वयम् मोठ्ठम्? खोट्टम्!

Submitted by चिमण on 15 December, 2008 - 09:47

कॉलेजात असताना मी भरपूर लांब केस ठेवले होते. रस्त्यात पोरी देखील वळून वळून बघत असत. त्या नजरा मत्सराच्या होत्या की 'काय ध्यान आहे' अशा अर्थाच्या होत्या यावर विचार करून मी त्रास करून घेत नसे. मला फार अभिमान होता केसांचा, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं! लांब केस ठेवण्याचं माझं ध्येय माझ्या बापाने न्हाव्याकरवी खुंटवलं. आपल्या पोटावर पाय आणणार्‍या लोकांचा कट उधळलाच पाहीजे या विचाराने पेटून त्या दिवशी न्हाव्याने एकदम मिलीटरी कटच मारला आणि दुप्पट पैसे लावले. हाय! हाय! मेरे बालोंके टुकडे हजार हुए कोई इधर गिरा कोई उधर!

कॉलेज संपून नोकरी लागेपर्यंत मी 'पांढरकेशी' झालो होतो. चार वर्षं नोकरी केल्यावर माझ्या कंपनीनं मला कंप्युटर शिकायला परत कॉलेजात पाठवलं. पहील्या दिवशी मी वर्गात पाऊल ठेवताच सगळी जन्ता मीच मास्तर आहे असं समजून खाडकन् उभी राहीली. मला असं वाटलं की जन्तेला माझ्या मागं मास्तर दिसला म्हणून मी वळून पाहीलं. मागं अर्थातच कुणी नव्हतं. खरा प्रकार लक्षात येताच 'काय मठ्ठ पोरं आहेत' अशी नजर टा़कून मी हसलो. पण ते हसण्यावारी नेण्याचं प्रकरण नव्हतं. हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की इतर माणसं म्हणजे दुकानदार, रिक्षावाले इ.इ. माझ्याशी बोलताना मला 'काका' किंवा 'अंकल' म्हणायला लागलेत.

दोन वर्षांनी शिक्षण संपताच कंपनीनं मला अमेरीकेला पाठवलं. राहण्याची सोय आमच्या कंपनीतल्याच एका मुलाकडे केली होती. तिकडे गेल्यावर एके दिवशी तो मला त्याच्या नेहमीच्या भारतीय दुकानदाराकडे घेऊन गेला. आम्हाला बघताच दुकानदारानं त्याला विचारलं - "काय? आज बाबांना घेऊन आलास वाटतं?". केवळ केसांच्या रंगबदलामुळे मी एका पीढीची उंच उडी मारल्याची एक अस्वस्थ जाणीव झाली. आपल्याला मनातून अजून तरुण वाटतंय ना मग लोकांच्या बोलण्याला कशाला भीक घालायची असा सूज्ञ विचार करून मी त्याला माफ केलं. कधीतरी 'काय भुललासी वरलिया रंगा' याचा साक्षात्कार होऊन लोक माझे पांढरे केस बाजूला सारतील व त्याखाली उचंबळणारं माझं तरूण मन पाहतील असा मला दृढ विश्वास होता.

अमेरिकेतून परत आल्यावर घरच्यांनी माझ्या लग्नाचा घाट घातला. दणादण मुली पहायला सुरुवात झाली आणि नकारही तेवढ्याच दणादण यायला लागले. रस्त्यात पोरी ढुंकून सुध्दा बघत नव्हत्या. चुकून नजरानजर झालीच तर 'म्हातारचळ लागलाय मेल्याला!' असे भाव दाखवून नजर फिरविली जायची. नकार फक्त मुलींनाच येतात हा माझा भ्रम निघाला. 'नकारांचं कारण तुझ्या केसात आहे' माझ्या मित्रानं एकदा छातीठोकपणे सांगीतलं. कमाल आहे! लहानपणी दुष्ट जादुगारांचे जीव त्यांच्या केसात असल्याचं ऐकलं होतं. पण तिर्‍हाईत मुलींचा नकार माझ्या केसात अडकण्याची संकल्पना पचवणं जड गेलं. 'अरे तसं नाही! तू पांढर्‍या केसांचा आहेस म्हणून नकार येतायत. यापुढे मुलगी बघायला जाताना तरी कलप लावून जा. अरे! केस सलामत तो मुली पचास!' मित्रानं स्पष्टीकरण व उपाय दोन्ही एकदम दिलं. मुलीच्या घरात शिरता शिरता अचानक आलेल्या पावसामुळे कलप ओघळून चेहर्‍यावर पसरलाय असं केविलवाणं दृष्य माझ्या डोळ्यासमोर तरळलं. तरीही धीराने कलप लावून मी मुलगी बघायला गेलो आणि काय आश्चर्य! पहील्याच मुलीनं होकार दिला.

लग्नानंतर माझं कलप कारस्थान तिला कळल्यावर हा आनंद टिकला नाही. 'केसानं गळा कापलास तू माझा' असा जळजळीत आरोप झाला. संघर्षपूर्ण लग्न आणि असले हीन आरोप यामुळे केसांनी माझा त्याग केला. मूळचं माझं अरुंद कपाळ अती भव्य झालं. आरशात बघितल्यावर उगिचच्या उगीच "भाळी चंद्र असे धरिला" हेच गाणं सुचायचं. दु:खात सुख एवढच होतं की आता मी केसानं कुणाचा गळा कापणं शक्य नव्हतं आणि माझ्या केसाला धक्का लावायची कोणाची प्राज्ञा नव्हती. डोक्यावरून केस उतरले खरे पण मी पीढीची आणखी एक पायरी अलगदपणे वर चढलो.

एकदा मुलाला शाळेत सोडायला गेलो होतो. "आज आजोबा सोडायला आलेत का?" त्याच्या मित्राचा निरागस प्रश्न मला चमकवून गेला. शेंबड्या पोराला काय कळतंय असा विचार करून मी ते कुणालाच सांगीतलं नाही. पुढे एकदा भाड्यावरून रिक्षावाल्याशी भांडण झालं. भांडता भांडता "तुमच्या वयाकडे बघून मी जास्त काय बोलत नाय" असं म्हणून त्यानं माझ्या दुखर्‍या भागावर बोट ठेवलं. मुकाटपणे पैसे देऊन मी काढता पाय घेतला. असंच एकदा पैसे काढायला बँकेत गेलो होतो. तिथे नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसली म्हणून काय करावं याचा विचार करत क्षणभर थबकलो. तेवढ्यात तिथला एक क्लार्क माझ्याकडे बघून खेकसला - "अजून पेंशन आलेली नाहीये". हरामखोर लेकाचा! मी याच्या पगाराचे पैसे भरतो आणि मलाच अशी वागणूक!

एकदा मात्र कहरच झाला. माझी बायको आणि मी मॉलमधे गेलो होतो. बायको कपडे बघत होती. मी हताशपणे इकडे तिकडे बघत होतो. अचानक मोठ्या भावाचा एक मित्र खूप वर्षांनी भेटला आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. बोलणं चालू असताना बायको "मी वरच्या सेक्शन मधे चाललेय" असं सांगून पटकन निघून गेली. ती गेल्यावर मित्राला काहीतरी सुचले.

तो: "बरं झालं तू भेटलास! माझा मुलगा लग्नाचा आहे, स्थळं बघतोय सध्या!"
मी: "असं का? अरे वा! कोणी असलं तर जरूर सांगीन तुला!"
तो: "तसं नव्हे! तुझी मुलगी लग्नाची आहे का विचारणार होतो! ओळखीत जमलं म्हणजे कसं बरं असतं!"
मी: "मला कुठली मुलगी? मला एक मुलगा आहे लहान! अजून शाळेत आहे तो." याला अचानक माझ्या मुलीचा कसा शोध लागला या आश्चर्यानं मी म्हंटलं.
तो: "मग आत्ता जी गेली ती कोण होती?"
मी: "तीsss? ती माझी बायको!"

यावर काहीतरी गुळमुळीत बोलून तो सटकला पण त्याच्या डोक्यातले विचार मला स्पष्ट दिसले - "एवढ्यात लग्न करायचं नसेल तर तसं सांग! सरळ मुलीला बायको का म्हणतोस?"

नाईलाजाने मी मित्राचा सल्ला घ्यायचं ठरवलं. सगळं ऐकल्यावर तो म्हणाला -
तो: "लोकांना वाटतं ते खरं आहे. तू आणि तुझे वडील एकत्र दिसलात ना की कोण कोणाचा बाप आहे ते कळत नाही".
मी: "मीss? मी माझ्या बापाचा बाप? हे फार होतंय! तुझ्याकडे मी सल्ला घ्यायला आलोय, आणखी मानहानी करून घ्यायला नाही."
तो: "त्यावर उपाय म्हणजे टकलावर केस उगवायचे. शनवारपेठेतल्या एका वैद्यांकडे याचा आयुर्वेदिक उपाय आहे. ते माणसाला उताणे झोपवून त्याच्या नाकात दुर्वांचा रस घालतात. असं एक आठवडाभर केलं की केस परत उगवायला लागतात."
मी: "बाप रे! फारच जालीम उपाय दिसतोय! पण मला एक सांग.. दुर्वांचा रस घालून केस कसे येतील? दुर्वा येतील फारतर. म्हणजे दुर्वा समजा जमिनीत पेरल्या तर दुर्वाच येणार ना? शेपू कसा येईल?".
तो: "हा प्रश्न तू वैद्यालाच विचार!" माझ्या बिनतोड लॉजिकचा त्याच्यावर अपेक्षित परीणाम न झाल्याने मी खट्टू झालो खरा पण तरीही मी हा उपाय करायचं ठरवलं. परिस्थितीने माणुस चहुकडून चेपला गेला की त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीही करायला तयार होतो तसंच काहीसं.

वरकरणी निरुपद्रवी दिसणारा दुर्वांचा रस नाकात गेल्यावर नाक कान घसा चांगला जाळत जातो. रोज मी भिंग घेऊन केसाचं एखादं सूक्ष्म रोपटं दिसतंय का ते बघत होतो. पण कशाचाच पत्ता नव्हता. तरी मी नेटाने महीनाभर त्या जळजळीत द्रव्याचा आस्वाद (!) घेतला. परीणामी नाकातले सगळे केस गेले आणि नवीन येणंही बंद झालं. टकलावरचे केस पुढच्या जन्मी येतील बहुतेक. मीही एक मूर्खच! त्या वैद्याला टक्कल आहे हे आधीच माझ्या लक्षात यायला पाहीजे होते! मधे कुणी तरी विग घालायचा सल्ला दिला पण मी तो नाकारला कारण मनातनं मला ते बाळाला टोपडं घातल्यासारखं वाटतं!

नुकताच मी परदेशात आलो आहे. अशा गावात जिथे भारतीय माणूस औषधाला सुद्धा सापडत नाही असं गावकरी म्हणतात. पण माझं नशीब एवढं चांगलं असतं तर मी हे सगळं लिहीलं असतं का? पहीले काही दिवस छान गेले. एक दिवस एका सुपरस्टोअर मधे जात असताना दोन माणसं चक्क मराठीतून बोलतांना दिसली. मीही न राहवून बोलायला सुरुवात केली. बोलता बोलता त्यातला एक माणूस मला सहज म्हणाला "काय इथे मुलाकडे आलात का?".

आत्ताशी कुठे मला 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण!' याचा अर्थ उमगायला लागलाय. मोठेपणाचे काही अनपेक्षित फायदेही असतात म्हणा! भरलेल्या बसमधे लोक मला केविलवाणी नजर टाकून बसायला जागा देतात हा त्यातलाच एक!

सध्या लोकांनी मला पणजोबा बनवायची वाट बघतोय!!

-- समाप्त --

गुलमोहर: 

सही लिखेला है रे.. मजा आला. Lol
- अनिलभाई

फंडू रे बॉस.... अचाट लिहील आहेस..:)

rofl.gif

खतरी लिहिलय!!

मस्त. एकदम खुसखुशीत झाला आहे. दिवाळी अंकातील लेखासारखा Happy

Lol छान करमणूक झाली असं म्हणून जखमेवर मीठ चोळायची इच्छा नाही खरंतर. पण मजा आली.

अचाट... Biggrin Biggrin Biggrin
ऑफिसात वाचण्याचा गाढवपणा केला. चिन्मय, मस्तच.

Happy दुर्वा, शेपू... Lol

    उसके दुश्मन है बहुत
    आदमी अच्छा होगा

    तेवढ्यात तिथला एक क्लार्क माझ्याकडे बघून खेकसला - "अजून पेंशन आलेली नाहीये". >>>>>>>>..
    Rofl

    शीर्षकापासूनच भन्नाट जमलाय लेख!
    >>> दुर्वांचा रस घालून केस कसे येतील? दुर्वा येतील फारतर. Lol

    दुर्वा.. शेपू.. >>>
    मॉलमधे बायको कपडे बघत होती. मी हताशपणे इकडे तिकडे बघत होतो.>>>>
    Lol

    सही रे माझ्या पणजोबा.. Happy

    --
    .. नाही चिरा, नाही पणती.

    जबर्दस्त.........अशक्य कोटीतलं लिहिलयं. हसून पुरेवाट झाली!!!!!!!!

    एका दिवसात इतक्या प्रतिक्रिया माझ्या कुठल्याच लेखाला आल्या नव्हत्या. सर्व नातवंडांचा प्रचंड आभारी आहे!

    >> बायको कपडे बघत होती. मी हताशपणे इकडे तिकडे बघत होतो.
    जबरदस्त Rofl

    चिमण आजोबा, सही लिहिलंय... एकदम कळीच्या मुद्द्यावर लिहिलंय.. झक्कास एकदम.

    अगदी झक्कास! ऑफीसात वाचत होती.. कुणी विचारलं का एकटीच हसतेस? Happy
    मागणी घातलेला प्रसंग.. Happy संपुर्ण लेख अप्रतिम!!

    एकदम भन्नाट! मजा आलि वाचताना.

    हहपुवा.

    एकदा मीही अशीच चूक केली होती. मैत्रीण नी तीचा भाऊ मध्यरात्रीचा airport वर न्यायला आला होता. रात्रीची वेळ, आधीच मी थकलेले flights delayed होते. मैत्रीण न्यायला येतेय हेच मोठे उपकार.
    मला वाटले तीचे वडील आहेत लांबून पाहीले तर.. अर्धे अधीक तुळतुळीत डोकं,उरलेलेही केस पुर्ण पांढरे झालेले, पोट बाहेर आलेले नी मोठा चष्मा.
    मी खूपच अदबीने(कारण चक्क तीचे वडीलसुद्धा बिचारे मला न्यायला आले तेही इतक्या रात्री ह्या जाणिवेने) पुढे झाले ने इथे तिथे न बघता चक्क पाया पडायला वाकले नमस्ते अंकल म्हणत.
    नंतर दोन दिवस मैत्रीणीकडे रहाताना अवघडल्यासारखे झाले होते. I couldnt believe that her brother's age is just 25. छ्या!...
    नंतर हा किस्सा सांगून माझी चूक लपवायला, इतर मैत्रींणीकडे हीच चर्चा झाली खरेच का ग तीचा भाऊ लहान आहे तिच्यापेक्षा नी २५ वर्षाचा आहे? Happy

    खरोखर जबरी Happy
    दुर्वा... शेपु सहीच Happy
    ********************************************
    The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!

    Pages