मी परत येइन ...... (अंतीम भाग)

Submitted by विशाल कुलकर्णी on 15 November, 2010 - 06:57

मी परत येइन.... भाग १

मी परत येइन.... भाग १

दुसरा दिवस उजाडला. सकाळचे नऊ - साडे नऊ वाजले होते. काल दुपारी वाड्याकडे गेलेली अदिती परत आली नव्हती. मास्तरांच्या डोळ्यातल्या पाण्याला खंड नव्हता. ते कर्नलची वाट बघत होते.

त्यांच्या मनात अनेक प्रश्न रुंजी घालत होते....

अदितीचं काय झालं असेल? ती जिवंत असेल का? असेल तर कुठल्या अवस्थेत असेल? आपण अदितीला जावु दिलं ती मोठी चुक केली का? गुरुजींनी आपल्या पत्नीबद्दल, माईंबद्द्ल खोटं का सांगितलं ? ती माऊली शेवटपर्यंत गावासाठी झटत होती.........

महत्वाचे म्हणजे ती तिसरी व्यक्ती कोण असेल?

त्यांना माहीतच नव्हतं, त्या तिसर्‍या व्यक्तीला त्यांनीच कालच फोन करुन बोलावलं होतं. फक्त श्रीराम गुरुजींचा आणि त्यांच्या स्वामींचा अंदाज थोडक्यात चुकला होता. या तिसर्‍या व्यक्ती बरोबर आणखी एक चौथी व्यक्ती तडवळ्यात येणार होती. तडवळ्याचं नष्टचक्र थोड्याच वेळात संपणार होतं.....

पुन्हा शुभ्र, पवित्र वातावरण तडवळ्यात नांदणार होतं.......

**********************************************************************************************************

आता इथुन पुढे..........

"मास्तर, आपण वाड्यात घुसायचं का? ती अदिती ताई एकलीच गेली हाये काल? तसाबी त्यो वाडा लै खतरनाक हे, पन तायनं आपल्यासाटनं जिव धोक्यात घाटलाया, काल दोपारच्याला गेलेली ताय आजुन परत न्हाय आली मास्तर. आता आमालाच लाज वाटाया लागलीया. जे काय व्हयाचं आसंल ते व्हवू दे पन आता थांबायला जिव घेत न्हाय मास्तर."

गावातली तरणीताठी पोरं आता स्वतःवर आणि वाड्यावरही चिडायला लागली होती. दिरगुळे मास्तरांनाही स्वतःच्या असहाय्यतेचा मनस्वी संताप यायला लागला होता. मुळात वाड्यात जे काही आहे ते किती भयानक आहे याची कल्पना सद्ध्या संपुर्ण गावात फक्त त्यांनाच होती. त्यांचं तडवळं कुठल्या भीषण संकटाच्या उंबरठ्यावर उभं आहे ते फक्त त्यांनाच माहीत होतं. पण त्यांनी अदितीला शब्द दिला होता की ते स्वतः एकटे किंवा गावच्या कुणालाही धोक्यात टाकणार नाहीत. म्हणुनच ते काळजावर दगड ठेवुन कर्नलसाहेबांची वाट पाहात होते. कारण अदितीचं काय झालं ते कर्नलसाहेबांना सांगु शकणारे ते एकटेच गावात होते. कर्नल त्यांच्या सांगण्यावर कितपत विश्वास ठेवतील हा देखील मोठाच प्रश्न होता मास्तरांसमोर. पण एकदा कर्नल आले की त्यांना सत्य परिस्थीती सांगुन मग कुठल्याही धोक्याचा विचार न करता अदितीला शोधायला वाड्यात शिरायचं हा विचार त्यांनी मनाशी अगदी पक्का केला होता. तशी त्यांनी आपल्या पत्नीलाही कल्पना देवुन ठेवली होती. ते फक्त कर्नलसाहेबांची वाट पाहात होते, एकदा त्या कर्तव्यातुन मोकळे झाले की मग जिवाची पर्वा न करत जे समोर येइल त्याला सामोरे जायचे मग त्यात जिव गेला तरी बेहत्तर हा निर्णय त्यांनी कधीच मनाशी घेवुन टाकला होता.

साधारण ११.३० च्या दरम्यान मारुतीच्या देवळासमोर एक जुनाट वाटणारी, पण मजबुत अशी बंदीस्त जीप येवुन उभी राहीली. भारतीय लष्कर वापरते तशा प्रकारची 'रक्षक' ची ती चिलखती जीप होती. जीपचा ड्रायव्हरपासचा दरवाजा उघडला आणि एक सहा फुट उंचीचा, साधारणपणे साठी ओलांडलेला, तरीही जेमतेम पन्नाशीचा वाटणारा एक कणखर म्हातारा जीपमधुन उतरला.

सहा फुट उंची, मजबुत व्यायामाचे शरीर, त्यांच्याकडे बघतानाच हा माणुस ऐन तारुण्यात दारासिंगच वाटत असेल याची खात्री पटत होती. अंगावर करड्या रंगाचा एक लष्करी पद्धतीचा सुट, पायात फिक्या हिरवट खाकी रंगाची शिकारी लोक घालतात तसली विजार. डोक्यावरच्या अमेरिकन टाईपच्या आर्मी कॅपमधुन आता पांढरेशुभ्र झालेले असले तरी जसेच्या तसे भरघोस प्रमाणात असलेले केस बाहेर डोकावत होते. ते लांब वाढलेले केस सोडले तर बाकी सर्व अवतार एखाद्या मिलीटरी अधिकार्‍यासारखाच होता. चेहर्‍यावर विलक्षण सावध असा करडेपणा, ओठ झाकणार्‍या गलमिशा. मास्तरांनी त्या पहाडाला बघितले मात्र, ते ओळखुन चुकले की ती वेळ आली आहे. स्वतःलाच धीर देत दिरगुळे मास्तर शब्द गोळा करत पुढे सरकले.

"मिस्टर दिगंबर दिरगुळे?"

त्यांच्याकडे बघत समोरच्या पहाडाने प्रसन्नपणे आपल्या मिशांवर डाव्या हाताची पालथी मुठ फिरवीत पृच्छा केली आणि आपला उजवा हात हस्तांदोलनासाठी पुढे केला.

"आम्ही कर्नल रणधीरराजे देशमुख. अदितीचा बाप. आता निवृत्त झालोय आर्मीतून पण अजुनही नावापुढे रिटायर्ड नाही लावत कारण मनाने अजुनही आर्मी सोडली नाहीये. बाय द वे, कमिंग टु द पॉईंट, काल तुम्ही फोनवर सांगीतलेत की अदिती काल दुपारी कुठल्याशा देसायांच्या वाड्यात गेलीय ती अजुनही परत आलेली नाहीये. मला जरा सगळं नीट मुद्देसुदपणे सांगता का. त्यावर आपली पुढची युद्धनीती ठरवता येइल."

म्हातारा भलताच फास्ट होता. मास्तरांना काय बोलावे तेच सुचेना...

"कर्नलसाहेब.... अहो अदिती......."

"दिरगुळेसाहेब, अहो माझी लेक आहे ती! ती संकटात आहे हे मला कळालेय. आता त्यावर इतर व्यर्थ चर्चा करुन वेळ घालवत बसण्यापेक्षा तिला मदत होइल अशी पावले हलवायला नकोत का आपल्याला? तेव्हा बाकी सगळ्या चिंता सोडा. सगळं सविस्तर सांगा, पुढे काय करायचं ते ठरवून आपल्याला कृती करायचीय. गप्पांमध्ये जास्त वेळ घालवणं मला आवडतही नाही, ते माझ्या स्वभावातच नाही."

कर्नलसाहेबांनी आपल्या स्वभावानुसार फटकळपणे सांगून टाकले.

"नाही कर्नलसाहेब, तुमच्या भावना कळतात मला. पण इथे शत्रु नेहमीसारखा नाहीये. गावात आधीच काही बळी घेतले आहेत त्याने. तुम्ही आतापर्यंत ज्या लढाया लढला आहात त्या मानवी शत्रुंच्या विरोधात. पण मुळात इथे समोर जे उभे आहे, ज्याचा आपल्याला सामना करायचाय ते मानवी नाहीये, ती कुठलीतरी अनामिक, अज्ञात अशी अमानवी शक्ती आहे, जिच्यासमोर सगळे मानवी प्रयत्न तोकडे पडतील. आमच्या पुज्य श्रीरामगुरुजींचा आधीच बळी घेतलाय त्या शक्तीने. कुठल्याही दैवी शक्तीच्या बरोबरीचे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त असे सामर्थ्य आहे त्या शक्तीकडे."

दिरगुळे मास्तर एकाच दमात सगळे बोलून गेले.

"असं नसतं मास्तर. त्या परमेश्वरापेक्षा या जगात काहीच श्रेष्ठ नाही. चांगलं आणि वाईटाच्या युद्धात नेहमी चांगल्याचाच विजय होतो, त्यात उशीर लागतो. कारण चांगल्याला आपलं चांगलं असणं, सत असणं सिद्ध करावं लागतं, ते नियम वाईटाला लागु होत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला वाईटाची सरशी होतेय असे वाटले तरी अंतीम विजय 'सत' शक्तीचाच होत असतो. तेव्हा तुम्ही त्याचा फारसा विचार करु नका. त्याच्या लढा द्यायला परमेश्वर समर्थ आहे."

एक नवीनच आवाज कानावर आला आणि आता कुठे मास्तरांचं जीपमधुन उतरलेल्या त्या चौथ्या व्यक्तीकडे लक्ष गेलं. चाळीस्-पंचेचाळीसच्या घरातलं वय. पण चेहर्‍यावर काळीभोर दाढी-मिशा. अंगात साधे, नेहमीच्या वापरातले पांढरा शर्ट आणि पँट असे कपडे. पायात चामड्याचे बुट, खांद्यावर एक शबनम पिशवी आणि चेहर्‍यावर प्रचंड आत्मविश्वास आणि एक प्रकारचा प्रसन्न खेळकरपणा.

"हरि ओम, नमस्कार मास्तर, मी चैतन्य, चैतन्य मार्तंड. कर्नलसाहेबांनी तुमच्याशी फोनवर संभाषण झाल्यावरच ओळखलं होतं की इथे काहीतरी वेगळं घडतय. म्हणुन त्यांनी मला बरोबर येण्याची विनंती केली. कर्नलसाहेबांना नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता आणि आम्ही निघालो. हा सामना थोडा वेगळ्या पातळीवरचा असल्याने मला काही तयारी करावी लागली त्यामुळे आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. नाहीतर सकाळीच आम्ही इथे येवुन पोहोचलो होतो."

दिरगुळे मास्तर त्या व्यक्तीकडे पाहतच राहीले. ते उंचं पुरं, साधं जरी असलं तरी कमालीचं देखणं व्यक्तीमत्व कुणालाही भुरळ पाडेल असंच होतं.

"मास्तर, आमचे चैतन्य तुमच्या 'त्या' अमानवी शक्तीशी लढा द्यायला समर्थ आहेत. तेव्हा तूम्ही आता बोलायला सुरुवात करा. एकही छोटासा मुद्दा सुटायला नको. मला अगदी सुक्ष्म माहितीदेखील हवीये."

चैतन्यांना बघितल्यावर मात्र मास्तरांच्या जिवात जीव आला. खरेतर श्रीराम गुरुजींनी 'त्या' शक्तीबद्दल जे सांगीतले होते त्यानंतर 'हा' साधारण माणसासारखाच दिसणारा 'चैतन्य' त्याचाशी कशा काय लढा देवु शकेल? हा प्रश्न डोक्यात होताच. पण गुरुजींनीच सांगीतले होते की तिसरी एक व्यक्ती येणार आहे. कोण जाणे, कदाचित ती तिसरी व्यक्ती म्हणजे चैतन्यच असतील. आणि मास्तर बोलायला लागले. एकही मुद्दा अगदी छोट्या-छोट्या गोष्टी ही न वगळता त्यांनी सांगायला सुरुवात केली. कर्नलांच्या सांगण्यावरून गावातल्या काही मुख्य व्यक्तींना त्यांनी तिथेच थांबवुन घेतले होते. आता अगदी आणिबाणीची वेळ होती, त्यामुळे गावकरी या नात्याने गावात काय घडतेय त्याची त्यांनाही कल्पना असणे हा त्यांचा अधिकारच होता. आणि कोण जाणे कदाचित त्यांचीही काही मदत होवु शकली असती.

"चैतन्य, हे प्रकरण भलत्याच थराला जावुन पोहोचलय. तुम्हाला काय वाटतय आपल्याला एकहाती हे सांभाळता येइल?"

कर्नलांनी चैतन्यांना विचारलं.

"आपण थोड्याफार प्रमाणात या सगळ्याची अपेक्षा केलीच होती कर्नल. म्हणुन तर अदिती इथे आली ना......................! तशीच जर वेळ आली तर मदत मिळण्याची व्यवस्था करुनच आलोय मी इथे. " चैतन्यांनी प्रसन्नपणे सांगितले.

"आपण तिला एकटेच पुढे पाठवण्यात चुक तर नाही केली ना?" कर्नलच्या आवाजात क्षणभर, एक क्षणभरच थोडासा बाप डोकावला, पण दुसर्‍याच क्षणी ते पुन्हा कर्नल बनले.

"हे तुम्ही बोलताय कर्नल्?तुम्ही? तुम्हीच म्हणता ना अदिती म्हणजे माझी लेक नाही तर निव्वळ सैतान आहे म्हणुन. काळजी करु नका मला खात्री आहे ती सुखरुप असेल."

चैतन्य हसुन म्हणाले तसे दिरगुळे मास्तर सात्त्विक संतापाने पुढे येत म्हणाले.

"काहीही काय शब्द वापराताय चैतन्यजी तुम्ही. अहो आमच्यासाठी तर देव बनुन आलीय यांची पोर. सैतान काय....?"

तसे कर्नल हसले, जोरात मास्तरांच्या पाठीवर एक थाप भारुन म्हणाले.

"भारीच हळवे आहात बुवा तुम्ही मास्तर. अहो माझी लेक आहे ती, तिची आई गेल्यानंतर तिचा बाप आणि आई दोघेही मीच होवुन वाढवलेय तिला. मलाही तिची काळजी असेल की नाही काही. बाकी अदितीबद्दल म्हणाल तर आजही मी तिला सैतानच म्हणतो, बारामुल्लाच्या घाटीत पाकड्या घुसखोरांबरोबर लढताना तिने दाखवलेली न्रुशंसता साक्षात सैतानालाही लाजवेल अशीच होती. जाऊदे त्या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाहीये. त्यावर आपण नंतर बोलु. चैतन्य, आता पुढचा प्लान ऑफ अ‍ॅक्शन काय असेल आपला? यापुढे या तुम्ही या मिशनचे सी.ओ., तुम्ही लीड करायचे आम्ही जवान त्यावर अंमल करणार. मास्तर, गावातली काही तरूण पोरं येवु शकतील आमच्या बरोबर?"

"एका पायावर तय्यार हावो सायेब आमी. म्या तर सकालपास्नं मास्तरांच्या म्हागं लागलुया वाड्यात घुसुया म्हुन. पर मास्तर तुमची वाट बगत हुते म्हुन थांबलो हुतो. कारं मर्दानो याचं ना वाड्यात?भ्याव तर न्हाय ना वाटत?"

"तर वो सर्जादादा, वाग म्हन्ला तरी खातु आन वाघोबा म्हन्ला तरीबी. आता जायाचं म्हनलं की जायाचं. आता म्हागं वळायचं न्हायी."

घोळक्यातले दहा-पंधरा काटक तरूण स्वतःहुन पुढे आले तसे चैतन्यांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य उमलले. मास्तरांच्या नजरेत मात्र प्रश्नचिन्ह होते..

"बारामुल्लाच्या घाटीत पाकड्या घुसखोरांबरोबर लढताना...., म्हणजे?"

कर्नल हसले, "कळेल लवकरच!"

"ठिक आहे, तुम्ही सगळे पुढे व्हा. वाड्याला सगळीकडून वेढा घालायचाय आपल्याला. काही ना काही हत्यार असु द्या जवळ. बहुतेक त्याची गरज पडणार नाही, पण असु द्या जवळ. एक लक्षात ठेवा त्याच्यासमोर तुमची कुठलीही हत्यारे चालणार नाहीत कदाचित पण त्याचे अनुयायी ते सामान्यच आहेत. पण शक्यतो त्यांच्यावर अगदीच गरज पडल्याशिवाय हत्यार उचलु नका. एक लक्षात ठेवा ती तुमच्या आमच्यासारखी निरुपद्रवी माणसे आहेत. पण त्यांना आपल्या अंगाला खेटू देऊ नका. शक्यतो त्यांना पकडुन बंदीस्त करा आणि हो, पुन्हा सांगतोय सद्ध्या फक्त वाड्याला वेढा घाला तोही गुपचूप उघड नव्हे. तो नक्कीच शक्तीशाली आहे. कदाचित आत त्याचे इतरही अनुयायी असतील, काळजी करु नका आपण एकटे नाही आहोत, मदत पोहोचतेय लवकरच. मी सांगितल्याशिवाय आपापल्या जागा सोडून पुढे यायचे नाही. मी योग्य वेळी इशारा करीन तेव्हा पुढे येवुन हल्लाबोल करा. मास्तर, चला मला जरा तुमच्या श्रीराम गुरुजींचे घर पाहायचेय. हरि ओम तत्सत !"

"मदत, आणखी कसली मदत येतेय कर्नलसाहेब,,,"

मास्तरांच्या या प्रश्नावर चैतन्यांकडे पाहात कर्नल नुसतेच गुढ हसले.

"कळेलच की मास्तर, घाई कशाला करताय? चला आम्हाला श्रीराम गुरुजींचे घर दाखवा."

मास्तर बुचकळ्यात पडले होते खरे पण त्यानी विषय वाढवला नाही. तसेही कर्नलांच्या व्यक्तीमत्वाने त्यांना भारुनच टाकले होते. तशात चैतन्यांचा एकंदरीतच गुढ वावर, जसे ते म्हणताहेत तसे वागण्यातच आपले भले आहे अशी खुणगाठ त्या भल्या गृहस्थाने आपल्या मनाशी बांधली आणि त्या दोघांना घेवुन मास्तर श्रीराम गुरुजींच्या घराकडे निघाले. कालच गुरुजींना शेवटचा निरोप दिलेला आज लगेच पुन्हा आता रिकाम्या पडलेल्या त्या घराकडे जाताना गुरुजींच्या अनेक आठवणींनी मास्तरांच्या मनात फेर धरलेला होता.

या सगळ्या गोंधळाचा फायदा घेत एक व्यक्ती त्या घोळक्यातून मागच्यामागे गुपचुप सटकली ते कुणाच्या लक्षातच आले नाही.

***********************************************************************************************************

"हीच ती शिवलीलामृताची पोथी, जिच्यावर अदितीचे नाव गुरुजींच्या स्वामींनी आधीच लिहून ठेवले होते. ते बघितल्यावरच अदितीचा या सगळ्या गोष्टींवर थोडाफार विश्वास बसायला लागला."

मास्तरांनी ती शिवलीलामृतांची पोथी चैतन्यांच्या हातात दिली. चैतन्यांनी मुखपृष्ठावर किरट्या अक्षरात लिहीलेले अदितीचे नाव वाचले, नंतर त्याकडे दुर्लक्ष करुन त्यांनी पोथीची पाने चाळायला सुरुवात केली.

"मास्तर, तुमचे श्रीराम गुरुजी गेल्या कित्येक दिवसात इथुन बाहेर पडले नव्हते, बरोबर? मग बाहेरच्या गावाशी, तुमच्याशी त्यांचा संपर्क कसा काय होता. कोणी तरी असेलच ना ज्यांच्या मार्फत ते तुमच्याशी संपर्क ठेवत असतील. "

"आहे ना, आमचा तुका न्हावी. नेहमी गुरुजींकडे यायचा. काही निरोप असेल तर ते थेट तुकामार्फत आमच्याकडे पाठवायचे. मग मी किंवा कुणीतरी त्यांना हव्या त्या गोष्टी पोचत्या करायचे काम करायचो. अर्थात तुकाच्या मार्फतच."

"अच्छा, मग मला एक सांगा मास्तर, तुमच्या अपरोक्ष काही गोष्टी तुका त्यांना पोहोचवत असण्याची कितपत शक्यता आहे. म्हणजे एखादे पुस्तक वगैरे.....?"

"असेलही चैतन्य, कारण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुका माझ्याकडे यायचा नाही. गावातून काही वस्तु आणुन त्या त्यांना परस्पर पोचत्या करायचा. गुरुजींना हवे आहे म्हणल्यावर गावातल्या कुणी काही नकार देण्याचा प्रश्नच येत नव्हता. सगळे गाववाले त्यांना फार मानायचे. पण पुस्तक वगैरे हवे असेल तर मात्र माझ्याकडे येणे आवश्यकच होते. कारण त्याबाबतीत गावातला इतर कोणीही काहीही मदत करु शकला नसता."

"मग गेल्या काही दिवसात तुमच्या गुरुजींनी एखादे नवे पुस्तक मागवले होते का? म्हणजे एखादी पोथी वगैरे....?"

"नाही, अजिबात नाही. माझ्याकडे तरी अशी कुठलीही मागणी आलेली नाही अशात. पण असं का विचारताय तुम्ही? तुम्हाला गुरुजींवर काही संशय...."

"नाही हो, तसे काही नाही. मी सहजच विचारले. उगाचच गेलेल्या माणसावर कशाला काही वहिम घ्यायचा." चैतन्य हातातले शिवलीलामृत काळजीपुर्वक हाताळात म्हणाले, मध्येच त्यांनी त्या पोथीचा वासही घेवुन बघितला. आणि कर्नलसाहेबांकडॅ एक अर्थपुर्ण कटाक्ष टाकला....

कर्नल स्वतःशीच हसले जणु काही त्यांचे डोळे चैतन्यांना सांगत होते.

"मी म्हटलं नव्हतं..............!"

"ठिक आहे मास्तर, तुम्ही व्हा पुढे, मला थोडा वेळ ध्यान लावायचे आहे. मी अर्ध्यातासात कर्नल साहेबांना घेवुन त्या वाड्यावर पोहोचतो. तुम्ही तिथेच आमची वाट बघा. अर्धातास मला एकांत हवा, बरीच तयारी करावी लागेल."

कर्नलसाहेबांनी चैतन्याकडे बघत कुणाच्याही नकळत अगदी मिस्कीलपणे डोळे मिचकावले. त्याचा अर्थ त्यांना तिथे नक्कीच काहीतरी सापडले होते.

ठिक आहे, म्हणुन दिरगुळे मास्तर आपल्या बरोबरच्या माणसांना घेवून त्या वाड्याकडे निघून गेले. संध्याकाळ व्हायला आली होती. थोड्या वेळातच त्याचा अंमल सुरु होणार होता.

"तर कर्नलसाहेब, मी काय म्हणत होतो......"

"एक मिनीट चैतन्य, मी जरा याला जावुन येतो." कर्नलसाहेबांनी करंगळी दाखवत चैतन्यना हलकेच डोळा मारला आणि गुरुजींच्या घरामागच्या अंधारात दिसेनाशे झाले. थोड्याच वेळात घराच्या मागच्या बाजुला घुसलेले कर्नलसाहेब घराच्या पुढच्या बाजुने आत शिरले तेव्हा त्यांच्या वज्रमुठीत एका क्षुद्र जिवाची गर्दन अडकलेली होती.

"अच्छा म्हणजे याच्यासाठी गेला होतात तर!" चैतन्य त्या व्यक्तीकडे पाहात हसत म्हणाले.

तसे त्या व्यक्तीने हात जोडले,

"साहेब, मला कायबी म्हायित न्हाय? लै वायट ताकद हाय त्येच्याजवळ. लुसत्या डोळ्यांनी कुणालाबी आपल्या काबुत करु शकतोय त्यो. म्या लै गरीब मानुस हाय वो."

चैतन्यांनी आपल्या खिशातुन एक वस्तु बाहेर काढली तसा ती व्यक्ती त्या वस्तुकडे आणि चैतन्यांकडे पाहातच राहीली.

"माणुस म्हणुनच जगायचय ना.....? मग मी विचारतो त्या प्रश्नांची नीट उत्तरे द्या."

आणि ती व्यक्ती घडा घडा बोलायला लागली. चैतन्यांचे ते शस्त्र पाहीले की महा भयानक पिशाच्चांचेही डोके ठिकाणावर येत असे हा तर एक सामान्य माणुस होता.

***********************************************************************************************************

देसाईंचा वाडा. गावापासुन साधार्ण अर्धा मैलावर असलेली एक आता पडलेली गढीवजा वास्तु.

खरेतर तसे बघायला गेल्यास या वाड्यात घाबरण्यासारखे काहीच नव्हते. खेडेगावातल्या कुठल्याही सर्वसामान्य पडझड झालेल्या जुन्या वाड्यांप्रमाणे तो ही साधाच एक अर्धवट पडका वाडा होता. पण सुभेदारांचा वाडा असल्याकारणे त्याचा विस्तार खुप म्हणजे खुपच मोठा होता. म्हणजे वाड्याच्या समोरच्या भिंतीपाशी उभे राहून दगड भिरकावला तर परसदारच्या भिंतीपर्यंत पोचणार नाही इतका मोठा. एके काळी वाडा खुप समृद्ध असावा. वाड्याला चारी बाजुनी दगडी कोट होता, एखाद्या गढीला असतो तसा. आत शिरले की समोरच एक तुटलेले अर्धवट राहीले तुळशी वृंदावन होते. मुख्य दाराला लागुनच दोन्ही बाजुला दोन मोठ्या पडव्या होत्या. वाड्याचा बाहेरचा कोट बर्‍याच ठिकाणी पडायला झालेला होता, खुपसा फुटलाही होता.

पण वाड्याबद्दल असलेल्या किवदंतींमुळे जनावरे आणि चुकुन माकुन शिरलेल्या शेळ्या-मेंढ्या सोडल्या तर वाड्यात शिरण्याची कुणाची टाप नव्हती. गेल्या ३-४ महिन्यात वाड्यात शिरताना दिसलेल्या शेळ्या मेंढ्यांचेही गावकर्‍यांना परत चुकनही दर्शन झाले नव्हते. त्यामुळे गावकरी थोडे वचकुनच होते वाड्याला. असो, तर वाड्यात आत शिरले की समोरच एक तीन मजली इमारत होती ती बहुदा सुभेदार देसाईंचे निवासस्थान असावे. आता तिसरा मजला जवळजवळ नाहीसा झालेला होता, बाकीच्या वास्तुचीही पडझड झालेली होती. त्या इमारतीच्या उजव्या हाताला काही लहान लहान कोठर्‍या होत्या, बहुदा त्या नोकरांच्या राहण्यासाठी असाव्यात. तर इमारतीच्या मागच्या बाजुला एक भली मोठी लांबलचक हॉलवजा खोली होती. तिथे बहुदा देसाई सुभेदारांचा पागा किंवा गोठा असावा. वाड्यातच एका बाजुला न्हाणीघरे आणि तत्सम बांधकामेही होती. वाड्याच्या बाह्य कोटाला एकुण तीन दरवाजे दरवाजे होते. एक समोरचा दिंडीदरवाजा, एक मागचा आणि एक डाव्या बाजुला असलेला छोटासा दरवाजा जो बहुदा वाड्यातल्या बाई माणसांच्या ये जा करण्यासाठी असावा.

चैतन्यांनी गावातल्या तरुणांची फौज हे तिन्ही दरवाजे तसेच जिथे जिथे कोटाला भगदाडं गेली होती तिथे तिथे पेरली. त्यांनी तिथुन बाहेर पळु पाहणार्‍या प्रत्येक व्यक्तीला जेरबंद करायचे होते. बरोबर मोजकी काही माणसे घेवून चैतन्य वाड्यात शिरले. वाड्यात शिरण्यापुर्वी त्यांनी आपल्या खांद्यावरच्या झोळीतुन काही धान्याचे दाणे काढले आणि आकाशाकडे बघत डोळे मिटून ते दोन्ही हात वर करुन काहीतरी पुटपुटायला लागले. मास्तर आणि इतर गावकरी उत्सुकतेने त्यांच्याकडे बघत होते. नंतर चैतन्यांनी डोळे उघडुन हातातले ते धान्याचे दाणे वाड्याच्या परिसरात उधळून दिले.

"आठी दिशा बांधुन टाकल्यात मी. आता यातुन फक्त माणसेच बाहेर पडु शकतील त्याला नाही जमणार यातून निसटणे. जय श्रीराम, हरि ओम तत्सत."

चैतन्यांनी आपल्याबरोबरच्या गावकर्‍यांना वाड्याच्या इतर भागात पिटाळले आणि कर्नल व मास्तरांना घेवुन स्वतः समोरच्या तीन मजली इमारतीत शिरले.

कर्नलनी त्यांच्याकडे बघून पुन्हा एकदा डोळे मिचकावले आणि ते ही चैतन्यांबरोबर त्या इमारतीत शिरले. समोरच मोठा, प्रशस्त असा दिवाणखाना होता. कधी काळी तिथे अमाप वैभव नांदत असावं, आता सगळीकडे पुरातनाचे अवशेष विखुरले होते. एका कोपर्‍यात वर जाणारा जिना दिसत होता. चैतन्य थोडे पुढे झाले, मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत त्यांनी जिन्याकडे पाऊल टाकले.

"मास्तर, तुम्ही खालचा मजला शोधा. मी आणि कर्नल वरच्या मजल्यावर जातो. चला कर्नल!"

कर्नलकडुन हो नाही आणि नाही नाही.

"कर्नल...?"

चैतन्यांनी आणि मास्तरांनी एकदमच मागे वळून पाहीले. त्या हॉलमध्ये या क्षणी फक्त ते दोघेच होते. वार्‍यावर विरघळून जावे तसे कर्नल तिथून विरघळून गेले होते, गायब झाले होते. मास्तरांच्या अंगावर सर्रकन काटा आला.

"चैतन्य, अहो कर्नल कुठे गायब झाले? आत्ता तर इथे होते."

तसे चैतन्य थोडे गंभीर झाले.

"मास्तर, सुरुवात झालीय. त्याने आपली ताकद दाखवायला सुरुवात केलीय हळु हळु. हा त्याचा पहिला वार होता. पण मी ही काही लेचापेचा नाहीये. काळजी करु नका. एक गोष्ट नक्की जे काही आहे ते इथेच कुठेतरी आहे. आता वरच्या मजल्यावर जाण्याची गरज भासत नाहीये मला. तुम्ही कायम माझ्याबरोबर राहा. एक क्षणभरही दुर होवु नका आता. "

"कर्र कर्र कच्च, खटाक !"

इमारतीचा दर्शनी दरवाजा आपोआपच धाडदिशी बंद झाला आणि मास्तर घाबरुन चैतन्यांच्या अंगावर आदळले.

"घाबरु नका मास्तर. शोधा, इथेच कुठेतरी एखादा गुप्त दरवाजा असणार आहे." त्यांना धीर देत चैतन्यांनी इमारतीच्या भिंती तपासायला सुरुवात केली. मास्तर पुरते घाबरले होते, नुसतेच रामरक्षा म्हणत चैतन्यांच्या बरोबर फिरत होते. चैतन्य एकेक वस्तु नीट तपासुन पाहत होते. पण कुठेच एखादे गुप्तदार असेलशी शंका घ्यायलाही जागा आढळत नव्हती. आता चैतन्यांच्याही चेहर्‍यावर थोडी चिंता झळाकायला लागली होती. आता त्यांनी दुसर्‍या मजल्यावर जाणार्‍या जिन्याकडे आपला मोहरा वळवला. जिना चढून दोन तीन पायर्‍या वर गेल्यावर त्यांना ते जाणवले. जिन्याच्या सुरुवातीला त्याच्या रेलिंगवर बसवलेला तो लाकडी, नक्षीदार गोलक त्यांना थोडासा लुज वाटला होता. ते तसेच जिना उतरुन भराभर खाली आले आणि त्यांनी तो लाकडी गोलक दोन्ही हातात धरुन फिरवायला सुरूवात केली. गोलक अर्धवट फिरला आणि जिन्याच्या बाजुला असलेली एक भिंत एक आपोआप जेमतेम एक फुटभर बाजुला सरकली. चैतन्यांना आश्चर्य वाटले, भिंत सरकताना अजिबात आवाज झाला नव्हता, म्हणजे इतक्यात या रस्त्याचा वापर सुरळीतपणे चालु आहे तर....

सर्वात आधी चैतन्यांनी एक गोष्ट केली, आपल्या खांद्यावरच्या झोळीत हात घालुन त्यांनी ती वस्तु बाहेर काढली. ते एक ऑटोमॅटीक पिस्तुल होते, मास्तर त्यांच्याकडे बघतच राहीले. तसे चैतन्यांनी त्यांना आपल्या पाठीमागे यायची खुण केली.

"असे चकीत होवुन पाहु नका मास्तर, माझ्याकडे. स्पष्टीकरण द्यायला वेळ नाहीये आता. तुम्हाला कळेलच सगळे हळु हळु."

चैतन्य पुढे आणि मास्तर त्यांच्यामागे त्या गुप्तद्वारातुन आत शिरले. आत खाली जायला पायर्‍या दिसत होत्या. अंधार असल्यामुळे काहीच दिसत नव्हते. चैतन्यांनी आपल्या झोळीतून एक अगदी सुक्ष्म असा पेन टॉर्च बाहेर काढला आणि त्याच्या प्रकाशात ते पायर्‍या उतरु लागले. घाबरलेले मास्तर त्यांच्या मागेच होते. पायर्‍या उतरुन ते दोघे खाली पोहोचले. सगळीकडे मिच्च काळोख होता. पेन टॉर्चमधुन निघणार्‍या एकुलत्या एक प्रकाशरेघेच्या आधाराने चैतन्य पुढे सरकु लागले. तेवढ्यात अंधारातून एक आवाज आला....

"वेलकम, वेलकम कॅप्टन चैतन्य निंबाळकर उर्फ डेडशॉट, माझ्या या छोट्याशा राज्यात तुझं स्वागत आहे मित्रा." बोलणारा हिंदीत बोलत होता, आवाजात एक प्रकारची उर्दुची झाक होती. हा आवाज कुठेतरी ऐकलाय. चैतन्यच्या डोक्यात धोक्याची घंटा खणखणायला लागली. हा आवाज..., हा आवाज दुसर्‍या कुणाचा असुच शकत नाही. मेजर दिलबागखान पख्तुनी. येस, हा पख्तुनीच आहे."

"ओह, माझा अंदाज अखेर खरा ठरला तर पख्तुनी. एवढं खोल कारस्थान करणारा तूच असु शकतोस, पण असा अंधारात का लपतोयस मित्रा, जरा उजेडात ये की."

तत्क्षणी अंधाराची जागा एकदम लख्ख प्रकाशाने घेतली. उजेडात जे दृष्य समोर दिसलं ते काळजाचा ठोका चुकवणारंच होतं. तो एक प्रशस्त मोठा हॉल होता. हॉलच्या मध्यभागी काही लोकांच्या सशस्त्र वेढ्यात कर्नल देशमुख उभे होते. जवळपास सहा जणांनी त्यांच्यावर बंदुका रोखलेल्या होत्या. कर्नलनी एका कोपर्‍यात बोट केलं...

तिथे अदिती उभी होती. नेहमीचीच सुंदर, करारी अदिती. पण तिची नजर, तिची नजर मात्र वेगळीच होती. नेहमी तिच्या नजरेत दिसणारा मिस्कीलपणा जावुन त्याची जागा एका कृर थंडपणाने घेतलेली होती. आणि तिच्या शेजारी उभा होता....

मेजर दिलबागखान पख्तुनी. पाक मिलीटरी इंटेलिजन्सचा अतिशय कृर, धुर्त आणि बुद्धीमान अधिकारी म्हणुन ओळखला जाणारा, हेरगिरीच्या दुनियेत शैतान म्हणुन कुख्यात असलेला साडे सहा फुटी, गोरा पान, देखणा पख्तुनी. त्याच्या त्या देखण्या चेहर्‍यामागे किती कारस्थानी मेंदु दडला आहे हे चैतन्य आणि कर्नल दोघांनाही चांगलेच माहिती होते. खरेतर गेली कित्येक वर्षे तो आणि चैतन्य हा पाठशिवणीचा खेळ खेळत आलेले होते. कधी चैतन्य शेर ठरला होता तर कधी पख्तुनी सव्वाशेर.

"वेलकम कॅप्टन, वेलकम टू माय डेन. बघ गेले सहा महिने इथे तुमच्याच देशात बसुन तुमच्याच देशाच्या विनाशाची खलबते रचतोय मी! आणि तू व तुझा हा देश ....! कसलं रे तुमचं गुप्तहेरखातं? इतक्या दिवसात तुम्हाला कसलाही ट्रेस लागु नये? थु है तुम्हारी जिंदगीपर. अब देख तेरा ये रिटायर्ड कर्नल और उसकी बेटी मेरे कब्जेमें है. जेव्हा मी परत जाईन तेव्हा या पोरीला बरोबर घेवुन जाईन."

तसे कर्नलसाहेब जागच्या जागी उस़ळले. पण बंदुकांच्या गराड्यात असल्याने त्यांना फारशी हालचाल करता आली नाही.

"अरे, शेर बुढा हो गया मगर फ़िरभी जोश जिंदा है! काळजी करु नका कर्नल, निदान जोपर्यंत तुमची लेक माझ्यासोबत आहे तोपर्यंत ती सुरक्षीत असेल. नमाजी मुसलमान आहे मी. पण एकदा ती आमच्या माणसांच्या हाती लागली की मग तिला अल्लाच वाचवु शकेल. बहोत लोग खुंदक खाये हुये है इस छोकरीसे. बारामुल्लामें जिस तरहसे हमारे शहिदोंकी बेइज्जती की थी इसने मुझे नही लगता इसे बख्शा जायेगा."

तसे कर्नल स्थिरावले, स्वत:शीच हसले.

"अच्छा, म्हणजे वाघिणीला बेसावध पकडुन, लांडगे तिच्यावर तुटुन पडणार तर. वाट बघ, त्याआधी इथुन बाहेर तर पडुन दाखव."

"उसकी फ़िकर तुम मत करो काफिर, इस बार पुरे होमवर्कके साथ हि उतरा हुं मै हिंदुस्तानमें. मै भी जाऊंगा और साथमें इसे भी ले जाऊंगा. जानेसे पहले तुम दोनो को, खासकर मेरे इस जिगरी दुश्मनको खुदाके पास पहुंचाने का काम जरुर करुंगा! बाय द वे हा तिसरा जो मास्तर आहे ना तुझ्याबरोबर, तो मात्र हकनाक मरणार बिचारा ! तुझ्या या फियान्सीला मात्र तु विसर आता डेडशॉट.

पख्तुनीने नेहमीप्रमाणेच चैतन्यला भडकवण्यास सुरुवात केली. तसा चैतन्य हसला

"अरे मुर्खा, तुझ्या हालचाली जर आमच्यापासुन लपल्या असत्या, तर आधी अदिती आणि मग आम्ही दोघे इथे पोहोचलो असतो का? आणि तुला काय रे तीन चार महिन्यापूर्वी जेव्हा तू गुजरातच्या मार्गाने भारतात शिरलास तेव्हाच उचलता आले असते. पण मग आमच्याच अस्तनीतले निखारे कसे सापडले असते? तू काय तोंडातून शब्द काढला नसतास आणि इथले उंदीर तसेच मोकळे राहीले असते. आम्ही आधी सगळे उंदीर उचलले आणि मग शेवटी तुझ्याकडे वळलो. आतापर्यंत हा वाडा बाहेरुन आर्मीच्या ट्रुपर्सनी वेढलाही असेल.

बाय द वे तुला म्हणुन सांगतो, तुझे इथले जवळ जवळ सगळे काँटॅक्ट्स आम्ही जेरबंद केले आहेत, अगदी प्रोफेसर खुरानासकट. अदितीवर त्याचाच डोट वापरला आहेस ना तु?"

तसं पख्तुनीने चैतन्यकडे एक थंड नजर टाकली, त्याने एकवार अदितीकडे पाहीले, अदिती अजुनही ट्रान्समध्येच होती. एक क्षणभरच पख्तुनीच्या चेहर्‍यावर वेदनेची लहर उलटून गेली. पण क्षणातच तो सावरला.

"पता है मुझको डेडशॉट ! आज सुबहही खबर पहुंच चुकी है मेरे पास! इसलिये तो उस बुढ्ढेको खत्म करना पडा इतनी जल्दी. मुझे स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शन्स है यहा से निकल भागनेकी जो की मै कामयाबीसे निकल जाऊंगा, तुम या तुम्हारी फौज ना आजतक कभी मुझे रोक सके हो ना आज रोक सकोगे! मै जानता हुं, तुम मुझसे झुठ नही बोलोगे! पुन्हा एकदा तू जिंकलास तर! पण डोंट वरी. इथुन बाहेर पडण्याचे खुप मार्ग आहेत माझ्याकडे. मी इथुन निसटेनच पण जाताना हिलापण घेवु जाईनच. तसंच पळायचं असतं तर स़काळीच तुम्ही इथे पोहोचायच्या आधीच निघुन गेलो असतो, पण मग तू म्हणाला असतास पख्तुनी भेकड निघाला. तुला ती संधी द्यायची नव्हती म्हणुन थांबलो मी. ये किस्सा आज खतम करके ही जाऊंगा मै. कमॉन मेजर, तू पुन्हा एकदा हारलाहेस, आता तरी हार मान्य कर. "

"मी थोडा मध्ये बोलु का चैतन्यजी?"

खुप वेळानंतर घाबरत घाबरत मास्तरांनी एक प्रश्न विचारला.

"बोलो मास्टर, मरनेसे पहले तुम्हे सबकुछ पता होना ही चाहीये."

पख्तुनी मोठ्याने हासत म्हणाला.

"हे सगळं काय चाललेय? ती पिशाच्चं, रंगी, तिचा तो सोन्याचा डुल, मग श्रीराम गुरुजींची ती भविष्यवाणी, ती काळी शक्ती, गायब झालेली कुशाक्का.... आणि आता हे साहेब, मला तर काहीच कळेनासं झालय. हे काय चाललेय? कुशाक्का कुठे आहे? रंगीच्या कानातला तो डुल बाहेर कसा आला?"

तसा पख्तुनी जोरजोराने हसायला लागला.

"फिकर मत करो मास्टर, वो औरत जिंदा है अभी, उसको छोड देंगे हम. वैसे भी वो कुछ नही जानती और आज जिस हालतमें वो है, उसे देखकर तो बाहरवाले तुम्हारे लोगही उसे चुडैल समझकर मार डालेंगे. हा वो लडकी तो उसी वक्त मर चुकी थी, अभी तक अपनी कब्रमें सुकूनसे सो रही होगी, हमने तो बस उसकी कबरसें उसके कान की बाली बाहर निकाली थी उसकी माँ को विश्वास दिलाने के लिये."

मास्तरांच्या डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहायला लागले.

"राक्षस आहात तुम्ही लोक? पण हे सगळे कशासाठी? आमचा छोटासा, साधासा गरीब गाव. काय घोडे मारले होते तुमचे. तुमच्या पाकिस्तानचे भारताशी वाकडे असेल पण आमच्या एका कोपर्‍यातल्या तडवळ्याने काय वाईट केलय तुमचं?"

तसा पख्तुनी थोडा गंभीर झाला.

"माफ करना मास्टर, बात तो पतेकी की है आपने. लेकीन जिस तरह आपका ये कॅप्टन अपने हिंदुस्तान के लिये कुछ भी कर सकता है, उसी तरह मै भी अपने वतन के लिये कुछ भी कर सकता हुं! डेडशॉट बाकीकी कहानी तुम बताओगे के मै सुनाऊ?"

चैतन्यने एक सुस्कारा सोडला.

"माफ करा मास्तर, आता तुम्हाला सगळं खरं काय ते सांगायलाच हवं.

आत्तापर्यंत तुम्हाला कळुन चुकलंच असेल की मी कोणी स्वामी वगैरे नाही. मी कॅप्टन चैतन्य निंबाळकर, जिला तुम्ही चित्रकार, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह वगैरे समजताय ती अदितीदेखील भारतीय लष्कराची एक लेफ्टनंटच्या दर्जाची अधिकारी आहे. अदितीचं वैशिष्ठ्य असं की ती स्पेशली ट्रेन्ड कमांडो आहे. ती दिसायला दिसते नाजुक, सुंदर पण प्रत्यक्षात अतिशय उच्च दर्जाची, धाडसी लष्करी अधिकारी आहे. आम्ही दोघेही मिलीटरी इंटेलिजन्ससाठी काम करतो. वुई आर ट्रेनड कमांडोज. अगदी गुरील्ला ट्रेनिंगपासुन सगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणातुन गेलो आहोत आम्ही. या प्रस्तावनेचे कारण एवढेच की आम्हाला या प्रकरणावर नेमण्याचे कारण म्हणजे हे प्रकरण हि केवळ तुमच्या तडवळ्याची तथाकथित भुताटकी एवढेच नसुन त्याहिपेक्षा खुप खोल आणि विस्तृत असे एक आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे. अर्थात या कारस्थानात तुमच्या तडवळ्याचा खुप मोठा वाटा आहे. कारण तुमच्यासाठी जरी ते तुमचे छोटेसे गाव असले तरी कुठल्याही आक्रमक राष्ट्रासाठी तो एक कधीही न संपणारा अवाढव्य खजीना आहे.

तुम्हाला आठवत असेल मास्तर, दिड वर्षापुर्वी तुमच्या गावात मुंबईच्या एका कंपनीने बोअरवेल काढुन दिल्या होत्या.

"हो तर, कुठलीतरी सेवाभावी कंपनी होती. त्यांनी खुप ठिकाणी शोध घेतला, पण पाणी त्यांना नाही मिळाले. मग एका ठिकाणी, म्हणजे या वाड्याच्या मागे त्यांना पाणी सापडले म्हणुन त्यांनी इथे एक बोअरवेल काढून एक हापसा बसवुन दिला. पण वाड्याच्या भीतीने त्या हापशावर पाण्याला कोणीही फिरकत नाही."

"बरोबर, तेच ते. मास्तर, पण सेवाभावी संस्था वगैरे काही नाही, तर एका विलक्षण अशा आंतरराष्ट्रीय कारस्थानाचा एक भाग होता तो. सेवा वगैरे काही नव्हते. त्यांना फक्त खात्री करुन घ्यायची होती. ठिकठिकाणी पाण्याचा शोध घ्यायचे निमीत्त करुन त्यांनी तिथली सॉईल सँपल्स, मातीचे नमुने घेतले. खरेतर त्यांना शोध दुसर्‍याच एका गोष्टीचा होता. २-३ वर्षांपुर्वी एक भारतीय भुगर्भ संशोधक डॉ. सतीशचंद्र चतुर्वेदी यांनी आपल्या संशोधनाच्या आधारे एक शक्यता वर्तवली होती की भारताच्या काही भागात जमीनीखाली टिटॅनियमचा प्रचंड साठा आहे. टिटेनियम हे एकप्रकारचे खनिज असुन त्याचे लोखंड, पितळ, कांस्य अशा धातुंबरोबर मिश्रण करुन एकप्रकारचा अतिशय मजबुत पण वजनाने हलका असा मिश्रधातु बनवला जातो जो खासकरुन मिसाईल्स, स्पेस शटल्स यांना लागणारी वॉरहेडस बनवण्यासाठी केला जातो. सद्ध्याच्या काळात अशा खाणी फक्त युरोप, साऊथ अफ्रिका, न्युझीलंड अशा पाश्चिमात्य राष्ट्रात उपलब्ध आहेत. ही राष्ट्रे आपल्या देशातील टिटॅनियम इतर राष्ट्रांना पुरवताना प्रचंड दर आकारतात. त्यामुळे खुपशा विकसनशील राष्ट्रात प्रयोगशाळेत कृत्रीमरित्या टिटॅनियम बनवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. दुर्दैवाने डॉ. चतुर्वेदी हा कमालीचा भ्रष्ट माणुस असल्याने त्याने हि माहिती आपल्या देशाला न पुरवता आपल्या शेजारी राष्ट्राला विकली. आणि अस्तित्वात आलं एक विलक्षण कारस्थान.....! भारताच्याच भुमीवर भारताच्याच विरोधात शस्त्रनिर्मीतीसाठी कच्चा माल तयार करण्याचं. त्यासाठी भारतातलेच काही देशद्रोही उद्योजक निवडले गेले आणि तडवळ्यात एक मोठा स्टील प्लांट उभा करण्याची योजना सरकारपुढे मांडण्यात आली.

अर्थात आम्ही काही अगदीच झोपलेलो नव्हतो. असं काहीतरी डील झालय याची आम्हाला माहिती मिळाली होती, पण पुरावा काहीच नव्हता. त्यातच ४-५ महिन्यांपुर्वी पख्तुनी गुजरातच्या मार्गे भारतात घुसला आणि आम्ही सावध झालो. तो येणार याची माहिती आधीच मिळाली होती. त्यात आम्ही म्हणजे मी आणि पख्तुनी गेली कित्येक वर्षे हा पाठशिवणीचा खेळ खेळतोय. त्यामुळे तो आलाय हे कळताच मी त्याच्या मागे लागलो. दरम्यान अदिती, पख्तुनीच्या भारतीय काँटॅक्ट्सच्या मागावर होती. त्यात तिला कर्नलसाहेबांचा खुप उपयोग झाला. कारण कर्नलसाहेबांनी आर्मीतुन निवृत्त झाल्यावर स्वतःची डिटेक्टीव्ह एजंसी चालु केली होती. दुर्दैवाने या प्रकरणात भारतीय लष्कराचेही काही उच्चाधिकारी गुंतले आहेत, त्यामुळे खुपच गुप्तपणे आमचा तपास चालु होता. त्यासाठी गुप्तपणे कर्नलसाहेबांची मदत मागितली गेली. अदितीही यात गुंतली असल्याने आणि अर्थातच देशभक्ती रक्तातच मुरलेली असल्याने कर्नलसाहेब आनंदाने तयार झाले.

या योजनेवर त्यांचे गेली दोन वर्षे काम चालु आहे. देशातील खुप मोठे असे काही उद्योजक, तसेच लष्करी अधिकारी या कारस्थानात सामील आहेत. आधी कायदेशीररित्या तडवळ्याची जागा ताब्यात घेवुन तिथे एक स्टील प्लांट्ची योजना सरकारपुढे मांडण्यात आली. त्या स्टील प्लांटच्या छुप्या नावाखाली इथे टिटॅनियम उत्खननाचे काम चालणार होते. खरेतर त्यात त्या उद्योजकांना बर्‍यापैकी यशही मिळाले होते. पण सरकारमधील एका मंत्र्याची सद सद विवेकबुद्धी अचानक जागी झाली आणि त्याने ही माहिती आमच्यापर्यंत पोचवली, म्हणजे आधी मा. गृहमंत्र्यांपर्यंत आणि तिथुन आमच्यापर्यंत. अर्थात असे त्या मंत्र्याचे म्हणणे आहे, मात्र आमची खात्री आहे की त्याला हवा तो मोबदला मिळाला नाही म्हणुन त्याने हि बातमी आमच्यापर्यंत पोचवली. असो... एका मोठ्या षडयंत्राचा मागोवा लागला होता. लगेच आम्ही माननीय संरक्षणमंत्र्यांची भेट घेवुन त्यांना याची कल्पना दिली आणि तडवळ्याशी संबंधीत कुठल्याही व्यवहारावर स्टे आणण्याची सिद्धता केली. अर्थात याचा सुगावा कुणालाही लागु दिला गेला नाही. त्यामुळे हा पख्तुनी आणि त्याचे सहकारी अंधारात राहीले, गाफील राहीले. त्यांच्या द्रुष्टीने वाटाघाटी चालुच होत्या."

चैतन्य एक क्षणभर थांबले आणि त्यांनी पख्तुनीकडे बघितले. पख्तुनीने खाऊ की गिळु अशा नजरेने त्याच्याकडे पाहीले.

"ओह, तो ये बात है और हम सोच रहे थे की तुम्हारा वो मंत्री आफताब हुसैन, और पैसा चाहता है इसलिये टाल मटोल कर रहा है, बंदेने अच्छा-खासा बेवकुफ़ बनाया हमको."

तसा चैतन्य आणि कर्नलसाहेब दोघेही हसायला लागले.

"बंदा तुम्हे बेवकुफ़ बनाने के लिये काबिल रहा ही कब था? उसके बाद तुम्हारे लोगोंसे जो उसके रुपमें मिला वो खुद आफताब था ही नही , तर त्याच्या वेषात आमचा माणुस होता."

पख्तुनीने चमकुन चैतन्यकडे पाहीले, "मतलब?"

आता कर्नलसाहेबांची पाळी होती.

"तुला काय वाटलं, माणसाला माणुस फक्त तुच उभा करु शकतोस? जसा तू श्रीराम गुरुंजींच्या जागी उभा केला होतास?"

आता चमकण्याची पाळी दिरगुळे मास्तरांची होती.

"म्हणजे, कर्नलसाहेब......?"

"कर्नलसाहेब खरं तेच सांगताहेत मास्तर. इथे स्टील प्लांटची निगोसिएशन्स चालु होती. पण प्लांट चालु व्हायच्या आधीच पुर्वतयारी करणे आवश्यक होते. बहुदा त्यासाठीच मेजर पख्तुनी इथे येवुन पोहोचला. पण गावात लपुन राहणं, वर सगळ्या हालचाली करणं इतकं सोपं नव्हतं. कुणाच्या ना कुणाच्या नजरेत आलंच असतं. म्हणुन मग गावातल्यात कुणाची तरी जागा घेणं आलं. बाकी कुणाची जागा घेणं कठीण होतं, कारण मेजरच्या शरीरयष्टीला सुट होइल असं इथे कोणीच नव्हतं. अशात एके काळी मारुतीचे पुजारी असलेल्या सौष्ठवसंपन्न असलेल्या गुरुजींवर पख्तुनीची नजर पडली. तसेही गुरुजी गावापासुन जवळ जवळ तुटलेच होते. त्याचा फायदा त्याने घेतला. गुरुजींना कैद करुन ठेवण्यात आलं.त्यांची जागा घेण्यात आली. त्यांच्याकडे नित्य येणारा तुका न्हावी, त्यासाठी पैशाचं आमिश आणि प्राण घेण्याची धमकी आपल्यात सामील करायला पुरेशी होती. काल सकाळी जेव्हा तुम्ही अदितीला घेवुन मास्तरांकडे आलात त्याच्या आधीच काही वेळ मास्तरांना संपवण्यात आलं होतं, कारण त्यांचं काम संपलं होतं. पख्तुनीला बहुदा अंताची कल्पना येवुन चुकली होती. तुमच्यापुढे त्यांनी मास्तरांच्या मृत्युचं नाटक केलं आणि 'त्या' तोतया मास्तरांचं तथाकथीत शव तिथेच सोडून तुम्ही आणि अदिती जेव्हा गावकर्‍यांना कल्पना द्यायला बाहेर पडलात तेव्हा बहुदा त्याची जागा खर्‍याखुर्‍या मास्तरांच्या शवाने घेतली. अदितीदेखील त्या अभिनयाला फसली म्हणजे पख्तुनीच्या अभिनयाला दाद द्यावीच लागेल. अर्थात तो असल्या कामात माहीर आहे म्हणा. त्यामुळे अदिती फसली यात नवल नाही."

अर्थात प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मलाही हे आजच कळालं. दुपारी तुम्ही गुरुजींच्या घरातुन बाहेर पडल्यानंतर कर्नलसाहेबांनी तिथे लपुन आमच्या हालचालींवर नजर ठेवणार्‍या तुकाला पकडलं आणि एक कोडं उलगडलं. खरेतर त्या आधीच थोडासा संशय आला होता मला मास्तरांची शिवलीलामृताची ती पोथी बघितल्यावर. मास्तरांच्या घरातली इतर सर्व पोथ्या पुस्तके जुनी होती, तुमच्या सांगण्याप्रमाणे मास्तरांनी इतक्यात तुमच्याकडुन कुठलंही पुस्तक मागवलं नव्हतं, पण मास्तरांकडची ती तुम्हाला दाखवण्यात आलेली शिवलीलामृताची पोथी मात्र नवी कोरी होती. अर्थातच पख्तुनीला तुकाकडुन अदितीबद्दल माहिती कळालेली असल्याने त्याने आधीच त्यावर अदितीचं नाव घालून ठेवलं होतं. दुर्दैवाने अदितीसारख्या धुर्त एजंटला फसवण्यात पख्तुनी यशस्वी झाला. त्या वाड्यात पिशाच्च वगैरे काही नाही हे अदितीला माहीत होते पण बहुदा गुरुंजीच्या या अशा वागण्यामुळे तिच्या मनात संशय निर्माण झाला असावा. आणि ही गोष्ट तिने चॅलेंज म्हणुन स्विकारली कारण गुरुंजीच्या मार्फत कुणीतरी किंबहुना पख्तुनी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय हे तिने ओळखलं असणार. दुसरं कोणी असतं तर त्याने क्षणभर विचार करुन आमची वाट पाहायचा निर्णय घेतला असता. पण कच खाणे आणि वाट पाहणे अदितीच्या रक्तातच नाही, त्यात पुन्हा वेळ गेल्यास शत्रु सावध होण्याची भिती होतीच, त्यामुळे तिने ते आव्हान स्विकारलं आणि पख्तुनीच्या ट्रॅपमध्ये शिरायचा निर्णय घेतला. अर्थात गुरुजीच पख्तुनी आहेत हे तिला कळाले असते तर आत्ता चित्र थोडे वेगळे दिसले असते. पख्तुनीची ताकद माहीती असल्याने तिने मुद्दामच तुम्हाला या सर्वांपासुन लांब ठेवलं.

"हे खुप धक्कादायक आहे. गेले सहा महिने मी गुरुजी म्हणुन दुसर्‍याच व्यक्तीला भेटतोय? मला कळलंही नाही?" दिरगुळे मास्तर चाट पडले होते. "पण मग रंगीचं काय? कुशाक्काचं काय झालं?"

"उसका जवाब मै देता हुं मास्टर!"

"डेडशॉट, पहले तो सलाम कुबुल करो, एक बार फिर तुम मुझे मात देने में कामयाब हो गये! त्या मंत्र्याच्या आफताब हुसैनच्या जागी आपला माणुस घुसवून तू माझ्यावर मात केलीस. हे अपडेट्स माझ्याकडे नसल्याने मी भारतात आणि मग इथे या तडवळ्यात येवुन दाखल झालो. माझ्या दृष्टीने प्लांटची मंजुरी पक्की होती. पण त्याआधी काही पुर्वतयारी करुन ठेवायची होती आमच्या मुळ, खर्‍या कामासाठी. त्यासाठी मी इथे येवुन पोहोचलो. इथे आल्यावर लक्षात आलं की गाव जरी छोटं असलं तरी गावात कमालीची युनीटी आहे. हिंदुस्तानमें जो अक्सर पाया जाता है वो टुटापन यहा नही था, ऐसे हालातमें काम औरभी मुश्किल बन गया! पण मग तुमचा पुजारी आणि तो तुका हातात आला तेव्हा लक्षात आलं की प्रत्यक्षात इथे काही हालचाल करणं किती कठीण आहे. एक बात तो माननीही पडेगी डेडशॉट तुम्हारा वो पुजारी सचमुच बडा पक्का निकला, आखीरतक नही माना. त्यामुळेच आम्हाला तुक्यावर अवलंबुन राहावं लागलं, पण तुकाची पोहोच गावात फारशी नसल्याने त्याचा एक खबर्‍या याशिवाय काही उपयोग होवु शकत नव्हता. पण त्याला त्याच्या धंद्यामुळे प्रत्येक घरात प्रवेश होता. त्याचा आम्हाला फायदा झाला. कारण आम्हाला आमच्या कारवाया रात्रीच कराव्या लागणार होत्या. रात्रीच्या वेळी गावकर्‍यांनी त्यांच्या घराबाहेर पडणे आमच्या दृष्टीने योग्य नव्हते. इथे तुका कामी आला. त्याच्या मार्फत , त्याला गावातल्या प्रत्येक घरात प्रवेश असल्याने आम्ही गावात भुताटकीची अफवा पसरवण्यात यशस्वी झालो. त्यात या कोठीबद्दल (वाडा) इथल्या लोकांमध्ये थोडा जादाही डर असल्याकारणाने आम्ही या वाड्यात मुक्काम ठोकला. मी तुमच्या त्या गुरुजीच्या घरात आणि या वाड्यात वावरत होतो. साधारण दिड महिन्यापुर्वी तुमच्या माणसाने, आमच्यासाठी अजुनही तो आफताब हुसैनच होता, आम्हाला खबर दिली की प्लांटची मंजुरी जवळपास तय आहे. मग आम्ही पुढचे पाऊल उचलले. गावात भीती निर्माण करणे महत्त्वाचे होते. तुकामार्फत आम्ही मग आधी रंगीला उचलले. आमचा एक तज्ञ, खरेतर एक हिंदुस्थानी पण पैशाच्या लोभाने आम्हाला मिळालेला एक स्पेशॅलिस्ट डॉ. खुराना यांनी तिच्या अंगातले सर्व रक्त काढुन घेतले व ती २-३ तासात मरेल अशी खात्री करुन तिला परत तिच्या घरी सोडण्यात आले. ती मेल्यानंतर आठवड्याने आम्ही तिच्याच वयाची दुसर्‍या एका वस्तीवरची मुलगी उचलली. तिच्यावर काही शस्त्रक्रिया करुन तिच्या दाताच्या कवळीत दोन सुळे बसवण्यात आले. नंतर डॉ. खुरानांनीच जे एक हिप्नोटिझम तज्ञही आहेत त्यांनी तिला संमोहित करुन ट्रान्समध्ये टाकले. लहान मुलगी असल्याकारणे ते खुपच सोपे होते. त्या अवस्थेत तिच्या मनावर ठसवण्यात आले की कुशाक्का तिची आई असुन तिला घेवुन येण्याची जबाबदारी तिची आहे. मुद्दामच तिला आपले सुळे कुशाक्काच्या मानेत रोवण्याच्याही सुचना देण्यात आल्या होत्या. जेणेकरुन पुढच्या वेळी जेव्हा आम्ही कुशाक्काला बाहेर परत सोडू तेव्हा गावकर्‍यांच्या मनात तिच्याबद्दल संशय निर्माण व्हावा. संमोहनाखाली असलेल्या त्या छोकरीने, सच कहो तो डॉ. खुरानाके उस डोटने... आपले काम चोख बजावले. एकदा पिशाच्चाची भिती गावकर्‍यांच्या मनात निर्माण झाली की तडवळ्याची ती छोटीशी वसाहत दुसरीकडे स्थलांतरीत करणे खुपच सोपे होते, आमचा लोकल काँटॅक्ट स्वखर्चाने त्यांची वस्ती दुसरीकडे वसवुन द्यायला तयारच होता. त्याला तितका पैसा पुरवायला आम्ही बांधील होतो."

चैतन्यने एकदा पख्तुनीकडे आणि एकदा अदितीकडे खुनशीपणाने बघितले, त्याच्या नजरेतला हेतु लक्षात आला तसा पख्तुनी खदखदुन हसायला लागला.

"अब आया समझमें बच्चे? तेरी महबुबा भी इस वक्त उसी डोट की शिकार है जानेमन. मेरी इजाजतके बगैर वो तेरे क्या इस कर्नलके साथ भी नही जायेगी. खरेतर माझा इथुन बाहेर पडायचा तो एक पासपोर्ट आहे म्हणलेस तरी चालेल. गंमत बघायचीय."

पख्तुनीने आपल्या हंटरशुजला अडकवलेला मोठा खंजीर बाहेर काढला आणि अदितीच्या हातात दिला.

"अदिती, वो आदमी मेरा दुश्मन है....."

त्याचे बोट चैतन्यकडे होते. दुसर्‍याच क्षणी खंजीर विलक्षण वेगाने चैतन्यकडे झेपावला. चैतन्य सावध होता म्हणुन त्याने तो वार चुकवला नाहीतर अदितीच्या घातक वारातुन शिकार बचावणे कठीणच होते.

"बस्स, अदिती..इतना काफी है!"

दुसर्‍याच क्षणी अदिती थंड पडली. तिच्या नजरेतली चमक थंडावली पण त्या एका घटनेने चैतन्यच्या नजरेत चमक आली. त्याने मागे वळुन पाहीले, तो खंजीर त्याच्यापासुन अवघ्या चार हातावर पडला होता. पुन्हा एकदा पख्तुनीने जागेचा ताबा केला.

"कमिंग टु द पॉईंट अगेन, आम्ही जवळ जवळ यशस्वी झालो होतो. निदान आमचा तसाच समज होता. सगळं काही प्लाननुसार कसलाही अडथळा न येता चाललं होतं. सगळ्या गोष्टी कशा मनासारख्या घडत होत्या. त्यानंतर अदिती इथे येवुन पोहोचली. श्रीराम पुजारीच्या वेषात तिला फसवणे अपेक्षेपेक्षाही सोपे गेले. ती अगदी सहज माझ्या जाळ्यात फसली. तुका तिच्या आणि मास्तरच्या मागेच होता. त्याच्याकडुन मला कळले की अदिती आजच वाड्यात घुसणार आहे, तिथेच माझ्या मनातला किल्ला ढासळायला सुरुवात झाली. कारण हे सगळं खुपच आसानीसे होत होतं. कसलेले अडथळे न येता. अदितीसारखी मंझी हुयी एजंट इतनी आसानासे मान जायेगी ये बात हजम नही हो रही थी. बस्स अब मुझे अ‍ॅक्शनमें आनाही पडा. कर्नल, तुम्हारी ये छोकरी, तुझी अदिती वाड्यात घुसली आणि नुसतीच घुसली नाही तर अवघ्या अर्ध्या तासात आमच्या या बेसमेंटमधल्या डेनपर्यंत येवुन पोचली. खुप झटापट झाल्यावर तिला काबु करण्यात आम्हाला कामयाबी मिळाली. तोवर तुझ्या छोकरीने माझी अकरा माणसे अल्लाघरी पाठवली होती. कर्नल, शैतान की खाला है तेरी ये छोकरी. किसी तर दुरसे डार्ट गन का इस्तेमाल करके हमने इअसे बेहोश किया और फिर हिप्नोटाईझ किया. आता मी सांगितले तर ती तुलासुद्धा खलास करायला कचरणार नाही कर्नल. अब वो पुरी तरहसे मेरी गुलाम है...."

कर्नलसाहेबांच्या करारी चेहर्‍यावर लेकीची काळजी आणि कौतुक दोन्ही दिसत होते. पख्तुनी पुढे बोलायला लागला.

"मेरा ये मिशन तो नाकामयाब रहा, लेकीन आज मै अपने सबसे बडे दुश्मन्को कॅप्टन चैतन्यको खतम करनेंमें जरुर कामयाब हो जावुंगा. इस बात का गम तो रहेगा कॅप्टन, की एक बराबरीके दुश्मनको खो दुंगा मै आज. तुमसे दुश्मनी करनेका मजा कुछ औरही था. एक तुमही तो हो, जिससे लडने में लडनेंका असली मजा आता है. लेकिन क्या करे, तुम जैसे लोग मेरे वतन के लिये खतरनाक है, तुम्हारे जैसा शातीर जब तक जिंदा है तब तक हम लोग चैन से रह नही पायेंगे, इसलिये तुम्हे मरनाही होगा....

एक बात और कर्नल, मैने पहलेभी कहा है की पाच वक्त का नमाजी हुं, सच्चा मुसलमान हुं और एक सच्चा मुसलमान अपनी जान बचानेके लिये औरतके पिछे नही छुपता. वो तो मैनेही ऐसेही कॅप्टन को भडकाने के लिये कहा था. तेरी इस बहादुर बच्ची को मेरे उन दरिंदोके सामने डालने जितना कमिना नही हूं मै. तेरी बेटी एक बहादुर सिपाही है, पक्की वरनपरस्त है, इसकी बहादुरी की बेइज्जती करने जितना बुरा भी नही हुं मै. तुम लोगोंके साथही मै इसे भी गोली मारके जाऊंगा. यहासे नकलनेका रास्ता पहले ही बना रख्खा है मैने. उसके लिये मुझे किसी औरतके पिछे छुपनेकी जरुरत नही. हा एक बातका लुत्फ तो जरुर उठाऊंगा मै......

कर्नल, चैतन्य आणि मास्तर तिघेही चमकुन त्याच्याकडे बघायला लागले. आता पख्तुनीच्या चेहर्‍यावर परत त्याचा मुळ खुनशीपणा झळकायला लागला होता...

"एक आशिकके सामने उसकी महबुबा और बापके सामने उसकी बेटीको मारकर जो मौत मै तुम दोनोंको मरने पहले दुंगा, उसका मजा कुछ औरही होगा. और सबसे बडी मजेदार बात तो तब होगी जब तुम्हारी बेटी को मै नही मारुंगा, वो ...मेरी गुलाम, मेरे कहनेपर तुम्हारे सामने खुदको खतम करेगी, खुदकुशी करेगी."

पख्तुनी खदखदुन हसायला लागला. आपल्या पराभवाचे शल्य त्या हसण्यात दडवण्याचा तो शेवटचा प्रयत्न होता त्याचा. त्याने तिथल्याच एका कोपर्‍यातील टेबलाचा एक कप्पा उघडून त्यातला आणखी एक खंजीर बाहेर काढला....

"तुम तो जानते हो डेडशॉट, मला त्या पिस्तुलापेक्षा या खंजरवरच खुप विश्वास आहे. आज त्याच खंजीराने तुझी मेहबुबा खुदकुशी करेल......"

"मै तुमसे पहलेभी कह चुका हूं मेजर, ये खंजर किसी दिन दगा देगा तुम्हे. सोच लो........!" चैतन्यने चेतावणी दिली पण तोपर्यंत पख्तुनीने तो खंजीर अदितीकडे उडवला होता.

"अपने आप को खत्म कर दो अदिती. जिहादके नाम पें कुर्बान हो जाओ, गाझी कहलाओगी."

अदितीने खंजीर वरच्यावर झेलला, क्षणात तिच्या डोळ्यातली चमक परत आली. तिने त्याच थंड, शुन्य रिकाम्या नजरेने एकदा चैतन्यकडे, एकदा कर्नलकडे पाहीले. मास्तरांकडे पाहताना क्षणभर तिच्या डोळ्यात एक ओळखीची खुण जागली. तो खंजीर तिने हातातल्या हात पेलला आणि कर्नलकडे नजर टाकली.... तिची ती नजर पाहीली आणि कर्नल प्रसन्नपणे हासले.

"तू हार गया पख्तुनी, ये आजभी मेरी आदुही है....!"

दुसर्‍याच क्षणी हातातला खंजीर पेलत अदिती पख्तुनीच्या अंगावर झेपावली. चैतन्यने आपल्या कंबरेला पाठीमागे लावलेली छोटी माऊजर पिस्तुल उपसुन हातात घेतली, त्याक्षणी कर्नल आपल्या भोवतालच्या वेढ्यावर तुटून पडले होते. चैतन्यने हातातले माऊसर कर्नलकडे फेकत जमीनीवर पडलेल्या खंजीरावर झेप घेतली. हे करण्याआधी त्याने मास्तरांना सुरक्षीत आडोश्यामागे ढकलुन दिले होते. थोडा वेळ धुमश्चक्री चालली, आतला हा गोंधळ चालु असतानाच, पहार्‍यावरच्या बुचकळ्यात पडलेल्या गावकर्‍यांना तसेच ठेवुन तोपर्यंत आर्मीचे जवान वाड्यात शिरले होते. तेवढ्यात अचानक लाईट्स गेल्या. सगळीकडे एकच अंधार झाला होता. चैतन्यने कसेतरी लाईटचे स्विच शोधून लाईट पुन्हा चालु केल्या. आर्मीच्या जवानांनी तोपर्यंत घुसखोरांच्या मुसक्या बांधल्या होत्या. अदिती हताशपणे सगळीकडे पाहात उभी होती. कर्नल, मास्तर दोघेही गोंधळले होते आणि .....

पख्तुनी पुन्हा एकदा त्याच्या हातावर तुरी देवुन पसार झाला होता. चैतन्यने मान उडवली, स्वतःशीच हसला...

"चलो, म्हणजे अजुन आयुष्यातली रंगत कमी झालेली नाही तर."

"आदु, तू कशी आहेस? तुझ्या डोळ्यातली ती नेहमीची शत्रुला बघितल्यावर उमटणारी थंड लहर बघितल्यावरच मी निश्चिंत झालो होतो. तुझ्यावर त्या डोटचा काही परिणाम झालेला नाही हे लक्षात आले होते. पण हे साधलेस कसे तू?"

कर्नलसाहेबांनी अदितीला विचारले तशी अदिती हसली....

"दादु, तुमचं ते स्नायु कडक करण्याचं ट्रेनिंग कामी आलं. सुदैवाने त्याने तो डोट लांबुन डार्टगनने मारलेल्या डार्टने माझ्या कातडीत इंजेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला काय माहिती की कर्नलची कारटी गेंड्याच्या कातडीची निघेल म्हणुन." अदिती कर्नलसाहेबांकडे बघून डोळा मारत म्हणाली.

"बाय द वे, अदिती...काल नक्की काय झालं तरी काय? त्याने तुला फार त्रास तर......." चैतन्यच्या आवाजात काळजी आणि पख्तुनीबद्दलचा राग दोन्ही होते.

"काय हे कॅप्टन, तू पख्तुनीला आज ओळखतोयस का? अरे पाकिस्तानी असला तरी फायटर आहे तो. इतर भेकड पाकिस्तान्यांसारखा पाठीत सुरा खुपसणारा भित्रा नाहीये. काल जेव्हा त्याच्या लोकांनी मला घेरले तेव्हा १०-११ जणांना कंठस्नान घातले मी. गुरिल्ला कमांडो ट्रेनिंग आणि कर्नल देशमुखांनी दिलेला गनिमी काव्याचा मंत्र उपयोगी पडला. पण एकंदरीत त्याच्या बोलण्या-वागण्यावरुन लक्षात आले की त्याला पराभवाची चाहुल लागलेली आहे. मग तो सगळेच गुंडाळून तुम्ही यायच्या आधीच पसार होवु नये म्हणुन मी त्याच्या आधीन जाण्याचे नाटक केले. मी ताब्यात असल्यावर तो इतका सहजासहजी हार मानणार नाही याची खात्री होती मला. तसेच झाले तो तुम्ही यायची वाट पाहात थांबला. तो डार्ट मारल्यावर पख्तुनीने स्वतः मला हिप्नोटाईझ करण्याचा प्रयत्न केला पण मी स्वतःवर ताबा ठेवण्यात यशस्वी झाले.

पण खरं सांगु कॅप्टन? एक क्षणभर वाटले त्याच्या संमोहनाचा नाही पण त्याच्या देखण्या डोळ्यांचा मोह पडतो की काय मला?"

अदितीने चैतन्यकडे पाहात डोळे मिचकावले. चैतन्याचे समाधानी डोळे गुपचुप सांगत होते की....

"आता तुझा बाप समोर आहे म्हणुन, तू भेट मला नंतर......., मग सांगतो !"

दिरगुळे मास्तर आपल्या त्या रक्षकांकडे विलक्षण प्रेमाने बघत होते. तिघांकडे बघुन त्यांनी आपले हात जोडले. स्वर सदगदीत झाले होते. तोंडातून शब्द फुटत नव्हता. किती मोठ्या संकटातून त्यांना, त्यांच्या गावाला बाहेर काढले होते या लोकांनी. कर्नलनी हलकेच त्यांच्या खांद्यावर थोपटले.

"चला मास्तर, अजुन काम संपलेले नाही, पाकड्यांनी पळवलेले गावकरी, तुमची कुशाक्का इथेच वाड्यातच कुठेतरी बंदीस्त आहेत. त्यांना शोधायचेय आपल्याला. आदु, येतेस आमच्याबरोबर की....." चैतन्यकडे बघत कर्नलने मिश्किलपणे विचारले तशी अदितीही चैतन्यला डोळा मारत म्हणाली....

"मी येते तुमच्याबरोबर कर्नल, कर्तव्य आधी. काय कॅप्टन?"

चैतन्य मनातल्या मनात चरफडत वरवर हसला. कर्नलची आणि अदितीची पाठ वळली तसा चैतन्यही मागे वळला. मागे वळुन त्याने आपल्या खिशातला तो कागदाचा तुकडा बाहेर काढला. कागदावर किरट्या अक्षरात लिहीले होते...

"इस बार जीत मुबारक हो डेडशॉट. मगर मै हार नही मानुंगा. तुमसे मुकाबले तो होते ही रहेंगे. याद रखना मै वापस आऊंगा........

"मी परत येइन...., लवकरच परत येइन....., तयार राहा एका नवीन युद्धासाठी ! "

समाप्त.

गुलमोहर: 

मंडळी... झालेल्या उशीराबद्दल क्षमस्व ! आधी ऑफीसच्या कामामुळे आणि नंतर दिवाळीच्या सुटीसाठी दहा दिवस रजेवर गेल्याने काही टाकता आला नाही. मनापासुन क्षमस्व आणि सहनशीलतेबद्दल आभार Happy
माझे आणखी एक आवडते लेखक श्री. गुरुनाथ नाईक यांना ही कथा सादर समर्पित. Happy

अरे नहीं... हे एकदमच फिल्मी इस्टाईल झालंय.... पहिले दोन भाग एकदम वेगळे आणि तिसर्‍या भागात डायरेक्ट बाबुराव अर्नाळकरच आठवले मला...

अर्नाळकर नाही...गुरुनाथ नाईक Wink
नेहमी वास्तवाला धरुनच लिहायला पाहीजे असं थोडंच आहे. कधी कधी पिटातल्या प्रेक्षकासाठी पण सिनेमा काढावा लागतोच ना? Proud

अगदीच अतर्क्य आणि ओढून ताणून कैच्या कै स्पष्टीकरणे दिलेली गोष्ट. पहिले दोन भाग आणि तिसरा म्हणजे नारायण धारपांची एक गोष्ट अर्धी ढापायाची आणि चिंतामनी लागू किंवा गुरुनाथ नाईक यांनी ढापलेली अजून एक गोष्ट पुन्हा अर्धी ढापायाची आणि त्याची प्यांटीच्या गुंड्या शर्टाला लावल्यासारखी कैच्या कैच जोडणी करायची असला परकार झाला आहे.

>>>पिटातल्या प्रेक्षकासाठी पण सिनेमा काढावा लागतोच ना?

आतापर्यंतच्या तुमच्या सगळ्या गोष्टीपण पिटातल्या क्याटेगरीतल्याच होत्या. आजकाल इकडे बोकाळलेल्या क्रमशः कादंबर्‍यांपेक्षाही भंगार. पण 'त्या' कादंबर्‍या ओरिजिनल तरी आहेत. तुमच्या गोष्टि म्हणजे सगळा चोरीचा मामला. नारायण धारप किंवा सुहास शिरवळकर यांची खूप खालच्या दर्जाची नक्कल करायची, पात्रे, प्लॉट, संवाद थोडीफार मोडतोड करून उचलायचे आणि म्हणायचे की धारपांची आठ्वण आली तर माझा गौरवच आहे. हा हा हा, चोरीच एवढ सॉलिड समर्थन !!

पण ही असंबद्ध गोष्ट सगळ्यावर वरताण आहे. तुम्हाला माझ्याकडून बप्पी लहिरी पारितोषिक ( उत्तेजनार्थ ) !!!

<<<आतापर्यंतच्या तुमच्या सगळ्या गोष्टीपण पिटातल्या क्याटेगरीतल्याच होत्या. >>>>

धन्यवाद हेडमास्तरसाहेब Happy

अरे काय हे Sad पहिले दोन भाग चांगले होते की, ही काय अवदसा आठवली शेवटी.
असे आणिबाणीच्या वेळी ड्वायलाकबाजी, अन एक्सप्लेनेशन्स वगैरे? विशाल , चेष्टा करत होतात का काय ही?
ऑपरेशन करून सुळे बसवणे वगैरे.. टू मच Lol

विशाल,

३ रा भाग नाही पचनी पडला. ही तूमची शैली नाहीये असे लगेच जाणवतेय.

भट्टी मूळीच जमली नाहीये.

तूमच्या मनाला तरी हा शेवट मानवतोय का ?

निव्वळ कथा संपवायची म्हणून संपवल्यासारखी वाटतेय.

तो पख्तुनी नक्कीच व्हॅम्पायर स्पीडने गायब झाला असावा, त्याने सांगितलेली रक्त काढून घेणाय्रा आणि नकली सुळे बसवण्याय्रा डॉक्टराची कहाणी साफ खोटी होती, कर्नल आणि आदितीला उल्लू बनवण्यासाठी. एक्च्युअली तो व्हॅम्पायरच होता आणि रंगूच रक्त पण त्यानेच शोषून घेतल आणि हेप्नॉटिझम सुध्दा व्हॅम्पायर्सना चांगल जमत. (ह.घ्या)
donald-duck-022007-30.gif

सुरूवात चांगली होती पण तिसरा भाग जमला नाही. त्यामुळे कथा फारशी आवडली नाही.
तुम्ही थोडे वेगळे कथाविषय पण ट्राय करा. तोच तोचपणा येऊ देऊ नका.

डेडशॉट हे नाव शिरवळकरांच्या पुस्तकात वाचलेय ...
फिरोज इराणीच्या ऑपोझीट असायचा तो ...
कथा तशी मस्त होती ...

विशाल ... ह्या सगळ्या मानसपुत्रांना जन्म देताना विसरू नकोस की साहित्यिक म्हणून त्यांना वाढवणाऱ्या बापाची जबाबदारी तुझी आहे ...
शिऱ्या परत दिसला नाही म्हणून म्हटले ...

निळु भाऊ शिर्‍याला लवकरच परत घेवुन येतोय. सद्ध्या अभ्यास चालुये. बँक / फोर्जरी असा विषय असणारेय. तोपर्यंत हा टीपी चालुय. Wink

आणि हो डेडशॉट उर्फ टफ जाफर हे पात्र मला फिरोजपेक्षाही जास्त आवडतं. Happy

या भागावर आलेल्या प्रतिक्रिया वाचुन मला "द विलेज" पाहिल्यावर लोकांच्या झालेल्या प्रतिक्रिया आठवल्या Happy
अगदीच अनपेक्षित शेवट झाला कथेचा. बराच स्ट्रेच्ड वाटला पण आवडला.

Pages