सोबती

Submitted by चिमण on 8 December, 2008 - 10:50

पहाटेचे ६ वाजलेले असतात. मी कामावर जाण्यासाठी म्हणून गाडीपाशी येतो. उशीरा निघालो तर ऑफिसला जायला २ तासांच्यावर वेळ लागतो म्हणून लवकर निघण्याचा खटाटोप! गाडीवर भरपूर फ्रॉस्ट जमलेले असते. एकंदरीत थंडीचे दिवस उदासवाणेच असतात.. छोटा दिवस, जास्त अंधार, येताजाता धुकं व बर्फ, दणकट थंडी आणि भेसूर दिसणारे निष्पर्ण वृक्ष! शिव्या घालत घालत निरुत्साहाने बर्फ काढतो आणि गाडी घेऊन निघतो. हाताला लागेल ती सिडी सरकवून गाणी लावतो.

"आखोंमें तुम दिलमें तुम हो".. हाफ टिकट मधलं किशोर व गीता दत्तचं गाणं लागतं. पिक्चरमधले प्रसंग डोळ्यासमोर तरळू लागतात आणि हळूच ओठांच्या कोपर्‍यातून हसू फुटतं. मन प्रफुल्लित होतं. आपोआप मी गुणगुणायला लागतो. डोळ्यावरची झोप उडून जाते. मघाचा वैताग कुठल्याकुठे पळून जातो. परक्या देशात अचानक जुना जवळचा मित्र भेटल्याचा आनंद होतो. कधी एकदाचा संपतोय हा प्रवास असं वाटायच्या ऐवजी आता संपूच नये असं वाटतं!

हाफ टिकट मधे किशोरनं काय अशक्य अभिनय केलाय! कधी कधी असं वाटतं की दिग्दर्शक त्याला फारसं काही सांगायच्या फंदात पडला नसावा.. 'सेटवर जा आणि पाहीजे तो गोंधळ घाल!' एवढंच सांगीतलं असणार. हाफ टिकट म्हणजे किशोरच्या सर्किटपणाचा कळस आहे. एवढा भंपकपणा, वेडेपणा एखादा माणूस इतक्या सहजतेने कसा करू शकतो? त्यात भर म्हणजे त्याची गाणी आणि नाच! एका प्रसंगातील शम्मी बरोबरचा त्याचा नाच आयुष्यभर लक्षात रहातो. एकही संवाद नसताना किशोर नुसत्या नाचण्यानं कमालीचा हसवतो. हा पिक्चर पाहील्यावर मेहमूद, आसरानी सारखे नट त्याला सर्वश्रेष्ठ विनोदी नट का म्हणायचे ते मात्र कळतं!

किशोर पहिल्यांदा मला भेटला तेंव्हा मला असच एकटं एकटं वाटत होतं. आम्ही पुण्यात ६९ साली प्रथम आल्यानंतर मला सगळंच परकं होतं, ओळखी अजून व्हायच्या होत्या. त्याच वेळेला 'आराधना' आला आणि किशोर माझा पहीला मित्र झाला. गाता गाता माझ्या सारख्या अनेकांना त्यानं खिशात टाकलं. नंतरही कामानिमित्त वेगवेगळ्या देशात एकटं रहायची वेळ आली तेंव्हा किशोरच सोबतीला होता.

एखाद्या झर्‍यासारखा खळाळता आवाज.. मोकळा ताजा टवटवीत आणि नैसर्गिक.. तालीम करून घोटलेला नाही. तो गाणं शिकलेला नव्हता कदाचित त्यामुळे संगीताच्या बारीक सारीक नियमांपासून मुक्त होता. पण तो गाण्याचा मूड व प्रसंगाला योग्य असे निरनिराळे आवाज, चित्कार व शब्द असं काहीही घुसडून रंगत मात्र वाढवायचा. "एक चतुर नार" मधे "उम ब्रुम उम ब्रुम" पासून "किचिपुडताय" पर्यंत कुठल्याही भाषेत नसलेले विचित्र शब्द तो गाण्याला कसलीही बाधा न आणता सहजगत्या घालतो. परीणामी गाणं एका वेगळ्याच पातळीवर जातं. वास्तविक मन्नाडेनं हे गाणं कर्नाटकी ढंगात उत्कृष्टपणे म्हंटल आहे पण शेवटी लक्षात रहातो तो किशोर!

आपल्याला गाणं येत नाही हे तोही प्रामाणिकपणे कबूल करायचा. फार पूर्वी लतानं घेतलेल्या त्याच्या मुलाखतीत बोलता बोलता तो मधेच म्हणाला "तुम तो जानती हो लता! मुझे ये सा, रे, गा कुछ नहीं समझता". जर धुन काही दिवस आधी ऐकवली आणि तीवर किशोरला शांतपणे विचार करू दिला तर तो तिचं सोनं करतो हे स. दे. बर्मनच्या लक्षात आलं होतं. पुढे टेपरेकॉर्डर आल्यावर तो नवीन गाणं टेप करून ७-८ दिवस अगोदर त्याला ऐकायला द्यायचा. हीच पध्दत आर. डी. नं पण पुढे चालू ठेवली. मात्र "मेरे नयना सावन भादो" ची धुन ऐकल्यावर किशोरनं "ये मुझसे नहीं होगा" असं म्हणत ते गाणं गायला साफ नकार दिला. हे गाणं लता पण गाणार आहे हे कळल्यावर किशोरनं आरडीला "तू ते गाणं आधी लताच्या आवाजात रेकॉर्ड करून मला दे. मग मी ते पाठ करून जसच्या तसं म्हणतो" असं सुचवलं. टेप घेऊन किशोर गेला ते ८ दिवसानंतर उगवला. नंतर खुद्द आरडीनं "गाना सुननेके बाद ऐसा नहीं लग रहा था की वो पढकर या सीखकर गा रहे हैं! ऐसा लग रहा था की वो अपने मनसेही गा रहे हैं!" अशी पावती दिली. किशोर काम करत असलेल्या नौकरी पिक्चरला सलील चौधरीचं संगीत होतं. किशोरला शास्त्रिय संगीत येत नाही म्हंटल्यावर सलीलनं त्याला "छोटासा घर होगा बादलोंकी छावमें" हे गाणं द्यायचं नाकारलं. नंतर किशोरनं त्याला आपलं एक गाणं ऐकवून कसंबसं पटवलं. ते गाणं छान झालं, नंतर पुढे हाफ टिकट मधलीही गाणी सलीलनं त्याला दिली पण तरीही तो किशोरला गायक मानायचा नाही. तब्बल १८ वर्षांनंतर 'मेरे अपने' साठी सलीलनं किशोरचं "कोई होता जिसको अपना" हे गाणं केल्यावर त्याचं मत बदललं. "जी गोष्ट सचिनदाला समजली होती ती कळायला मला १८ वर्ष लागली" असं तो खेदाने म्हणाला.

13kish2.jpg

त्याचं सगळच जगावेगळं व नाविन्यपूर्ण होतं. मूळचं आभासकुमार नाव सोडून किशोरकुमार हे नाव घेऊन त्याने चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. त्याच्या भावाची, अशोककुमारची, त्यानं अभिनेता व्हाव अशी इच्छा होती. पण गाण्यातलं सारेगम पण माहीत नसलेल्या किशोरला गायक व्हायचं होतं. तो सैगलला गुरू मानायचा. एकदा स.दे. बर्मन अशोककुमारकडे आला असताना त्यानं किशोरला सैगलची नक्कल करताना ऐकलं. स.दे. नं त्याला स्वतःची शैली विकसीत करण्याचा सल्ला दिला. तो त्यानं ऐकला. किशोरची शैली त्याच्यावेळच्या व त्याच्यानंतरच्या पार्श्वगायकांपेक्षा फारच वेगळी आहे म्हणूनच त्याच्या दर्जाचा एकही गायक अजून झालेला नाही. स.दे. नं किशोरला घडवला. तोही त्याला आपला गुरू म्हणायचा. त्याच्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरूवात स.दे. नं दिलेल्या गाण्यानं व्हायची. स.दे. गेल्यानंतर रेडिओ सिलोन वर किशोरनं त्याला श्रध्दांजली अर्पण केली. एक तासाचा कार्यक्रम किशोरनं केला. स. दे. च्या बर्‍याच गमतीजमती त्यानं स. दे. च्या बोलण्याची नक्कल करीत सांगीतल्या. जेंव्हा किशोरला अभिनयातून गाणी म्हणायला वेळ मिळत नव्हता त्या वेळची एक गोष्ट त्यानं सांगीतली. तेंव्हा तो कुठल्याच संगीतकाराला अगदी स.दे.ला सुद्धा तारखा देऊ शकत नव्हता. त्या काळात स.दे. नं त्याला रात्री घरी जेवायला बोलावलं. आग्रह करकरून त्याला प्रचंड खायला घातलं. शेवटी तो म्हणाला 'आता बास झालं सचिनदा! मला आता चालवणार पण नाही!'. ताबडतोब स. दे. नं नोकरांना सांगून घराच्या दार-खिडक्या बंद करवल्या आणि म्हणाला 'आता कुठे जाशील. चल, गाण्याची प्रॅक्टीस करू या!'. मिली चित्रपटाचे रेकॉर्डिंग चालू असतानाच स.दे. आजारी पडला. हॉस्पीटलमधे किशोर त्याला भेटायला गेल्यावर स.दे. नं त्याला नुकतच रेकॉर्ड झालेलं मिली मधलं 'बडी सूनी सूनी है' हे गाणं म्हणायला लावलं.

भावाच्या आग्रहाखातर तो अभिनेता झाला खरा पण त्यात त्याचं मन लागत नव्हतं. चलती का नाम गाडी, पडोसन, नई दिल्ली असे त्याचे काही पिक्चर फार गाजले पण गाण्यासाठी त्यानं अभिनय सोडून दिला. सेटवर किशोर लोकांना काहीतरी येडपटपणा करून सतत हसवत असे. दिल्ली का ठग च्या सेटवर त्यानं नूतनला विचारलं 'मैं तुम्हे पागल लगता हूँ ना?'. त्यावर नूतननं 'लगते हो? मुझे तो यकीन है!' असं सांगून त्याला खलास केला.

kishore-kumar.jpg

त्याच्या कार्यक्रमांच्या वेळी सूत्रसंचालन तो स्वतःच करत असे. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात तो म्हणाला की डॉक्टरनं मला गाणी म्हणताना नाच न करण्याचा सल्ला दिला आहे. 'पर गाना और नाचना तो साथ मे होता है!" असं म्हणून त्यानं डॉक्टरचा सल्ला धाब्यावर बसवला आणि 'खैके पान बनारसवाला' हे गाणं जोरदार नाच करत सादर केलं. त्याचं बोलणं उत्स्फूर्त होतं व बोलता बोलता मधेच कुठल्या तरी गाण्याची गंमत सांगायचा आणि प्रॅक्टीस केलेली नसली तरी गायचा!

आणीबाणीच्या काळात संजय गांधीच्या कार्यक्रमात त्यानं गाणी म्हणायला स्वच्छ नकार दिला. त्याबद्दल त्याची गाणी रेडीओवर वाजवणं बंद झालं पण हा पठ्ठ्या शेवट पर्यंत माफी मागायला काही गेला नाही. शेवटी इतर लोकांनीच रदबदली केल्यावर त्याची गाणी परत सुरू झाली.

किशोरच्या सोबतीमुळं आज फार पटकन मी ऑफिसला पोचतो. सूरमयी व आनंदी दुनियेतून रूक्ष जगात प्रवेश करतो... किशोर काळाच्या पडद्याआड गेला असला तरी माझ्या कानाच्या पडद्याआड अजून शाबूत असल्याच्या आनंदाने!

-- समाप्त --

गुलमोहर: 

छान Happy

झकास!
>>किशोरच्या सोबतीमुळं आज फार पटकन मी ऑफिसला पोचतो.
अगदी अगदी Happy

वा वा बर्‍याच दिवसांनी असा लेख वाचला!

सुंदर लिहिलंय.

मस्तच, चिन्मय. सुंदर लेख.

मस्तच रे चिन्मय.. शेवटी किशोर इज किशोर यार... Happy

मयुरेश, दाद,
ते चिन्मय गोखले नाहीये, चिमण्या गोखले असे आहे Happy

किशोर........... आई ग... मस्तच !!!!!!!
आनेवाला पल जानेवाला हे

काल मी लेख लिहून घरी गेलो आणि आज येऊन पहातो तर ढीगभर प्रतिक्रिया आलेल्या! असो. सर्वांना धन्यवाद! फारच आभारी आहे!

चिमण्या
अप्रतीम लेख्.....चलती का नाम गाडी मध्ये जी क्यूट धमाल त्याने केली आहे ..ती लाजवाब! आमचा सर्व ग्रूप त्यावेळी किशोरवर पूर्ण फिदा होता. सगळ्यात गंमत म्हणजे शेवटी बंगल्यात शिरताना तो स्वता: मागे राहातो व मधुबालाला पुढे घालून स्वता: तिच्या मागे लपत लपत आत शिरतो ते तर मस्तच!
धन्यवाद...........खूप दिवसांनी किशोरकुमारच्या आठवणींना उजाळा मिळाला.

मस्तय

--
I’m not sure what’s wrong… But it’s probably your fault... Proud

खरंच किशोरच्या गाण्यांचा विचार करायला लागलं की आसपासच्या रुक्ष गोष्टींचा विसर पडतो.
मस्तच लिहिलय. अभिनंदन!

परत एकदा सगळ्यांना धन्यवाद!
योग, तुझा लेख मला फार आवडला. असा एखादा लेख अस्तित्वात आहे हे समजले असते तर मी लिहायच्या फंदात पडलो नसतो.

चिमण्यागोखले, अतिशय सुंदर. चित्रे टा़कल्याने वातावरणनिर्मिती छान झाली. आणि तुमची शैलीही सुरेख.. Happy

--
.. नाही चिरा, नाही पणती.

>>तर मी लिहायच्या फंदात पडलो नसतो.
अरे बब असे काही नाहीये.... उलट गुरू च्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या..:)

छान Happy

अहाहा ! बहार आणलीस मित्रा....
मन्नाडे, रफीसाब, मुकेश सगळेच ग्रेट होते. पण किशोरदांचं वैशिष्ठ्य म्हणजे त्यांनी पार्श्वगायकांना त्यांचा योग्य मोबदला संगित दिग्दर्शकाकडे मागण्याचं धैर्य दिलं. त्या काळात अगदी रफीला देखिल किती तरी संगीत दिग्दर्शकांनी पैशाच्या बाबतीत फसवलं होतं. चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शकाइतकाच गायकदेखिल महत्वाचा आहे, हे किशोरने जाण्वुन दिलं, गायकांना त्यांचं योग्य ते पारिश्रमिक मागण्याचं धाडस आणि नैतिक बळ किशोरने दिलं असं म्हटलं तरी ते फारसं गैर ठरणार नाही.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

तुमची शैली खूप छान आहे गोखले साहेब. लेख आवडला.

किशोरच्या सर्व चाहत्यांना मनःपूर्वक धन्यवाद! मला किशोरच्या गाण्यांची एक साईट सापडली आहे. तिथे गाणी फक्त ऐकता येतात, डाउनलोड करता येत नाहीत. पण बरीच दुर्मिळ गाणी तिथे ऐकता येतील. काही गाण्यांच रेकॉर्डिंग तितकसं चांगलं नाही. उदा. 'ये है जीवनकी रेल ये है तूफान मेल' हे गाणं. जरूर आनंद घ्या!

साईट :- http://songs.kishorekumar.org/

-- चिमण

सुंदर लेख,मजा आली.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

Pages