिलय, मजा आली वाचताना.
अन तू म्हणालीस तसं >>> तुम्हाला पुनःप्रत्ययाचा आनंद देण्याची जबाबदारी माझी<<<दिलास अगदी फर्स्ट हँड पुनःप्रत्यय Happy
मस्त गं !

<<घरातल्या कुणाकडून ही गोष्ट शिकायची तर त्यात शिक्षण कमी आणि भांडाभांडी, रागवारागवीच जास्त होते. (नवरा-बायकोची तर होतेच होते.) >>
अगदी मनातल. लले नेहमीप्रमाणे . बेस्ट.

मस्तच लिहिलय्स.
मी एका आर्मीतल्या वडीलांच्या मित्रा कडून शिकले गाडी चालवायला त्या मुळे फारच काटेकोर आणि शिस्तबद्ध चालवते Proud लले . माझ्या कडे क्लास लावायला हरकत नाही Proud

तो हवालदील, हैराण चेहेरा बघण्यासारखी दुसरी करमणूक नाही! >>> अगदी अगदी... मी शिकत असताना समोरून दुसर्‍या ड्रायव्हिंग स्कूलची कार आली की एकच विचार मनात यायचा... "भला उसका चेहरा मेरे चेहरे से उजला कैसे" :p लले गाडीचं जाऊदे... लेख धम्माल झाला आहे... :d

RTO मधे टेस्टिंगच्या वेळी इनस्पेकटर बाजूच्या सिटवर बसल्यावर महिन्या भराची ट्रेनिंग पणाला लावून मुली कश्या टेस्ट ड्रायव्ह देतात त्याची ही धम्माल... माझ्या RTO टेस्टच्या वेळी गाडीत ४ जण त्यात १ मुलगी... तिचा नंबर पहिलाच लागला... म्हंटलं झालं आमच पण लायसन बोंबलणार... त्यातच त्या रुटवर एक लेफ्ट U टर्न होता... साहेबाने लेफ्टचा सिग्नल द्यायला सांगून त्या मुलीला U टर्न घेण्याची आज्ञा केली... आधी तिने हात बाहेर काढून राईटचा सिग्नल दिला आणि साहेबाकडे पाहिले... साहेबाच्या आकुंचन पावलेल्या भुवया पाहून तिने लगबगीने लाईट सिग्नल साठी एक दोन बटणं दाबली... आणि भर उन्हात आमची हसून हसून पुरेवाट झाली.
सावधान! चालक (अजूनही) शिकत आहे... मात्र हताशपणे हलणार्‍या वायपरकडे पहात होती... Rofl

भला उसका चेहरा मेरे चेहरे से उजला कैसे >>> Rofl

महिन्या भराची ट्रेनिंग पणाला लावून मुली कश्या टेस्ट ड्रायव्ह देतात त्याची ही धम्माल >>> Lol (हसत हसत झाईर णिषेद :फिदी:)
मला लायसन्सच्या दिवशी भरून वाहणार्‍या मुंबई-अहमदाबद हाय-वेवर उजवीकडे यू-टर्न मारायला सांगितला होता. बहुतेक मी मारला असावा बरोबर... कारण माझा लायसन्स त्याच दिवशी मंजूर झाला Proud

Pages