लेखकाचे घर असावे शेजारी

Submitted by भरत. on 26 January, 2011 - 06:36

नेहमीप्रमाणे अकरा महिन्यांनी आमची गृहदशा बदलली. ती बदलली की पत्रिकेतले शेजारग्रहही ओघाने बदलायचेच. तसं ते फ़ारसं कधी जाणवायचं नाही, कारण दोन दोन दारांच्या, टाइट्ट शेड्युलच्या (काम आणि टीव्ही दोन्हीची बरं) आणि मी माझ्यापुरता या अ‍ॅटिट्युडच्या कडेकोट बंदोबस्तातून `इकडून तिकडे गेले वारे’ इतके म्हणण्याएवढीही फ़ट कशी ती नसायची. त्यामुळे नव्या घरात प्रविष्ट झाल्याच्या संध्याकाळीच आमच्या द्वारघंटिकेवर कुणीतरी अंगुलीप्रहार केल्याने नवल वाटतच दार...नाही दारावर दारे उघडली, तर मध्यमवयाकडून ज्येष्ठतेकडे म्हणजे काकी ते आजी या मधल्या स्टेशनावरच्या एक बाई दारात चक्क सस्मित उभ्या. आणि त्यांनी काय म्हणावे? "नमस्कार. आम्ही तुमच्या शेजारी राहतो. हे समोरचं दार!" मुंबईत असा शेजारी असू शकतो यावर खरं तर आमचा विश्वासच बसत नव्हता. आम्ही एखाद्या जुन्या वाड्यात रहायला आलो असतो , तर ते एखादे प्रेमळ भूत आहे, अशी समजूत करून घेतली असती (आठवा ’एक डाव भुताचा’). पण ही तर तशी नवी रंगरंगोटी केलेली मुंबईनगरीतली सोसायटी. त्यामुळे त्या पार्वतीबाईंचे निश्चिंत मनाने स्वागत केले. घरातले सामान लागतच होते, आणि समोरच्या पेटार्‍यातील पुस्तकांना बुकशेल्फ़मधल्या त्यांच्या त्यांच्या जागा खुणावत होत्या. त्या बाईंना आमच्याकडे यावेसे वाटण्यास ही पुस्तकेच कारण झाली होती. झालं काय, की पुस्तकांच्या एका पेटार्‍याला मराठी साहित्याचा भार पेलला नव्हता, आणि अनेक महान साहित्यिक वाटेत धुळीस मिळाले होते. त्यानंतर उडालेल्या धावपळीमुळे सोसायटीतल्या सहजीवनात किंचितशी खळबळ उडाली होती. एकमेकांची ओळख पाळख करून घेतल्यावर पुन्हा दारे बंद झाली.
यथावकाश येता जाता , कचरा देता, पेपर-दूध घेता एकमेकांशी सुहास्याची देवाणघेवाण सुरू झाली. आणि काही दिवसांनी पार्वतीबाईंच्या अंगुलीने पुन्हा एकदा आमच्या द्वारघंटिकेवर नाजूक प्रहार केला. यावेळी मात्र त्यांनी मोठाच धक्का दिला आम्हाला."मी सांगितलं का तुम्हाला? मला किनई काव्य रचायची खूप आवड आहे. आणि परवाच्या रविवारी इथल्या एका सभागृहात माझ्या काव्यगायनाचा कार्यक्रम आहे. आता तुम्हाला पण वाचनाची एवढी आवड आहे, म्हणून तुम्हाला बोलवतेय. आणि हो कार्यक्रमात स्नेहभोजनही आहे, तेव्हा नक्की या". कार्यक्रमाचे स्थान, वेळ, दिवस ही माहिती देऊन आणि आमचा पक्का होकार घेऊन त्या गेल्या. रविवारी सकाळी पण पुन्हा एक तोंडी स्मरणपत्र झाले.
सांगितल्या वेळी आम्ही त्या ठिकाणी पोचलो, तर दिसले की ते एक मंगल कार्यालय आहे आणि मंगल कार्याच्याच खुणाही दिसत होत्या.(आता यावरून काही नतद्र्ष्ट लोक काव्यवाचन हे अमंगल कार्य आहे का असा कुजकट प्रश्न विचारतील) . काहीतरी घोळ आहे असे वाटत असतानाच बाईंच्या घरची मंडळी दिसली. सभागृहात नेता नेता त्यांनी आम्हाला सांगितले की तिथे त्यांच्या नात्यातल्या कुणाचे लग्नच होते. फ़ार काही बोलता आले नाही, कारण तेवढ्यातच बाईंच्या मंजुळ आवाजात मंगलाष्टके ऐकू आली.
धक्क्यातून आम्हाला पूर्ण सावरण्याइतका अवधी देत आणि आपण खरंच काव्यगायन ऐकतो आहोत, याची खात्री पटेतो ते चालले. मग लग्नासारखे लग्न लागले. आम्हाला स्नेहभोजनाचाही लाभ मिळाला.

दुसर्‍या दिवशी पार्वतीबाई आमचा अभिप्राय ऐकायला हजर. आम्ही पण 'छानच रचना केली तुम्ही' असं स्नेहभोजनातल्या जिलब्यांना स्मरून सांगितले. मग बाईंनी आपल्या काव्यप्रवासाचे वर्णन सुरू केले. कसं लहानपणापासून त्यांना कविता लिहायला आवडायचं, कॉलेजात कशा मंचावरून टाळ्या घ्यायच्या (कविता आवडल्याच्या की 'थांबवा थांबवा'च्या ते विचारायची आमची प्राज्ञा नव्हती); मग संसाराच्या व्यापात कसं काही जमलं नाही; पण प्रापंचिक जबाबदारीतून आता जरा मोकळीक मिळाल्यावर (म्हणजे सून आल्यावर) काव्यप्रपंचालाच वाहून घ्यायचं कसं ठरवलंय हे अगदी सविस्तर सांगितलं. शिवाय आपली भारतीय आणि मराठमोळा संस्कृती टिकवायचं आणि नव्या पिढीवर सुसंस्कार आपल्या काव्यातून करण्याचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं. "आजकाल ओव्या कुणी लिहीत नाही ना, मग ओव्या सुचायला हव्यात म्हणून अजूनपण मी जात्यावर थोडं थोडं धान्य दळायचे बघा. आता हे गुढघे मला खाली बसू देत नाहीत हो. पण मी कसली हार मानतेय. सुटीच्या दिवशी सुनेला सांगते जात्यावर दळायला आणि मी तिथ्थे टेबलाशी बसून ओव्या लिहिते हो. माझी कवितांची वही, सध्या मागच्या सोसायटीत राहणार्‍या प्रा. देशपांड्यांना वाचायला दिलीय. त्यांच्या वाचून झाल्या की तुम्हाला देईनच. "
आणि मग काय . हा परिपाठ चालूच झाला. सगळ्याच ठिकाणी आम्हाला बोलवणे काही पार्वतीबाईंना शक्य नसायचे, त्यामुळे त्यांच्या काव्यवाचनाचा लाभ आम्हाला नियमितपणे व्हायचा नाही. अचानकच (अगदी योगायोगाने) आम्हा दोघांच्या कार्यालयांत कामाचा व्याप वाढल्याने संध्याकाळी घरी परतायलाही उशीर होऊ लागला.
मागल्या सोसायटीतल्या प्रा. देशपांड्यांना पार्वतीबाईंच्या कविता फ़ार आवडल्याने, किंवा त्यावर अभिप्राय देण्यासाठी खूपच विचार करावा लागत असल्याने ती वहीही आमच्याकडे आली नव्हती.
दरम्यान त्यांची ’कलिंगडाच्या बियांची बर्फ़ी’ ही पाककृती एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. झालं असं,की एका वृत्तपत्राने नावीन्यपूर्ण पाककृती मागवल्या होत्या आणि त्यातल्या निवडक पंचवीस पाककृतीं आपल्या पुरवणीत प्रसिद्ध केल्या. पार्वतीबाईंनी त्या दिवशीच्या त्या वृत्तपत्राच्या पन्नासेक प्रती विकत घेऊन त्यांच्या जवळच्यां नातलग आणि परिचितांना वाटल्या होत्या. आमच्या कुटुंबाचे पाककौशल्य गोड आणि तिखटाचा शिरा हा वेगवेगळा दिसेल आणि चवीला वेगळा वाटेल, इतपतच असल्याने आणि पार्वतीबाईंच्या कार्यबाहुल्याने त्यांनाही ती बर्फ़ी पुन्हा करता न आल्याने ’बर्फ़ी ती विरघळते कशी मुखी’ ते काही आम्हाला कळले नाही. या प्रसिद्धीबद्दल पार्वतीबाईंचा त्यांच्या ज्ञातीच्या भगिनी समाजाकडून सत्कार झाला आणि तत्संबंधीचे वृत्तही छायाचित्रासकट समाजपत्रिकेत प्रकाशित झाले. तेही त्यांनी आम्हाला तत्परतेने आणून दाखविले.
आपल्या कर्तबगारीची दवंडी पिटणे तसे पार्वतीबाईंना आवडायचे नाही, पण आम्हाला दुसर्‍या कुणाकडून हे कळले तर वाईट वाटेल, म्हणून त्या अगत्याने आम्हाला हे सगळे सांगायच्या.

असेच दिवस , महिने चालले होते आणि पुन्हा एक आग्रहाचे आमंत्रण. यावेळी तर बाईंच्या काव्यगायनाच्या सीडीचे प्रकाशन तेही त्या भागातल्या आमदारांच्या हस्ते! तेही एका मैदानात, म्हणजे हजारोंची गर्दी असणार होती. बाईंच्या कवितांचा रसिकवर्ग एवढ्या वर्गाने असल्याबद्दल आणि त्यांचा अशा मान्यवर मंडळींशी परिचय असल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटले (पुन्हा कोणीतरी कवीच्या लेखणीला, शब्दांना आणि प्रतिभेला तुच्छ लेखण्याचा आरोप करतंय का? पण आम्हाला वाटले बुवा). आपल्या सखी शेजारणीच्या उत्कर्षाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आम्ही अत्यानंदाने पोचलो, तर पुन्हा मागच्या वेळसारखाच घोळ. कुणाच्यातरी अमृतमहोत्सवाच्या बॅनर्सनी मैदान आणि मंच रंगलेले पण तरीही चिकाटीने आसनस्थ होऊन आम्ही वाट पहात राहिलो. अमृतमहोत्सव त्याच आमदारांच्या तीर्थरूपांचा होता . त्यांच्या कार्याचा परिचय, जीवनपटाचा आढावा ,उत्सवमूर्तीबद्दल भाषणे, असा कार्यक्रम यथासांग पुढे सरकत होता. त्यांची कांद्यांनी तुला करून ते कांदे विभागातल्या जनतेला रास्त भावात उपलब्ध करून दिले गेले. एव्हाना आम्ही नक्की तिथे कशासाठी आलो आहोत, हेच विसरून गेलो; तोच अचानक पार्वतीबाई मंचावर अवतीर्ण झाल्या. त्यांनी आमदार आणि त्यांचे पूज्य पिताजी यांच्यावर रचलेले एक कवन ऐकून उपस्थितांचे कान तृप्त केले . कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने पार्वतीबाईंच्या काव्यगायनाच्या सीडीचे अनावरण आमदार महोदयांच्याच्या हस्ते होईल असे जाहीर केले. आमदार महोदय, त्यांचे पिताश्री, पत्नी (या पार्वतीबाईंच्या शाळूसोबती होत्या असे नंतर कळले), स्वत: पार्वतीबाई आणि त्यांचे यजमान इतकी मंडळी मंचाची शोभा वाढवू लागली. (बरोबर आमदाराच्या मागे पुढे असतात तशी मंडळी होतीच, त्यांना पाहून इथे कवितेशी संबंधित काही चालले आहे असा कुणाला संशयही आला नसता (हाही माझा पूर्वग्रह बरं)).
प्रथम आमदार महोदयांनी सीडीच्या समारंभीय आवृत्तीला अनावृत्त केले आणि मग कॅमेर्‍यांच्या लखलखाटात मंचावरच्या मान्यवरांनी आपल्या हातात एकेक सीडी झळकावली. त्या कॅमेर्‍यांच्या फ्लॅशपेक्षा पार्वतीबाईंचे स्मितहास्यच अधिक उजळून दिसत होते.

यथावकाश आमच्या बैठकीत त्या सीडी श्रवणाचा, तोही कवयित्रीच्या खास उपस्थितीत आणि कवितेबद्दलची भूमिका, तिच्या जन्माची कथा अशा ओघवत्या वर्णनासकट समारंभ झाला. कार्यक्रम खरे तर कवयित्रींना सोसायटीच्या गेटटुगेदरसाठीच करायचा होता, पण कॉस्मोपोलिटिन मुंबईत मुळात मराठी बोलणारे मराठी लोक शोधावे लागतात, इथे तर सोसायटीतच मराठी नावे लावणारे लोक शोधावे लागत होते.

त्या सीडी सारखीच कवितांची आवर्तने मग यथावकाश होत राहिली.
आणि आमचे अकरा महिने भरले. आमच्या निरोपाखातरही पार्वतीबाईंनी एक कविता आम्हाला भेट दिली . घर सोडताना ‘अशी’ भावना यापूर्वी आम्हाला कधीच जाणवली नव्हती!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

'ओव्या सुचायला हव्यात म्हणून अजूनपण मी जात्यावर थोडं थोडं धान्य दळायचे ..' Lol
हे आणी अशी कित्येक वाक्ये वाचून Rofl
तुमची खुसखुशीत शैली आवडली

आपल्या कर्तबगारीची दवंडी पिटणे तसे पार्वतीबाईंना आवडायचे नाही, पण आम्हाला दुसर्‍या कुणाकडून हे कळले तर वाईट वाटेल, म्हणून त्या अगत्याने आम्हाला हे सगळे सांगायच्या. >>>>>>:P
छान लिहीलंय!

भरत,
मस्त जमलाय लेख. खुसखुशीत नर्म विनोद आवडले.
सीडी प्रकाशनाचा प्रसंग तर छानच.
"त्यांची कांद्यांनी तुला करून ते कांदे विभागातल्या जनतेला रास्त भावात उपलब्ध करून दिले गेले. एव्हाना आम्ही नक्की तिथे कशासाठी आलो आहोत, हेच विसरून गेलो"
हे तर ..... सॉलीड..... मस्त.
कंसातली वाक्य देखील छान वाटली.

तुम्ही कवितेवर गांभीर्याने विचार करून प्रतिसाद देता, इतकच आजवर ठाऊक होतं.
पण विनोदी शैलीत लिखाण करण्याचा हा गुण आजच कळला.

भन्नाट रे...! Lol Rofl

आमच्या द्वारघंटिकेवर कुणीतरी अंगुलीप्रहार...

'ओव्या सुचायला हव्यात म्हणून अजूनपण मी जात्यावर थोडं थोडं धान्य दळायचे ..

खुसखुशीत लेख.

'ओव्या सुचायला हव्यात म्हणून अजूनपण मी जात्यावर थोडं थोडं धान्य दळायचे . Biggrin

उल्हासकाकांशी सहमत..... भरतरावांचा हा गुण नव्याने कळाला. Happy

भरत, एकदम खुसखुशीत लेख Happy

आता यावरून काही नतद्र्ष्ट लोक काव्यवाचन हे अमंगल कार्य आहे का असा कुजकट प्रश्न विचारतील>>> Biggrin

मला कुणाची डायरेक्ट स्तुती(कोण तो मागून हळुच निंदा - निंदा म्हणतोय रे?) करायला जमत नाहीच पण तिसरयाजवळ केलेली (स्तुती) तुम्हाला चौथ्याकडुन कळुन वाईट वाटायला नको म्हणून सांगतो..
भरतराव लेख खुपच छान (कंसातसुद्धा छानच) आहे. Uhoh

Happy

विनोदी लेखन गांभीर्यपूर्वक वाचून अभिप्राय नोंदविणार्‍या सगळ्यांचे आभार .
निशाचर Happy
उल्हास, कवितांवर विचार करुन दिलेल्या प्रतिसादांनंतर चटके बसल्यानेच हे लेखन खुसखुशीत झालं असावं. आणखी पोळलं तर कुरकुरीतही होईल!

लेख आवडला.

कवितांवर विचार करुन दिलेल्या प्रतिसादांनंतर चटके बसल्यानेच हे लेखन खुसखुशीत झालं असावं. आणखी पोळलं तर कुरकुरीतही होईल!>>>
केवढा हा काव्यमत्सर Proud