बायको हरवली आहे..!!

Submitted by A M I T on 23 November, 2010 - 07:11

इन्स्पेक्टर साखरदांडेंनी फोनवरील बोलणं आटोपून रिसीव्हर ठेवला.
आणि त्यांची नजर समोर बसलेल्या एका तरूण गृहस्थावर पडली.
"बोला. काय पाहीजे?" इ. साखरदांडेंनी सवयीने प्रश्न केला.
"चंदा पाहीजे." रूमालाने कपाळावरचा घाम टिपत गृहस्थ म्हणाला.
"चंदा..!!" इ. साखरदांडेंच्या कपाळावर आठ्या जमल्या. "अजून गणेशोत्सव होऊन महीना लोटला नाही. लगेच आले चंदा गोळा करायला." आपला "हलका" खिसा चाचपत साखरदांडे तडकलेच.
"तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो माझ्या बायकोचं नाव आहे "चंदा." गृहस्थाने "नाव" घेतले.
"मग मी काय तिच्या बारशाचे पेढे वाटू?" इ. साखरदांडेंनी आपल्या बायकोवरचा राग ह्या गृहस्थाच्या बायकोवर काढला.
"अहो माझी बायको हरवलीय." गृहस्थाने हळवा होत तक्रार केली.
"काय सांगताय? मग यात शोक करण्याचं कारण काय! तुम्ही तर खुश व्हायला हवेत." इ. साखरदांडेंनी उत्साहात सल्ला दिला. "माझीच बायको कशी हरवत नाही कुठे?"
"का हो, इतकी वाईट आहे का तुमची बायको?" गृहस्थ.
"वाईट! माझ्याबरोबर भांडताना तिची जीभ अगदी न्हाव्याच्या कैचीसारखं चालत असतं. मी काही बोललो की कचकच कचकच कचकच. " इ. साखरदांडेंनी बायकोचे "दुर्गुण" गायले. "असो. मला सांगा तुमची कशी काय हरवली?"
"कशी म्हणजे?" गृहस्थांनी न समजून विचारले.
"कशी म्हणजे? चावी हरवतात तशी हरवली की आणखी कशी?" इ.चा तर्क.
"अहो, नुकतच आमचं लग्न होऊन आम्ही हनीमूनला हॉटेल रजनीगंधा मध्ये आलो. सकाळी काही खरेदीसाठी बाहेर निघालो. खरेदी जवळजवळ आटोपलीच होती तोच एका हमरस्त्यावर आम्हांला एक घोळका दिसला. काय झालं असावं? हे पाहण्यासाठी आम्ही घोळक्यापाशी गेलो. आणि नंतर पाहतो तर बायको गायब.!!" गृहस्थाने जबानी दिली.
"अच्छा. म्हणजे असली भानगड आहे!"
"मग तुम्हाला काय वाटलं, "नकली" भानगड आहे?"
"हे पहा. तुम्हांला स्वत:ची बायको सांभाळता येत नाही."
"हरवली. आता त्याला मी काय करणार?"
"बरोबर..! तुम्ही तुमच्या बायका हरवा. आम्ही शोधतो. एवढं एकच काम उरलयं पोलीसांकडे. मला सांगा, तुम्ही हॉटेलमध्ये फोन केला होतात का?"
"हो. पण तिथेही ती नाही."
"बरं. आता मला तुमच्या बायकोचं वर्णन सांगा."
"फोटो आहे. चालेल का?"
"उत्तम. द्या बघू द्या फोटो." इ. साखरदांडे फोटो पाहण्यास अधिर झाले.
गृहस्थाने बॅगेतला एक फोटो साखरदांडेंच्या हाती दिला.
"अहो, हा काय?"
"आमच्या लग्नातला फोटो आहे हा."
"अहो, पण या फोटोत तुमच्या बायकोचा चेहरा मुंडावळ्यांनी झाकलेला आहे. ओळखूही येत नाही. दूसरा फोटो नाही का, ज्यात तिचा चेहरा स्पष्ट दिसेल असा."
"हो. आहे ना." गृहस्थाने दूसरा फोटो इ.च्या हाती दिला.
"वॉव! ब्युटीफूल. अशी मनात आणि "तुमची बायको अगदी चंद्रासारखी दिसते हो." अशी त्या गृहस्थाच्या तोंडावर इ. नी तोंड भरून स्तुती केली.
"जो तो माझ्या बायकोला चंद्राची उपमा देतो. मग मी यांना "धुमकेतू" वाटतो की काय?" गृहस्थाच्या मनातला राग खदखदला.
"नाहीतर माझी बायको. ना रंग-रूप ना फिगर. इतरांच्या बायका चंद्रासारख्या कलेकलेने वाढतात. पण साला माझी बायको किलो किलोने वाढते." इति इ. साखरदांडे.
"नका हो. बायकोचं वजन असं चारचौघांत सांगू नका."
"का हो का?"
"तुमचं वजन कमी होईल."
"माझं वजन कमी होईल?"
"समाजातलं."
"हम्म. बरोबर बोललात." असं म्हणत इ. साखरदांडेंनी "वजनदार" नि:श्वास सोडला तेव्हा त्यांची झुपकेदार मिशी किंचीत हलली. "ठिक आहे. आम्ही तुमच्या बायकोचा तपास करतो. तुम्ही तुमची डीटेल्स या इथे लिहा. तुमची बायको सापडली की लग्गेच कळवतो तुम्हांला."
"धन्यवाद साहेब."
"धन्यवाद कसले? आमची ड्युटीच आहे ती."
"येतो."
"या." म्हणत इ. साखरदांडे आपले समाजातले वजन तपासत विचारमग्न झाले.

गृहस्थ पोलीस ठाण्याबाहेर पडला.तेव्हा जवळच पानाच्या टपरीवरील रेडिओवर गाणं वाजत होतं..
ये अंधा कानून है..!!

गृहस्थाला मात्र ते वेगळं ऐकायला आलं, ते असं...
ये "चंदा" कानून है..!!

आणि चंदाच्या चंदेरी स्वप्नात तो तरंगू लागला.

***

हा लेख इथेही वाचू शकता.

http://kolaantudya.blogspot.com/

गुलमोहर: 

किती वायफळ लिहावे याशीही सिमा असावी..... या लिखाणासी साध्य असे काही आहे का? किमानपक्षी गरीब विनोद तरी साधावा. अगदीच सुमार लिहीता आपण.

मी असे का बोलतोय? ते तुम्ही तुमच्या मनाला विचारू नका.... पुन्हा एकदा तुमचाच लेख वाचा.

विचारी मना तूच वाचून पाही ||||

धन्यवाद मनू.
माझा फोटो किंवा प्रत्यक्ष पाहीलं असतत तर तुम्हाला कळलं असतं की, मी "हाडाचा" लेखक आहे. Lol

मला राग आला असेल, असा विचार आपल्या विचारी डोक्यात आणू नये.

बाकी...॥ विचारी मनू तुमच्यासारखा शोधून सापडणार नाही. ॥