लखलख चंदेरी

Submitted by आशुचँप on 3 December, 2009 - 13:19

आणि राजा विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही.... या गोष्टीप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा उमेशच्या मागे लागून नविन ट्रेकचा हट्ट धरला. तोही आमच्याच जातीचा त्यामुळे एक सोयीचा दिवस पाहून आम्हा घुमक्कडांची चौकडी नव्या भटकंतीला निघाली.
यावेळी किल्ला ठरविला होता शिवप्रभूंची राजधानी रायगड. त्यावेळी ताम्हीणी-डोगंरवाडीचा रस्ता बाईकने जाण्यायोग्य नव्हता. त्यामुळे आम्ही वरंधा घाटाने जायचे ठरविले. नेहमीप्रमाणेच लवकर निघू असा धोशा लावत दुपारी उशीराच निघालो. वरंधा घाटापाशी पोचलो तेव्हा सुवार्ता कळली की काही दुरूस्तीच्या कामांमुळे घाट काही तास बंद राहणार आहे. उमेशने तातडीने पर्याय काढला. त्याच्या म्हणण्यानुसार, आत्ता घाट सुरु होईपर्यंत वेळ काढण्याएवजी मांढरदेव घाटाने पुढे जावे आणि नंतर पुढे महाबळेश्वरला जाऊन आंबेनळी घाटाने कोकणात उतरून पुढे जावे.
आम्हाला काय काहीही चालणार होते, तेव्हा मम.. म्हणून गाड्यांवर बसलो आणि निघालो.
घाटापाशी आलो तेव्हा छानपैकी अंधारून आले होते. एका छोटेखानी हाटेलात थोडेसे खाऊन पुन्हा गाड्यांवर स्वार झालो आणि घाटाच्या दिशेने सुटलो. घाटाच्या सुरूवातीला थोडीशी वर्दळ होती, पण नंतर मात्र आख्या घाटात आम्हाला एकही गाडी पास झाली नाही. संपुर्ण घाटात फक्त आमच्याच दोन गाड्या. आजबाजूला मिट्ट काळोख.. फक्त हेडलाईटच्या उजेडात दिसेल एवढाच रस्ता दिसत होता. उमेशची गाडी आमच्या पुढे होती. एका वळणावर त्याला काही दिसले आणि त्याने आम्हाला थांबा.. थांबा अशी खूण केली. आम्हीही उत्सुकतेनी काय आहे ते पहायला गाडी पुढे घेतली. तोपर्यंत ते दोघे गाडीवरून ऊतरले होते. उमेशने माझ्या मित्राला हेडलाईट बंद करायला सांगितले. लाईट बंद झाला आणि अचानक ते दिसले.
रस्त्याच्या बाजूला एक झाड होते त्यावर मोठ्या संख्येने काजवे बसले होते. आणि त्या निरव काळोखात ते झाड अक्षरशः लखलखत होते. आम्ही डोळे विस्फारून ते विलक्षण दृश्य पहात होतो. मी आत्तापर्यत असा देखावा कधीच पाहिला नव्हता. आजबाजूचा अंधार, बोचरी थंडी, संपुर्ण घाटात आम्हीच एकटे असल्याची जाणीव सगळं काही विसरायला झालं आणि त्या लखलखत्या प्रकाशाने सारे आसमंत वेढून टाकले.
निसर्गाच्या या अनोख्या किमयेला दाद देत पुढे निघालो पण मन मात्र त्या झाडाभोवतीच रेंगाळत होतं. थोडे पुढे जाताच तर अजूनच धमाल आली.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या एकमेकांमध्ये मिसळल्या होत्या आणि त्या जंक्शनवरही काजवे मंडळींची शाळा भरली होती. त्यामुळे त्याखालून जाताना मला तर लग्नाच्या मांडवाखालून जात असल्याचा फील आला. (त्यावेळी माझे लग्न व्हायचे होते तरीही..) मला आत्ता खरेच दु:ख होतेय की मी ते दृश्य शब्दांमध्ये वर्णन करू शकत नाही.
तिथून पुढे जाताना आलेला अनुभवही तितकाच विलक्षण. मी आधी सांगितल्याप्रमाणे आख्या घाटात आमच्याशिवाय एकही गाडी नव्हती. पण जेव्हा आम्ही घाट उतरायला सुरूवात केली तेव्हा मला असे जाणवले की मागून एक गाडी येत आहे.
मी एकदम मागे वळून पाहीले तेव्हा काळोख्या अंधाराशिवाय काहीच दिसले नाही. पुढच्या वळणावर पुन्हा एकदा भास झाला. आणि यावेळी इतका स्पष्ट की मला खरोखर वाटले की आमच्या मागून एक कार येत आहे.
आता मला हे सांगता येणार नाही की यामागचे स्पष्टीकरण काय आहे ते पण मला आजही तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो. नुसताच भास म्हणावा तर मला प्रत्यक्षात दिसल्यासारखे जाणवत होते.
मला जाणवत होते की आमच्या मागे एक पांढर्‍या रंगाची मारूती कार येत आहे. त्यात एक मध्यवयीन जोडपे आहे. आणि सावकाशपणे ती गाडी घाट उतरत आहे.
मला शेवटी हा प्रकार इतका असह्य झाला की मी सगळ्यांना थांबायला लावले. मी काही पावले मागे जाऊन पाहीले की कोणच्या गाडीचा मागमूस लागतोय का. मला अपेक्षा होती की एखाद्या तरी गाडीचा लाईट दिसेल, पण त्या दाट मिट्ट काळोखाखेरीज मला काहीही दिसले नाही आणि जाणवलेही नाही.
मी सगळ्यांना हा भास सांगितला. हरिश्चंद्रगडाचा अनुभव ताजा असल्यामुळे कोणी टिंगल-टवाळी केली नाही, पण फार गांर्भियानेही घेतले नाही.
"तुझ्यावर बहुदा त्या घटनेचा जरा जास्तच पगडा बसला आहे", असा निष्कर्ष काढून सगळे रिकामे झाले.
परत गाड्या सुरू करून जाऊ लागतो तो परत हा भास व्हायला सुरूवात झाली. मला वाटले खरेच माझ्या मनाचे हे खेळ आहेत. नाहीतर बाकीच्या तिघांनाही काहीतरी जाणवायला पाहीजे होते.
पण मला वरचेवर मागे वळून पहायची इच्छा होत होती, पण हेही कळत होते की मागे अंधाराशिवाय काहीच दिसणार नाही. तरीपण मागच्या गाडीतून येणारे जोडपे माझा पिच्छा सोडायला तयार नव्हते.
मी निखिलशी गप्पा मारायला सुरूवात केली, म्हणलो किमान त्या निमित्ताने माझे मन दुसरीकडे वेधले जाईल.
अर्थात हा प्रयत्नही असफल ठरला कारण बोलतानाही माझ्या मनातून ती गाडी आणि ते जोडपे जात नव्हते.
जागेपणी स्वप्न पडल्याचा अनुभव का खरोखरच कोणती अदृश्य गाडी आमच्या मागे आहे यात मला फरक करता येईना. पुर्णपणे भंजाळलो होतो आणि अचानक शेवटच्या वळणावर मागचा आवाज थांबला.
पहिले काही सेकंद मला जाणवले नाही पण लक्षात आले की आता आपल्या मागून कोणचीही गाडी येत नाहीये. आता फक्त आमच्या दोन गाड्यांचेच आवाज येत आहेत.
एकदम हायसे वाटल्यासारखे झाले. मनावरचे ते अदृश्य दडपण जणू अल्लाद कोणीतरी काढून घेतले होते. तरीपण मला ही भावना त्रस्त करत होती की असे का व्हावे.
नुसतेच मनाचे खेळ म्हणावेत तर ते त्या थोडक्याच भागापुरते का जाणवले. बरं कशाची भिती म्हणावी तर यात मला कुठेही घाबरून गेल्याचे वाटले नाही.
पण मग असे का व्हावे याचा मला उलगडा होईना. पुढे घाट संपल्यावर वस्ती सुरू झाली. एके ठिकाणी चहाची पाटी दिसली आणि मिणमिळता बल्ब.
चहाची तल्लफ सगळ्यांनाच आलेली, त्यामुळे न सांगताच गाड्या त्या खोपटाकडे वळल्या. आमच्या गाड्यांचे आवाज ऐकून खोपट्याचा मालक त्याच्या उबदार घोंगडीखालून उठला.
तो चहाच्या तयारीला लागत असतानाच मी मला सतावत असलेल्या या प्रश्नाबद्दल चर्चासत्र सुरू केले.
भूते-खेते, आभास असे सगळे असलेल्या या चर्चेत तो गावकरी ओढला गेला नसता तरच नवल.
मग सगळी कहाणी त्याला ऐकवली.
"आरं तिच्या मंग तीच ती गाडी असणार,"
हे ऐकताच माझ्या मनात काय झाले असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता. मी कापर्‍या आवाजात विचारले
"कोणची गाडी?"
तो म्हणला "आवं मागल्या आठवड्यात योक गाडी खाली पल्डी व्हती. तिच असनार बगा."
"पांढऱया रंगाची होती का, तिच्यात दोघेजण होते का?" मी एकदम अधीरपणे विचारले.
"ते काय मला ठावं नाही. पण डिपारमेंटची मान्स बोलत व्हती तवा म्या ऐकलं,"
"पन तुम्हास्नी हवं असलं तर गावामंदी जावा, थकडं कललं समदं,"
बाकीच्यांच्या नजरा पाहून मी गावात जाऊया का हा प्रश्न मनातचं ठेवला.
पण अजुनही मला तो प्रसंग आठवतो आणि वाटतं त्या गावात जाऊन चौकशी करावी की खरोखरच ती गाडी पांढर्‍या रंगाची मारूती होती का आणि त्यात जोडपे होते का आणि त्यांचे काय झाले.
काय म्हणताय येताय मग माझ्याबरोबर????

गुलमोहर: 

आशु, खरच इंटरेस्टींग आहे. तुम्ही नक्की चौकशी करा. असे अनुभव सगळ्यांनाच येतात असे नाही. तुम्ही नक्कीच वेगळे आहात.

नानबा, तुम्ही म्हणताय ते खरंय. मला अजुन रूखरूख वाटते त्यावेळी मी सगळ्यांना पटवून गावात न्यायला पाहिजे होते.
========
मुग्धा - मला असे वाटत नाही मी काही वेगळा आहे. अद्यापी तरी ऐकदाच हा अनुभव आला आहे.

अरे बाकीचे आधीच माझी चेष्टा करत होते. त्यांना मी काय सांगतोय हे खरेच वाटत नव्हते...काय करणार आणि दुसरे म्हणजे नक्की कुठे कोण सांगणार याबाबत काय खात्री नव्हती...

अज्ञात वस्तुंचा वावर आपल्या सभोवती अखंड चालु असतो, म्हणुन काहीच हालचाली आपल्याला जाणवु शकतात सर्वच नाही कारण त्यांचाही संबंध आपल्याशी या प्रूथ्विशी प्रत्येक्ष-अप्रत्येक्षरीत्या आहे. या अज्ञात दुनियेचा वावरच आपल्यात आपला राम आपला रावण राखायला कारणीभुत असतो. जेव्हा एखादी घटना शास्त्रिय किंवा नैसर्गिक कारणा शिवाय घटते तिला आपण 'अनहोनी' म्हणतो, करण ती आपल्या आकलन शक्तिच्या बाहेरची गोष्ट असते. पण ती असते.

आशु... असा भास आम्हाला मार्लेश्वर ते रत्नागीरी मार्गावर झाला होता. ८-८:३० वाजले होते. सतत शीळ ऐकायला येत होती १५ मीनिटे.. आणी निर्जन रस्ता होता आमच्या ३ बाईक सोड्ल्यातर.

डेविल - पावसाळ्याचे दिवस होते का....
कारण त्या दिवसात.. मलबार व्हिसलींग थ्रश नावाचा पक्षी शीळ घालत असतो कायम..आणि अगदी मानवी वाटावी अशी शीळ असते...
आणि दिसत नाही अजिबात...