कुत्र्याविषयी थोडे..

Submitted by अजय भागवत on 21 January, 2011 - 19:41

लहानपणी कुत्रा पाळण्याचा हट्ट पालकांकडे करणारे अनेक असतात. अशा हौशीपायी कुत्र्यांबद्द्ल अनेक गमतीजमती माहीती झाल्यात, त्याच येथे मांडल्या आहेत.

कान आणि नखे

पाळलेल्या पहील्या कुत्रीचे नाव लायका ठेवले होते. लायका हे रशियाने मानवाला अंतराळात पाठवण्याआधी ज्या कुत्रीला पाठवले होते तिचे नाव. जिन्याखालील त्रिकोणी जागेत तिचे घर मस्तपैकी सजवले होते. तिला पिल्ले झाली, त्यात प्रत्येकाचे स्वभाव वैशिष्ठ्य समजुन घेता-घेता माहीती साठत गेली.
Laika.jpg

असे लक्षात आले की, सरळ कानाचा कुत्रा जास्त तिखट असतो, तो अंगावर धावुन येतो, भुंकतो, घाण खात नाही. ह्याउलट खाली कान पडलेले कुत्रे तुलनात्मक सौम्य असतात. कुत्रीला ४-५ पिल्ले झाली की, एखाद-दुसरे सरळ उभ्या कानाचे पिल्लू असते.
नखांच्या संखेवरुनही कुत्र्याचा स्वभाव ओळखता येतो. कुत्र्याला पुढच्या पायाला नेहमी ५-५ नखे असतात- ४ पंजाला व एक थोडे वर-मागील बाजुला (आपल्या पायाच्या घोट्याजवळ येइलसे).
DogDewClawJake1_wb.jpg

पण मागच्या पायांची नखसंख्या मात्र वेगवेगळी असते. ढोबळमानाने ८०% कुत्र्यांच्या मागील पायाला ४-४ नखे असतात. उरलेल्या २०% कुत्र्यात ५-४, ५-५, ५-६, ६-६ अशी संख्या असु शकते. मी ह्यातील प्रत्येक प्रकारचे कुत्रे पाळलेले आहे. आम्ही अशा कुत्र्यांना त्यांच्या नखांवरुनच ओळखत असु- १८ नखी, १९, २०, २१, २२ नखी. त्यात एखादे कुत्रे सरळ कानी असेल तर डब्बल धमाल. जितकी जास्त नखे, तितके ते कुत्रे हुशार असते.
800px-HindLegDualDewClaw.jpg

कुत्र्याचे पिल्लू रस्त्यावरुन उचलूनच आणावे लागे (किंवा एखादा दयाळू हवे तर एखादे पिल्लू घेऊन जा असे सांगे)- दुकानातून विकत आणणे वगैरे प्रकार अलिकडचे. मित्र-मित्र मिळून कुत्रा-शोध मोहीमेला जात असु. कुणाकडे तरी आधीच माहीती आलेली असे की, अमक्या-तमक्या गल्लीत कुत्र्याची पिल्ले बघितली. मग त्या पिल्लांच्या वर्णन करण्यात तो रमुन जाई. त्यात अनेक बाता पण मारल्या जात. "त्याच्या कपाळावर टिळा आहे / ओम आहे", "काळे-पांढरे ठिपक्यावालं पिल्लू सरळ कानावालं आहे". कधी एकदा जाऊन ती पिल्ले डोळे भरुन पाहतोय असे सगळ्यांना होई. पिल्ले शोधतांना सतत मागील पायाकडे लक्ष ठेवुन जास्तीत जास्त नखांचे कुत्रे मिळवण्यासाठी धडपड असे. असे कुत्रे मिळाले की, इतका आनंद होई की बस!

पाळणे व गमावणे

पिल्लू रस्त्यावरुन आणलेले असल्यामुळे ते अगदी घाणेरडे जरी नसले तरी, असेच धरुन न आणता, पोत्यात घालून आणत असु. म्हणजे कुत्रीपण मागे लागायची शक्यता नसे. घरी आणून धाब्यावर नेले जाई व त्यास आंघोळ घालून त्याच्या अंगावरील / कानातील जळवा-सदृश आळ्या काढल्या की, एकदम शांतपणे झोपी जाई. ह्यानंतर नामकरण केले जाई व भरपूर दुध आणि त्यात चपात्या कुस्करुन त्याच्या दिमतीला ते ठेवले जाई. रात्रभर कुई-कुई करत त्यास आईची आठवण येई, आम्हालाही वाईट वाटे पण स्वत:ला समजावत असु की, अरे, आपण तर ह्याची जास्त काळजी घेतोय, वगैरे. कुई-कुई आवजाने शेजारी वैतागुन जात पण शेजारी समंजस असत.
दुस-या दिवशी शाळेत गेलो की, घरी येई पर्यंत त्यास खाऊ-पिऊ घालायची जबाबदारी अर्थातच घरच्यांची असे. असे दोन-चार दिवस गेले की, ते पिल्लू अचानक गायब होई; रात्रीतून, किंवा, दिवसा. कसे ते आजपर्यंत नाही कळले. मग पुन्हा नवा शोध सुरु.

काही प्रसंग

कुत्र्याइतका लोभस पाळीव प्राणी नाही असे माझे ठाम मत आहे. सध्या ताण घालवण्यासाठी अनेक जण कुत्रे पाळतात. दिवसभरचा थकवा / शीण एका मिनीटात घालवण्याची किमया ह्या कुत्र्यात असते. ते तुमच्याशी खेळू लागते, आढून बाहेर घेऊन जाते, कोप-यातील एखादी त्याची नेहमीची वस्तू तोंडात धरुन घेऊन येते व तुमच्या समोर टाकून लांबवर जाऊन उभे राहते व सांगते, की, टाक ती वस्तू, मी घेऊन येतो. बाहेर जायचे असल्यास, गाडीचे दार उघडले की, आधी आत जाऊन बसते. फार मजा येते.
800px-Puppy_near_Coltani_-_17_apr_2010.jpg

एका स्नेह्यांकडे कुत्रे पाळले होते. ते त्यास कधीच बांधून ठेवत नसत. त्यामुळे ते जितके तास घरी असे त्यापेक्षा जास्त बाहेर असे. कधी-कधी २-३ दिवसांनी परत येई. त्यांच्याकडे घरी दत्ताचे पारायण होत असे व अनेकदा हे कुत्रे त्यावेळेस देवघरासमोर बसलेले असे. ह्या कुत्र्याचा किस्सा असा आहे- ह्याच्या बाहेर जाण्याच्या सवयीमुळे त्याला इतर गल्लीतील कुत्र्यांच्या भांडणास तोंड द्यावे लागे. अशाच एका भांडणातून ह्याला खोल जखमा झाल्या पण हे कुत्रे घरी न येता समोरील इमारतीच्या जिन्याखाली जाऊन बसले. असेच एक-दोन दिवस गेले, येणारे-जाणारे त्यास बाहेर बोलवत पण ते अंगावर येई. मग कुणीतरी त्याच्या मालकाला कळवले. ते तिथे गेले, त्यास बाहेर काढले, व जखमांना उपचार केले. डॉक्टर म्हणाले की, ह्याला आता अजिबात बाहेर जाऊ देऊ नका, नाहीतर.. म्हणून त्यास त्यांनी पहील्यांदा बांधले. ते शांत राहीना; भुंकणे सतत चालू राहील्यामुळे, त्यास त्यांनी नाईलाजाने सोडले. त्याच क्षणी त्याने भिंतीवरुन ऊडी मारली व पसार झाला. जे व्हायचे ते झालेच. परत त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला व पुन्हा त्यास अधिकच जखमी केले. पुन्हा हे महाशय त्याच जिन्याखाली लपले. आता मात्र तो फारच जखमी झाला होता व येणा-या- जाणा-यांवर भुंकतही होता. तेथील लोकांनी ताबडतोब मालकांना सांगितले. ते आले व त्याची अवस्था पाहून म्युनिसीपालटीला फोन केला आणि त्यास घरी घेऊन आले.
थोड्यावेळाने श्वासपथक आले. त्यांच्या पिंजरागाडीत आणखीही काही कुत्रे होती. ह्याला जणू काही पुढचे कळाले. हा अंगणात होता; तो जागचा उठला व घरात गेला. मालकांनी त्यास खास केक आणला होता, जाण्याआधी त्यास खाऊ म्हणून. तो त्याला खाण्यास देऊ लागले पण त्याने तो खाल्ला नाही. देवघरात गेला, काही क्षण तेथे बसला. उठला, घरातील प्रत्येक खोलीत जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जवळ गेला, अंगावरुन हात फिरवुन घेतला व तसाच बाहेर जाऊन स्वतः त्या पिंजरागाडीत बसला. जातांना भुंकलाही नाही. हा प्रसंग त्या गल्लीतील अनेकांनी पाहीला आहे व ते आजही ह्याची आठवण काढतात.

त्यांचे नियम / प्रशिक्षण

YellowLabradorLooking_new.jpg

कुत्र्याला शिक्षण देऊन त्यास आणखीही काही महत्वाच्या कामासाठी निवडायचे असेल तर त्याची पहीली चाचणी असते. शिक्षक एक चेंडू लांबवर फेकतात. जो कुत्रा तो चेंडू परत आणून देतो तो कुत्रा शिक्षण-योग्य आहे असे मानतात. कुत्रा प्रशिक्षक त्या कुत्र्याच्या मालकाच्या मदतीने त्यास शिक्षण देतो. एका प्रकारात त्यांना एखाद्या पासवर्डची ओळख दिली जाते. उदा, जर कुत्र्याला एखाद्याच्या अंगावर धावुन जायला भाग पाडायचे असेल तर त्या कुत्र्याचा मुड अचानक हिंस्र करावा लागतो. ह्यासाठी ते मालकाला एक पासवर्ड म्हणण्यास सांगतात, त्यांनी तो शब्द उच्चारता क्षणी प्रशिक्षक त्या कुत्र्यास काठीने मारतो. तसे केल्याने तो कुत्रा रागावेल असे बघितले जाते. कालांतराने तो पासवर्ड उच्चारला की, कुत्रा एकदम हिंस्र होतो व मालक सांगेल त्याच्या अंगावर धावुन जातो.

एकाने सांगितले की, कुत्रा एखाद्या गल्लीत, मोकळ्या जागेत स्वतःची मालकी स्थापीत करतं. त्यासाठी ते चार दिशांना जाऊन एकेका जागी लघवी करतं; हीच त्याची सीमाआखणी. दुसरा कुत्रा आला की, त्यास तो वास येतो आणि त्यानुसार त्यास कळतं की, हे राज्य कोणाचंतरी आहे. त्यास ते राज्य बळकावायचं असेल तर अर्थातच त्या दोघांची मारामारी ठरलेलीच. ती होते, बलाढ्य कुत्रे जिंकते व त्यावर कब्जा घेते. नियम असा आहे की, एका ठिकाणी दोन कुत्रे नाही! मात्र ह्याउलट जर ती कुत्री असेल आणि जागा कुत्र्याने आखलेली असेल तर एका भांडणानंतर -जे अगदी लुटूपुटू असते- त्यांच्यात समेट होऊ शकतो; पण एकदा तरी भांडण होतेच. आणि तिस-या प्रकारात जर बाहेरुन आलेली कुत्री असेल तर, आणि जागा कुत्रीनेच आखलेली असेल तर ती, आलेल्या पाहुणीला त्याजागेत राहू देते- भांडणाशिवाय!!

कुत्रा पाळण्याचा एकमेव तोटा असा की, तुम्ही त्यास एकटे ठेवुन जाऊ शकत नाही. सध्या त्यांच्यासाठी पाळणाघरं झालेली आहेत पण ती फार महाग वाटतात. त्यामुळे त्यास बरोबर घेऊन जाणे दरवेळी शक्य होतेच असे नाही. म्हणून मग एखाद्याला घरी रहावे लागते. पण कुत्र्यामुळे मिळणा-या अनंत वात्सल्यपुर्ण क्षणांसमोर तो त्रास फिका पडतो.

खात्री आहे की, इतरांकडेही कुत्र्यांबद्दल सांगण्यासारखे अनेक किस्से असतील; म्हणून ते ऐकण्यासाठी येथेच थांबतो.

[लेखातील चित्रे विकीपेडीयावरुन साभार]

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

असुदे, कुत्र्यांमधे अगदी लहान मुलासारख्या भावना दिसतात. लक्ष वेधून घेण्यासाठी, लाड करुन घेण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांच्यात नैसर्गिक उत्सुकता पण असते. सगळ्याचा वास घेऊन बघायचा असतो. टिव्ही बघायचा असतो.

पण त्याला काहितरी द्यायचे पण असते, एखादा उंदीर वा पाल मारली, तर तो अवश्य मालकाला ऑफर करतो. अ‍ॅड्व्हेन्चर्स ऑफ यलो डॉग, हा फ्रेंच सिनेमा बघितला आहे का ? मस्त भावदर्शन केलेय त्या कुत्र्याने.

दिनेशदा, क्या बात है. पूर्ण वाढलेल्या कुत्र्याची मानसिकता साधारण ३ ते ४ वयाच्या मुलासारखी असते.

हा ऑफर करायचा प्रकार कुत्र्या मांजरीबाबत घडलाय. Happy त्यावेळचे भाव बघण्याजोगे असतात त्यांचे.

हा सिनेमा नाय बघितला. मिळतो का बघतो.

अतिशय सुरेख लेख !! पण मला कुत्र्यांची प्रचंड भिती वाटते. ते श्वानप्रेम दुरुन बघायलाच ठीक वाटतं. माझ्या नणंदेकडली जेरी सगळ्यांकडून हक्काने लाड करुन घेते पण माझ्याकडे आली की माझे प्राण कंठाशी येतात. आता तिलाही कळलंय की मला तिची भिती वाटते म्हणून. पण एकदातरी तिच्या पाठीवरुन मी हात फिरवावा असं तिचे डोळे नेहेमीच सांगतात Happy

आयला, आज आक्रितच घडलं
सकाळी मी असा आन्घोळीला बाथरुममधे घुसलेलो, तोन्डाला साबण लावुन झालेला, अन कानावर लिम्बीच्या घुसमटत्या विव्हळत्या किन्काळ्या ऐकु येऊ लागल्या, म्हणले काय झाल?
कुत्र शिरलय घरात.....
कस तरी डोक्यावरुन बदाबदा पाणी घेऊन डोळ्यात जाऊ न देता तोन्डावरचा साबण धुवुन टाकला, टॉवेल गुन्डाळला, अन निथळत्या अन्गाने बाहेर आलो, तोवर पोराने कुत्र्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता.
स्नानसमाधिमधे ओरडुन विघ्न आणल्याबद्दल चरफडत पुन्हा आत जाऊन आन्घोळ उरकली, बाहेर आलो, देवाला दिवा/उदबत्ती दाखवली, तोवर धाकटी ओरडत आली, बाबा बाबा ते कुत्रा जातच नाहीये
म्हणले अरे मग हाकला की.
तावातावात बाहेर आलो, बघतो तो काय?
समोर एक नखशिखान्त काळेशाऽऽर काळेकुळकुळीत ल्याब्रेडॉर जातीचे, अन्दाजे सहा/सात महिन्यान्चे कुत्रे!
चान्गली साता जन्माची ओळख असल्यागत घरभर फिरुन बाहेरच थाम्बले होते, गेट उघडुन दिले तरि जायचे नाव नाही, उलट मस्त लगट करत होते!
मग काय? त्याच्या मालकाचा शोध सुरु केला, तर आजुबाजुला कुणाकडचेच ते नव्हते
आले असेल वाट चूकून.
मग थोरली गेली त्याच्याकरता काहीतरी खायला आणायला (चक्क पैसे पण स्वतःकडचे वापरते म्हणाली)
मी आपला त्याला टाटा करुन ऑफिसला आलो! Happy

मगाशी घरी जाऊन बघितले तर तासापूर्वीच, गेट उघडे राहिले, तर ते कुत्रे आपलेआपण निघुन गेले होते Sad

छान माहिती...

माझ्याकडेही कुत्रा होता. आर्ची नाव त्याच. पोमेरीयन आणि सॅमॉईड (?) यांच ब्रीड होता. पांढराशुभ्र, सिल्की कोट आणि नॉर्मल पॉम्स पेक्षा मोठा. आवाज दणदणीत. बंगल्याच्या गेटवर कावळा जरी बसला तरी दणकुन भुंकायचा. त्याला पेढे खुप आवडायचे. माझ्या लहान भाचवंडांना (४ वर्ष आणि ७ वर्ष) त्याच्या पाठीवर बसुन मस्ती करायचा.

मी ऑस्ट्रेलियाला यायच्या आधी २ दिवस अचानक त्याला काहितरी झाले आणि तो गेला Sad खुप रडले मी..... माझ्या बाबांच्या पण डोळ्यात पहिल्यांदा पाणी पाहिले मी Sad या गोष्टीला १३ वर्ष होऊन गेली पण अजुन डोळे भरुन येतात Sad

खरच आपला फॅमिली मेंबरच होऊन जातात आपले पेट्स... स्पेशली कुत्रे जास्तच लळा लावतात Happy

आता एक लॅबी घ्यायचाय. लेक ५ वर्षांची होईल तेव्हा Happy स्ध्या शेजारच्यांच्या ऑल्सेशियनशी मैत्री केलेली आहेच Happy

मस्त लेख.
मला पण कुत्री भयंकर आवडतात. माझ्या कडे एक मिक्स ब्रिड होता "चिकु" नावाचा. पण तो दिड र्वषातच गेला. त्याला मी कधीच विसरु शकत नाही.

पंत तुम्हाला बागुलबुवानी सैबेरीयन हस्की बद्दल सगळ सांगितल आहे तरी पण एक गोष्ट राहीली, सैबेरीयन हस्की ही जात कोल्ह्या सारखी आहे कोल्हे जसे कोल्हेकुई करतात ना तसे ह्या जातीची कुत्री ही करता, त्यामुळे शेजारी,घरात कुणीतरी आजारी वै. असेल तर त्रास होउ शकतो. बाकी दिसायला एकदम सह्ही दिसता ही सैबेरीयन हस्की. मला ही भयंकर आवडतात.

मी लॅब्रेडॉर रीट्रीवर पपी आणले आहे. आता तो ३ महीन्याचा झाला आहे
आणि आता त्याचे केस झडून दूसरे यायला लागले आहे त. त्यामूळे घरात केस पडायला लागले आहेत. स्वछते
साठी को ण ता वॅक्यूम क्लीनर सोयीचा पडेल?

माझ्या लहानपणापासून घरी कुत्रा नाही असा एखादा महिनाही नसेल, आम्ही प्रत्येकाला एकच नाव देतो Happy आत्ता जो आहे तो एका मित्रानं भेट दिलेला आहे, ब्रीड वगैरे काही माहित नाही पण फार लाडका आहे घरात..
कुत्र्यांच्या बाबतीत एक कोडं अजून सुटलं नाहीये, एरव्ही घरात परक्या माणसानं पाऊल जरी ठेवलं तरी भुंकून नको करून टाकतात पण तेच घरात काही कार्यक्रम असेल तर अनेक माणसं येत जात असून शांत रहातात, इतकं समजतं त्यांना ?

Sahish, माझ्याकडेही लॅब्रेडॉर पपी आहे. आता दीड वर्षाचा झालाय. लॅब्रेडॉर्स त्यांच्या केस गळण्यासाठी (कु)प्रसिद्ध आहेत. आत्ता जे केस गळतायत ती म्हणजे त्याची पपी फर गळून नवीन मोठ्या कुत्र्यासारखी फर येत असणार. वर्षातून २ वेळा हे केस गळणे प्रचंड प्रमाणात वाढते. समर सुरू होण्याआधी/ हिवाळा संपता संपता - ह्यावेळी त्यांचे थंडीपासून संरक्षण करणारे जाड केस जाऊन थोडे पातळ केस येतात. आणि हिवाळा सुरू होण्याआधी/ समर संपता संपता - अगदी उलट प्रकार. अंगावर थंडीपासून बचावासाठी जाड केस येतात.

तुम्ही भारतात आहात असे दिसतेय पण तिथेही खालील गोष्टी मिळाल्या तर बघा.

  1. Furminator: हा ब्रश त्यांचे गळायला आलेले केस खेचून काढतो. त्यामुळे घरभर पडणे कमी होते. एकाच जागी काय ते पडतात. आठवड्यातून २-३ दा तरी नियमीत पणे करावे लागते.
  2. Roomba/ Neato (Robot Vacuum): आपल्या आप अडथळे पार करून घर स्वच्छ करतो. कोपरे वगैरे नंतर आपल्याला साध्या व्हॅक्युम ने साफ करावेच लागतात पण भरपूर काम वाचते.

खूप खूप धन्यवाद लंबूटांग.
ह्या दोन्ही गोष्टी मी पूण्यातून अथवा अमेरीकेतून मिळवीन. आणि आपल्याला फिड्बॅक कळवीन.

अ भि जि त & गमभन |.........धन्स्...........मुधोळ डॉग हेच का ते?....आणि यातलं मुधोळ म्हणजे कर्नाटकातलं मुधोळ का?

हा आता नाही. Sad रस्त्यावर मुर्खासारख्या पळणार्‍या मुलाला वाचवण्यासाठी कारने रस्ता सोडला आणि रस्त्याच्या बाजुने वॉकला जाणार्‍या याला उडवलं. एकही जखम न होता हा ५ मिनिटात गेला.
गोल्डन रिट्रीवर :
Kasper.JPG

चप्पलवर बसलं तर याचा लाडका डॅड याला सोडुन बाहेर जाणार नाही असा याचा समज असावा. याला झोपताना जवळ एक चप्पलचा जोड लागायचाच. कितीही जागा बदलायला लावली तरी तोंडात चप्पल घेवुन नविन जागेवर जावुन बसायचा. Kasper.jpg

Pages